14 August 2020

News Flash

नंदनवनं महानगरांतली!

जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

शहरातली जंगले

१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.

..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

मार्गशीर्ष पौर्णिमेची रात्र. बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं. जंगलातील जमिनीवरील शुष्क पालापाचोळ्यावर पूर्णचंद्राचे चित्रविचित्र कवडसे पडले होते.. पानगळ झालेल्या झाडांमधून अलगद झिरपत. मधल्याच काहीशा सखल आणि उजाड पठारावरील एकांडं, काटेरी बांध्याचं सावरीचं झाड चांदण्यात चमचमत होतं. झाड लालचुटूक फुलांनी बहरलं होतं. काही पतंग आणि छोटी वटवाघळं अधूनमधून त्या फुलांवर भिरभिरत होती. ते चांदण्यानं चिंबलेलं छोटं पठार सोडलं तर चहुबाजूंची काहीशी शुष्क, पण तरीही गर्द हिरवाई छायाप्रकाशाच्या खेळाने अनोखी, गूढगर्भ वाटत होती. जमिनीचे चढउतार आणि मधूनच रांगणारा शुष्क ओढा परिसराला एक आगळंच त्रिमिती परिमाण देत होते. सखल पठाराच्या पूर्वेकडील टेकाडावर गर्द झाडोऱ्यात लपलेल्या एका उंबर वृक्षाखालील एका कातळावर आम्ही तिघंजण लपून, सावधतेने आणि अधीरतेने श्वास रोखून बसलो होतो- त्या सावरीच्या पायथ्याशी टक लावून, डोळ्यांत तेल घालून. त्या गहिऱ्या आसमंताशी विसंगत असं काही तिथे होतं. सावरीच्या झाडाला बांधलेली एक बकरी अधूनमधून झाडाला घिरटय़ा मारत होती. मधूनच बसत होती. मधेच उठून बाजूच्या हिरव्या पाल्याच्या ढीगाला नाखुशीने कुरतडत होती. अचानक बावरून चिरक्या आवाजात ओरडत आजूबाजूच्या शांततेला अस्वस्थ करत होती. तिला दूरवरून मधूनच आर्त स्वरात साथ देत होती एक टिटवी. संध्याकाळपासून आम्ही तिथे थंडीत कुडकुडत बसलो होतो. डोळ्यांसमोर घोंघावणाऱ्या किमरांचा आणि कानांजवळ गुणगुणणाऱ्या डासांचा सामना करत. पण आम्हाला अपेक्षित नाटय़ काही घडत नव्हतं.. आता मध्यरात्र टळली तरी! चुकून डोळा लागू नये म्हणून आम्ही एकमेकांना अधूनमधून डिवचत होतो. तरीही डुलक्या यायला लागल्या होत्या. काहीशी निराशा दाटायला लागली होती मनात. तोच आमच्या पुढय़ातच कोणीतरी अलगद झेप घेतली. दोन-तीन उडय़ांतच ती गर्द छाया समोरील सावरीकडे पोचली. क्षणभर चांदण्यात कांती झळाळली. क्षणार्धात् त्या बकरीवर झेप घालून, तिला आपल्या जबडय़ात पकडून बाजूच्याच ओढय़ाच्या मार्गाने ती छाया हिरवाईच्या गहिऱ्या अंधारात विलीन झाली. हे निमिषनाटय़ आसमंताच्या नकळत घडून गेलं. त्या बिचाऱ्या बकरीला तर आकांत करायलाही वाव मिळाला नाही. आम्ही मंत्रमुग्ध अवस्थेत तो क्षण डोळ्यात साठवण्याचा, मन:पटलावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो. अचानक एका कल्पनेने माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे हा बिबटय़ा इतका वेळ आपल्या डोक्यावरच, उंबराच्या फांदीवर बसला होता की काय? आपण बेसावध होण्याच्या क्षणाची वाट पाहत?

हे नाटय़ घडलं होतं मुंबईजवळच्या बोरीवली राष्ट्रीय वनात. १९७८ च्या हिवाळ्यात. तिथल्या बिबटय़ांच्या जीवनक्रमाच्या अभ्यासाचा हा एक भाग होता. सुमारे दोन वर्षे चाललेल्या या अभ्यासातून या वनातील बिबटय़ांचा जीवनपट प्रकट होत होता. त्यातून तिथल्या आदिवासी पाडय़ांवरील मुलांवर झालेल्या बिबटय़ांच्या हल्ल्यांच्या कारणांचे धागे उलगडत होते. आज सुमारे ३५ वर्षांनी या वनातील बिबटय़ांची बरीच तपशीलवार माहिती अनेक अभ्यास उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यासमोर आली आहे. आपल्या मुंबईचे ‘राजे’ अनेक आहेत; पण मुंबईच्या अतुलनीय राष्ट्रीय वनाचा अनभिषिक्त राजा एकच- इथला प्रसिद्ध बिबटय़ा!

