‘तरुणाईचं संगीत’ नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे का, तरुण संगीतकार त्याबद्दल कसा विचार करतात, तरुण श्रोत्यांची आवडनिवड आणि त्यांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा असतो, या साऱ्यांचा मागोवा घेणारी चर्चा..

‘पण तरी तरुणाईचं संगीत असं काही नसतंच!’ कॉफीचा कप बाजूला ठेवत माझा मित्र तावातावाने मला सांगत होता. तरुण वय, तरुण मन आणि तरुण संगीत असा आमचा गप्पांचा विषय होता. त्याच आवेशात तो पुढे म्हणाला, ‘आता म्हातारेही रेहमानचं रॉक ऐकतात आणि कित्येक तरुण शास्त्रीय संगीतामध्ये मग्न होतात. बघ ना, जीन्स आता सगळ्या वयातले पुरुष घालतात. ती काही आता तरुणाईची मिरास उरलेली नाही.’ तो सांगत होता त्यात दम होता. पण तरी पटकन् तोच धागा मनात घोळताना वाटलं, जीन्स सर्वजण घालत असतीलही; पण भक्कम बांध्याच्या विशी-पंचविशीतल्या तरुणाला ती जास्त शोभते! जणू तिथे ती जीन्स मोकळी होत म्हणते- ‘या तगडय़ा बांध्यासाठी मी आहे. हे माझं वय आहे.’

..आणि माझ्यासमोर डोळ्यासमोर आली ती कडकड वाजणारी, तळपणारी इलेक्ट्रिक गिटार. तीही असंच म्हणते, नाही का? समोरचा तो तरणा श्रोतृवृंद, मोठय़ा आवाजात गाणारा तो रॉक गायक, बेभान होत पावलं थिरकवायला लावणारे ते उन्मादी वातावरण, मधोमध ती तप्त इलेक्ट्रिक गिटार आणि तिची चपळ फिरत.. हा सारा माहोल तारुण्याचं साररूप मांडणारा! ते रॉक तर नक्कीच तरुणाईचं गाणं आहे. आणि मग मित्राचा निरोप घेऊन परतताना रस्त्यावर ट्रॅफिक सावकाश जात होता त्याचं कारण दिसण्याआधी ऐकू आला ढोलताशांचा आवाज! काय मस्त पोरं-पोरी रस्त्यात ढोल-ताशावादन करीत होती. घामाने चमकणारे ते चेहरे, घट्टे पडलेल्या बोटांचा टिपऱ्यांवरचा खेळ, तुम्हाला ताठ बसायला लावेल असा एकसंध ढोलांचा आवाज.. हे संगीतही नक्कीच तरुणाईचं हो! तारुण्याचं खास असं संगीत असायला हवं. त्याचे काही खास गुणधर्मही असणार.

पहिला गुणधर्म तर माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता आणि कानावर आपटत होता : मोठ्ठा आवाज! तरुणाईच्या संगीताचं हे एक महत्त्वाचं लक्षण दिसतंय. रॉकचा तो कर्कश्श, तीव्र नाद किंवा ढोलांचा सुमधुर नाद- दोन्हींचा ‘व्हॉल्यूम’ हा मोठा आहे. जगभरातले तरुण गाणं मोठय़ा आवाजात ऐकतात, हेही त्यालाच पूरक निरीक्षण. मग कधी गाडी चालवताना कानात इअरप्लग असतात आणि रस्त्यावरचा आवाज त्या गाण्याच्या अफाट आवाजापुढे मुळीही ऐकू येत नाही. कधी एखादा तरुण गाडीतून ‘जब से तेरे नैना’ ऐकत चारी खिडक्या बंद करून जात असतो. त्या चारचाकी वाहनाच्या खिडक्या बंद असल्या तरी सिग्नलवर शेजारी दुचाकी घेऊन उभ्या राहिलेल्या आपल्यालाही ते शानचं सुंदर गाणं स्पष्ट ऐकू येतं. आठवतो आहे मला मी नुकताच वाचलेला डेनव्हर-बोल्डर प्रांतातला एक शोधनिबंध. अमेरिकेतल्या या प्रांतात अनेक तरुणांना या सव्‍‌र्हेमध्ये सामील केलं गेलं होतं. त्याचे निष्कर्ष असे आले की, बेसिकली तरुण मंडळी मोठय़ाल्या आवाजात गाणी ऐकतात. त्यातही मुलगे मुलींपेक्षा अधिक व्हॉल्यूमवर गाणी लावून ठेवतात. पण सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे होतं की, तरुणांना आपण किती मोठय़ा आवाजात गाणं ऐकतो, हे नीटसं ठाऊकच नसतं. त्यांच्या लेखी ती ‘नॉर्मल’ गोष्ट असते. सगळ्या हेडफोन्सच्या कव्हरवर वैधानिक इशारे असले, तरी तरुण जोरात आवाज वाढवत कानातले ते बोळे मिरवत डुलू लागतात! कानाच्या आत त्या मोठय़ा आवाजानं शब्दश: भूकंप होतो. ‘इनर इअर’च्या केशपेशी त्या आवाजाच्या माऱ्यानं झुकतात. हळूहळू ऐकण्याची क्षमता मंदावत जाते. मग आवाज अजून वाढवावा लागतो पोरांना. क्षमता अधिकच उणावते. आणि एक दुष्टचक्र तयार होतं. पण हा गोंधळ इथवरच राहत नाही. सार्वजनिक सण-समारंभांत आणि संगीत मैफिलींमध्ये त्याच धर्तीचा आवाज ऐकू येऊ लागतो. गणपतीच्या काळात राजीव साने यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट माझ्या नजरेसमोर येते आहे. ‘डॉल्बीची स्पीकरभिंत = कानावर आणि हृदयावर बलात्कार!’ मला पटतं ते. पण मग वाटतं, तिथे तिन्हीत्रिकाळ नाचणाऱ्या पोरांना तो बलात्कार का आवडतो? किंवा रॉक-पॉप मैफिलीमध्ये तर खुद्द वादक क्रमश: बहिरे होतात अशी टक्केवारी आहे. पण तरुणांना ते मुदलात ‘संगीत’ वाटतं.. आवडतं.

