69-ls-diwali-2016-astro
मेष : सावट दूर होईल

नूतन वर्षांत मकर राशीत प्रवेश करणारा मंगळ आपल्या कर्तृत्वाला उजाळा देणारा ठरेल. तर भाग्यातील शुक्र उत्तम आर्थिक बाजू सांभाळील. जुनी येणी, जमीन खरेदी-विक्री यात फायद्याचे गणित यशस्वी ठरेल. आपल्यापाशी असलेली इच्छाशक्ती आणि जिद्द या काळात खूपच उपयोगाची ठरेल. शनी-रवी यांच्या असहकार्यातून निर्माण होणारा शाब्दिक वाद टाळा; न बोलता अनेक कामे यशस्वी करू शकाल.

महिला समाजकार्यात भाग घेतील, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे, म्हणजे पुढचा शिक्षणाचा प्रवास यशस्वी ठरेल.

नोव्हेंबर २०१६ : बुध-शनीचे वास्तव्य जरी कटुता आणणारे असले तरी मंगळाच्या कणखर वागण्यातून ते स्पष्टपणे पुसले जाईल. अखेर सत्य आणि सचोटीच्या साह्य़ाने विरोधाची तीव्रता कमी होईल. दगदग, धावपळ वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचे, पोटाचे त्रास जाणवतील.

डिसेंबर २०१६ : दशम स्थानातल्या मंगळ-शुक्रामुळे उत्साह वाढेल. उद्योगधंद्यात विशेष आनंद लाभेल. नवीन परिचय, प्रेमप्रकरण यात अतिहळवेपणा, भावनिकता यांपासून दूर राहा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आणि कौतुक होईल. आपण आखलेल्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. नवीन येणाऱ्या संधीचे सोने कराल.

जानेवारी  २०१७ : या महिन्याच्या पूर्वार्धात कुंभ राशीत मंगळ-शुक्र एकत्र आलेत. आपल्याकडे असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. संसार-उद्योगधंद्यातील वाद वाढवू नका. भूतकाळातील हेवेदावे, शत्रुत्व, सुडाची भावना विसरून जा. क्षमाशीलता हा मोठा सद्गुण आहे. नवीन कामे, नवीन स्पर्धा तूर्त नको. मात्र महिन्याचा उत्तरार्ध शुभदायक आहे.

फेब्रुवारी २०१७ : २६ जानेवारीला धनू राशीत झालेले शनीचे आगमन आपल्या भाग्यस्थानात आहे. एकूण आपल्या जीवनावर याचा चांगला परिणाम दिसून येईल. बुध-शुक्र लाभयोगातून मानसिक स्वास्थ्य लाभेल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण समस्या दूर होतील, आरोग्य ठीक राहील.

मार्च २०१७ : स्वराशीत मंगळ-बुध, त्यात शनीचा नवपंचमयोग; या काळात आपल्या मेहनतीला यश लाभेल. उत्तम बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यातून कामाचा उरक छान होईल. सांपत्तिक उलाढालीत विशेष यश लाभेल.

एप्रिल २०१७ : १३ एप्रिलला मेष राशीतील रवी मदतीचा हात देईल. धनस्थानातील मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवील. उद्योग-व्यवसायात गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. समाजकार्यात, राजकारणात मानसन्मान लाभेल. आरोग्य चांगले राहील.

मे २०१७ : उधळपट्टी टाळा, तसेच फटकळपणे वागून शत्रूंची संख्या वाढवू नका. शनी-बुध नवपंचमयोगातून मार्ग सापडतील. अपचन, पोटाचे विकार जाणवतील. पथ्य पाळा.

जून २०१७ : शुक्र-शनी नवपंचमयोगातून कामाचा उत्तम उरक होईल. रवी पराक्रमात आहे. उद्योगधंद्यातील स्पर्धेत टिकून राहाल. २० जूनला शनी वक्री होत आहे. गोंधळ, अस्वस्थता टाळा. आरोग्य जपा.

जुलै २०१७ : गृहसौख्य स्थानात रवी-मंगळ आहे. वादविवाद, गैरसमज यांपासून दूर राहा. शनी अष्टमात असल्याने राजकारण, सामाजिक कार्यात विरोधाभासी घटना घडतील. पण या सर्वावर धनस्थानातील शुक्र मात करून खूप मोठे पाठबळ देईल.