वनखात्याच्या प्राणीगणनेनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० बिबटे आहेत. १०४ चौ. कि. मी. वनक्षेत्राच्या प्रमाणात ही संख्या समतोल वाटते. पण या वनक्षेत्राला मुंबई महानगराने विळखा घातला आहे. प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी दिवसागणिक वाढणारं महानगर हा विळखा आवळत चालला आहे. मुंबई महानगराची परिस्थिती आज स्फोटक झाली आहे. या महानगराच्या लोकसंख्येची घनता आज विक्रमी झाली आहे. जगात सर्वोच्च! प्रति चौ. कि. मी.ला सुमारे ३१,००० माणसं! जायचं कुठे इतक्या माणसांनी? मग सुरू झालं अतिक्रमण. मोकळ्या जागांवर, वनक्षेत्रावर. २००२ ते २००४ या कालावधीत या वनक्षेत्राच्या परिसरात एकच हाहाकार उडाला. बिबटय़ांच्या हल्ल्यात ८४ व्यक्ती सापडल्या. काही मृत्युमुखी पडल्या, तर काही जबर जखमी झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू झाली. अतिक्रमणं उठवली. पुनर्वसन सुरू झालं. वनक्षेत्राभोवती कुंपण उभं राहायला लागलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्राभोवती ना-विकास पट्टय़ाच्या आखणीची चाचपणी सुरू झाली. वनखात्यानेही सुरक्षाव्यवस्था वाढवली. भटक्या बिबटय़ांना पडकून त्यांचं योग्य वन-परिसरात पुनर्वसन सुरू झालं. बिबटय़ांचं नैसर्गिक भक्ष्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिसरातल्या जनतेसाठी लोकशिक्षण सुरू झालं. अनेक संशोधक वन्यजीव- मानव संघर्षांचा अभ्यास करायला लागले. या सर्व प्रयत्नांचा चांगला परिणाम आता दहा वर्षांनंतर काही प्रमाणात दिसायला लागला आहे. वनक्षेत्रासभोवतालच्या वसाहतींमधल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट व्हायला लागली. भटके कुत्रे कमी झाले. बिबटय़ांचा बाहेरील प्रादुर्भाव कमी झाला. संघर्षांची धारही कमी झाली. आज इथल्या शाळांमधल्या मुलांना आपल्या बिबटय़ाचा अभिमान वाटायला लागला आहे. बिबटय़ाही सावध अंतर ठेवून वनक्षेत्रातच वावरायला लागला आहे. मुंबईचा बिबटय़ा हा आता शहरी जैवविविधतेचं, वनसंवर्धनाचं मानाचं प्रतीक झाला आहे. त्याची ख्याती साता समुद्रापलीकडे पोचली आहे.

जगातील कुठच्याही महानगराला नसलेलं असमान्य वैभव मुंबईला लाभलं आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या साधारण मध्यावरील कोंदणातील पाचूचं वन- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. १०४ चौ. कि. मी. चा अतिरम्य नैसर्गिक वन- परिसर, त्यातील आपल्याला आज माहीत असलेल्या सुमारे १३०० हून अधिक वनस्पतींच्या जाती, ३५ जातींचे वन्यप्राणी, २७५ जातीचे पक्षी, ७८ जातींचे सरपटणारे प्राणी, १७० जातींची फुलपाखरं, असंख्य कीटक आणि सूक्ष्म प्राणीजीवन. आश्चर्यकारक जैवविविधता. शिवाय परिसरातही विविधता. डोंगरदऱ्या, कातळी पठारं, झरे, नद्या, खाडी, दोन मोठे जलाशय, मिश्र पानगळीचं जंगल, तिवरांचं जंगल, मधूनच आदिवासी पाडे आणि प्राचीन बौद्ध गुंफांचं मायाजाल. या वनाच्या रूपात महाराष्ट्राच्या प्रिय सह्याद्रीचंच प्रतीक मुंबईत वर्षांनुर्वष उभं आहे.. सभोवतालच्या ओसांडणाऱ्या मानवी समुद्राला आसरा देत!

या भूभागाचा इतिहास तसा फार प्राचीन. अरबी समुद्रावरचं सोपारा आणि उल्हास खाडीवरचं कल्याण ही सामान्य युगापूर्वी सुमारे तीन शतकं या काळापासून अनेक देशांशी आणि देशांतर्गतही व्यापारविनिमय करणारी प्रसिद्ध बंदरं. त्या काळातील बौद्ध व जैन धर्माच्या अनेक खुणा, शिलालेख इथल्या उत्खननात सापडले आहेत. महाराष्ट्रात इथूनच सुरुवात झालेल्या बौद्ध धर्माची सर्वात मोठी वसाहत (११०) गुंफा सामान्य युगापूर्वी सुमारे दोन शतकांपासून कान्हेरीच्या घनदाट अरण्यातील अग्निजन्य कातळात कोरली गेली आणि पुढे सामान्य युगाच्या सुमारे ११ व्या शतकापर्यंत ती कार्यान्वित राहिली. इथल्या चैत्य आणि विहारांतून गौतम बुद्धाच्या प्रार्थना गुंजत राहिल्या आणि त्याच्या शांततेच्या व निसर्गाशी एकरूपतेच्या संदेशाचा प्रसार परिसरात होत राहिला. कान्हेरी आणि तुंगारेश्वर पर्वतातील पायवाटांनी ही बंदरं आण पूर्वेकडील प्रदेश जोडले गेले. पण तरीही या परिसरात मानवी वस्ती तुरळकच होती. पर्वतराजी घनदाट, निबीड अरण्याने व्यापलेली होती. या पर्वताचं प्राचीन नाव कान्हेरी किंवा कृष्णगिरी असं होतं. तिथल्या काळ्याकभिन्न कातळाला समर्पक असं. पुढे मराठा, पोर्तुगीज आणि इंग्रज राजवटींखाली वसई, ठाणे आणि मुंबई इथे शहरीकरण सुरू झालं आणि इंग्रजांच्या राजवटीत या अरण्यातल्या बोरीवलीजवळील सुमारे २० चौ. कि. मी. जंगल परिसराला ‘कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान’ या नावाने संरक्षित केलं गेलं. तर इतर वन- परिसर हा राखीव वनप्रदेश म्हणून ठेवला गेला. मुंबई महानगर तसं नशीबवान! एरवी शहरीकरणाच्या झपाटय़ात असे वनप्रदेश प्रथम नष्ट होतात. लाकडासाठी वृक्षतोड, दगड-मातीसाठी खाणकाम, जमीन बळकावण्यासाठी अतिक्रमण वगैरे विध्वंसामुळे! पण मुंबईच्या बाबतीत हा एक चमत्कारच- किंवा त्यावेळच्या राज्यकर्त्यांची दूरदृष्टीच म्हणायला पाहिजे. कृष्णगिरी वनाचा संरक्षित परिसर वाढवला गेला. १९६९ सालापासून बाजूची राखीव जंगलं अंतर्भूत करून या राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्र आज १०४ चौ. कि. मी. इतकं वाढवलं गेलं आहे. १९७४ मध्ये त्याचं नामकरण ‘बोरीवली राष्ट्रीय उद्यान’ असं आणि पुढे १९८४ मध्ये ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ असं करण्यात आलं. खरं तर अशा नैसर्गिक अरण्याला ‘उद्यान’ म्हणणं हेच मुळात चूक आहे. आपण त्याला यथार्थ अशा ‘अरण्य’ या नावानेच संबोधू या. १९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुंबईच्या साष्टी बेटावरील हे अरण्य उत्तरेच्या तुंगारेश्वर आणि तानसा परिसरातील अरण्याशी सलग होतं. आणि त्या काळात या अरण्यात बरेच वाघही अस्तित्वात होते. हे वाघ मुंबई बेटांच्या परिसरात माझगाव, माहीम, मलबार टेकडीपर्यंत दिसत असल्याची नोंदही आढळते. १८५८ मध्ये बहुधा शेवटचे दोन वाघ इथे मारले गेले. २००३ मध्ये पुन्हा एकदा वाघाच्या पायांचे ठसे या वनाच्या उत्तरेकडील परिसरात दिसले. पण तो बहुधा कुठूनतरी दूरच्या वनातून इकडे भरकटलेला चुकार वाघ असावा. या वन-परिसरात चार नद्याही उगम पावतात. दहिसर, पोइसर, ओशिवरा आणि मिठी. इंग्रज राजवटीत मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी या वन-परिसरात दोन जलाशयांची निर्मिती करण्यात आली. १८६० साली मिठी नदीवर विहार धरण आणि १८६८ मध्ये दहिसर नदीवर तुळसी धरण बांधण्यात आलं. या वन परिसरात या जलाशयांत आणि नद्यांतून आजही स्वच्छ पाणी वाहत असतं. मात्र, बाहेरील शहर परिसरात येताच ते प्रदूषित होतं. या जलाशयांच्या आसऱ्याने इथे मगरी आणि अनेक पाणपक्षी वास्तव्य करून आहेत. हे अरण्यच या नद्यांची, जलाशयांची माता आहे. मुंबई महानगरासाठी हे अरण्य म्हणजे हवेचं शुद्धीकरण करणारी फुप्फुसं, तर इथले जलाशय हे भूजलाचं शुद्धीकरण करणारी मूत्रपिंडच आहेत.