असं का होतं? अनेक कारणं त्यामागे असू शकतात. एक तर त्या वयात देह आणि मन दणकट असतं. आघात सोसायची केवळ शक्तीच नव्हे, तर काहीशी इच्छाही असते. शरीरामधली संप्रेरकं पोरांना मस्ती प्राप्त करून देत असतात. मुलगे आपल्या ताणाचं विसर्जन त्या बधिर करणाऱ्या आवाजात करीत असावेत. आणि तरुणीही काही मागे नसतात! पण त्या नाचतात! हेही तरुणाईच्या संगीताचं एक साधं लक्षण आहे. संगीताचा नृत्याला आवाहन करणारा ताल. तरुणाईचं संगीत हे नर्तनाचं आवाहन सोबत घेऊन येतं. द्रुतगतीमधला ताल सहसा तरुणांना रुचतो. ही बघा माझ्यासमोरच्या टेबलावर बसलेली जोडी. या कॉफी हाऊसमध्ये बसून मी लिहितो आहे आणि मागे कविता सेठ स्पीकर्समधून गाते आहे : ‘तुमही दिन ढले, तुमही दिन चढे, तुमही हो बंधू सखा तुम्ही..’ आणि त्या सुंदर तालावर ही समोरची षोडशा बसल्या बसल्या अंग हलवीत नृत्य करते आहे. एकतर काळाच्या ओघात गाणं हे फक्त ‘ऐकायचं’ राहिलं नाही, व्हिडीओमुळे ते ‘बघायचं’देखील बनलं. आणि मग मायकेल जॅक्सननं जगाला गाणं ऐकण्याऐवजी त्यामधलं ‘मूनवॉक’ तऱ्हेचं नृत्य बघायची सवय लावली. त्या गोष्टीलाही आता वीस-पंचवीस वर्षे लोटलीत. ही समोरची मुलगी तर वाढलीच जागतिकीकरण झालेल्या, बदललेल्या भारतात. जिथे तरुणांची स्वप्नं उंचावलेली आहेत, आणि ती स्वप्नं मांडणारं संगीत गतिमान झालेलं आहे. त्यामुळेच जगभरातलं तरुण संगीत आज आपल्या तरुणाईलाही आपलंसं वाटतं.