ऑगस्ट २०१७ : पंचमात रवी-बुध, पराक्रमात शुक्र. एकूण वातावरणात खूप चांगला बदल दिसून येईल. आपल्या कामात सहजता येईल. कामाचे कौतुक होईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक लाभ संभवतो.

सप्टेंबर २०१७ : बुध-शुक्र-मंगळ तीन तडफदार ग्रहांचे अस्तित्व पंचमात आहे. १७ सप्टेंबरपासून रवी षष्ठात, तर १२ सप्टेंबरपासून तूळ राशीत गुरू. एकूण हा महिना सुखासमाधानाचा तोल उत्तमरीत्या सांभाळील. नवीन जबाबदाऱ्या, नवीन कामे हाती येतील.

ऑक्टोबर २०१७ : १७ ऑक्टोबरला तूळ राशीत रवीसोबत बुध-गुरू आहे. एकूण ग्रहस्थितीचा आलेख खूप छान उंचावत आहे. नोकरी-धंद्यांत आपले स्थान अधिक घट्ट होईल. शांतपणे कामात घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : शुभसंकेत मिळतील

वृषभ राशीची या वर्षांची ग्रहबैठक म्हणजे बुद्धिबळाचा एक डाव ठरेल, त्यात हा खेळ मजेदार असणार आहे. अडचणी आल्या तरी त्या संधी घेऊन येतील नि ती प्रत्येक संधी मोलाची ठरेल. मनाबरोबर बुद्धीचाही उपयोग जरूर करावा. कन्या राशीतील गुरू या खेळातील नायक ठरेल नि इतर ग्रहांचेही सहकार्य उत्तम लाभेल. विशेषत: महिला आपल्या प्रेमळ वागण्यातून घरातील वातावरण आनंदी ठेवू शकतील आणि त्यांचे हे वागणे सांसारिक जीवनात खूप मदतीचे ठरेल. घरातील मुलांना विद्याअभ्यासात यश प्राप्त होईल.

नोव्हेंबर  २०१६ : पंचमात गुरू, नवमात मंगळ आणि रवी, बुधही अनुकूल आहेत. वेळेचा सदुपयोग करून कार्यक्षमता वाढवाल. प्रलोभने जरूर टाळा. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. जुनी येणी येतील.

डिसेंबर २०१६ : मंगळ, गुरू व शुक्राचे उत्तम सहकार्य मिळेल. नोकरी, उद्योग, राजकारणात आपले स्थान बळकट राहील. विनय, विनम्रता तुमच्या यशाला अधिक सुंदरता देईल. अष्टमात रवी जुन्या चिंतेचे सावट मनात आणेल, पण त्याची पर्वा करू नका. प्रेमात फार अपेक्षा ठेवू नका, त्या जाचक ठरतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा.

जानेवारी २०१७ : दशमात मंगळ, शुक्र, एकंदरीत ग्रहांचा वृषभ राशीशी उत्तम मेळ बसत आहे. जी कामे हाती घ्याल ती पूर्णपणे यशस्वी कराल. आरोग्याविषयीच्या तक्रारी दूर होतील. थोरामोठय़ांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल.

फेब्रुवारी २०१७ : दशमात रवी, बुध, लाभात मंगळ, शुक्र आहे. वेळीच संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. आरोग्य चांगले राहील, उत्साह वाढेल, नवीन योजना आखाल.

मार्च २०१७ : तात्पुरता ग्रहांचा असहकार असला तरी रवी, शुक्र पूर्णपणे पाठीशी उभे राहतील. वादविवाद टाळा. फार चिकित्सक दृष्टीने विचार करू नका.  कामाचा वेग वाढू द्या. आरोग्याची काळजी घ्या.

एप्रिल २०१७ : गुरू, शुक्राची उत्तम साथ, त्यामुळे कामाचे स्वरूप सोपे कराल नि त्यात यशप्राप्ती होईल. नवीन योजनांची सुरुवात करा. सामाजिक कार्यात महत्त्वाचा सहभाग राहील. गरजूंना मार्गदर्शन, मदत कराल. त्यातून मानसिक समाधान लाभेल. कामाचा गौरव होईल.