आता २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र या अरण्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. स्वार्थी राज्यकर्ते, विकासक, अतिश्रीमंत व्यापारी व उद्योजक आणि निवाऱ्यासाठी असहाय गरीब जनता यांचा एकत्रित विळखा या अरण्याला गिळंकृत करायला पाहत आहे. परंतु एक प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच उभा राहत असेल की, महानगराची लोकसंख्या सतत वाढत असताना, अनेकांच्या आशा-आकांक्षा, रोजगार, पोटापाण्याचे उद्योग या शहरावर अवलंबून असताना हे अरण्य आणि एवढा मोठा परिसर हा इथल्या विकासाला असलेला अडसरच नाही का? ‘महानगरातलं अरण्य’ हा एक अद्भुतरम्य कल्पनाविलास तर नाही ना? आपण जागतिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून सर्वसमावेशक विचाराने या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू या.

१९६२ मध्ये अमेरिकेत एका पुस्तकाने खळबळ उडवून दिली. हे पुस्तक होतं- ‘सायलेंट स्प्रिंग’! रेशेल कार्सन या लेखिकेचं. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने आणि शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं. तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली आणि त्याची दखल सरकारला घ्यावीच लागली. डी. डी. टी. च्या कृषिक्षेत्रातील वापरावर देशव्यापी बंदी घालण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचं लोकआंदोलन सुरू झालं आणि अमेरिकन सरकारने ‘पर्यावरण संरक्षण निगम’ स्थापन केला. या पुस्तकामुळे जगभरच पर्यावरण, निसर्ग, पारिस्थितिकी अभ्यास, जैवविविधता इत्यादी विषय विद्यापीठं, संशोधन केंद्रं, प्रयोगशाळा यांतून बाहेर येऊन लोकाभिमुख झाले, पर्यावरण आंदोलनाचे भाग झाले. सामान्य जनतेच्या पर्यावरणीय संवेदनक्षमतेला सुरुवात झाली. तिला पर्यावरण संवर्धनाची, लोकजागृतीची आणि लढय़ाची दिशा मिळाली. जगभरचे हे लढे साधे-सोपे नाहीत. त्यांना सातत्याने उद्योजकांकडून, विकासकांकडून, राजकारण्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधाला, दादागिरीला सामोरं जावं लागतं.

ही पर्यावरण चळवळ भारतात पोहोचायला १९७५ साल उजाडलं. पर्यावरणस्नेही पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात प्रथमच पर्यावरण, निसर्गसंवर्धनाचे कायदे अमलात आले. केरळमधील जनतेचा विरोध असलेला ‘सायलेंट व्हॅली’ प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे रोखला गेला. तिथल्या कुंतिपुरा नदीच्या खोऱ्यातील अरण्य आणि वन्यजीवांचा जणू पुनर्जन्मच झाला. १५ नोव्हेंबर १९८४ रोजी या परिसराला ‘सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान’ म्हणून संरक्षित करण्यात आलं. ‘सायलेंट स्प्रिंग’ ते ‘सायलेंट व्हॅली’ अशी झालेली ही पर्यावरण चळवळीची वाटचाल सततच दोलायमान राहिली आहे. सध्याच्या अतिशहरीकरणाच्या झंझावातात तर ही चळवळ असहायतेच्या बाजूला झुकायला लागली आहे. ३ ते १४ जून १९९२ या कालावधीत ब्राझीलमधील रिओ शहरात झालेल्या संयुक्त राष्ट्र संघ आयोजित ‘अर्थ समिट’मध्ये १७२ देश सहभागी झाले होते आणि त्यातून या विषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच चालना मिळाली. यातूनच पुढे विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून निसर्ग/ पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, जैवविविधता, ॠतुमानबदल, शहरी वने इत्यादी विषयांवर सकारात्मक चर्चा व्हायला लागल्या. त्या दिशेने प्रत्यक्ष प्रयत्न व अंमलबजावणीही सुरू झाली.

