14 August 2020

News Flash

वनप्रेमी पॅरिस

नष्ट होत चाललेली जंगले, ‘ग्लोबल वार्मिग’चे परिणाम, हवामानातील अनपेक्षित बदल ही त्याचीच झलक आहे.

शहरातली जंगले

१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.

..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

आज भौतिक विकास साधताना निसर्गाची अपरिमित हानी होते आहे. याचे दूरगामी परिणामही जगाला भोगावे लागत आहेत. नष्ट होत चाललेली जंगले, ‘ग्लोबल वार्मिग’चे परिणाम, हवामानातील अनपेक्षित बदल ही त्याचीच झलक आहे. जागतिक पातळीवर हरितगृह वायू उत्सर्जनात सतत होणाऱ्या वाढीमुळे पृथ्वीचे तापमान दोन डिग्रीने वाढले आहे. या वर्षांच्या अखेरीस पॅरिसमध्ये होणाऱ्या ‘युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स- २०१५’मध्ये हा अत्यंत महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा असणार आहे. जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन पर्यावरणाशी निगडित समस्यांवर तोडगा काढावा आणि त्यासंदर्भात काहीएक नियमावली तयार करून तिचे सर्वानी पालन करणे, हे आजघडीला मोठेच आव्हान आहे. वाढते शहरीकरण हे आज मानवी प्रगतीचे अविभाज्य अंग बनले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीने कदाचित गाडय़ांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुराचे किंवा इतर औद्योगिक आस्थापनांतून निर्माण होणाऱ्या कार्बन वायूचे नियंत्रण करणे शक्य असले, तरी आज हाती उरलेल्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे हेही तितकेच निकडीचे झाले आहे. आजवर झालेली पर्यावरणाची हानी भरून न येणारी आहे. परंतु पुढच्या पिढीसाठी निसर्गाचे संवर्धन हे हरितगृह वायू उत्सर्जनाच्या नियोजनाइतकाच महत्त्वाचे आहे. या पाश्र्वभूमीवर शहरांमधील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित जंगले खूप महत्त्वाची ठरतात. फ्रान्स सरकारने शहरांभोवती तसेच शहरांमध्ये नैसर्गिक तसेच मानवनिर्मित हिरवाई टिकून राहील अशी काळजी अनेक वर्षांपासून घेतलेली आहे.

तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बेसुमार जंगलतोड आणि शिकार यामुळे फ्रान्समधील जंगले आणि वन्यजीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर होती. राजा फिलिप ल् बेलच्या राजवटीत या परिस्थितीचे गांभीर्य पहिल्यांदा ओळखले गेले. त्याने प्रथमच पाणी व मातीच्या नियोजनासाठी समिती स्थापन केली. परंतु तरीही जंगलांचा ऱ्हास होतच राहिला. १६६९ मध्ये पुन्हा या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले व वनीकरणासाठी ठोस पावले उचलण्यात आली. वृक्षलागवडीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राजाच्या ताब्यात असलेली जंगले सरकारच्या अखत्यारीत आली. शिकार व जंगलतोडीवर मोठय़ा प्रमाणावर बंधने घालण्यात आली. लाकूडतोड पूर्णपणे बंद करणे व्यवहार्य नव्हते, त्यामुळे जंगलांचे पुनरुज्जीवन आणि लाकडाची विक्री यांत तोल सांभाळला जावा असा योजनाबद्ध कार्यक्रम आखला गेला. १८२७ मध्ये वनविभागाकडे सार्वजनिक वनव्यवस्थापन व पाणी प्रशासन सोपवण्यात आले. इमारती लाकडाची विक्री व कापणी विहित नियमानुसार झाली पाहिजे आणि जैववैविध्याचा आदर केला जावा अशी व्यवस्था निर्माण केली गेली. फ्रेंच लाकूडउद्योग हा एकूण व्यापारातील एक मोठा घटक आहे. लाकूड उत्पादनातील तूट भरून काढणे आणि या क्षेत्रात भविष्यात अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी इमारती लाकूड विकसित करण्याचे आणि त्यासाठी जंगलवाढ ही स्थायी प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. फ्रेंच सरकारचा वनविभाग हा अत्यंत सक्रिय आहे. अर्थव्यवस्था आणि समाजभूमिका यांची सांगड घालून वनसंवर्धनासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात. मोठय़ा प्रमाणातील झाडांची लागवड, मुख्यत्वे डोंगरदऱ्यांमधील अत्यंत विरळ वस्ती आणि जुन्या शेतजमिनींचा वनीकरणासाठी केलेला वापर यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून फ्रान्समधील जंगलांचे क्षेत्र सुमारे दीड लाख चौरस कि. मी. इतके वाढले.

