जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे आज सारे जग जवळ आले आहे. देशांच्या सीमा गळून पडताहेत. अनेक बडय़ा जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्रीय तरुण-तरुणीही नोकऱ्या करीत आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली माहीत नसलेली महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय व्यक्ती सापडणे आज मुश्कीलच. या पाश्र्वभूमीवर गुगल, कमिन्स, मेड-एल मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यामध्ये कार्यरत महाराष्ट्रीय तरुणांनी कथन केलेली तिथली कार्यसंस्कृती..

नमस्कार..

आज कोणत्याही.. अगदी कोणत्याही विषयांतील माहितीच्या खजिन्यासाठी ‘खुल जा सिम सिम’ या परवलीच्या शब्दाला पर्याय म्हणून वापरात असणाऱ्या ‘गुगल’ या जगद्व्याळ कंपनीच्या मुख्यालयात (माऊंटन व्ह्य़ू, कॅलिफोíनया, अमेरिका) मी अन्योन्यक्रिया अभिकल्पक (Interaction Designer)- म्हणजे मानव आणि संगणक संवाद संरचनाकार म्हणून गेल्या वर्षभरापासून काम करतेय.

..तर आज गुरुवार. या प्रसन्न सकाळी ‘गुगल’ची कार्यसंस्कृती अनुभवण्याकरिता गुगलम्प्लेक्सकडे मार्गस्थ होण्यासाठी आपण जमलो आहोत. आपणा सर्वाचं स्वागत! सफरीवर निघण्यापूर्वी गुगलबद्दल थोडी माहिती देते. गुगलची मातृसंस्था- अल्फाबेट इंकार्पोरेशन. आंतरजालावर (इंटरनेटवर) आधारित विविध सेवा ही कंपनी पुरवते. गुगलच्या अनेक प्रॉडक्ट्सपकी गुगल सर्च इंजिन हे सर्वाधिक सुपरिचित आहे. दुसरे सर्वाना माहीत असणारे- जीमेल. पण त्याव्यतिरिक्त  यूटय़ुब, गुगल ट्रान्सलेट, अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम, गुगल मॅप, गुगल डॉक, शीट्स, स्लाइड्स, कॅलेंडर, क्लाऊड स्टोरेज, हॅंगआऊट, कीप, फोटोज, गुगल प्लस असे कितीतरी.. गुगलचे जगभरात विखुरलेले दहा लाखांपेक्षा जास्त सव्‍‌र्हर आहेत. गुगलचं ध्येय आहे : जगातील सगळी माहिती व्यवस्थित एकत्र करून ती सर्वाना उपयुक्त होईल अशा प्रकारे सहज उपलब्ध करून देणं. ‘अल्फाबेट’ झाल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीचं ध्येय आहे-  ‘योग्य तेच करा’! केवळ २० वर्षांपूर्वी १९९६ च्या जानेवारीत लॅरी पेज आणि सॅरेगे ब्रिन यांनी एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून सुरू केलेल्या या प्रकल्पानं आज अवघं जग व्यापून टाकलं आहे. केवळ एक यशस्वी कंपनी म्हणूनच नव्हे, तर मनुष्यबळ व्यवस्थापनात अनोख्या कल्पना राबविणारी तरुणांची कंपनी म्हणून ‘गुगल’ वाखाणली जाते. कंपनीचा परिसर सतत नावीन्याचा ध्यास घेणाऱ्या आणि ज्ञानार्जनाची आस असलेल्या युवकांची जिथे वर्दळ असते अशा एखाद्या विद्यापीठासारखा पूर्णत: अनौपचारिक वातावरणाचा असावा असं लॅरी आणि सॅरेगे यांचं ध्येय होतं. म्हणजे नेमकं कसं, ते आपण समजावून घेऊ या! चला निघू या!

