21 March 2019

News Flash

सुदान सुदानी जिंदादिली!

असाच एकदा सुदानला जाण्याचा योग आला. सुदानची राजधानी खार्टुम.

सुदान

34-ls-diwali-2016-travel‘स्वर आले दुरुनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी..’ हे गाणं एका निवांत क्षणी ऐकत असताना कुठूनतरी दूरवरून अवचित हे विरही अन् व्याकूळ स्वर कानावर येतात आणि आपलं अवघं भावविश्व दोलायमान होऊन जातं.

असाच एकदा सुदानला जाण्याचा योग आला. सुदानची राजधानी खार्टुम. खार्टुममधलं काम संपवून वाळवंटातला त्रासदायक प्रवास करत मी दुसऱ्या शहरात पोचलो. या छोटय़ाशा शहरात फेरफटका मारताना मुद्दाम बघण्यासारखं वा विकत घेण्यासारखं काही मिळालं नाही. केव्हाही वाळूची वादळं झेलणाऱ्या या भागाला शहर का म्हणत असावेत, हे माझ्यासाठी मोठं गूढच होतं. दोन मजल्यांपेक्षा मोठं घर नाही. सर्व घरं माती आणि दगडांनी बांधलेली. एकही घर रंगवलेलं नाही. िभती फक्त ओल्या वाळूने िलपलेल्या. क्वचितच झाडं दिसत होती. बाकी सगळीकडे फक्त उन्हाचा रखरखाट. काही वेळातच तप्त वारे वाहू लागल्याचं मला जाणवलं. बघता बघता हे गरम वारे जोरात वाहू लागले. त्याबरोबरच वाळूचे अतिशय बारीक कण चेहऱ्यावर आणि अंगावर येऊन आदळू लागले. आधीच अतिउष्ण हवा, गरम वारे आणि त्यात तापलेल्या वाळूचा मारा. मला खरंच सहन होईना. लोकांची घरपरतीची लगबग उडाली. तिथंच राहणाऱ्या लोकांनी लगेचच फडक्याने तोंडं झाकून घेतली. बाकीच्या लोकांनीही आजूबाजूला आडोसा शोधला. काही क्षणांतच रस्ता निर्मनुष्य झाला. आणि अचानक माझ्या लक्षात आले की, दूरवरून वाळूचे वादळ येत आहे. पाच ते सात फुटी उंच वाळूची िभत माझ्या दिशेने सरकत होती. वाळूचे वादळ घोंघावत येणे म्हणजे काय, हे मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.

पटकन् मी मग एका शेजारच्या दुकानात शिरलो. मला पाहून दुकानदार पुढे आला. मी पाण्याची बाटली विकत घेतली आणि वादळ थांबण्याची वाट बघत तिथेच थांबलो. जरा वेळाने तो दुकानदार म्हणाला, ‘तुम्ही भारतीय आहात का?’ मी ‘हो’ म्हणताच तो म्हणाला, ‘तुम्ही िहदू आहात का?’ यावरही मी हुंकार भरला. तसं त्याने मला त्याच्या घराच्या आतल्या भागात येण्यास सांगितलं. दुकानापाठीच त्याचं घर होतं. ‘आगे दुकान और पिछे मकान’ म्हणतात त्याप्रमाणे. घरासमोर आणि दुकानामागे एक छोटंसं मोकळं अंगण होतं. सुदानमधील इतर घरांपेक्षा हे घर खूप वेगळं असावं. एकमजली आणि आपल्याकडच्या गावातील घरांची आठवण करून देणारं. घरात विशेष वावर दिसत नव्हता. दुकानाच्या मालकाने मला घराच्या आतल्या अंगाला नेलं. तिथलं दृश्य पाहिलं आणि माझ्या आश्चर्याला, आनंदाला पारावार उरला नाही. तिथं रंग उडालेलं, चिरा पडलेलं, तरीही मंजिऱ्यांनी डोलणारं एक तुळशी वृंदावन होतं. माझे हात आपसूक जोडले गेले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचल्यागत तो बोलू लागला.. ‘या घराचा मालक िहदू होता. बरीच वष्रे इकडे घालवल्यावर काही आपत्तीपोटी त्यानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याचा मी एकनिष्ठ नोकर असल्यानं दुकान आणि घर माझ्याकडे सोपवून तो निघून गेला. जाताना बाकी गोष्टी तो घेऊन गेला. मात्र, ही कृष्णाची मूर्ती आणि तुळशी वृंदावन इथेच राहिलं. मी कट्टर मुसलमान आहे. आमच्यात मूर्तिपूजा नाही. तुळशीला एक झाड मानून नेमानं पाणी मात्र घालतो. आपण िहदू आहात. मी असे समजतो की, हा कृष्ण म्हणजे तुमचा ‘अल्ला’ आहे. मला आठवतंय, की या घराची मूळ गृहिणी रोज मनोभावे कृष्णाची पूजाअर्चा करी आणि तुळशीला पाणीही घाली. आज बऱ्याच वर्षांनी या घरात एक िहदू आला आहे. मी तुम्हाला पाणी आणि फुलं आणून देतो. तुम्ही तुमच्या देवाची पूजा करा. कारण त्यामुळे माझ्या सहृदय मालकाच्या आत्म्याला शांती लाभेल. तो जेथे असेल तेथून मला दुआ देईल. मी मूर्तिपूजक नसलो तरी भावनाप्रधान आहे. कृतघ्न नाही. ज्यांनी मला हे घर, दुकान सारं काही देऊ केलं, त्याच्याप्रति असलेल्या कृतज्ञबुद्धीने ही मूर्ती मी ठेवून दिली आहे, इतकंच! तुळशीची मी पूजा करीत नाही, पण नेमाने पाणी मात्र घालतो.

