16 January 2021

News Flash

देशोदेशीचे ट्रम्प : (ब्राझील) बोल्सोनारो झाले बेताल!

ब्राझील सध्या राजकीय अराजकाच्या उंबरठय़ावर आहे.

बोल्सोनारो

39-ls-diwali-2016-trumpसध्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या आक्रस्ताळ्या, उजव्या, कट्टरतावादी वक्तव्यांमुळे जगभर गाजत आहेत. महिला आणि मुस्लिमांबद्दलची त्यांची भडकावू विधाने तसेच त्यांना हीन लेखणारी त्यांची भूमिका अत्यंत आक्षेपार्ह आहे. आपल्या देशातील स्थलांतरितांना हाकलून द्यावे असे त्यांचे आग्रही मत आहे. एतद्देशीयांच्या अधोगतीला हे स्थलांतरित लोकच कारणीभूत आहेत असा जोरदार विखारी प्रचार ते करीत आहेत. ट्रम्प यांच्यासारखेच आक्रस्ताळे, अस्मितावादी, उजव्या, राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते आज अनेक देशांत उदयाला येत आहेत. इंग्लंड, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, ब्राझील आदी देशांतील अशा नेत्यांच्या वाढत्या लोकप्रियतेने विवेकी जग अस्वस्थ न झाले तरच नवल. देशोदेशीच्या अशा ‘ट्रम्पस्’चा एक लेखाजोखा..

सुंदर हिरव्या टेकडय़ा. अगदी शहराच्या मधोमध आणि खेटूनही. निळाशार समुद्र आणि सोनेरी पुळण. जेथे नजर जाईल तेथे उत्साही रंगांची उधळण. निसर्ग असा.. जशी ठेवणीतील जपलेली संपदा. जगातील सर्वात मोठय़ा पर्जन्यवनाचा देश.. ब्राझील! ब्राझीलियन वूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या झाडांनी बनलेला ताम्रवर्णी अरण्याचा प्रदेश. निम्म्या दक्षिण अमेरिकी खंडाला व्यापणारा ब्राझीलचा हा भूगोल दूरस्थ भारतासह उपखंडातील पाऊसपाण्याचा नियंता आहे. सांबा नृत्याची बेभानता आणि फुटबॉलवेड नसानसांत जपणारे इथलं मस्त, बेफिकीर जनजीवन. इथलं बोसा नोव्हा संगीताच्या तालाचं वेड आणि चार दिवस चालणाऱ्या वार्षकि काíनव्हल परेडची उत्सवी िझग तर साऱ्या जगालाच आहे. एकदाच नव्हे, तर तब्बल पाचदा फुटबॉल विश्वचषकाचा मानकरी ठरलेला हा देश. या परिचित ओळखीपल्याडचे ब्राझीलचे अलीकडचे वेगळेपण बेचन करून सोडते. जगातील हा एकमेव लोकशाही देश असेल; जेथे गत तीन दशकांत निवडणुकीद्वारे सत्तेवर आलेल्या आठ राष्ट्राध्यक्षांपकी केवळ दोघेच आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करू शकले. दोघांना महाभियोग चालवून सत्ताच्युत करण्यात आले. या साखळीतील दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष- म्हणजे ऑगस्ट २०१६ अखेरीस पायउतार झालेल्या डिल्मा रुसफ होत. त्याआधी एका राष्ट्राध्यक्षाला लष्करी कटाद्वारे हटविण्यात आले. एकाने आत्महत्या केली. एकाचा सत्ता हाती घेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आणखी एकाने कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. डिल्मा या ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या. त्यांना जावे लागण्यामागे होते कुटिल कारस्थानच!

होय. ब्राझील सध्या राजकीय अराजकाच्या उंबरठय़ावर आहे. शतकातील सर्वात मोठय़ा आíथक मंदीचा तो सामना करीत आहे. आणखीन भयंकर हे, की मिश्रवर्णीय वैविध्य असूनही एकजीवता जपत आलेल्या ब्राझीलमध्ये वंशभेदाने डोके वर काढले आहे. फुटबॉल विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद आणि पाठोपाठ ऑलिम्पिक या जागतिक क्रीडाकुंभाचेही आयोजन ब्राझीलने केले. यानिमित्ताने ब्राझीलमध्ये जगभरातून आलेल्या पाहुण्यांना स्थानिकांचे प्रेमळ आवभगत आणि त्यासह ‘डिल्मा चले जाव’चा रोष आणि त्रागा अशी दोन्ही रूपे पाहायला मिळाली. आíथक संकटावस्था, सामाजिक आणीबाणी की राजकीय अरिष्ट..? यापकी नेमकी कोणती अवस्था इथे सर्वात गहन आणि चरमिबदूला पोहोचली आहे?