सकाळी ८.३० वा.. मी कंपनीच्या बसमध्ये बसले आहे. ऑफिसला निघाले आहे. या बसमध्ये वायफाय सुविधा आहे. त्यामुळे मी ऑफिसला पोहोचण्यापूर्वी ई-मेल, बठकांचे वेळापत्रक आणि तंत्रज्ञानाच्या जगातल्या चालू घडामोडी या प्रवासातच तपासते. गुगलचे मुख्यालय म्हणजे माऊंटन वू इथल्या गुगलम्प्लेक्समधील इमारतींची मिळून ३५ लाख चौरस फूट एवढय़ा क्षेत्रफळाची जागा आहे. जगभर गुगलची कार्यालये आहेत. पण सर्वात जास्त संख्येनं कर्मचारी माऊंटन व्ह्य़ू परिसरात आहेत. मी पहिल्यांदा इथं आले तेव्हा मला नवलच वाटलं. मला वाटलं होतं, इथं उंचच्या उंच इमारती असतील आणि वातावरण केवळ ‘तांत्रिकी’ असेल. पण तसं नाहीये. ऑफिसच्या इमारती तीन-चार मजल्याच्याच आहेत. प्रत्येक इमारतीची बाहेरील आणि आतील रचना वेगळी. सगळा परिसर आखीवरेखीव रस्त्यांचा. सजवलेल्या पायवाटांचा. उंचच्या उंच रेडवूड झाडांनी सजलेला आहे. गुगलम्प्लेक्समधील इमारती इथे-तिथे विखुरलेल्या असल्याने एकीकडून दुसरीकडे जायला इथे बरेचजण गुगलच्या रंगीत सायकलींवरून रपेट मारतात.

९.३० वा.. ऑफिसच्या इमारतीत गेल्या गेल्या मी कॅफेमध्ये जाते. तिथं छान नाश्ता मिळतो. प्रवास, नाश्ता, जेवण यांत होणारी यातायात नाहीशी केल्यानं कर्मचाऱ्यांना कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येतं, असं त्यामागचं गणित. एवढंच कशाला, कामाचा ताण आला असेल तर गुगलम्प्लेक्समध्ये असलेल्या मसाज सेंटरमध्ये जाऊन आम्ही मसाज घेऊ शकतो. किंवा मग जवळच असलेल्या सुंदर तलावाच्या काठाकाठानं छान वॉकही घेऊ शकतो. जागोजागी इथं ‘नॅप पॉड्स’ आहेत. तिथं आडवं होऊन डुलकीही काढू शकतो. असो. तर मी थोडी पोटपूजा करते आणि माझ्या डेस्ककडे येते.

१० वा.. मी काही मेलना उत्तरं देते. आजच्या माझ्या अखत्यारीतल्या बठका निश्चित करते. आणि अगोदरच ठरलेल्या दिवसभरातल्या पहिल्या बठकीसाठी निघते. गुगलच्या एका प्रॉडक्ट्सचं डिझाईन करण्यासाठी आमची टीम काम करते. आमची ही दर आठवडय़ाची बठक. प्रत्येकानं केलेलं काम आणि त्यावर प्रत्येकाचं मत असं सर्वसाधारण चच्रेचं स्वरूप असतं. ही बठक नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ चालते. एकेक जण लॅपटॉप घेऊन, तो प्रोजेक्टरला जोडून भल्यामोठय़ा स्क्रीनवर त्यानं केलेल्या कामामागचा कार्यकारणभाव समजावून सांगतोय. आणि नंतर कशावर मत हवंय आणि कशावर नकोय, हेही सांगतोय. उदा. आज मी सादर करत असलेलं काम सध्या अगदीच प्राथमिक स्तरावर आहे, तर मत देणाऱ्यानं दृश्यात्मक बाबीवर न बोलता संकल्पनात्मक बाबीबद्दल बोलावं, अशी मी विनंती करते. त्या दालनातला एकजण चर्चा भरकटू नये यासाठी गरज असेल तेव्हा हस्तक्षेप करतो आणि वेळेत चर्चा होईल असं पाहतो. आणखी एकजण चच्रेच्या नोंदी घेत असतो.. जेणेकरून बोलणाऱ्याला लक्ष विचलित न होता बोलता यावं. आणि बठकीनंतर निवांतपणे नोंदी पाहता याव्यात. एकुणातच चच्रेचा रोख टीका करण्यापेक्षा समीक्षा करणं असा असतो. म्हणजे ‘मला हे पटत नाहीये..’ अशा शब्दात टीका करण्यापेक्षा ‘हे डिझाईन करण्यामागचा तुझा विचार काय होता?’ असं विचारतील. मी कनिष्ठ असले तरीही बठकीत माझं प्रत्येक मत गांभीर्यानं घेतलं जातं. मला इथलं मत्रीपूर्ण वातावरण समजून घ्यायला जरा वेळ लागला. आपल्यापेक्षा सर्वच अर्थानं ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीला नावानं एकेरीत हाक मारणं किंवा बोलणं मला जरा जड गेलं. समजा, बठक सुरू आहे. एखादा ज्येष्ठ अधिकारी आला आणि एकही खुर्ची रिकामी नाहीये आणि मी चटकन् उठून माझी खुर्ची त्याला देऊ केली, तर ते अजिबात शिष्टसंमत नाहीये. होय! साहेबाचं वागणं साहेबासारखं नसतंच. आणि दुसराही त्याला तो साहेब असल्याचं आपल्या वागण्यातून दाखवत नाही. इथली अनौपचारिकता ही भाषा आणि देहबोलीच्याही पल्याड आहे. इथे महत्त्व आहे ते ज्येष्ठता-कनिष्ठतेचा पडदा भेदून एखाद्याच्या कल्पना आणि मते यावर बेधडक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या तुमच्या प्रतिभेला! यातूनच प्रत्येकामध्ये जबाबदारीची आणि एकमेकांप्रति आदराची जाणीव निर्माण होते.