मे २०१७ : फार शिस्तबद्ध वागू नका. स्वत:चे ते खरे करणे, हट्टीपणाने वागणे यामुळे माणसे आपल्यापासून दूर जातात ही जाणीव मनापाशी असू द्या. स्वभाव महत्त्वाकांक्षी असल्याने विचारचक्र सतत चालू राहील, पण त्याच मंथनातून नवीन कामे पुढे येतील. आर्थिक लाभ संभवतो.

जून २०१७ : बुध, मंगळाचे उत्तम साह्य़, पंचमातील गुरूचा आशीर्वाद. नोकरी, व्यवसायात लाभदायक घटना घडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल, पण ते योग्य कारणासाठी असेल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. मात्र जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार काळजीपूर्वक करा.

जुलै २०१७ : स्व-राशीत शुक्र, पराक्रमात रवी, मंगळ, एकूण शुभग्रहांचा प्रवास सुरू आहे. त्यात २० जूनला वक्री शनीचे आगमन झाले आहे, पण त्याचे भय बाळगू नका. याही स्थितीत नवीन जबाबदाऱ्या येतील, त्या आपण सहज पार पाडाल. शुक्राच्या सहकार्यातून कामाचे एक वेगळे चैतन्य आपल्याला प्रेरणादायक ठरेल.

ऑगस्ट २०१७ : शुक्र, मंगळ, गुरू यांचे उत्तम सहकार्य मिळेल. महिन्याच्या पूर्वार्धात कोर्टकचेरीची कामे होतील. नवीन स्वीकारलेली आव्हाने यशस्वी कराल. कौटुंबिक वातावरणात झालेले गैरसमज दूर होतील. मुलांची अभ्यासातली प्रगती समाधानकारक राहील. परोपकाराची संधी लाभेल. सामाजिक कामातून एक वेगळे समाधान मिळेल.

सप्टेंबर २०१७ :  सडेतोडपणे वागाल, पण मनाला त्रास देणाऱ्या घटनांचा फार विचार करीत बसू नका. तसेच गुरू १२ सप्टेंबरला तूळ राशीत येत आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

ऑक्टोबर २०१७ : षष्ठातील रवीचे आगमन खूपच फलदायक ठरेल. भूतकाळ आठवत बसू नका, वेळेला खूप महत्त्व द्या. श्रम आणि बुद्धीचा वापर करा म्हणजे यश लवकर मिळेल. अर्थप्राप्ती होईल, पण पैशाची बचत करा.

मिथुन : नवी दिशा लाभेल

एकूण रोजचे जगण्याचे सकारात्मक सूत्र लक्षात ठेवून प्रत्येक दिवसाकडे पाहिले, तर जीवन फारसे कठीण वाटणार नाही. अंतर्मनातील सकारात्मक भाव खूप काही चांगले देऊ शकतो आणि आपणच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. या बौद्धिक राशीला हे सहज शक्य आहे.

नोव्हेंबर २०१६ : उत्कर्षांचा प्रवास चालू राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. दिलेला शब्द पाळा, त्याची किंमत पुढे चांगल्या रूपात प्राप्त होईल. तरुणांनी सावधतेने वागावे. परिचयातून विवाह जमतील.

डिसेंबर २०१६ : ११ डिसेंबरला मंगळाचा कुंभ राशीतील प्रवेश नि सप्तमात रवी; एकूण ग्रहांची ही हालचाल तुमच्या चांगलीच पथ्यावर पडेल. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

जानेवारी २०१७ : मंगळ-शुक्राची उत्तम साथ लाभेल. १४ जानेवारीपर्यंत सूर्य अनुकूल राहील. त्यात महत्त्वाचे निर्णय घ्याल. भावविवशता दूर ठेवा. व्यवहार, उद्योग-धंद्यात कटाक्षाने लक्ष घालावे. नवीन जागेचा प्रस्ताव पुढे येईल. जागा बदलण्याचा योग आहे. महिलांना गृहसौख्य उत्तम लाभेल.

फेब्रुवारी २०१७ : शुक्र, मंगळ, रवी यांचे उत्तम सहकार्य लाभेल. पैशाची आवक वाढेल. फायदा-तोटय़ाचे मनातील अंदाज खरे ठरतील. नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. बौद्धिक व राजकीय क्षेत्रांतील लोकांशी नव्याने परिचय होतील.

