मी जन्माला आलो तोच ‘गे वैनीऽऽ, विजयदुर्गचे बांगडे इलेत गेऽऽ घेतस..? ताजे आसत..’ अशी ललकारी ऐकत. फोंडाघाटला आमच्या घराच्या मागच्या बाजूनं एक वहाळ वाहतो. तो ओलांडला की समोर मासळी मार्केट. सहावी-सातवीत असताना या मार्केटमध्ये बसून मी स्वत: पापलेटं नि बांगडे विकलेले आहेत. याचा  फायदा असा झाला, की मासा ताजा आहे की बासा (म्हणजे शिळा), हे मी त्याच्या नुस्त्या वासावरून दोन मैलांवरूनही ओळखायला शिकलो. बरेचजण माशाचं गालफाड उघडून त्याच्या ताजेपणाची खात्री करून घेतात. पण काही काही डॉक्टर बघा, तुम्हाला हातही न लावता नुस्तं निरीक्षण करून औषधं लिहून देतात, तसा मी कुठल्याही माशाच्या नुस्त्या कांतीवरून आणि त्या पाण्याच्या वासावरून त्याची कुंडली सांगू शकतो.

तर सांगायचं म्हंजे आमच्या वडिलांनी केलेल्या केळ्यांच्या, मिठाच्या, तंबाकूच्या वगैरे व्यापारामध्ये जसा घाटा आला तसाच या माशाच्या व्यापारातही. आमचा कवी-मित्र रुजारिओ पिंटो याची आई मेरीमाय तेव्हा मालवणहून बांगडे, इस्वण, कर्ली, सुंगटाच्या फाटय़ा घेऊन यायची. ती आमच्या वडलांना सांगायची, ‘वो भाऊनु, गाबत्याक गोरवा नि भटाक तारवा काय कामाची? ो धंदो तुमचो न्हय. तुमी दिवाणजी. तुमी हिशेबबिशेब लिवीत बसायचा. माशे आमी इकायच्ये. काय?’ पण आमच्या भाऊंचं असं होतं की कुठल्याही व्यापारात ‘लाखाचे बारा हजार’ झाल्यावरच ते शांत व्हायचे.

रोज संध्याकाळी मासे विकायला बसण्याची माझी डय़ूटी एके दिवशी संपली. पण मासे मारण्याचं आणि ते चवीनं खाण्याचं वेड मात्र संपलं नाही. तो जो आमच्या घराला वळसा घालून पुढे जाणारा वहाळ आहे, त्याला त्याकाळी पावसाळ्यात पूर यायचा. मग आम्ही पुलाच्या कठडय़ावर बसून टोकाला गांडुळ लावलेल्या गऱ्या टाकून मासा कधी गरीला लागतोय याची वाट बघत बसायचो. गरीला कधी शेंगटी लागायची, तर कधी खवळा. पण नशीब जोरावर असलं तर कधीतरी खडस पण लागायचा. काठीला बांधलेल्या तंगुसाला खूपच ताण बसायला लागला आणि त्याच्या शेवटच्या हिसक्यानं आपणच वरून खाली पाण्यात पडणार अशी वेळ आली की त्याच क्षणी- म्हणजे अगदी डोळ्याचं पातं लवतं- न लवतं तोच सगळ्या शक्तीनिशी तंगुसाची काठी वर खेचायची.. बस्स्! खडस तुमच्या हाती लागलाच म्हणून समजायचं. असे दोन खडस जरी मिळाले तरी तुम्ही त्या रात्री पोटाला तडस लागेपर्यंत जेवणार.. लिहून ठेवा.

आमच्या आईला हे असले नदीतले मासेबिसे खाणं अजिबात पसंत नव्हतं. घरात कुणालाच नदीतले मासे आवडत नव्हते, आणि नाहीत. पण भाऊंना आणि मला नदीतले मासे म्हणजे मेजवानीच वाटायची. आमच्या फोंडय़ाच्या माळावरचे भोरपी पावसाळ्यात समुद्राचे मासे मार्केटमध्ये यायचे बंद झाले की आपापल्या पाठींवर शिसाचे गोळे लावलेली जाळी टाकून मासेमारीच्या मोहिमेवर निघायचे. नद्या, ओढे, विहिरी, तळी, पाट- जिथं जिथं माशांच्या जागा असतील तिथं जाळी टाकून मासे काढायचे नि मग फोंडय़ाच्या बाजारात येऊन फडक्यांवर वाटे घालून विकायला बसायचे. काळे कुळकुळीत मळवे- ही नदीतल्या माशांची फेमस जात. भाऊ भोरप्याकडून मळवे घेऊन आले रे आले, की माझ्यावर आणि भाऊंच्यावर आईच्या जिभेचा पट्टा सटासट फिरायला सुरुवात व्हायची. त्यावेळी आपण आपल्या तोंडाला मख्ख कुलूप लावून ठेवलं की बस्स. तासाभराचाच तर प्रश्न असायचा. मग मळवे खाणारे आम्ही फक्त दोन एवढे अल्पसंख्य असूनही आमच्या पानांत मळव्यांचं जे झणझणीत कालवण आणि ज्वारीच्या गर्रमागर्रम भाकऱ्या पडायच्या, त्याचा आनंद काय वर्णावा!

आणि त्याच वहाळाच्या काठावर योगीपुरुष बसावा तसा एकाग्र चित्तानं, विशिष्ट शीळ घालत तासन् तास कुल्र्याच्या बिळांवर नजर रोखून बसलेला तो लखलखीत काळ्या रंगाचा ढवणसुद्धा मला आज याक्षणी जसाच्या तसा आठवतो. खाली दादा कोंडकेंसारखी खाकी ढगळ पॅन्ट आणि वर अंगात काही नाही. उघडा. पाऊस पडत असला तर डोकीवर प्लॅस्टिकची फाटकी खोळ. मार्केटच्या मागे असलेल्या गावठी गुत्त्यावर पावशेर मारणार, हातात एक मोठं पातेलं घेणार नि कुल्र्या पकडायला निघणार. बऱ्याचदा त्याच्या मागोमाग मी चिकटून निघायचो. तो मला पिटाळायला बघायचा. पण नंतर नंतर त्याला माझा काहीच त्रास नाही, हे कळल्यावर तो आपल्याबरोबर मला येऊ देऊ लागला.