मला आठवतंय- एक अगदी कोवळा, चौदा-पंधरा वर्षांचा, तारुण्यात पाय टाकतो न् टाकतोय असा पोरगा एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात मला भेटला होता. त्या इंग्रजी यथातथा बोलू शकणाऱ्या, शाळा करून वर नोकरी करणाऱ्या पोराला कोण आवडत असावं? तर- जस्टीन बिबर! ‘का रे आवडतो तुला तो?’ असं विचारल्यावर त्यानं दिलेलं उत्तर मला आजही महत्त्वाचं वाटतं. ‘त्याचं ‘बेबी’ गाणं ऐकलंय का? भारी नाचतो!’ ‘म्हणून आवडतो तुला?’ मी विचारलं. ‘नाही बा! आमच्या गल्लीतल्या किशादादाला आवडतो, म्हणून आम्हा सगळ्यांना तो भारी वाटतो!’ त्या उत्तरातून तरुणाईच्या संगीताच्या अनेक बाजूंवर मला लख्ख प्रकाश पडल्यासारखं झालं. ते उत्तर सकृत्दर्शनी विनोदी वाटलं तरी त्यात संगीताचं समाजशास्त्र ठासून भरलेलं आहे. पहिला निष्कर्ष म्हणजे- तरुण ‘पीअर इन्फ्लुअन्स’च्या तत्त्वावर गाणी ऐकतात. आसपासचे माझे मित्र सध्या विशाल-शेखरची गाणी ऐकताहेत ना; तर मीही ऐकायला हवं. माझ्या मैत्रिणी लेडी गागासारखी हेअर स्टाईल करीत आहेत, तर मीही करायला हवी. (संगीतासोबत फॅशन आलीच.) त्या उत्तराचा दुसरा भागही मोलाचा आहे. तरुणाई संगीताचा रसास्वाद व्यापक अर्थाने सामुदायिक तऱ्हेनं घेते. एका खोलीत बसून इअरप्लग घालून ‘कोल्ड प्ले’ ऐकणारा कफ परेडवरचा तरुण हा वरवर एकटा वाटतो; पण तसेच त्याचे दहा मित्र त्यांच्या त्यांच्या खोल्यांत स्वत:ला गाडून घेऊन तोच ‘कोल्ड प्ले’ कंपूचा दंगा ऐकत असतो. आणि मग थोडय़ा वेळाने कफ परेड, कुलाबा, ठाणे, बोरीवली, वाळकेश्वर आणि माटुंगा इथून या मित्रांचे त्यांच्या फेसबुक ग्रुपवर ‘कोल्ड प्ले’ला पसंती देणारे उंचावलेले अंगठे अवतरतात. ‘मल्हारवारी’ हे गाणं एकटय़ानं ऐकायचं नसतंच मुळी! आणि ‘मोरया मोरया’ हे गाणं कसं कॉलेजच्या चाळीस  पोरांबरोबर एकत्र मोठय़ा आवाजात ऐकायचं असतं!

संगीत क्षेत्रातली व्यावसायिक फळी तरुणांच्या अशा मानसिकतेचा फायदा न उठवती तरच नवल! मग ठरवून नवे स्टार संगीत क्षेत्रात तयार केले जातात. त्यांचं तरुणांमध्ये जोरदार प्रमोशन केलं जातं. एकदा का ती व्यक्ती मोजक्या तरुणांना भावली, की भराभरा तिचे ‘फॅन्स’ वाढतात. तरुण तिच्या पार भजनीही लागतात. ‘कॉर्पोरेट’ला संगीतामधले ‘टीन स्टार’ किंवा ‘यंग स्टार’ तयार करायला भारी आवडतं. कारण तो व्यवसाय कमी जोखमीचा आणि जवळजवळ हुकमी असतो. अनेक गायनस्पर्धामधून कळत-नकळत हेच केलं जातं. वेगवेगळे ‘आयडॉल्स’ हे हुशारीने घडवले जातात, विकले जातात. चॅनलचा त्यात खरा फायदा असतो. म्हणजे ते गायक वा गायिका कमअस्सल असतात असं मी म्हणत नाही. पण चॅनल त्या गायकाला विशिष्ट ‘पेहेराव’ अनेक अर्थानी प्रदान करतं. मग चलनी नाणी तेवढीच शिल्लक राहतात; बाकीचे औदासीन्यात हरवतात.

तरुणांचं जग हे आजच्या व्यवहारकुशल पिढीतही स्वप्नांचं, आकांक्षांचंच असतं. हे नवे तरुण गायक चेहरे त्या स्वप्नांना शब्द, सूर, भावना देतात.. सजीव करतात. केवढे घट्ट फॅन असतात तरुण एकेका गायकाचे! माझा एक विशीतला तरुण मित्र आहे. तो दिवस-रात्र नीती मोहन या तुलनेनं नव्या बॉलीवूड गायिकेचं गाणं यू-टय़ूबवर लावत असतो. त्याच्या बोलण्यात ते नाव इतक्या वेळा आणि इतक्या तऱ्हांनी येतं, की ते ऐकताना आपलं वयदेखील खाली सरकतं. आपण आपल्या तारुण्यात ऐकलेली गाणी आठवू लागतात. मग माझ्या पस्तिशीच्या पिढीसाठी ते गाणं रेहमानचं ‘दिल है छोटासा’ असतं; त्याच्या आधीच्या पिढीसाठी ते गाणं आर. डी. बर्मनचं असतं, त्याच्या आधीच्यांसाठी शंकर-जयकिशन, आणि अगदी वृद्ध मंडळींच्या लेखी ते गाणं सी. रामचंद्रांचंही असू शकतं!

