24 January 2021

News Flash

उझ्बेकिस्तान इतिहासाच्या पुस्तकातील रेशमी पान

उझ्बेकिस्तान हा मध्य आशियातील एक महत्त्वाचा देश.

उझ्बेकिस्तान

34-ls-diwali-2016-travel‘हे जग पुस्तकासारखं आहे. आणि जे प्रवास करत नाहीत, ते केवळ एकच पान वाचतात..’ असं युरोपियन तत्त्ववेत्ता ऑगस्टिन म्हणाला होता. खरोखरच या ‘जग’रूपी पुस्तकाची पानं पलटणं हा एक सुखद अनुभव असतो. अज्ञात ठिकाणाला भेट देताना मनात थोडीशी धाकधूक असते खरी; मात्र काहीतरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची आणि अंतिमत: आपलंसं करण्याची उत्सुकता त्या भीतीवर सहज मात करते. अशा उत्सुकतेपोटी घडलेला प्रवास हा नेहमीच आपल्याला समृद्ध करून जातो. माझ्या पीएच. डी.च्या अभ्यासाच्या निमित्ताने मला उझ्बेकिस्तान या अनोख्या देशाला भेट देण्याची संधी मिळाली. साधारण महिन्याभराच्या वास्तव्यात मी या देशातील अनेक ठिकाणं पाहिली. रेल्वे, बस व मेट्रोने. तर कधी चक्क पायी फिरले. अनेक लोकांशी संवाद साधला. या सगळ्यातून माझ्यापुढे उघडलं- एका अद्भुत संस्कृतीचं दालन!

उझ्बेकिस्तान हा मध्य आशियातील एक महत्त्वाचा देश. मध्यवर्ती आणि मोक्याचं स्थान लाभलेला हा देश ‘दुहेरी भूवेष्टित’ (डबली लँडलॉक्ड) (म्हणजे इतर पाच भूवेष्टित देशांनी वेढलेला.) आहे. या प्रदेशातील इतर देशांच्या- अर्थात ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझस्तान, कझाखस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा उझ्बेकिस्तानला लागून आहेत. विशेष म्हणजे भूवेष्टित असूनही या देशात सर्व प्रकारची भौगोलिक वैशिष्टय़े पाहायला मिळतात. पूर्वेकडचा डोंगराळ भाग, सिरदरिया आणि अमुदरिया नद्यांची सुपीक खोरी आणि पश्चिमेचे वाळवंट पाहिल्यावर या भौगोलिक विविधतेची कल्पना येते. हिवाळ्यात खूप थंड आणि उन्हाळ्यात खूप गरम असं हवामान असलेल्या या देशात जाण्यासाठी एप्रिल ते सप्टेंबर हा काळ सुखद असतो.

उझ्बेकिस्तानला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. चीन आणि युरोप यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग- अर्थात रेशीम मार्ग (सिल्क रोड) याच भागातून जात असे. रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, दागिने, उंची अत्तरं आणि तत्सम वस्तूंच्या देवाणघेवाणीबरोबरच आचार-विचारांचं आदानप्रदानही या प्रदेशाने खूप पाहिलं आहे. आजवर अनेक आक्रमणं, सत्तांतरं आणि मानवी स्थलांतरं अनुभवलेल्या या प्रांताने अनेक लोकांना, विचारांना आणि परंपरांना आपलंसं केलं. प्राचीन झोराष्ट्रियन धर्म, कनिष्काच्या काळात पसरलेला बौद्ध धर्म, कालांतराने इस्लाम आणि आधुनिक काळात सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली ‘निधर्मी’ राजवटही येथे प्रस्थापित झाली. या सगळ्यातून संपन्न होत गेली ही वैशिष्टय़पूर्ण संस्कृती आणि सभ्यता!

भारतीय इतिहासातदेखील उझ्बेकिस्तानचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळात बाहेरील जगाशी आपला संबंध मुख्यत: या प्रदेशातूनच आला. व्यापाराच्या माध्यमातून प्रस्थापित झालेलं आपलं नातं पुढे सांस्कृतिक धाग्यांनी विणलं गेलं. मध्ययुगात समरकंदच्या तिमूरने भारतावर आक्रमण केलं आणि पुढे त्याचा वंशज बाबर याने येथे मुघल राजवटीची स्थापना केली. मध्य आशियाई स्थापत्य आणि कलेने भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. १९ व्या शतकात हा संपूर्ण प्रदेश रशियन झारच्या अधिपत्याखाली आला आणि १९२४ पासून सोव्हिएत संघाचा भाग झाला. सोव्हिएत काळातदेखील भारताचे उझ्बेकिस्तानशी जवळचे संबंध होते. १९६६ चा ताश्कंद करार आणि त्यानंतर लगेचच झालेला पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचा दुर्दैवी मृत्यू आजही आपलं मन हेलावून जातो.

