34-ls-diwali-2016-travelपूर्वेकडचे देश, तिथले लोक, त्यांच्या चालीरीती आणि खाद्यसंस्कृतींबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. लहानपणी पूर्वेकडच्या कितीतरी वैचित्र्यपूर्ण आणि अद्भुत कथा ऐकल्या/ वाचल्या होत्या. मेरू पर्वताजवळच्या हिमवंत अरण्यातल्या र्अध स्त्रीचं व र्अध हंसिणीचं शरीर असलेल्या किन्नरींच्या कथा किंवा लबाड वाघापासून सुटका करून घेण्यासाठी उंच आकाशात जाऊन सूर्य आणि चंद्र बनलेल्या बहीण-भावाची गोष्ट.. अशा गोष्टी ऐकून पूर्वेबद्दल एक भयमिश्रित कुतूहल वाटत असे. पूर्वेकडे पिवळ्या रंगाचे लोक राहतात आणि ते सतत जादूटोणा करत असतात अशीही समजूत होती. शाळेत असताना भूगोलातले ईशान्य मोसमी वारे, नऋत्य मोसमी वारे, निरनिराळी वृत्तं, अक्षांश-रेखांश या मंडळींशी माझी कायम झटापट चाले. आमच्या काळे गुरुजींची भूगोल शिकवण्याची खास धाटणी होती. एरव्ही स्वत:चा तालुका सोडून इतरत्र कुठेही न जाणारे हे गुरुजी भूगोल शिकवताना आम्हाला पूर्वेच्या जगाची सफर अवघ्या चार वाक्यांत घडवत. ते सांगत, ‘पोरांनो, भारताच्या पूर्वेकडे काय आहे?  पूर्वेकडे मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, फिलिपिन्स असे देश आहेत. तिथले लोक कसे असतात? तर ते चिनी तोंडवळ्याचे, चपटय़ा नाकांचे असतात! हे सगळे देश म्हणजे तिकडच्या समुद्रातली बेटं आहेत! त्यांना काय म्हणतात? त्यांना ‘मसाल्याची बेटं’ असं म्हणतात. गोरे इंग्रज लोक आणि युरोपीय लोक या बेटांवरून मसाल्याच्या गोण्या जहाजांत भरून मायदेशी नेत असत. काय करत असत? मसाल्याच्या गोण्या जहाजांत भरून विलायतेला नेत!’ असा भूगोल ते शिकवत! त्या काळात मसाल्याच्या गोण्या म्हणजे नेमकं काय, हेही आम्हाला नीट माहीत नव्हतं. घरी आई स्वयंपाकात वापरण्यासाठी वर्षांतून एकदा वेगवेगळे पदार्थ एकत्र कुटून एक काळा मसाला तयार करीत असे. तो एकच एक मसाला मला ठाऊक होता. त्यामुळे एकदा वर्गात काळे गुरुजींनी  ‘पूर्वेकडील बेटांवरून इंग्रज लोक काय नेत असत?’  हा प्रश्न विचारला तेव्हा मी ‘काळा मसाला’ असंच उत्तर दिलं होतं. तेव्हा माझ्या हातावर छडय़ा पडल्या होत्या. त्यामुळे लहानपणी भूगोल, पूर्व-पश्चिमेसारख्या दिशा आणि पूर्वेकडची मसाल्याची बेटं ही सारी माझी शत्रू बनलेली होती.

भारत देश आशिया खंडाशी नेमका कुठे जोडलेला आहे, उत्तर व दक्षिण आशिया यांमध्ये काय फरक आहे, भारताच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणते देश आहेत, हे नीट कळायला अनेक र्वष जावी लागली. भारताचा नकाशा बारकाईनं बघून बघून मला दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशिया म्हणजे नेमकं काय, याचं कामचलाऊ ज्ञान झालं. दक्षिण आशियात भारतासोबत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव आणि श्रीलंका हे देश आहेत. दक्षिण-पूर्व आशियाचे मात्र दोन हिस्से आहेत. त्याचा मुख्य हिस्सा हा दक्षिण आशिया खंडाशी सलग जोडलेला आहे. या जोडलेल्या सलग भूभागाला ‘इंडो-चायना’ असं म्हणतात व त्यात म्यानमार (ब्रह्मदेश), थायलंड (सयाम), लाओस, कम्बोडिया (काम्पुचिया), उत्तर व दक्षिण व्हिएतनाम आणि पश्चिम मलेशिया (मलाया) या देशांचा समावेश होतो. म्हणजे एखाद्यानं जर ठरवलं तर भारतातून आसामच्या पूर्वेला सलग जमिनीवरून प्रवास करीत म्यानमार व थायलंड ओलांडून मलेशियात थेट क्वालालम्पूपर्यंत पोहोचता येईल. हा प्रवास खुश्कीच्या मार्गानं करून अख्खा इंडो-चायना ओलांडता येतो. दक्षिण-पूर्व आशियाचा दुसरा भाग मात्र बहुतांशी समुद्री बेटांचा आहे. बंगालच्या उपसागरापासून उत्तर पॅसिफिक समुद्रापर्यंत अनुक्रमे अंदमानचा समुद्र, िहदी महासागर, दक्षिण चीनचा समुद्र यांमध्ये विखुरलेली हजारो बेटं त्यात समाविष्ट आहेत. या सर्व बेटांचे काही द्वीपसमूह तयार झाले आहेत. सिंगापूर, इंडोनेशिया, पूर्व मलेशिया, फिलिपिन्स, पूर्व तिमोर, ब्रुनेई, कोकोस बेटं आणि ख्रिसमस ही बेटं त्यांत सामावलेली आहेत. या दक्षिण-पूर्व आशिया उपखंडात ब्रिटिशकालीन जुनं सयाम हे आताचं थायलंड आहे. मलायाचा द्वीपकल्प आणि बोर्निओ मिळून आजचा मलेशिया झालेला आहे. तर जुन्या काळची जावा-सुमात्रा बेटं, बोर्निओचा थोडा भाग, न्यू गिनी आणि सुलावेसी बेटं ही सारी मिळून आजचा इंडोनेशिया बनलेला आहे.