धरतीवरील जीवसृष्टीला आधारभूत प्रणालीच्या अस्तित्वासाठी वनांची नितांत गरज आहे. वनं प्राणवायूची निर्मिती करतात. कर्बसाठा सांभाळतात/ वाढवतात. हवामान समतोल राखतात. भूजलाचा साठा व त्याचे शुद्धीकरण करतात. जमिनीची धूप व मरूभूमीकरण रोखतात. वन्यजीवांना आधार देतात. संपूर्ण परिसंस्था सुदृढ ठेवतात. वनं मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक विकासाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे साहाय्य करत असतात. आज पृथ्वीवर सर्व प्रकारच्या वनांनी व्यापलेला परिसर एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २५% आहे आणि सध्याच्या विकासाच्या अतिहव्यासामुळे त्यात दर दिवसाला सुमारे २०० चौ. कि. मी. वन परिसर नष्ट होत आहे. आज दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक (भूप्रदेशाच्या सुमारे ५०%) वनप्रदेश आहे, तर आशियात सर्वात कमी (भूप्रदेशाच्या सुमारे २०%) वनप्रदेश आहे. यातील नैसर्गिक वनांचं- म्हणजेच अरण्यांचं प्रमाण फारच कमी आहे आणि ‘विकासा’चा सर्वात मोठा घाला या अरण्य प्रदेशांवर आहे. जगभर दरवर्षी सुमारे ६० हजार चौ. कि. मी. अरण्यप्रदेश नष्ट होत आहे. या विध्वंसावर काहीसं नियंत्रण ठेवण्यासाठी काही पर्याय पुढे आले व त्यातून काही प्रमाणं सुचवली गेली. पृथ्वीच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे ३३% भाग अरण्यांखाली (नैसर्गिक जंगलं, वन्यजीवांसाठी), सुमारे ३३% भाग हरित (वनं, उद्यानं, टेकडय़ा, नद्या, ओढे, जलाशय, शेती वगैरे- वन्यजीव आणि मानव दोघांसाठीही)आणि उरलेला सुमारे ३४% भाग हा मानवाच्या विकासकामांसाठी (गावं, शहरं, महानगरं आणि त्यातील सुविधांसाठी) असावा अशी कल्पना साधारणपणे सर्वमान्य झाली आहे. आज जगभरात यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातला प्रमुख प्रयत्न आहे अरण्य परिसरांचं संवर्धन. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की, नैसर्गिक अरण्य परिसंस्था या हजारो वर्षांच्या सातत्याच्या उत्क्रांतीतून निर्माण होत असतात.

मानवाला अशी निर्मिती केवळ अशक्यप्राय आहे. म्हणूनच आता असलेल्या अरण्यांचं काळजीपूर्वक, शास्त्रीय पद्धतीने संरक्षण व संवर्धन करणं अत्यावश्यक ठरतं. त्याला पूरक प्रयत्न म्हणजे इतर हरित भूप्रदेशात आणि विकसनशील भूप्रदेशातही वनप्रदेशांची, निसर्ग उद्यानांची निर्मिती करणं. यातूनच शहरी वनांची संकल्पना आली आणि आज जगभर त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जगभरच्या काही महानगरांतील या प्रयत्नांची एक झलक आपण घेऊ.

आज जपानमधील टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. या महानगराच्या मध्यावर ७२ हेक्टर परिसरात गेल्या सुमारे ८० वर्षांत मुख्यत: देशी वनस्पतींची लागवड करून एका निसर्गरम्य वन-उद्यानाची निर्मिती केली गेली आहे. हे उद्यान ‘मिजी पवित्र वन’ म्हणून ओळखलं जातं. जपानचे भूतपूर्व महाराज मिजी यांच्या स्मरणार्थ उभाारलेल्या या वनोद्यानात ३६५ जातींच्या सुमारे एक लाखावर सदाहरित वनस्पती आहेत. आणि त्यांच्या आसऱ्याने तिथे विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरं व इतर छोटे वन्यजीव वावरत असतात. याशिवाय चेरी वृक्षांच्या एकत्रित बहरासाठी जगप्रसिद्ध असलेलं ‘युएनो पार्क’ हेही टोकियो शहराचं आकर्षण आहे.

लोकसंख्येने जगात ११ व्या क्रमांकावर असलेलं न्यूयॉर्क शहर हे तिथल्या ‘सेंट्रल पार्क’साठी प्रसिद्ध आहेच; पण त्याशिवाय या शहरातील उद्यानांनी शहराचा सुमारे २०% भाग व्यापलेला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांनी २०१७ पर्यंत आणखी सुमारे दहा लाख झाडं लावण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. न्यूयॉर्क शहराच्या मध्यावरील ‘सेंट्रल पार्क’ या वनोद्यानाला अमेरिकन सरकारने ‘देशाचा ऐतिहासिक मानदंड’ म्हणून १९६२ मध्ये सन्मानित केलं आहे. सुमारे ३४१ हेक्टर परिसरात हे वनोद्यान १८५७ ते १८७३ या कालावधीत उभारलं गेलं. त्यानंतरही त्यात अनेक सुधारणा, बदल सातत्याने करण्यात आले. या वनोद्यानात वैविध्यपूर्ण परिसर आहेत, विश्रांतीसाठी व खेळासाठी जागा आहेत, जलाशय आहेत, कारंजी आहेत, करमणुकीसाठी जागा आहेत, निसर्ग-भ्रमंती मार्ग आहेत. जवळजवळ प्रत्येकासाठी काही ना काही करण्यासाठी, निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी इथे सोय आहे. वेगवेगळ्या ॠतूंत निसर्गाची बदलती रूपं इथे पाहायला मिळतात. हे उद्यान इतकं लोकप्रिय आहे की वर्षभरात सुमारे चार कोटी माणसं इथला निसर्ग अनुभवतात. इथली जैवविविधताही वैशिष्टय़पूर्ण आहे. इथे देशी आणि विदेशी जातींचे सुमारे २५ हजार वृक्ष व अनेक वनस्पती आहेत. इथे सुमारे २३५ जातींचे पक्षी, विविध छोटे प्राणी आणि कीटक आढळतात.

