28 February 2020

News Flash

समान शिक्केषु…

जनगणनेचे जात, धर्मनिहाय विश्लेषण अलीकडेच जाहीर झाले. त्यानंतर एकच गदारोळ उठला.

कोणत्याही समाजाच्या उन्नतीसाठी जी काही किमान वैचारिक पातळी लागते, ती आपण घालवून बसलेलो आहोत. एखाद्याचा विचार समजून घ्यावयाचा असेल तरी आपल्याकडे काहीएक विचार असावा लागतो. तोच नसेल तर इतरांच्या विचारांचा आदर होणार कसा? अशा वातावरणात एकेकाच्या कपाळावर शिक्केमारले जातात. ते सोपे असते. त्या शिक्क्यांमुळे त्यांची त्यांची ओळख पटत असते आणि समान शिक्केवाल्यांची अशी एक कंपूशाहीही तयार होते. आपल्याकडे यापेक्षा वेगळे काय आहे?

जनगणनेचे जात, धर्मनिहाय विश्लेषण अलीकडेच जाहीर झाले. त्यानंतर एकच गदारोळ उठला. भगवी वस्त्रे घालून काहीबाही बरळणाऱ्यांनी, देशात मुसलमानांची संख्या किती वाढते आहे, हिंदूंनी कशी अधिक मुले प्रसवायला हवीत, वगैरे बडबड केली. पुरोगामी कळपातल्यांनी त्यास लगेचच उत्तर दिले. ते जणू वाटच पाहत होते, हे भगवे-वस्त्रांकित कधी काहीतरी बरळताहेत आणि आपण कधी त्यांचा पाणउतारा करतोय. हे असे प्रसंग आपल्याकडे वारंवार घडतात. एका बाजूने विचार केल्यास ही मतभिन्नता हे जिवंत समाजाचे लक्षण आहे, असा युक्तिवाद करता येईल. त्यामुळे जे काही चालले आहे ते किती बरे आहे, याचे समाधानही बाळगता येईल.

परंतु ते सारेच फसवे असेल. याची प्रमुख कारणे दोन : एक म्हणजे अशा मुद्दय़ांवर कोण काय अािण कोणत्या सुरात बोलणार, हे जणू आपल्याकडे ठरूनच गेले आहे. आपल्याकडे विचारवंत म्हणवून घेणारा कोण आहे, हे पाहिलं की तो कोणत्या प्रश्नावर काय बोलेल याचा अंदाज बांधता येतो. आणि तो सहसा चुकत नाही. हे समाजाच्या साचलेपणाचे लक्षण. विचारधारांमध्ये स्वत:ला बांधून न घेता स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्याचे बौद्धिक स्वातंत्र्य जे घेत नाहीत, त्याची किंमत द्यायची तयारी जे ठेवत नाहीत, त्यांची गणना या अशा साचलेल्यांमध्ये होते. भारतात- आणि त्यातही विशेषत: महाराष्ट्रात हे असे साचलेले आपल्याला पैशाला खंडीभर आढळतील. या गटातील व्यक्ती विषयाच्या प्रामाणिक विश्लेषणापेक्षा आपल्या विचारधारेस अधिक महत्त्व देतात. स्वत:च्या नीरक्षीरविवेकाचा आधार घेण्याऐवजी आपली विचारधारा काय सांगते, ती कोणाच्या बाजूने अनुकूल आहे, ते पाहून आपले मत बनवतात. अर्थातच त्यात प्रामाणिकपणाचा अभाव असतो. कालांतराने ही माणसे ओळखू येतात अािण काळाच्या ओघात हळूहळू संदर्भहीन होत जातात. परंतु काही काळ तरी- निदान सुरुवातीचा- समाजाचा अशा मंडळींवर विश्वास असतो. त्यामुळे ते जे काही मांडत असतात, त्यावर काहींनी विश्वास ठेवलेला असतो. म्हणजेच एका अर्थाने समाजाचे जे व्हायचे ते नुकसान अशांमुळे झालेले असते. या नुकसानीस आणखीही एक पदर आहे.

