06 March 2021

News Flash

शंभरीचा रणगाडा

पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) येथील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे हे युद्धातील अस्त्र म्हणून वापरले. त्यास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत

रणगाडा

पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) येथील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे हे युद्धातील अस्त्र म्हणून वापरले. त्यास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने युद्धातील प्रभावी अस्त्र असलेल्या रणगाडय़ांच्या स्थित्यंतरांची ही कहाणी..

शंभर वर्षांपूर्वीचा काळ. युद्ध रेंगाळले होते. एखाद्या डबक्यात पाणी साचून तुंबावे तसे. लढणाऱ्या दोन्ही बाजूंची सेना समोरासमोर मैलोन् मैल अंतरांवरील समांतर खंदकांमध्ये दबा धरून बसलेली. अधूनमधून खंदकातून बाहेर पडून परस्परांवर चढाया होत. पण कोणत्याही संरक्षक चिलखताविना उघडय़ा मैदानात स्वाऱ्या करणाऱ्या पायदळासाठी शत्रूच्या मशिनगन्सच्या फैरी आणि तोफखाना कर्दनकाळ ठरत. एकेका चढाईत तसंच प्रतिचढाईत हजारो सैनिक मारले जात. बरं, हे टाळण्याकरता खंदकात दबा धरून बसावं, तर तिथले जिणेही सुसह्य़ नसे. चिखलाने भरलेल्या खंदकांत सतत उभे राहावे लागल्याने तळपाय कुजून ‘ट्रेंच फुट’चा त्रास व्हायचा. खंदकात उंदीर-घुशींचा सुळसुळाट असे. थंडी-वाऱ्यात अंग अवघडल्याने आळस द्यायला जरा ताठ उभे राहावे, तर कधी शत्रूचे ‘स्नायपर’ (नेमबाज) डोक्याचा लक्ष्यवेध करतील याचा नेम नाही. खंदकाच्या युद्धाची (ट्रेंच वॉरफेअर) ही कुचंबणा प्रदीर्घ काळ चाले. जगभरच्या लष्करी नेतृत्वाला प्रश्न पडे, की या कुंचबलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा कसा?

..आणि अखेर कोंडी फुटली. युद्धभूमीवर ‘रणगाडा’ अवतरला! पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) मधील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे वापरले. त्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. रणगाडय़ाच्या दमदार आगमनाने रेंगाळलेल्या युद्धाला नवी रणनीती आणि गती मिळाली. सैनिकांना चिलखती संरक्षण पुरवत शत्रूची काटेरी तारांची (barbed wire) आणि खंदकांची तटबंदी भेदून शत्रूप्रदेशात खोलवर मुसंडी मारण्याचे साधन आणि तंत्र रणगाडय़ामुळे गवसले. शतकभराच्या वाटचालीत रणगाडे केवळ उत्क्रांतच होत गेले नाहीत, तर त्यांनी युद्धभूमीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले. आणि आजतागायत ते अबाधित राहिले आहे.

अनेक शतकांच्या इतिहासात युद्धतंत्र विकसित होत जाऊन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते खंदकाच्या लढाईपर्यंत येऊन स्थिरावले होते. युद्धतंत्र अशा पातळीवर आले होते, की त्यामुळे युद्धे महिनोन् महिने रेंगाळत. त्यात एक प्रकारचे साचलेपण (‘सॅच्युरेशन’ वा ‘स्टॅग्नन्सी’) आले होते. युद्धातील मानवी संहाराने परमोच्च पातळी गाठली होती. आघाडीवर रक्तामांसाचा चिखल होऊनही युद्धातील कोंडी फुटत नसे. पहिल्या महायुद्धात १९१६ मध्ये फ्रान्समधील व्हर्दून तथा वेर्दन (Verdun) आणि सोम येथे झालेल्या लढाया ही या प्रकारच्या लढाईची अंतिम रूपे होत. व्हर्दूनच्या रणसंग्रामाला तर ‘Verdun meat-grinder’ म्हणूनच ओळखले जाते. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ अशा प्रदीर्घ काळात झालेली ही पहिल्या महायुद्धातील सर्वात अधिक काळ चाललेली लढाई. ३०३ दिवसांच्या या युद्धकाळात जर्मनी आणि फ्रान्स या परस्परांच्या शत्रूंचे मिळून एकूण साडेबारा लाख सैनिक कामी आले. दर महिन्याला सुमारे ७० हजार सैनिक मरत होते. व्हर्दूनच्या लढाईतून जर्मनीचे लक्ष आणि साधनस्रोत दुसरीकडे वळवले जावेत म्हणून फ्रान्समध्ये सोम येथे चढाईची दुसरी आघाडी उघडण्यात आली. १ जुलै ते १ नोव्हेंबर १९१६ दरम्यान सोम नदीच्या परिसरात हा रणसंग्राम चालला. त्यात जर्मनी, फ्रान्सबरोबरच ब्रिटन आणि अन्य देशांच्या सैनिकांनीही भाग घेतला. युद्ध संपेपर्यंत सहभागी सर्वच देशांच्या सैन्यांतले मिळून जवळपास १५ लाख सैनिक धारातीर्थी पडले. मशिनगन्स आणि तोफखान्यामुळे खंदकाच्या लढाया भीषण संहारक झाल्या होत्या. त्यावर कोणताही तोडगा उपलब्ध नव्हता.

47-ls-diwali-2016-tank

रणगाडय़ाचे आगमन

सोम नदी परिसरात ब्रिटिश, फ्रेंच आणि जर्मन सैन्य समोरासमोरच्या खंदकांत दूरवर दबा धरून बसले होते. ब्रिटिश पायदळ आणि घोडदळाने केलेल्या स्वाऱ्या जर्मन मशिनगन्सनी निष्प्रभ ठरवल्या होत्या. अखेर ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे जनरल सर डग्लस हेग यांनी फ्लेर्स-कोर्सलेट (Flers-Courcelette) गावांवरील १५ सप्टेंबरच्या हल्ल्यात ‘मार्क-१’ हे नव्याने लष्करात दाखल झालेले रणगाडे वापरण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट १९१६ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. आघाडीवर ४९ रणगाडे आणण्यात आले होते. त्यापैकी ३२ रणगाडे युद्धभूमीवर जिथून हल्ला सुरू होणार होता त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्यापैकी सात रणगाडय़ांचे इंजिन ऐनवेळी सुरूच झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हल्ल्यात २५ रणगाडय़ांनीच भाग घेतला. त्यातलेही काही मधेच बंद पडले. चिखलात रुतून बसले किंवा शत्रूच्या हल्ल्यांत निकामी झाले. उर्वरित केवळ नऊच रणगाडे दोन्ही खंदकांमधील ‘नो मॅन्स लँड’ पार करून जर्मन फळीपर्यंत पोहोचून हल्ला करू शकले.

या पहिल्यावहिल्या रणगाडा हल्ल्याचा ब्रिटिशांना प्रत्यक्ष रणभूमीवर फारसा फायदा झाला नाही. रणगाडय़ांनी शत्रूची फळी भेदत त्यांची काही ठाणी उडवून लावली. रणगाडय़ाचे भलेमोठे धूड पाहून, त्यांच्या ट्रॅक्सचा करकरणारा आवाज ऐकून, त्यामधून होणारा तोफांचा आणि मशिनगन्सचा मारा पाहून शत्रूचे काही सैनिक मशिनगन्स टाकून पळून गेले. आघाडीवरील १.८ कि. मी.च्या पट्टय़ात जर्मनांनी माघार घेतल्याने तो भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. मात्र, युद्धातील रणगाडय़ांच्या या पहिल्यावहिल्या वापराचा शत्रूवरील मनोवैज्ञानिक आघात जास्त मोठा होता. त्याला ‘टँक टेरर’च म्हटले जायचे.

मात्र, जनरल हेग यांना रणगाडय़ांचा इतक्या उतावीळपणे वापर केल्याबद्दल टीकेचे धनी व्हावे लागले. युद्धभूमीवरील भूभाग फारच ओबडधोबड होता. हे नवे यंत्र वापरण्यासाठी ब्रिटिश सैन्याचे पुरेसे प्रशिक्षणही झाले नव्हते. इतक्या कमी संख्येने रणगाडे वापरल्याने युद्धभूमीवर अपेक्षित परिणाम तर साधला गेला नाहीच; उलट त्यांच्या अस्तित्वाचे गुपितही उघड झाले, असे काही टीकाकारांचे म्हणणे होते. तरीही जनरल हेग यांनी दोन दिवसांनी १७ सप्टेंबरला पुन्हा रणगाडय़ांनिशीच हल्ला चढविला. वाईट हवामान आणि मोठय़ा नुकसानीमुळे तो मागे घ्यावा लागला. पण जनरल हेग यांना या नव्या यंत्राच्या क्षमतेबाबत खात्री पटली होती. त्यांनी आणखी एक हजार रणगाडय़ांचे उत्पादन करून रणभूमीवर पाठविण्याची मागणी केली.

त्यानंतर जुलै १९१७ मध्ये ब्रिटिशांनी यीप्रसच्या (Ypres) तिसऱ्या लढाईत २१६ रणगाडे वापरले. पण मैदानी भागातील चिखलामुळे त्यांचा वापर फारसा परिणामकारी ठरला नाही. तथापि, २० नोव्हेंबर १९१७ रोजी ब्रिटिश रणगाडय़ांना हवे असलेले अनुकूल वातावरण मिळाले. त्या दिवशी कॅम्ब्रेच्या (Cambrai) लढाईत ब्रिटिशांनी जर्मनांविरुद्ध ४०० हून अधिक रणगाडे मैदानात उतरवले. त्यांच्या तुफानी माऱ्याने शत्रूच्या संरक्षक फळीला सात मैल लांबीच्या अंतरात खिंडार पडले आणि ब्रिटिशांनी त्याद्वारे सहा मैल आत खोलवर शत्रूप्रदेशात मुसंडी मारली. परंतु रणगाडय़ांच्या जोरावर मिळवलेला हा प्रदेश ब्रिटिश पायदळ आपल्या कब्जात राखू शकले नाही आणि जवळपास सर्व प्रदेश जर्मनांनी परत मिळवला. भूभागावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले पायदळाचे महत्त्व त्यातून अधोरेखित झाले, तरीही रणगाडय़ांनी युद्धभूमीवरील आपले स्थान त्यातून पक्के केले होते. ८ ऑगस्ट १९१८ रोजी ब्रिटिशांनी अमिन्सच्या (Amiens) लढाईत ६०० रणगाडय़ांनिशी प्रचंड विजय मिळवला. जनरल एरिक लुडेनडॉर्फ यांनी या दिवसाचे वर्णन ‘जर्मन लष्करासाठीचा काळा दिवस’ असे केले.

48-ls-diwali-2016-tank

रणगाडय़ांचा पूर्वेतिहास

रणगाडय़ांच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाल्यास बरेच मागे जावे लागेल. पूर्वीच्या काळी युद्धात वापरले जाणारे रथ हे रणगाडय़ांचे आद्यरूप मानता येईल. त्यानंतर चिलखती घोडदळ हा प्रकार बरीच वर्षे युद्धभूमीवर प्रचलित होता. घोडा आणि स्वार अशा दोघांनाही धातूची चिलखते घालून रणांगणात उतरवले जात असे. मात्र, ही बोजड चिलखते घातल्याने घोडे व स्वार दोघांच्याही सफाईदार हालचालींवर मर्यादा येत. त्यातही धातूच्या पत्र्याच्या चिलखतापेक्षा (प्लेट आर्मर) तारांनी विणलेले चिलखत (चेन आर्मर) बरेच विकसित मानले जाई. पण तेही शत्रूच्या माऱ्यापासून संपूर्ण संरक्षण देण्यास पुरेसे नसे. ढाल-तलवार, धनुष्य-बाण, भाले यापासून लढाई जसजशी बंदुका-तोफांकडे वळली, तसतसे या चिलखतांचे महत्त्व कमी झाले. त्याहून भक्कम चिलखतांची निकड भासू लागली. मशिनगन्सच्या माऱ्यापुढे तग धरेल असे संरक्षक आवरण अद्याप निर्माण झाले नव्हते.