याशिवाय लंडन महानगरातील ‘हाइड पार्क’, जर्मनीतील म्युनिक शहरातील ‘इंग्लिश गार्डन’, सॅनफ्रान्सिस्को महानगरातील ‘गोल्डन गेट पार्क’, कॅनडातील व्हॅंॅकुव्हर शहरातील ‘स्टॅन्ले पार्क’, फ्रान्समधील पॅरिस महानगरातील ‘बूआ दे वेनसेन्ने’ आणि ‘बुआ दे बूलोने’, अमेरिकेतील फिलाडेल्फिया महानगरातील ‘फेअरमाऊंट पार्क’, चीनची राजधानी बीजिंग महानगरातील ‘चाओयांग पार्क’ ही काही आंतरराष्ट्रीय मोठय़ा उद्यानांची उदाहरणं.

२००३ साली दक्षिण ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड या संपूर्ण महानगराच्याच हरितीकरणाचा प्रकल्प परिसंस्था व जैवविविधता संवर्धन या दृष्टिकोनातून हाती घेतला गेला. या प्रकल्पांतर्गत महानगरातील ३०० उद्यानांचं एकत्रित जाळं विणून सुमारे ३० लाख देशी वृक्ष आणि झुडपांची लागवड २०१४ सालापर्यंत करण्यात आली.

जगातलं सर्वात मोठं मानवनिर्मित शहरी वन दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या महानगरात आहे. ३३५ चौ. कि. मी. चं शहर, तर १६४५ चौ. कि. मी. च्या या महानगराची लोकसंख्या सुमारे ४५ लाख आहे. इथला ‘क्लिपरिविअर्सबर्ग नेचर रिझव्‍‌र्ह’ हा सुमारे ७०० हेक्टरचा जैवविविधता आणि इतिहास यासाठी प्रसिद्ध परिसर १९८४ मध्ये जनतेसाठी खुला केला गेला आणि लवकरच त्याला ‘जोहान्सबर्गचं रत्न’ अशी लोकमान्यता मिळाली. वनस्पतींची विविधता, झेब्रा, हार्टबिस्ट, वाइल्डबिस्टसारखे वन्यप्राणी, सुमारे २१५ जातींचे पक्षी व समृद्ध कीटकजीवन इथे आढळतं. दक्षिण आफ्रिकेतीलच केपटाऊन हे शहर ४०० चौ. कि. मी. चं, तर त्याचा महानगरीय परिसर २४४५ चौ. कि. मी. चा आहे. या महानगरातील लोकसंख्या सुमारे ३८ लाख इतकी आहे. या शहरातील ‘टेबल माऊंटन नॅशनल पार्क’ची निवड २०११ साली जगातील सात नव्या निसर्ग-आश्चर्यात केली गेली. २२१ चौ. कि. मी. परिसरात पसरलेलं हे राष्ट्रीय उद्यान भूशास्त्र, फिनबॉस खुरटं वन, प्रोटिया फुलं आणि विविध वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. या वनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सातत्याने अनेक प्रयत्न केले जातात. इथलं नियंत्रित निसर्ग पर्यटनही वाखाणण्याजोगं आहे. आज जगातील महानगरांतील हे एकच नैसर्गिक वन वेगळ्या परिसंस्थेतलं असलं तरी मुंबईच्या संजय गांधी अरण्याशी ते बरोबरी करू शकेल.

परंतु वर उल्लेखिलेली जगभरातल्या काही महानगरांतील इतर प्रसिद्ध उद्यानं मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय अरण्याच्या जवळपाससुद्धा पोहोचू शकत नाहीत. आकाराने किंवा जैवविविधतेनेसुद्धा! यातूनच मुंबईच्या या निसर्गवैशिष्टय़ाचं महत्त्व अधोरेखित होतं. जगभरातील अनेक शहरं तिथला निसर्ग वनोद्यानांच्या उभारणीतून सांभाळण्याचा प्रयत्न करीत असताना आपण आपल्या नैसर्गिक अरण्याची करत असलेली हेळसांड व विध्वंस हा अक्षम्य गुन्हाच आहे. आपल्याला केपटाऊनच्या टेबल माऊंटन नॅशनल पार्ककडून महानगरातील वनांच्या संवर्धनासंबंधी अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत.