तो म्हणजे समाजापुढे वास्तव न येण्याचा! वरचेच उदाहरण घ्यावयाचे झाल्यास एक मुद्दा आवर्जून सांगता येईल. तो म्हणजे या प्रतिगामी/ पुरोगामी अशा दोन गटांतील वावदूकपणात झाकोळून गेलेली जनगणनेची आकडेवारी. ती असे दर्शवते की, २०११ ची जनगणना अािण २००१ साली झालेली जनगणना यांतील सगळ्यात मोठी बाब म्हणजे धर्म नाकारणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ! जनगणनेच्या नोंदीत एक तपशील असतो. धर्माचा. नागरिकांनी आपला धर्म तेथे नोंदणे अपेक्षित असते. परंतु या दोन जनगणनांत धर्मनोंदीस नकार देणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झालेली आहे. ही बाब प्रचंड लक्षणीय आहे. कारण एकूण लोकसंख्येतील वाढ १७ टक्के इतकीच असताना त्यातले धर्म नाकारणारे इतक्या संख्येने वाढावेत, ही खरोखरच लक्षात घ्यावी अशी बाब आहे. २००१ सालातील जनगणनेत धर्माचा रकाना रिकामा ठेवणारे जेमतेम सात लाख इतकेच होते. २०११ सालच्या जनगणनेत ही संख्या २९ लाखांवर गेली आहे.

त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे याकडे ना पुरोगाम्यांनी लक्ष दिले, ना प्रतिगाम्यांनी. हे काही अर्थातच चुकीने वा योगायोगाने झाले असे नाही. या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे ठरवून दुर्लक्ष केले गेले. तसे करणे हे उभय बाजूंना सोयीचे होते आणि आहे. मुसलमान वाढल्याची आवई ठोकून आपला कार्यभाग साधणे हे हिंदुत्ववाद्यांना सोयीचे झाले. आणि या मुद्दय़ावर हिंदुत्ववाद्यांना चार टोले हाणता आल्याने पुरोगाम्यांना आपले कथित वैचारिक पुढारलेपण सिद्ध करण्याची संधी मिळाली.

माध्यमांची भूमिका या टप्प्यावर सुरू व्हायला हवी. पण ती होत नाही, हे खरे आपले आजचे सामाजिक अपंगत्व आहे. ती का होत नाही? कारण त्यामागे असलेली माध्यमांची असहिष्णुता. ही जाणिवेतून आलेली आहे आणि बरीचशी अजाणतेपणानेदेखील. खरी समस्या आहे ती जाणिवेतून तयार झालेल्या असहिष्णुतेमुळे. माध्यमांच्या रचनेपासून तीकडे पाहता येईल.

या रचनेचा पाया माध्यमांनी आपली प्रबोधनाची भूमिका सोडून देण्याने घातला गेला. अगदी अलीकडेपर्यंत- म्हणजे आचार्य अत्रे वा त्यानंतरही गोविंदराव तळवलकरांपर्यंत माध्यमांनी- अर्थातच वर्तमानपत्रांनी आपली प्रबोधनाची भूमिका निष्ठेने सांभाळली. दलित चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आदी अनेक विषय अलीकडचे. ते हाताळताना तत्कालीन संपादकांनी आपला संपादकपदाचा आब तसूभरही सोडला नाही. संपादकपद अािण चळवळे यांतील फरक या संपादकांना पूर्णपणे ठाऊक होता आणि उगाच एकाची टोपी घालून दुसऱ्यांच्या वेशात शिरण्याचा उद्योग त्यांनी केला नाही. त्यानंतर मात्र परिस्थिती झपाटय़ाने बदलत गेली. या बदलात तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या.