दुपारी १२ वा..  बठक संपल्यानंतर आम्ही सगळे जवळच्या कॅफेकडे निघतो. आज आम्ही नूडल्स आणि सूप घेणार आहोत. हॉलमध्ये हारीनं मांडून ठेवलेल्या प्लेट्स तुमचं उबदार स्वागत करतात. (गुगलमध्ये मिळणाऱ्या विविध देशीय, चवदार, दर्जेदार आणि पौष्टिक खानपान सेवेचं जगभरातल्या कॉर्पोरेट क्षेत्रात कायम मिटक्या मारत चर्चा होत असते.) आपल्या कर्मचाऱ्यांना चविष्ट, पण पौष्टिक अन्न देण्याला ‘गुगल’ फार महत्त्व देतं. म्हणजे गोड पदार्थाचा कोपरा असतो, पण तिथले कप छोटे असतात. तुमच्या जिभेचे चोचले माफक प्रमाणात पुरवले जावेत; पण तुमचं वजन वाढू नये, इतपत आकाराचे ते असतात. गेल्याच आठवडय़ात मी इथं अस्सल महाराष्ट्रीय पक्वान्नाचा आस्वाद घेतला. काय काय होतं? तुमचा विश्वास बसणार नाही. रताळे आणि भोपळ्याची भाजी, चवळीची उसळ, साधं वरण, गाजराची कोिशबीर आणि पोळी. ‘गुगल’च्या कार्यसंस्कृतीवर दोन पुस्तकं निघालीयेत. (‘हाऊ गुगल वर्क्‍स’- एरिक आणि जोनाथन, ‘इन द प्लेक्स’- स्टेवन लेव्ही) तशीच पुस्तकं इथल्या खाद्यसंस्कृतीवरही निघतील, इतकं इथलं खाद्यजीवन विस्तृत आणि भन्नाट आहे.

