24 January 2021

News Flash

पंतप्रधान ते अध्यक्ष व्हाया…

रशियातील पुतिनयुगाचा वेध घेणारा लेख...

व्लादिमीर पुतिन

विसाव्या शतकात बलाढय़ अमेरिकेला शह देणाऱ्या सोव्हिएत रशियाचं १९९१ मध्ये विघटन झालं आणि नंतर दशकभरातच ‘एक होती महासत्ता..’ असं म्हणण्याची वेळ आली. एकविसाव्या शतकात पाऊल ठेवताना अध्यक्ष येल्तसिन यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याकडे रशियाची सूत्रे सोपवली आणि सुरू झालं- पुतिनयुग! याच काळात रशिया पुन्हा जागतिक पटावर दमदारपणे उभा राहू लागला. केजीबीचे एक दुय्यम दर्जाचे अधिकारी ते अध्यक्ष अशा पुतिन यांच्या गेल्या दोन दशकांतल्या प्रवासाची कहाणी अत्यंत नाटय़मय आणि उत्कंठावर्धक आहे. त्याच बरोबर एका हुकूमशाही राजवटीचा खरा चेहरा उघड करणारीही आहे. रशियातील या पुतिनयुगाचा वेध घेणारा लेख..

अध्यक्ष येल्तसिन यांनी स्टेपशिन यांना पंतप्रधानपदावरनं बडतर्फ केलं आणि त्या जागी व्लादिमीर पुतिन यांची नेमणूक केली. पण ही घटना पुतिन यांच्या नेमणुकीपुरतीच नव्हती. म्हणजे येल्तसिन यांनी पुतिन यांची नेमणूक करताना ते आपले उत्तराधिकारी असतील, असंही जाहीर करून टाकलं. नंतर खासगीत बोलताना येल्तसिन यांनी याची कबुली दिली. ते म्हणाले..

‘‘पुतिन यांना पदात सुरुवातीला रस नव्हता. याचा अर्थ त्यांना हे पद नको होतं असं नाही. तर या पदापासून पुढच्या प्रवासासाठी त्यांना आता निवडणुकांना सामोरं जावं लागणार होतं आणि पुतिन यांना निवडणूक हा प्रकारच आवडत नव्हता. ते दुस्वास करायचे या पद्धतीचा. मला निवडणुकीचा तिटकारा आहे. मला मतं द्या, असं मला लोकांना सांगताच येत नाही.. अशा शब्दांत पुतिन यांनी आपला निवडणूकविरोध दर्शवला होता.’’

खरं तर यावरनं त्यांच्या मनोभूमिकेचा अंदाज येल्तसिन आणि मंडळींना यायला हवा होता. पण तो आला नाही. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर १६ ऑगस्ट १९९९ ला त्यांनी पहिल्यांदा डय़ुमात भाषण केलं. शीर्षस्थ पदांचा मान कायम राखणं आणि त्यांची अधिकारकक्षा मजबूत करणं याला माझं प्राधान्य राहील, हे पुतिन यांचं विधान त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा दाखवणारं होतं. पण तरीही पुतिन नक्की कोणत्या दिशेनं जाणार आहेत, हे काही कोणाला समजलं नाही.

लवकरच पुतिन यांच्या पंतप्रधानपदावरच्या नेमणुकीस डय़ुमानं मान्यता दिली खरी; पण किमान आवश्यक २२६ इतक्या मतांपेक्षा फक्त सात मतं त्यांना अधिक मिळाली. याचा अर्थ पुतिन यांना हवा तितका पािठबा नव्हता. हे अर्थातच पहिल्यांदा हेरलं प्रिमाकोव्ह यांनी. मॉस्कोचे महापौर युरीय लुझकोव्ह यांनाही याचा अंदाज आला. या दोघांनी मिळून ठरवलं : पुतिन यांच्या विरोधात समस्त राजकीय ताकद एकवटायची आणि अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांना आव्हान द्यायचं. या दोघांनाही आपण यशस्वी होऊ याची खात्री होती, कारण जनमत त्यांच्या बाजूनं होतं. लोकप्रियता चाचण्यांत प्रिमाकोव्ह अजूनही कितीतरी आघाडीवर होते. त्यांची लोकप्रियता हे पुतिन यांच्यासाठी मोठं आव्हान होतं.

याचं कारण- पुतिन कोण, काय, कुठले, हे जनतेला काही माहीत नव्हतं. एफएसबी या गुप्तहेर यंत्रणेचं प्रमुखपद पुतिन यांच्याकडे होतं खरं; पण त्या पदाचा जनतेशी काही संबंध नव्हता. त्यामुळे जनमानसात पुतिन यांची काही प्रतिमा नव्हती. तेव्हा काही महिन्यांवर आलेल्या डय़ुमाच्या निवडणुकांत पुतिन यांना विजयी करायचं असेल तर मुळात त्यांची काही प्रतिमा तयार करणं गरजेचं होतं. ही गरज खुद्द पुतिन यांच्यासाठी जशी आणि जितकी होती, तेवढीच ती येल्तसिन आणि कुटुंबीयांसाठीही होती. कारण पुतिन जर हरले तर येल्तसिन कुटुंबीयांचं काय होणार, हा खरा प्रश्न होता. त्यामुळे मग या सर्वानी ग्लेब पावलोव्हस्की या जनसंपर्क तज्ज्ञाची मदत घ्यायचं ठरवलं. दिमतीला बेरेझोव्हस्की आणि त्यांची खासगी वृत्तवाहिनी होतीच. सगळ्यांनी ठरवलं, पुतिन यांच्यासाठी प्रचाराचा असा काही धडाका लावायचा, की प्रिमाकोव्ह आणि मंडळी पालापाचोळ्यासारखी उडून जायला हवीत. ही प्रतिमानिर्मिती आणि मग तिच्या संवर्धनासाठी तितकंच काहीतरी महत्त्वाचं साधन हाती असायला हवं होतं. नसेल, तर ते तयार करायला हवं होतं.

त्यांनी ते केलं.. चेचन्या.

जातीय, धार्मिक दंगली या राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी अनेकांना किती उपयुक्त असतात, हे आपल्याला माहीत आहेच. आता ते रशियनांनाही ठाऊक होणार होतं. ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवायचे आणि त्यासाठी चेचेन बंडखोरांना जबाबदार धरायचं-असा तो कट. खरी मेख आहे- हा कटाचा तपशील बाहेर आलाच कसा, ही.