ढवणचा मुलगा माझ्या वर्गात. बाप त्याला जाम शिव्या घालायचा. त्यामुळे तो बापाला नेहमी टरकून. मी ढवणबरोबर वहाळाच्या काठावर कधी कधी तासन् तास बसून असायचो. त्याची ती सुमधुर शीळ ऐकत. ढवण कुल्र्या पकडायच्या धंद्यात नसता तर जागतिक बासरीवादक झाला असता लेकाचा! त्याच्या शिट्टीला भुलून हळूहळू एकेक कुर्ली बिळाबाहेर यायची. कुर्ली बाहेर आली रे आली की चित्ता जसा भक्ष्यावर झेप घेतो तेवढय़ा चपळाईनं फडाक्कन् ढवणचा हाताचा पंजा कुर्लीच्या मुख्य डेंग्यावर पडायचा. तो डेंगा मोडण्यासाठी आपल्या हाताच्या पंजात ढवण सगळीच्या सगळी ताकद एकवटायचा. त्याच्या पंजावरच्या त्या टरारून ताणलेल्या शिरा आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या डोळ्यांसमोर मला स्पष्टपणे दिसतात. मुख्य डेंगा मोडेपर्यंत कुर्लीचे बाकीचे डेंगे ढवणच्या हाताच्या पंजावर दुबळेपणाने आपटत राहायचे. ढवण तेव्हा छद्मी हसायचा. मग तो फाटकन् मुख्य डेंगा मोडून ती फडफडती कुर्ली पातेल्यात डेंग्यांसहित फेकून द्यायचा. हा थरार बघण्यासाठी मी वारंवार ढवणबरोबर जायचो आणि घरचा ओरडा खायचो. अशा पंचवीसेक कुल्र्या पातेल्यात जमल्या की ढवण निघाला नाक्यावरच्या चौकात. तिथं कुंबयाच्या पसरट पानांवर पाच-पाच कुल्र्याचा एक याप्रमाणे तो वाटे घालायचा. बारा आणे एक वाटा. दहा मिनिटात सगळे वाटे खतम. की त्यातले बारा आणे नवटाक पावशेर मारण्यासाठी स्वत:जवळ ठेवून, बाकीचे तीन रुपये बायकोकडे देऊन ढवण निघाला पातेलं घेऊन.. नाही नाही, एकदम वहाळाकडे नव्हे. पहिल्यांदा मार्केटमागच्या गुत्त्याकडे. तिथं मस्त पावशेर मारत अर्धा तास घालवल्यावर तोंडात खारवलेल्या आंब्याची फोड टाकून मगच पुन्हा शीळ वाजवत कुल्र्याच्या शोधात-

आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक तिरफळाचं झाड होतं. तिरफळं (प्रमाणात) घातलेलं पेडव्यांचं किंवा बांगडय़ांचं तिखलं तुम्ही कधी खाल्लंय की नाही? नाही? मग तुमचा जन्म व्यर्थ गेलाय म्हणून समजा. अहाहा! लोक नारळीच्या झाडाला- म्हणजे माडाला ‘कल्पवृक्ष’ असं म्हणतात. अस्सल मासे खाणाऱ्यांना मात्र तिरफळाचं झाड हेच कल्पवृक्ष होय. ताज्या फडफडीत माशांचं सांबारं चुलीवर रटरटतंय आणि इतक्यात आईच्या हातातून त्यात चार-पाच तिरफळं पडतात.. आणि मग जो काय दिव्य परिमळ आसमंतातून वाहत जातोय.. परिणामी तिकडून गडग्यापलीकडून शेजारणीची चौकशी सुरू झालीच म्हणून समजा..

‘गे वैनीऽऽ, झाला काय गे सांबारा?’

‘गे, नुक्ता चुलीर ठेवलंय..’ आमची आई.

‘हां हां. होवंदेत. मगे जरा माज्या बाबल्याक धाडून देतय वाडगो घेवन तुज्याकडे-’

‘गे, पण तुज्या घोवान घेतल्यान ना गे माशे?’ आई.

‘व्हय गे. पण मी केलेला सांबारा आमच्या घरात सगळ्यांका चलता. माका मातर तुज्याच हातचा लागता.’

आता ह्यवर काय बोलणार! आमच्या आईच्या हातची माशाची आमटी खायला मिळावी म्हणून जानकी फोंडेकारीण भाऊ पटेलांचा डोळा चकवून आमच्याकडे तरवा लावायला यायची. दिवस पावसाळ्याचे. गडी माणसं तरवा लावतायत. आणि आई चुलीवरच्या एका वायनावर भाकऱ्या भाजतेय नि दुसऱ्या वायनावर फणसाच्या घोटय़ांची भाजी (आठळ्या) रटरटतेय. त्या भाजीत सुकी सुंगटं आहेत.. वातावरण असं सर्वागानं खरपूस झालंय. आणि पोटात अक्षरश: लाव्हा उसळायला लागलाय..

आपलं चॅलेंज आहे- की ही जी ‘डिश’ मी आता सांगितली, ती संजीव कपूर किंवा कोणत्याही शेफने करून दाखवावी. मुंबईत ज्याला ‘कोलीम’ म्हणतात त्याला आम्ही मालवणीत ‘गोलमो’ म्हणतो. तर गोलम्याची चटणी आणि हुनहुनीत भाकरी हे पण एक सॉलिड कॉम्बिनेशन आहे. आणि हां- आणखी एक सर्वश्रेष्ठ युती आणि आघाडी म्हणजे गरम, पांढराशुभ्र भात, कुळथाची पिठी आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेल्या सुक्या बांगडय़ाचा कांदा घालून केलेला कुस्कर. आये गेऽऽ आये गेऽऽ! या एवढय़ा एका कारणासाठी पुन्हा पुन्हा मालवणी मुलखात जन्म घ्यावा. चुलीतल्या फुललेल्या निखाऱ्यांवर दोडया किंवा बांगडा मस्त तावूनसुलाखून हुलपवायचा. तो कुस्करायचा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि वर खोबरेल तेलाची धार.. अहाहा! बांगडे के कुस्करने निकम्मा कर दिया हमें गालिब। नहीं तो हम भी आदमी थे कुछ पॉपलेट भी खाने लायक।।