शिक्षक, पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि मुख्य म्हणजे खासदारही असलेल्या प्रा. जाँ वायलिस सॅन्टोस यांचा ब्राझीलसंबंधीचे ताजे विश्लेषण मांडतानाचा हा सवाल आहे. वायलिस यांची आणखी एक ओळख म्हणजे ते ब्राझीलच्या संसदेत पोहोचलेले दुसरे गे सदस्य आहेत.            सारे जग आज वित्तीय अरिष्टाने ग्रासलेले आहे. कमी-अधिक फरकाने सर्वच देश त्याची झळ सोसत आहेत. पण आíथक संकटातून तरण्यासाठी धनिकांच्या तालावर नाचणारी इथली राज्यसंस्था जाणूनबुजून राजकीय संकट ओढवून घेते आहे, हे विशेषच आहे. निवडून आलेल्या सरकारला अस्थिर केले जाते. पक्षपाती आणि एकच बाजू लावून धरणाऱ्या माहितीचा मारा प्रसार माध्यमांतून करून, प्राप्त परिस्थितीत अपरिहार्य ठरलेले पक्ष आणि युतीचे राजकारण कलुषित केले जाते आहे. शहाण्यासुरत्या म्हटल्या जाणाऱ्या मध्यमवर्गीयांची संभ्रमावस्था बळावत जाईल असा हा ऐवज आहे. परंतु मतदार म्हणून या वर्गाची निर्बुद्धताच यातून अधिक ठळकपणे अधोरेखित होत जाते. म्हणजेच आíथक संकटाचे विभाजन हे राजकीय पेचप्रसंगात आणि त्याचे पुढे आणखी भंजन होऊन त्याने सामाजिक विग्रहाचे रूप धारण करावे अशी ही एकंदर अवस्था असल्याचे प्रा. वायलिस सांगतात.

प्रा. वायलिस यांचे हे विश्लेषण ब्राझीलचा संदर्भ वेगळा काढून लक्षात घेतले तर आज जगातील जवळपास प्रत्येक लोकशाहीवादी देशाला थोडय़ाफार फरकाने लागू पडेल असे चपखल आहे. विशेषत: मोजक्या धनाढय़ांकडून नाचविले जाणारे बाहुल्यांचे सरकार ही अशा अवनतीला पोहोचलेल्या लोकशाहीची अपरिहार्य परिणती आहे. धनिकांच्या राजकीय आकांक्षा बळावत जाऊन त्यांनीच राज्यकत्रे बनण्यासाठी सध्या सर्वत्र चंग बांधलेला दिसतो. यातून सामोरी येणारी भेसूरता कोणते टोक गाठते, याचा प्रत्यय म्हणजे एकसारखीच भीषणता असणाऱ्या वर उल्लेख केलेल्या तिहेरी संकटांचा एकत्रित घाला होय.

जैर मेसियासस बोल्सोनारो. वय वष्रे ६१. लष्करात हवाई छत्री सनिक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. जगभरात सत्ताकांक्षी धनिकशहांचे जे वारे वाहत आहे, त्यातील हे ब्राझीलचे प्रतिरूप. २०१८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अनेक राजकीय पक्षांना चोची मारून झाल्यावर सध्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षात या महाशयांनी बस्तान बसवले आहे. शिवाय पाच धट्टे वारसदार पुत्र. त्यांची राजकीय कारकीर्द वेगवेगळ्या पक्षांत सुरूच आहे. आपल्याकडील टिपिकल पश्चिम महाराष्ट्रातील मराठा राजकारणासारखे आहे हे.

रिओ द जानेरिओ या ब्राझीलच्या सर्वात मोठय़ा लोकवस्तीच्या शहरात सर्वाधिक मते घेऊन चारदा निवडून आलेले बोल्सोनारो हे सध्या खासदार आहेत. ‘लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेला सर्वाधिक वर्ण-िलगविद्वेषी लोकप्रतिनिधी आणि किळसवाणा राजकारणी’ अशी अमेरिकेचे पुलित्झर पुरस्कारप्राप्त पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी त्यांची संभावना केली आहे. अर्थात त्यांच्या बाबतीत स्थानिक माध्यमांची भूमिका एक, तर सीमाबा पत्रकारांची दृष्टी एकजात वेगळी. ब्राझीलमध्ये निष्पक्ष पत्रकारितेला गळफास लावला गेला आणि त्यानंतरच बोल्सानारोसारखी बांडगुळे पुढे आली, असेही ग्रीनवाल्ड यांचे निरीक्षण आहे. ब्राझीलमध्ये राज्यसंस्थेशी घनिष्ठता असणाऱ्या तीन-चार अब्जाधीश घराण्यांच्या हाती संपूर्ण माध्यम क्षेत्राच्या नाडय़ा आहेत. ब्राझीलमधील राजकारणाचा अक्ष बहुतांश मध्यिबदूकडून डावीकडे झुकलेला काही काळापर्यंत होता. सगळ्याच राजकीय पक्षांचा कार्यक्रम आणि भूमिकाही उणे-अधिक तशाच होत्या. अशातच बोल्सोनारो यांनी कट्टर राष्ट्राभिमान, सनातन संस्कृतीचे िडडिम बडवत कडवा कम्युनिस्टविरोध हाच आपल्या राजकारणाचा आधार बनवून वेगळी वाट चोखाळली. निवडणुकांमध्ये यश आणि लोकप्रियतेचे मापही त्यांनी मिळवले.