त्याचं श्रेय जातं स्पेनच्या गुप्तहेर यंत्रणेला. पुतिन पंतप्रधानपदी नेमले जायच्या आधी, जात असताना आणि नंतर ते आणि बेरिझोव्हस्की यांच्यात पाच गुप्त बठका झाल्या. ठिकाण होतं- स्पेनच्या दक्षिणेकडच्या कादिझ प्रांतातल्या सॅन रॉक गावातलं सोतोग्रांद हा हॉलिडे रिसॉर्ट. ही जागा या दोघांनी का निवडली? कारण या ठिकाणी बेरिझोव्हस्की यांच्या मालकीची एक आलिशान व्हिला होती. तिथं घडलेल्या या गुप्त चर्चा स्पेन हेरखात्याकडून नोंदल्या जात होत्या. खरं तर स्पॅनिश गुप्तहेर यंत्रणेला पुतिन यांच्यात काही रस नव्हता. त्यांची नजर होती एका रशियन माफियावर. तो बेरिझोव्हस्की यांच्या लगतच्या व्हिलात राहत होता. तेव्हा त्याच्यावर हेरगिरी करायला म्हणून स्पॅनिश गुप्तहेरांनी सगळी आवश्यक ती उपकरणं तिथं लावून ठेवली होती. पण त्यात सापडले पुतिन. कारण झालं असं की, या रशियन माफियाला स्पॅनिश गुप्तहेर यंत्रणेनं टिपलं ते थेट पुतिन यांच्याशीच गप्पा मारताना. गुप्तहेरांनी ही बाब आपल्या अधिकाऱ्यांना कळवली. आणि अधिकाऱ्यांनी सरकारला. त्यानंतर एकदम धोक्याची घंटा सरकारी पातळीवर घणघणू लागली. याचं कारण हा माफिया कोणाच्या संपर्कात आहे, हे स्पेन सरकारला कळलं. आणि तो ज्यांच्या संपर्कात आहे ते कोण आहेत, हे गुप्तहेरांना कळलं. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे पुतिन हे राजमार्गानं स्पेनमध्ये आले नव्हते. म्हणजे त्यांच्या आगमनाची नोंद कुठेच झालेली नव्हती. तर ते आले होते जिब्राल्टरमाग्रे. हे बेट आहे ब्रिटिशांच्या ताब्यात. तिथल्या हवाई दलाच्या तळावर ते उतरले आणि ब्रिटिश गुप्तहेरांनी बोटीतनं त्यांना स्पेनमध्ये आणून पोहोचवलं. इतका मोठा आंतरराष्ट्रीय कट होता तर! हे सगळं मग ‘ला राझों’ या स्पॅनिश वर्तमानपत्रानं छापलं आणि मग एकच बभ्रा झाला. पुढे लंडनच्या ‘द टाइम्स’ या बडय़ा वर्तमानपत्रानंही याचा पाठपुरावा केला.

बातमी खरी होती. या सगळ्या कट-कारस्थानांच्या केंद्रस्थानी होता एक मुद्दा. येल्तसिन यांचा उत्तराधिकारी म्हणून पुतिन यांना कसं पुढे आणायचं, ते अध्यक्षपदी निवडून यावेत यासाठी काय काय आणि कसं कसं करायचं, आणि मुख्य म्हणजे यात कोणा-कोणाला सहभागी करून घ्यायचं, हा. यात एक जाणवलं : ते म्हणजे- पुतिन यांच्याशी जोडला जाईल, पुतिन ज्यामुळे ओळखले जातील असा राजकीय पक्षच नाही. पुतिन यांच्यासाठी असा पक्ष असायला हवा- ही गरज पहिल्यांदा ओळखली बेरेझोव्हस्की यांनी. त्यांनी या कामात पण चेचन्यामधला आपला एक परिचित व्लादिस्लाव सुकॉव्ह याला दिमतीला घेतलं. सुकॉव्ह विख्यात उद्योगपती मिखाईल खोदोर्कोव्हस्की यांच्यासाठी प्रसिद्धी प्रतिमा प्रमुख म्हणून काम करत होता. खोदोर्कोव्हस्की हे नाव खूप महत्त्वाचं. पुतिन यांच्यासाठी तर त्याचं महत्त्व अधिकच. सुकॉव्ह यांना पुतिन यांच्यासाठी पाचारण केलं गेलं. त्यांनी तीन महिन्यांत नवा पक्ष जन्माला घातला- युनिटी. पुतिन यांच्यासाठी आधी घेतला गेलेला माध्यमतज्ज्ञ पावलोव्हस्की, सुकॉव्ह आणि खासगी वृत्तवाहिनीचे मालक बेरेझोव्हस्की या तिघांनी मिळून पुढचे चार महिने अक्षरश: धुमाकूळ घातला. चेचेन बंडखोराच्या कथित कारवाया हे त्याचं फलित होतं. ३१ ऑगस्टपास्नं या प्रसिद्धी तंत्राला लागलेली फळं दिसायला लागली. त्या दिवशी मॉस्कोत क्रेमलिनपासून अगदी जवळ पहिला दहशतवादी बाँबस्फोट झाला. मग ४ सप्टेंबरला दाजेस्तानात. ९ सप्टेंबरला मॉस्को. १३ सप्टेंबर- मॉस्को हायवे. १६ सप्टेंबर- व्हाल्गोदोंस्क. याखेरीज मॉस्कोत आणखी तीन ठिकाणी जिवंत बाँब सापडले. ते वेळीच निकामी केले गेल्याने पुढचा अनर्थ टळला. या सगळ्या काळात पुतिन धीरोदात्तपणे परिस्थिती हाताळत होते. चेचेन बंडखोरांना या दहशतवादी कृत्यांसाठी जबाबदार धरत होते. पुतिन यांचे माध्यम सल्लागार जनतेत चेचेन बंडखोरांविरोधात जास्तीत जास्त नाराजी कशी पसरेल याची व्यवस्था करण्यात मग्न होते.

याचा परिणाम लगेच दिसून आला. ९ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर तळाशी असलेला पुतिन यांच्या लोकप्रियतेचा निर्देशांक झडझडून जिवंत झाला आणि बघता बघता वर जाऊ लागला. पुतिन यांची लोकप्रियता अचानक वाऱ्याच्या वेगानं वाढू लागली. त्यासाठी एकूण ३०१ जणांचा बळी गेला. पण ते ठीक आहे. देशाच्या व्यापक हितासाठी नाही तरी सामान्यांना मरावंच लागतं. तसे ते मरत असल्यानं पुतिन यांच्यासमोरचं राजकीय आव्हान विरघळत गेलं. पुतिन यांची लोकप्रियता इतकी वाढली, की २३ सप्टेंबरला रशियातल्या २४ प्रांतांच्या गव्हर्नर्सनी अध्यक्ष येल्तसिन यांना आवाहन केलं, की तुम्ही आता अध्यक्षपदाची सूत्रंही पुतिन यांच्याच हाती द्या. तेच आता देशाला स्थिर नेतृत्व देतील, असं या गव्हर्नरांचं म्हणणं होतं. अर्थात यामागेही पुतिन यांचाच हात होता. पण हे जनसामान्यांना माहीत असायचं काहीच कारण नव्हतं. जनतेला पुतिन यांच्या रूपात एक तारणहार दिसत होता. या काळात रशियातल्या काही शोधपत्रकारांनी ताज्या दहशतवादी हल्ल्यांमागे चेचेन बंडखोर नाहीत, तर क्रेमलिनमधील काही उच्चपदस्थ आहेत, अशा बातम्या देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो काही यशस्वी झाला नाही. पुतिन यांच्या बाजूने वाहणारे वारे इतके तेज होते, की त्यांच्याविषयीच्या शंकाकुशंकांचा पालापाचोळा कुठच्या कुठे उडून गेला.