मग नववीपासून सावंतवाडीत आलो तसं मच्छी मार्केट दूर पडायला लागलं. पण सोमवार आणि सणावाराचे दिवस वगळता मासळी आणायला जाणं कधी सोडलं नाही. जयवंत दळवी माहीमच्या मार्केटमध्ये मासे बघत तासन् तास फिरायचे, हे मला खूप म्हंजे खूपच नंतर कळलं. पण मला हा नाद अगदी लहानपणापासून होता. सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलजवळच्या मासळी मार्केटात मी नेहमी जात असल्यामुळे तिथल्या कोळणी माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. मासे बासे असतील आणि समोर दुसरं गिऱ्हाईक असेल तर दूरवरूनच नेत्रपल्लवी करून त्या मला ‘आज मासे घेऊ नकोस’ असं सुचवायच्या. सावंतवाडीच्या त्या मार्केटमध्ये तऱ्हेतऱ्हेचे मासे बघायला मिळायचे. बांगडे, पेडवे, तारले, कोळंबी ऊर्फ सुंगटा, पॉपलेट, सरंगा ऊर्फ हलवा, इस्वण ऊर्फ सुरमई, सुळे, कर्ली, नालवा, काळ्या पाखाची मोरी, तांबोशी, गुंजुली, सौंदाळे, शेतका, पाश्चाळी, इणगा, मांदेली.. किती तऱ्हेतऱ्हेचे ढंग! आणि ते ‘बुरयाटे’! वा वा वा! खूप म्हंजे खूपच बारीक मासा. नवजात लव असते ना, तेवढा बारीक, नाजूक नि कोमल. पण त्यात काटा असतो. हा मासा काटय़ासहित खायचा. याला फारसं गिऱ्हाईक नसायचं. पण माझ्या आजोबांना (म्हंजे आईच्या वडिलांना) बुरयाटे फारच आवडायचे. ते मडुऱ्याला राहायचे. ते रिटायर्ड हेडमास्तर कम् सब-पोस्ट मास्तर होते. मडुऱ्याच्या घरात फक्त आजोबा आणि आजी. म्हंजे मडुऱ्यात मासे मिळत नव्हते असं नाही. दर दिवशी खिरीस्तावीण मागच्या दारी फाटी घेऊन यायची. ‘गे वैनी, खुबे आसत ताजे.. घेतस?’ अशी हाळी आली की परात घेऊन आजी मागच्या दारी जाणार. आजोबा पडवीच्या उंबऱ्यावर उभे राहणार. आजी थेट खिरीस्तावणीसमोर. तिच्या फाटीत खुबे, सौंदाळे, कर्ली, पेडव-बिडवे सगळा मालमसाला. हे हेरून आजोबा मुद्दाम तिला डिवचणार- ‘बुरयाटे आसत काय गो?’ मग ती खिरीस्तावीण ओशाळून म्हणणार- ‘नाय वो नानानु.. पण सरंगो बगा ताजो फडफडीत आसा.’ त्यावर पुन्हा नाना आजोबांचा डायलॉग- ‘अगो, बुरयाटय़ाची सर तुज्या सरंग्याक नाय. जाऽ तू आपला- माजो नातू येतलो बुरयाटे घेवन आयतवारी.’ मग आजी त्या खिरीस्तावणीला डोळा मारून रोखून ठेवायची. आजोबा नेहमीचा डायलॉग मारून पुढच्या दारी गेले की मग आजी आपल्या आणि नाना आजोबांच्या आवडीची मासळी भरपूर खरेदी करायची. तिला थोडे पैसे, भात, नारळ, आंबे असं काय काय द्यायची. ‘देव बरे जाव..’ असा दुवा देऊन खिरीस्तावीण मग उठता उठता आजीच्या पातेल्यात एखादा बांगडा जास्तीचा टाकायची नि निघायची..

खरं तर रोज जेवणात मासे असावेत, एवढीच नाना आजोबांची माफक अपेक्षा असायची. पण खिरीस्तावीण कधी कधीच मासे घेऊन यायची. मी मात्र सावंतवाडीहून दर रविवारी न चुकता त्यांच्यासाठी मासे घेऊन जायचो. मी दहावीत होतो तेव्हा. आजोबा माशांचे आणि एसटीच्या तिकिटाचे पैसे द्यायचे. शिवाय वर दोन-चार रुपये हातावर ठेवायचे. ते मला शाळेच्या वस्तू घ्यायला उपयोगी पडायचे. हे आमचे आजोबा सहा फूट उंचीचे. एकदम कडक असे. दर रविवारी खास सावंतवाडीहून मासळी घेऊन जाणाऱ्या माझ्या बाबतीत मात्र फारच मायाळू वागायचे. आमची वैनी आजी पण माशांना लावायचा मसाला पाटय़ावर स्वत: वाटून अशी काही फक्कड आमटी बनवायची की.. वा वा! बरं, हे लोक पण असे तालेवार ना, की शेतकं आणली तर बावीकडच्या माडावरच्या नारळाचं खोबरं किसणार.. नि सुळे ऊर्फ मुडदुशी नेली तर डुऱ्याकडच्या नारळालाच मान देणार. आता खोबऱ्यामध्ये असा काय फरक असतो बरं? पण नाही. यांच्या मते, प्रत्येक माशाची जात आपापला स्वभाव आणि आपापला नारळ बरोबर घेऊन जन्माला येते. ही चैन त्यांना परवडायची एवढय़ाचसाठी- की त्यांची स्वत:ची नारळीची बाग होती.

पण तुम्ही काही म्हणा, ‘तिसऱ्या’ खाव्या तर रत्नागिरीच्या. खुबे वेगळे आणि तिसऱ्या वेगळ्या. तिसऱ्या म्हंजे तिसऱ्याच. दुसऱ्या कोणी नव्हेत. मी नोकरीसाठी रत्नागिरीला ब्याऐंशीत आलो. बॅचलर होतो. आमच्या आकाशवाणीच्या बाजूला थिबा पॅलेस. तिथं गव्हर्मेन्ट पॉलिटेक्निक. तर पॉलिटेक्निकची पोरं, स्टाफ आणि आम्ही काही आकाशवाणीवाले अशांना दुपारच्या जेवणासाठी त्या परिसरात एकच आशास्थान होतं, ते म्हणजे ताईंची खानावळ.