राजकीय पक्ष का निघतात, का वाढतात, बोल्सोनारोसारखे नेते कसे यशस्वी होतात, यावर ब्राझीलमध्ये आणि बाहेरही बऱ्यापकी लिखाण झाले आहे. त्या- त्या देशाच्या सांस्कृतिक पर्यावरणात कशा प्रकारचे नेतृत्व, कोणत्या प्रकारचे राजकीय तत्त्वज्ञान, कोणत्या प्रकारच्या भूमिका यशस्वी होऊ शकतात, याचे राज्यशास्त्रीयदृष्टय़ा नियम ढोबळपणे मांडता येतील. डिल्मा रूसफ यांची २०१४ मध्ये निवडून येण्याची दुसरी खेप होती. जवळपास साडेपाच कोटी (पहिल्या खेपेच्या तुलनेत खूपच जास्त) मते मिळवून त्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पण त्यांच्या वर्कर्स पार्टीला बहुमतासाठी अन्य पक्षांच्या कुबडय़ा घेणे भाग ठरले. ही राजकीय जुळवाजुळव करून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड होणे हाच अनेकांसाठी आश्चर्याचा एक धक्का होता. कारण हा जरी लोकशाहीवादी देश असला, तरीही निवडणुकांचा कौल हा मतपेटीपेक्षा देशाचा जीडीपी- अर्थात आíथक संपन्नता (किंबहुना, त्या संपन्नतेचे मोजके लाभार्थीच!) ठरवीत असते. ब्राझीलमधील डिल्मा यांच्यावरील महाभियोग हा तेथील अल्पसंख्य गोरे, हितसंबंध दुखावलेले धनिक व देश-विदेशांतील भांडवलशहा यांनी शिजवलेल्या कट-कारस्थानाची परिणती आहे, असे लीड्स विद्यापीठातील लॅटिन अमेरिकी इतिहासाचे प्राध्यापक मॅन्युएल बार्सयिा यांचे थेट म्हणणे आहे. व्हेनेझुएला (२००२), हैती (२००४) आणि होंडुरास (२००९) या अन्य दक्षिण अमेरिकी देशांत बा शक्तींनी घडवून आणलेल्या बंडाळीची ही ताजी पुनरावृत्ती असल्याचे ते सांगतात. महाभियोगाची प्रक्रिया जरी सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी त्याची नेपथ्यरचना ही २०१४ मध्ये डिल्मा यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हापासूनच झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अगदी ‘डिल्मा चले जाव’ म्हणून रस्त्यावरच्या आंदोलकांची छायाचित्रे पाहा.. त्यांनी हाती धरलेले फलक पाहा. लष्करी हस्तक्षेपाची खुली आळवणी आणि मदतीसाठी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पला अगदी आर्जवही केले गेले, असे गार्सयिा सांगतात.

डिल्मा यांचा गुन्हा काय, तर त्यांनी सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी हवा असणारा निधी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून घेऊन परस्पर वळता केला. २००८ च्या जागतिक वित्तीय अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर उपासमार झालेल्या या अपुऱ्या योजनांना भासणारी निधीची चणचण तातडीने दूर करण्यासाठी त्यांनी ही तांत्रिक चूक केली. आवश्यक वैधानिक शर्तीचे पालन न करण्याची चूक. अर्थात या निधीतील एकही रियाल (ब्राझिली रुपया) त्यांच्या खिशात गेला नाही. आणि दुसरा अर्थसंकल्प मांडला जाण्यापूर्वी तरतूद केलेला निधी बँकांना परतही केला गेला. आपल्याकडे दुष्काळग्रस्तांसाठीचा मदतनिधी हा मुख्यमंत्र्याने विधीमंडळाला सूचित न करता ग्रामसुधार आणि जलसिंचनासाठी वळता करावा, इतकी ही साधी चूक होती. त्याउलट, डिल्मावर आरोप करणारे आणि तिला पदच्युत करणारे सारे एकजात भ्रष्टाचारी, कारस्थानी, लुटारू, नाना आíथक गरव्यवहार आणि लबाडीचे दोषसिद्ध गुन्हे केलेले आहेत. अगदी डिल्माच्या जागी अध्यक्षपदी आलेले मिशेल टेमेर यांच्यापासून ते त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वानाच यापकी एखादे विशेषण लागू पडेल.