एक म्हणजे संपादक अािण चळवळे यांतील दरी मिटून गेली किंवा लक्षणीयरीत्या कमी झाली. याचे कारण काही संपादकांनी सामाजिक बांधीलकी वगैरे फसवे शब्द वापरत राजकीय व्यासपीठांवर जाण्यास प्रच्छन्नपणे सुरुवात केली. ही वाईट पायंडय़ाची सुरुवात होती. राजकीय व्यासपीठावर अर्थातच या आणि अशा पत्रकारांचे स्वागतच झाले. वर्तमानपत्र वा अन्य कोणतेही माध्यम कितीही टिनपाट का असेना; त्याचा संपादकच आपल्या मांडवात येऊन प्रसिद्धी करावयास तयार आहे म्हटल्यावर कोरडय़ाठाक झालेल्या राजकीय पक्षांनाही हिरवळ येते. त्यामुळे या पत्रकारांचे राजकीय व्यासपीठांवर स्वागतच झाले. ते स्वागत वस्तुत: या पत्रकारांमागच्या माध्यमाच्या प्रभावळीचे होते. परंतु ते आपल्या बुद्धिवैभवाचे आहे असा गैरसमज या पत्रकारांनी करून घेतला. याचा परिणाम असा झाला की या माध्यमवीरांपासून प्रामाणिक पत्रकारिता दूर गेली. खेरीज समव्यावसायिकांनी या पत्रकारांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रामाणिकपणा दाखवला नाही. त्यामुळे हे पत्रकार ज्या राजकीय पक्षांचा झेंडा खांद्यावर घेऊन निघाले होते त्याच्या विरुद्ध राजकीय विचारसरणीवाले त्या पत्रकारांविरोधात अधिकाधिक आक्रमक होत गेले. म्हणजे झाले असे, की या राजकीय पक्षांची भूमिका त्या राजकीय पक्षांच्या भूमिकेविरोधात होती. परंतु त्या राजकीय पक्षांची टोपी पत्रकारांच्या डोक्यावर असल्यामुळे ती प्रत्यक्षात पत्रकारांविरोधात आहे असे मानले गेले. तसा दुटप्पीपणा पत्रकारांनीच मोठय़ा प्रमाणावर केला. याबाबत हे पत्रकार राजकीय नेत्यांपेक्षा अधिक अनैतिक निघाले असे छातीठोकपणे म्हणता येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे याच काळात माध्यमांच्या उथळीकरणास ऊत आला. तसे करण्यातही आघाडीवर पत्रकारच होते. या पत्रकारांना विद्वत्तेचे वावडे होते आणि बुद्धिजन्य व्यवहारांचे अपंगत्व होते. पत्रकारितेचे दुर्दैव म्हणजे याच काळात खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांमुळे मनोरंजन उद्योगाचा प्रस्फोट झाला. इतके दिवस नाटक वा सिनेमांसाठी नाटय़ वा सिनेगृहांत उठून जावे लागत असे. दूरचित्रवाणीच्या पडद्याने ती गरज घरच्या घरी भागवण्याची सोय केली. मनोरंजनासाठी सोय हा घटक इतका निर्णायक ठरला, की सपक असले, तरी घरपोच असल्यामुळे मिळेल ते स्वाहा करण्याची सवय दर्शकांना लागली. याचा परिणाम माध्यमांनी आपल्यावर करून घेतला. म्हणजे माध्यमांचे मनोरंजनीकरण सुरू झाले. विचार मागे पडला. आणि चंमतग करणे म्हणजे पत्रकारिता असे चित्र तयार होऊ लागले.

तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे खाजगी दूरचित्रवाणीवरील बातम्यांचा सुळसुळाट. या माध्यमाची दर्शकांना आकर्षून घेण्याची क्षमता मोठी असली तरी त्यात जखडून ठेवण्याची क्षमता मात्र नाही. जोपर्यंत दूरदर्शनसारखी एकच एक वाहिनी होती तोपर्यंत ठीक होतं, परंतु खाजगी वाहिन्यांचा सुळसुळाट झाल्याने रिमोट नावाचे एक भलतेच क्रूर हत्यार दर्शकांच्या हाती गवसले. तीस सेकंदांच्या वर एखादी वाहिनी दर्शकांना बांधून नाही ठेवू शकली, की दर्शक लगेचच दुसरीकडे जाण्यास तयार! मनोरंजन क्षेत्रातली ही एका अर्थी बदफैलीच. परंतु ती इतकी सर्रास होते, की एखाद्या वाहिनीशी निष्ठा नाही याबद्दल कोणालाच तसे काही वाटत नाही. या इतक्या घरभेदी वृत्तीमुळे दर्शकांना बांधून ठेवणे, हे आणि हेच वाहिन्यांसमोरील उद्दिष्ट राहिले. आता दर्शकांना खिळवून ठेवणे हेच जर उद्दिष्ट असेल तर वैचारिकतेस पहिले गचांडी धरून बाहेर काढणे आलेच. म्हणजेच जे काही द्यावयाचे ते मनोरंजनाच्या रूपातच.

याचाच अर्थ न्या. रानडे, आगरकर, टिळक, फुले, आंबेडकर वगैरे विचारी मंडळींना या सर्वानी अडगळीत टाकून दिले. कारण आता त्यांचा काही उपयोग नव्हता. आता हीच मंडळी मोडीत निघाल्यावर नरहर कुरुंदकर वा दुर्गाबाई भागवत यांचा माध्यमांना काही उपयोगच नव्हता. अशा तऱ्हेने माध्यमांनी विचारपरंपरेशी असलेली आपली नाळ स्वहस्ते तोडली. अािण एकदा का विचारांशी नाते तुटले, की मी म्हणेन ती पूर्व अशीच परिस्थिती तयार होते.

मराठी पत्रकारितेमध्ये ती अवस्था आता आलेली आहे. यास जसे वर्तमानपत्रांचे मालक जबाबदार आहेत, तितकेच पत्रकारही जबाबदार आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता अनेक वर्तमानपत्रांच्या मालकांना आपल्या नाकाखाली काय चालले आहे याचा गंध नाही. तो घेण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांचे सर्व लक्ष अािण प्रयत्न आहेत ते वर्तमानपत्र नावाची दुभती गाय जास्तीत जास्त कशी पिळता येईल, हा. मिळेल त्या मार्गाने जाहिराती कमावणे अािण आपल्या हातातील माध्यमाच्या साहाय्याने आपले काळे धंदे जमेल तितके झाकणे, हे त्यांचे माध्यमधोरण. त्यामुळे आज मराठीत अनेकांना अनेक बचत योजनांत टोप्या घालून स्वत:ची समृद्धी साधणारा, एक डान्सबार मालक, एक सदैव राज्यसभा इच्छुक, तर एक सर्वपक्षीय लाचार अशा मंडळींच्या हाती माध्यमे आहेत.