१९९१ साली उझ्बेकिस्तान सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला. यंदाच आपल्या स्वातंत्र्याची पंचविशी पूर्ण केलेला हा देश पर्यटनासाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे. स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य असलेला उझ्बेकिस्तान मुख्यत: ओळखला जातो तो येथील ऐतिहासिक ठेव्यामुळे. प्राचीन आणि मध्ययुगीन स्थापत्याचे अद्वितीय नमुने आजही येथे आपुलकीने जतन करून ठेवले आहेत. येथील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या खिवा, बुखारा, समरकंद आणि ताश्कंद या चार शहरांची सफर म्हणजे इतिहासप्रेमींसाठी मेजवानीच असते.

31-ls-diwali-2016-uzbekistan
खिवा आणि बुखारा : प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा

इतिहासाची आणि स्थापत्याची आवड असलेल्या प्रत्येकाने खिवा आणि बुखारा या शहरांना भेट द्यायलाच हवी. ही दोन शहरे म्हणजे प्राचीन उझ्बेकिस्तानचं मूर्तस्वरूप आहेत. २५०० वा वाढदिवस साजरा केलेल्या जगातील मोजक्या शहरांमध्ये या दोन शहरांचा अग्रक्रम लागतो. एवढे पावसाळे पाहूनही ही नगरं आजही अभेद्य उभी आहेत. कैक आक्रमणं झाली; शहरं बेचिराख करण्याचेही प्रयत्न झाले; प्रत्येक राज्यकर्त्यांने आपापल्या मर्जीनुसार नवीन वास्तू बांधल्या; जुन्या मोडल्या. मात्र, तरीही या शहरांचं प्राचीनत्व हरवलं नाही!

अमुदरिया नदीच्या काठी वसलेलं खिवा एकेकाळच्या वैभवशाली खोरेझम साम्राज्याची राजधानी होतं. २१ व्या शतकात राहून प्राचीन काळाचं दर्शन घडवणारं हे शहर म्हणजे खरोखरच एक ‘ओपन एअर’ म्युझियमच आहे. युनेस्कोने या संपूर्ण शहराला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’चा दर्जा दिला आहे. खिवा शहराचा विस्तार केवळ २६ हेक्टर एवढाच आहे. शहराला चहूबाजूंनी अभेद्य तटबंदी आहे. सुमारे दहा मीटर उंच असलेल्या या तटरक्षक भिंतीला ‘ईचन काला’ असं म्हणतात. या भिंतीच्या आतच पूर्ण शहर वसलेलं आहे. आतील रस्ते अरुंद असल्यामुळे गाडीने फिरता येत नाही. पायीच फिरावं लागतं. ‘ईचन काला’च्या पश्चिम दरवाज्याजवळ ‘कुन्या आर्क’ गढी आहे. येथे खोरेझमी राजांचं वास्तव्य असे. हा शहराचा सर्वात उंच भाग असून येथून संपूर्ण शहराचं अवलोकन करता येतं.

खिवामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. २१३ कोरीव खांबांवर उभारलेली जुम्मा मशीद, प्रचंड आकाराचा ‘कलता मिनार’, मध्य आशियातील सर्वात मोठा समजला जाणारा मुहम्मद अमीनखान मदरसा, निळ्या रंगाच्या भव्य घुमटाने युक्त असं पहिलवान मेहमूद याचं स्मारक.. सगळंच अवर्णनीय. या वास्तूंच्या आसपास स्थानिक लोकांनी चालवलेली कलाकुसरीच्या वस्तूंची अनेक दुकानं आहेत. हे लोक म्हणजे शहराच्या गतवैभवाचं दर्शन घडवणारे ‘गाईड’च आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर इतिहासाची पानं नकळत उलगडली जातात!