ब्राझीलमधील राजकारणाच्या अध:पतनाने इतका खालचा थर गाठला असताना बोल्सोनारोसारखे नेते निपजणे नवलाचे नाही. रेटून खोटं बोललं की ते अनेकांना खरं भासतं. लष्करातून आलेले असल्याने बोल्सोनारो यांचे सगळेच बोलणे रेटून असते. सवंग प्रसिद्धी हे अशा मंडळींचे मोठे भांडवल असते. आपण सोडून इतरांबद्दल यथेच्छ तुच्छताभाव हा त्यांचा राजकीय स्थायीभाव असतो. जुन्या जुलमी लष्करी राजवटीचे उघड गोडवे गाणाऱ्या या लोकप्रतिनिधीच्या मते, ब्राझीलच्या विद्यमान आíथक हलाखीला सध्याची लोकशाही व्यवस्थाच जबाबदार आहे. तत्कालीन अत्याचारी लष्करशहाला स्मरून त्यांनी संसदेत डिल्माविरोधात मत दिले असल्याचे बिनदिक्कतपणे सांगितले. (ब्राझीलमध्ये १९६४ ते १९८५ पर्यंत लष्करी सत्ता होती.) बोल्सोनारोंची प्रारंभिक मतपेटीही या गत जुन्ता मिलिटरी राजवटीतील सनिकांची वसतिस्थानेच होती. कधीकाळी अधिकार गाजवलेल्या या मंडळींना पुन्हा त्या गतवैभवाची स्वप्ने विकूनच त्यांची राजकीय कारकीर्द आकाराला आली. त्यांचा हा सरंजामी थाट आणि सम्राट असल्यासारखे त्यांचे फतवे काढणे जुन्या लष्करशाहीच्या स्मरणरंजनात रममाण असलेल्या मंडळींना भावतेही. विद्यमान लष्करी अधिकारी आणि पोलिसांचेही त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ आहेच.

बोल्सोनारो यांच्या वादग्रस्त सार्वजनिक शेरेबाजी आणि बेगुमान मुलाखतींची एक लांबलचक यादीच देता येईल. त्या तुलनेत अमेरिकेतील त्यांचे भाऊबंद डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘मेक्सिकनांना बाहेर ठेवण्यासाठी िभत उभारेन’सारखी विधाने खूपच फिकी ठरावीत. वारंवार कृष्णवर्णी, समिलगी लोकांबद्दल आणि महिलांबद्दल द्वेषमूलक उल्लेखांतून बोल्सोनारो यांनी जागतिक स्तरावर मथळे मिळवले आहेत. याबद्दल होणाऱ्या टीकेबद्दल खंत तर सोडाच; उलट त्यांचा प्रतिसवाल असा की, ‘अरे, दरिद्री काळ्या लोकांनो, अरे गरीब माणसांनो, दीनवाण्या देशी मंडळींनो, अरे दुबळ्या महिलांनो, खूपच गरीब आहात आपण सारे.. माफ करा, पण मी साऱ्यांनाच खूश करण्याचा प्रयत्न का करावा?’

बोल्सोनारो यांना मीडियाने आज डोक्यावर घेतले आहे. या गाजावाजाची सुरुवात दीडेक वर्षांपूर्वी त्यांनी महिला राजकारणी व डाव्या पक्षाच्या खासदार मारिया डू रोझारियो यांच्यासंबंधी केलेल्या अत्यंत घृणास्पद विधानापासून झाली. एका मुद्दय़ावरील संसदेतील चच्रेचे टीव्हीवर प्रक्षेपण सुरू होते. रोझारियो यांचे गतकाळातील लष्करी राजवटीत पायदळी तुडवले गेलेले मानवाधिकार, खून, बलात्कारांवर प्रहार करणारे भाषण सुरू होते. बोल्सोनारो यांनी त्यांना मधेच थांबवत ‘मी तुझ्यावर बलात्कार करणार नाही, कारण तुला त्या लायकीचीदेखील मी समजत नाही,’ असे विधान केले. यावर खूप गदारोळ झाला. ‘मी फौजदारी गुन्हा दाखल करेन,’ म्हणत रोझारियो सभागृहातून बाहेर पडल्या. तर बोल्सोनारो निर्वकिारपणे ‘अरे, पळपुटय़ा!’ असे त्यांना हिणवत राहिले. कळस म्हणजे त्यांनी या घटनेचे वर्णन करणारे अभिमानाने ट्वीट केले. ‘रोझारियोला तिची पायरी दाखवून दिली,’ असा शेराही त्यात होता.