भंडारी मसाल्याची मासळी खावी तर ताईच्या हातची. रोज नवीन प्रकार. झणझणीत. फार आकर्षण वाटायचं ताईच्या खानावळीचं. पावलं तिथंच ओढ घेण्यासाठी आम्हाला आणखीन एक कारण होतं. विशेषत: बॅचलर्सना. ते म्हणजे भारती नावाची लवलवती मासोळी. ही ताईची मुलगी. गोरीपान. तरतरीत. शेंगटीसारखा शेलाटा बांधा. आणि हासली की काळजाची तुकडी पडलीच म्हणून समजा. तर ही भारती आपल्या आयशीची नजर चुकवून माझ्या ताटात मासळीची एखादी तुकडी जादा वाढायची. आपण मान वर उचलून प्रश्नार्थक बघितलं तर सीबीआयच्या पण लक्षात येणार नाही एवढय़ा कमी वेळात- म्हणजे फक्त अडीच सेकंदात डोळा मारायची. हाऽय हाऽय.. कुठे असेल आता ती- कोण जाणे! पण ती भारती, ती ताई, आणि ताईनं केलेल्या त्या मसालेदार तिसऱ्या कधीच विसरता येणार नाहीत.

तिसऱ्यांना भंडारी लोक ‘शिवल्या’ म्हणतात. तर या शिवल्या खाण्याचं माझं आणखी एक ठिकाण म्हणजे जयु भाटकरचं घर. हां हा- दूरदर्शन सह्यद्रीवर जो निर्माता आहे- तोच जयु भाटकर. तो माझा एम. ए.चा क्लासमेट. मी आकाशवाणीवर नोकरीत असतानाच एम. ए. करत होतो. जयु तेव्हा आमच्याकडे कॅज्युअल अनाऊन्सर होता. पण एम. ए.चा तो रेग्युलर स्टुडन्ट होता. रविवारी गोगटे-जोगळेकर कॉलेजमधली लेक्चर्स संपल्यावर तो मला दुपारी आपल्या घरी घेऊन जायचा. जयुची आई पण शिवल्या अशी बनवायची की- आणि हां.. चिंबोऱ्या पण! (रत्नागिरीत कुल्र्याना ‘चिंबोऱ्या’ म्हणतात.) ताईची खानावळ बंद झाल्यावर मासे खायची पंचाईतच होती. पण निदान काही रविवार तरी जयुच्या घरी निभावले. आणखी एक मला हवी तशी मासळी मिळण्याचं ठिकाण सापडलं- प्रशांत लंच होम. बंदर रोडवर होतं ते. प्रोप्रायटर- सतीश खानोलकर. लंच होम ज्या दिवशी सुरू झालं, त्या पहिल्या दिवशी तिथं पहिला जेवणारा माणूस मी होतो. मेल्या  खानोलकराची बोनी मी केली; पण कधी काय एखादी ज्यादा तुकडी त्यानं मला वाढूक नाय. मला ज्यादा तुकडी वाढणारी एकच एक व्यक्ती रत्नागिरीत होती- भारती. पण ताईनं खानावळ बंद केल्यावर मी काय कधी (त्यांच्या घरचा पत्ता माहीत असूनही) ज्यादा प्रयत्न केला नाय.

अत्यंत उत्तम आणि वेगवेगळ्या प्रकारची मासळी खरेदी करणे, ती स्वच्छ करणे, स्वत: बनवणे किंवा आपल्या बायकोला मासळी बनवायला मदत करणे आणि ती कुणाही आवडीच्या माणसाला आग्रह करून करून खाऊ घालताना माशांच्या गजाली करणे, हे छंद असलेले दोन मेहुणे आमच्या कुटुंबात आहेत. मोठय़ा बहिणीचे मिस्टर प्रकाश गणपत टिकले आणि धाकटय़ा बहिणीचे मिस्टर सुशील दाभोळकर. हे दोघेही मासे प्रकरणात बाप आहेत बाप!

पैकी हे जे प्रकाश टिकले आहेत ते ‘अरे, ह्य़ा माशे-मटनाच्या यसनापायी आमची अर्दी इस्टेट गेली. कणकवलेच्ये खोत होतव आमी..’असं जाहीरपणे सांगतात. खरंय ते. २५-३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती, की ह्य़ांच्या घरात खेपेला चार-पाचशे रुपयांची मासळी लागायची. एकत्र कुटुंब. सगळेच अट्टल मासे खाणारे. अधूनमधून त्यांच्याकडे कोंबडी, ससे, बकऱ्याचं मटण, रानडुक्कर वगैरे वगैरे प्रकार असायचेच. पण मासे मात्र रोज हवेतच.

टिकले कुडाळला एमएसईबीत हेडक्लार्क होते. मी गेलो की लगेच दहा-पंधरा मिनिटात त्यांच्या स्कूटरच्या मागे बसून कुडाळच्या मासळी बाजारात चक्कर ठरलेलीच. तसे ते रोजच मासे घ्यायचे. पण मी गेलो की जरा डायलॉगबाजी होत मासळी खरेदी होणार.

‘काय गोऽऽ ताजी आसत ही शेतका?’

‘भाऊनु, ताजी? अवो, आजुन अरद्या तासात परत जिती व्हतीत, एवडी ताजी आसत.’

‘बग हां- तुज्यार विश्वास ठेव्न घेतय. नायतर आताच काय ता सांग. ो बरोबर आसा तो माजो मेवणो.. हां- इज्जत घालवशीत नायतर माजी..’

‘नाय वो. खऱ्यानी सांगतय. शेलका ताजी फडफडीत आसत. किती घालू? दोनशेची?’

‘बाये.. बाये.. बाये.. गो चार शेतकांचे दोनशे नि तीनशे लाव्क लागलात तर गाडी इकूची लागतली माका..’

‘मग अशीच घेव्न जावा. तुमच्याकडे काय पैशे मागलेत आमी कंदी?’

‘नको गो बाय आमका काय फुकट. बरा, दीडशेक घाल व्हयतो वाटो..’

नाही-होय करता करता दीडशेची शेतकं, शंभराचे पेडवे, शंभराचे सौंदाळे असा सगळा तीनशे- साडेतीनशेचा माल घेण्यासाठी टिकले भावोजी मार्केटमध्ये पाऊणएक तास घालवणार म्हणजे घालवणारच. आपली खरेदी करून झाली तरी आम्ही दोघे फालतू चौकश्या करत, कोण कुठली मासळी घेतो ते बघत मार्केटमधून फिरत राहायचो. कोणी ओळखीच्यातला ‘नग’ भेटला आणि विषय निघाला तर कारगील प्रकरणात वाजपेयींनी काय करायला पाहिजे होतं, या विषयावर तिथल्या तिथे परिसंवादही झडायचा.