खिवा पाहून आपली गाडी बुखाराला वळवली की प्राचीन इतिहासाची सफर अधिकाधिक रंजक होत जाते. बुखारा हे प्राचीन रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचा थांबा होता. अगदी इसवी सनपूर्व काळापासून हे शहर भरभराटीला आलं होतं. येथे दळणवळण, व्यापार, आर्थिक उलाढाली तर होतच; पण वैचारिक देवाणघेवाणही होत असे. जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक येत. यात व्यापारी, सावकार, कुशल आणि अकुशल कारागीर, मूर्तिकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, विद्वान, धर्मप्रसारक आणि प्रवासी अशा सर्वाचाच सहभाग असे. या सर्वाच्या येण्याने हे शहर समृद्ध होत गेलं. प्राचीन काळी बुखारात भारतीय व्यापारी आणि सावकारांची वसाहत होती. त्यातील काही तेथेच स्थायिक झाले आणि पुढे तेथील संस्कृतीत मिसळून गेले. आजही बुखारातील लोक भारतीयांबद्दल आणि त्यांनी आणलेल्या आचार-विचारांबद्दल भरभरून बोलतात. त्याकाळच्या जागतिक व्यापारात भारताचं स्थान किती मोलाचं होतं, हे यावरून जाणवतं.

बुखारामधील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ‘सिटाडेल आर्क’- अर्थात भव्य तटबंदी असलेला किल्ला. हा नक्की कधी आणि कुणी बांधला याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी तो सुमारे २५०० ते ३००० वर्षे जुना आहे, यावर इतिहासकारांचं एकमत आहे. त्याच्यासमोरील प्रवेशद्वाराकडे पाहूनच किल्लय़ाच्या अभेद्यपणाची कल्पना येते. किल्लय़ाच्या आतमध्ये दरबार, राजा-राण्यांचे महाल, शस्त्रास्त्रांच्या कोठय़ा यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस राजाच्या बसण्याची जागा आहे. तिथे बसून राजा मुख्य दरवाज्यासमोरील मोकळ्या जागेत घडणारे कार्यक्रम पाहत असे. सिटाडेल आर्क पाहताना बुखाराच्या गतवैभवाची जाणीव होते.

येथील आणखी एक महत्त्वाचं स्थळ म्हणजे ‘कल्यान मिनार’, त्यासमोरची कल्यान मशीद आणि मीर-ए-अरब मदरसा. कल्यान मिनार ४५ मीटर उंच आहे आणि त्यावर निळ्या सिरॅमिकने नक्षीकाम केलेले आहे. हा मिनार १२ व्या शतकात बांधला. त्यामागील मुख्य हेतू दिशादर्शनाचा होता. दुरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना हा मिनार दिसताच बुखारा जवळ आल्याची खूण पटायची. कल्यान मिनारापुढील मशीद आणि मदरसा कालांतराने बांधले गेले. मात्र, तिन्ही वास्तूंचा एकत्रितपणे देखावा खूपच सुंदर दिसतो.

बुखारा हे संपूर्ण शहरच जणू एक प्रेक्षणीय स्थळ आहे. त्यामुळे शहरातून पायी फेरफटका मारणे हा एक अद्भुत अनुभव असतो. येथे पावला-पावलावर प्राचीन इमारती, बाजार, मशिदी, मदरसे, कारावान सराय (उंटांचे तांडे घेऊन निघालेल्या व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या धर्मशाळा), ट्रेडिंग डोम्स (व्यापार-उदिमासाठी बनवलेल्या खास जागा) पाहायला मिळतात. नवव्या शतकातील समानीद साम्राज्याची एकमेव ओळख असलेले समानीद स्मारक, आता काहीसा जीर्ण झालेला, मात्र तरीही सुंदर असा निळ्या रंगाच्या चार घुमटांनी बनलेला ‘चार मिनार’ (तिथे त्याला ‘चोर मिनार’ म्हणतात.), ‘ल्याबी हौज खास’- अर्थात छोटेखानी मानवनिर्मित तलाव आणि त्याभोवती असलेल्या निळ्या कोरीवकाम केलेल्या वास्तु, इस्लामातील नक्शबंदी पंथाचे उगमस्थान असलेल्या बहाउद्दीन नक्शबंद याचं स्मारक आणि मशीद, झोरास्ट्रियन धर्माची पाळेमुळे प्रतिबिंबित होणारी ‘मागोकी अटारी’ मशीद.. नावं सांगावीत तेवढी कमी ठरतील. बुखारा आपल्याला खरोखरच एका अजब विश्वाची सहल घडवतं यात शंकाच नाही.