खरं पाहता भौगोलिकदृष्टय़ा भारताच्या दक्षिण भागातील निमुळता द्वीपकल्प जरी दक्षिण आशियात असला तरी ईशान्येकडील अरुणाचल, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालॅण्ड आणि त्रिपुरा ही राज्यं मात्र दक्षिण-पूर्व आशियाचा भाग आहेत. खेरीज बांगलादेश व अंदमान-निकोबार बेटंदेखील दक्षिण-पूर्व आशियात आहेत. भारताच्या मणिपूर, मिझोरम, आणि नागालॅण्ड या सीमावर्ती राज्यांतले लोक आणि म्यानमार, थायलंड, मलेशिया या देशांचे लोक या दोहोंच्या संस्कृती, चालीरीती, परंपरा व खाद्यसंस्कृतीत विलक्षण साम्य आहे. त्यांचे आपापसातले व्यवहारही पूर्वापार होत आहेत. आम्ही मणिपूर व नागालॅण्डमध्ये गेलो होतो तेव्हा या दोन्ही राज्यांतील सीमावर्ती गावांचे दैनंदिन व्यवहार आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पलीकडच्या म्यानमारमधील गावांशी होताना आम्ही पाहिले आहेत. ना पासपोर्ट, ना व्हिसा. पण इकडचे लोक सर्रास तिकडे जातात आणि तिकडचे लोकही इकडे येतात. इकडच्या वस्तू तिकडे नेऊन विकल्या जातात आणि तिकडच्या इकडे आणल्या जातात. मणिपूरच्या मोरेह गावाचे म्यानमारमधील तामू गावाशी असेच परस्परव्यवहार होतात. तसंच मिझोरमच्या चामफाई गावातून म्यानमारच्या ‘ऱ्ही’ या गावाशी व्यवहार होतात. हे व्यवहार बव्हंशी अनधिकृत असले तरी त्यांची वार्षिक उलाढाल कित्येक कोटींची आहे.

इतिहासपूर्व काळातले दाखले असं सांगतात की, दक्षिण-पूर्व आशियात प्राचीन काळी इंडोनेशियातील फ्लोअर्स बेटावर अत्यंत बुटकी मनुष्यजात अस्तित्वात होती. ती कालांतरानं नामशेष झाली. सुमारे ४५ हजार वर्षांपासून माणसाच्या अनेक जमाती भरतखंडातून, तवानमधून व पॉलिनेशियातून दक्षिण-पूर्व आशियात दाखल झाल्या. त्यांत तवानकडच्या ऑस्ट्रोनेशियन लोकांची संख्या सर्वाधिक होती. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स वगरे देशांमध्ये प्रामुख्यानं ऑस्ट्रोनेशियन कुळाचेच लोक आहेत. साधारणत: ख्रिस्तपूर्व काळापासूनच भारतातील व्यापाऱ्यांनी आणि िहदू धर्मप्रसारकांनी दक्षिण-पूर्वेच्या या बेटांवर जायला सुरुवात केली. तोपर्यंत तिथे आदि-संस्कृती नांदत होती. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून तिथे िहदू धर्म रुजण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच भारतातून ब्रह्मदेशमाग्रे सयाम, काम्पुचिया आणि व्हिएतनाम या दक्षिण-पूर्वेच्या प्रदेशांपर्यंतचा व्यापारमार्ग प्रस्थापित झाला. त्या काळात  ‘यावा-द्वीप’ (जावा व सुमात्रा) या बेटावर िहदू राजांचं राज्य होतं. िहदू धर्म, संस्कृत धर्मग्रंथ, रामायण-महाभारतासारखी महाकाव्यं आणि पाली भाषा यांचा फार मोठा प्रभाव इथल्या बेटांवर हजारो र्वष टिकून होता. रामाचा सेवक सुग्रीव यानं सीतेच्या शोधार्थ यावा-द्वीपावर सन्य पाठवलं असा उल्लेख रामायणातही आहे. ख्रिस्तजन्मानंतरच्या सहाव्या शतकात हीनयान बौद्ध धर्माचा प्रसार या भागात सुरू झाला. साधारणत: तेराव्या शतकापर्यंत दक्षिण-पूर्व आशियात िहदू धर्म आणि बौद्ध धर्म या दोहोंची वाढ जोमानं झाली. त्या काळात सुमात्रा आणि इंडोनेशियात उत्तरेकडे ख्मेर साम्राज्य आणि दक्षिणेकडे श्रीविजयन् साम्राज्याचा अंमल होता. मलय बेटांवर लंग्कासुख साम्राज्य होतं. कम्बोडियात फुनान साम्राज्य होतं आणि व्हिएतनाममध्ये चंपा लोकांचं राज्य होतं. अशा रीतीनं संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियामध्ये हजारो वर्षांपासून िहदू व बौद्ध संस्कृती नांदत होत्या. त्यांच्या खाणाखुणा या बेटांवर आजही ठळकपणे आढळतात. हे सारं कळलं तेव्हा या बेटांविषयी मनात असणारी लहानपणीची अढी नकळत निघून गेली आणि तिची जागा या विलक्षण बेटांबद्दलच्या आकर्षणानं घेतली.