९१ च्या जूनमध्ये मुंबईला आल्यावर आम्ही एका चाळीत घाटकोपरला राहत होतो. आजूबाजूला सगळी मालवणी माणसं होती. त्यामुळं कुणाच्या ना कुणाच्या चुलीवरच्या (गॅसच्या शेगडीवरच्या) तव्यावर तळल्या जाणाऱ्या मांदेल्यांचा, नाही तर बोंबलांचा वास सगळ्या चाळीत परमळत असायचा. ‘अवचिता परिमळु’ हे नेहमीचंच होतं. मालवणी मुलखात फुले घमघमतात आणि मासे परमाळतात. याच्यावरून अशोक बागवेंचा एक विनोद आठवला. एकदा असेच आम्ही हॉटेलमध्ये जेवत असताना बागवे म्हणाले की, ‘संत ज्ञानेश्वर हे मूळचे मालवणी होते.’ ‘काय सर, काऽय फेकताय?,’ असं म्हणून आम्ही हसायला लागलो. तर बागवे एकदम गंभीर चेहरा करून म्हणतात- ‘अरे, ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतीत शेवटी पसायदानात ‘ईश्वरनिष्ठांची मांदेली’ असं लिहिलेलं मी वाचलेलं आहे.’ अर्थातच ‘मांदियाळी’वरची बागवेंची ही कोटी हसता हसता पुरेवाट करणारी होती.

आमच्या ‘कवितांच्या गावा’मधल्या भिडूंपैकी एक मिशीवाले शाकाहारी सोडले तर आम्ही सगळे मासे या प्रकारावर तुटून पडणारे. पण आमच्यात मासळीच्या वेगवेगळ्या डिशेस स्वत: बनवणारा एकच.. आणि तो म्हणजे किशोर कदम.

किश्याने आम्हाला कित्येक वेळा खारदांडय़ाला नेऊन स्वत: ताजी फडफडीत मासळी आणून खिलवली आहे. ‘भरलेला मसाला बांगडा’ ही त्याची स्पेशालिटी आहे. असे भरलेले पाच-पाच बांगडे एका वेळी फस्त करताना मी त्याला बघितलेलं आहे. उत्तम मासळी खरेदी करणं, ती स्वत: बनवणं आणि मित्रांना ती आग्रह करकरून खाऊ घालणं, हे किशोरचं तीन अंकी नाटक आम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे.

आगरी मसाल्याचा अत्यंत चविष्ट जिताडा खावा तर दमयंतीवैनीच्या हातचा. ‘दमयंती भोईर’ अशी सही न करताही तिजी दर्जेदार कविता जशी ओळखू येते, तद्वतच हा जिताडा दमयंतीवैनीनेच केलाय, हे दर्दी मासेखाऊंना ओळखू यावं, एवढी त्यावर तिची स्वतंत्र मुद्रा असते. मोहन भोईर हा आमचा नाटककार आणि प्रकाशक मित्र हा दमयंतीचा नवरा. वाशी गावात त्यानं आपल्या घरी जिताडा आणि तांदळाच्या पांढऱ्याशुभ्र भाकऱ्या खायला आजतागायत किती शेकडय़ांनी साहित्यिकांना नेलं असेल, कोण जाणे! एकदा करावे गावात मोहनने ‘कोमसाप’चा कार्यक्रम तिथल्या शाळेत लावला. मधु मंगेश कर्णिक, रमेश तेंडुलकर सर, मंगेश पाडगांवकर, वि. शं. चौघुले अशी भलीमोठी फौज होती. सोबत परेन शिवराम जांभळेंची लगबगही होतीच. कार्यक्रम झकास झाला. मग सगळी मंडळी तिथंच मोहनच्या भावाच्या घरी जेवली. भाकऱ्या आणि जिताडा असा फक्कड बेत. लेखक-कवींच्या रसवंतीला अगदी भरतं आलं होतं त्या दिवशी.

विठ्ठल विठ्ठल। पिणारा अट्टल।

संपूर्ण बोट्टल। संपवितो।।

मंगू म्हणे माझा। लहान आवेग।

मला चार पेग। पुरे बापा।।

ही पाडगांवकरांची पुढे गाजलेली वात्रटिका पहिल्यांदा आम्ही तिथं करावे गावात जेवताना ऐकली. जेवणं झाल्यावर सगळे माडीवरून खाली उतरले. बाहेर पडले. तेंडुलकर सर मात्र मागेच रेंगाळताहेत असं माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, ‘काय सर, काही रालंय काय?’ तर ते हळू आवाजात म्हणाले, ‘अरे, मला दोन भाकऱ्या आणि थोडं जिताडय़ाचं कालवण मिळेल काय, ते जरा मोहनला विचार ना..’ मी म्हटलं, ‘एवढंच ना सर? अरे मोहन..’ लगेच मोहन पळत आला. मी त्याला सरांसाठी घरी न्यायला काय हवंय ते सांगितलं. लगेच दमयंतीवैनीनं डब्यातून कालवण आणलं आणि ‘भाकऱ्या किती हव्यात?’ म्हणून विचारलं. सर म्हणाले, ‘दोन पुरेत. सचिनला.. बऱ्याच दिवसांनी घरी आहे. त्याला आगरी पद्धतीचं जिताडय़ाचं कालवण आणि तांदळाच्या भाकऱ्या खूप आवडतात.’ हे ऐकल्यावर मोहनने स्वयंपाकघरात जाऊन पंचवीसेक भाकऱ्या असलेली अख्खी टोपली उचलून आणली. तेंडुलकर सर एवढे संकोचले, की पुन्हा पुन्हा ‘सॉरी.. सॉरी’ म्हणत राहिले. पण त्यांनी दोनच भाकऱ्या घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटियरसाठी नव्हे; आपल्या मुलासाठी!