डय़ुमा निवडणुकांच्या बरोबर दोन महिने आधी येल्तसिन यांनी पुतिन यांना चेचेनविषयी निर्णयाचे सर्वाधिकार बहाल केले. पुतिन यांनी वेळ दवडला नाही. चेचन्यावर हल्लाच केला. त्याची तीव्रता इतकी होती, की चेचेन राजधानी ग्रॉझनी या शहराची पार वाताहतच झाली. इतका विध्वंस रशियातल्या शहरांनी दुसऱ्या महायुद्धातसुद्धा अनुभवला नव्हता. रशियन वर्तमानपत्रं आणि प्रसिद्धी माध्यमं या कथित दहशतवादी कृत्यांच्या वर्णनांनी आणि त्यानंतरच्या रशियन लष्कराच्या कारवाईच्या तपशिलानं दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे एक झालं- अमेरिकेत चव्हाटय़ावर आलेलं रशियन गरव्यवहाराचं एक भलंमोठं प्रकरण दाबलं गेलं. त्याचा फटका बसला अल गोर यांना. काय होतं हे प्रकरण?

अमेरिकेत याच काळात बँक ऑफ न्यूयॉर्क या बलाढय़ वित्तसंस्थेतल्या अफरातफरीचा तपशील चव्हाटय़ावर यायला लागला होता. या बँकेत रशियन माफियांनी मोठय़ा प्रमाणावर पसे फिरवले असल्याचे आरोप होत होते. गेले वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. रशियानं चेचेनवर हल्ला करायला आणि या चौकशीचे तपशील बाहेर यायला एकच गाठ पडली. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की, यूएस काँग्रेसच्या समितीसमोर त्याची सुनावणी झाली. त्यातनं समोर आलेला तपशील धक्कादायक होता. या बँकेच्या केमेन बंदरावरील शाखेत दोन खाती होती. त्यात अचानक २७ लाख डॉलर्सचा भरणा झाला होता. एरवी ही बाब दुर्लक्षली गेली असती; पण या खात्यातल्या उलाढालीकडे अमेरिकी अर्थ अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं, कारण त्या खातेधारकाचं नाव.

ते होतं- लिओनिद याचेंको. रशियाचे अध्यक्ष बोरीस येल्तसिन यांचा हा जावई. या चौकशीत आणखी एक बाब समोर आली. या खात्यात पसे भरण्यासाठी आणि नंतरच्या फेरफारीसाठी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला ती महिला रशियाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतले प्रतिनिधी कॉन्स्टंटिन कागलोव्हस्की यांची पत्नी होती. या दोघांनी संगनमतानं तब्बल १,००० कोटी डॉलर्सची उलाढाल या खात्यातनं केली होती. अमेरिकी बँकेत मनी लाँडिरगचं उघडकीस आलेलं हे तोपर्यंतचं सर्वात मोठं प्रकरण. अमेरिकी अर्थव्यवस्था त्यामुळे हादरली होती. या इतक्या 04-ls-diwali-2016-artimमोठय़ा प्रचंड आíथक घोटाळ्यात रशियन माफिया आणि क्रेमलिन यांचा थेट सहभाग होता, ही बाब समोर आल्यानं तर अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या आíथक संबंधांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्याचा थेट फटका बसला अमेरिकेचे उपाध्यक्ष अल गोर यांना.

कारण ते बिल क्लिंटन प्रशासनातले रशियन संबंधांचे सूत्रधार होते. आणि हा सगळा तपशील उघड व्हायच्या महिनाभर आधी त्यांनी रशिया कसा आíथक सुधारणांच्या मार्गाने निघालेला आहे याची द्वाही फिरवली होती. त्याच मंत्रिमंडळातले उपमंत्री स्ट्रोब टालबॉट हेदेखील नुकतेच रशियात जाऊन पुतिन यांच्याशी चर्चा करून परतले होते. त्यांनीही पुतिन यांची तारीफच केली होती. आणि आता हा आíथक घोटाळा समोर आला. त्यामुळे अमेरिकेची आणि त्यातही अल गोर यांची अशी पंचाईत झाली की त्यांना रशियन सत्ताकेंद्रांवर टीकाही करता येईना.

अमेरिकेतली ही परिस्थिती आणि त्याच वेळी चेचेन युद्ध, त्यामागच्या हेतूंची प्रामाणिकता यावर घेतला जाणारा संशय यामुळे रशियातली ही अवस्था बेरेझोव्हस्की यांनी हेरली. या पसा फिरवाफिरवीत त्यांचाही हात होता. तेव्हा यातल्या आणखी भानगडी बाहेर आल्या तर आपलं अमेरिकेत जाणं अवघड होईल हे त्यांनी ताडलं. लगेच ते मध्यस्थीच्या तयारीला लागले. त्यासाठी त्यांनी ताबडतोब वॉशिंग्टन गाठलं आणि टालबॉट यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, यातनं बाहेर पडायचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे अमेरिकेनं पुतिन यांच्यामागे उभं राहणं. पुतिन सरळ आहेत आणि सत्तेवर आले तर नाटोच्या मध्य आशियातल्या हितसंबंधांत ते अमेरिकेची मदतच करतील. बेरेझोव्हस्की यांनी आणखी एक मुद्दा मांडला. तो म्हणजे जर पुतिन हरले तर कम्युनिस्ट प्रिमाकोव्ह रशियाचे अध्यक्ष होतील आणि तसं झालं तर मध्य आशिया, प. आशियातल्या इस्लामी दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकेला रशियाची काहीही मदत मिळणार नाही. सबब पुतिन निवडून येण्यातच अमेरिकेचं हित आहे.

दोन्ही मुद्दे चपखल होते. आणि मुख्य म्हणजे अमेरिकेला मोहवण्यासाठी पुरेसे होते. यामुळे अमेरिकेच्या आघाडीवर तरी रशियात शांतता राखता आली. बँक ऑफ न्यूयॉर्क प्रकरण फार पुढे गेलं नाही. अर्थात यात अल गोर यांना चांगलीच टीका सहन करावी लागली. ऐन अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हा सर्व तपशील बाहेर आल्यानं त्यांची चांगलीच पंचाईत झाली. इतकी, की निवडणुकांत गोरविरोधकांच्या हाती एक चांगलंच हत्यार आलं. पण त्याची फिकीर करण्याचं कारण पुतिन यांना नव्हतं. त्यांच्यासाठी एक नवी डोकेदुखी रशियात जन्माला येत होती.