जगात विविध ठिकाणी त्यादृष्टीने संशोधन सुरू होते. पंधराव्या शतकात लिओनार्दो द विन्सी याने रणगाडय़ाची संकल्पना मांडली होती. त्यानेच हेलिकॉप्टरचे पहिले कल्पनाचित्रही बनवले होते. पंधराव्या शतकात झेक सेनानी जान झिस्का याने प्रथम चिलखती गाडय़ांमध्ये तोफा बसवून गाडीच्या बाजूला असलेल्या छिद्रांमधून तोफा डागण्याची व्यवस्था केली. या चिलखती गाडय़ा वापरून त्याने अनेक युद्धे जिंकली. पण त्याच्या मृत्यूनंतर विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना मागे पडली. रणगाडय़ासाठी ओबडधोबड, खाचखळग्यांच्या जमिनीवरून मार्गक्रमण करण्याची क्षमता महत्त्वाची होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाहन उद्योगात अनेक प्रयोग होत होते आणि त्यातून शेतीसाठी धातूचे अखंड ट्रॅक्स असलेल्या ट्रॅक्टरचा उदय झाला होता. धातूच्या पट्टय़ांची ही साखळी दातेरे असलेल्या चाकांवर बसवून त्याआधारे वाहने ओबडधोबड जमिनीवरून चालविण्याचे तंत्र विकसित होत होते. ही यंत्रणा ‘कॅटरपिलर’ नावाने ओळखली जाई. तिचा वापर करून वाहनाला तोफ जोडून रणगाडय़ासारखे प्राथमिक शस्त्र बनविण्याची कल्पना फ्रेंच तोफखान्यातील कॅप्टन लेवावासूर (Levavasseur) याने १९०३ मध्ये मांडली होती. मात्र, फ्रेंच तोफखान्याच्या तांत्रिक समितीला ही कल्पना व्यवहार्य वाटली नाही आणि ती योजना बारगळली. पहिल्या महायुद्धापूर्वी रणगाडय़ाशी मिळत्याजुळत्या संकल्पना दोघांनी मांडल्या होत्या. गुंथर बर्स्टिन या ऑस्ट्रियाच्या इंजिनीअरने १९११ मध्ये आणि लान्सलॉट द मोल या ऑस्ट्रेलियाच्या इंजिनीअरने १९१२ साली मांडलेल्या संकल्पना त्या- त्या सरकारने फेटाळल्या होत्या. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बेंजामिन होल्ट याने १९०३ ते १९०७ या काळात कॅटरपिलर ट्रॅक्टर विकसित केला. पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीला लष्करी सेनानींना या यंत्रात रस वाटू लागला. त्यांनी खाचखळग्यांनी आणि चिखलाने भरलेल्या भूभागात अवजड तोफा ओढून नेण्यासाठी आणि साधनसामग्रीची वाहतूक करण्यासाठी होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. त्यातून सुरुवातीला रणगाडय़ाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. ब्रिटिशांच्या रॉयल आर्मी सव्‍‌र्हिस कोअरने १९१६ पर्यंत अशा एक हजार होल्ट कॅटरपिलर ट्रॅक्टर्सचा वापर युद्धभूमीवर केला होता.

49-ls-diwali-2016-tank

फ्रान्सनेही अशाच प्रकारे होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. याच दरम्यान फ्रान्समध्ये जीन बॅप्टिस्ट एस्टिएन, एम. फ्रॉट आदींनी अशाच प्रकारचे प्रयोग चालवले होते. त्यातून फ्रॉॅट-लॅफली लँँडशिप, ऑब्रियट-गॅबेट फोट्र्रेस, श्नायडर सीए-१ अशा प्राथमिक स्वरूपाच्या रणगाडय़ांची प्रारूपे (प्रोटोटाईप्स) आकाराला आली. मात्र, प्रत्यक्ष युद्धभूमीवर ती फारशी प्रभावी ठरली नाही.

त्याकाळी रणगाडय़ांच्या सुरुवातीच्या रचनांचा आधार होल्ट कॅटरपिलर ट्रॅक्टर हाच होता. ब्रिटनमध्येही याच धर्तीवर प्रयत्न होत होते. मे १९१५ मध्ये खंदक आणि काटेरी तारांची कुंपणे पार करू शकेल असे ट्रायटन ट्रेंच क्रॉसर यंत्र तयार केले गेले.

पहिला वापरण्यायोग्य रणगाडा

याच काळात विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनमध्ये रणगाडा संशोधनाला चालना दिली. विविध प्रयोग करत अखेर ३ डिसेंबर १९१५ रोजी ब्रिटनमध्ये ‘लिट्ल विली’ नावाचा पहिला रणगाडा तयार झाला. आजच्या आधुनिक रणगाडय़ांचे हेच मूळ प्रारूप होते. तथापि त्याची खंदक पार करण्याची क्षमता पुरेशी नव्हती. त्याच्या संरचनेत बदल करून वॉल्टर गॉर्डन विल्स यांनी साधारण अंडाकार रचना (rhomboidal design) बनवली. त्याचे नाव- ‘हिज मॅजेस्टीज् लँडशिप सेंटिपेड’ किंवा ‘मदर’ असे होते. ‘बिग विली’ किंवा ‘मार्क १’ नावाने ओळखला गेलेला आणि प्रत्यक्ष युद्धात वापरला गेलेला हाच तो पहिला रणगाडा. २९ जानेवारी १९१६ रोजी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि ब्रिटिश युद्ध कार्यालयाने अशा १०० रणगाडय़ांच्या उत्पादनाची मागणी नोंदविली.

50-ls-diwali-2016-tank

जर्मनी आणि रशियातही याच काळात रणगाडय़ावर संशोधन सुरू होते. जर्मनीत १९१८ साली ‘ए ७ व्ही’ या रणगाडय़ाची निर्मिती केली गेली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यापैकी काही रणगाडे युद्धात वापरण्यात आले.

रशियात वासिली मेंडेलीव या नौदल गोदीतील इंजिनीअरने १९११ ते १९१५ दरम्यान रणगाडय़ाचे बरेच सुधारीत प्रारूप बनवले. आजच्या आधुनिक रणगाडय़ाची अनेक वैशिष्टय़े त्यात होती. वाहनाच्या संरक्षक चिलखतावर आणि आकारावर बारकाईने लक्ष दिले होते. तोफगोळे भरण्याची यंत्रणा स्वयंचलित (ऑटोमॅटिक लोडिंग मेकॅनिझम्) होती. भूभागानुसार जमिनीपासूनचे अंतर (ग्राऊंड क्लीअरन्स) जुळवून घेण्यासाठी न्यूमॅटिक सस्पेन्शन होते. रेल्वेमार्गावरून वाहतुकीसाठी चाके बदलण्याची (अ‍ॅडॅप्टर व्हील्स) सोय होती. पण याचा जवळपास पाणबुडीइतका अफाट उत्पादनखर्च असल्याने त्याचे उत्पादन मात्र झाले नाही. अलेक्झांद्र पोरोखोवशिकोव याने रचना केलेला ‘वेझ्देखोद’ आणि लेबेदेंको याने रचना केलेला ‘झार टँक’ हे रशियाचे सुरुवातीचे रणगाडय़ांचे प्रयोग होते.

‘टँक’ नावाची कथा

रणगाडय़ाला ‘टँक’ हे नाव कसे पडले, याची कथाही सुरस आहे. रणगाडय़ावर होत असलेले संशोधन गुप्त राखण्यासाठी ‘टँक’ हे नाव त्यास दिले गेले आणि रणगाडय़ाला मग ते कायमचेच चिकटले. इतके, की रणगाडय़ापेक्षा ‘टँक’ हे नावच लोकांना अधिक जवळचे वाटते. जगातील बहुतांश भाषांत त्याचा अंगिकार केला गेला. डिसेंबर १९१५ मध्ये प्रथम ‘टँक’ हे नामाभिधान वापरात आले. व्लियम ट्रायटन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ऑगस्ट १९१५ मध्ये रणगाडय़ाचे प्रारूप बनवले जात होते, तेव्हा त्याचा वापर नेमका कशासाठी होणार आहे याबाबत गुप्तता पाळण्यासाठी आणि चकवा देण्यासाठी या संशोधनाचा उल्लेख ‘टँक’ असा केला गेला. कारखान्यातील तंत्रज्ञांना आणि कामगारांना या प्रकल्पाचा उल्लेख ‘वॉटर कॅरियर्स’ किंवा ‘वॉटर टँक्स’ असा करण्याचे आदेश होते. तसेच पाण्याच्या टाकीसारखे दिसणारे हे यंत्र मेसोपोटेमिया (इराक) आघाडीवर सैन्याला पाणी पुरविण्यासाठी विकसित केले जात आहे असा दिखावा निर्माण केला गेला. रणगाडा बनविणाऱ्या लँडशिप कमिटीने ऑक्टोबर १९१५ मध्ये आणखी दिशाभूल करणारे नाव वापरण्याचे ठरविले. त्यानुसार समितीच्या अर्नेस्ट स्विंटन या सदस्याने नुसते ‘टँक’ हे नाव सुचवले आणि तेच कायम प्रचलित झाले. इतकेच नाही, तर लँडशिप कमिटीचे नाव बदलून ‘टँक सप्लाय कमिटी’ असे ठेवण्यात आले. तसेच सुरुवातीला रणगाडय़ाच्या संशोधनात नौदलाच्या तंत्रज्ञांचा वाटा अधिक असल्याने रणगाडय़ाच्या रचनेतील भागांना हॅच, हल, बो आणि पोर्ट्स अशी नावे दिलेली आढळतात.

51-ls-diwali-2016-tank

चिलखत, गतिमानता व मारकक्षमता

रणगाडय़ाच्या रचनेत तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. संरक्षक कवच (आर्मर किंवा प्रोटेक्शन), गतिमानता (मोबिलिटी) आणि मारकक्षमता (फायरपॉवर)! रणगाडय़ाची उपयुक्तता याच गोष्टींवर अवलंबून असते. या तिन्ही गोष्टी सुनिश्चित करत रणगाडय़ाचा विकास होताना ऑटोमोबाइल क्षेत्रातील इंटर्नल कम्बशन इंजिन, धक्के सहन करण्यासाठीचे सस्पेन्शन अशा अनेक शोधांचा उपयोग झाला. मात्र, हे तिन्ही गुणधर्म किंवा त्यांचा योग्य संयोग साधणे ही तारेवरची कसरत असते. शत्रूच्या माऱ्यापासून अधिक संरक्षण पुरविण्यासाठी पोलादी चिलखत जास्त जाड करत जावे, तर रणगाडय़ाचे वजन वाढून त्याची गतिमानता कमी होते. वेग वाढविण्यासाठी वजन कमी करावे, तर शत्रूच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता वाढते. या दोन्हींचे संतुलन साधत रणगाडय़ावर शक्तिशाली तोफ आणि मशिनगन बसवून त्यास मारकक्षमताही प्रदान करावी लागते. रणभूमीवर सुरुवातीच्या आगमनानंतर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ हा समतोल साधून रणगाडे अधिक परिणामकारक बनविण्याच्या कामी लागले.

सुरुवातीचे रांगणे…

सुरुवातीच्या रणगाडय़ांची ‘मेल’ आणि ‘फिमेल’ अशी विभागणी केली गेली. मेल म्हणजे तोफ असलेले, तर फिमेल म्हणजे केवळ मशिनगन असलेले रणगाडे. ब्रिटिशांच्या पहिल्या मार्क १ मध्येही हे प्रकार होते. त्यापैकी मेल मार्क १ चे वजन २८.४ टन, तर फिमेल मार्क १ चे वजन २७.५ टन होते. हा रणगाडा चालवण्यासाठी आठजण लागायचे. त्याला १०५ अश्वशक्तीचे (हॉर्स पॉवर) इंजिन होते. तो जास्तीत जास्त ४५ कि. मीटरचे अंतर पार करू शकत होता आणि त्याचा वेग ताशी फक्त तीन कि. मीटर होता. त्यावर ६ ते १५ मि. मीटर (०.२३ ते ०.५९ इंच) जाडीचे चिलखत होते. त्यावर सहा पौंडांच्या दोन तोफा किंवा ७.७ मि. मी. च्या चार ते पाच मशिनगन्स होत्या. रणगाडय़ांची वजनावर आधारित लहान, मध्यम आणि अवजड अशा तीन गटांत विभागणी केलेली असायची.