भारतातील महानगरांमधील निसर्गाची अवस्था सध्या काय आहे, यावरही एक नजर टाकू या. मुंबई आज तरी बऱ्यापैकी निसर्गाशी जवळीक साधून आहे. संजय गांधी अरण्याबरोबरच समुद्रकिनारा, खाडय़ा, तिवराची वनं, नद्या, टेकडय़ा, महानगर परिसरातील तुंगारेश्वर, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा यांसारखी संरक्षित वनं, माहीम निसर्ग उद्यान, राणीबागसारखी मोठी उद्यानं आणि त्याबरोबरच निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी जागृत असलेल्या स्वयंसेवी संस्था, मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीसारखी १३० वर्षांहून अधिक निसर्ग अभ्यास, संशोधन  व संवर्धनाचा वारसा असलेली संस्था या सर्वामुळे मुंबई महानगराच्या नैसर्गिक जैवविविधतेला आज जगात तुलना नाही. भारताच्या राजधानीत- दिल्लीत नैसर्गिक वन जवळजवळ नाहीच. तरीही दिल्ली महानगरातून जाणाऱ्या अरवली पर्वताच्या रांगेतील वनाला ‘दिल्ली रिज’ म्हणून संरक्षित केलं गेलं आहे. सुरुवातीला सुमारे आठ हजार हेक्टरचं हे क्षेत्र शहरी विकासाच्या रेटय़ाखाली आकुंचित होत गेलं. त्यावर कुबाभळीसारख्या विदेशी वनस्पतींचं अतिक्रमण झालं. आता त्यातल्या सुमारे तीन चौ. कि. मी. परिसराला ‘अरवली जैवविविधता उद्यान’ म्हणून संरक्षित क्षेत्राचा दर्जा दिला गेला आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने दिल्लीत सुमारे ५०० हेक्टरमध्ये २५ शहरी उद्यानं उभारण्याचा प्रकल्प योजला आहे. कोलकाता आणि चेन्नई ही इंग्रजांच्या राजवटीपासूनची महत्त्वाची महानगरं; पण दोन्ही ठिकाणी नैसर्गिक वनांना फारसा वावच नाही. त्यातल्या त्यात चेन्नईच्या मध्यावर सुमारे २७० हेक्टर क्षेत्रफळाचं ‘गिंडी राष्ट्रीय उद्यान’ हे छोटेखानी नैसर्गिक वन आहे. सुमारे ३५९ जातींच्या वनस्पती, विविध पक्षी व काळवीट, रानमांजर यांसारखे प्राणी थोडय़ा प्रमाणात का होईना, इथे आढळतात. मूळचं सुमारे ४०० हेक्टरचं हे क्षेत्र शहरी विळख्याने सतत आकुं चित होत असल्याने त्याचं भवितव्य संशयास्पद आहे. कोलकात्यात सुमारे १०९ हेक्टर परिसरातलं ‘जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यान’ हे एकच सर्वात जुनं आणि वनस्पती वैविध्याने प्रसिद्ध असं उद्यान आहे. भारतात महानगरांमधील निसर्गाची ही अशी केविलवाणी अवस्था आहे. दुय्यम शहरंही त्याच मार्गावर आहेत. त्यातल्या त्यात दक्षिण भारताच्या मध्यावरील बंगळुरू शहराचं निसर्ग-भवितव्य बरंच आशादायक वाटतं. मुळातच हे शहर ‘उद्यान शहर’ म्हणूनच विकसित झालं आणि त्याला विविध जलाशय, टेकडय़ा, नद्या अशी निसर्ग-प्रतीकंही लाभली आहेत. तिथली ‘लालबाग’, ‘कबन पार्क’ यांसारखी मोठी उद्यानं आपली खास निसर्गवैशिष्टय़ं राखून आहेत. तर भारतीय विज्ञान संस्थेसारख्या अनेक मोठय़ा शैक्षणिक संस्थांचे परिसरही नैसर्गिक जैवविविधतेला राखून आहेत. बंगळुरूचं मुंबईशी स्पर्धा करणारं खास वैशिष्टय़ म्हणजे बंगळुरू महानगर परिसरात संरक्षित राखलेलं ‘बन्नेरघट्टा राष्ट्रीय अरण्य’! बंगळुरू महानगराच्या नैऋत्येला सुमारे १०४ चौ. कि. मी . परिसरातील हे नैसर्गिक, आद्र्र/ मिश्र पानगळीचं व झुडपांचं अरण्य ग्रॅनाइटच्या टेकडय़ांवर बाजूच्या ‘सत्यमंगला’ व ‘बिलगिरी रंगनाथा’ या अधिक मोठय़ा वन-परिसरांपर्यंत विखुरलेलं आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, हत्ती, बिबटे, रानकुत्रे, अस्वलं यांसारखे वन्यप्राणी, विविध प्रकारचे पक्षी आणि कीटक हे या अरण्याचं वैशिष्टय़ आहे. अतिवेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या झपाटय़ात टिकून राहण्यासाठी त्याला स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि जागरूक नागरिक यांच्या साहाय्याची अतोनात गरज आहे.

अगदी सुरुवातीला उल्लेखिल्याप्रमाणे १९७५ सालानंतर भारतात निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाच्या जागृतीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली. भारत सरकारनेही यादृष्टीने धोरणं आखायला व कायदे बनवायला सुरुवात केली. जैवविविधता संवर्धनाकडेही खास लक्ष देण्यात आलं. परंतु विकास आणि निसर्ग/ पर्यावरण संवर्धन या रस्सीखेचीत निसर्गाचा विध्वंस अव्याहतपणे चालूच राहिला आहे. किंबहुना, तो अधिकच वाढला आहे. तसं पाहिलं तर भारत हा जगातील थोडय़ाच देशांपैकी एक देश आहे- जिथे १८९४ पासून राष्ट्रीय वन धोरण कार्यरत आहे. स्वातंत्र्योत्तर १९५२ आणि १९८८ मध्ये या धोरणात काळानुसार बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. या वनधोरणानुसार देशातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३% क्षेत्र वनाच्छादित असायला हवं. यातील पर्वत परिसरात हे प्रमाण ६०% हून अधिक, तर सपाटीच्या प्रदेशात २५% हून अधिक असावं अशी अपेक्षा आहे. भारतात आज हे क्षेत्र फक्त २३% आहे आणि ते दर दिवसागणिक आकुंचित होत चाललं आहे. याचाच अर्थ असा की, वनधोरण केवळ कागदावरच राहिले आहे. त्याची अंमलबजावणी तर बाजूलाच; उलट ‘विकासा’च्या नावाखाली निघत असलेल्या विविध पळवाटा व अशास्त्रीय दृष्टिकोनामुळे नैसर्गिक अरण्यांची आणि विशेषत: तिथल्या जैवविविधतेची वाताहत सुरू आहे. अनेक संशोधन संस्था, संशोधक, निसर्गप्रेमी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे २००२ साली जैवविविधता कायदा संमत झाला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर जैवविविधता आयोग नेमण्यात आले. राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कार्यवाही योजना यातील ‘शहरी जैवविविधता’ या क्षेत्राची आखणी करण्याची संधी मला २००३ साली ‘कल्पवृक्ष’ या संस्थेमार्फत मिळाली. या आखणीनुसार जागतिक पातळीवर अवलंबलेलं धोरणच राष्ट्रीय, राज्य आणि शहरी पातळीवर अंतर्भूत केलं गेलं. म्हणजेच या तिन्ही पातळ्यांवर ३३% अरण्यप्रदेश, ३३% हरितप्रदेश व ३४% विकसनशील प्रदेश असावा, त्याप्रमाणेच शहरांचं नियोजन असावं अशी शिफारस करण्यात आली. नुकताच बहुचर्चित असा मुंबई विकास आराखडा तयार होत असताना त्यातील पर्यावरण क्षेत्रावर विचार मांडण्याची संधी मला मिळाली. मुंबई महानगराच्या भविष्यातील नियोजनात पर्यावरण, परिसंस्था व जैवविविधता यांचा सर्वसमावेशक रीतीने अंतर्भाव व्हावा यासंबंधीचा माझा आराखडा तत्त्वत: मान्य झाला. पण दुर्दैवाने तो अंतिम मांडणीत वगळला गेला. मुंबईच्या निसर्ग व जैवविविधतेच्या धोरणात्मक संवर्धनाची एक सुसंधी गमावली गेली.