२२ सप्टेंबर १९९९ या दिवशी रेझन इमारतीत बाँब ठेवताना पकडले गेलेले ‘दहशतवादी’ हे प्रत्यक्षात रशियन गुप्तहेर यंत्रणेतलेच कर्मचारी असल्याचं निष्पन्न होत होतं. या बाँबस्फोटातला रशियन गुप्तहेरांचा सहभाग उघड होऊ लागल्यानं झालं असं की, याआधीच्या सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांविषयी संशय व्यक्त होऊ लागला. म्हणजे सगळ्या हल्ल्यांच्या मागे चेचेन बंडखोर नाहीत, तर रशियन गुप्तहेर यंत्रणाच आहे, असं उघड बोललं जाऊ लागलं. याचा पाठपुरावा सुरू केला मिखाईल ट्रेपाश्कीन यांनी. ते एक तर वकील. आणि त्यात काही वर्षांचा गुप्तहेर खात्यातला अनुभव. यामुळे ट्रेपाश्कीन यांना या चौकशीत निश्चित काहीतरी गवसेल असं अनेकांना वाटलं. त्यामुळे पुतिनविरोधी गटातले अनेकजण ट्रेपाश्कीन यांच्याशी हातमिळवणी करू लागले. हे बाँब ठेवण्याचं काम करणारे सरकारी गुप्तहेरच आहेत, याचे अनेक पुरावे ट्रेपाश्कीन यांना गवसू लागले. या बाँबपेऱ्यांमधल्या एकाचं तर त्यांच्याकडे छायाचित्रही होतं. तेव्हा हा सगळा ऐवज पुतिन यांच्याविरोधात वापरायचा, वर्तमानपत्रांना द्यायचा असा त्यांचा प्रयत्न होता.

परंतु अचानक त्यांनाच अटक झाली. आरोप काय? तर बेकायदा शस्त्र बाळगलं. वास्तविक त्यांच्याकडे आवश्यक तो परवाना होता. परंतु त्यांच्याकडे परवान्यात नमूद केल्यापेक्षा अधिक क्षमतेचं शस्त्र आहे असं दाखवलं गेलं आणि त्यांच्यावर खटला भरला गेला. हा बनाव आहे हे अनेकांना कळत होतं. त्यामुळे ट्रेपाश्कीन यांच्या समर्थनार्थ निदर्शनं होऊ लागली. त्यांच्यावरचा खटला मागे घेण्याची मागणी पुढे आली. पण तसं काही झालं नाही. खटला चालवला गेलाच. ते दोषीही ठरले. आणि चक्क पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना झाली. तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. ती थांबली. परिणामी ट्रेपाश्कीन ज्यांच्याविषयी माहिती देणार होते त्यातला एक सायप्रसमध्ये पळून गेला. खरं तर त्याला पळून जाऊ दिलं गेलं. त्याचं नाव व्लादिमीर रोमानोविच. तो देशच सोडून गेला. त्यामुळे पुतिन यांच्याविरोधात काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. तिकडे तो गेला आणि अचानक बातमी आली- रस्त्यावरच्या अपघातात त्याचं निधन झालं. त्याचे आणखी दोन सहकारी होते. त्यातला एक युश्चेनकोव नावाचा मॉस्कोतच आपल्या घराखाली मारला गेला. अज्ञात मारेकऱ्यानं त्याला गोळ्या घातल्या. दुसरा सहकारी होता त्याला अचानक ताप आला. त्याचा घसा बसला. बोलणंच बंद झालं. सर्वागावर पुरळ आलं. क्रेमलिनच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचाराचा प्रयत्न झाला, पण तो अपयशी ठरला. कारण तिथल्या डॉक्टरांनाही शोधता आली नाही अशी कोणती तरी विषबाधा त्याला झाली होती. शेवटी तोही गेला. अगदी डॉक्टरांच्या डोळ्यांदेखत.

अशा तऱ्हेने एकामागोमाग एक असे पुतिन यांचे विरोधक काळाच्या पडद्याआड जात राहिले. काही मूठभर टाळक्यांनी पुतिनविरोधी मत मांडत राहायचा प्रयत्न केला. परदेशी वृत्तपत्रांना मुलाखती वगरे दिल्या. पण ते प्रयत्न तसे तेवढेच. त्यातनं फारसं काही साध्य झालं नाही. ते होणार नाही, अशीच पुतिन यांची चोख व्यवस्था होती. त्यांचं एकमेव लक्ष्य होतं.. डिसेंबर १९९९ च्या डय़ुमा निवडणुका आणि पाठोपाठ मे २००० मध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुका. एव्हाना पुतिन ही काय चीज आहे हे सर्वानाच कळून चुकलं होतं. विशेषत: विरोधकांना. हा माणूस आपल्या अस्तित्वालाच नख लावू शकतो, हे त्यांनी अनुभवलं होतं. पण विरोधकांप्रमाणे जनतेत पुतिन यांच्याविषयी तितकी नाराजीची भावना नव्हती. उलट, कौतुकच होतं पुतिन यांच्याविषयी. असा धडाडीचा नेता रशियाला हवा असंच अनेकांना वाटू लागलं होतं. आधीच्या ढेरपोटय़ा, बेढब, मद्यपि नेत्यांच्या तुलनेत चांगला धडधाकट, व्यायाम वगरे करून स्वत:ला सशक्त राखणारा पुतिन यांच्यासारखा नेता रशियनांचा आवडता झाला नसता तरच नवल. त्यामुळे पुतिन यांच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. १९९९ च्या सप्टेंबर महिन्यात पुतिन जेमतेम पाच टक्के रशियनांना आवडत होते. दरम्यानचं चेचन युद्ध आणि पाठोपाठच्या सगळ्या घटनांमुळे अवघ्या तीन महिन्यांत हे लोकप्रियतेचं प्रमाण ४५ टक्क्यांवर गेलं. त्यामुळे पुतिन यांचा वारू आता कोणी रोखू शकणार नव्हतं.

पण पुतिन यांना केवळ निवडून येण्यात रस नव्हता. त्यांचे आता प्रयत्न होते ते अध्यक्षीय निवडणुकीत आपल्या जवळपासही कोणी येऊ नये, यासाठी. त्यांना काळजी वाटत होती ती जुन्या कम्युनिस्ट समर्थकांची. त्यांच्या पािठब्यावर पुतिन यांचं कोणतंही गणित अवलंबून नव्हतंच. किंबहुना, ते आपल्याला पािठबा देणार नाहीत, याबाबत पुतिन यांच्या मनात शंका नव्हतीच. पण त्यांना जनतेतला एक मोठा गट अजूनही कम्युनिस्टधार्जणिा आहे हे जाणवत होतं आणि त्याचीच त्यांना काळजी होती. त्यामुळे मग पुतिन यांच्या प्रचाराचा रेटा वाढू लागला. प्रसिद्धी माध्यमांत प्रिमाकोव्ह, झ्युगानेव्ह यांच्या विरोधात बरंच काही छापून येऊ लागलं. याचा अपेक्षित परिणाम झाला आणि पुतिन यांच्या युनिटी पक्षाला चांगलं यश मिळालं. प्रिमाकोव्ह वगरे जुनी मंडळी स्पध्रेतनं बाहेर फेकली गेली. डय़ुमात पुतिन यांना चांगलं यश मिळालं. आता त्यांना एकच अडथळा पार करायचा होता- अध्यक्षीय निवडणुका. त्याआधी त्यांच्या बाजूनं आणखी एक घटना घडणार होती.