२००० साली जागतिक नदी परिषद थायलंडमधील रासि-सलाई या गावात भरली होती. या परिषदेच्या निमित्तानं मी पहिल्यांदा थायलंडमध्ये गेलो. त्या काळात दक्षिण-पूर्व आशियातील थायलंड, सिंगापूर आणि मलेशिया हे देश पर्यटनाच्या क्षेत्रांत शोकेसमध्ये ठेवल्यासारखे गाजत होते. जगभरच्या टुरिस्ट कंपन्यांनी हाँगकाँगसह या तीन देशांच्या सफरींची पॅकेजेस पर्यटकांना सवलतींसह विकायला सुरुवात केली होती. त्यामुळे आम्हीही एकदा पॅकेज घेऊन या चारही देशांची सफर करून आलो. पण दक्षिण-पूर्व आशियात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या चार देशांचं थोडं दुर्लक्षित असं एक सावत्र भावंड आहे. ते सर्वसाधारण पर्यटकांमध्ये फारसं प्रसिद्ध नाही. त्याचं नाव आहे-कम्बोडिया! ते बरेच दिवस आमच्याही यादीतून सुटलं होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी कम्बोडियात जुन्या िहदू आणि बौद्ध परंपरेतली अंकोरवाट व अंकोरथाम ही प्राचीन देवळं आढळून आली होती. युनेस्कोनं या प्राचीन देवळांना जागतिक वारसास्थळं म्हणून मान्यता दिली आहे. केव्हातरी एकदा ती पाहायचं मनात होतंच. म्हणून मुद्दाम कम्बोडियाला जायचं ठरवलं.

कम्बोडिया (काम्पुचिया) म्हटलं की कुणालाही १९७५ ते १९७९ दरम्यानचा भयानक काळ आठवतो. जेव्हा तिथे ख्मेर रूज या पक्षाच्या पोलपॉट या हुकूमशहानं सत्ता बळकावून या देशाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यानं कम्बोडियाला पूर्णपणे भातशेती-प्रधान देश बनविण्यासाठी इतर सगळे उद्योगधंदे बंद करवले. सगळ्या विषयांची सगळी पुस्तकं जाळून टाकली. सगळ्या धर्मावर बंदी आणली. आणि विरोध करणाऱ्या सर्वाना जिवे मारून टाकण्याचा सपाटा लावला. कित्येक कलावंत, लेखक, विचारवंत, शिक्षक, व्यापारी, कारखानदार यांच्या हत्या करवल्या गेल्या. या चार वर्षांच्या काळात क्रूरकर्मा पोलपॉटच्या आदेशानं इथे सुमारे वीस लाख लोक मारले गेले. अखेर १९७८ मध्ये शेजारच्या कम्युनिस्ट व्हिएतनामनं आपलं सन्य कम्बोडियात घुसवलं व पोलपॉटकडून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर सुमारे एक तप व्हिएतनामच्या साहाय्यानं कम्बोडियात कम्युनिस्ट सत्ता नांदत होती. १९९२ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीनं तिथे लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं. संसदेची स्थापना झाली. आणि कम्बोडियाच्या राजपदाची पुनस्र्थापना करून राजाला राष्ट्रप्रमुख नेमलं गेलं. तेव्हापासून हा देश आपला आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी धडपडतो आहे. आज कम्बोडियात ९० टक्के लोकसंख्या ख्मेर लोकांची आहे. पाच टक्के व्हिएतनामी आणि एक टक्का चिनी लोक या देशात राहतात. इथे ग्रामीण भागांत भातशेती हेच उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. काही प्रमाणात मका, सोयाबीन, निरनिराळे कंद, भुईमूग, तीळ ही पिकं घेतली जातात. भातशेतीखालोखाल रबराच्या झाडांची लागवड आणि रबर उत्पादन हेही मोठय़ा प्रमाणावर होतं. खेडोपाडी गायी, म्हशी आणि बलगाडय़ा भरपूर दिसतात. कम्बोडियात शहरी लोकसंख्या अवघी दहा टक्के आहे. व्यापार, व्यवसाय, बँका, कारखाने, हॉटेलं, शाळा वगरे सुविधा प्रामुख्यानं शहरांमध्येच आहेत. अपुरा रोजगार, अपुरी घरं आणि दारिद्रय़ या शहरी समस्या आहेत. कम्बोडिया हा मुळातच जगातल्या सर्वात दरिद्री देशांपकी एक आहे. त्याच्या दीड कोटी लोकसंख्येपकी सुमारे वीस लाख लोक आजही दारिद्रय़रेषेखाली जगत आहेत आणि ४० टक्के बालकं कुपोषित आहेत.

जगभरातले पुरातत्त्वज्ञ आणि पर्यटक आज कम्बोडियाला जातात ते ११ व्या शतकातल्या प्राचीन अंकोर शहराला भेट देण्यासाठी! अंकोरवाट आणि अंकोरथाम हे दोन विस्तीर्ण मंदिरसमूह इथे आहेत. कम्बोडियात नवव्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ख्मेर वंशाचं साम्राज्य होतं. इ. स. ८०२ मध्ये ख्मेर वंशाचा िहदू राजा दुसरा जयवर्मन् यानं स्वत:ला तिथला सम्राट म्हणून घोषित केलं आणि अंकोर शहरास राजधानीचा दर्जा दिला. त्यानंतर इ. स. ८८९ मध्ये राजपुत्र यशोवर्मन हा राजा झाला. त्यानं यशोधरपुरा नावाचं नवं शहर वसवलं. पाणीपुरवठा आणि शेती-सिंचन यांसाठी एक मोठा जलाशय निर्माण केला. ख्मेर वंशाचं साम्राज्य पाच शतकांपर्यंत टिकून होतं. या काळात अंकोर शहराचा राजधानी म्हणून विकास केला गेला. अनेक िहदू मंदिरं व आश्रम बांधले गेले आणि िहदू धर्माच्या प्रसारास चालना दिली गेली. याच काळात अंकोरवाट आणि अंकोरथाम या मंदिरसमूहांची उभारणी केली गेली. अंकोर शहर आणि त्यातील या मंदिरसमूहाचे अवशेष आजही कम्बोडियातल्या सिएम-रीप शहराजवळ उभे आहेत. सुमारे एक हजार चौरस कि. मी. क्षेत्रफळाच्या या मंदिरसमूहात असंख्य छोटी-मोठी देवळं असून त्यांतली काही नीटपणे उभी आहेत, तर काही भग्नावशेषांच्या रूपात आहेत.