पहिले रणगाडे फारच बोजड, कूर्मगतीने चालणारे होते. ते फार दूरवर प्रवासही करू शकत नसत. फ्रान्सने १९१८ मध्ये १४ टन वजनाचा मध्यम रणगाडा विकसित केला. त्या काळात फ्रान्सचा रेनॉ (Renault) एफटी हा सहा टनी हलका रणगाडा सर्वाधिक वापरला जात असे. पहिल्या महायुद्धाच्या अखेपर्यंत फ्रान्सने ३,८७०, तर ब्रिटनने २,६३६ रणगाडय़ांची निर्मिती केली होती. ब्रिटिशांपेक्षा फ्रेंच रणगाडे वापरण्यास अधिक सुलभ होते. फ्रान्सने पायदळाला पूरक म्हणून रणगाडे वापरण्याचे तंत्र अवलंबिले होते. त्याचाच अंगीकार करत अमेरिकेने ‘एम १९१७’, तर इटलीने ‘फियाट ३०००’ रणगाडय़ांची रचना केली. रणगाडय़ांच्या विकासात फ्रान्सला मागे टाकत ब्रिटनने पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा आघाडी घेतली. ब्रिटिशांचा व्हिकर्स मीडियम टँक ताशी ३२ कि. मीटर या वेगाने दौड करू शकत असे. १९३० पर्यंत रशिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान या देशांनी रणगाडा उत्पादन सुरू केले होते. एव्हाना छोटय़ा रणगाडय़ांची संख्या वाढली असली तरी त्यांचे महत्त्व कमी होऊ लागले होते. एकीकडे रणगाडे विकसित होत असतानाच रणगाडाविरोधी शस्त्रेही तयार होत होती. स्पेनमधील गृहयुद्ध आणि तत्पूर्वीही हे जाणवू लागले होते. कारण शत्रूच्या रणगाडय़ांशी लढण्यासाठी अधिक विध्वंसक रणगाडय़ांची गरज भासू लागली होती. रणगाडे पायदळाला पूरक म्हणून वापरायचे असल्याने त्यांचा वेग कमी ठेवलेला असे आणि त्यामुळे ते नष्ट होण्याची शक्यताही वाढत असे.

त्यावर उपाय म्हणून १९३० च्या दशकात रणगाडय़ांचे संरक्षक आवरण जाड करण्यावर भर दिला गेला. त्यातून ४० मि. मी. जाडीचे चिलखत असलेल्या फ्रेंच आर-३५ आणि ६० मि. मी.चे चिलखत असलेल्या ब्रिटिश ए-११ रणगाडय़ांची निर्मिती झाली. रणगाडय़ांच्या तोफेची 52-ls-diwali-2016-tankमारकक्षमता वाढविण्याच्या स्पर्धेतून रशियाच्या टी-२८, टी-३४ आणि टी-३५ रणगाडय़ांची आणि जर्मन पँझर-३ आणि पँझर-४ रणगाडय़ांची निर्मिती झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला- म्हणजे १९३९ साली जर्मन पँझर-३ रणगाडय़ांवर ५० मि. मीटर व्यासाची तोफ होती, तर
रशियाच्या टी-३४ रणगाडय़ावर ७६ मि. मी. व्यासाची तोफ होती. साहजिकच रशियाच्या रणगाडय़ांची मारकक्षमता जास्त होती.

दुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंत अन्य देश प्रभावी रणगाडे उत्पादनात बरेच मागे पडले होते. ब्रिटनने १९३० ते १९३९ या काळात उत्पादन केलेल्या ११४८ रणगाडय़ांपैकी केवळ ८० रणगाडय़ांची मारकक्षमता थोडी बरी होती. इटलीच्या १५०० पैकी केवळ ७० एम-११ रणगाडय़ांवर ३७ मि. मी. तोफा होत्या. अमेरिकेकडे मशिनगन्स असलेले केवळ ३०० रणगाडे होते. जपानकडील २००० रणगाडय़ांपैकी बहुतांशी असेच हलक्या शस्त्रांनी सज्ज होते. त्यामानाने फ्रान्सचे चिलखती दल अधिक सक्षम होते. तरीही फ्रान्सच्या २६७७ रणगाडय़ांपैकी १७२ रणगाडे ७५ मि. मी.च्या तोफांने सुसज्ज होते. मात्र, सगळ्यात मोठे चिलखती दल रशियाने उभे केले होते. रशियाने १९३० ते १९३९ यादरम्यान तब्बल २०,००० रणगाडे- म्हणजे अन्य सर्व देशांच्या एकत्रित रणगाडय़ांहून अधिक रणगाडे तयार केले होते.

नवी रणनीती

एखादे नवे शस्त्र किंवा शस्त्रास्त्र प्रणाली युद्धभूमीवर दाखल झाली की ती अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत सामावून घेऊन त्याच्या वापराची व्यूहनीती (स्ट्रॅटेजी) आणि डावपेच (टॅक्टिक्स) ठरवावे लागतात. सुरुवातीच्या काळात रणगाडे पायदळाला (इन्फंट्री) पूरक म्हणून चिलखती घोडदळाच्या (आर्मर्ड कॅव्हलरी) भूमिकेत वापरले गेले. रणगाडय़ांची रणनीती (डॉक्ट्रिन) ठरविण्यात ब्रिटिश सेनानी आणि युद्धतज्ज्ञ जे. एफ. सी. फुलर यांनी पायाभूत काम केले. मोठय़ा संख्येने रणगाडे हल्ला करणाऱ्या दलाच्या अग्रभागी ठेवून वापरण्याची त्यांची रणनीती बऱ्याच देशांमध्ये अंगीकारली गेली. याच अनुषंगाने पुढे जर्मनीतील ‘पॅन्झर जनरल’ म्हणून ओळखले गेलेले हाइन्झ गुडेरियन, ब्रिटनचे पर्सी होबार्ट, अमेरिकेचे अ‍ॅड्ना शफी ज्युनिअर, फ्रान्सचे चार्ल्स द गॉल, सोव्हिएत युनियनचे मिखाईल तुखाचेव्हस्की यांनी महत्त्वाचे काम केले. पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचे यांत्रिकीकरण करून त्यांचा एकत्रित (समन्वयाने) वापर केला पाहिजे, असा मतप्रवाह ब्रिटिश सेनानी आणि युद्धतज्ज्ञ बी. एच. लिडेल हार्ट यांनी मांडला. परंतु हे सारे कागदावरचे डावपेच प्रत्यक्ष रणभूमीवर वापरण्याचे कसब जर्मनांनी दाखविले.

तारुण्यात पदार्पण…

पहिल्या महायुद्धातील सोमच्या लढाईत प्रथमच वापरले गेलेले रणगाडे दुसऱ्या महायुद्धापर्यंत (१९३९ ते १९४५) चांगलेच सुधारले होते. पँझर रणगाडय़ांच्या जोडीला लढाऊ विमानांचे ताफे वापरून झंझावाती हल्ले करण्याचे तंत्र (ब्लिट्झक्रिग) वापरत हिटलरच्या नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात बराचसा युरोप पादाक्रांत केला. रशियात खोलवर घुसत थेट क्रेमलिनच्या दारात धडक मारली.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत नाझी जर्मनीने युरोपमधील सर्वात प्रबळ रणगाडा दल उभे केले होते. जर्मन चिलखती दलात १९३९ साली ३१९५ रणगाडे होते. त्यापैकी २११ ‘पँझर-४’ या प्रकारचे होते. जर्मन रणगाडा दलाची खरी ताकद त्याच्या एकत्रित वापरात होती. बाकी देशांनी रणगाडे एकतर पायदळाच्या जोडीला वापरले किंवा ‘कॅव्हलरी टँक युनिट्स’ म्हणून वेगळे वापरले. मात्र, जर्मनीने स्वतंत्र ‘पँझर डिव्हिजन्स’ उभ्या करून त्यांचा आघाडीवर एकवटून वापर केला. त्यात त्यांची खरी ताकद होती. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या या यशस्वी रणनीतीनंतर अन्य देशांनीही त्या अनुषंगाने विचार करत आपापल्या रणगाडा दलांची फेररचना करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचे उत्पादनही वाढवले.

दुसऱ्या महायुद्धातील १९३९ ते १९४१ दरम्यानच्या लढायांमध्ये रणगाडय़ांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच त्यांच्या रचनेतही मोठय़ा प्रमाणात सुधारणा झाली. जर्मनीने त्यांचे ‘पँझर-४’ आणि रशियाने त्यांचे ‘टी-३४’ रणगाडे १९४२ पर्यंत अधिक लांबीच्या तोफेने आणि
अधिक वेगवान तोफगोळ्यांनी सज्ज केले. जर्मनीने १९४३ साली ‘पँथर’ मध्यम रणगाडा रणात उतरवला. त्याला ७५ मि. मी.ची तोफ होती आणि त्याच्या गोळ्याचा वेग ९३६ मीटर किंवा ३०७० फूट प्रति सेकंद इतका होता. मूळ ‘पँझर-४’ रणगाडय़ाच्या तोफगोळ्याचा वेग ३८४ मीटर किंवा १२६० फूट प्रति सेकंद इतका होता. ‘पँथर’ रणगाडा पूर्वीच्या ‘पँझर’ रणगाडय़ांच्या तुलनेत दुप्पट वजनाचा- म्हणजे ४३ टनांचा होता. पण त्याची मारकक्षमताही तितकीच जास्त होती. जर्मनीने त्याहून ताकदवान अशा ‘टायगर’ रणगाडय़ाचीही निर्मिती केली. ‘टायगर-२’ हा दुसऱ्या महायुद्धात वापरला गेलेला सर्वात वजनी रणगाडा होता. त्याचे वजन ६८ टन होते. त्याला ८८ मि. मी. व्यासाची तोफ होती. त्याच्या स्पर्धेत रशियाने ‘जेएस’ (जोसेफ स्टालिनच्या नावाने) किंवा ‘स्टालिन’ हा रणगाडा विकसित केला. १९४४ पर्यंत युद्धभूमीवर दाखल झालेल्या 53-ls-diwali-2016-tankया रणगाडय़ाचे वजन ४६ टन असले तरी त्याची तोफ मोठी म्हणजे १२२ मि. मी. व्यासाची होती. याचदरम्यान रशियाने आपल्या टी-३४ रणगाडय़ांना अधिक प्रभावी ८५ मि. मी.च्या तोफा बसवल्या. टायगर आणि जेएस या दोन्ही रणगाडय़ांना सुरुवातीला यश मिळाले तरी पुढील काळात ते प्रामुख्याने अन्य मध्यम रणगाडय़ांच्या जोडीनेच वापरले गेले.