मी ऐकतोय, पाहतोय ते स्वप्न की सत्य, हे मला समजेना. बूट-मोजे काढून, हात-पाय धुऊन मी तुळशीला पाणी घातलं. त्याच्याकडून अजून थोडं पाणी मागून घेतलं. श्रीकृष्णाची मूर्ती अगदीच धूळकट झाली होती. त्याने दिलेल्या पाण्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ स्नान घातलं. आता ती मूर्ती सूंदर दिसू लागली होती. तो दुकानदार माझ्याकडे एकटक पाहत होता. मी केलेली प्रत्येक कृती त्याने पाहिली आणि तो म्हणाला की, त्याच्या मालकाची पत्नीसुद्धा अशीच पूजा करीत असे. एव्हढे सांगून तो पटकन् आत गेला आणि एक डबा घेऊन आला. मी तो डबा उघडून बघताच मला आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसला. कारण त्या डब्यात काही उदबत्त्या, हळद आणि कुंकू होते. तितक्यात त्याने एक काडेपेटीही आणून दिली. भारावल्यागत मी श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे उभा राहिलो आणि त्या हसऱ्या मूर्तीकडे पाहताना हृदयातून झंकार उमटले- ‘कृष्ण मनोहर दिसतसे उभा, चतन्याचा गाभा प्रकटला..’ आणि मनात अंतर्नाद उमटले- ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम्।’

आम्ही दोघे दुकानात परत आलो. थोडा वेळ गप्पा मारल्या. तो भरभरून बोलत होता. बहुतेक सर्व आठवणी िहदू मालकाबद्दल होत्या. एव्हाना दुकानाबाहेरचे (आणि माझ्या आतलेसुद्धा) वादळ शमले होते. परत एकदा श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मी हॉटेलच्या दिशेने चालू लागलो.

१९९९ च्या दरम्यान मी कामानिमित्त सुदानला गेलो होतो. अचानक सुदानमध्ये औषधांची विक्री अमाप वाढली होती. विशेषत: अ‍ॅंटिबायोटिक्स आणि क्षयावरील औषधांना प्रचंड मागणी होती. सरकार, खासगी दवाखाने या औषधांसाठी निविदा मागवीत होते. मी मार्केटमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. अनेक वैद्यकीय अधिकारी, फार्मसिस्ट आणि औषध विक्रेत्यांना भेटल्यावर माझ्या असे लक्षात आले की, सुदानमध्ये त्यावेळी फक्त तीनच औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या होत्या. त्यातील एकच कंपनी   अ‍ॅंटिबायोटिक्स आणि क्षयरोगावरील औषधे बनवीत असे. काही कारणांमुळे ही कंपनी बंद पडली होती आणि ती परत कधी सुरू होईल याची कोणालाच खात्री नव्हती. सुदानमध्ये त्यावेळी एक लाखाहून अधिक क्षयरोगाचे रुग्ण उपचार घेत होते. ही कंपनी या रुग्णांना अतिशय स्वस्तात क्षयरोगावरील औषधे पुरवीत असे. विश्वास बसणार नाही, परंतु फक्त एक ब्रिटिश पौंडात सबंध महिना पुरेल एवढी औषधे ही कंपनी विकत असे. परंतु गेले काही महिने उत्पादन बंद झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. म्हणूनच सर्व सरकारी यंत्रणा कामास लागून देशाबाहेरील औषधनिर्मात्यांकडून ही औषधे मोठय़ा प्रमाणात आयात करीत होती. रुग्णांना औषधे वेळेवर, स्वस्तात आणि सहजी उपलब्ध व्हावीत यासाठी काही नियम पण शिथिल केले गेले होते. या सर्वाचा परिणाम म्हणूनच की काय, पण आयात आणि विक्री वाढली होती.