दु. १ वा..  जेवण आटोपून मी माझ्या प्रॉडक्ट मॅनेजरबरोबर होणाऱ्या चच्रेकरिता निघते. त्याच्याकडे गेल्यावर तो विचारतो, डिझाईन तयार करण्यासंदर्भात माझ्याकडे एक विचारणा झाली आहे. तुझ्याकडे पुरेसा वेळ आहे का? मी होकार देते आणि केव्हापर्यंत मी हे काम करू शकते, ते सांगते. इथं एक आहे- तुमच्यावर कामं कोणीही थोपवत नाही. शक्य आहे का, विचारतात आणि तुमच्या सोयीनुसार कामाचं वेळापत्रक मागं-पुढं करतात. तुमचा बॉस तुमची कामं ठरवत असला तरीही तुम्हाला विश्वासात घेऊनच कामं दिली जातात! कारण तुम्ही मुळात शिस्तशीर आणि प्रामाणिक आहात हे कंपनीने गृहीतच धरलेलं असतं. नोकरीवर घेण्यापूर्वीच हे सारं पारखून घेतलेलं असतं. म्हणून तर ‘गुगल’मध्ये प्रवेश करणाऱ्याला भल्यामोठय़ा मुलाखतींच्या अनेक फेऱ्यांमधून जावं लागतं. म्हणजे मग कामाला लागल्यावर कर्मचाऱ्याच्या सचोटीबाबत कोणी संशयानं पछाडलेला असत नाही. एकूण प्रत्येकजण हा आपापल्या कामाप्रति जबाबदार आहे अशी भावना मनापासून बाळगणारा असतो. समजा, मला बरं वाटत नाहीये आणि मी कार्यालयात येऊ शकत नाहीये, किंवा मला घरी लवकर जावंसं वाटतं आहे, तर मी तसं सहज करू शकते. त्यासाठी मला कोणाच्या नाकदुऱ्या काढण्याची गरज पडत नाही. मी माझं काम जबाबदारीनं करावं, मेल्सना वेळीच उत्तरं द्यावीत आणि ठरलेल्या बठकांना ठरल्याप्रमाणे हजर राहावं- एवढं करणं मी अपेक्षित असतं. एखाद्याला सुट्टीवर जायचंय? फार कटकट होत नाही. सहकारी सहज सांभाळून घेतात. नव्यानं आई झालेल्या स्त्रीला जशी बाळंतपणाची रजा मिळते तशी बाबा झालेल्यांनाही मिळते. या सर्वामागचं साधं तत्त्व हेच, की घर आणि काम यांत संतुलन राहिलं तर कर्मचारी जास्त सक्षमतेनं काम करतात.

दु. १.३० वा.. मी बाथरूमला जाण्यासाठी एक छोटा ब्रेक घेते. तिथं गेल्यावर दारामागे मला भित्तिपत्रकं लावलेली दिसतात. आमच्या कामांसंदर्भात तिथं काही युक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, किंवा काही सूचना असतात. मी आधीच म्हटल्याप्रमाणं ‘गुगल’ म्हणजे एक भल्यामोठय़ा विद्यापीठासारखी आहे. ‘सतत शिकत राहणं’ या सूत्राभोवती या कंपनीत सगळं सुरू असतं. इथं नामांकित तज्ज्ञ व्याख्यानं द्यायला सतत येत असतात. ती भाषणं रेकॉर्ड होतात. ती यूटय़ुबवरही उपलब्ध आहेत. (https://goo.gl/zptXw8) जगभरातल्या कोणत्याही कॉन्फरन्सला जायची माझी इच्छा असेल तर ‘गुगल’ मला स्पॉन्सरशिप देतं. आमच्या जवळच्या स्टॅनफर्ड युनिव्हसिर्टीचा किंवा कोणत्याही शिक्षणसंस्थेचा अभ्यासक्रम मला करायचा असेल तर त्याकरता ‘गुगल’ त्या खर्चाचा बऱ्यापकी भार उचलतं. मग त्या शिक्षणाचा माझ्या कामाशी संबंध असो किंवा नसो. गुगलमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर दादालोक काम करीत असतात. त्यातल्या कोणालाही तुम्ही मेलवर संपर्क साधू शकता आणि वेळ घेऊन दुपारच्या जेवणाच्या निमित्तानं किंवा कॉफीच्या निमित्तानं त्यांना भेटू शकता.. त्यांच्याशी चर्चा करू शकता.