आणि गंमत बघा, आपल्या तरुणपणी ऐकलेली गाणी ही आपल्या कायम स्मरणात असतात. आपल्या हृदयाजवळ त्यांचं घर असतं. आणि ही केवळ कविकल्पना नव्हे! तारुण्य आणि संगीत यांचा अनुबंध न्यूरॉलॉजीनंही याच स्वरूपात मांडलेला आहे. आपण कुठलंही गाणं ऐकतो ते डोक्यात कसं फिट बसतं? कविता ऐकताना, वाद्यमेळ ऐकताना डोक्याचा ‘परायटल कॉर्टेक्स’ जागृत होतो. सोबत गाताना अजून दुसरा मेंदूचा भाग चेतनामय होतो. अशा अनेक प्रकारांनी एक गाणं मेंदूमध्ये ठसतं. हे सारं कुठल्याही वयात होत असतं. पण तारुण्यामध्ये गाणं ऐकताना या सगळ्याची तीव्रता खूप अधिक असते. खेरीज त्या गाण्यासोबत जे मानसिक तरंग उठतात, ते अधिक सजग असतात. (‘दम मारो दम’ ऐकताना कॉलेजची ट्रिप स्मरत असते.) त्यामुळे तरुण वयात ऐकलेली गाणी ही मेंदूमध्ये अधिक घट्ट तऱ्हेनं ठसलेली असतात. आयुष्यभर हे तरुणाईतलं संगीत माणसाला पुरतं. आत्ताच्या तरुणांना त्यांचं गाणं हे सर्वश्रेष्ठ वाटतं. तसंच प्रत्येक पिढीतल्या तरुणांनाही वाटत असतं.

अर्थात एक फार मोठा बदल या सध्याच्या आणि आधीच्या पिढीमध्ये एका बाबतीत झालेला आहे. तो बदल आहे गाणी ऐकण्याच्या पद्धतीमध्ये! ही पिढी ‘गाणं’ विकत घ्यायची अभिलाषा फारशी धरत नाही. तिला सी. डी. तर नकोच असते. अल्बम आय-टय़ून्सवरून संगणकावर ‘उतरवून’ घ्यायचाही तिला कंटाळा येतो. या पिढीला आवडतं- हव्या त्या गाण्याचं हवं तेव्हा थेट ऑनलाइन ‘स्ट्रीमिंग’! रेडिओवर लागतील ती गाणी त्याच ठरावीक वेळात ऐकण्यापेक्षा ऑनलाइन गाणी ऐकणं/ बघणं या पिढीला रुचतं. जरीन इमाम या सी. एन. एन.च्या समीक्षकानं म्हटलं आहे- ‘Note- The idea of what is music ownership is changing.’ गाण्याचा मालकी हक्क या पिढीला जिथे वाय-फाय उपलब्ध आहे तिथे नकोच आहे असं दिसतं. तुम्ही कधी गंमत म्हणून सध्याचे तरुण कशी गाणी संगणकावर ऐकतात ते न्याहाळा! मग कधी तो क्रम असाही असू शकतो : गायत्री मंत्र (अ‍ॅकॉस्टिक), ‘धीरे धीरे,’ जे-झेचं हिपहॉप, मग मधेच राहुल देशपांडेचं ‘कटय़ार’मधलं गाणं, मग नीलेश मोहरीरचं ‘सर सुखाची श्रावणी’.. मग थोडा विराम. मग पुन्हा संगणकावर ‘डान्स बसंती’, मरिया कॅरे, तिचा यू-टय़ूब ‘ओप्राह’ कार्यक्रमातला गाण्यातला तुकडा, ‘सेल्फी’चं गाणं.. मग कॉफी.. मग मागे पावसासोबत अमित त्रिवेदीचं ‘इकतारा’, मग चुकून बटण दाबल्यामुळे, पण आवडल्यामुळे ऐकलं गेलेलं आशाबाईंचं ‘चांदण्यात फिरताना..’ या क्रमाने हवी ती गाणी ऐकण्याचा आवाका आणि स्वातंत्र्य हे आत्ताच्या तरुण श्रोत्यांकडे आहे. म्हणूनच मला तरुणाईच्या संगीताच्या या टप्प्याकडून अनेक आशा आहेत. आजची पिढी काय ऐकते, या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच मला सहजपणे देता येत नाही. ही पिढी रॉक तर ऐकतेच. पुण्या-मुंबईतच काय, महाराष्ट्रातल्या अनेक छोटय़ा गावांमध्येही रॉकचे चाहते तयार झाले आहेत. पण म्हणून ते शास्त्रीय संगीत ऐकणार नाहीत असंही नाही. त्या अडनिडय़ा गावात कुणी बुवा गायला आले तर तरुण टाळकी तेही गाणं चवीनं ऐकतील. या पिढीला अनेक संगीतप्रकार आवडतात. अनेक तऱ्हांचे गायक-गायिका भावतात त्यांना. अर्थात या तरुणांचं गाणं असं व्यापक असलं तरी त्यातही आपापल्या आवडीनुसार कुणी श्रेया घोषालचं फॅन होईल, कुणी जस्टीन टिंबरलेकचं, तर कुणी सावनी रवींद्रचं! तारुण्याचं आणि संगीताचं नातं हे असं गहिरं, अर्थपूर्ण असतं. अनेकदा धबधबा असतो तो नुसता : प्रेमाचा, विरहाचा, उडत्या अनेकरंगी सुरांचा.