मी डोंबिवलीत राहत होतो त्यावेळची गोष्ट. २००० सालातल्या नोव्हेंबरचा चौथा आठवडा असावा. ‘मनोहर कदमचा कॅन्सर बळावलाय, आणि त्यानं तुला भेटायला घरी बोलावलंय तातडीनं..’ असा निरोप आला. मनोहर माझा खूप जुना मित्र. आम्ही दोघेही मालवणी मुलखातले. सत्यशोधक चळवळीतला आघाडीचा कार्यकर्ता आणि वैचारिक लेखक म्हणून तो महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. ‘म. टा.’मध्ये नोकरी करणारी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ती प्रतिमा जोशी ही मनोहरची पत्नी. आम्ही फॅमिली फ्रेण्डस् होतो. मनोहरच्या कुल्र्याच्या नेहरूनगरमधल्या घरी मी नेहमी जायचो. त्याचा कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर त्याला भेटून आलो होतो. त्याच्या घशाच्या आसपास काही गाठी आल्या होत्या. पण त्यातून तो पूर्ण बरा होणार, हे आम्हाला सगळ्यांना- म्हणजे प्रतिमा, जीवराज सावंत, सुबोध मोरे, शरद कदम, सीताराम गिरप अशांना वाटत होतं. पण आजार वाढत गेला नि एके दिवशी निखिल वागळे भेटला तेव्हा म्हणाला की, ‘अरे, मनोहर तुझी आठवण काढतोय. भेटून ये लवकर.’ तर मी लगोलग गेलो नि भेटलो. तेव्हा थकलेल्या आवाजात माझा हात घट्ट आपल्या हातात घेऊन तो म्हणाला, ‘महेश, मी आता थोडय़ा दिवसांचो सोबती आसय. पण जाताना रडत जायाचा नाय असा मी ठरवलेला आसा. माका आजुन काय काय लिवचा होता रे.. ता मातर अरद्यार सोडुचा लागता हा..’ त्याला धाप लागली.

मी म्हटलं, ‘तू मन्या, निरवानिरवीची भाषा आधी बंद कर. तू ेच्यातना वाटावतलस. भाय्र येतलंस.’

‘नाय रे, लास्ट स्टेज आसा..’ असं म्हणून तो थोडंसं हसला नि म्हणाला, ‘माका मालवणी पद्धतीचा बांगडय़ाचा तिखला खावची इच्छा झालेली आसा. जरा बायकोक सांग नि फुडच्या रविवारी घेव्न ये..’

त्यानंतरच्या लगेचच्या रविवारी सक्काळी डोंबिवलीच्या मार्केटमध्ये जाऊन मी ताजे फडफडीत बांगडे, सुरमय, पापलेटं, कोळंबी असे चार-पाच प्रकारचे मासे आणले. उमाने तिरफळं घालून बांगडय़ाचं तिखलं केलं. सुकी कोळंबी केली. सुरमय नि पापलेटचे तुकडे तळले. डबे घेऊन दुपारच्या कडावर मी मनोहरच्या घरी दाखल झालो. डबे बघून मनोहर निरागस हसला नि म्हणाला, ‘अरे गुलामा, तू खऱ्यानीच माशे घेव्न इलंस? मी गम्मत केल्लंय. अरे, माका याक शीत गिळाक आता जमना नाय. े येवडे माशे मी कशे खानार?’ मला अक्षरश: रडायला यायला लागलं. ओठांवर ओठ घट्ट दाबून मी डब्यांची झाकणं उघडली. मनोहरने बांगडय़ाच्या तिखल्याचा नि तळलेल्या पापलेटचा वास छाती भरून घेतला. मग प्रतिमानं पापलेटचा इवलासा तुकडा तोडून, सगळा मसाला धुऊन काढून पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याच्या कातळीसारखा त्याच्या जिभेवर ठेवला. त्याने डोळे मिटून मोठय़ा कष्टानं, पण अतीव समाधानानं तो सावकाश चावत घशाखाली लोटला..

त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात ४ डिसेंबरला मनोहर गेला.

मनोहर आणि मी- आम्ही दोघे एका मुलखातले तरी होतो. मित्र होतो. पण ग्रेसचा आणि माझा तसा काय संबंध? जुलै २००३ मध्ये ग्रेसची एक कॉन्सर्ट मी निमंत्रित (तुडुंब) श्रोत्यांसमोर आकाशवाणी सभागृहात आयोजित केली होती, एवढंच. ती कॉन्सर्ट झाल्यावर ग्रेस मला आणि मी ग्रेस सरांना विसरून गेलो होतो. पण दोन र्वष उलटून गेल्यावर, २००५ च्या मे महिन्यात एकदा मुंबईत आलेले असताना त्यांनी रवींद्र आवटीकडे निरोप दिला, की त्यांना माझ्या मीरा रोड इथल्या घरी येऊन मालवणी पद्धतीचे मासे खायचेत म्हणून. हा निरोप आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होता. मी हसून तो बाजूला सारला. पण १५ दिवसांनी थेट ग्रेस फोनवर आले नि म्हणाले, ‘महेश केळुसकर..  मी येत्या रविवारी तुझ्या घरी मासे खायला येतोय. पुढचं मला काही माहीत नाही.’ आणि त्यांनी फोन ठेवून दिला.

‘आयला ही काय जबर्दस्ती..!’ असं म्हणत घरी आल्यावर मी थोडा कुरकुरलो. पण बायको म्हणाली, ‘अरे, अशा अनपेक्षित, अनाहूत भोजनइच्छा टाळू नयेत कधी. त्यांच्या मुखातून कदाचित तुझा किंवा माझा कोणी पूर्वज बोलत असेल. येऊ देत त्यांना.’ तेव्हा आम्ही मीरा रोडला राहत होतो. ग्रेस जेवायला येणार म्हटल्यावर मी सकाळीच उठून भाईंदरच्या खाडीतली ताजी फडफडीत अव्वल मासळी आणली. ‘डिंपल’च्या अशोक मुळेला कुठून बातमी लागली होती, कुणास ठाऊक. पण त्यालाही माझ्याकडे जेवायला येण्याचा तोच मुहूर्त सापडला होता. तो सकाळी साडेअकरालाच अवतीर्ण झाला. आणि आवटीच्या गाडीतून ग्रेस साडेबाराच्या दरम्यान पोहोचले. मी दार उघडलं. मनापासून त्यांचं स्वागत केलं. माझ्याकडं तेव्हा दोनच खुच्र्या होत्या. ग्रेस आणि आवटी खुच्र्यावर बसले. मी आणि मुळे खाली बसलो. मग बायकोने लिंबू सरबत आणलं. ‘कालवण होईलच एवढय़ात. आणि सुरमई तळायला घेते..’ म्हणाली. ग्रेसनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ते आल्यापासून गप्पच होते. आम्ही वेगवेगळे विषय काढून त्यांना खुलवण्याचा प्रयत्न केला. पण हे मौनीबाबा ढिम्म! मग थोडय़ा वेळानं तव्यावरती ‘चुर्र.. चुर्र..’ असा मासळी तळल्याचा आवाज येऊ लागला नि ताज्या सुरमईच्या मसाल्याचा घमघमाट सुटला. बास्स! ग्रेस महोदय तिथून जे सुरू झाले ते झालेच. मग ताटं वाढली. जेवताना एक शब्द बोलले नाहीत. दोन-तीनदा ‘मला सुरमई वाढा.. मला कोळंबी हवी थोडी..’ हे सांगण्यासाठी तोंड उघडलं, तेवढंच. सोलकढी पण त्यांनी दोनदा मागून घेतली. अगदी तृप्त मनानं ग्रेसनी ‘अन्नदात्री सुखी भव’ असा आशीर्वाद उमाला दिला आणि म्हणाले, ‘मुली, तुला वाटलं असेल की मी तुझ्याकडे मासे खायला आलो. नाही. मी त्यासाठी नाही आलेलो. तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात नोकरी सोडायचं खूळ शिरलंय असं मला खात्रीलायक ऐकलंय. ते खूळ तुझ्यासमोरच त्याच्या डोक्यातून काढून टाकावं, या इराद्यानं मी आलोय..’