भारतात परत यावयाच्या काही दिवस आधी माझी भेट आमच्या कंपनीचा एजंट आणि सुदानच्या आरोग्यमंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार कम् मदतगाराबरोबर ठरली होती. इतर जुजबी बोलणी झाल्यावर आम्ही माझ्या कंपनी आणि प्रॉडक्ट्सबद्दल बोललो. अचानक एजंट व मंत्री दोघेही अमेरिकेच्या नावाने शिव्या देऊ लागले. माझी दूरदर्शनकडे पाठ होती, त्यामुळे मला काय झाले ते कळले नाही. मंत्री म्हणाला, ‘बघा- बघा, ही अमेरिकन विमाने कशी हल्ला करून निष्पाप नागरिकांना ठार मारताहेत.’ दूरदर्शनवर अमेरिकेने कोठेतरी केलेल्या हवाई हल्ल्याबद्दलची माहिती दिली जात होती आणि एकदम आमच्या संवादाला कलाटणी मिळाली. मंत्री सांगू लागला, ‘सहा-आठ महिन्यांपूर्वी आम्हीसुद्धा असाच भयाण अनुभव घेतला आहे. सुदानमध्ये फक्त तीनच औषध कंपन्या होत्या. त्यासुद्धा आम्हाला पुरतील एव्हढी औषधे बनवू शकत नव्हत्या. आम्ही बरीच औषधे आयात करीत होतो. त्यातील एक कंपनी आम्हाला अतिशय स्वस्तात औषधे बनवून देत असे. या दुष्ट अमेरिकन लोकांना हे पाहवलं नाही. त्यांनी परस्पर ठरवून टाकलं, की या कारखान्यात आम्ही रासायनिक शस्त्रं बनवतो. आणि त्यांनी शेकडो कि. मी. अंतरावरून या कारखान्यावर बॉम्बहल्ला केला. कारखाना एकदम उद्ध्वस्तच करून टाकला. नशीब! त्यात काही जीवितहानी झाली नाही. पण आमच्यासारख्या गरीब देशाची औषधे बंद करून टाकली हो त्यांनी. हे संहारक लोक कुठे जाऊन हे पाप फेडतील फक्त अल्लाच जाणे!’ त्याच्या प्रत्येक शब्दात अतीव दु:ख, राग आणि तिडीक होती. नंतर आमच्या कंपनीचा एजंट सांगू लागला, ‘माझा एक नातेवाईक याच कंपनीत काम करीत असे आणि अगदी जवळच राहत असे. भलामोठा आवाज ऐकून तो धावतच बाहेर आला. बघतो तर काय, कारखान्यावरचे छप्पर उडून गेले होते. िभती जमीनदोस्त झाल्या होत्या. सगळीकडे फक्त धूर आणि मातीचे साम्राज्य होते. कारखान्याच्या काही भागांत आग लागली होती. बघता बघता विमाने घोंघावू लागली. सगळीकडे एकच धावपळ उडाली होती. भीतीने लोक धावाधाव करू लागले. काय झाले हे कोणालाच कळत नव्हते. नशीब अल्लाने त्या दुष्ट हल्लेखोरांना तेवढय़ावरच थांबवले.’ त्यांना काय सांगू आणि काय नको असे झाले होते. शेवटी आरोग्यमंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार म्हणाला, ‘तुम्ही अजून किती दिवस सुदानमध्ये आहात?’ मी त्यांना प्रांजळपणे सांगितले की, ‘आहे अजून तीन दिवस.’ तो ‘ठीक आहे,’ असे म्हणाला आणि लगेचच एक फोन करून अरेबिक भाषेत, पण कडक शब्दात काहीतरी सूचना दिल्या. आमचे जेवण झाले. जाता जाता मंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार म्हणाला की, दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ९.३० वाजता तो मला कोठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे. मी त्या वेळेला तयार राहावे. मी पण ‘हो’ म्हणून गाडीत बसलो. बसता बसता सहज विचारले की, ‘काय कोणाबरोबर मीटिंग आहे?’ पण एक नाही की दोन नाही. हे महाशय बोलायलाच तयार नाहीत. मग मी हळूच आमच्या एजंटकडे बघितले. त्यानेसुद्धा माझ्याकडे काणाडोळा केला. काही एक न बोलता मला हॉटेलवर सोडून ते दोघे निघून गेले. रात्री झोपण्याच्या अगोदर मी सरळ आमच्या एजंटला फोन केला. एजंट म्हणाला की, ‘आपले जे काही बोलणे झाले त्यानंतर तुम्हाला ती कंपनी दाखवायला घेऊन जायचे ठरले. त्यांच्या डोक्यात काही वेगळी कल्पना आहे. आपण कंपनीला भेट देऊन झाली की मग सविस्तर बोलू. पण तुम्ही काही काळजी करू नका. मंत्र्यांचा वैयक्तिक सल्लागार तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगले बिझनेस प्रपोजल देणार असेल.’ रात्रभर मला शांत झोप लागू शकली नाही. मनात विचारांचे काहूर माजले होते. शेवटी कधीतरी उशिरा झोप लागली. सकाळी बरोब्बर ९.३० वाजता वाहनचालक ‘सलाम आलेकुम’ आणि ‘सुबह खेर’ म्हणून दारात हजर झाला.