कम्बोडियात प्रथम आम्ही सिएम-रीप शहरात दाखल झालो. अंकोर समूहातली मंदिरं या शहरानजीक आहेत. सिएम-रीप हे कम्बोडियाच्या वायव्य भागातलं शहर. जुन्या फ्रेन्च वसाहतीच्या काळातली वास्तुशिल्पं आणि चिनी बनावटीची घरं यांनी नटलेलं हे एक टुमदार शहर आहे. सिएम-रीप या नावाचा अर्थ ‘सयामचा पराभव’ असा होतो. त्याबाबतची एक कथा अशी आहे : इ. स. १५४९ मध्ये वायव्येकडील सयाम (थायलंड) देशाचा राजा महाचक्रपात यानं मोठं सन्य घेऊन काम्पुचियावर (कम्बोडिया) आक्रमण केलं. काम्पुचियाचा राजा आंगचॅन यानं त्याचा प्रतिकार करून तो हल्ला परतवून लावला. म्हणून या शहराला ‘सिएम-रीप’ हे नाव दिलं गेलं. अर्थात ही कथा खरी आहे की खोटी, याबद्दल बरेच प्रवाद आहेत. सिएम-रीप ही दक्षिण-पूर्व आशियातील प्राचीन ऐतिहासिक वास्तुंच्या अभ्यासकांची पंढरी आहे. शहरापासून काही कि. मी. अंतरावर असलेलं घनदाट जंगल, या जंगलात दूरवर विखुरलेल्या पुरातन मंदिरांच्या भव्य वास्तु, या वास्तूंभोवती गुंफलेल्या गूढरम्य कथा.. आणि तिथून शहरात परत आल्यावर नाना प्रकारच्या करमणुकींनी मध्यरात्रीपर्यंत गजबजलेले रस्ते या सगळ्यात पर्यटक गुंगून जातात.

या अनोख्या सिएम-रीप शहरात आम्ही उतरलो आणि डिझेलवर चालणाऱ्या एका ऑटोरिक्षात बसून हॉटेलकडे निघालो. श्रीलंकेप्रमाणे कम्बोडियातही ऑटोरिक्षांना ‘टुक-टुक’ म्हटलं जातं. पण कम्बोडियातली टुक-टुक थोडी वेगळी आहे. इथे एका दुचाकी मोपेड मोटरसायकलला पाठीमागे दोन चाकांची छोटी बग्गी जोडलेली असते. या बग्गीत एकमेकांकडे तोंड करून दोन सीट्स असतात. एका वेळी चार माणसं त्यांत आरामात बसू शकतात. सामान ठेवायलाही जागा असते. कम्बोडियाच्या रस्त्यांवर या टुक-टुक रिक्षा आणि दुचाकी मोपेड मोटारसायकली हीच वाहनं प्रामुख्यानं दिसतात.

सिएम-रीपच्या या दौऱ्यात अंकोरवाट, अंकोरथाम, बान्तिये-श्री आणि ता-प्रोहम् ही मंदिरं बघायची, त्यांची ऐतिहासिक पाश्र्वभूमी जाणून घ्यायची आणि संध्याकाळी गर्दीनं फुलून जाणाऱ्या इथल्या पब् स्ट्रीटवर जाऊन खाऊगिरी करायची असा आमचा बेत होता. तसंच शक्य झालं तर सिएम-रीपच्या प्रसिद्ध नाटय़गृहात जाऊन ‘अप्सरा नृत्य’ बघावं असंही मनात होतं. िहदू आणि बौद्ध पुराणकथांमध्ये अप्सरांचे अनेक उल्लेख आहेत. अप्सरा या गंधर्वलोकीच्या दिव्य शक्तीप्राप्त सौंदर्यवती. या अप्सरांचं माहात्म्य कम्बोडियातही जाणवतं. इथल्या लोककथांमध्ये, चित्रांमध्ये आणि जागोजागच्या प्राचीन शिल्पांमध्ये नृत्य करणाऱ्या अप्सरा चितारलेल्या दिसतात. सिएम-रीपच्या अंकोरवाट मंदिरांमध्ये आणि शहरातील नाटय़गृहांमध्ये पर्यटकांसाठी अप्सरा नृत्यांचे कार्यक्रम नियमितपणे होतात. तेही बघण्याजोगे असतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम आम्ही अंकोरथाम शहराला आणि तिथल्या मंदिरसंकुलाला भेट दिली. बाराव्या शतकाअखेरीस ख्मेर राजा सातवा जयवर्मन यानं प्रस्थापित केलेलं हे शहर. पूर्वी इथे यशोधरपुरा हे राजधानीचं नगर होतं. या नगरातील राजवाडय़ात बाफुआन नावाचं एक राज-मंदिर होतं. पुढे बाराव्या शतकात या यशोधरपुरा नगरीजवळच एका नव्या नगराची आणि मंदिरांची उभारणी झाली. नऊ चौरस कि. मी. क्षेत्रफळाच्या या नव्या नगराला सोळाव्या शतकात राजधानी म्हणून घोषित करून ‘अंकोर थाम’ हे नाव दिलं गेलं. या शहरात मधोमध जयवर्मन राजानं स्वत: उभारलेलं बायॉन मंदिर आहे आणि त्याच्या अवतीभवती आणखी ५१ मंदिरं उभारलेली आहेत. प्रत्येक मंदिर कठीण काळ्या कातळाचे चौकोनी चिरे रचून उभारलेलं आहे. मध्यभागीच्या बायॉन मंदिराचा कळस सुमारे ४३ मीटर उंच आहे. कळसाच्या चारही बाजूंवर अतिभव्य असे बोधिसत्व अवलोकितेश्वराचे चेहरे दगडी चिऱ्यांमध्ये कोरले आहेत. भोवतालच्या प्रत्येक मंदिराचा कळस सुमारे वीस ते पंचवीस मीटर उंच आहे. या प्रत्येक कळसावर दगडाच्या चिऱ्यांनी घडवलेला एखाद्या राजपुरुषाचा किंवा देवाचा भव्य चेहरा आहे. कळसांवरचे हे धीरगंभीर चेहरे जणू या मंदिरांच्या घडणीची कहाणीच आपल्याला सांगताहेत असा भास होतो. ही मंदिरं तब्बल चार शतकांच्या कालावधीत बांधली गेली असल्यानं त्यातली काही िहदू मंदिरं आहेत, तर काही बौद्ध. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या कळसावर शिव, विष्णू, राजा जयवर्मन आणि बोधिसत्व अवलोकितेश्वर यांपकी कुणाचा तरी चेहरा घडवलेला आढळतो. या प्राचीन शहराभोवती पाण्यानं भरलेला एक खंदक आहे. खंदक ओलांडून आत आल्यावर बायॉन आणि इतर मंदिरांकडे जाणाऱ्या मार्गाच्या दगडी िभतींवर िहदू पुराणांतल्या आणि बोधिसत्वांच्या कथांमधील अनेक प्रसंगांची चित्रं कोरलेली आहेत. त्यातील सर्वात जास्त लांबीची चित्रकथा समुद्रमंथनाची आहे. देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी वासुकी नागास मेरू पर्वताभोवती दोरीसारखा गुंडाळून त्याचा रवीसारखा वापर करून समुद्र घुसळून काढला अशी कथा विष्णुपुराणात आहे. या समुद्रमंथनाचं दीर्घ लांबीचं एक शिल्प इथे कोरलेलं आहे. इतर सर्व मंदिरांच्या बाहेरही लहान-मोठय़ा मार्गाच्या दुतर्फा फणा काढलेल्या नागांची शिल्पं आहेत. या मंदिरांशिवाय अंकोरथाम संकुलात राजेमहाराजांची दहनभूमी, सजवलेल्या हत्तीच्या मिरवणुकीची भव्य शिल्पं असणारी एक दगडी िभत आणि ‘प्रिया पाल्यालय’ नावाचं एक मंदिरही पाहण्याजोगं आहे.