आज पॅरिसच्या भोवताली फोंतान्ब्ल, रांबुईए, सां जर्मान ओ ले अशी अनेक नैसर्गिक जंगले आहेत. यातले फोंतान्ब्लचे जंगल खूप प्रसिद्ध आहे. पॅरिसच्या दक्षिण-पूर्व दिशेला साधारण अडीचशे कि. मी. इतके मोठे असे हे जंगल आहे. ओक, पाईन तसेच बिचवृक्ष या जंगलात आढळतात. या जंगलात हिथर जातीचे फुलझाड खूप आढळते, म्हणून याला ‘हिथरचे जंगल’ असेही म्हणतात. अनेक प्रकारचे मश्रुम हे या जंगलाचे वैशिष्टय़! आसपासच्या भागांतील लोक इथे मश्रुम वेचायला येतात. या जंगलात प्राणी, पक्षी, कीटकांच्या मिळून सात हजारांहून जास्त प्रजाती आढळतात. त्यातही मुख्यत्वे कीटक. या जंगलाचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे इथले मोठमोठे खडक ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतात. या दगडांचे आकार विविध प्राण्यांसारखे दिसतात. हे झाले सभोवतालच्या जंगलांचे. पॅरिसमधील गेल्या दीडशे वर्षांतील बदलाचा आवाका पाहिला तरी वनीकरणाला दिले गेलेले महत्त्व लक्षात येऊ  शकेल.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पॅरिसची अक्षरश: नव्याने उभारणी करण्यात आली. शहरातील बऱ्याच इमारती पाडून एकाच तऱ्हेच्या ४० हजार इमारती नियोजनबद्धरीत्या उभारण्यात आल्या. जणू नव्या युगासाठी शहर सज्ज करण्यात येत होते. या संपूर्ण बदलामागे होता- नेपोलियन तिसरा. त्याने जॉर्ज युजिन ऑसमन याच्याकडे हा संपूर्ण आधुनिकीकरणाचा भार सोपवला होता. त्याने आधुनिकीकरणासोबतच शहरात बागबगीचे तयार करणे आणि उपनगरांमध्ये जंगले विकसित करणे यालाही प्राधान्य दिले. त्यासाठी एक वेगळा विभागच नेमण्यात आला. या विभागाचा मुख्य अधिकारी होता- जॉन चार्ल अल्फा. अल्फा, तिसरा नेपोलियन आणि ऑसमन यांनी मिळून १८४८ ते १८६५ या सतरा वर्षांच्या काळात पॅरिसच्या १८३५ हेक्टर क्षेत्रामध्ये सहा लाखांहून अधिक झाडे लावून अनेक बागबगीचे तयार केले. सर्व मोठय़ा रस्त्यांच्या (बुलवार्ड) दुतर्फा झाडे लावली. पॅरिसला जगातील सर्वात सुंदर शहर बनवण्यात या बागा व जंगलांचा फार मोठा वाटा आहे. या कामाचा आवाका एवढा मोठा होता, की आज पॅरिसमध्ये कोणत्याही घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक तरी बाग आढळतेच. आज पॅरिस शहराचा ३००० हेक्टर एवढा भूभाग हिरवा आहे. त्यात छोटय़ा-मोठय़ा ४९० बागा व जंगले आहेत. यातील लक्षणीय आहे- बुआ द बुलोन्य (woods of Boulogne) हे पॅरिसच्या पश्चिमेकडचे जंगल. १८५२  दरम्यान तिसऱ्या नेपोलियनच्या राजवटीत हे जंगल कृत्रिमरीत्या निर्माण केले गेले. पॅरिसमधले हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल. बुआ द विन्सेन्टपेक्षा थोडेसे लहान. या जंगलाचा आराखडा तयार करण्याचे काम सुमारे पाच वर्षे सुरू होते. पहिल्यांदा जेक हिथोर्फ आणि नंतर जॉन चार्ल अल्फा यांनी या जंगलाच्या उभारणीत विशेष मेहनत घेतली. पुढील प्रदीर्घ काळ या जंगलाचे महत्त्व अबाधित राहील अशी काळजी घेतली. हे आज या जंगलातून फेरफटका मारताना जाणवते. संपूर्ण मानवनिर्मित; परंतु तरी नैसर्गिक रचनेच्या खूप जवळ जाईल असे हे जंगल. सपाट जमिनीच्या तुकडय़ावर बागेची रचना न करता वेगवेगळे उंचसखल भूभाग, टेकडय़ा, तळी, तळ्यांमधील छोटी छोटी बेटे, दगडांवरून खळाळते छोटे धबधबे, गवताळ भाग हे सारे या जंगलात पाहायला मिळते. पॅरिसमधील सीन नदीपासून निघणारा उर्कचा कालवा या जंगलाला पाणी पुरवतो. या जंगलात वेगवेगळ्या भागांना जोडणारे अनेक छोटे रस्ते, पायवाटा आणि सायकलवाटा आहेत. रेडवूड, सेडार , चेस्टनट आणि कोनिफेरस जातीचे वृक्ष बुलोन्यच्या जंगलात आढळतात. २७० हेक्टर परिसरात हजारो जातींची फुलझाडे लावली आहेत. बुआ द बुलोन्य हा इंग्लिश लँडस्केप आर्किटेक्चरचा सुंदर नमुना आहे.