खोटं खोटं हसून मी पण त्याला मोडक्यातोडक्या अरेबिकमध्ये शुभेच्छा दिल्या. १५-२० मिनिटांतच आमची गाडी मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराच्या बंगल्यावर पोचली. आमच्या कंपनीचा एजंट आधीच तिथं येऊन बसला होता. मला ‘बस’ असे सांगून शांत राहण्याची खूण केली. मी पण गुपचूप बसून राहिलो.

थोडय़ाच वेळात मंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार बाहेर आला. आदल्या रात्री जेवायला आलेले असताना पाश्चिमात्य शैलीचे कपडे परिधान करून ते आले होते. आता मात्र ते खास सुदानी पेहरावात होते.

आम्ही तिघं त्या औषध कंपनीच्या दिशेने जाऊ लागलो. एजंट आणि मंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार या दोघांचं अखंड संभाषण सुरू होतं. ते अस्खलित अरेबिकमध्ये बोलत होते. एकही इंग्लिश शब्द येत नव्हता. मला आपण मराठीत कसे बोलतो याची प्रकर्षांने आठवण झाली. मुंबईतले लोक कितीतरी इंग्लिश शब्दांचा वापर करत मराठी भाषेची वाताहत करून टाकतात. तसे इथे होत नव्हते. त्याशिवाय माझ्यासारख्या माणसाला- ज्याला अरेबिक बिलकूल येत नाही त्याला- दोघांच्या संभाषणाचा काहीच पत्ता लागत नव्हता.

२५-३० मिनिटांत आम्ही औषध कंपनीच्या फॅक्टरीवर पोहोचलो. मला पाहताच सिक्युरिटी गार्ड एकदम सतर्क झाले. परंतु मंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार पुढे होऊन काहीतरी अरेबिकमध्ये बोलला आणि आमचा मार्ग मोकळा झाला. पण आत जाताना माझा पासपोर्ट आणि व्हिसा दोन्ही चेक करण्यात आले. फॅक्टरीमध्ये काम पूर्णपणे बंद होते. आत जाताच एक ऑफिसर आम्हाला येऊन मिळाला. तो या फॅक्टरीत काम 29-ls-diwali-2016-sudanकरणारा ऑफिसर होता. मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराने त्या ऑफिसरला अरेबिकमध्ये काहीतरी सांगितले. मग त्याने आमचा कब्जाच घेतला. नशीब.. इथे मला पुन्हा तीच बॉिम्बगची कहाणी ऐकावी लागली नाही!!

फॅक्टरीचा परिसर खूपच मोठा होता. निरनिराळ्या प्रकारच्या गोळ्या, कॅप्सुल्स आणि सीरप्स बनविण्याची यंत्रे पडून होती. काही महिन्यांपासून उत्पादन बंद असल्यामुळे धूळ आणि कचरा साचलेला होता. फुटलेल्या बाटल्या, गोळ्या, कॅप्सुल्स आणि इतर पॅकिंग साहित्य इतस्तत: विखुरलेले होते. आम्ही जेव्हा गोळ्या बनविण्याच्या भागात आलो तेव्हा ऑफिसरच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने फक्त छताकडे बोट दाखवले. आणि तेव्हढे दाखवणेच पुरेसे होते. त्याच्या डोळ्यातील अश्रू सारं काही सांगून गेले. त्याला पुढे काही बोलवेना. मी त्याच्या खांद्यावर फक्त हात ठेवला आणि त्याने अश्रू आवरण्याचा प्रयत्न सोडून दिला. तो अक्षरश: ओक्साबोक्शी रडू लागला. आमच्या एजंटने सांत्वन केल्यावर तो काहीसा शांत झाला.