अंकोरवाट हे अंकोरथामसारखं शहर नव्हे, तर तो एक मंदिरसमूह आहे. त्याचं क्षेत्रफळ १.६ चौरस कि. मीटर एवढं आहे. हे मंदिर अंकोरथामच्याही आधी १२ व्या शतकाच्या सुरुवातीला यशोधरपुरा नगरात बांधलं गेलं. प्रथम ते श्रीविष्णूचं िहदू मंदिर होतं. परंतु १२ व्या शतकाअखेरीस त्याचं रूपांतर बुद्धमंदिरात केलं गेलं. हे मंदिर ख्मेर संस्कृतीतील अभिजात वास्तुकलेचा आदर्श नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आज हजार र्वष उलटून गेल्यानंतरही हे मंदिर बऱ्यापकी सुस्थितीत आहे. प्रतिष्ठापनेपासून आजपर्यंत ते कम्बोडियाच्या िहदू संस्कृतीचं प्रतीक बनून राहिलं आहे. जगाच्या दृष्टीनं आज ‘कम्बोडिया म्हणजे अंकोरवाट’ हे समीकरण रूढ झालं आहे. त्यामुळेच कम्बोडियाच्या राष्ट्रध्वजावरदेखील अंकोरवाट मंदिराची शिखरं दिमाखानं झळकत असतात. अंकोरवाट मंदिरात ख्मेर वास्तुकलेची दोन वैशिष्टय़ सामावलेली आहेत. मेरू पर्वताचं प्रतीक म्हणून उभारलेलं केंद्रस्थानीचं पर्वतीय मंदिर हे त्याचं पहिलं वैशिष्टय़. दुसरं- भोवताली तीन बाजूंनी वेढणारी तीन आयताकृती परिघीय मंदिरं. केंद्रस्थानीच्या मुख्य मंदिराची पाच उत्तुंग शिखरं दिमाखानं आकाशाशी स्पर्धा करताना दिसतात.  मंदिराच्या दगडी िभती व शिखरांवर अत्यंत कलात्मक अशा कोरीव वेलबुट्टीची सजावट आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या िहदू देव-देवतांची शिल्पंही जागोजागी कोरलेली आहेत. केंद्रस्थानीच्या या मुख्य मंदिराभोवती चहूबाजूंनी पाण्यानं भरलेला एक खोल खंदक आहे. या खंदकाच्या पाण्यात अनेक सुसरी असल्याची वदंता आहे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात दुसऱ्या सूर्यवर्मन राजानं बांधलेल्या या मंदिरात त्याकाळचे कोणतेही शिलालेख आढळत नाहीत. त्यामुळे या मंदिराचं मूळ नाव काय होतं, हे सांगता येणं कठीण. गेल्या पिढीतले लोक मात्र त्यास ‘वराह-विष्णुलोक’ असं म्हणत. बाराव्या शतकाअखेरीस या अंकोरवाट मंदिराचं रूपांतर बुद्धमंदिरात झालं. आज ते बुद्धमंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकानंतर या मंदिराकडे लोकांचं दुर्लक्ष होत गेलं. पण तरीही ते अद्यापि बऱ्याच चांगल्या स्थितीत उभं आहे. या अंकोरवाट मंदिराचं आणखी एक वेगळेपण आहे. कम्बोडियात हे असं एकमेव मंदिर आहे- ज्याचं तोंड पश्चिम दिशेकडे आहे. ते पश्चिमाभिमुख का आहे, हे मात्र आजवर कळू शकलेलं नाही.