हे वाचून काहींना असा प्रश्न पडू शकतो की, याचा सहिष्णुतेच्या अभावाशी काय संबंध?

तो आहे. याचे कारण सहिष्णुता या गुणासाठी काही किमान सत्त्व असावे लागते. त्याचाच अभाव आज माध्यमांमध्ये असल्यामुळे या अशा सत्त्वहीन, मूल्यहीन व्यक्तींकडून कोणत्या वैचारिक मोकळेपणाची अपेक्षा ठेवता येईल? अशा वातावरणात आपले घोडे दामटणे हे एकमेव ध्येय अशा बनावट माध्यमी मंडळींच्या हाती असते. ते दामटायचे झाले तर इतरांची फिकीर करून चालत नाही. तेच तर नेमके आता होताना दिसते आहे.

आणि दुसरे असे की, मुदलात या माध्यमांच्या आडातलेच वैचारिकतेचे झरे पार कोरडेठाक पडून गेलेले असल्यामुळे त्यांच्या हातातील माध्यमांत त्यांचा ओलावा कसा दिसणार? काहीजण तसा तो दाखवायचा प्रयत्न करतात; परंतु तो अगदीच वरवरचा असतो. परिणामी वाचकांचा वा दर्शकांचादेखील या मंडळींच्या सहिष्णुतेवरील दाव्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्यांना आज काहीही मोल नाही, हे वास्तव आहे. या मूल्यांची भाषा करणारे आपले मोल घालवून बसलेले असल्यामुळे हे शब्द म्हणजे बापुडे केवळ वारा ठरले आहेत. राजकारणात ज्याप्रमाणे केवळ सवयीने ‘या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात’ हे शब्द उच्चारले जातात, ते उच्चारणाऱ्यांचा या तिघांच्या परंपरेशी काही संबंध असतोच असे नाही, हे जसे आता किमान विचारी नागरिकांना कळून चुकले आहे, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरेंचे झाले आहे.

अशा तऱ्हेने कोणत्याही समाजाच्या उन्नतीसाठी जी काही किमान वैचारिक पातळी लागते, ती आपण घालवून बसलेलो आहोत. एखाद्याचा विचार समजून घ्यावयाचा असेल तरी आपल्याकडे काहीएक विचार असावा लागतो. तोच नसेल तर इतरांच्या विचारांचा आदर होणार कसा? अशा वातावरणात एकेकाच्या कपाळावर शिक्केमारले जातात. ते सोपे असते. त्या शिक्क्यांमुळे त्यांची त्यांची ओळख पटत असते आणि समान शिक्केवाल्यांची अशी एक कंपूशाहीही तयार होते. आपल्याकडे यापेक्षा वेगळे काय आहे? सगळा प्रयत्न असतो तो कपाळावर कोणता शिक्का आहे, त्याचा शोध घेण्याचा! एकदा का असा शिक्का सापडला, की त्या व्यक्तीची योग्य ती वासलात लावता येते. त्याला कोणत्या चौकटीत बसवायचा, त्याचे किती ऐकायचे, वगैरे हिशेब लगेच मांडता येतात.

प्रश्न असतो तो ज्यांच्या कपाळावर शिक्के नाहीत आणि जे शिक्के लावून घ्यायला तयार नाहीत, त्यांचे काय करायचे, हा. अशा वातावरणात सहिष्णुता मूळ धरूच शकत नाही. सध्या आपल्याला याचाच तर अनुभव येत आहे. सर्व काही ‘समान शिक्केषु व्यसनेषु सख्यम्’ असेच सुरू आहे. अशावेळी कोणत्याही रंगाचा शिक्का आपल्या कपाळावर लागणार नाही, आपले शील या शिक्क्यांपासून मलिन होणार नाही याची खबरदारी घेणे, हे खऱ्या विचारीजनांसमोरचे आव्हान आहे.
गिरीश कुबेर

First Published on February 8, 2016 12:38 pm

Web Title: indian politics and society
Next Stories
1 निमित्त.. मात्र!
2 हवंहवंसं तरणं गाणं…
3 संगीताने आयुष्यात ठेहराव येतो…
Just Now!
X