दु. २ वा.. आता माझ्या मॅनेजरबरोबर माझी बठक आहे. हा माझा बॉस. अलीकडेच आमचा कार्यनिष्पत्तीचा आढावा (परफॉर्मन्स रिवू) झाला. मी अलीकडच्या सहा महिन्यांत काय काय काम केलं, ते लिहून दिलं होतं. त्यावर माझ्या सहकाऱ्यांनी त्यांची मतं दिली होती. ही मतं मॅनेजर मला आता सांगणार होता. हा आढावा ऐच्छिक होता. पण सहा महिन्यांनंतर होणारा आढावा अनिवार्य असणार आहे. त्यावेळी मला माझ्या बॉसबद्दल माझा अभिप्राय देता येईल. माझ्या बॉसबद्दलचा माझा अभिप्राय मी माझं नाव गुप्त ठेवून देते. ‘गुगल’मध्ये पदोन्नती मिळण्याकरिता तुमच्या सहकाऱ्यांचे तुमच्याबद्दलचे अभिप्राय (केवळ बॉसचे नाही.) अत्यंत महत्त्वाचे असतात. टीममध्ये मिळून-मिसळून काम करण्याला महत्त्व असल्यानं अशा प्रकारची आढावा पद्धत उपयोगी ठरते. त्यामुळे ‘बॉस एके बॉस’ अशी संस्कृती निर्माण होत नाही. आणि बॉसचं मूल्यमापन करण्याची कर्मचाऱ्यांना मुभा असल्यानं अरेरावीपणाला जागा राहत नाही. पदोन्नती म्हणजे अर्थातच पगारात भरभक्कम वाढ असते. पण ती किती, ते अन्य कोणाला माहिती होत नसते. लास्लो ब्लॉक हा गुगलचा एचआर प्रमुख होता. त्यानं सांगितलं होतं.. काही वेळा कनिष्ठ स्तरावर असणारी माणसं अधिक चांगली कामगिरी करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांपेक्षा जास्त पगार मिळत असल्याचीही उदाहरणं आहेत. तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. मग तुम्ही ज्येष्ठ असा की कनिष्ठ! प्रभावी कामगिरीचा योग्य तो सन्मान करणं हेच तर कामाच्या मोबदल्याचं तत्त्व असतं.

दु. २.३० वा.. आता मी माझ्या डेस्कवर येते. माझ्या ‘२० टक्के’ प्रोजेक्टला हात घालते. गुगलमध्ये ही एक इंटरेिस्टग संकल्पना आहे. गुगलमधल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सकरिता मर्यादित कालावधीसाठी विशेषज्ञांची आवश्यकता असते. मग दुसऱ्या ग्रुपमधला एखादा त्या ग्रुपमध्ये आपलं काम सांभाळून सामील होऊ शकतो. म्हणजे मी माझ्या वेळेच्या २० टक्के वेळ दुसऱ्या ग्रुपमधला कामाचा भार उचलण्यासाठी खर्च करू शकते. मी सध्या नवीन आव्हान म्हणून माझं सध्याचं डिझाईनचं नियमित काम करत असतानाच त्यासोबत गुगल रिसर्च टीमबरोबर गुगल रिसर्चच्या डिझाईनचं काम करतेय.

दु. ४.३० वा.. आता ‘टीजीआयएफ’ची (थॅंक गॉड इट्स फ्रायडे!) वेळ झालीय. गुगलचे संस्थापक लॅरी आणि सॅरेगे यांच्या उपस्थितीतील ही एखाद्या परिषदेसारखी भव्य बठक. गुगलमध्ये सध्या काय सुरू आहे याचं सादरीकरण यावेळी केलं जातं. त्यावर प्रश्नोत्तरं होतात. वक्त्याला आणि लॅरी व सॅरेगे या दोघांनाही श्रोत्यांच्या- म्हणजे आम्हा कर्मचाऱ्यांच्या अवघड प्रश्नांना सामोरं जावं लागतं. बहुधा गुगलचं नवीन प्रॉडक्ट किंवा ‘आधुनिक तांत्रिक शोध’ असा सादरीकरणाचा विषय असतो. आजचा विषय असतो- ‘गुगलचे प्रॉडक्ट दिव्यांगांना वापरण्यायोग्य बनविण्यासाठी गुगल करीत असलेले प्रयत्न’! यापूर्वी ‘वेगवेगळ्या वंशांच्या उमेदवारांना गुगलमध्ये सामावून घेणं’, ‘एलजीबीटी समुदायाला आपलंसं करणं’ अशा विषयांवर इथे सादरीकरणं झालेली आहेत. कोणताही संकुचितपणा न बाळगता हे जग सर्वाना सामावून घेणारं असावं, अशा विचाराच्या कंपनीत मी काम करते आहे, याबद्दल माझा ऊर अभिमानानं भरून येतो. महिलांना आणि विविध वंशांच्या लोकांना गुगलमध्ये उचित संख्येनं स्थान देण्याला गुगल महत्त्व देतं. असं करण्यानं गुगल आणखी एक हेतू साध्य करतं. सुंदर पिचई म्हणाले होते, ‘कंपनी चालवणं असो किंवा देशाचं नेतृत्व करणं असो; विविध प्रदेशांच्या, वंशांच्या, वेगवेगळ्या पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल तर अधिक चांगला विचारविनिमय होतो, अधिक चांगले निर्णय होतात आणि प्रत्येकासाठी अधिक चांगली निष्पत्ती होते.’