बान्तीयश्री, ता-प्रोहम आणि प्रीआ-खान ही आणखी तीन प्रसिद्ध मंदिरं अंकोर परिसरात आहेत. बांतीयश्री हे दहाव्या शतकातलं शिवमंदिर आहे. अंकोरथामपासून २५ कि. मी. अंतरावर नॉमदेई डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे छोटं मंदिर पूर्णपणे तांबडय़ा जांभा दगडांत बांधलेलं आहे. सूक्ष्म  कोरीवकामासाठी हा योग्य दगड असल्याने या मंदिरातली शिल्पं आणि त्यांतील कलाकुसर जगभर वाखाणली गेली आहे. या मंदिराचा उल्लेख ‘अंकोर समूहातलं रत्न’ असा केला जातो. इथली इतर सर्व मंदिरं कोणत्या ना कोणत्या राजपुरुषानं बांधलेली आहेत. पण बान्तीयश्री हे मंदिर मात्र विष्णुकुमार आणि यज्ञवराह नावाच्या दोन ज्ञानी पंडितांनी बांधलं आहे. या मंदिराचं मूळ नाव त्रिभुवनमहेश्वर मंदिर असं होतं. अलीकडच्या काळात त्यास ‘बान्तीयश्री’ हे नाव पडलं. ‘बान्तीयश्री’ या कम्बोडियन शब्दाचा अर्थ ‘स्त्रियांचं माहेरघर’ असा होतो. या मंदिराच्या लाल दगडांवर असणाऱ्या नाजूक कलाकुसरीत सुंदर स्त्रियांच्या अनेक प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्यक्षात शिवमंदिर असूनही लोकांनी त्यास ‘बान्तीयश्री’ (स्त्रियांचं माहेरघर) म्हणावयास सुरुवात केली, असं इथले लोक सांगतात.

ता-प्रोहम हे बायॉन मंदिराच्या धर्तीवर बांधलं गेलेलं तेराव्या शतकातलं मंदिर. त्याचं मूळ नाव ‘राजविहार’ असं होतं. अंकोरथामपासून एक कि. मी. अंतरावर पूर्वेकडे हे मंदिर आहे. दुसऱ्या जयवर्मन राजाच्या काळात इथे एक महायान बुद्धविहार आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचं विद्यापीठ होतं. इथे पूर्वी असलेल्या मंदिरांच्या, विहारांच्या आणि वसतिगृहांच्या अनेक इमारती पडीक स्वरूपात आजही दिसतात. या परिसरात पूर्वी दाट जंगल होतं. जंगलातल्या अनेक वृक्षांनी या जुन्या इमारतींवर अतिक्रमण केलेलं आज पाहावयास मिळतं. वृक्षांनी गिळंकृत केलेल्या या जुन्या इमारती पाहण्यासाठी जगभरचे पर्यटक इथे गर्दी करत असतात. प्रीआ-खान हे राजा जयवर्मन यानं स्वत:च्या पित्याला अर्पण करण्यासाठी बांधलेलं मंदिर होय. अंकोरथामच्या ईशान्येला जयताटक तलावाशेजारी असणारं हे मंदिर विशाल, पण साधंसुधं आहे. त्याच्या मध्यभागी एक बुद्धमंदिर आहे आणि ते चहूबाजूंनी विहारांनी वेढलेलं आहे. त्यांच्या बाहेरच्या बाजूस अनेक िहदू मंदिरं आहेत. इ. स. ११९१ मध्ये राजा जयवर्मन यानं आक्रमणकर्त्यां चाम सन्याचा पराभव ज्या ठिकाणी केला, तिथेच प्रीआ-खान हे मंदिर उभं केलं गेलं आहे.

कम्बोडियातली अंकोरवाट, बायॉन, बान्तीयश्री, आणि प्रीआ-खान ही सारी जगप्रसिद्ध मंदिरं नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळात उभारण्यात आली आहेत. सर्व मंदिरांची रचना इथे उपलब्ध होणाऱ्या लॅटेराईट दगडांनी केली गेलेली आहे. या दगडांवर आता वातावरणाचे दुष्परिणाम होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सूर्यापासून येणारे अतिनील किरण, सूक्ष्म सायनोबॅक्टेरिया आणि बुरशीमुळे पदा होणारं सेंद्रिय आम्ल यामुळे या मंदिरांच्या दगडांचं विघटन सुरू झालेलं आहे. कम्बोडियातील पुरातत्त्व खात्याचे तज्ज्ञ या संकटाचा सामना करण्यात सध्या गुंतले आहेत.

सिएम-रीप शहरापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर टोन्लेसॅप नावाचा एक विस्तीर्ण तलाव आहे. या तलावापासून उगम पावणारी टोन्लेसॅप नदी पुढे १२० कि. मी. दूर वाहत जाऊन आग्नेयेकडील मेकाँग नदीला मिळते. टोन्लेसॅप नदी आणि तलाव या दोहोंच्या आसपासचा सखल आणि दलदलीचा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीनं अत्यंत समृद्ध आहे. या प्रदेशास संयुक्त राष्ट्रसंघानं ‘जैवविविधतेचा हॉट स्पॉट’ म्हणून मान्यता दिली आहे. टोन्लेसॅप हा दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठा तलाव आहे. तो कम्बोडियाचा आर्थिक आधारही आहे. टोन्लेसॅप नदी वर्षांतून सहा महिने एका दिशेने आणि उर्वरित सहा महिने विरुद्ध दिशेने वाहत असते. ही गोष्ट काहीशी आश्चर्यकारक वाटेल, परंतु ती खरी आहे. इकडे मे-जूनच्या सुमारास पाऊस सुरू होतो आणि ऑगस्टपर्यंत इतका पाऊस पडतो, की टोन्लेसॅप नदी सखल प्रदेशातून तलावाच्या दिशेनं वाहू लागते. साधारणत: नोव्हेंबपर्यंत तलाव भरून जातो. त्या महिन्यात पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. त्यावेळी मेकाँग नदीतील पाणी ओसरायला सुरुवात होते. मेकाँगचं पाणी विशिष्ट पातळीपर्यंत खाली गेलं, की टोन्लेसॅप नदी मेकाँगच्या दिशेनं उलट वाहायला सुरुवात करते. त्यामुळे टोन्लेसॅप तलावातलं पाणी टोन्लेसॅप नदीमार्फत मेकाँग नदीत जाऊ लागतं. ज्या काळात टोन्लेसॅप तलाव भरलेला असतो त्या काळात तिथे मासेमारीला बंदी असते. कारण तो मासळीच्या प्रजननाचा काळ असतो. पण जेव्हा तलाव आणि टोन्लेसॅप नदीतलं पाणी ओसरू लागतं तेव्हा मासेमारी सुरूकेली जाते. नोव्हेंबरनंतर तलावाच्या परिसरातली सारी कुटुंबं तलाव आणि नदीच्या पात्रात तरंगत्या घरांमध्ये राहायला जातात. पुढच्या मे-जूनपर्यंत ते लोक पाण्यावर तरंगणऱ्या घरात राहून मासेमारी करतात. त्यांचं खाणंपिणं, राहणं, झोपणं, शाळा आणि दिवसभराचे सारे व्यवहार त्या तरंगत्या घरांतूनच चालतात. त्या काळात टोन्लेसॅप नदी आणि तलावात माशांपासून मगरी-सुसरींपर्यंत जे काही मिळेल त्यावर ते गुजराण करतात. तलावाचं पाणी ओसरू लागताच हे लोक एक उत्सव साजरा करतात. त्यास ‘सात डोक्यांच्या सर्पाचा उत्सव’ असं म्हटलं जातं. आम्ही एका बोटीतून अशाच ‘चाँग खनिआ’ नावाच्या एका तरंगत्या खेडय़ापर्यंत जाऊन आलो.