जसजसे रणगाडे बलशाली होऊ लागले तसतशी त्यांना नष्ट करण्याची गरज भासू लागली. अमेरिकी लष्कराने स्वयंचलित तोफांसारखे दिसणारे खास ‘टँक डिस्ट्रॉयर्स’ तयार केले. जर्मनीनेही आपले स्वत:चे रणगाडाभेदी ‘टरेटलेस टँक्स’ तयार केले. ब्रिटनने मात्र संपूर्ण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पायदळाला मदत करणाऱ्या ‘चर्चिल’ आणि वेगवान क्रूझर प्रकारच्या  ‘क्रुसेडर’ आणि ‘क्रॉमवेल’ रणगाडय़ाचे उत्पादन सुरू ठेवले. त्यापैकी चर्चिल रणगाडय़ांचे चिलखती आवरण चांगले होते, तर अन्य दोन रणगाडे वेगवान होते. पण ब्रिटनच्या कोणत्याच रणगाडय़ांत जर्मन किंवा रशियन रणगाडय़ांची ताकद नव्हती. परिणामी १९४३ आणि १९४४ च्या लढायांत ब्रिटनने अमेरिकी बनावटीचे ‘एम-४ शेरमन’ मध्यम रणगाडे वापरले. अमेरिकेत एम-४ रणगाडय़ाचे उत्पादन १९४२ मध्ये सुरू झाले आणि लवकरच ४९,२३४ एवढय़ा ‘एम-४’ रणगाडय़ाचे उत्पादन केले आणि अमेरिकेच्या दोस्तराष्ट्रांना त्यांचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा केला गेला. परंतु १९४४ पर्यंत ते शत्रूच्या मारकक्षमतेपुढे पुरे पडेनासे झाले आणि त्यांच्या जागी नवे रणगाडे आणावे लागले. मात्र, ब्रिटिशांप्रमाणेच अमेरिकेनेही रणगाडय़ांच्या बाबतीत चुकीची रणनीती स्वीकारली होती. त्यांनी रणगाडय़ांचा वापर पायदळाला मदतनीस म्हणूनच केला. रणगाडे एकवटून स्वतंत्रपणे हल्ले करण्याचे जर्मन तंत्र त्यांनी अवलंबिले नाही. त्यामुळे त्यांचे रणगाडेही जर्मनांप्रमाणे संहारक शक्तीने परिपूर्ण न राहता तोकडे पडत गेले. युद्धाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने ‘एम-२६ पर्शिग’ हे ९० मि. मी. व्यासाच्या तोफेचे अवजड रणगाडे युद्धात उतरवले. तोपर्यंत ब्रिटिशांनी ७६ मि. मी. व्यासाची तोफ असलेल्या ‘सेंच्युरियन’ रणगाडय़ाचे प्रारूप तयार केले होते. अमेरिका आणि ब्रिटनचे हे रणगाडे जर्मनीच्या टायगर आणि पँथर रणगाडय़ांच्या तोडीचे होते. अन्यथा ब्रिटिश आणि अमेरिकी रणगाडे मारकक्षमतेच्या बाबतीत जर्मनी आणि रशियाच्या बरेच मागे होते.

अल-अलामीन आणि कस्र्कचे रणसंग्राम

दुसऱ्या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या (ब्रिटन, अमेरिका, रशिया) यांच्या बाजूने वळविण्यात युद्धाच्या उत्तरार्धात लढल्या गेलेल्या उत्तर आफ्रिकेतील अल-अलामीन आणि रशियातील कस्र्क येथील रणगाडय़ांच्या लढायांनी मोठी भूमिका बजावली. इजिप्तमधील अल-अलामीनच्या लढाईने हिटलरचे वाळवंटातील तेलावर आणि सुएझ कालव्यावर ताबा मिळवून ब्रिटिशांचा भारताकडील संपर्क तोडण्याचे मनसुबे उधळले गेले. तर कस्र्कच्या लढाईने नाझी जर्मनीचे युक्रेनच्या तेल आणि गव्हाच्या कोठारावर ताबा मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. कस्र्कचा रणसंग्राम ही आजवरची जगातील रणगाडय़ांची सर्वात मोठी लढाई म्हणून ओळखली जाते.

अल-अलामीनच्या लढाईत जर्मनीच्या आफ्रिका कोअरचे फिल्ड मार्शल अर्विन रोमेल (‘डेझर्ट फॉक्स’ म्हणून नावाजलेले) आणि ब्रिटिश एट्थ आर्मीचे (आठव्या आर्मीचे) जनरल बर्नार्ड लॉ माँटगोमेरी (‘माँटी’ म्हणून सुपरिचित) हे दोन कसलेले सेनानी समोरासमोर उभे ठाकले होते. रोमेलने जून १९४२ मध्ये उत्तर आफ्रिकेतील टोब्रुक हे शहर ताब्यात घेतल्यानंतर इजिप्तकडे मोर्चा वळवला. मात्र, सप्टेंबरमध्ये आलम-हल्फा येथे झालेल्या लढाईत त्याची विजयी घोडदौड रोखली गेली. रोमेलनी इजिप्तमधील अल-अलामीन गावाजवळ तळ ठोकून ४० मैल आघाडीवर मोठी मोर्चेबांधणी केली. उत्तरेकडे भूमध्य समुद्रावरील अलेक्झांड्रिया बंदर, दक्षिणेला कतारा डिप्रेशन नावाने ओळखला जाणारा प्रदेश आणि दोन्ही बगलांवर तटबंदी अशी मजबूत व्यवस्था केली होती. रोमेलच्या बाजूने जर्मनी व इटलीचे मिळून साधारण एक लाख सैनिक, ५५० रणगाडे, तितक्याच तोफा आणि ७०० ते ८०० विमाने असा फौजफाटा होता. तर ब्रिटिशांच्या दिमतीला त्याच्या साधारण दुप्पट- म्हणजे दोन लाख सैनिक, १००० रणगाडे, ८०० ते ९०० तोफा, ७५० विमाने असा शस्त्रसंभार होता. ब्रिटिश लष्कराच्या जोडीला त्यांच्या साम्राज्यातील भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांचेही सैनिक होते. २३ ऑक्टोबरला युद्धाला तोंड फुटले आणि दहा दिवस चाललेल्या घनघोर रणसंग्रामात माँंटगोमेरीच्या ब्रिटिश फौजांनी रोमेलच्या जर्मन सैन्याला मात देत टय़ुनिशियापर्यंत माघार घ्यायला भाग पाडले. अमेरिकेहून बोटींवरून घाईघाईत इजिप्तला पाठवलेल्या ३०० शेरमन रणगाडय़ांनी माँटगोमेरीच्या सैन्याला चांगलाच हात दिला. या शेरमन रणगाडय़ांनी ब्रिटिश सैन्याला हवी असलेली मारकक्षमता प्रदान केली. युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. जर्मनी-इटलीने मिळून साधारण ६०,००० सैनिक (मृत व जखमी मिळून), ५०० रणगाडे, २५० तोफा आणि ८० विमाने गमावली. तर ब्रिटिशांनी सुमारे १३,५०० सैनिक, ३५० ते ५०० रणगाडे, १०० तोफा आणि ९० विमाने गमावली.

कर्स्क…

जर्मनीने रशियातील कस्र्क येथे १९४३ साली केलेला हल्ला रशियाने निष्फळ ठरवला. कस्र्क येथे रशियन आघाडी काहीशी जर्मन प्रदेशात २४० कि. मीटरच्या अर्धवर्तुळाकारात आत घुसली होती. त्याच्या बगलांवरून जर्मनीने रणगाडय़ांनिशी मोठा हल्ला चढवला. मात्र, रशियाकडूनही कडवा प्रतिकार झाला. अखेर जर्मनांना माघार घ्यावी लागली. रशियाने जर्मनांकडून ओरेल आणि खारकोव्ह ही शहरे परत जिंकून घेतली. ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्याने त्याचदरम्यान सिसिली आणि इटलीत चढाई सुरू केल्याने हिटलरला रशियातील आक्रमक मोहीम आटोपती घेऊन मध्य युरोपात लक्ष घालावे लागले. त्यामुळे पूर्वेकडील आघाडीवर रशियाचा वरचष्मा निर्माण झाला.

जर्मन फिल्ड मार्शल एरिक फॉन मॅनस्टीन हे कस्र्क येथील हल्ल्याच्या योजनेचे शिल्पकार होते. हिटलरने मॅनस्टीन यांची योजना स्वीकारली, पण जर्मनीत तयार होणारे नवे रणगाडे आघाडीवर पोहोचविण्याच्या नादात जुलैपर्यंत वेळ गेला आणि रशियालाही तयारीला वेळ मिळाला. हिटलरला रशियाचे अधिकाधिक सैन्य नष्ट करायचे होते. या आघाडीवर जर्मनीचे ५० डिव्हिजन सैन्य (साधारण नऊ लाख सैनिक), १७ मोटोराइज्ड आर्मर्ड डिव्हिजन्समधील (चिलखती तुकडय़ा) २७०० रणगाडे होते. जर्मनांनी या अर्धगोलाकार फुगवटय़ाच्या दोन्ही बाजूंनी ५ जुलै १९४३ रोजी आक्रमण सुरू केले. पण रशियाला या आक्रमणाची आगाऊ चाहुल लागली होती आणि त्यांनी आघाडीवर सर्वत्र रणगाडाविरोधी सुरुंग आणि अन्य मोर्चेबंदी करून ठेवली होती. इतक्या मोठय़ा संख्येने हल्ला करूनही जर्मन सैन्य रशियाच्या प्रदेशात उत्तरेकडून केवळ १६ कि. मीटर आणि दक्षिणेकडून ४८ कि. मीटर आत घुसू शकले. १२ जुलै रोजी या युद्धातील परमोच्च बिंदू गाठला गेला. जर्मनीची भिस्त ‘पँथर’ आणि ‘टायगर’ रणगाडय़ांवर होती. रशियाच्या रेड आर्मीने या विभागात पाच लाख रणगाडाविरोधी सुरुंग आणि ४,४०,००० इतके मानवविरोधी सुरुंग (अँटि-पर्सोनेल माइन्स) पेरले होते. त्यामुळे जर्मनीची मोठय़ा प्रमाणावर हानी होत होती. जनरल जॉर्जी झुकॉव्ह यांच्या नेतृत्वाखालील रशियन फौजांनी प्रतिहल्ला चढवला होता. रशियाच्या फौजांमध्ये प्रामुख्याने ‘टी-३४’ आणि ‘टी-७०’ रणगाडय़ांचा भरणा होता. त्यांच्या जोडीला अमेरिका व ब्रिटनकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ‘एम-३ ली’, ‘चर्चिल’, ‘मातिल्दा’ आणि ‘व्हॅलेंटाइन’ रणगाडय़ांचाही समावेश होता. या युद्धभूमीवर रशियाने १३ लाख सैनिक, ३६०० रणगाडे, २०,००० तोफा आणि २७९२ विमाने इतक्या मोठय़ा प्रमाणात फौजफाटा गोळा केला होता. म्हणजेच सोव्हिएत रशियाने एकूण सैन्यापैकी २६ टक्के सैन्य, २६ टक्के तोफखाना, ३५ टक्के विमाने आणि ४६ टक्के रणगाडे कस्र्कच्या आघाडीवर ओतले होते. कस्र्कचे युद्ध इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे रणगाडय़ांचे युद्ध ठरले. मुख्य लढाईत दोन्ही बाजूंच्या ६००० रणगाडय़ांसह २० लाख सैन्य आणि ४००० विमानांनी भाग घेतला. कस्र्कच्या मुख्य लढाईत (५ जुलै ते २३ ऑगस्ट १९४३) जर्मनीने साधारण दोन लाख सैनिक, ७६० रणगाडे आणि ६८० विमाने गमावली. तर रशियाचे नुकसान जर्मनीच्या साधारण तिप्पट होते. रशियाने साधारण १६०० रणगाडे गमावले. या युद्धाने हिटलरची पूर्वेकडील आगेकूच बंद पडली आणि पूर्व आघाडीवर रशियाचे वर्चस्व स्थापन झाले.

महायुद्धोत्तर रणगाडय़ांतील सुधारणा

दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांच्या सैन्यांना कळून चुकले की, सर्व तऱ्हेचे रणगाडे शत्रूच्या रणगाडय़ांचा समाचार घेण्यासाठी पुरेशा मारकक्षमतेने सज्ज असले पाहिजेत. त्यातून पायदळासाठीचे कमी ताकदीचे रणगाडे आणि खास चिलखती दलांचे अवजड रणगाडे ही रणगाडय़ांची विभागणी संपली. त्यानंतर सर्वसमावेशक ‘मेन बॅटल टँक’ची (एमबीटी) संकल्पना उदयास आली. ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्याने तसा फरक बरेच दिवस पाळला होता. मात्र, रणगाडे एकवटून हल्ला करण्याचे तंत्र काही सर्वानीच अवलंबिले नव्हते. बदलत्या परिस्थितीत रणगाडय़ांची उपयुक्तता कमी झाल्याची आणि त्यांचे भविष्य काय असणार याची चर्चा वेळोवेळी होत असते. तशी ती दुसऱ्या महायुद्धानंतरही होत होती. रॉकेट लाँचर्स, रिकॉइललेस गन्स अशी नवनवी रणगाडाभेदी शस्त्रे तयार झाल्याने तसेच रणगाडय़ांची खरी ताकद त्यांच्या चिलखतात आहे अशा गैरसमजातून ही भावना उत्पन्न झाली होती. सोव्हिएत रशियाने मात्र मोठय़ा प्रमाणावर चिलखती दले कायम राखली आणि शीतयुद्धाच्या काळातील कोरियन युद्धात (१९५०-५३) रशियाने उत्तर कोरियाला पुरविलेल्या ‘टी-३४/८५’ रणगाडय़ांनी दक्षिण कोरियावरील चढाईत जी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यातून रणगाडय़ांच्या विकासाला पुन्हा चालना मिळाली.