‘गुगल’मध्ये अभावितपणे होणारी एखादी पूर्वग्रहदूषित कृती अतिशय गंभीरपणे घेतली जाते. तुम्हाला यात अधिक रस असेल तर तुम्ही https://goo.gl/YBtMK3   या लिंकला भेट देऊ शकता. प्रगत विद्यापीठासारखंच इथं संशोधनाचे प्रकल्प सुरू असतात. प्रश्नोत्तराची सत्रं, व्याख्यानं, सादरीकरणं, चर्चा असं सतत सुरू असतं. प्रयोग करणं, घासूनपुसून प्रॉडक्ट बाजारात आणणं, त्याला सतत सुपरफाइन करत राहणं- हे इथल्या कामाचं चक्र आहे. पण इथल्या कार्यसंस्कृतीचं अनोखेपण आहे ते इथल्या दडपणरहित, अत्यंत मनमोकळ्या आणि अनौपचारिक वातावरणामध्ये. आणि ते टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या धोरणांमध्ये! अर्थात या स्वातंत्र्याचा गरफायदा न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही संस्कृती टिकवण्याचं श्रेय द्यावंच लागेल.

सायं ६ वा.. मी गुगलम्प्लेक्समधल्या जिममध्ये जाते. जसे जिममध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत, तसेच माझ्या कामाशी संबंधितही अनेक क्लासेस आहेत. उदा. प्रेझेंटेशन कला किंवा डिझाईन टूल्स. माझ्या वैयक्तिक आवडीच्या गोष्टी शिकवणारेही क्लासेस इथं आहेत. नुकतेच मी इथे शिवणकामाचे धडे घेतले. माझ्या आईच्या साडीचा टॉप मी शिवला. तो शिकवला मला इथल्या एका ‘गुगलर’नं! (गुगलमध्ये काम करणारे स्वत:ला ‘गुगलर’ म्हणवतात.) हे ‘गुगलर’ अगदी पोहण्यापासून ते मध्ययुगीन तलवारबाजीपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांची प्रात्यक्षिकासह संथा अन्य गुगलरना देतात.

सायं ७ वा.. मी आता घरी परत निघाले आहे. काही ई-मेल्सना मी उत्तरं देते आणि लॅपटॉपच्या कॅलेंडरमध्ये उद्याचं माझं वेळापत्रक तपासते. माझ्या उद्या काही फारशा बठका नसल्यामुळे डिझाईनचं खूप काम करता येणार आहे. उद्या प्रकाश आमटे ‘स्मार्ट व्हिलेजेस’वर व्याख्यान द्यायला येत आहेत. मी त्याला हजर राहीन. बस घराजवळ येईपर्यंत मी आपल्या लॅपटॉपवर डिझाईनमधल्या आताच्या नवीन प्रवाहाबद्दल वाचते. घर आलं.

आय होप, तुम्ही ही ‘गुगल’ची फेरी एन्जॉय केली असेल! बाय..!
जयती अंबेकर