दिवसभर निरनिराळी प्राचीन मंदिरे आणि टोन्लेसॅप नदीची सर केल्यानंतर संध्याकाळी सिएम-रीप शहरात कुठे जाऊ, असा प्रश्न हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला विचारला असता ती म्हणाली, ‘जगभरातून सिएम- रीपला येणारे पर्यटक संध्याकाळी इथल्या पब-स्ट्रीटवर जातात. या शहरातलं पब-स्ट्रीट हे एक आंतरराष्ट्रीय प्रस्थ आहे. प्रत्यक्षात ‘आठवा रस्ता’ असं बेचव नाव असणारा हा पब-स्ट्रीट दिवेलागणीनंतर निरनिराळ्या चवींच्या खाद्यपदार्थानी, मादक दरवळ असणाऱ्या पेयांनी, जादूच्या प्रयोगांपासून कसरतीच्या खेळांपर्यंत अनेक करामती दाखवणाऱ्या कलाकारांनी आणि देशोदेशीच्या पर्यटकांनी फुलून गेलेला असतो. संध्याकाळ झाली की या अरुंद रस्त्यावर गर्दी जमायला सुरुवात होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांतले दिवे उजळतात. निऑनचे फलक झगमगू लागतात. रस्त्याच्या कडेनं अनेक हातगाडीवाले, हातात तबक घेऊन फिरणारे खाद्यविक्रेते, चाकांच्या फिरत्या गाडय़ांवर मद्य विकणारे लोक, बांबूच्या जाळीला लहान मुलांची खेळणी लावून फिरणारे विक्रेते या सर्वाच्या वर्दळीने पब-स्ट्रीट गजबजून जातो. इथे हातगाडय़ांवर आणि दुतर्फा असलेल्या दुकानांतून कम्बोडियन, थाई, चायनीज आणि कॉन्टिनेन्टल अशा कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ उत्तम मिळतात.

आपल्याकडे चणे-फुटाणेवाल्यांकडे असते तशा वेताच्या तिवईवर ट्रे ठेवून खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका कम्बोडियन फेरीवाल्याजवळ आम्ही थांबलो. त्याच्या ट्रेमध्ये डोकावून पाहिलं. त्यात तळलेले मसालेदार नाकतोडे, बीटल किडे, टारांटुला कोळी आणि काडीवर टोचलेले नागमोडी साप होते. येणारे-जाणारे लोक ते नाकतोडे व किडे विकत घेऊन कागदावर ठेवून खात खात फिरत होते. आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा कळलं की, असे खारवलेले अन् तळलेले किडे आणि साप हे इथे भटकणाऱ्यांचं आवडतं माकडखाणं आहे. ते पाहून मला आमच्या मणिपूर-नागलॅण्ड सफरीची आठवण झाली. २०१४ साली कोहिमातल्या भाजी मंडईत आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे भाजीसोबत काही टोपल्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या टपोऱ्या अळ्या विक्रीला ठेवल्या होत्या. काही ठिकाणी अर्धवट तयार झालेली मधमाश्यांची पोळी होती. त्या पोळ्यांत मधमाश्यांच्या पांढऱ्या अळ्या होत्या. एका टोपलीत तीन-तीन जिवंत बेडकांच्या एकत्र बांधलेल्या जुडय़ा ठेवल्या होत्या. मी फोटो घेतोय हे पाहिल्यावर एका भाजीविक्रेत्यानं बेडकांची एक जुडी उचलून मला दाखवली आणि म्हणाला, ‘टेक इट. इट इज वेरी गुड. वेरी गुड!’ नागालॅण्डच्या त्या सफरीत गाईड म्हणून आमच्यासोबत केझो नावाचा एक सुशिक्षित नाग तरुण होता. भाजीबाजारात विक्रीला ठेवलेल्या अळ्या, किडे आणि बेडूक पाहून मला आश्चर्य वाटलं हे त्यानं ओळखलं. केझो आम्हाला म्हणाला, ‘आम्ही नाग लोक ईशान्येच्या दुर्गम अशा पहाडांमध्ये राहतो. तिथे शेतजमीन फारच तुरळक ठिकाणी आहे. धान्य फारसं पिकत नाही. पहाडांवर मधल्या आणि शिखराच्या भागांत राहणाऱ्या लोकांना वारंवार खाली खोऱ्यात येणं शक्य नसतं. म्हणून आम्ही पहाडांवर जे पशुपक्षी मिळतात ते खातो. या टपोऱ्या अळ्या हेच आम्हा गरीब नाग लोकांसाठी प्रोटिनयुक्त अन्न  आहे. म्हणून आम्ही ते खातो. हे काही फार अघटित आहे असं कृपा करून समजू नका.’ केझो जे बोलला त्यानं माझे डोळे उघडले. तेव्हापासून देशोदेशीचे लोक जे काही खातात त्यावर मतप्रदर्शन करणं मी टाळतो. त्यांच्या खाद्यसवयींचा आदर करतो. मणिपूर-नागालॅण्डसह थायलंड-कम्बोडिया या समस्त इंडो-चायना उपखंडातील खाद्यसंस्कृतीत पहिल्या महायुद्धानंतर जे बदल होत गेले, त्याबद्दल १९ व्या शतकातल्या फान-के-बिन्ह या व्हिएतनामी पत्रकारानं सविस्तर लिहून ठेवलं आहे. फान-के-बिन्ह म्हणतो की, ‘पहिल्या महायुद्धाआधी इंडो-चायनातील सुखवस्तू लोक मासे, पोर्क, मटण, चिकन, कासवं आणि गाई-म्हशीचं मांस खात. त्याशिवाय भात, काही भाज्या आणि सोयाबीनपासून तयार केलेलं टोफू हे त्यांचं अन्न असे. खास प्रसंगी ते कुत्र्याचं मांसही खात.’ नागालॅण्डमधील कोहिमाच्या मार्केटजवळ एक कुत्र्यांचा कत्तलखाना आहे. तो बघायचाय का, असं जेव्हा आम्हाला आमच्या गाईडनं विचारलं तेव्हा आम्ही होकार दिला होता आणि तो कत्तलखाना पाहून आलो होतो. बकऱ्यांचा असतो तसाच कुत्र्यांचा कत्तलखाना! फक्त आपण कधी पाहिलेला नसतो म्हणून त्याची कल्पनाही आपल्याला हादरवून टाकते. ‘इंडो-चायनातील गरीब लोक मात्र हलक्या दर्जाचा भात, रानभाज्या, गोगलगायी, िझगे, खेकडे आणि कीटकांच्या अळ्या खात..’ असं फान-के-बिन्हनं लिहिलंय. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या काळात बाहेरून येणाऱ्या ब्रिटिश, फ्रेंच, चिनी आणि जपानी लोकांचा प्रभाव इथल्या खाद्यसवयींवर झाला आणि तीत अनेक बदल झाले. त्यानंतर गेल्या अनेक दशकांत इंडो-चायनात झपाटय़ानं बदलत गेलेल्या खाद्यसंस्कृतीनं इथे परकीय पद्धतीचे संपृक्त, परंतु कमी पोषणमूल्यं असणारे खाद्यपदार्थ रुजवले. दक्षिण-पूर्व आशियातील ‘इंडो-चायना रिसर्च’ संस्थेच्या ‘आय-लाईट’ मासिकाच्या जुल २०१२ च्या अंकात एक लेख वाचला होता. युद्धोत्तर काळात बदललेल्या खाद्यसंस्कृतीमुळे इंडो-चायनातील बऱ्याच देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या मधुमेहाची लागण झालेली आहे असं त्यात म्हटलं होतं. म्हणून मणिपूर-नागलॅण्ड असो की कम्बोडिया-व्हिएतनाम; तिथल्या लोकांनी परंपरागत शहाणपण वापरून जे काही खाद्य निवडलेलं आहे तेच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं.