ज्या महाराष्ट्रात १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रांतून वनसंरक्षणाचं धोरण अमलात आणलं, त्याच आपल्या महाराष्ट्रातल्या वनांची परिस्थिती आज किती विदारक आहे पाहा. महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१३ चौ. कि. मी असून, त्यापैकी ६१,३६९ चौ. कि. मी. इतकं वनक्षेत्र आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील वनाच्छादित प्रदेश १९.९४% आहे. यातही चांगलं किंवा मध्यम दर्जाचं वनाच्छादन फक्त ९.६% आहे. (संदर्भ : भारतीय सर्वेक्षण संस्था, डेहराडून) महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यानं व ४३ अभयारण्यं आपल्या अस्तित्वासाठीच तडफडत आहेत. चुकीच्या ‘विकास’ संकल्पना आणि अशाश्वत नियोजनाच्या रेटय़ाखाली संपूर्ण देशातल्याच या निसर्ग-दारुण चित्राच्या पाश्र्वभूमीवर आपल्या मुंबईच्या अतुलनीय अरण्याचं भवितव्य काय आहे? काय करू शकतो आपण त्याच्या सर्वागीण संवर्धनासाठी?

मुंबईचा विकास, राष्ट्रीय पर्यावरण/ जैवविविधता कायदे आणि सर्वसामान्य तर्कदृष्टी यांचा समतोल साधत पुढीलप्रमाणे एक ढोबळ नियोजन आपण करू शकतो..

सर्वप्रथम म्हणजे संजय गांधी अरण्याचा १०४ चौ. कि. मी . हा परिसर आपण मुंबई शहराचा पवित्र ‘निसर्ग-गाभारा’ आहे, ही संकल्पना मान्य करून त्याचं तिथल्या जैवविविधतेसह शाश्वत संवर्धन करू. हे अरण्य वन्यसृष्टीचं आहे, त्याचं स्वरूप नैसर्गिकच राहील आणि तिथला मानवी हस्तक्षेप नियंत्रित आणि फक्त पर्यटन क्षेत्रातच राहील, ही जबाबदारी आपण स्वीकारू. या अरण्याभोवती छोटा का असेना, पण एक हरितपट्टा शहरी विकसित परिसरापासून अंतर ठेवण्यासाठी निर्माण करू. एक पाऊल मागे जाऊन आपल्या अरण्यातील निसर्गाकडे आदराने व नम्रतेने पाहण्याचा हा एक मार्ग आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची करमणुकीची गरज भागविण्यासाठी आणि नैसर्गिक अरण्यावरील ताण कमी करण्यासाठी शहरात मोठी निसर्गवनं, उद्यानं आणि निसर्ग परिसर उभारू. जागेच्या टंचाईवर मात करून हे समुद्रकिनारा, नद्या, खाडय़ा, टेकडय़ा, तलाव परिसरात (ना-विकास क्षेत्र) करता येईल. इथे निसर्ग आणि मानव आनंदी सहजीवन जगू शकतील. त्याशिवाय शहरातील मोठय़ा संस्थाांचा परिसर- विद्यापीठ, महाविद्यालयं, विद्यालयं, रुग्णालयं, महापालिका संकुलं वगैरेंच्या आवरातही निसर्ग परिसंस्थांची निर्मिती करू. आपल्या इमारतींच्या गच्च्यांवर सेंद्रिय शेती करू. छोटी उद्यानं उभारू. शहरातील रस्ते, रेल्वेमार्ग, ओढे यांचं रूपांतर ‘जैवविविधता मार्ग’ असं करून संपूर्ण शहरभर ‘हरित आणि नील’ निसर्गजाल तयार करू. शहरातील या नावीन्यपूर्ण निसर्ग परिसरात नागरिकांना करमणुकीबरोबरच पर्यावरण व परिसंस्थांसंबंधी जागृती करता येईल. हे एक निसर्ग-लोकशिक्षणाचं माध्यम होईल. अशा शहरभर पसरलेल्या आणि नैसर्गिक अरण्याला लागून असलेल्या हरित परिसराचा आणखी फायदा म्हणजे सर्व विकसित परिसरातही नागरिकांना अधूनमधून पक्षी, फुलपाखरं यांचा आनंद घेता येईल. शुद्ध हवेत निरोगी जीवन जगता येईल. त्याशिवाय या सतत वाढणाऱ्या व आता ठाणे, रायगड जिल्ह्यात पसरणाऱ्या शहाराला महानगर परिसरातील नैसर्गिक अरण्य संरक्षित करून, तर इतर निसर्ग परिसरात वनोद्यानं उभारून शाश्वत विकासाच्या मार्गावर नेऊ या. उल्हास नदी, तुंगारेश्वर, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि इतर पर्वत परिसरांचा निसर्ग सांभाळून संपूर्ण महानगरातील जैवविविधता समृद्ध करू या.