मार्च २०१७ : शुक्र, बुध, रवी नि मंगळ अशी एक उत्तम ग्रहमालिका आपल्या राशीभोवती गुंफली आहे. प्रवासाचे उत्तम योग येतील. घरात प्रसन्नता राहील. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात मानसन्मान लाभेल. पूर्वी घेतलेले चुकीचे निर्णय, वादविवाद, तंटे मिटवण्याची उत्तम संधी मिळेल. शरीर स्वास्थ्य ठीक राहील.

एप्रिल २०१७ : शुक्र, बुधाची उत्तम साथ आहे. सूर्य लाभात. एकूण या योगातून आपल्या मेहनतीस यश प्राप्त होईल. उद्योगधंदा व नवीन कामाच्या शोधात असणाऱ्यांना हा काळ यशदायक ठरेल. सामाजिक कार्यात प्रशंसा होईल.

मे २०१७ : ग्रहांच्या बाबतीत संमिश्र काळ आहे. शुक्र, बुध वगळता इतर ग्रहांचे सौख्य मिळणे कठीण आहे. पण अशा काळातच आपली खरी कसोटी असते. काहीसे नमते, काहीशी कटुता विसरली तर खूपशी विरोधाची धार बोथट होईल नि गैरसमज दूर होतील. मित्र-नातेवाईकांचा खूप आधार वाटेल.

जून २०१७ : षष्ठात आलेला शनी खूपसा मनस्ताप कमी करील. लाभातील शुक्रामुळे आर्थिक लाभ संभवतो. खर्चाचे प्रमाण जरी वाढले तरी पैसे पुरतील. नवीन योजना, नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळेल. त्यातून खरे समाधान प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील.

जुलै २०१७ : ग्रहांचा आलेख जरी खाली आला तरी एकमेव शनीचा आधार खूपच मोलाचा ठरेल. जिद्द आणि श्रम अशा काळात खूप मदतीचे ठरतात. कामे जरी रेंगाळली तरी ती महिन्याच्या उत्तरार्धात मार्गी लागतील.

ऑगस्ट २०१७ : बुध, रवी यांचा पूर्ण सहयोग; पण हा महिना काहीसा समतोल राहील. सुखदु:खाच्या काळात संयमी माणूस हलत नाही, इतके लक्षात असू द्या. कारण या साधुत्वातून तुमच्या मनाकडे फार मोठे सामथ्र्य येत असते.

सप्टेंबर २०१७ : १२ सप्टेंबरला पंचमात गुरूचे आगमन होईल नि खूपशा सकारात्मक गोष्टी पुढे येतील. मेहनतीतून मिळणाऱ्या यशाचा अनुभव घ्याल. समाधान, परिपूर्णता यातला खरा आनंद शोधू शकाल.

ऑक्टोबर २०१७ : गुरू, रवी, बुध यांचे उत्तम सहकार्य, त्यात षष्ठातील शनी चातुर्याने विरोध संपवून टाकेल. चतुर्थातील शुक्र आर्थिक बाजू सांभाळील. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल.

एकूण सध्याच्या काळात जगण्याचे समीकरण बदलत आहे. नात्यातील जुने प्रसंग, वादविवाद, गैरसमज यांची उजळणी करत बसू नका. तो मनाचा दुबळेपणा ठरेल. खरं तर कुठलाही संघर्ष हा मानसिक शक्तीला पोखरणारा असतो. म्हणून संघर्षांतून मिळणारे यश मनाला समाधान देणारे हवे. जीवनात गरज नसलेले संघर्ष टाळा. वेळेचा सदुपयोग करा. त्यात आनंद शोधा. त्यातच खरे समाधान लपलेले असते.

कर्क : यशदायक घटना

एकूण या वर्षी तुमच्यातील विनय, नम्रता, यशाचा आलेख उंचावतील, पण कामात गाफीलता, बेपर्वाई या गोष्टी कटाक्षाने टाळा. यशाचे मूल्यमापन करताना आपल्यातल्या न्यूनत्वाकडे तटस्थपणे पाहा, म्हणजे गुण-दोषांचे नीट आकलन होईल. महिलावर्गाचे प्रयत्नातून प्रश्न सुटतील.  नवीन परिचय होतील. घरातील मुलांना अभ्यासात यशप्राप्ती मिळेल.