या प्रत्येक राजकीय कृतीबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकली असती. परंतु कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा दबदबा आणखी प्रस्थापित होईल, यादृष्टीनेच व्यवस्थेची पावले पडत गेली. माध्यमे डोळ्यावर कातडे ओढूनच होती; समाजानेही या घटना सामान्य म्हणून स्वीकारल्या. खरे तर ब्राझीलची राज्यघटना याबाबत खूपच उदार आहे. लोकप्रतिनिधीने सभागृहात कितीही गरळ ओकावी, त्याच्या शिव्याशापांना कायद्याच्या कारवाईपासून पुरेपूर संरक्षण आहे. सार्वजनिक जीवनात पुरुषांची बरोबरी करत असलेल्या सर्वच स्त्रिया व्यभिचारी, छिनाल, वेश्याच असतात, अशी बोल्सोनारो यांची ठाम धारणा आहे. तसे दर्शविणारी त्यांनी सभागृहाबाहेरही अनेक वक्तव्ये केली आहेत. समिलगी चळवळीच्या एका लघुपटासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या अमेरिकी अभिनेत्री इलीन पेज तसेच आफ्रो-ब्राझीलियन गायिका प्रीटा गिल यांच्या बाबतीतही त्यांनी अशीच स्वैर विधाने केल्याच्या घटना आहेत. प्रिटा यांनी तर त्यांना न्यायालयाची पायरीही चढण्यास भाग पाडले. तर त्यावर ‘मला त्यांचा प्रश्नच समजला नाही. त्यांनी काळ्या लोकांबद्दल विचारल्याचे मला आता ध्यानात आले. मला वाटले, ते समिलगींबद्दल विचारत असावेत,’ अशा शब्दांत त्यांना माफीवजा सारवासारव करावी लागली. पुन्हा न्यायालयाबाहेर ‘मी जरी जातीयवादी, वर्णद्वेष्टा असलो तरी त्याची टीव्हीवर जाहीर वाच्यता करण्याइतका मूर्ख निश्चितच नाही,’ अशी मखलाशीही त्यांनी माध्यमांपुढे केली.

ब्राझीलमध्ये समिलगी विवाहांना मान्यता देणारा कायदा २०१३ सालात करण्यात आला. हे पाहता हा देश ऑस्ट्रेलिया आणि पुढारलेल्या युरोपीय देशांपेक्षा प्रगत ठरतो. कायद्याने संमती मिळाली, पण त्याला समाजमान्यता मिळणार नाही यासाठी बोल्सोनारोसारख्या सनातनी नेत्यांचा सभागृहात आणि बाहेरही निरंतर प्रयत्न राहिला. एलजीबीटी समुदायाविरोधात चिथावणीखोर, आगखाऊ भाषणांचा सपाटाच त्यांनी सुरू केला. रिओमध्ये दर दोन दिवसांनी एका समिलगी व्यक्तीचा मुडदा २०१३ सालात पडू लागला. या समुदायाविरोधात जागतिक स्तरावर होणाऱ्या अत्याचारांच्या निम्म्या घटना एकटय़ा ब्राझीलमध्ये घडत असल्याचे एका सर्वेक्षणाने निष्कर्ष दिला. बोल्सोनारो यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ‘माझा मुलगा समिलगी निपजण्यापेक्षा कार अपघातात मृत्युमुखी पडल्याचे पाहणे मी पसंत करेन,’ अशा शब्दांत आपला द्वेषभाव व्यक्त केला. या खून, अत्याचारांविरोधात, त्याला प्रतिबंध म्हणून संसदेत सरकार पक्षातर्फे विधेयक आणले गेले. तर या महाशयांनी विरोधात भाषण करताना ९० टक्के हत्या या जेथे अमली पदार्थाचे सेवन होते अथवा वेश्यावस्तीतील असल्याचे सांगितले. खरे तर त्यांच्या जोडीदाराकडूनच झालेल्या या हत्या आहेत, असेही रेटून सांगितले. ब्राझीलमध्ये समिलगींच्या हत्यांची समस्याच नसल्याचे पटवून देण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला.