मी ही कल्पनारम्य स्वप्नसृष्टी आपणासमोर उभी करत आहे का? खरं तर गेल्या सुमारे ५० वर्षांत मुंबईत मी स्वत: अनुभवलेल्या निसर्गसृष्टीच्या पुनर्निमितीची संकल्पना आपल्यासमोर मांडत आहे. माझं लहानपण परळ-लालबाग या गिरणगाव परिसरात गेलं. पण तिथेही आम्हाला निसर्गसान्निध्य होतं. शिवडी टेकडी व बाजूची ख्रिस्ती दफनभूमी, हाफकिन इन्स्टिटय़ूट आणि के. ई. एम. रुग्णालय परिसरात विविध वनस्पती आणि त्यांच्या आसऱ्याने राहाणारे पक्षी सतत आमच्या साथीला असायचे. हाफकिनमधले मोर अनेकदा आमच्या खिडकीसमोर येऊन आम्हाला आनंदित करायचे. हा होता १९५० ते १९६५ चा काळ. पुढे १९७० ते १९८० च्या काळात शिवाजी पार्कच्या समुद्रात आम्ही नियमित पोहायचो. त्यासुमारास मुंबईचे समुद्रकिनारे बरेच स्वच्छ होते आणि अनेकदा डॉल्फिन आम्हाला साथ द्यायचे. गिरगाव चौपाटीवर डॉ. छापगर आम्हाला समुद्री जलसृष्टीचे धडे द्यायचे आणि त्यावेळी तिथल्या पाण्यात अनेक जलचर सहज पाहायला मिळायचे. त्या पाण्यात ‘समुद्रअश्व’ (Sea-horse) हाताळायला मिळालेला अनुभव कायमचा मनावर कोरला गेला आहे. याच सुमारास आम्ही मिठी नदीच्या किनाऱ्यावर माहीम निसर्ग उद्यानाची निर्मिती केली. त्यावेळी डॉ. सलीम अलींकडून त्या खाडीतील स्थलांतरित पक्षीवैभवाचे अनुभव ऐकायला मिळाले. त्यांनी तर तिथे रोहित पक्षी अनेकदा पाहिले होते. १९७५ ते १९९५ या वीस वर्षांत मी मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या निसर्ग अभ्यासक रथी-महारथींच्या संपर्कात आलो आणि त्यावेळी ‘बोर१वली अरण्य’ अगदी जवळून पाहिलं. अनुभवलं. अभ्यासलं. दर महिन्यातल्या पहिल्या रविवारी सकाळी दोन तास गोरेगाव ते कान्हेरी या अरण्य- मार्गावर पक्षीगणना चालायची. ती नुसती गणना नसायची, तर परिसर अभ्यासच असायचा. विशिष्ट जातींच्या पक्ष्यांचं असणं किंवा नसणं हे परिसर बदलाचं निर्देशक कसं असतं, हे तिथे अनुभवायला मिळालं. तांबट, सुतार, हॉर्नबिल पक्ष्यांची विविध झाडांवरच्या ढोलीतली घरटी अभ्यासता आली. विविध पक्ष्यांना त्यांच्या शीळेनुसार ओळखायची कोडी आम्ही इथेच सोडवली. लेखाच्या सुरुवातीला सांगितलेला बिबटय़ांचा अभ्यास हा त्यावेळचाच. इथल्याच करंज दरी परिसरात वनस्पतींचा अभ्यास करताना त्यांचं वन्यजीवांशी असलेलं नातं उमजत गेलं. एका श्रावणात इथल्याच हिरव्यागार कुरणावर इंद्रधनूच्या खाली पिसारा फुलवून नाचणाऱ्या, मधूनच केकारव करून सभोवतालच्या लांडोरांना काहीसं दचकवणाऱ्या मोहक मयूराने मंत्रमुग्ध केलं होतं. तसंच कान्हेरीजवळच्या अशोकवनात फुललेल्या अशोकवृक्ष्यांच्या सान्निध्यात रमून परतताना वाटेत दिसलेली चौशिंग्यांची जोडी आणि तिथल्याच निवडुंगी कातळी पठारावर दिवसा लपलेले असंख्य रातवे हे अनुभव शब्दातीत आहेत. १९८५ ते १९९० च्या कालावधीत मी गोरेगावच्या चित्रनगरीला लागूनच असलेल्या मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जागेवर ‘पारिस्थितीकी संशोधन केंद्र’ आणि ‘निसर्ग-संवर्धन शिक्षण केंद्र’ यांच्या उभारणीत गुंतलो होतो. त्यावेळी हे अरण्य हीच माझी कर्मभूमी झाली होती. अनेक दिवस-रात्री या अरण्य परिसरात अनुभवल्या आणि त्यातूनच स्फूर्ती मिळून तिथल्या निसर्गात सामावून जाणारी वास्तू उभी राहिली. इमारतीचा पायथा तयार होत असताना एका पहाटे तिथल्या वर्तुळाकार जोत्यावर शांतपणे पहुडलेल्या बिबटय़ाने दर्शन दिलं. जणू काही त्या बिबटय़ाने आपल्या शुभेच्छा देऊन ‘वास्तुशांती’ केली. माझ्यासाठी तो कृतकृत्यतेचा क्षण होता. त्या बिबटय़ाच्या निवासाचा, त्याच्या संजय गांधी अरण्याचा सांभाळ आणि संवर्धन करणं हे मग माझे पर्याप्त कर्तव्यच झाले. मुंबई महानगराचा शाश्वत विकास आणि तिच्या नागरिकांचं सुखी, आनंदी आणि निरामय जीवन हाही या कर्तव्याचाच एक अविभाज्य भाग आहे. मुंबईची जनताही या र्सवकष निसर्ग अभियानात सामील होणार आहे. सद्याच्या प्रदूषित अवस्थेतही शिवडीच्या खाडीत वास्तव्य करून असलेले लाखो रोहित पक्षी आणि अधूनमधून मुंबई बंदर परिसरात येणारे देवमासे आणि डॉल्फिन यांनी ही आशा अधिक पल्लवित केली आहे.

छायाचित्रे : श्रीपाद कुलकर्णी
उल्हास राणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 11:17 am

Web Title: mumbai forest
Next Stories
1 वनप्रेमी पॅरिस
2 जर्मनीतले अरण्यपुराण
3 आम्स्तर्दाम बोस
Just Now!
X