32-ls-diwali-2016-uzbekistan
समरकंद : मध्ययुगाची अनोखी सफर

समरकंदला ‘पर्ल ऑफ द ईस्ट’ असं म्हणतात. हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचं आहे. खिवा आणि बुखाराप्रमाणेच समरकंददेखील प्राचीन रेशीम मार्गावरील महत्त्वाचा थांबा होतं. मात्र, दुर्दैवाने येथील प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा काळाने पुसून टाकल्या आहेत. आज समरकंद ओळखलं जातं ते मुख्यत: मध्ययुगीन इतिहासाचं प्रतीक म्हणून.

समरकंदचं इस्लामपूर्व नाव ‘अफ्रासियाब’ होतं. आधुनिक समरकंदच्या ईशान्येला वसलेलं अफ्रासियाब प्राचीन काळात व्यापारामुळे भरभराटीला आलेलं होतं. १३ व्या शतकात चेंगीझ खानच्या नेतृत्वाखाली मंगोल साम्राज्याने या प्रांतावर आक्रमण केलं आणि अफ्रासियाब अक्षरश: बेचिराख करून टाकलं. आज त्या ठिकाणी केवळ उजाड माळरान आहे. आधुनिक काळात केलेल्या उत्खननात जुन्या अफ्रासियाब शहराचे अनेक अवशेष सापडले. ते सर्व अवशेष आपल्याला अफ्रासियाब म्युझियममध्ये पाहायला मिळतात. या म्युझियममध्ये फेरफटका मारल्यावर जुन्या समरकंदचं ऐश्वर्य आपल्या लक्षात येतं. मूळ शहराची रचना, त्याभोवती उभारलेली भव्य तटबंदी, घरांच्या प्रतिकृती.. एवढंच नाही तर त्याकाळची भांडी, वस्तू, शस्त्रे, दागिने, भित्तिचित्रे.. सगळं येथे मांडून ठेवलंय. समरकंदची इस्लामपूर्व संस्कृती असूनही तिचं योग्य तऱ्हेनं जतन आधुनिक सरकारने केलंय, हे विशेष.

चेंगीझ खानच्या आक्रमणाचा विषय निघाला तर आजही इथले लोक हळवे होतात. क्रूर मंगोल साम्राज्याविरुद्ध या प्रदेशाला तिमूरने स्वतंत्र केलं. (ज्याचं वर्णन आपल्या इतिहासात ‘तैमूरलंग’ म्हणून आढळतं.) म्हणून उझ्बेकिस्तानच्या इतिहासात तिमूरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याला उझ्बेक इतिहासात राष्ट्रपुरुष मानलं जातं. तिमूरची राजधानी असलेल्या समरकंदमध्ये आजही त्याचं अस्तित्व जाणवतं. समरकंदमधील सर्वाधिक महत्त्वाची वास्तू म्हणजे ‘गुर-ए-अमीर’- अर्थात तिमूरची कबर. तिमूरचा नातू उलूगबेकने बांधलेल्या या वास्तूत तिमूर आणि त्याच्या वंशजांचे अवशेष पुरलेले आहेत. निळ्या सिरॅमिकच्या टाइल्सनी केलेलं अप्रतिम नक्षीकाम हे ‘गुर-ए-अमीर’चं वैशिष्टय़. त्यावरील निळा घुमट तर केवळ लाजवाब आहे. घुमटाच्या आतील बाजूने- म्हणजेच कबरीच्या वर छतावर संपूर्ण सोन्याचं नक्षीकाम आहे. तेदेखील तितकंच अप्रतिम.

समरकंदमध्ये पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं ठिकाण म्हणजे ‘रेगिस्तान’! या ठिकाणी उझ्बेकिस्तानच्या मध्ययुगीन ऐश्वर्याचं मनमुराद दर्शन होतं. रेगिस्तान स्क्वेअर म्हणजे तीन बाजूंनी तीन भव्य इमारती आणि मधे असलेली मोकळी जागा. या तिन्ही भव्य इमारती म्हणजे एकेकाळचे गजबजलेले मदरसे होते. त्यांच्या आतील बाजूस शिकवण्याचे वर्ग, विद्यार्थी वसतिगृहाच्या खोल्या अशी रचना आढळते. मधल्या प्रचंड चौकात पूर्वी राजेशाही कार्यक्रम होत असं इतिहासकारांचं मत आहे. रेगिस्तानचं वैशिष्टय़ म्हणजे इमारतींच्या प्रवेशद्वारांवर केलेलं कोरीवकाम. येथील दरवाजे, घुमट, मिनार सर्वच सुरेख. निळ्या सिरॅमिकचा विपुल वापर आणि त्यातून साकारलेली अद्वितीय कलाकृती पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. रेगिस्तानच्या समोरील बाजूस उभं राहून तिन्ही इमारती आणि मधल्या चौकाचा ‘पॅनोरॅमिक व्ह्य़ू’ मिळतो. त्याचं सौंदर्य तर अवर्णनीयच.