तीच ती. ३१ डिसेंबर १९९९ या ऐतिहासिक दिवशी घडलेली. अध्यक्ष येल्तसिन यांनी साश्रुनयनांनी राष्ट्राचा निरोप घेतला आणि हंगामी अध्यक्ष म्हणून पुतिन यांची नेमणूक केली. अनेकांना ही घटना भलतीच अनपेक्षित वाटली. पण खरोखरच ती तशी होती का?

संशयाला जागा आहे. कारण येल्तसिन यांच्या या जगप्रसिद्ध भाषणाच्या आदल्याच दिवशी- म्हणजे ३० डिसेंबरला रशियन सरकारच्या वेबसाइटवर पुतिन यांचा एक लेख प्रकाशित झाला. ‘रशिया- अ‍ॅट द टर्न ऑफ द मिलेनियम.’ तो लेख म्हणजे पुतिन यांच्या आगामी राजवटीचं दिशादर्शन म्हणता येईल. रशियात नव्या विचारधारेविषयी या लेखात संशय व्यक्त केला गेला होता आणि त्याचवेळी कम्युनिस्ट विचारधाराही कशी निरुपयोगी आहे, ते सांगितलं गेलं होतं. म्हणजे मुक्त आíथक धोरणांनाही विरोध आणि कम्युनिस्ट तत्त्वज्ञानालाही पािठबा नाही, असं. आचारविचार स्वातंत्र्याची परदेशी मूल्यंदेखील रशियनांनी स्वत:साठी कशी योग्य पद्धतीने आखून घ्यावीत याची मांडणी पुतिन यांनी त्यात केलेली आहेच; पण त्याचबरोबर देशाचं मध्यवर्ती सरकार कसं सर्वशक्तिमान हवं आणि त्यासाठी काय काय करायला हवं, यावरही त्यात भर देण्यात आलेला आहे. एका बाजूनं तो लेख नवी दिशा दाखवतो की काय असा भास होतो खरा; पण वरवर लोकशाही मूल्यांची भाषा करत स्टालिनकालीन शक्तिमान मध्यवर्ती सरकारचीही तो तरफदारी करतो. पुतिन यांची मानसिकता त्यातून दिसून येते. कारण सत्ता आली की ती एका केंद्रात कशी एकवटता येईल याचा पूर्ण आराखडाच त्यात आहे. त्याचं सार म्हणजे आता रशियाला कोणत्याही विचारधारेची गरज नाही, हे पुतिन यांचं स्पष्ट प्रतिपादन. त्यातील प्रतिपादनाचा प्रत्यय पुतिन निरीक्षकांना दुसऱ्याच दिवसापासून येणार होता.

३१ डिसेंबरला अध्यक्ष येल्तसिन पायउतार झाले आणि पुतिन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. लगेचच पुतिन यांनी डय़ुमाच्या सुरक्षा परिषदेची बठक बोलावली. तीत पुतिन म्हणाले, ‘‘यापुढे रशियनांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होणार नाही याची काळजी घेईल. विशेषत: आचारविचार अधिकार, नागरी स्वातंत्र्य यांना महत्त्व दिले जाईल. परंतु ते देताना सरकारचेही काही मूलभूत अधिकार असतात याचे भान बाळगले जाईल. सरकारच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करून जनतेच्या अधिकारांना प्राधान्य दिले जाईलच असे नाही. समर्थ समाजासाठी सरकारदेखील तितकेच समर्थ हवे याचे भान सुटता नये.’’

याचा अर्थ इतकाच, की नागरिकांनी मूलभूत अधिकार वगरेंची फार अपेक्षा बाळगायचं कारण नाही. त्यांच्या मूलभूत अधिकारांपेक्षा सरकारचे अधिकार केव्हाही अधिक महत्त्वाचे. आणि सरकार म्हणजे अर्थातच सर्व सत्ताधिकार हाती असलेली व्यक्ती. म्हणजे अर्थातच अध्यक्ष. म्हणजेच पुतिन आणि फक्त पुतिन. याची चुणूक लगेचच दिसून आली.

हंगामी अध्यक्ष म्हणून पुतिन यांनी निर्णय घेतला तो माजी अध्यक्ष बोरीस येल्तसिन यांना सर्व वैधानिक संरक्षण देण्याचा. म्हणजे पायउतार झाल्यानंतरही येल्तसिन यांच्यावर कोणीही कोणत्याही कारणासाठी आता कसलाही खटला दाखल करू शकणार नव्हता. येल्तसिन आणि कुटुंबीयांसाठी हीच बाब तर महत्त्वाची होती. आता ते सुखानं निवृत्त होऊ शकणार होते. यापाठोपाठ पुतिन यांनी अध्यक्षीय आस्थापनाची सूत्रं आपल्या दोन अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांच्या हाती सुपूर्द केली. इगॉर सेचिन आणि दिमित्री मेदवेदव. याच्याच जोडीला पुतिन यांनी या दोघांकडे रशियन अर्थव्यवस्थेच्या चाव्याच दिल्या. देशातील तेल आणि नसíगक वायू क्षेत्राचे संपूर्ण निर्णयाधिकार पुतिन यांनी या दोघांच्या हाती दिले.

हे केल्यानंतर पुतिन यांनी आपल्या तिरक्या चालीचं दर्शन घडवायला सुरुवात केली. एका बाजूला त्यांनी येल्तसिन यांना सर्व संभाव्य खटल्यांपासून संरक्षण दिलं; पण त्याचवेळी त्यांच्या काळात सत्तेच्या नाडय़ा सांभाळणारी त्यांची कन्या तातियाना हिला झटका दिला. अध्यक्षीय सल्लागार पदावरनं पुतिन यांनी तिची उचलबांगडी केली. तो इशारा होता. खुद्द येल्तसिन, त्यांची कन्या तातियाना हिला. आणि या दोघांच्या बरोबरीनं येल्तसिन यांच्या काळात डोईजड होऊन बसलेल्या बोरीस बेरेझोव्हस्की यांना. तातियानामार्फत तेच तर सरकारमधली सूत्रं स्वत:ला हवी तशी फिरवत होते. येल्तसिन यांनी या दोघांना हवी तितकी मोकळीक दिली होती. आता ती मिळणार नव्हती. पाठोपाठ त्यांनी संपूर्ण अध्यक्षीय प्रशासनाची पुनर्रचना केली. एकेकाळी आपल्याबरोबर असलेल्या अनेक केजीबी अधिकाऱ्यांना पुतिन यांनी मोक्याच्या जागी नेमलं. निकोलाय पात्रुशेव्ह यांच्याकडे एफएसबी सोपवली. सर्जेई इव्हानोव्ह, व्हिक्टर झोलोटोव्ह, लिओनिद रेमन, अलेक्सी कुद्रीन आदी अनेक पुतिन समर्थकांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागली. अत्यंत महत्त्वाची अशी सगळी पदं आपल्या विश्वासूंनी भरली गेल्यावर पुतिन यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