तो ऑफिसर सांगत होता, ‘आम्ही इथे अतिशय उच्च दर्जाची औषधे बनवत होतो. आम्ही मानवी आणि पशुवैद्यकीय अशा दोन्ही प्रकारच्या औषधांचे उत्पादन करत होतो. आमची कंपनी सुदानमधील एकमेव कंपनी होती, की जी टीबीसाठी लागणाऱ्या औषधांचे उत्पादन करत होती. सुदानमध्ये आमची उत्पादने प्रसिद्ध होती. टीबीव्यतिरिक्त इतर पण खूप औषधे होती. भविष्यातले आमचे प्लानसुद्धा तयार होते. पण काय करणार? अल्लाला बहुधा ते मंजूर नसावेत. त्या मनहूस दिवशी ही अशी परिस्थिती झाली आणि सर्व संपले. इथल्या बऱ्याच कामगारांना अजून नोकऱ्या मिळू शकलेल्या नाहीत. बॉम्बहल्ल्यात एक कामगार मृत्यू पावला. दहा ते बारा जण जखमी झाले. आमचे सर्वाचे भविष्य आज अंधारात आहे. फक्त अल्लामियाँला माहीत आहे- आमचे पुढे काय होणार!’

फॅक्टरीमध्ये तासभर चक्कर मारल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस अतिशय उत्तमरीत्या सजवले होते. ऑफिसमध्ये लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध होत्या. सुदानमध्ये जेवणाची वेळ साडेअकरा वाजता सुरू होते. आणि मग एक-दीडपर्यंत लोक परत येत नाहीत. मी शाकाहारी असल्याचे सांगताच मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. का, ते मला नंतरच्या चच्रेत उमगले. मग खास माझ्यासाठी शाकाहारी जेवणाची ऑर्डर देण्यात आली. माझे शाकाहारी आणि त्यांचे मांसाहारी जेवण होत असताना सर्वसाधारणपणे जे प्रश्न विचारले जावेत तेच त्यांनीही विचारले. जसे की, तुम्ही कधीच मांसाहार केला नाही का? किती टक्के भारतीय लोक शाकाहारी असतात? तुम्ही सर्व फक्त शाकाहार करून जगू कसे शकता? तुम्हाला शाकाहार करून सर्व जीवनसत्त्वे आणि प्रथिने कशी मिळतात? या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन आम्ही जेवण आटोपते घेतले.

आता मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराने आम्हाला मीटिंग रूममध्ये नेले. त्यानेच सुरुवात केली. म्हणाला, ‘मिस्टर गोखले, मी तुम्हाला आमची फॅक्टरी अशासाठी दाखवली, की आमच्या- म्हणजे माझ्या आणि तुमच्या कंपनीच्या एजंटच्या मनात एक अभिनव कल्पना आहे. बघा, तुम्हाला- म्हणजे तुमच्या कंपनीला ती पसंत आहे का! मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असतानाच तो म्हणाला, ‘आम्ही तुमच्या कंपनीच्या सहकार्याने सुदानमध्ये औषधाची अत्याधुनिक फॅक्टरी स्थापन करू इच्छितो. मला खात्री आहे की, आज सकाळी फॅक्टरीला भेट दिल्यानंतर आता त्यामागची कारणमीमांसा सांगण्याची गरज नाही. सुदान सरकारतर्फे तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. जसे तुम्ही सकाळी पाहिलेत- आमच्याकडे प्रशिक्षित, कुशल कामगार आहेतच. फॅक्टरी बांधण्यासाठी मोफत जागा, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा देण्यात येतील. या फॅक्टरीमध्ये साधारण तीनशेच्या आसपास माणसे काम करत होती. जर का नवीन फॅक्टरी झाली तर या सर्वाना परत काम मिळेल आणि त्यांची कुटुंबे पुन्हा स्थिरावतील. भारताकडे उत्तम तंत्रज्ञान आहे. पूर्वीची फॅक्टरी बांधताना आम्ही बऱ्याच गोष्टी भारतातून आयात केल्या होत्या. अगदी औषधे बनवण्यास जो कच्चा माल लागत असे, तो मागवतानासुद्धा आम्ही नेहमी इंडियन कंपनीला प्राधान्य देत होतो. कारण तुमची उत्पादने युरोपियन कंपनीच्या तोडीस तोड दर्जाची असतात. आणि शिवाय खूप स्वस्तही असतात. आम्ही तुमच्या कंपनीला लवकरच एक प्रस्ताव पाठवून देऊ. तुम्ही आता इथली परिस्थिती पाहिलीच आहे. आमचा प्रस्ताव मिळताच तुमच्या कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर पाठपुरावा करा आणि आम्हाला काहीतरी सकारात्मक उत्तर द्या.’