मग वय वाढतं तशी श्रवणनदी स्थिरावते, सखोल होते. तिची उसळी कमी झाल्याची हळहळ वाटली तरी तिचं आताचं स्थैर्यही हवंहवंसं वाटतं. आणि शेवटी जगण्याच्या आणि संगीताच्या साऱ्या नद्या एकवटत एकाच अटळ बिंदूवर विसावणार असतात. असं असलं तरी धबधब्याचं मोल कमी होत नाही. प्रत्येक पिढीचं नवं गाणं समजून घेणं हे वरच्या पिढीच्या माणसांना आव्हानात्मक असतं. पण कालसुसंगत राहायचं असेल तर ते नवे नाद, नवे आवाज, नवे सूर जाणणं हेही अगत्याचं असतं. ते नव्या पिढीचं गाणं समजून घ्यायला पूर्वग्रह दूर सारावे लागतात. सांगीतिक हट्ट शिथिल करावे लागतात. भाषेचे नवे पोतही ध्यानी घ्यावे लागतात. अशा अनेक अर्थानी ते एक आव्हान असतं- तरुण नसलेल्यांसाठी.

आणि तरुण श्रोत्यांसाठी वेगळंच आव्हान समोर असतं. पुढय़ात येणारं प्रत्येक गाणं काही सकारात्मक नसतं. ‘मेटल’ संगीतात जसे मृत्यूचे, हिंसेचे विकट संदर्भ येतात, तसे आता सगळ्या संगीतप्रकारांमध्ये डोकावू लागले आहेत. तरुणांना ती गाणी फार सहज खेचून घेऊ शकतात. चुकीच्या मार्गावरही नेऊ शकतात. किंवा बंडखोरीचं गाणं हे भांडवलशाही गायकानं भांडवलशाही तऱ्हेच्या सीडी कंपनी, रेडिओ, टीव्ही, फेसबुक, जाहिरात अशा माध्यमांमधून खपवलं आहे, हे कळण्याचा आवाका खूपदा त्या तरुण वयात नसतो. पटकन् भारून जायचं ते वय असतं. गाणी ऐकतानाही तसंच होऊ शकतं. असे धोके ओळखत, त्या गाण्याचा रसास्वाद घेऊनही त्या गाण्याला आपल्याला बदलू न देण्याचं मोठ्ठं आव्हान या तरुण पिढीपुढे आहे असं मला प्रकर्षांनं वाटतं.

अशी हरेक पिढीपुढे.. श्रोत्यांच्या पिढीपुढे आव्हानं असतात. पण ती उचलण्यात, पेलण्यात मोठं सार्थक असतं. चांगलं, उच्च दर्जाच्या निर्मितीचं तरुणाईचं संगीत मोठय़ा मंडळींना पुन्हा मनानं तरुण करतं आणि तरुणांना थोडं मोठं, थोडं अधिक परिपक्व बनवतं. आणि याच कारणासाठी ते महत्त्वाचं असतं. आणि फार आतून आपणा साऱ्यांना हवंहवंसंही!
डॉ. आशुतोष जावडेकर