तो म्हणजे- अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या अध्यक्षीय निवडणुकांत प्रचार न करण्याचा. हा जनतेसाठी धक्का होता. पण त्यामागचं पुतिन यांचं चातुर्य हे, की त्यांनी स्वत:ला अलगदपणे या सर्व राजकारणाच्या वर नेऊन ठेवलं. ‘‘हे निवडणुका वगरे राजकारण्यांचं काम आहे, मी काही त्यात पडायची गरज नाही.. माझा काही त्यात स्वार्थ नाही..’ अशी अत्यंत आपमतलबी, तरीही हुकमी खेळी पुतिन यांनी केली. विरोधक त्यामुळे जवळपास चीतपटच झाले. पण पुतिन यांच्या विरोधकांसमोरही त्यामुळे मोठंच आव्हान उभं राहिलं. कारण निवडणुका वगरे मुद्दे पुतिन यांनी असे काही खाली आणून ठेवले, की त्यात गुंतलेले सर्वच लहान होऊन गेले. आणि पुतिन मात्र या क्षुद्र राजकीय स्वार्थावर स्वार!

याचा परिणाम असा झाला की, एकामागोमाग एक असे अनेक गव्हर्नर पुतिन यांच्यामागे उभे राहू लागले. याहीआधी देशातल्या दोन डझनभर गव्हर्नरांनी येल्तसिन यांच्याकडे मागणी केलीच होती- पुतिन यांना अध्यक्ष करण्याची. ती पाहून आणखीही अनेक गव्हर्नर पुतिन यांना पािठबा देते झाले. यामुळे पुतिन यांच्याविरोधात लढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काहींचं अवसान गळालं. आणि कहर म्हणजे क्रेमलिनमधल्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सरळ रजा घेऊन पुतिन यांच्यासाठी निवडणुकीत काम करण्याचा मनोदय जाहीर केला. साहजिकच व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी रजादेखील दिली गेली. काही ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांकडेच पुतिन यांचं प्रचार साहित्य आढळलं. या निवडणुकीसाठी काही आंतरराष्ट्रीय निरीक्षक आले होते. त्यांना हा सगळाच प्रकार धक्कादायक वाटला. तसा तो वाटायचं दुसरं कारण म्हणजे रशियातल्या प्रसार माध्यमांत आढळलेली भयाण शांतता. खासगी आणि सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणी वाहिन्या, वर्तमानपत्रं वगरे कोणीही पुतिन यांच्या विरोधात काहीही बोलायलाच तयार नव्हतं. पण बेरेझोव्हस्की यांच्या मालकीची दूरचित्रवाणी वाहिनी मात्र मोठय़ा हिरीरीनं पुतिन यांचा प्रचार करताना दिसत होती. रशियन कायद्यानुसार प्रत्येक उमेदवाराला टीव्हीवरील चच्रेसाठी प्रत्येकी ८० मिनिटांचा अवधी दिला जातो. पुतिन यांनी तो नम्रपणे नाकारला. पण त्याचवेळी त्यांच्या कार्यालयातनं विरोधी उमेदवारांना निरोप गेला.. पुतिन यांच्याविरोधात वाटेल ते बोललात तर याद राखा. साहजिकच सगळा प्रचार एकतर्फीच झाला. हे सगळं इतकं डोळ्यावर येणारं होतं, की ‘पार्लमेंटरी असेंब्ली ऑफ द कौन्सिल ऑफ युरोप’ या निरीक्षक संघटनेनं आपलं मत नोंदवलं : प्रसार माध्यमांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली.

तेव्हा अशा वातावरणात निकाल काय लागणार, हे उघडच होतं. पुतिन विजयी झाले. त्यांना ५२.९४ टक्के इतकी मतं पडली. आपल्या विरोधकांपेक्षा पुतिन यांना २२ लाख मतं अधिक पडली, असं सांगितलं गेलं. पण काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी त्यातलाही विरोधाभास दाखवून दिला. डिसेंबरातल्या डय़ुमा निवडणुकांत १० कोटी ८० लाख ७३ हजार ९५६ इतके मतदार होते. त्यातल्या ६ कोटी ६६ लाख ६७ हजार ६८२ जणांनी प्रत्यक्ष मतदान केलं. पण त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांत मतदारांची एकूण संख्या झाली १० कोटी ९३ लाख ७२ हजार ४६ इतकी. म्हणजे त्यात तब्बल १३ लाख इतक्या मतदारांची वाढ झाली. पण त्याचवेळी रशियन सरकारची आकडेवारी दर्शवते की, या तीन महिन्यांत रशियाची लोकसंख्या वाढली ती फक्त १ लाख ८२ हजारांनी. म्हणजे लोकसंख्या वाढली जवळपास दोन लाखांनी आणि मतदारांत वाढ झाली ती मात्र १३ लाख. हे गौडबंगाल काही कोणाला कळलं नाही. त्यातही परत योगायोगाचा भाग असा की, ज्या गव्हर्नरांनी पुतिन यांना बिनशर्त पािठबा जाहीर केला, त्यांच्याच प्रांतांत नेमकी अधिक मतदारांची नोंद झाली. हे कसं? याचंही उत्तर कधी कोणाला मिळालं नाही.

निवडणुकीनंतर जवळपास सहा महिने ‘मॉस्को टाइम्स’ या वर्तमानपत्राच्या शोधपत्रकारांनी ही सगळी माहिती जुळवण्याचा प्रयत्न केला. हे पत्रकार अनेकांना भेटले. देशभर गेले. जिथे कुठे पुतिन यांना भरभरून मतं पडली, तिथं जाऊन त्यांनी सर्व माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. पण काहीही हाती लागलं नाही. हाती उरले ते फक्त प्रश्न. त्यांत उलट दिवसागणिक वाढच होत गेली. डय़ुमाचे उपसभापती कम्युनिस्ट अलेक्झांडर सॅली यांनी यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कोणाच्याही हाती काहीच पडलं नाही. पुतिन यांचा विजय हेच या सगळ्यांसाठी अंतिम सत्य होतं.. ते कितीही कटू होतं, तरी. पुतिन सत्तेवर राहणार होते आणि आता त्यांचं लक्ष्यही निश्चित होतं.

प्रसार माध्यमं. पुतिन यांचा वरवंटा आता प्रसार माध्यमांवर फिरणार होता. आंद्रे बबित्स्की या रशियातल्या आघाडीच्या पत्रकाराच्या रूपानं याचा अंदाज समस्त माध्यम क्षेत्राला आला. आंद्रे कट्टर पुतिनविरोधक. चेचन्यात पुतिन यांची लबाडी उघडकीस आणण्याचा चंगच जणू त्यानं बांधलेला. त्याच्या बातमीदारीची धग इतकी, की शेवटी रशियन सनिकांनी त्याला चेचन्यात अटक केली आणि त्याला चेचेन बंडखोरांचा हस्तक ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. इतर पुतिन विरोधकांना हा इशारा होता. बबित्स्की याचा गुन्हा काय, विचारलं तेव्हा पुतिन म्हणाले, मशीनगनमधनं गोळ्या झाडण्यापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा त्यानं केलाय.