वेलची आणि बडीशेपेची मुखशुद्धी झाल्यावर ग्रेस पुन्हा सुरू झाले. मासेबिसे सगळं राहिलं बाजूला. ग्रेस आम्हाला संसारातील फासे समजावून देऊ लागले. आणि बोलता बोलता तो दु:खाचा महाकवी आपल्या कवितांच्या अरण्यात शिरला. भोवतालच्या सगळ्यांना तो विसरला. अज्ञातात नजर लावून आपल्याच तंद्रीत कवितांमागून कविता म्हणत राहिला. अगदी पार संध्याकाळ होईपर्यंत. मीरा रोडच्या त्या आमच्या घरामागच्या डोंगराआड सूर्य बुडाला नि अचानक कच्चकन् ब्रेक लागावा तसे ग्रेस थांबले. त्यांना तीन दिवस आधी सांगितल्याशिवाय मी राजीनामा देणार नाही, असं तिथं हजर असलेल्यांसमक्ष त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं आणि पुन्हा मासे खायला येईन, असं सांगून ते अंतर्धान पावले.

नोकरीनिमित्तानं, तर कधी कार्यक्रमांच्या निमित्तानं मी अनेक गावं भटकलो. जिथे गेलो तिथे एकदा तरी मासे खाल्ल्याशिवाय परत आलेलो नाही. १९९४  च्या ऑक्टोबरमध्ये मी आकाशवाणीच्या दमण केंद्रावर रुजू व्हायला गेलो. पहिले काही दिवस त्या सुशेगात दमणमध्ये कंटाळा यायचा. मग रोज संध्याकाळी नानी दमणच्या समुद्रावर जाऊन बसायला लागलो. तिथून उठून दमणच्या मच्छी मार्केटमध्ये चक्कर मारायची नि मग एखादी बीअर मारून चालत वरकुंडला ऑफिस स्टाफ क्वार्टर्सपाशी यायचं. दमण केंद्रावर त्यावेळी आम्ही बाहेरचे सात-आठजण काम करत होतो. त्यापैकी एक परब म्हणून प्यून होता. त्यानं फक्त फॅमिली आणली होती. आम्ही बाकीचे एकत्र जेवायचो. स्वयंपाक करण्यासाठी एक लोकल बाई यायच्या. पण त्या फक्त सकाळी येत आणि दोन्ही वेळच्या चपात्या, डाळ, भात आणि भाजी बनवून जायच्या. सकाळी मी सगळ्यांबरोबर जेवायचो. पण संध्याकाळी परबला घेऊन बऱ्याचदा मासळी मार्केटला जायचो नि कधी बोंबील, तर कधी सुरमई, तर कधी कोळंबी घेऊन यायचो. परब हा मालवणी माणूस. त्याची बायको इतकी उत्तम मासळी बनवायची, की ‘क्या बात है!’ असं कुणीही म्हटलंच पाहिजे. परब, वहिनी आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आणि मी असे आम्ही जेवायला बसायचो नि मालवणी गजाली करत मासळी-भातावर ताव मारायचो.

सीकेपी लोक पोह्यंमध्येसुद्धा सोडे घालतात. सोडे म्हणजे सुकवलेली मोठी कोळंबी. दमणचे सोडे अलम दुनियेत प्रसिद्ध आहेत. एकदम अव्वल. तर दमणहून डोंबिवलीला घरी येताना दर महिन्याला मी अर्धाएक किलो सोडे घेऊन यायचोच. सोडय़ामध्ये बटाटय़ाच्या चार फोडी घालून ज्वारीच्या गरम भाकरीबरोबर एकदा खाऊन बघा.. स्वर्गीय आनंद मिळण्याची १००  टक्के हमी!

मासे खावे तर दमणमध्ये किंवा गोव्यामध्ये, असं लोक म्हणतात. खरंच आहे ते. सावंतवाडीला मी जेव्हा कॉलेजात होतो, तेव्हा पैसे साठवून आम्ही मित्र गोव्याला जायचो. साडेचार रुपयांची एक किंगफिशर बीअर तिघा-चौघांत प्यायची. मग म्हापसा एसटी स्टॅन्डसमोरच्या शिरसाटांच्या हॉटेलमध्ये ‘शीत आनि हुमाण’ (ऊर्फ गरम भात आणि बांगडय़ाची कढी) खायचं, जवळच्याच एखाद्या थिएटरमध्ये तासाभराचं इंग्लिश पिक्चर बघायचं, नि मग बॅक टू पॅव्हेलियन!

पुढे मग गोव्यात अनेकदा गेलो. पण असं एकदाही झालं नाही, की गोव्याला गेलो नि मासळी खाल्ल्याशिवाय परत आलो. (जसं की, आग्य््रााला गेलो नि ताजमहाल बघितल्याशिवाय परतलो.. ह्य चालीवर!) गोव्यात पाहुण्याला/ मित्राला उत्तमोत्तम मासळीच्या समुद्रात बुडवल्याशिवाय ज्यांना चैन पडत नाही अशी दोन प्रसिद्ध माणसं आहेत. एक म्हणजे आमचे रमाकांतभाई खलप आणि दुसरा विष्णू सूर्या वाघ. भाईंनी एकदा बोट भाडय़ानं घेऊन तिच्यावर कवींना चढवलं आणि मांडवी नदीत ‘तरंगतं कविसंमेलन’ केलं. कवींना मानधन नव्हतं. त्याऐवजी कवी पितील तेवढी बीअर आणि खातील तेवढी तळलेली मासळी! मी त्या कविसंमेलनाचा सूत्रसंचालक होतो. त्यामुळं मला भाईंच्या देखरेखीखाली फक्त एकच बीअर प्यायला मिळाली. मात्र, एकामागून एक जेवढे कवी त्या रात्री बोटीवरच्या स्टेजवर चढले तेवढे (साधारण २०-२२) चविष्ट मासळीचे फ्राय तुकडे माझ्या पोटात गडप झाले.