मंत्र्याच्या वैयक्तिक सल्लागाराने दिलेला प्रस्ताव खरे पाहता चांगलाच होता. परंतु परिस्थिती अशी होती, की मी त्यांना होकारात्मक वा नकारात्मक काहीच उत्तर देऊ शकत नव्हतो. त्यांना तसे अपेक्षितही नव्हते. मीटिंग छानच झाली. मला खूपच आनंद झाला. कारण एकतर आमच्या कंपनीकडे चांगला प्रस्ताव आपण होऊन आला होता. आणि दुसरे म्हणजे भारताबद्दल त्यांचे मत फारच चांगले होते. ते भारताकडे एक विश्वसनीय पुरवठादार म्हणून बघत होते.

मीटिंग संपली. नंतरची चर्चा फारच मजेशीर होती. पण खूप काही नवं शिकवणारीही होती. एजंट म्हणाला, ‘सुदानने आजपर्यंत चीनबरोबर बरेच करार केले आहेत. उदा. रस्ते व उड्डाणपूल बांधणे, तेलविहिरी खणणे, बंदर बांधणे, वगरे. तसेच काही करार भारताबरोबर पण केले आहेत. फरक आहे तो इंडियन आणि चिनी लोकांत!!’ ‘कसा काय?’ असा प्रश्न मी विचारणार तोच त्याने उतर दिले, ‘चिनी लोक आम्ही खातो तेच खातात. आम्ही राहतो तसे राहतात. (म्हणजे तंबू बांधून!) आमच्याबरोबरीने उन्हातान्हात रस्त्यावर, उड्डाणपुलावर किंवा बंदरात काम करतात. परंतु इंडियन माणूस साधारणपणे शाकाहारी असतो. जसे तुम्ही आहात! (जेवताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव का बघण्यासारखे झाले होते, ते मला आत्ता कळले.) किंवा मासांहारी असले तरी आमचे जेवण सहसा ते खात नाहीत. खाल्लेच तर फक्त आमच्या समाधानापुरतेच खातात.’ मी यावर काही बोलणार एव्हढय़ात तो पुढे विनोदाने म्हणाला, ‘आमचा प्रस्ताव जर का पास झाला, तर ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा.’ अशा प्रकारे मीटिंग हसतखेळत, पण खूप काही शिकवून गेली.

या अनुभवांतून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे भारतीय आणि सुदानी जनमानसात असलेला फरक. गेल्या काही वर्षांत जगभर जागतिकीकरण होत आहे. त्यानुसार भारतीय जीवनपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. अमेरिकन आणि युरोपियन संस्कृती भारतात फैलावते आहे. देव, देश, धर्म आणि भाषा या गोष्टींचा अभिमान कमी कमी होत चालला आहे. इथे धर्म म्हणजे ‘रिलिजन’ नव्हे. धर्म म्हणजे आपली जीवनशैली, आपल्या चालीरीती, अन्नसेवन करायच्या सवयी, वेशभूषा, लग्नसंस्था, शिक्षणप्रणाली, वगैरे..