संस्कृतीरक्षकाचा हा मुखवटा बोल्सोनारो यांना फळलाही. त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर नि:संशय वाढत चालली आहे. तीस लाखांच्या पल्याड मजल गेलेल्या त्यांच्या फेसबुक पेजवर लाइक्स आणि कॉमेन्ट्स हेच पुरेपूर दर्शवितात. ब्राझीलचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष लुईझ इनाशियो लुला डा सिल्व्हा यांच्यापेक्षा या लाइक्स कांकणभर नव्हे, तर सात लाखांनी अधिक असल्याचे बोल्सोनारो स्वत:च अभिमानाने सांगतात. जाहीर कार्यक्रमांत त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडत असते. गतवर्षीच्या डिसेंबरपासून चालू वर्षांतील जूनपर्यंत त्यांच्या पाठीराख्यांची संख्या दुपटीने वाढल्याचे एका विश्वासार्ह सर्वेक्षणाचा दावा आहे. बोल्सोनारो यांचा हा उदय म्हणजे ब्राझिली समाजाच्या टोकाच्या ध्रुवीकरणाचा संकेत आहे. विभाजनरेषा तीव्र स्वरूपात पुढे येत आहेत. एकीकडे गोऱ्या अभिजनांची मस्ती, तर दुसरीकडे कंगाल, बेरोजगारीचे जिणे. वैफल्य आणि नराश्याशी मत्र जुळलेले हे तरुण मग एकतर स्वत:चे जीवन संपवतात किंवा इतरांचे जिणे हराम करू लागले आहेत.

दोन दशकांची हुकूमशाही राजवट आणि त्यानंतर टोकाची मुक्त बाजारव्यवस्था यांतून गेलेल्या ब्राझीलमध्ये २००२ साली लुला डा सिल्व्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी-कामकऱ्यांचे पुढारपण करणाऱ्या वर्कर्स पार्टीकडे सत्ता आली. चारदा पराभव पदरी आल्यानंतर कठोर संघर्ष व श्रमिकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनाने मिळविलेली ही सत्ता होती. आíथक धोरणांत बाजारव्यवस्थेशी जुळते घेत गरीबांच्या कल्याणाच्या अधिकाधिक योजना राबविण्याचे काम या सरकारने सुरू केले. विशेषत: शेजारच्या अमेरिका आणि विकसित राष्ट्रांशी वाकडे न घेता जागतिक व्यवस्थेत एकध्रुवीयता राहणार नाही याचीही लुला यांनी काळजी घेतली. ‘ब्रिक्स’ (ब्राझील, चीन, भारत, रशिया आणि दक्षिण आफ्रिका) असा उभरत्या राष्ट्रांचा स्वतंत्र गट त्यांच्याच काळात उदयाला आला. विदेशातून मोठय़ा प्रमाणात भांडवली गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला. अल्पावधीत दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक औद्योगिकीकरण असलेले राष्ट्र म्हणून शेतीप्रधान ब्राझीलची ओळख निर्माण झाली. त्यासाठी पक्षातील अतिंडाव्यांची टीका, भांडवलशाहीपुढे लोटांगण यांसारखे लांच्छन लुला यांना सोसावे लागले.

आíथक भरभराटीचा लाभ हा दारिद्रय़निर्मूलन आणि संपत्तीच्या फेरवाटपासाठी या सरकारने पुरेपूर करून घेतला. गरिबी हटाव कार्यक्रम, शिक्षण, आरोग्य व गृहनिर्माण क्षेत्रातील योजनांचा लाभ ब्राझीलमधील नागरिकांना झाला. लुला आणि त्यांच्याच वारसदार असलेल्या डिल्मा रूसफ यांच्या १३ वर्षांच्या कारकीर्दीत दारिद्रय़रेषेखालील ७५ टक्के, तर गरिबीत असलेल्या ६५ टक्के लोकांचा जीवनस्तर सुधारल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते. ‘बोल्सा फॅमिलिया’सारख्या यशस्वी सामाजिक योजनांनी साधलेली ही किमया आहे. थेट निधी हस्तांतरणाच्या या योजनेचे साडेचार कोटींच्या घरात लाभार्थी आहेत. गत खानेसुमारीनुसार, २००३ ते २०११ या काळात ३.९६ कोटी ब्राझिली जनता नव-मध्यमवर्गात सामील होण्याइतकी संपन्नता मिळवू शकली आहे.

लुला यांच्या राजवटीला नशिबाची साथही होतीच. २००६ साली सरकारी मालकीची तेल कंपनी पेट्रोब्रासने रिओच्या सागरकिनाऱ्याला जगातील सर्वात मोठय़ा तेलसाठय़ाच्या संशोधनाची घोषणा केली. हा या कंपनीसाठी आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेसाठी भाग्योदयाचा क्षण होता. १९९० पर्यंत पेट्रोब्रास ही एक आजारी कंपनी होती. परंतु पुढे मात्र तिने अकस्मात कलाटणी घेतली. २००२ मध्ये दोन अब्ज डॉलरच्या तिच्या नफ्याने २००८ सालाअखेरीस १९ अब्ज डॉलरचे शिखर गाठले. लुला यांची लोकाभिमुख राजवट आणि सापडलेल्या ‘काळ्या सोन्या’च्या या घबाडातून ब्राझिली जनतेचा आशावाद गगनाला भिडलेला होता. फुटबॉल विश्वचषक आणि ऑलिम्पिकचे यजमानपद खांद्यावर घ्यावे- इथवर या आशावादाने मजल मारली.