निळ्या सिरॅमिकच्या कोरीवकामातून साकारलेल्या वास्तु आणि बारीक रेखीव कारागिरी केलेले निळे घुमट ही समरकंदच्या इस्लामिक स्थापत्यशैलीची वैशिष्टय़े आहेत. सगळ्याच वास्तु तशाच धाटणीच्या आहेत. तरीही कुठेही तोच-तोचपणा वाटत नाही. पर्यटकांना प्रत्येक स्थळी काहीतरी नवीन, वैशिष्टय़पूर्ण सापडतं. तिमूरने बायकोच्या नावे बांधलेली ‘बीबी-खानुम’ मशीद आणि ‘शाह जिंदा’ (अर्थात सगळ्या राज्यकर्त्यांच्या ओळीने कबरी असलेला बोळ.. जिथे प्रत्येक कबरीच्या वर वेगळा चौथरा बांधला आहे. प्रत्येक कबरीचे नक्षीकाम वेगळे आहे.) ही दोन ठिकाणं सुंदर आहेत. तिमूरचा नातू उलूगबेक स्वत: शास्त्रज्ञ आणि खगोलतज्ज्ञ असल्यामुळे त्याने बांधलेली ऑब्झव्‍‌र्हेटरीदेखील प्रेक्षणीय आहे. त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी ती उद्ध्वस्त केल्यामुळे आता केवळ एक आर्क शिल्लक आहे. मात्र, स्वतंत्र उझ्बेक सरकारने या वास्तुचं चांगलं पुनरुज्जीवन केलं आहे. एकूणच समरकंदच्या सांस्कृतिक जीवनावर आजही तिमूर आणि उलूगबेकचा खूप प्रभाव जाणवतो. १५ व्या शतकात होऊन गेलेल्या या राजांनी घडवलेलं हे समृद्ध शहर मनात कायमचं घर करून राहतं.

ताश्कंद : इतिहास आणि आधुनिकतेचा सुरेल संगम

ताश्कंद म्हणजे आधुनिक उझ्बेकिस्तानच्या राजधानीचं शहर. सर्वार्थाने सुंदर असलेलं हे शहर म्हणजे उझ्बेकिस्तानचा प्राचीन इतिहास, सोव्हिएत भूतकाळ आणि स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळ यांचा सुरेल संगम आहे. अनेक संस्कृतींचं मिश्रण असलेलं ताश्कंद पर्यटनप्रेमींसाठी बहुआयामी अनुभव आहे. याच शहरामार्फत विदेशी पर्यटकांची उझ्बेकिस्तानशी तोंडओळख होते. प्रवेश केल्यापासून हे शहर आपल्याला वेड लावतं. समांतर, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, भव्य चौक आणि रस्त्याच्या दुतर्फा भरपूर झाडी पाहून मन लुब्ध होतं.

भारतातील दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांप्रमाणेच ताश्कंदचेदेखील जुने ताश्कंद आणि नवीन ताश्कंद असे दोन भाग केले आहेत. त्यापैकी जुनं ताश्कंद इतिहासाचं, तर नवीन ताश्कंद आधुनिक काळाचं प्रतीक म्हणता येईल. जुन्या ताश्कंदमध्ये इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभाव अधिक आहे. निळ्या सिरॅमिकचं कोरीवकाम केलेले भव्य मिनार, मशिदी, मदरसे येथे अनेक आढळतात. त्यापैकी ‘हजरती इमाम’ मशिदीचा परिसर सर्वाधिक प्रेक्षणीय आहे.