याच्या उलट सुदानमध्ये अनुभवले. देव, देश, धर्म आणि भाषा या गोष्टींचा जाज्ज्वल्य अभिमान सुदानी लोकांत दिसून येतो. पिझ्झा, बर्गर आणि इतर फास्ट फूडचे फॅड असले तरी आपल्याकडे जितक्या वेगाने ते पसरते आहे, तितक्या वेगाने ते अजून इथे पसरलेले नाही. आपल्याकडे गावे सोडली तर सरसकट पॅंट-शर्ट हाच पेहराव दिसून येतो. सुदानमध्ये मात्र लोक खास सुदानी पेहरावास प्राधान्य देतात. सुदान इस्लामिक आणि ख्रिस्ती परंपरा असलेला आफ्रिकन देश आहे. धर्म, निसर्ग (हवामान परिस्थिती) आणि स्थानिक लोकांच्या समजुती यांचा सुदानी राष्ट्रीय व पारंपरिक वेशभूषेवर फार मोठा प्रभाव आहे. पुरुष सलसर, पण लांब (ज्याला आपण झगा म्हणू शकू.) अशा प्रकारचे पांढरे किंवा एखाद्या हलक्या रंगाचे- ज्याने पूर्ण शरीर झाकले जाईल असे वस्त्र (स्थानिक भाषेत त्याला ‘जलबिया’ म्हणतात.) घालतात. पायात शूज असतात. ‘जलबिया’ हा लांब स्लीव्हज् व कॉलरलेस झगा असतो. वाळूपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठीच हा खास पोशाख आहे. त्याची सल, समर्पक रचना त्वचेस श्वसन करण्यास मदत करते आणि घाम येणेही कमी होते. सुदानी वस्त्रं सुती धाग्यांनी बनलेली असतात. पगडी, फेटा किंवा गोल इस्लामिक टोपी आणि त्यावर अनुरूप अशा रंगाचा स्कार्फ पुरुष वापरतात. फेटा धार्मिक कारणांसाठी तसेच सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी घातला जातो.

उज्ज्वल भविष्य आणि आíथक भरभराटीसाठी अनेक भारतीयांनी शंभर वर्षांपूर्वीपासून विदेशाचा रस्ता धरला. गुजरातपासून केरळपर्यंतचे अनेक भारतीय गेल्या दीड-दोनशे वर्षांत आफ्रिका तसेच आखाती देशांत स्थलांतरित झाले आहेत. पण आज त्यांच्या वारसांना ओढ आहे ती भारतीय मातीची. त्याचाच हा एक हृदयस्पर्शी प्रत्यक्षानुभव..

उत्तर-पूर्व आफ्रिकेत वसलेला, आखाती संस्कृती जपणारा आणि या प्रदेशातील सर्वात मोठा, चार कोटी लोकवस्तीचा देश म्हणजे सुदान! पण इथल्या विस्तीर्ण वाळवंटात गरिबी आणि मागासलेपण हातात हात घालून नांदत होते. जगातील सर्वात लांब नदी नाईल ही सुदानमधून वाहते. राजधानी खार्टुममधून ही नदी दोन वेगवेगळ्या प्रवाहांत वाहते. तिच्या रंगावरून एका प्रवाहास ब्लू नाईल, तर दुसऱ्यास व्हाइट नाईल असे संबोधले जाते. खार्टुमच्या आजूबाजूच्या प्रदेशात या लोकांशी संवाद साधताना विश्वाच्या पसाऱ्यातली कोणतीच गोष्ट कार्यकारणभाव असल्याशिवाय घडत नाही, या विचाराशी मी सहमत झालो.

एकदा दुसऱ्या एका कामासाठी सुदानला गेलो होतो. इथे कामकाज लवकर सुरू होते आणि कचेऱ्या दुपारी तीन वाजता बंद होतात. त्यामुळे मला सकाळी आठ वाजताच एका मीटिंगला पोचायचे होते. डोक्याला पागोटे बांधलेले सुदानी पेहरावातले काही लोक त्या कचेरीबाहेर काम करत होते. त्यातला एकजण माझ्याकडे एकटक पाहत असल्याचे मला जाणवले. त्याची नजर आणि चेहऱ्यावरचे भाव मला काहीतरी सांगू पाहत होते असं मला वाटलं. मी पुन्हा सहज मागे वळून पाहिलं तर तो माझ्याकडेच बघत उभा होता. तेव्हाच मी मनातल्या मनात ठरवलं, की या माणसाला नंतर आपण भेटायचं.

दुपारी ३ वाजता मीटिंग आटोपून बाहेर पडलो तेव्हा बाकीची माणसे निघून गेली होती. सकाळचा तो माणूस मात्र तसाच ताटकळत उभा होता. जणू माझीच वाट बघत होता. मी गाडीपर्यंत पोचण्यापूर्वीच तो लगबगीने माझ्यासमोर उभा राहिला आणि त्याने हात जोडून मला नमस्कार केला. मला फार आश्चर्य वाटलं. मी पण प्रतिनमस्कार केला. त्याचा चेहरा उजळला आणि मोडक्यातोडक्या िहदीत तो म्हणाला, ‘आप िहदुस्थानी हो क्या?’ माझ्या होकारासरशी त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. उन्हात श्रमल्याने तो थकला होता. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, हे मला जाणवलं. मी त्याला घेऊन एका जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. तो पार संकोचून गेला होता. थोडे खाणेपिणे झाल्यावर तो जरासा सलावला आणि मोकळेपणे बोलू लागला.