१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला कमी क्षमतेची अण्वस्त्रे (टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स) बनवली गेली. मोठय़ा अण्वस्त्रांच्या (स्ट्रॅटेजिक न्युक्लिअर वेपन्स) तुलनेत ही लहान अण्वस्त्रे मर्यादित युद्धांत वापरली जाण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळेही रणगाडय़ांच्या विकासाला गती मिळाली. अशा हल्ल्यांतून सैनिकांच्या तुलनेत चिलखती वाहने वाचण्याची शक्यता अधिक होती. तसेच रणगाडय़ांच्या जाडजूड पोलादी आवरणामुळे विषारी किरणोत्सर्गापासून आतील सैनिक वाचण्याची शक्यता वाढली. त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि विकास यांना उत्तेजन मिळाले. १९७० च्या दशकापर्यंत अण्वस्त्रे प्रत्यक्ष युद्धात वापरली जाण्याची शक्यता ओसरली आणि रणगाडय़ांचे युद्धभूमीवरील महत्त्व सैन्यदलांना पुन्हा पटले.

मारकक्षमतेत वाढ

शत्रूचे रणगाडे आणि मोर्चेबंदी भेदण्यासाठी रणगाडय़ांची मारकक्षमता अधिकाधिक असण्याची गरज भासू लागली. त्यातून रणगाडय़ांच्या तोफांचा आकार (तोफेचा व्यास किंवा कॅलिबर) वाढला. अधिक गतिमान आणि रणगाडय़ांचे चिलखत भेदण्याची क्षमता असलेले तोफगोळे विकसित होत गेले. तसेच ओबडधोबड जमिनीवरून रणगाडा जात असतानाही त्याच्या तोफेतून अचूकपणे लक्ष्यावर मारा करण्याची यंत्रणा (फायर कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्यावर भर देण्यात आला.

तोफेच्या वाढत्या क्षमतेसाठी ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ाचे उदाहरण देणे उचित ठरेल. १९४५ साली सेंच्युरियन रणगाडय़ावर ७६ मि. मीटर व्यासाची तोफ होती. ती १९४८ साली ८३.८ मि. मी.ची झाली. १९५९ साली ती १०५ मि. मी.ची झाली. ब्रिटिशांनी १९५० च्या दशकात ‘काँकरर’ हे १२० मि. मी. ची तोफ असलेले रणगाड बनवले. तर १९७० च्या दशकात सेंच्युरियन रणगाडे बदलून त्यांच्या जागी १२० मि. मी.ची तोफ असलेले नवे ‘चिफ्टेन’ रणगाडे बनवले.

सोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांवरील तोफांच्या आकारातही या काळात बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धातील ८५ मि. मि.च्या तोफा असलेल्या ‘टी-३४/८५’ रणगाडय़ांच्या जागी ‘टी-५४’ आणि ‘टी-५५’ हे १०० मि. मी. व्यासाच्या तोफा असलेले नवे रणगाडे आले. त्यानंतर १९६० च्या दशकात ११५ मि. मी.च्या तोफांचे ‘टी-६२’, तर १९७० आणि १९८० च्या दशकांत १२५ मि. मी. व्यासाच्या व आतून गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या (स्मूथ बोअर गन्स) तोफांचे ‘टी-६४’, ‘टी-७२’ आणि ‘टी-८०’ या प्रकारचे रणगाडे आले. भारताकडेही ‘टी-७२’ या प्रकारच्या रणगाडय़ांचा मुख्यत: भरणा आहे. तोपर्यंत १२२ मि. मी.च्या तोफा असलेले ‘जेएस-३’ आणि ‘टी-१०’ रणगाडे मागे घेण्यात आले होते.

अमेरिकी सैन्याकडे १९५० च्या सुरुवातीला १२० मि. मी.च्या तोफेचे ‘एम-१०३’ हे अवजड रणगाडे होते. पण त्यांची संख्या कमी होती. त्यांच्याकडे मुख्यत्वे ९० मि. मी.च्या तोफा असलेले ‘एम-४६’, ‘एम-४७’ आणि ‘एम-४८’ हे रणगाडे होते. १९५० च्या दशकाच्या मध्यास ‘एम-४७’ रणगाडे फ्रान्स, इटली, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, ग्रीस, स्पेन आणि तुर्कस्तान अशा अमेरिकेच्या मित्रदेशांना देण्यात आले. अमेरिकेने १९६० च्या दशकात ‘एम-४८’ च्या जागी ‘एम-६०’ हे रणगाडे आणण्यास सुरुवात केली. नव्या ‘एम-६०’ रणगाडय़ांना १०५ मि. मी.ची तोफ होती. ती ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांसाठी तयार कलेल्या तोफेचीच अमेरिकी आवृत्ती होती.

हीच १०५ मि. मी.ची तोफ स्वित्र्झलडमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या ‘पीझेड-६१’ आणि ‘पीझेड-६८’ रणगाडय़ांनी वापरली. तसेच जर्मनीच्या ‘लेपर्ड-१’, स्वीडनच्या ‘एस-टँक’, जपानच्या ‘टाईप-७४’ आणि इस्रायलच्या ‘मर्कावा मार्क-१’ व ‘मर्कावा मार्क-२’ या रणगाडय़ांसाठीही हीच १०५ मि. मी.ची तोफ स्वीकारली गेली. अमेरिकेने १९७० च्या दशकात बनवलेल्या ‘एम-१ अ‍ॅब्राम्स’ रणगाडय़ाला हीच तोफ होती. मात्र, १९८० च्या दशकातील ‘एम-१ ए-१ अ‍ॅब्राम्स’साठी जर्मनीत ‘लेपर्ड-२’ रणगाडय़ासाठी विकसित केलेली १२० मि. मी.ची तोफ वापरण्यात आली. ब्रिटिशांनी १९८० च्या दशकात बनविलेल्या ‘चॅलेंजर’ रणगाडय़ांसाठी १२० मि. मी.ची तोफ योजण्यात आली. ती रायफल प्रकारची तोफ होती. (रायफल प्रकारात तोफेच्या आतल्या पृष्ठभागावर सर्पिलाकार आटे पाडलेले असतात. त्यामुळे तोफगोळ्याला स्वत:भोवती गोल फिरत जाण्याची गती मिळते.)

दारुगोळ्यातील सुधारणा

रणगाडय़ांच्या केवळ तोफेच्या आकारातच नव्हे, तर त्यातून डागल्या जाणाऱ्या दारुगोळ्यातही सुधारणा होत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या दिवसांत रणगाडय़ाचे पोलादी कवच भेदू शकेल असा दारुगोळा विकसित झाला. त्याला ‘आर्मर पियर्सिग, डिस्कार्डिग सॅबॉट अँटि-टँक प्रोजेक्टाइल्स’ (एपीडीएस) असे म्हटले जाते. या प्रकारच्या रणगाडाभेदी तोफगोळ्याचे बाह्य़ आवरण वजनाने हलके असायचे. रणगाडय़ाच्या तोफेतून बाहेर पडल्यावर बाहेरचे हे हलके आवरण गळून पडायचे. त्याच्या आत टंगस्टन कार्बाइडचा कठीण, जड आणि टोकदार गाभा असायचा. तो खूप वेगाने प्रवास करत शत्रूच्या रणगाडय़ाचे कवच भेदून त्याला नष्ट करायचा. ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांच्या ८३.८ मि. मी.च्या तोफेतून डागण्यासाठी विकसित केलेला ‘एपीडीएस’ गोळा १४३० मीटर (४६९२ फूट) प्रति सेकंद इतक्या वेगाने मारा करत असे. त्यापूर्वीचे साधे रणगाडाभेदी गोळे दर सेकंदाला ९०० मीटर (३००० फूट) वेगाने मारा करायचे. या वेगवान व कठीण गाभ्याच्या टोकदार गोळ्यांमुळे सेंच्युरियन रणगाडे ८८ मि. मी. तोफ असलेले जर्मन टायगर-२ रणगाडे जितक्या जाडीचे कवच भेदत त्याच्या दुप्पट जाडीचे कवच भेदू शकत असत. (याच सेंच्युरियन व शेरमन रणगाडय़ांच्या जोरावर भारताने १९६५ च्या युद्धात पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेल्या पॅटन रणगाडय़ांचा धुव्वा उडवला होता.)

यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे ‘हाय एक्स्प्लोझिव्ह अँटि-टँक (एचईएटी-हिट) शेल’ १९५० च्या दशकात बनवले गेले. या प्रकारच्या रणगाडय़ाच्या तोफगोळ्यांत धातूच्या जाड आणि टोकदार सळईसारखा भाग असे. रणगाडय़ाच्या तोफेतून गोळा डागताना होणाऱ्या स्फोटाच्या उष्णतेने त्याच्या आतील शंकूच्या आकाराच्या पोकळ भागात धातू वितळून गरम रस तयार होत असे. धातूच्या तप्त रसाचा झोत टोकदार गोळ्याच्या समोरील छिद्रातून अत्यंत वेगाने शत्रूच्या रणगाडय़ाच्या कवचावर आघात करत असे. त्याने रणगाडय़ाच्या आवरणात भगदाड पडून गोळा आत जाऊन रणगाडा नष्ट करत असे. अमेरिकी सैन्याने त्यांच्या ९० मि. मी.च्या रणगाडय़ाच्या तोफांसाठी हिट शेल निवडले होते. तसेच फ्रेंच लष्कराने १९६० च्या दशकात आणलेल्या त्यांच्या ‘एएमएक्स-३०’ या रणगाडय़ाच्या १०५ मि. मी. तोफेसाठी हेच गोळे वापरले होते. मात्र, १९७० च्या दशकात ‘एपीडीएस’ आणि ‘हिट’ गोळ्यांचा वापर मागे पडून ‘आर्मर पियर्सिग, फिन स्टॅबिलाइज्ड, डिस्कार्डिग-सॅबॉट’ (एपीएफएसडीएस) या प्रकारचे रणागाडाभेदी तोफगोळे प्रचारात आले. त्यामध्ये टंगस्टनचे मिश्रधातू किंवा ‘डिप्लिटेड युरेनियम’चे धातूच्या जाड आणि टोकदार सळईसारखे अंतर्गत भाग असायचे. ते १६५० मीटर (५४०० फूट) प्रति सेकंद इतक्या वेगाने जाऊन रणगाडय़ावर आघात करत. त्यामुळे रणगाडय़ांना आजवर कधी नव्हे इतकी मारकक्षमता मिळाली होती. या धातूंची घनता जास्त असल्याने त्यांची आघात करण्याची क्षमता अधिक आहे. (मात्र, ‘डिप्लिटेड युरेनियम’ वातावरणात मिसळून शेकडो वर्षे किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वापर निषिद्ध मानला जातो. तरीही अमेरिकेने इराकवरील हल्ल्यात ते वापरल्याची टीका झाली होती.)