जुन्या ताश्कंदची शान असलेला ‘चोरसू बाजार’ हा शतकानुशतकं भरत आलेला बाजार आहे. रेशीम मार्गावरून ये-जा करणारे व्यापारी या बाजारात आपल्या वस्तू विकत असत, असं येथील विक्रेते अभिमानाने सांगतात. निळ्या रंगाचा प्रचंड डोम हे चोरसू बाजाराचं वैशिष्टय़. त्यामुळे हा बाजार दुरूनही ओळखू येतो. येथे अगदी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस यांपासून ते कपडे, दागिने, पेंटिंग्ज, कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिकच्या कप-बश्या, किटल्या, प्लेट्स इत्यादीपर्यंत सगळं मिळतं. त्यामुळे आपल्या ताश्कंद सफरीतील एक दिवस चोरसू बाजारातील खरेदीसाठी राखून ठेवावा.

जुन्या ताश्कंदचा अनुभव घ्यायचा असेल तर पायी फेरफटका मारावा. ओळीने असलेली जुन्या पद्धतीची मोठी चौसोपी घरं, मातीने सारवलेल्या भिंती, सोप्यात झोपाळे, अंगणात फुलझाडं हे वातावरण अगदी हृद्य वाटतं. यापलीकडे जाऊन प्रेमळ आदरातिथ्य करणारी माणसं पाहिली की मन हेलावून जातं. ओळख नसताना कुठल्याही घराचा दरवाजा ठोठावला तरी तो हसतमुखाने उघडला जातो. आतील कर्ती व्यक्ती ‘या-बसा’ म्हणते. संपूर्ण घर फिरून दाखवते. विचारपूस करते. उझ्बेक आदरातिथ्याचं परमोच्च प्रतीक म्हणजे ‘ग्रीन टी’ पिण्याचा आग्रह! तो जेव्हा होतो, तेव्हा ‘अतिथी देवो भव’चा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो. एकूणच उझ्बेक जनतेच्या आदरातिथ्याचा जवाब नहीं!

पर्यटकांना जुन्या आणि नवीन ताश्कंदमधील फरक चटकन् लक्षात येतो. नव्या ताश्कंदचा तोराच वेगळा. इथे आपल्याला मुख्यत्वेकरून दिमाखदार भव्य चौक, हिरव्यागार बागा आणि कारंजी, सोव्हिएत पद्धतीच्या इमारती पाहायला मिळतात. एकूणच या भागावर आधुनिकतेची छाप आहे. ताश्कंदमधील ‘इंडिपेन्डन्स स्क्वेअर’ म्हणजे प्रवाशांसाठी खास आकर्षण असतं. हे भव्य स्मारक म्हणजे स्वतंत्र उझ्बेकिस्तानचं मूर्त प्रतीक आहे. सोनेरी रंगाचा मोठ्ठा पृथ्वीचा गोल आणि त्यावर कोरलेला उझ्बेकिस्तानचा नकाशा दुरूनच लक्ष वेधून घेतो. त्याच्या पुढय़ात तान्हुल्याला मांडीवर घेऊन बसलेल्या आईचा पुतळा आहे. ही आई म्हणजेच त्यांची मातृभूमी आहे असा उझ्बेक लोकांचा समज आहे. उझ्बेक जनमानसात मातृभूमीला फार महत्त्व आहे. या मुख्य स्मारकाभोवती सुंदर बाग आणि कारंजी आहेत. चारही बाजूंनी स्टार्क पक्ष्याच्या १६ प्रतिकृती लावल्या आहेत. हा पक्षी शांततेचं प्रतीक आहे. इंडिपेन्डन्स स्क्वेअरपासून जवळच ‘क्राइंग मदर’ अर्थात साश्रुनयनांनी बसलेल्या आईचं स्मारक आहे. तिचा मुलगा देशरक्षणासाठी कामी आला, म्हणून तिला दु:खही आहे आणि सार्थ अभिमानही आहे. जन्मदात्या आईपेक्षाही मातृभूमीचं ऋण मोठं आहे असा संदेश या स्मारकातून दिला आहे. या स्मारकापाशी अखंड ज्योत तेवत असते.

ताश्कंद शहराच्या मध्यभागी ‘अमीर तिमूर स्क्वेअर’ नावाचा अजून एक मोठा चौक आहे. हा चौकदेखील इंडिपेन्डन्स स्क्वेअरप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर काळात बांधला गेला. उझ्बेक इतिहासात राष्ट्रपुरुष मानल्या गेलेल्या तिमूरचं स्वतंत्र उझ्बेक सरकारने उदात्तीकरण केलेलं जाणवतं. देशाची संस्कृती, भाषा, कला आणि एकूणच समाजजीवनात त्याला पुनरुज्जीवित केलं आहे. देशात सर्वत्र त्याची स्मारकं, पुतळे आणि प्रतिमा आढळतात. परंतु ‘अमीर तिमूर स्क्वेअर’मध्ये असलेला तिमूरचा भव्य अश्वारूढ पुतळा केवळ देदीप्यमान आहे.