नोव्हेंबर २०१६ : महिन्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध बऱ्याच दृष्टीने शुभदायक ठरेल. आर्थिक अडचणी दूर होतील. उद्योगधंद्यात, नोकरीत मतभेद, नाराजी उत्पन्न होईल, पण वेळ पाहून टोकाचे निर्णय टाळावेत. उत्तरार्धात अनेक गोष्टींना सकारात्मक स्वरूप प्राप्त होईल. कोर्ट-कचेरीची कामे निघालीच तर ती सामोपचाराने घ्यावीत.

डिसेंबर- २०१६ : गुरू, शुक्र नवपंचमयोगाचा उत्तम प्रभाव. उद्योगधंद्यात, नोकरीत रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक कलह मिटेल, गैरसमज दूर होतील. आपल्या विचारांचा प्रभाव वाढेल. त्यातून कामे मार्गी लागतील.

जानेवारी २०१७ : महिन्याच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यात, नोकरीत विशेष प्रगती होईल. मात्र अति आत्मविश्वास टाळा. तसेच चर्चेतून प्रश्न सोपे होतील. कौटुंबिक प्रश्नांना फार व्यापक स्वरूप देऊ नका. गैरसमज दूर करा. आर्थिक स्थिती चांगली राहील, जुनी येणी येतील.

फेब्रुवारी २०१७ : पराक्रमात गुरू, नवमात शुक्र-मंगळ, षष्टात शनी. ग्रहांचे उत्तम सहकार्य आहे. उद्योगधंद्यात उत्तम यश मिळेल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपल्या चतुरस्रपणाचे कौतुक होईल, मनोबल वाढेल, मात्र आरोग्याची काळजी घ्या.

मार्च २०१७ : गुरू, शुक्र, मंगळाचे उत्तम सहकार्य आहे. मनात आणलेल्या योजना सहज पार पाडाल. अर्थप्राप्ती होईल. पण व्यवहारात सतर्क राहा. शब्द देणे, वचने देणे टाळा. आरोग्य ठीक  राहील.

एप्रिल २०१७ : रवी, बुध, शुक्र, गुरू यांचे उत्तम सहकार्य, तर दशमात १२ एप्रिलला होणारे मंगळाचे आगमन नोकरीत, उद्योगधंद्यात कामाला अधिक गती आणेल. नवीन परिचय आनंद देतील. आरोग्य चांगले राहील.

मे २०१७ : उत्तम ग्रहमान, त्यात १४ मेला लाभस्थानात रवीचे होणारे आगमन खूप लाभदायक ठरेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन जागेच्या खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

जून २०१७ : २० जूनला वक्री होणारा शनी काहीसा उपद्रव करील. पण बुध, मंगळ नि गुरू यांच्या शुभ उपस्थितीमुळे त्याला प्रतिबंध बसेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तसेच उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचा व्याप वाढेल, पण संयम नि शांतता यातून खूपशी कामे सहज पार पडतील.

जुलै २०१७ : गुरू, शुक्र यांच्या नवपंचमयोगातून लाभदायक घटना घडतील. तर दशम स्थानातला हर्षल खूपशा गोष्टींना चालना देईल. आर्थिक येणी वसूल होतील. गैरसमज दूर होतील. महिलांना त्यांच्या क्षेत्रात यश लाभेल. संसार सांभाळून समाजकार्यात सहभागी व्हाल.

ऑगस्ट २०१७ : व्ययात शुक्र, खर्चाचे प्रमाण वाढेल. पराक्रमात गुरू. व्यवसाय, नोकरीत प्रगती उत्तम होईल. नवीन आव्हाने स्वीकारा, ती यशस्वी होतील. घरातील वयोवृद्धांना सन्मानाने वागवा, त्यांची मने जपा.

सप्टेंबर २०१७ : १२ सप्टेंबरला गुरू तूळ राशीत आहे. कुटुंबात वादविवाद, गैरसमज कटाक्षाने टाळा. पराक्रमात रवी उद्योगधंद्यात, सामाजिक कार्यात महत्त्वाचा ठरेल. शुक्रामुळे लाभदायक घटना घडतील. महिनाअखेर उत्तम शांतता लाभेल. नवीन-जुन्या मित्रमंडळीच्या गांठीभेटीतून विशेष आनंद मिळेल.