वातावरण हे असं माध्यमविरोधी! त्यात आता वाढच होण्याची चिन्हं होती. ते पाहून रशियातल्या ३० माध्यम संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी पुतिन यांना एक अनावृत पत्र लिहिलं. ‘ओब्साया गॅझेटा’ नावाच्या वर्तमानपत्रानं ते पहिल्या पानावर छापलं. त्यात म्हटलं होतं : रशियात सध्या कधी नाही एवढा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. वार्ताहरांवर खटला भरण्याच्या तुमच्या निर्णयांमुळे या स्वातंत्र्याची अधिकच गळचेपी होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का? सर्व सत्ता तुमच्या हाती एकवटायला हवी, हा तुमचा आग्रह हा काही धोरणात्मक प्रक्रियेसाठी नाही. कारण तशी कोणतीही धोरणात्मक प्रक्रिया तुम्ही सुरूच केलेली नाही. तेव्हा तुमचे हे सर्व सत्ता स्वत:च्या हाती केंद्रित ठेवणे, हे कोणा उद्दिष्टपूर्तीच्या मार्गातील साधन नसून सत्ता हेच तुमचे उद्दिष्ट आहे.

या वर्तमानपत्राचं धर्य असं की, त्यांनी या अंकाच्या पाच लाख प्रती मोफत वाटल्या. परंतु पुतिन बधतील अशी कोणतीही शक्यता नव्हती. उलट, त्यांचा दृष्टिकोन अधिकाधिक असहिष्णुच होत गेला. माध्यमं आणि पुतिन यांच्यात हे असे तणावाचे संबंध असताना आणखी एक घटना त्यावेळी घडत गेली. ती म्हणजे पाश्चात्त्य देश आणि त्यातही विशेषत: अमेरिकेनं रशियन बँकांत जवळपास १५० कोटी डॉलर्स ओतलेत. कशासाठी? तर चेचन्याची बाजू लढवणाऱ्या पत्रकारांच्या सेवेसाठी. म्हणजे पत्रकारांनी चेचन्याची तळी उचलून धरत रशियन सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी यासाठी म्हणे पाश्चात्त्य देश पशाची खिरापत वाटू लागलेत. असं कोण म्हणालं? तर रशियाची गुप्तहेर संस्था- एफएसबी. आणि यातला योगायोगाचा भाग म्हणजे ‘न्यू टाइम्स’ नावाच्या एका मॉस्कोस्थित वर्तमानपत्रानं हा एफएसबीचा अहवाल 05-ls-diwali-2016-book-coverजसाच्या तसा छापला. म्हणजे ‘ओब्साया गॅझेटा’ या वर्तमानपत्रात पुतिन यांच्या माध्यमविरोधी धोरणाला प्रसिद्धी; तर ‘न्यू टाइम्स’चा दावा- पत्रकारच कसे पाश्चात्त्यधार्जणिे आहेत आणि त्यांच्या तालावर नाचणारे आहेत, असा.

त्यावेळी जाहीरपणे पुतिन यांच्या बचावार्थ उतरले दिमित्री मेदवेदेव. तेच ते. पुढे रशियाचे पंतप्रधान झाले आणि मग अध्यक्ष आणि नंतर पुन्हा पंतप्रधान. मेदवेदेव सदासर्वकाळ पुतिन यांचे आश्रित म्हणूनच ओळखले जातात. त्याची सुरुवात यावेळीच झाली असावी. तर पुतिन यांच्यावर माध्यमांतून होणारी टीका वाढू लागलीय हे लक्षात आल्यावर मेदवेदेव मदानात उतरले. ‘‘पुतिन यांना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेची काहीही फिकीर नाही. त्यांना काळजी आहे देशाची.. म्हणजेच तुमच्या भल्याची. पुतिन त्याला अधिक महत्त्व देत असल्याने विरोधक आणि प्रसार माध्यमे यांच्या टीकेकडे ते दुर्लक्षच करणार आहेत.’’ हे झालं मेदवेदेव यांचं म्हणणं. त्यानंतर काही दिवसांनी पुतिन यांच्या प्रचार कार्यालयानं एक पत्रक काढलं. त्यात म्हटलं होतं- प्रसार माध्यमे काय लिहीत आहेत, याच्या पुतिन यांचे कार्यालय नोंदी ठेवत आहे. त्यानंतर या सगळ्याची योग्य दखल घेऊन योग्य दारूगोळ्यासह साजेसा प्रतिसाद देण्याचा अधिकार अध्यक्षपदाचे उमेदवार व्लादिमीर पुतिन राखून ठेवत आहेत.

या भाषेनेच प्रसार माध्यमे हादरली. त्याचवेळी बेरेझोव्हस्की यांच्या वृत्तवाहिनीनं पूर्णपणे आपली ताकद पुतिन यांच्यामागे उभी केली, तर दुसरी एक वाहिनी होती एनटीव्ही नावाची- ती पुतिन यांच्यामागे हात धुऊन लागली. या वाहिनीनं तर थेट आरोपच केला, की रशियातल्या वेगवेगळ्या शहरांत झालेल्या बाँबस्फोटांमागे पुतिन यांचाच हात आहे. या वाहिनीचं म्हणणं असं की, एफएसबी या गुप्तहेर यंत्रणेनंच हे सगळे बाँबस्फोट घडवून आणले. व्लादिमीर गुसिन्स्की यांच्या मालकीची ही वाहिनी. आपल्याविरोधात इतकं सारं बोललं, चíचलं जातंय हे पाहिल्यावर पुतिन यांनी आपले खरे दात बाहेर काढले.

‘नोव्या गॅझेटा’ या आणखी एका वर्तमानपत्रानं मॉस्कोतल्या बॉिम्बगची चौकशी सुरू केली होती. त्या वर्तमानपत्राचा निष्कर्षही पुतिन यांच्याकडेच बोट दाखवत होता. या वर्तमानपत्राच्या वेबसाइटवर या शोधपत्रकारितेचे निष्कर्ष रोजच्या रोज प्रसिद्ध होत होते. ते वाचायला चांगलीच झुंबड उडत होती. मग अचानक या वर्तमानपत्राच्या वेबसाइटवर हल्ला झाला. तो इतका तीव्र होता, की ती वेबसाइटच बंद पडली. मग एनटीव्हीच्या वार्ताहरांना, संपादकांना धमक्या यायला लागल्या. त्यातली एक वार्ताहर होती एलिनोरा फिलिना नावाची. तिला तर एफएसबीनं गाठलं आणि सांगितलं, तू एनटीव्हीतली तुझी चाकरी चालूच ठेव; पण आमच्यासाठी हेरगिरीही कर. म्हणजे वृत्तवाहिनीतनं कोण कोण पुतिन यांच्या विरोधात काय काय बोलतंय ते आम्हाला कळवत राहा. तिनं पत्रकारितेशी प्रतारणा करायला नकार दिला. मग तिला धमकी दिली- तुझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंही ती बधली नाही तेव्हा तिच्या मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न झाला. यामुळेही कोणी काही घाबरत नाहीये असं दिसल्यावर एक भयानक, माध्यमांच्या अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला.