उगवत्या अर्थव्यवस्थेचे चीननंतर ब्राझील हे एक उत्तम उदाहरण होते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत ब्राझीलची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या पाचपट वेगाने वाढत होती. २०११ साली तर ब्राझीलची अर्थव्यवस्था ही इंग्लंडपेक्षा मोठी होती. परंतु क्षमतेपेक्षा जास्त उसनवारी करत साधलेल्या या वाढीला प्रचंड मोठय़ा वित्तीय तुटीचा पदरही आहे. यामुळेच जगातील पाच बडय़ा उगवत्या आणि तरीही संवेदनशील अर्थव्यवस्थांपकी एक असे ब्राझीलला गणले जाते. जरा तोल ढळला तर कडेलोटाची स्थिती येईल अशा अर्थव्यवस्थेच्या या ठिसूळतेचे अस्तरही मग दिसू लागले.

काळाने कूस बदलली. सापडलेल्या तेलसाठय़ाचे चलनीकरण म्हणजे तो खोल सागराच्या गर्भातून बाहेर उपसण्यासाठी प्रचंड मोठी भांडवली गुंतवणूक सरकारने कर्ज काढून केली. तर दुसरीकडे २०१४ च्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीने लोळण घेतली. खेरीज मजबूत बनलेल्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ब्राझीलच्या चलनाचे मूल्य निम्म्याने घसरले. सरकारी कर्जामुळे मोठी वित्तीय तूट फुगलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा आघात होता. त्यातच स्वत: अर्थतज्ज्ञ असलेल्या रुसफ यांनी महागाई दरावर नियंत्रण म्हणून वस्तूंच्या किमतींवर सक्तीने नियंत्रणाचे धोरण स्वीकारले. जे अर्थात भांडवलदारवर्ग आणि उद्योगांच्या पचनी पडणारे नव्हते. त्याउलट, कल्याणकारी योजनांवर टाच आणून वित्तीय काटकसरीचा त्यांचा आग्रह होता.

प्रारंभी वरदान ठरलेला तेलसाठाच पुढे शाप बनून अर्थव्यवस्थेवर उलटला. पेट्रोब्रास या तेल कंपनीवरील एकूण कर्जभाराने १०० अब्ज डॉलरचा आकडा गाठला. नव्या गुंतवणुकीला बांध आणि सुरू असलेल्या रिफायनरीचे काम थांबविणे भाग पडले. पेट्रोब्रास कंपनी समृद्धीच्या शिखरावर असताना लाचखोरांनी तिचे लचके तोडल्याचे प्रकरण उजेडात आले. राष्ट्राध्यक्ष डिल्मा यांचा अपवाद केला तर सर्वपक्षीय २०० लोकप्रतिनिधी या कंपनीच्या साधनसूचीत असल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचारविरोधी जनउद्रेकाला सरकारविरोधात आणि आíथक धोरणांच्या विरोधाकडे वळविण्यात भांडवलदार आणि त्यांचे हितसंबंध जोपासणारी माध्यमे बऱ्यापकी यशस्वी ठरली. आधीच कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी घायाळ करणाऱ्या राजकीय पेचप्रसंगाची भर घातली गेली. एकटय़ा रिओ शहरातील बेरोजगारीच्या आकडय़ाने सरलेल्या फेब्रुवारीत दुपटीने वाढून ८.२ टक्क्यांचे प्रमाण गाठले. त्यात झिका आजाराच्या साथीनेही डोके वर काढले आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक्स या स्पर्धा सरल्यानंतर हे आíथक संकट अधिक गहिऱ्या रूपात पुढे येईल. बेरोजगारांच्या टोळक्यांचे रस्त्यांवरील थमान, िहसाचाराच्या घटना एव्हाना सुरूही झाल्या आहेत. समाजातील वांशिक ध्रुवीकरणाची लागण ही सर्वात आधी पोलिसांमध्येच होत असते. कायदा-सुव्यवस्थेची ब्राझीलमध्ये दुहेरी रचना आहे. लष्करी पोलीस- जे बंदोबस्त पाहतात; आणि दुसरे नागरी पोलीस- जे तपास करतात. लष्करी पोलिसांच्या कारवायांची एकटय़ा रिओ शहराबाबत उपलब्ध आकडेवारीच अंगावर काटा आणणारी आहे. २०१५ सालात पोलिसी कारवायांत जवळपास ६०० मृत्यू आणि २०१६ सालच्या पहिल्या तीन महिन्यांत आणखी १५० हत्या पोलिसांकडून झाल्या आहेत. मारले गेलेले तरुण कृष्णवर्णी गरीबच आहेत, हे वेगळे नमूद करण्याची गरज नाही.