ऑक्टोबर २०१७ : पराक्रमात मंगळ, शुक्र, त्यात कन्या राशीत रवी, १७ ऑक्टोबपर्यंत पंचमात शनी, विद्या-व्यवसायात परिश्रमातून यश लाभेल. घरगुती प्रश्न सुटतील. उत्तम अर्थप्राप्ती होईल.

योग्य निर्णय, आर्थिक व्यवहार, महत्त्वाचे करार, नव्या योजना याबाबतीत विशेष काळजी घ्या. सहानुभूती, प्रेम, वात्सल्य या भावूक शब्दाच्या गर्तेतून बाहेर पडणे जरुरीचे आहे. माणसातील दुबळेपणा मनाला खिळखिळा करत असतो, त्याची नोंद घ्या. शरीराप्रमाणे मनाचेही आरोग्य असते ते जपा. निर्विकार मन म्हणजे एक विशिष्ट आनंद असतो.

सिंह : कर्तृत्व उजळेल

आपले खरे निर्णय आपले अंतर्मन घेत असते. अशा अंतर्मनात फार मोठी ताकद असते. केवळ नकारात्मक विचारांत आपण आपले मन गुंतवून टाकत असतो. त्यामुळे आपले खूपसे नुकसान होत असते. तेव्हा अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा येऊ द्या. म्हणजे तुमच्या प्रत्येक होकारात एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. महिला परिश्रमातून यशस्वी होतील. त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळीत बोलताना शब्द जपून वापरावेत. मौल्यवान वस्तू सांभाळा.

नोव्हेंबर २०१६ : ७ नोव्हेंबरला धनू राशीत जाणारा शुक्र खूप मोलाचा ठरेल. नोकरी, उद्योगधंद्यात लाभदायक घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात यश लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल. षष्ठातील मंगळामुळे विरोध मावळेल, त्यातून नव्या जागेच्या कामांना गती प्राप्त होईल.

डिसेंबर  २०१६ : १५ डिसेंबरला धनू राशीत सूर्यप्रवेश, उद्योगधंद्यातील योजनांना उत्तम प्रतिसाद लाभेल. नोकरीत वरिष्ठांशी वितुष्ट टाळा. आरोप-प्रत्यारोपातून परिस्थिती वेगळे वळण घेईल. तरीही गैरसमज वाढू देऊ नका. अखेर संयम, शांततेतून मार्ग निघतील. श्रमाचे सार्थक होईल.

जानेवारी २०१७ : २७ जानेवारीपर्यंत शुक्राचे उत्तम सहकार्य लाभेल. १४ जानेवारीला रवि षष्ठात असल्याने विरोधी सूर कमी होईल. नोकरीधंद्यात समजुतीचे वातावरण पोषक ठरेल. आर्थिक लाभ, मानसिक स्थिती चांगली राहील. समस्या दूर होतील.

फेब्रुवारी २०१७ : महिन्याच्या पूर्वार्धातील काळ शांततामय राहील, पण उत्तरार्धात गैरसमज, वादविवाद क्षुल्लक कारणांवरून होतील. पण न बोलता, न मत मांडता काही गोष्टींना आळा बसेल. चर्चेत उलटसुलट प्रतिक्रिया नकोत. जमीन, वास्तूव्यवहारातले  निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.

मार्च २०१७ : १४ मार्चपूर्वी महत्त्वाची कामे आटोपण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक समस्या संयम व समजुतीने सुटतील. हेकेखोरपणा, हट्टीपणा नको. उद्योगधंद्यात, नोकरीत नव्या जबाबदाऱ्या वाढतील. त्यातून उत्कर्ष होईल. पैशाची आवक वाढेल, तसे खर्चाचे प्रमाण वाढेल.

एप्रिल २०१७ : बुध, रविचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यापार, शिक्षण, साहित्य, विज्ञान क्षेत्रात प्रगतीचे पाऊल पुढे असेल. अष्टमातील शुक्र आर्थिक लाभाचे गणित अधिक सोपे करील. प्रवासाचे लहान लहान योग आनंदात भर घालतील. बौद्धिक व राजकीय क्षेत्रातील लोकांशी नव्याने परिचय होतील.