१९६० च्या दशकात रणगाडय़ांवर ‘गाइडेड मिसाइल लाँचर्स’ बसविण्याचा प्रयत्न केला गेला. अमेरिकेच्या ‘एम-६० ए-२’ आणि अमेरिकी-जर्मन ‘एमबीटी-७०’ या रणगाडय़ांवर नेहमीच्या तोफेसह ‘शिल्लेलाघ’ नावाची रणगाडाभेदी गाइडेड क्षेपणास्त्रेही बसविली होती. मात्र, तोफगोळ्यांच्या तुलनेत क्षेपणास्त्रे डागण्याचा वेग कमी असल्याने आणि तोपर्यंत ‘फायर कंट्रोल सिस्टिम्स’मध्ये सुधारणा झाल्याने १९७० च्या दशकात गन/लाँचर प्रकारचे रणगाडे मागे पडले.

रणगाडा खाचखळग्यांतून जात असताना खूपच हलत असतो. तो स्थिर नसल्याने तोफेतून लक्ष्यावर अचून नेम साधणे अवघड बनते. त्यावर मात करण्यासाठी ‘फायर कंट्रोल सिस्टिम्स’मध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच झालेली सुधारणा म्हणजे ‘ऑप्टिकल रेंज फाइंडर’चा वापर. ही प्रणाली प्रथम अमेरिकी ‘एम-४७’, जर्मन ‘लेपर्ड-१’ आणि फ्रेंच ‘एएमएक्स-३०’ रणगाडय़ांवर बसवली गेली. १९६० च्या दशकात ‘ऑप्टिकल रेंज फाइंडर्स’च्या जागी ‘लेसर रेंज फाइंडर्स’ वापरले जाऊ लागले. त्यांच्या जोडीला ‘इलेक्ट्रॉनिक बॅलिस्टिक कंप्युटर्स’ वापरल्याने रणगाडे लक्ष्यांवर अधिक अचूकपणे नेम साधू लागले. १९७० च्या दशकापर्यंत त्यांचा वापर सार्वत्रिक होऊ लागला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतांशी रणगाडय़ांमध्ये ‘स्टॅबिलाइज्ड गन कंट्रोल्स’चा वापर होऊ लागला. त्यामुळे रणगाडा खड्डे किंवा उंचवटे पार करताना हलत असला तरीही लक्ष्यावर केंद्रित केलेल्या तोफेचा कोन बदलत नसे. सुरुवातीला रशियाच्या ‘टी-५४’ रणगाडय़ांवर तोफ उभ्या प्रतलात (वरच्या आणि खालच्या दिशेने) फिरत असताना ही प्रणाली लागू होत असे. पुढे ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांमध्ये तोफ आडव्या प्रतलात फिरत असतानाही ही प्रणाली लागू करण्याची सोय करण्यात आली. १९७० च्या दशकापर्यंत सर्वच रणगाडय़ांमध्ये ‘स्टॅबिलाइज्ड गन कंट्रोल्स’चा वापर होऊ लागला. त्यानंतर रणगाडय़ाच्या गनर आणि कमांडरसाठी स्वतंत्र ‘स्टॅबिलाइज्ड साइट्स’ची सोय झाली. त्याने नेम धरणे आणखी सुलभ झाले.

याशिवाय ‘नाइट साइट्स’ उपकरणांच्या वापरामुळे रणगाडय़ांना रात्रीच्या काळोखातही शत्रूला पाहण्याची क्षमता मिळाली. सुरुवातीला सोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांवर ‘अ‍ॅक्टिव्ह इन्फ्रारेड’ प्रकारच्या नाइट साइट्स बसवण्यात आल्या. १९६० च्या दशकात रणगाडय़ांवर ‘इन्फ्रारेड इमेज इन्टेन्सिफायर्स’ बसवले जाऊ लागले. तर १९७० च्या दशकात ‘थर्मल इमेजिंग साइट्स’चा वापर प्रचलित होऊ लागला. इन्फ्रारेडच्या तुलनेत थर्मल इमेजर्सना ‘पॅसिव्ह’ म्हटले जाते. कारण त्यात इन्फ्रारेड प्रणालीप्रमाणे ऊर्जा उत्सर्जित होत नाही. या कारणाने ‘पॅसिव्ह इमेजर्स’ बसवलेल्या रणागाडय़ांचा शत्रूला माग लागणे कठीण असते.

चिलखतातील सुधारणा

१९६० च्या दशकापर्यंत रणगाडय़ाचे चिलखत हे सलग पत्र्याचे किंवा ओतीव असे. सुरुवातीच्या रणगाडय़ांमध्ये त्याची जाडी आठ मि. मीटर होती. तर १९४५ मध्ये जर्मन ‘जॅग्दटायगर’ रणगाडय़ाचे आवरण २५० मि. मी. जाडीचे होते. मात्र, चिलखताच्या जाडीबाबत भिन्न मतप्रवाह होते. चिलखताची जाडी कमी करून वजन घटवले आणि त्यांची गतिमानता वाढवली तर युद्धात त्यांची शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्याची क्षमता वाढते असे दुसऱ्या महायुद्धानंतर मानले जाऊ लागले. त्यामुळेच युद्धोत्तर काळातील ‘लेपर्ड-१’ आणि ‘एएमएक्स-३०’ या रणगाडय़ांचे चिलखत कमी जाडीचे होते. ब्रिटिश चिफ्टेन रणगाडय़ांचे चिलखत मात्र पुढील भागात १२० मि. मी. जाडीचे होते. त्याचा फायदा १९६७ आणि १९७३ साली झालेल्या अरब-इस्रायल युद्धांमध्ये दिसून आला. अखंड पोलादाच्या आवरणातही बदल होऊन नव्या प्रकारची चिलखती आवरणे तयार झाली. नव्या प्रकारच्या चिलखतात पोलादी जाड पत्र्यांच्या मध्ये सिरॅमिक आणि अन्य अधातू पदार्थ भरले होते. त्याने हल्ल्यांत ‘शेप्ड-चार्ज वॉरहेड’ प्रकारच्या तोफगोळ्यांपासून रणगाडा वाचण्याची शक्यता वाढली. सर्वप्रथम ब्रिटनमध्ये ‘चोभम आर्मर’ नावाने या प्रकारचे रणगाडय़ाचे चिलखत तयार करण्यात आले. ते १९७० च्या दशकात ‘लेपर्ड-२’ आणि ‘एम-१’ रणगाडय़ांवर प्रथमच वापरण्यात आले.

लेबॅननमधील युद्धात १९८२ साली इस्रायलने प्रथमच रणगाडय़ांवर ‘एक्स्प्लोझिव्ह रिअ‍ॅक्टिव्ह आर्मर’ वापरले. या प्रकारात धातूच्या दोन कमी जाडीच्या पत्र्यांमध्ये स्फोटके भरलेली असतात. त्यातील स्फोटकांचा बाहेरच्या बाजूला स्फोट होतो. त्यामुळे शत्रूच्या तोफगोळ्यांची मारकक्षमता कमी होते. अशा प्रकारचे चिलखत विशेषत: ‘शेप्ड-चार्ज वॉरहेड’च्या विरोधात अत्यंत प्रभावी ठरले.

मात्र, अधिक संरक्षण देण्याच्या नादात जाड चिलखतांमुळे रणगाडय़ांचे वजन वाढले. १९५० आणि १९६० च्या दशकांत आलेल्या ‘टी-५४’ आणि ‘एएमएक्स-३०’ यांसारख्या रणगाडय़ांचे वजन ३६ टन होते. तर चिफ्टेनचे वजन ५४ टन होते. १९८० च्या दशकातील ‘एम-१’ आणि ‘लेपर्ड-२’ यांचे वजन ५० टन, तर चॅलेंजरचे वजन ६२ टन होते.

गतिमानता

एकीकडे रणगाडय़ांच्या वजनात वाढ होत होती; मात्र त्यांना गती देणाऱ्या इंजिनांच्या शक्तीतही वाढ होत असल्याने त्यांचा वेग घटण्याऐवजी वाढतच गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर रणगाडय़ांना ५०० ते ८०० अश्वशक्तीची इंजिने होती. ‘एमबीटी-७०’ या रणगाडय़ाच्या आगमनापासून त्यांच्या इंजिनाची क्षमता १५०० अश्वशक्तींपर्यंत वाढली. अशाच प्रकारची इंजिने ‘एम-१’ आणि ‘लेपर्ड-२’ रणगाडय़ांनाही बसवण्यात आली. त्याने रणगाडय़ांची शक्ती आणि वजन यांचे गुणोत्तर २० अश्वशक्ती प्रति टन इतके झाले होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस बहुतांशी रणगाडय़ांची इंजिन्स गॅसोलिनवर चालणारी आणि स्पार्क-इग्निशन प्रकारची होती. सोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांनी मात्र डिझेल इंजिन वापरण्यास सुरुवात केली आणि १९६० च्या दशकापर्यंत सर्वच रणगाडय़ांना डिझेल इंजिने बसवली जाऊ लागली. डिझेलच्या ज्वलनातून अधिक उष्मांक तयार होत असल्याने आता रणगाडे अधिक दूरवर प्रवास करू शकत. तसेच रणगाडय़ावर हल्ला झाल्यास गॅसोलिन पेट घेऊन होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाणही कमी झाले. स्वीडनने १९६० च्या दशकात त्यांच्या ‘एस-टँक’साठी डिझेल इंजिनच्या बरोबरीने नव्याने विकसित झालेले गॅस टर्बाइन इंजिन वापरले. त्यानंतर ‘एम-१’ आणि ‘एम-१ ए-१’ रणगाडय़ांवरही १५०० अश्वशक्तीचे गॅस टर्बाइन इंजिन बसवले गेले. रशियानेही १९८० च्या दशकात विकसित केलेल्या ‘टी-८०’ रणगाडय़ांवर गॅस टर्बाइन इंजिन बसवले. अन्य देशांनी मात्र डिझेल इंजिनच्या अधिक किफायतशीरपणामुळे त्यांचाच वापर सुरू ठेवला.

ओबडधोबड जमिनीवर रणगाडय़ाची गती केवळ त्याच्या शक्तीमुळे ठरत नव्हती, तर त्यावर ‘सस्पेन्शन’चाही परिणाम होत असे. म्हणून रणगाडय़ाचे सस्पेन्शन (धक्के व हादरे शोषून घेण्याची क्षमता) सुधारण्यावर भर देण्यात आला. बहुतांशी रणगाडय़ांमध्ये ‘इंडिपेंडंटली लोकेटेड रॉड व्हिल्स’ आणि ‘ट्रन्सव्हर्सली लोकेटेड टॉर्शन बार्स’ वापरण्यात आले. सेंच्युरियन, चिफ्टेन आणि मर्कावा हे रणगाडे याला अपवाद होते. त्यांत चाकांना कॉइल स्प्रिंग बसवण्यात आल्या होत्या. १९८० च्या दशकात धातूच्या स्प्रिंगऐवजी हायड्रो-न्यूमॅटिक सस्पेन्शन वापरल्याने रणगाडय़ांची धक्के सहन करूनही स्थिर राहण्याची क्षमता वाढली होती.

अंतर्गत रचना

साधारणत: रणगाडय़ाच्या ‘हल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य भागाच्या पुढच्या बाजूला चालकाची बसण्याची सोय असते. इंजिन मागील बाजूला आणि मुख्य भागावर मध्ये तोफेचे फिरणारे ‘टरेट’ असते. टरेटमध्ये टँक कमांडर, गनर आणि लोडर बसतात. व्हिकर्स-आर्मस्ट्राँगने १९३४ साली ‘ए-१०’ रणगाडय़ात केलेली ही रचना बहुतांश रणगाडय़ांत स्वीकारली गेली. १९६० नंतर त्यात काही बदल होत गेले. मुख्य भागावर बसवलेले तोफेचे फिरते टरेट कायम राहिले; मात्र तोफेत लोडरने हाताने गोळे भरण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणा अवलंबिण्यात आली. रशियाच्या ‘टी-६४’ आणि ‘टी-७२’ रणगाडय़ांवर ही यंत्रणा प्रथम बसवण्यात आली. इस्रायलनेही आपल्या मर्कावा रणगाडय़ात काही बदल करून इंजिन पुढच्या भागात आणि दारुगोळा साठवण्याची सोय मागील भागात केली. त्यामुळे शत्रूच्या माऱ्यात दारुगोळा पेट घेऊन रणगाडा नष्ट होण्याची शक्यता कमी झाली. मर्कावाच्या टरेटच्या समोरील भागाचे क्षेत्रफळही बरेच कमी केले आहे. त्यामुळे शत्रूच्या माऱ्यापासून अधिक संरक्षण मिळते. रणगाडय़ांच्या पुढील भागातील धातूचे आवरण सरळ उभे करण्याऐवजी जमिनीशी थोडय़ा कोनात- म्हणजे तिरपे (उताराचे) केलेले असते. त्याने चिलखताची जाडीही वाढते आणि उतरत्या चिलखतावर शत्रूचा तोफगोळा लागल्यास तो सरळ आत घुसण्याऐवजी दिशा बदलून बाजूला जाण्याची शक्यता वाढते. त्यातून अधिक सुरक्षितता मिळते.