ताश्कंद हे शहर विशेषत: म्युझियम्ससाठी प्रसिद्ध आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘तिमुरीद म्युझियम’मध्ये तिमूर आणि त्याचे वंशज यांची माहिती, वंशावळी, फोटो, तिमुरीद साम्राज्याचे नकाशे, चित्र, तसेच त्याकाळच्या स्थापत्यशैलीची वैशिष्टय़े इत्यादींची मांडणी केलेली आहे. विशेषत: तिमूरचा वंशज असलेला बाबर, त्याने भारतात स्थापन केलेले मुघल साम्राज्य, त्याची वंशावळ याची माहिती आणि त्याचबरोबर ताजमहालाचीही प्रतिकृती येथे आहे. उझ्बेक लोकांना मुघल साम्राज्याविषयी फार आत्मीयता आहे. एका उझ्बेक राजवटीने भारतावर तीन शतकं राज्य केलं, ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, या अभिमानात कुठलाही दंभ जाणवत नाही. स्वातंत्र्यानंतर बांधलं गेलेलं तिमुरीद म्युझियम खूपच छान आहे. याशिवाय ‘नॅशनल म्युझियम’मध्ये देशाचा अश्मयुगापासूनचा इतिहास उलगडून दाखवला आहे. हजारो वर्षांची संस्कृती, परकीय आक्रमणं, विविध राजवटींचा इतिहास, रशियन साम्राज्य आणि सोव्हिएत काळातला इतिहास उत्तमरीत्या येथे मांडलेला आहे. उझ्बेकिस्तानचा संपूर्ण इतिहास समजून घ्यायचा असेल तर या म्युझियमला भेट देणं अत्यावश्यक आहे. ‘नॅशनल म्युझियम ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये कलाकुसरीच्या वस्तू, सिरॅमिकची भांडी, बाहुल्या, तसेच पारंपरिक पोशाख ठेवले आहेत. कलाप्रेमींनी हे म्युझियम नक्कीच पाहावं.

२१ व्या शतकात बांधण्यात आलेलं ‘मेमरी ऑफ रिप्रेशन’ स्मारक आणि म्युझियम हेदेखील स्वातंत्र्योत्तर उझ्बेकिस्तानच्या राष्ट्रीय अस्मितेचा अप्रतिम नमुना आहे. रशियन राज्यकर्त्यांनी उझ्बेक जनतेवर अनन्वित अत्याचार केले. झारच्या आक्रमणांपासून स्टॅलिनच्या छळवणुकीपर्यंत अगणित कटू अनुभवांचा हा देश साक्षी आहे. त्या आठवणींना वाचा फोडण्यासाठी आणि नवीन पिढीला त्याची ओळख करून देण्यासाठी ‘मेमरी ऑफ रिप्रेशन’ स्मारक आणि म्युझियम बांधण्यात आलं. अंखोर नदीच्या काठी अतिशय रम्य ठिकाणी निळ्या रंगाचा मोठा डोम आणि पांढऱ्या पिलर्सपासून बनवलेलं हे स्मारक उभं आहे. सभोवती फुलबाग आहे. आणि स्मारकाच्या मागून नदीने खेळकर वळणं घेतली आहेत.

ताश्कंदमधील अंखोर नदीच्या काठाने पायी फिरणे हा एक सुखद अनुभव असतो. सरकारच्या पुढाकाराने २०१४ मध्ये बांधली गेलेली मिनोर मशीद याच नदीच्या काठी आहे. मध्ययुगीन उझ्बेक स्थापत्यशैलीचा वापर करून ही मशीद बांधली असली तरीही तिला आधुनिकतेचा साज आहे. भोवतालचा नदीकाठचा आल्हाददायक परिसर या इमारतीची शोभा वाढवतो. नदीच्या दोन्ही बाजूंनी गर्द हिरवाई आहे. मशीद पाहून नदीकाठाने पायी निघाल्यास अनेक प्रेक्षणीय स्थळं वाटेत पाहायला मिळतात. प्रचंड, तरीही सुंदर असा ताश्कंद टॉवर, गोल्फ क्लब, वॉटर पार्क, जपानी बाग, इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ उझ्बेकिस्तानची उंच काचेची बिल्डिंग.. एक ना अनेक. नव्या ताश्कंदचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल तर हा फेरफटका मारण्याशिवाय पर्यायच नाही.