या जंगलाचा मुख्य उद्देश शहरवासीयांच्या मनोरंजनाचे ठिकाण हा असल्याने जंगलाच्या काही भागात पब्लिक पार्क तयार केले गेले आहेत. जिथे छोटय़ा झोपडय़ा, विश्रांतिगृहे उभारलेली आहेत. तळ्यांमध्ये बोटिंग, घोडेस्वारीसाठी मार्ग, गोल्फसाठी  मैदाने अशा सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बागेच्या उत्तरेला लोंगशांप हे घोडय़ांच्या शर्यतीसाठीचे मैदान आहे.  या बागेत लहान मुलांचे आवडते ठिकाण म्हणजे ‘जार्दा द अक्लिमटेशन’ म्हणजे पॅरिसचे प्राणिसंग्रहालय. वीस हेक्टर जागेत अतिशय नियोजनपूर्वक अनेक दुर्मीळ प्रजातींचे प्राणी आणि पक्षी इथे ठेवलेले आहेत. या प्राणिसंग्रहालयासोबत विज्ञान संग्रहालयही आहे. त्यात विज्ञानावर आधारित अनेक खेळ आहेत.

बुआ द बुलोन्य तसेच अन्य जंगले अत्यंत निगुतीने राखली गेली आहेत. यात केवळ सरकारचाच नाही, तर लोकांचाही सहभाग आहे. निवांत वेळात वा सुटय़ांच्या दिवशी इथे लोकांची वर्दळ असते. चालणे, पळणे, व्यायाम, सायकलिंग, घोडेस्वारी असे अनेक उपक्रम सुरूअसतात. कुणी दुपारचे जेवण घेऊन निवांतपणे वचन करत वा ऊन खात इथे आरामात पहुडलेले असतात. पॅरिसच्या नागरिकांना या नैसर्गिक वा मानवनिर्मित बागा त्यांच्या रोजच्या जीवनात खूप महत्त्वाच्या वाटतात; आणि त्यामुळे वनांविषयी कोणताही निर्णय घेताना सरकारला त्याचा विचार करावा लागतो. जंगलतोडीला इथे कडाडून विरोध होतो. म्हणूनच दीडशे वर्ष ही जंगले आणि बागा टिकू शकल्या आहेत. कृत्रिम बागा व जंगलनिर्मिती ही जरी सरकारची जबाबदारी असली, तरी त्यांचा जपून वापर करणे, या ठिकाणी स्वच्छता राखणे या गोष्टी मात्र इथले नागरिक चोखपणे करताना दिसतात.

वनांचे रक्षण व संवर्धन ही अनेक पिढय़ांची

गोष्ट असते. आज पॅरिसमध्ये दिसणारी हिरवाई

१८ व्या शतकातल्या राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे.
डॉ. प्रियांका देवी-मारुलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 11:14 am

Web Title: paris forest
Next Stories
1 जर्मनीतले अरण्यपुराण
2 आम्स्तर्दाम बोस
3 हॅमस्टेड हीद, लंडन!
Just Now!
X