03 August 2020

News Flash

संगीताने आयुष्यात ठेहराव येतो…

एका ठिकाणी शांत बसून दोन तास एकच राग ऐकायचा, यापेक्षा सुखद अजून काय असू शकेल?

जग किती वेगानं पुढे चाललं आहे हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान ज्या सुसाट वेगानं प्रगत होत आहे तो वेग अचंबित करणारा आहे. फक्त संगीत क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत या वेगानं गोष्टी पार बदलून टाकल्या आहेत. हा वेग एका क्षणी इतका वाढेल, की आपल्याला थांबण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं प्रत्येक पिढीला वाटत असतं. पण पुढची पिढी अधिक सक्षम आणि सुसज्ज असते. मला असं नेहमी वाटत आलं आहे की, संगीत हे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. किंबहुना, आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी संगीत अत्यंत सहजतेनं सामावून घेतं. त्यामुळे संगीताचा मूलभाव काय आहे हे बऱ्याचदा झाकोळलं जातं. ज्या वेगानं आपण पुढे जातोय त्यावरून मला असं वाटतं की, आपण आता द्रुत गतीच्या बंदिशीमध्ये आहोत. पूर्वीच्या काळात विलंबित लयीमध्ये सगळा कारभार चालायचा. त्यानंतर तो वेग वाढून मध्य लयीत बराच काळ आपण होतो. आणि आता आपण द्रुत लयीत दौडतो आहोत. मजा ही आहे, की प्रत्येक पिढीला हेच वाटत राहतं. असं वाटतं की, आता कुठल्याही क्षणी तिहाई होईल आणि मैफल संपेल. पण खरं तर हा वेग वाढतच नाही. पेनरोज नावाच्या शास्त्रज्ञाने Penrose Stairs चा शोध लावला. हे एक चमत्कारिक  illusion आहे. आपल्याला असं वाटत राहतं की, आपण वर जात आहोत, पण आपण पुन्हा तिथेच येतो. संगीतात असाच Shepard Tone नावाचा प्रकार आहे. आपल्याला असा भास होतो की सूर वर जातोय, पण तो संपतच नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं- आणि मुख्य म्हणजे संगीताचंसुद्धा असंच असावं. Nostalgia  ही एक अशी चमत्कारिक गोष्ट आहे. आपण कधीच संतुष्ट नसतो. आपल्याला असं वाटत राहतं, की काही वर्षांपूर्वी काय सुंदर गाणी होत असत. आता म्हणजे फक्त कचरा. म्हणजे ९० च्या दशकात लोक त्यावेळच्या चित्रपटगीतांना अक्षरश: शिव्या घालत असत. आता आपल्याला ती गाणी ऐकावीशी वाटतात. मेलोडिअस वाटतात. ही मानवी वृत्तीच असल्यामुळे त्यात आपण फार बदल करू शकत नाही. पण मला असं वाटतं की, समाज म्हणून आपण नवनवीन गोष्टींसाठी तयार असणं फार गरजेचं झालं आहे. आपण समाज म्हणून जितक्या सहजतेनं आजूबाजूचे बदल स्वीकारत आहोत, तेवढंच आपण संगीताच्या बाबतीतदेखील सहनशील असायला हवं. भले ते चित्रपट संगीत असो किंवा शास्त्रीय संगीत; त्यात बदल होणारच. समाज आणि संस्कृतीबरोबर हे बदल होणं अनिवार्य आहे. आपण ते टाळू शकत नाही. संगीत हा शक्यतांचा प्रचंड मोठा सागर आहे आणि आपण त्यातला अजून फारच थोडा भाग पाहिला आहे. जसजसं तंत्रज्ञानाने जग जवळ येत गेलं तसं संगीतदेखील बदलत गेलं. गेल्या १०-१५ वर्षांत पॉप्युलर संगीताचा चेहरा पूर्णत: बदलून गेला आहे. दहा वर्षांपूर्वी हिट् असलेलं गाणं आता नकोसं वाटतं. किंवा २५-३० वर्षांपूर्वीपर्यंत चार-पाच तासाच्या मैफली होत असत, त्या आता दोन तासाच्या वर गेल्या की श्रोते घरी जायला लागतात. आपण हे जाणीवपूर्वक बदलणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्यात बाजारीकरणाचा मोठा वाटा आहे हे जरी खरं असलं तरी पळवाट काढण्यासाठी ‘सुमार ते सुंदर’ असं म्हणणं खूपच चुकीचं आहे. आपल्याला सगळीकडे फास्ट फूड हवं आहे. सगळ्याची होम डिलिव्हरी हवी आहे. पण कलेच्या बाबतीत असे वागत राहिलो तर कला संपुष्टात यायला फार वेळ लागायचा नाही. टेलिव्हिजननं या वेगाला अजूनच प्रोत्साहन मिळालंय. पूर्वी आठवडय़ातून एकदा येणाऱ्या मालिका आता आठवडय़ातून सहा वेळा येतात. त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळच मिळत नाही. आणि एक संपलं की दुसरं- असं चालूच राहतं.