मला अरेबिक येत नव्हते आणि त्याला इंग्लिश कळत नव्हते. मग थोडं िहदी, अर्धवट इंग्लिश आणि मोडकंतोडकं अरेबिकमध्ये असं आमचं संभाषण सुरू झालं. तो सांगू लागला, ७०-८० वर्षांपूर्वी त्याचे आई -वडील गुजरातमधून निघून आफ्रिकेमाग्रे सुदानला येऊन पोहोचले. उपजत हुशारी आणि कष्ट करायची तयारी असल्यामुळे वडिलांचा इथे चांगला जम बसला. त्याला दोन भाऊ होते. दोघांनी तिथल्या मुलींशीच लग्ने केली आणि ते सुदानी मुस्लीम झाले. तो मात्र तसाच राहिला. काही वर्षांपूर्वी आई-वडील दोघंही वारले. आता तो एकटाच राहत होता. भारतात त्याला ओळखणारं कोणीच नव्हतं. पण भारताविषयीचं अपरंपार प्रेम आणि उत्सुकता त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, हावभावावरून दिसत होती. तो दूरदर्शनवर भारताबद्दलच्या बातम्या बघत असे. तो म्हणाला, ‘मला भारतात परत यायचे आहे आणि तिकडेच मरायचे आहे.’ त्याचे नावही तेथील लोकांनी बदलून टाकले असले तरी तो स्वत:ला िहदूच समजत होता. तो म्हणाला की, तो कधीच मशिदीत जात नाही. मनोमन गोपाळकृष्णाला प्रार्थना करतो की, पुढच्या जन्मी िहदू म्हणून मी भारतात जन्माला यावे आणि तिथेच राहावे, एव्हढीच माझी इच्छा आहे. त्याने पटकन् माझा हात हातात घेतला आणि तो रडू लागला. मला काय करावे ते कळेना. मी त्याचा हात हातात घेतला आणि थोपटला. त्याला शक्य तेवढा धीर, दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला. त्याचे सांत्वन केले. या िहदू सुदानी बंधूची व्यथा माझं काळीज चिरून गेली. आणि मनात आलं की, काळ हे दु:खावरचे औषध नसून, आवरण असतं. मूळ दु:ख हृदयसंपुटात तसंच भळभळत राहतं.

मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. काही करावं अशी त्याची अपेक्षाही नव्हती. भरभरून बोलल्याने त्याच्या दु:खाचा किंचित निचरा झाला होता. त्याने मला खाण्याचे पसे देऊ दिले नाहीत. म्हणाला, ‘आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्याचा आपण पाहुणचार करावयाचा असतो. मी एव्हढेच देऊ शकतो. कृपया, मला पैसे देऊ देत.’ मीही त्याच्या शब्दाचा मान राखला. बाहेर आल्यावर मी खिशात हात घातला आणि हातात आल्या तेवढय़ा नोटा त्याला दिल्या. तो ‘नको’ म्हणाला तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘अरे मित्रा, भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने जात नाही. मला माहीत नव्हते की मला इथे सुदानमध्ये अचानक माझा मित्र भेटेल. तेव्हा ही तुझ्यासाठी एका भारतीय मित्राची छोटीशी भेट आहे असं समज.’ आणि पुनभ्रेटीचे वचन देऊन अतिशय दु:खद अंत:करणाने मी त्याचा निरोप घेतला.

आठ-दहा महिन्यांनी मला परत सुदानला जाण्याचा योग आला. खार्टुमला पोहोचताच मी सर्वप्रथम त्या मित्राची चौकशी केली. पण काही दिवसांपूर्वीच तो देवाघरी गेल्याची दु:खद बातमी मला कळली. माझे आणि त्या िहदू सुदानी मित्राचे कुठलेच संबंध नसूनही त्या केवळ वीस मिनिटांच्या भेटीमुळे त्याने आज माझ्या हृदयात कायमचे घर केले आहे, हे मात्र नक्की!!
मकरंद गोखले

First Published on March 8, 2017 1:17 am

Web Title: sudan