सुरुवातीला हलके, मध्यम व अवजड अशा प्रकारचे विविध कामगिरीसाठी वेगवेगळे वापरले जाणारे रणगाडे होते. शीतयुद्धाच्या काळात या सर्व कामगिरींसाठी उपयुक्त ठरेल अशा आणि सर्वाच्या खुबी एकत्र केलेल्या ‘मेन बॅटल टँक’ची (एमबीटी) संकल्पना आकार घेऊ लागली. आज रशियाचा ‘टी-९०’ आणि सर्वात नवा ‘टी-१४-अर्माता’, इस्रायलचा ‘मर्कावा एमके ४-एम’, जर्मनीचा ‘लेपर्ड-२ ए-५’, फ्रान्सचा ‘लेक्लर्क’, ब्रिटिश ‘चॅलेंजर’ आणि ‘चिफ्टेन’, अमेरिकेचा ‘एम-१ ए-१ अ‍ॅब्राम्स’ आणि ‘एम-१ ए-२ अ‍ॅब्राम्स’ हे जगातील सर्वात प्रगत मेन बॅटल टँक्स म्हणून ओळखले जातात. आजच्या रणगाडय़ांमध्ये आण्विक, जैविक आणि रासायनिक (न्यूक्लिअर, बायोलॉजिकल अँड केमिकल- एनबीसी) शस्त्रांच्या हल्ल्यांपासूनही बचावाची सोय आहे.

गेल्या १०० वर्षांच्या स्थित्यंतरांतून, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीतून तसेच युद्धभूमीवरील अग्निवर्षांवात तावूनसुलाखून  रणगाडय़ाची आजची अजोड शस्त्रास्त्र प्रणाली आकारास आली आहे. रणगाडय़ाने दुसऱ्या महायुद्धातील अल-अलामीन आणि कस्र्कचे रणसंग्राम यांच्यापासून भारत-पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धातील चविंडा, खेमकरण-असल उत्तरच्या लढाया आणि अरब-इस्रायल यांच्यातील १९६७ सालचे सहा दिवसांचे युद्ध आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध, कोरिया-व्हिएतनाममधील संघर्ष आणि अगदी अलीकडच्या काळातील इराक युद्धापर्यंत (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म) गेल्या १०० वर्षांत आपले महत्त्व अबाधित राखले आहे. आता तर रणगाडय़ांना युद्धभूमीवर अदृश्य करण्याचे तंत्रही विकसित केले जात आहे. अत्याधुनिक सेन्सर्स (संवेदक) आणि अन्य तंत्रज्ञानाच्या आधाराने भोवतालच्या परिसरासारखी दृश्ये रणगाडय़ाच्या पृष्ठभागावर प्रोजेक्ट करून तो वातावरणात बेमालूमपणे मिसळवता येईल आणि शत्रूच्या अगदी जवळ जाईपर्यंत तो दिसणारही नाही अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच तो रडारवर न दिसण्यासाठी ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानही वापरले जात आहे. आज क्षेपणास्त्रांच्या युगात रणगाडय़ांच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. आज युद्धभूमीवर रणागाडय़ांना लढाऊ विमानांचे किंवा हेलिकॉप्टर्सचे हवाई छत्र पुरवावे लागते. परंतु जोवर शत्रूची मोर्चेबंदी भेदून शत्रूप्रदेशात खोलवर मुसंडी मारण्याची गरज भासत राहील तोवर जगभरच्या सेनानींना रणगाडय़ांवर भिस्त ठेवावीच लागणार, हे नि:संशय!

भारत आणि रणगाडे

जगात सर्वत्र रणगाडे आपला ठसा उमटवत असताना भारतातही त्यांचा केवळ वापर होत नव्हता, तर त्यांच्या उपयोगाचे नवे उच्चांक स्थापित होत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतीय सैन्याला रणगाडय़ांच्या वापराची संधी मिळली. आफ्रिकेतील अल-अलामीनची लढाई, बर्मा (ब्रह्मदेश तथा म्यानमार) आघाडीवर तसेच अन्यत्र भारतीय सैन्याने रणगाडा दलाबरोबर कामाचा अनुभव घेतला होता. स्वातंत्र्यानंतर जेव्हा जम्मू-काश्मीरवरील नियंत्रणासाठी भारत आणि पाकिस्तान या नवस्वतंत्र देशांमध्ये १९४७-४८ साली युद्ध झाले तेव्हा काश्मीरमधील झोजी लाच्या (ला म्हणजे खिंड) लढाईत रणगाडे वापरण्याचा पराक्रम भारतीय सैन्याने केला. श्रीनगर ते लेह या मार्गावरील झोजी ला हे समुद्रसपाटीपासून ३५२८ मीटर (११,५७५ फूट) उंचीवर आहे. इतक्या उंचीवर रणगाडे नेण्याचा भारतीय सैन्याचा जागतिक विक्रम अद्यापि अबाधित आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने काश्मीरमध्ये घुसलेल्या हल्लेखोर टोळ्यांनी मे १९४८ मध्ये झोजी लावर ताबा मिळवला. त्यामुळे लडाखमधील लेहला धोका निर्माण झाला. ब्रिगेडियर हिरालाल अटल यांच्या नेतृत्वाखालील ७७ पॅराशुट ब्रिगेडने केलेला समोरासमोरील हल्ला अयशस्वी ठरला. अखेर लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल करिअप्पा (नंतर ते फिल्ड मार्शल झाले.) यांनी या कारवाईचे जुने नाव ‘ऑपरेशन डक’ बदलून ‘ऑपरेशन बायसन’ असे केले. सातव्या लाइट कॅव्हलरी रेजिमेंटचे एम-५ स्टुअर्ट रणगाडे श्रीनगरमधून आघाडीवर न्यायचे होते. शत्रूला किंवा आपल्या नागरिकांनाही कारवाईचा सुगावा लागू नये म्हणून श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रणगाडय़ांचे भाग सुटे करून ते रातोरात श्रीनगरमधून बालताल येथे नेण्यात आले. रणगाडे तेथून पुढे नेण्यासाठी मद्रास सॅपर्स या इंजिनीअरिंग रेजिमेंटच्या दोन फिल्ड कंपन्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बालताल ते झोजी ला आणि गुमरी इथपर्यंत खेचरांवरील वाहतुकीच्या दर्जाचा असलेला मार्ग सुधारून रणगाडय़ांच्या वाहतुकीसाठी योग्य बनवला. इतकी सगळी तयारी झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९४८ रोजी पाकिस्तानी टोळीवाल्यांवर स्टुअर्ट रणगाडे आणि २५ पौंडांच्या तोफांसह तुफानी प्रतिहल्ला चढविण्यात आला. आघाडीवरील पहिल्या रणगाडय़ावर स्वार होऊन खुद्द मेजर जनरल के. एस. थिमय्या (ते पुढे लष्करप्रमुख झाले.) या चढाईचे नेतृत्व करत होते. हिमालयातील इतक्या उंच पर्वतराजीमध्ये रणगाडे आलेले पाहून शत्रूसैन्याचे धाबे दणाणले. हा शत्रूवरील मनोवैज्ञानिक आघातच मोठा होता. अखेर शत्रूने झोजी ला सोडून मातायानपर्यंत माघार घेतली.

पुढे १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही रणगाडय़ांच्या मोठय़ा लढाया झाल्या. त्यात छांब, खेमकरण, असल उत्तर, चविंडा, फिलोरा येथे रणगाडय़ांचे घनघोर रणसंग्राम झाले. आणि त्यांनीच युद्धाचे पारडे फिरवले.

१९४७-४८ च्या युद्धात जम्मू-काश्मीर पूर्णपणे मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने १९६५ साली भारताची पुन्हा कुरापत काढली. १९६२ साली चीनबरोबरच्या युद्धात भारताला हार पत्करावी लागल्याने भारत कमकुवत असल्याचा पाकिस्तानचा समज होता. त्यात अमेरिकेकडून त्या काळातील सर्वोत्तम समजले जाणारे पॅटन रणगाडे आणि एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टारफायटर ही लढाऊ विमाने मिळाल्याने पाकिस्तानी लष्करशहा फिल्ड मार्शल अयुब खान यांचा आत्मविश्वास वाढला होता. सुरुवातीला कच्छच्या रणात ताकद आजमावून पाहिल्यावर त्यांनी ऑगस्ट १९६५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावाने कारवाई सुरू केली. मात्र, ऑगस्टच्या अखेरीस भारताने काश्मीरमधील महत्त्वाची हाजी पीर खिंड जिंकून लढाईत वरचष्मा मिळवला. त्यानंतर १ सप्टेंबरला पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम’च्या नावाने संपूर्ण हल्ला चढवला. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी रणगाडा दलाला थोपवण्यासाठी भारतीय रणगाडा दलांनी दंड थोपटले. या क्षेत्रातील पहिली मोठी लढाई फिलोरा येथे १० आणि ११ सप्टेंबरला लढली गेली. ११ सप्टेंबरला भारताने फिलोरा जिंकले. पण या लढाईत भारताचे लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बी. तारापोर यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले.

भारतीय सैन्याच्या १ आर्मर्ड डिव्हिजनने (ब्लॅक एलिफंट) ९ सप्टेंबरपासून सियालकोट क्षेत्रात मुसंडी मारली. ग्रँड-ट्रंक मार्गावरील वझीराबाद जिंकणे तसेच जस्सोरन जिंकून सियालकोट-पसरूर रेल्वेमार्गावर नियंत्रण मिळवणे आणि पाकिस्तानी रसदपुरवठा खंडित करणे, हे या क्षेत्रात भारताचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मार्गात पाकिस्तानमधील चविंडा येथे मोठा रणसंग्राम झाला. दुसऱ्या महायुद्धात कस्र्क येथे जगातील आजवरचे सर्वात मोठे रणगाडय़ांचे युद्ध झाले होते. त्यानंतरच्या सर्वात मोठय़ा रणगाडा-युद्धात चविंडाच्या लढाईचा समावेश होतो. त्यात पाकिस्तानने भारतीय हल्ला थोपवून सरशी मिळवली. या लढाईत भारताने सुमारे १००, तर पाकिस्तानने ४४ रणगाडे गमावल्याचे सांगितले जाते.

१९६५ च्या युद्धातील सर्वात महत्त्वाची रणगाडय़ांची लढाई पंजाबमधील असल उत्तर या ठिकाणी लढली गेली. पाकिस्तानी सैन्याने सीमेजवळील खेमकरण हे भारतीय गाव जिंकून घेतले होते. त्याला भारताने असल उत्तर येथे खणखणीत उत्तर दिले. या लढाईत भारताने पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचे ९९ पॅटन रणगाडे भारताने नष्ट केले. तर भारताचे दहा रणगाडे निकामी झाले. असल उत्तरजवळ नष्ट झालेल्या आणि पकडलेल्या पॅटन रणगाडय़ांचे ‘पॅटन नगर’च उभे राहिले. त्यामुळे असल उत्तरला आजही पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांची दफनभूमी (ग्रेव्हयार्ड ऑफ पॅटन टँक्स) म्हणून ओळखले जाते. याच लढाईत ग्रेनेडियर्सच्या चौथ्या बटालियनमधील कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार (सीक्यूएम) अब्दुल हमीद यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. १० सप्टेंबर १९६५ रोजी जीप माऊंटेड रिकॉइललेस गनच्या साहाय्याने त्यांनी एकहाती तीन ‘एम-४८ पॅटन’ रणगाडे उद्ध्वस्त केले. चौथ्या रणगाडय़ाने मात्र त्यांना टिपले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.