कम्बोडियाची सफर तिथलं ‘अप्सरा नृत्य’ पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. कम्बोडियन संस्कृतीत महत्त्व पावलेल्या अप्सरांची कैक शिल्पं आम्ही सिएम-रीप शहरातल्या निरनिराळ्या मंदिरांत पाहिली होती. बाराव्या शतकापासून कम्बोडियात अप्सरा नृत्यकला ही एक अभिजात कला म्हणून प्रचलित होती. परंतु १९७५ च्या सुमारास ख्मेर रूज पक्षाच्या पोलपॉट या हुकूमशहानं इथल्या साहित्य आणि कलांवर जी बंदी लादली, त्यामुळे तिथे मोठा सांस्कृतिक ऱ्हास घडून आला. त्यातून बाहेर येण्यास या देशाला अनेक र्वष घालवावी लागली. १९९५च्या सुमारास पर्यटन हा प्रमुख आर्थिक आधार बनल्यानंतर इथल्या अप्सरा नृत्यप्रकाराला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. बोफादेवी या कम्बोडियन राजकन्येनं या नृत्याच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह धरला. त्यामुळे या नृत्याच्या प्रशिक्षणास पुन्हा सुरुवात झाली. प्राचीन काळी केवळ राजघराण्यांतले पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच अप्सरा नृत्यांचे कार्यक्रम होत असत. परंतु आता ते सार्वजनिक स्वरूपात मंदिरांमध्ये आणि प्रेक्षागृहांमध्ये सर्वासाठी होतात. या अप्रतिम नृत्यांमध्ये अनेक प्रतीकात्मक मुद्रांचा समावेश असतो. ईश्वराशी संवाद, स्वत:शी संवाद, आकाशस्थ पऱ्यांसारखं उड्डाण अशा विविध भावावस्था व्यक्त करणाऱ्या सुमारे १५०० मुद्रा त्यात असतात. कम्बोडियात या अवघड नृत्यप्रकाराचं शिक्षण आता राजधानी नॉमपेन्हमधील शाही कला विद्यापीठात दिलं जातं.

मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी एका प्रेक्षागृहात अप्सरा नृत्य पाहून आम्ही हॉटेलवर परत आलो. आता सिएम-रीप शहराचा आणि कम्बोडियाचा निरोप घेण्याची वेळ आली होती. इथले प्राचीन िहदू आणि बौद्ध मंदिरांचे अवशेष, खाद्यसंस्कृती आणि अभिजात कलाप्रकार हे तर लक्षात ठेवण्याजोगे होतेच; पण त्याहीपेक्षा जास्त लक्षात ठेवण्याजोगे होते इथले सामान्य लोक. ज्यांनी १९७५ ते १९७९ या चार वर्षांत बेचिराख झालेलं कम्बोडियाचं समाजजीवन आणि संस्कृतीचं नेटानं पुनरुज्जीवन केलं. स्वभावानं मनमिळाऊ, कष्टांची तयारी असणारे कम्बोडियन आपल्या प्राचीन इतिहासाचा नुसताच अभिमान बाळगून नाहीत, तर आपल्या शिक्षणाच्या, उपजीविकेच्या आणि न्यायाच्या हक्कांसाठी कायम जागरूक राहून प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या धडपडीला सलाम!
विजय दिवाण