पचनशक्तीचे असे साहसी प्रयोग करण्यात आणि करवून घेण्यात आमचा आणखी एक मित्र माहीर आहे. तो म्हणजे विष्णू सूर्या वाघ. मी गोव्यात आलोय हे याला समजण्याचा अवकाश; याचा लगेच फोन येणार : ‘पात्रांव, खंय आसा रे तू?’ मग आपण ठिकाण सांगायचं. की अमुक अमुक हॉटेलात मी उतरलोय, म्हणून. लगेच विष्णू- ‘हां, थयच रांव तू. हांव तुका न्हेवक येता.. पंदरा-वीस मिन्टात.’ आपल्या होकारा-नकाराची वाट हा बघत नाही. तो गाडी घेऊन येतो. बरोबर आणखी चार-पाच मित्र असतात. आपण चूपचाप गाडीत चढायचं. ‘आपण कुठे चाललोत?’ असं विचारायचं नाही. मग दीड-दोन तासानी आपण गोव्यातल्या कुठल्यातरी रम्य खेडेगावात पोहोचणार. नारळी-पोफळीच्या बागेमधून वाट काढत आपण विष्णूबरोबर थोडं चालत गेल्यावर समोर चौसोपी जुनं घर दिसणार. घरातला यजमान धावत येऊन विष्णूला मिठी मारणार. मग विष्णू आपल्याकडे वळून त्याला सांगणार.. ‘पळे कोण हाडलो, तुज्या वाढदिसाक ो पावणो- महेश केळुसकार. मराठी-मालवणीतले होडलो कवी. जाणां मरे तू-?’ की मग घरात आल्यावर फेसाळत्या चषकांचा जल्लोश आणि ताजी फडफडीत मासळी खात आपण बेहोश. ‘घेरे पात्रांव.. ही ‘गाबोळी’ खाव्न पळे. किंते म्हणता- पुरो? ह्य ऽऽ महेशबाब, आयज अशे पुरो म्हणुच्ये ना- रे, हाड रे तुकडी घेवन ये ताजी सुरमयची..’ विष्णूने अशी हाळी दिल्यावर लगबगीनं यजमानीण येणार नि आग्रह करून करून आपल्याला मासळी वाढत राहणार. ती तशी देवीसारखी वाढत असताना तिच्या मोठय़ा अंबाडय़ावर माळलेल्या सुरंगीच्या वळेसाराचा गोडा गंध आणि तुमच्या पानात पडत राहणाऱ्या मासळीचा खारा वास एकमेकांत रीमिक्स होणार. आणि मग तुम्ही मेलात म्हंजे ठार मेलात म्हणून समजा. तद्नंतर कधीही गोव्यात जायच्या आधी शंभर वेळा तुम्ही खात्री करून घेणार, की आपण जातोय त्या दिवसात विष्णू तिथं आहे की नाही..

तुम्ही पणजीमध्ये असलात तर मासळी खायचं एक अत्यंत नामी ठिकाण सांगून ठेवतो, ते म्हणजे ‘हॉटेल सिटी प्राईड’! कला अकादमीसमोर जो सेंट इनेज रोड आहे, तिथं आमोणकरांचं हे छोटंसं ‘बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’ आहे. तिथं एखादा सिक्स्टी एमेल पेग मारून मासळीवर ताव मारण्यात जी मजा आहे.. अहाहा! बाहेर पडताना तुम्ही आमोणकरांना ‘देव बरे करो-’ असा तृप्त आशीर्वाद देऊनच बाहेर पडणार.

हे मत्स्यपुराण लांबत चाललंय, नि मला अजून काय काय आठवतंच आहे. पिलर्णे-बारदेस- गोवा इथलं डॉ. सुबोध केरकरांचं ‘म्युझियम ऑफ गोवा’ पाहून झाल्यावर जयप्रद देसाई, किशोर कदम, शशिकांत तिरोडकर यांच्याबरोबर सुलभा सौमित्र आणि शकुंतलाची गाणी ऐकत रंगलेली मत्स्यमैफल अजून जिभेवर आहे. सावंतवाडीच्या जिमखान्यावरच्या भालेकरांच्या खानावळीसमोर रात्री बारा वाजेपर्यंत वाढत चाललेली गाडय़ांची रांग आणि तिथं वशिल्यानं नंबर लावून खाल्लेले भरले बोंबील, सावंतवाडीच्याच वैश्यवाडय़ातील नार्वेकरांच्या ‘सावली’ खानावळीत टिकले भावजी आणि मी जेवत असताना ताटात पडत राहणारे चुरचुरीत पेडवे, केळवे बीचवरच्या पाटीलवाडीत आणि आमच्या आरेम अप्पांच्या घरी कितीतरी वेळा चापलेली वाडवळी पद्धतीची माशांची कालवणं, रायगड जिल्ह्यतल्या हाशिवरे गावातल्या शाळेत कार्यक्रम करून आल्यावर वाटेत जगुभाऊ मोकलनी खाऊ घातलेला जिताडा.. मत्स्यदाते सुखी भव!

‘माशे देवचे, पण कोंड दाखव नये’ अशी मालवणीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ- नदीच्या कोंडीतील मासे पकडून आणल्यावर त्यातले थोडे शेजाऱ्यापाजाऱ्यांना द्यायला हरकत नाही, पण ज्या कोंडीतून ते आणले, ती कोंड मात्र दाखवू नये. इथे मी तुम्हाला मासेही दिले आणि ते जिथे मिळतात त्या वेगवेगळ्या कोंडीही दाखवल्या. आता आपापली जाळी घेऊन निघा.. कुठेही, कसलेही ताजे झणझणीत मासे खाताना मला मात्र विसरू नका. विसरलात तर पुढच्या जन्मी मासा व्हाल.. नि अर्थातच माझ्या पोटात जाल.
महेश केळुसकर