ताश्कंद शहराचं अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे येथील मोठमोठय़ा बागा. संपूर्ण शहरात अनेक बागा आहेत. पण सगळ्यांची महाराणी म्हणजे ‘अलिशर नवई नॅशनल पार्क’! अलिशर नवई म्हणजे १५ व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध कवी आणि भाषातज्ज्ञ. त्याला उझ्बेक भाषेचा जनक मानलं जातं. त्याच्या नावाची अनेक ठिकाणं उझ्बेकिस्तानात आहेत. शहराच्या मध्यभागी असलेली अलिशर नवई बाग म्हणजे पर्यटकांसाठी रेलचेलच आहे. बागेत गर्द झाडी तर आहेच; शिवाय मध्यभागी एक मोठं तळं आहे- ज्यात बोटिंग चालतं. बागेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी तसेच प्रदर्शनंही सतत सुरू असतात. निसर्गाच्या सान्निध्यातील हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

ताश्कंदमध्ये भारतीयांनी आवर्जून भेट द्यावं असं ठिकाण म्हणजे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक. शहराच्या केंद्रस्थानी एका चौकात शास्त्रींचा अर्धपुतळा बसवला आहे. भोवताली छोटी बाग आहे. त्या रस्त्याला शास्त्रींचं नाव दिलं आहे. आजही हा देश आपल्या माजी पंतप्रधानांना विसरलेला नाही, या जाणिवेने कृतज्ञता वाटते. ताश्कंदमधला भारतीय दूतावासदेखील प्रेक्षणीय आहे. अत्यंत रम्य परिसरात असलेल्या या एम्बसीमध्ये भारताचा व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या उझ्बेक नागरिकांची गर्दी असते. उझ्बेक लोकांना भारताविषयी प्रचंड प्रेम, आपुलकी आहे. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, पोशाख, योग याचं त्यांना खूप आकर्षण आहे. बॉलीवूडचे चित्रपटसुद्धा इथे फार लोकप्रिय आहेत. राज कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि शाहरुख खानचे फॅन आपल्याला जागोजागी भेटतात. त्यामुळे भारतातून आलेल्या पाहुण्यांचं या देशात विशेष स्वागत होतं.

ताश्कंदमधील वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. बस आणि टॅक्सी दोन्ही सोयीचं असलं तरी शहराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे येथील मेट्रो. सोव्हिएत काळात ७० च्या दशकात या मेट्रोची सुरुवात झाली. मात्र, तिचा एक रूट उझ्बेकी स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आला. शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मेट्रोचा वापर करता येतो. मेट्रो स्टेशन्स म्हणजे अक्षरश: म्युझियम्स वाटावीत इतकी सुंदर बांधली आहेत. संगमरवरी खांब, त्यावर सुरेख कोरीवकाम, कमानी, सिरॅमिकचे वा काचेचे नक्षीकाम, मोठमोठी झुंबरं यांनी स्टेशन्स सजवलेली आहेत. प्रत्येक मेट्रो स्टेशनचं सौंदर्य वेगळं आहे. ९० च्या दशकात बांधलेली नवीन स्टेशन्सही जुन्याच्या तोडीस तोड बनवली आहेत. त्यामुळे ताश्कंद मेट्रोकडे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही पाहण्यास हरकत नाही. मेट्रोतून फिरलेलं, अनुभवलेलं ताश्कंद दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतं.

आशिया खंडाच्या आणि जगाच्या इतिहासाचं रेशमी पान वाचण्यासाठी उझ्बेकिस्तानला आवर्जून भेट द्यावी. आपल्याला एका अद्भुत विश्वाचं दर्शन घडेल यात शंका नाही. खिवा, बुखारा, समरकंद आणि ताश्कंद असा संपूर्ण उझ्बेकिस्तानचा दौरा हा एक परिपूर्ण अनुभव आहे.
रश्मिनी कोपरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:16 am

Web Title: uzbekistan
Next Stories
1 कंबोडिया दिव्य अप्सरांच्या कम्बुजदेशात…
2 एक सदारंग ‘खयाल’
3 सर्जनचिंतन आत आणि बाहेर
Just Now!
X