ब्राझीलची अर्थव्यवस्था गांजलेली आहे, अनाचार वाढला आहे, अराजकाची परिस्थिती आहे. या सर्वाला कारणीभूत खलनायक कोण, हेही ठरवून टाकले गेले आहे. केवळ वर्कर्स पार्टी, डिल्मा रूसफ आणि कम्युनिस्टच नव्हे, तर त्या सरकारचा लोककल्याणाचा सामाजिक कार्यक्रम, त्यातून उभारी मिळवणारे मिश्रवर्णीय, काळे, स्त्रिया अशा सर्वानाच खलनायक ठरवून त्यांच्यावर खापर फोडता यावे असे ध्रुवीकरण साधण्यात बोल्सोनारोसारखे लफंगे राजकारणी यशस्वी ठरले आहेत. भ्रष्टाचारविरोधाचा बुरखा ओढून आपल्या विशेषाधिकार व हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या आणि लोकशाहीचा अवकाश अधिकाधिक संकुचित करत नेणाऱ्या लफंग्या घोडय़ांना ऊत आला आहे. सर्वसमावेशक लोकशाही अशा पिसाळलेल्या घोडय़ांना मानवत नाही. सामाजिक लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला विरोध केला तरच त्यांना चौखूर उधळायला वाव मिळतो. ‘समाजवादी आदर्शवादाने आमच्या (गोऱ्यांच्या) शिक्षण, आरोग्य, रोजगार, संपत्तीच्या संधी आणि आमचा आत्मसन्मान हिरावून घेतला..’ या त्यांच्या प्रचाराला दुभंगलेल्या समाजमनात मूळ धरता आले आहे. ‘ब्रिंग मिलिटरी बॅक नाऊ’ अशा उघड लोकशाहीविरोधी पवित्र्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांतील पूर्वाश्रमीच्या डाव्या, क्रांतिकारी पक्षांच्या सत्ता उलथवून लावल्या गेल्या असताना ब्राझीलने आíथक स्वयंपूर्णतेने दमदारपणे वाटचाल सुरू ठेवावी, ही शेजारच्या बडय़ा भांडवलदारांच्या डोळ्यांत सलणारी बाब जरूरच होती. त्यांचे हितसंबंध पुढे रेटण्यासाठी बोल्सोनारोसारख्या बेभान घोडय़ांची आवश्यकता होतीच. अमेरिकेच्या अंकित व्यवस्था नसेल तर त्या समाजावर व्यवस्थाशून्यतेचे संकट येते, या अर्जेटिना, बोलिव्हिया, इक्वेडोर आणि व्हेनेझुएलामध्ये गिरवल्या गेलेल्या धडय़ाची ही ताजी पुनरावृत्ती आहे. विकिलिक्स केबल्सच्या रहस्यस्फोटाने ही कृष्णकृत्ये पुढे आणली आहेत. अमेरिकी साम्राज्यवादाच्या प्रसारात सीआयए, आयएमफ , वर्ल्ड बँकेसारख्या व त्यांच्या उपकंपन्या असलेल्या पिट्ट वित्तसंस्था या परंपरागत शिलेदारांबरोबरीनेच यूसेड, नॅशनल एंडोमेंट फॉर डेमॉक्रसी (नेड)सारख्या एनजीओ तसेच ‘सनातन धर्मा’चा मुखवटा धारण केलेल्या बोल्सोनारोच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षासारख्या छुप्या हस्तकांचेही यात योगदान आहे.

ब्राझील- किंबहुना, संपूर्ण लॅटिन अमेरिकेत लोकशाहीपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानाची तडही बहुतेक एकाच वेळी लागेल. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल येईल, त्याचवेळी ब्राझीलमधील सुमारे ५,००० नगरपालिकांच्या निवडणुकांचा कौलही स्पष्ट होईल. माणसाळू न शकलेल्या घोडय़ांची अ‍ॅमेझॉनच्या जंगलात रवानगी करण्याइतके लोकमानस दोन्ही ठिकाणी शाबूत आहे काय, हे दिसेलच!
सचिन रोहेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:11 am

Web Title: bolsonaro of brazil
Next Stories
1 इटली : मात्तिओ सॅल्विनी..  दे धडक!
2 फ्रान्स : अस्वस्थतेचे अपत्य- मरी ल पेन
3 ऑस्ट्रिया : स्थलांतरितांच्या प्रश्नातून उगवलेलं नेतृत्व
Just Now!
X