आर्टमि बोरोविक हा रशियातला एक धडाडीचा पत्रकार. त्याचे वडील जेनरिक हेदेखील पत्रकार होते. अमेरिकेतनं त्यांनी रशियातल्या वर्तमानपत्रांसाठी बातमीदारी केली होती. वडिलांप्रमाणेच आर्टमिदेखील याच क्षेत्रात आला. फरक इतकाच, की आर्टमिचे वडील अमेरिकेतनं रशियासाठी बातमीदारी करायचे; हा रशियात राहून अमेरिकेतल्या वाहिन्यांसाठी बातमीदारी करायचा. ‘सीबीएस ६० मिनिट्स’ हा अमेरिकेतला एक लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम. हा त्यासाठी रशियातनं वार्ताकनं करायचा. मिखाईल गोर्बाचोव यांचा ग्लासनोस्त, पेरिस्रोयका काळ त्यानंच मोठय़ा ताकदीनं अमेरिकन जनतेसमोर मांडला. तर हे करता करता रशियात तो शोधपत्रकार म्हणूनही नावारूपाला येत होता. त्यातनंच त्यानं ‘टॉप सीक्रेट’ नावाचा कार्यक्रम सुरू केला. या नावाचं दैनिकही सुरू केलं. चांगलंच लोकप्रिय झालं ते. रशियातल्या सत्ताधाऱ्यांचे भ्रष्ट उद्योग चव्हाटय़ावर मांडणं हा त्याचा उद्देश. अर्थातच पुतिन हे त्याचं लक्ष्य होतं. चेचन्याची दोन्ही युद्धं पुतिन यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी रेटली असं त्याचं निरीक्षण होतं आणि त्याच अनुषंगानं पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात तो होता. त्यात पुरेसा ऐवज हाती लागतोय- न लागतोय तोच मॉस्को आणि अन्य शहरांत अचानक बॉिम्बगचे प्रकार घडायला लागले. आर्टमि त्याचीही चौकशी करू लागला. ही प्रकरणं साधी नाहीयेत, यामागेही रशियातले सत्ताधारी आहेत असा त्याचा संशय होता. त्यासंदर्भातले सगळे साक्षी-पुरावे जमा करायला लागला होता तो. हा सगळा स्फोटक ऐवज त्याच्या हाती लागेल अशी शक्यता असतानाच आर्टमि गेला.

९ मार्च २००० या दिवशी. त्याला घेऊन जात असलेल्या खासगी विमानाचा उड्डाणानंतर अचानक अपघात झाला आणि विमानातले सर्वच्या सर्व प्रवासी त्यात गेले. रशियातला तेलसम्राट झिया बाझायेव याच्या मालकीचं हे विमान. वास्तविक आर्टमि दुसऱ्याच विमानानं जाणार होता, पण त्या दिवशी नेमका त्याच्या विमानाला उशीर झाला. किएवला जायचं होतं त्याला. सकाळी आठची वेळ. प्रचंड थंडी. विमानतळावर सगळीकडे बर्फच बर्फ. त्यामुळे त्याच्या विमानाला उशीर होणार होता. गंमत म्हणजे बाकी सगळी विमानं अगदी वेळेवर होती, पण याच्याच विमानाला फक्त उशीर होणार होता. मग विमानतळावर त्याला बाझायेव भेटला. म्हणाला, चल, मीही किएवलाच निघालोय. आर्टमि म्हणाला- येतो. त्या छोटेखानी विमानात दोघेही बसले आणि काही न सांगतासवरताच ते धावपट्टीकडे निघालं. विमानतळावर चांगलाच गोंधळ उडाला. त्या गोंधळातच त्यानं उड्डाणाचा प्रयत्न केला, पण ते कोसळलं. कर्मचारी धरून नऊजण होते विमानात. सगळेच गेले.

१२ मार्च या दिवशी आर्टमि यानं पुतिन यांच्यावर केलेला वृत्तपट प्रसिद्ध होणार होता. २६ मार्चला अध्यक्षीय निवडणुका होत्या. आणि बरोबर ९ मार्चला आर्टमि गेला. रशियन राजकारणाच्या भाष्यकारांनी या अपघातामागे घातपातच कसा होता, ते सप्रमाण सिद्ध केलं. आर्टमि यानं पुतिन यांच्या शेपटीवर पाय दिला होता. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे कृत्य पुतिन यांना सहन होणं शक्यच नव्हतं. तेव्हा त्याच्या विमानाचा अपघात आणि पुतिन यांचं राजकारण यांचा थेट कसा संबंध आहे, हे अनेकांनी दाखवून दिलं. प्रसार माध्यमांचं जग आर्टमिच्या मरणानं हादरलं. प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू आपल्या उंबरठय़ापर्यंत आल्याची जाणीव झाली. आज आर्टिम.. उद्या कोण? आणि परवा.. आपण? हा प्रश्न मनात घेऊनच पत्रकार मंडळी वावरू लागली. आर्टमि याच्या शेवटच्या वार्तापत्रात त्यानं पुतिन यांच्या तोंडी एक वाक्य घातलं होतं. दोन जर्मन वार्ताहरांशी बोलताना पुतिन असं म्हणाले होते. ते वाक्य होतं- ‘‘रशियात तीन पद्धतीनं माणसांना वश करता येतं. एक व्होडका, दुसरं ब्लॅकमेल.. आणि या दोन्हीनी माणसं वश झाली नाहीत तर तिसरं हत्यार काढायचं. ते म्हणजे ठार मारण्याची धमकी.’’

लवकरच ती अनेकांच्या बाबत खरी ठरणार होती. अध्यक्षीय निवडणुकांत पुतिन यांचा विजय होणार होता आणि अशा धमक्या प्रत्यक्षात आणण्याच्या त्यांच्या क्षमतेला जणू त्यामुळे राजमान्यताच मिळणार होती. आणि मग पत्रकार, गुप्तहेर, उद्योगपती जे जे कोणी आडवे येतील, ते असे अलगद नाहीसे होणार होते. अ‍ॅना पोलित्कोवस्काया, अलेक्झांडर लिटविनेंको, सर्जेई इव्हानोव, सर्जेई युशेन्को, युरी शेश्कोचिखिन, निकोलाय जेरेन्को, विख्यात ‘फोर्ब्स’ मासिकाच्या रशियन आवृत्तीचा संपादक पॉल क्लेबिन्कॉव, मिखाईल खोदार्कोवस्की.. आणि असे अनेकजण…

(गिरीश कुबेर यांनी रशियातील पुतिनयुगावर लिहिलेलं हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे.)
गिरीश कुबेर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:25 am

Web Title: vladimir putin
Next Stories
1 सजनवा बैरी हो गये हमार…
2 पँक्रीची कमाल
3 नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा
Just Now!
X