वास्तविक पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेले ‘एम-४८ पॅटन’ हे त्यावेळचे जगातील सर्वोत्तम रणगाडे मानले जायचे. त्याविरुद्ध भारताचे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकी आणि ब्रिटिश सेंच्युरियन आणि शेरमन हे रणगाडे बरेच जुने आणि कमी ताकदीचे होते. पण भारतीय सेनादलांचे प्रशिक्षण, मनोबल, रणनीती आणि डावपेच वरचढ ठरले. भारताने पॅटन रणगाडे फोडल्याने अमेरिकेसह जगभरात आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यानंतर अमेरिकेने ‘एम-४८ पॅटन’ रणगाडे बदलून त्याची सुधारीत आवृत्ती असलेले ‘एम-६०’ रणगाडे त्यांच्या सेनादलाला दिले.

बांगलादेश मुक्तीसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धात भारतीय चढाईची मुख्य भिस्त पूर्वकडील आघाडीवर होती. त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने राजस्थान सीमेवरील लोंगेवाल येथील भारतीय ठाण्यावर रणगाडय़ांनिशी मोठा हल्ला चढवला. मात्र, संख्येने आणि शस्त्रबळाने कमी असूनही भारतीय सैन्याने केलेल्या कडव्या प्रतिकाराने ४ ते ७ डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या या लढाईचे पारडे फिरवले आणि त्याची इतिहासात कायमची नोंद झाली. यावेळी पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनच्या अल्फा कंपनीचे मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने दाखविलेल्या धैर्य आणि पराक्रमाला तोड नाही. लोंगेवालाच्या ठाण्यावर भारतीय पायदळाचे केवळ १२० जवान होते. त्यांच्यावर पाकिस्तानने २००० सैनिक आणि ‘टी-५९’ प्रकारच्या ४५ ते ६५ रणगाडय़ांनिशी हल्ला चढवला होता. मात्र, त्याने डगमगून न जाता मेजर चांदपुरी यांच्या जवानांनी हवाई दलाची मदत मिळेपर्यंत हल्ला थोपवून धरला आणि अखेर पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले. भारतीय पायदळाच्या रणगाडाभेदी रिकॉइललेस गनने आणि हवाई दलाच्या ‘हॉकर हंटर’ व स्वदेशी ‘एचएफ-२४ मरुत’ लढाऊ विमानांनी पाकिस्तानी रणगाडय़ांच्या चिंधडय़ा उडवल्या. भारताने या लढाईत केवळ दोन सैनिक गमावले. पण पाकिस्तानने २०० सैनिक आणि ३४ रणगाडे गमावले. मेजर चांदपुरी यांना महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले. या लढाईत पाकिस्तानी रणगाडय़ांनी अखेरचे प्रयत्न म्हणून केलेल्या हालचालींनी थरच्या वाळवंटातील जमिनीवर तयार झालेल्या अनोख्या नक्षीकामाचे छायाचित्र बरेच गाजले. या लढाईवर बेतलेला ‘बॉर्डर’ हा हिंदी चित्रपटही बराच गाजला. त्यात सनी देओलने मेजर चांदपुरी यांची, तर जॅकी श्रॉफने विंग कमांडर एम. एस. बावा यांची भूमिका केली होती.

भारताने १९६५ आणि १९७१ च्या युद्धात रशियन बनावटीचे पाण्यातून प्रवास करू शकणारे ‘पीटी-७६ अँफिबियस लाइट टँक्स’देखील प्रभावीपणे वापरले. बांगलादेशमधील गंगा व ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात नद्यांची शेकडो मुखे काही कि. मीटर रुंदीचे विक्राळ रूप घेतात. या भूप्रदेशात ‘पीटी-७६’ रणगाडे अत्यंत प्रभावी ठरले. वास्तविक १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला रचना केलेले हे रणगाडे या युद्धापर्यंत कालबाह्य़ ठरले होते. पण भारताने त्यांचा खुबीने वापर करून घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९७१ च्या युद्धातील गरीबपूरची लढाई. त्यात भारताच्या केवळ १४ ‘पीटी-७६’ रणगाडय़ांनी तांत्रिकदृष्टय़ा वरचढ असलेल्या पाकिस्तानी ‘एम-२४ शफी’ रणगाडय़ांना मात दिली.

नगरचे रणगाडा संग्रहालय

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे लष्कराच्या रणगाडा व चिलखती दलाची ‘आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल’, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) तसेच व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (व्हीआरडीई) ही महत्त्वाची केंद्रे आहेत. तसेच ‘आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल’तर्फे अहमदनगरमध्ये ‘कॅव्हलरी टँक म्युझियम’- म्हणजेच रणगाडा संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारचे आशियातील हे एकमेव संग्रहालय आहे. माजी लष्करप्रमुख जनरल बी. सी. जोशी यांच्या हस्ते १९९४ साली त्याचे उद्घाटन झाले. ते स्वत: रणगाडा दलातील अधिकारी होते. विविध देशांनी वापरलेले सुमारे ५० जुने रणगाडे आणि त्यांची माहिती येथे मांडण्यात आली आहे. त्यात अगदी पहिल्या महायुद्धात कँब्रे आणि फ्लँडर्सच्या लढाईत वापरलेल्या रणगाडय़ांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील रणगाडय़ांचाही समावेश आहे. ब्रिटिश व्हॅलेंटाइन, जपानी ‘टाईप-९५ हा-गो’, शेरमन क्रॅब, अमेरिकी पॅटन, सेंच्युरियन, जर्मन पँझर, पाकिस्तानी शफी, भारतीय विजयंता हे रणगाडे या संग्रहालयाचे खास आकर्षण आहेत.  ब्रिटिश जनरल डायर याने अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे भारतीयांवर गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या चिलखती गाडीच्या प्रकारातील गाडय़ाही इथे आहेत. भारतीय रणगाडा दलाचा हा इतिहास नव्या पिढय़ांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

विजयंता व अर्जुनची कहाणी

१९६० च्या दशकात भारताचा स्वत:चा ‘मेन बॅटल टँक’ (एमबीटी) असावा अशी कल्पना पुढे आली. ब्रिटिश आणि जर्मन रणगाडय़ांची चाचपणी करून ऑगस्ट १९६१ मध्ये ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड (आता बदललेले नाव- व्हिकर्स डिफेन्स सिस्टिम्स) या कंपनीशी भारतासाठी रणगाडा विकसित करण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला भारतासाठी रणगाडय़ाचे प्राथमिक प्रारूप (प्रोटोटाईप) बनवून ९० रणगाडे ब्रिटनमध्ये तयार करून भारताला देण्याचे ठरले. तसेच तामिळनाडूतील चेन्नईजवळील आवडी येथे स्वदेशी रणगाडानिर्मितीचा कारखाना उभारून ‘विजयंता’चे उत्पादन होऊ लागले. ब्रिटनमध्ये विजयंताची पहिली प्रारूपे १९६३ साली तयार झाली. त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. जानेवारी १९६५ पासून आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मधून स्वदेशी विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन होऊ लागले. तेव्हापासून १९८३ पर्यंत १२०० ते २२०० विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन केल्याचे सांगितले जाते. १९६५ पासून २००८ पर्यंत विजयंताने भारतीय चिलखती दलांना बळ पुरवले. बांगलादेशमुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात ते प्रत्यक्ष वापरले गेले. विजयंता रणगाडय़ाच्या मूळ संरचनेत थोडे बदल करून ‘कॅटापुल्ट सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी’ (स्वयंचलित तोफ), ‘कार्तिक आर्मर्ड व्हेईकल-लाँच्ड ब्रिज’ (पूल उभे करण्याचे यंत्र) आणि ‘विजयंता आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल’ अशी चिलखती वाहने बनविण्यात आली. डिझेल इंजिनवर चालणारा ४३ टनी ‘विजयंता’ ताशी ५० कि. मीटरच्या वेगाने ५३० कि. मी.पर्यंत मजल मारू शकत असे. त्याचे चिलखती आवरण ८० मि. मीटरचे होते आणि त्यावर १०५ मि. मी. व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन्स बसवल्या होत्या.

तिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक आणि स्वदेशी अर्जुन रणगाडय़ावर १९७२ पासून काम सुरू झाले. आवडी येथील ‘कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट’ (सीव्हआरडीई) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) यांनी त्याची संरचना केली असून, आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मध्ये त्याचे उत्पादन होते. सतत होणाऱ्या विलंबामुळे आणि नवनव्या त्रुटी व अडचणींमुळे अर्जुन प्रकल्पाचे भवितव्य अंध:कारमय असल्याचे म्हटले जायचे. त्याच्या उपयुक्ततेवर आणि प्रभावीपणावर बरीच टीकाही झाली. प्रकल्पावरील वाढत्या खर्चाचाही मुद्दा होता. मे १९७४ मध्ये त्यासाठी १५ कोटी ५० लाख रुपये मजूर करण्यात आले होते. ‘डीआरडीओ’ने १९९५ पर्यंत या प्रकल्पावर तीन अब्ज रुपये खर्चूनही प्रत्यक्ष रणगाडा काही लष्कराला मिळाला नव्हता. भारतीय लष्कराला वेळेत स्वत:चा अत्याधुनिक रणगाडा न मिळाल्याने तातडीची गरज भागविण्यासाठी १९९० च्या आणि २००० च्या दशकात रशियाकडून ‘टी-९०’ (भीष्म) रणगाडे घ्यावे लागले. अखेर ‘अर्जुन’ची विकास प्रक्रिया आणि चाचण्या संपून लष्कराने २००० साली १२४ अर्जुन रणगाडय़ांची मागणी नोंदवली. आवडी येथील कारखान्यात त्यांचे उत्पादन सुरू होऊन २००४ साली पहिल्या तुकडीतील १६ रणगाडे लष्कराला मिळाले. सध्या एका अर्जुन रणगाडय़ाची किंमत ५५ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.

अर्जुनवर १२० मि. मी. व्यासाची मुख्य तोफ आणि ७.६६ मि. मी. व १२.७ मि. मी.च्या मशिनगन्स आहेत. त्याचे डिझेल इंजिन १४०० अश्वशक्तीचे असून ‘अर्जुन’ सपाट जमिनीवरून ताशी ६७ कि. मी.च्या, तर ओबडधोबड जमिनीवरून ४० कि. मी. प्रति तास वेगाने प्रवास करू शकतो. तो चालवण्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चारजणांची गरज भासते. ‘अर्जुन’साठी ‘कांचन’ नावाचे मोडय़ुलर कॉम्पोझिट प्रकारचे चिलखती आवरण विकसित करण्यात आले आहे. ‘अर्जुन मार्क-१’, ‘मार्क-२’ आणि ‘टँक-एक्स’ अशी त्याची मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने आजवर ‘अर्जुन मार्क-१’ प्रकारच्या २२४ आणि ‘मार्क-२’ प्रकारच्या ११८ रणगाडय़ांची मागणी नोंदवली आहे. हे रणगाडे भारतीय लष्कराच्या चिलखती दलाच्या (आर्मर्ड कोअर) ‘४३ आर्मर्ड रेजिमेंट’ आणि ‘७५ आर्मर्ड रोजिमेंट’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘डीआरडीओ’कडून त्यात अद्यापि बदल आणि सुधारणा केल्या जात आहेत. ‘डीआरडीओ’ ‘नाग’ नावाचे चार कि. मीटर पल्ला असलेले स्वदेशी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रही विकसित करीत आहे. पाकिस्तानच्या ‘अल-खालीद’ रणगाडय़ांचा समाचार घेण्यास ते सज्ज आहे.
सचिन दिवाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:03 am

Web Title: 100 years of tank
Next Stories
1 संस्कार महत्त्वाचे!
2 वार्षिक राशिभविष्य : ३१ ऑक्टोबर २०१६ ते १९ ऑक्टोबर २०१७
Just Now!
X