खरं तर या सगळ्यावर उत्तम टॉनिक म्हणजे संगीत! हा सगळा वेग मंदावून टाकण्याची शक्ती संगीतात आहे. एका ठिकाणी शांत बसून दोन तास एकच राग ऐकायचा, यापेक्षा सुखद अजून काय असू शकेल? एक अख्खी संध्याकाळ एकच राग ऐकताना जी मन:शांती मिळते ती आज फार गरजेची झाली आहे. आजूबाजूच्या वेगामुळे अनेक संगीतकारदेखील या वेगात काम करत असतात. आणि एका अर्थानं तीदेखील काळाची गरज आहेच. पण या वेगाला जर मंदावायचा असेल तर संगीतासारखं दुसरं साधन नाही. त्यामुळे योयो हनी सिंग हा फास्ट फूड आहे हे आपण मान्य करायला हवे. आणि अधूनमधून फास्ट फूड खायला हरकतदेखील नाही. पण रोज तेच खाल्ले तर तब्येत बिघडते. पण याचा अर्थ त्यांना पूर्णपणे झिडकारून लावायचं असाही होत नाही. वर म्हटल्याप्रमाणे आपणदेखील आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर आपलं मत नोंदवण्याची प्रचंड घाई असते. ते मत जर विचार करून मांडलं तर कदाचित ते थोडं वेगळं असू शकेल असं वाटतं. म्हणजे योयो हनी सिंगला नक्की काय म्हणायचं आहे, हे आधी कळू तरी देत. त्याआधी आपण त्याला शिव्या घालून मोकळे होतो. असं करून चालणार नाही. जर प्रेक्षक म्हणून आपण विचार करून, त्यावर रवंथ करून, मग आपली प्रतिक्रिया नोंदवली, तर आपोआपच कलाकारदेखील कला निर्माण करताना आणखीन विचार करतील, हे निश्चित.

dw-28संगीत ही अशी गोष्ट आहे- जी प्रत्येकासाठी वेगळा अर्थ निर्माण करते, प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं भावते. पण तरीही काही गोष्टी अशा असतात, ज्या सर्वाना आवडतात, किंवा बहुतांश लोकांना आवडतात. त्या गोष्टी प्रत्येक वेळी सुमार दर्जाच्या असतील असं नाही. पण अभिजात असलेलं असं काही जर अधिकाधिक लोकांना आवडू लागलं तर त्याने समाजाची प्रगतीच होते, हे नक्की. आणि यात नक्कीच ‘क्लासेस’ आणि ‘मासेस’ हा भेदभाव होतो. तो व्हायलाही हवाच. बहुतांश लोकांना आवडेल असं गाणं करणं हे बिलकुल अवघड नाही. किंबहुना, मला वाटतं- ते किंचित सोपेच आहे. पण सगळ्यांनाच आवडेल असं संगीत निर्माण करताना खरा कस लागतो. म्हणजे क्लासेस आणि मासेस दोघांनाही त्यात रस वाटावा असं संगीत निर्माण होणं ही काळाची गरज आहे. शास्त्रीय संगीतात ती ताकद प्रचंड प्रमाणात आहे. आत्ताही अनेक शास्त्रीय पाया असलेली गाणी किंवा एखाद्या विशिष्ट रागाच्या चौकटीतली गाणी लोकांना आवडतात. आणि तसं संगीत निर्माण करणारेही अनेक कलाकार आहेत. प्रश्न- त्यांची कला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आहे! त्यासाठी आपण कलाकारांपर्यंत जायला हवे. आपण किती वेळा एखाद्या नवीन गायकाचं गाणं ऐकायला जातो? किंबहुना, आपण कुठल्याच गायकाचं गाणं ऐकायला बाहेर पडतो का? चित्रपटदेखील आपण टीव्हीवर यायची वाट पाहतो. आपण स्वत:हून प्रेक्षक म्हणून ही जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याने कलाकाराला तर धीर मिळेलच; पण आपल्यालाही नक्कीच काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल. आपल्याला आवडणारे गायक-गायिका हे टीव्हीमुळेच आपल्याला माहिती व्हायला हवेत असा काही नियम आहे का? किंवा टीव्हीवर येणारे कलाकाराच फक्त श्रेष्ठ असं म्हणणंदेखील तेवढंच चुकीचं ठरेल. श्रोते म्हणून आपणदेखील जबाबदारीने वागायला हवं यात काहीच शंका नाही. योयो हनी सिंग कसा वाईटच आहे आणि त्याची गाणी कशी संस्कृती बिघडवत आहेत, असं म्हणण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी ऐकू या! तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यात होऊ  शकतो. यु-टय़ूबवर कितीतरी नवनवीन कलाकार आपलं संगीत सतत पोस्ट करत असतात. तुम्हाला घराबाहेरदेखील पडायची गरज नाही. फक्त शोधायची गरज आहे. यातून त्या कलाकाराला मिळणारं प्रोत्साहन हे तर गरजेचं आहेच; पण तितकीच महत्त्वाची आपल्या स्वत:ची ते संगीत ऐकून होणारी प्रगतीदेखील आहे! या प्रचंड वेगानं चाललेल्या आयुष्यात आता तर स्मार्टफोनमुळे Whatsapp वरदेखील उत्तमोत्तम संगीत येत असतं. त्यातही आपण सुमार दर्जाचं संगीत ऐकत नाही ना, हे एकदा पडताळून पाहिलं पाहिजे. या प्रचंड वेगानं चाललेल्या आयुष्यात शांतता निर्माण करण्यासाठी माणसाला काहीतरी लागतंच. shepard tone सारखा भास निर्माण करण्यासाठी का होईना, पण संगीताने आयुष्यात ठेहराव येतो. संगीत माणसाला मनोरंजनापलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडतं. आणि आपण काय विचार करायचा, हे आपणच ठरवायला हवं.
गंधार संगोराम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 12:21 pm

Web Title: music is everywhere
टॅग Music,Song
Next Stories
1 जुनं म्हणूनच सोनं!
2 बडोदा डायनामाइट कट
3 मी लेखक कसा झालो?
Just Now!
X