मे २०१७ : दशमात मंगळ, रवि, नवमात बुध, उद्योगधंद्यात कामांना वेग येईल. नवीन योजना, नवीन कल्पनापूर्तीचा काल. आरोग्य उत्तम राहील. मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल, पण महिना अखेरचा काळ आनंदमय असेल.

जून  २०१७ : शुक्र, रवि, बुध, मंगळ शुभस्थानांत आहेत. एकूण उत्तम उर्जितावस्थेचा काळ अनुभवाल. जुनी येणी येतील. अचानक धनलाभाचे योग. मित्रमंडळी, पाहुण्यांची ये-जा चालू राहील. खरेदी-विक्रीत नफ्याचे प्रमाण वाढेल.

जुलै २०१७ : १६ जुलैपर्यंत रवि मिथुन राशीत तर शुक्र वृषभेत  आहे. एकूण शरीरस्वास्थ्य, मनस्वास्थ्य ठीक  राहील. पूर्वीचे चुकीचे निर्णय सुधारण्यात वेळ जाईल. पैशाची आवक हळूहळू वाढू लागेल. नवीन परिचयांतून कामांना गती प्राप्त होईल. कुठेतरी स्थिरता लाभल्याचे वाटू लागेल.

ऑगस्ट २०१७ : शुक्र, रवि, बुधाच्या मदतीचा हात खूप मोलाचा ठरेल. नवी नवी येणारी आव्हाने स्विकारून ती यशस्वी करून दाखवाल. उत्साह वाढेल, कामानिमित्त प्रवास करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घेणे फायद्याचे ठरेल. योग्य कारणासाठी पैसे खर्च होतील.

सप्टेंबर २०१७ : १५ सप्टेंबरला शुक्राचे सिंह राशीतील आगमन खूपच महत्त्वाचे ठरेल. त्यात त्यांना लाभलेली मंगळ-बुधाची साथ कामाचे स्वरूप खूपच जलदगती प्राप्त करील. दगदग वाढेल, पण काहीसे संयमाने घेतले तर अनेक गोष्टींत सहजता प्राप्त होईल.

ऑक्टोबर २०१७ : ९ ऑक्टोबरला शुक्राचा कन्या राशीतील प्रवेश खूपच लाभदायक ठरेल. १३ ऑक्टोबरला तूळ राशीत रविमुळे सामाजिक, राजकीय कामातील सहभाग समाधान देणारा ठरेल.

कन्या : आत्मविश्वास लाभेल

या नूतन वर्षांत आपल्याला ग्रहसौख्य उत्तम लाभले आहे. आनंदाबरोबर उत्तम बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य नि स्पष्ट, सत्य वाणी या जोरावर आपले समाजातील स्थान खूप महत्त्वाचे ठरेल. कटू प्रसंगांना सामोरे जाताना मनाचे संतुलन खूप चांगले राखू शकाल. आपली भावनिकता ईश्वरभक्तीत असेल, पण नात्याच्या गुंत्यात आपण मनाचा संयम फार खुबीने पाळाल. कारण हळवेपणा जपण्यात पुरे आयुष्य निघून जाते, हे आपण जाणता. त्यामुळे या वर्षांचा जीवनप्रवास सावधानतेने कराल नि यशस्वी व्हाल.

नोव्हेंबर २०१६ : पराक्रमात १५ नोव्हेंबरला जाणाऱ्या रवीसोबत बुध, शनी एकूण उत्तम ग्रहसौख्य लाभेल. नवीन ओळखी-परिचयातून आनंद मिळेल. उद्योगधंद्यातून अर्थलाथ होतील. सामाजिक कार्यात महत्त्वाचा सहभाग, मानसन्मान लाभेल. विरोधक माघार घेतील. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल.

डिसेंबर-२०१६ : स्वराशीत गुरू, पंचमात मंगळ, शुक्र. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात मानसन्मान, प्रियजनांच्या भेटीगाठी, आरोग्य छान राहील. मनोबल वाढेल, हिंमत दाखवून योग्य निर्णय घ्याल.

जानेवारी २०१७ : शनी, रवी, मंगळ, शुक्र यांचे उत्तम सहकार्य. नवीन जबाबदाऱ्या घेऊन त्या यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवाल. सामाजिक कार्यात महत्त्वाचा सहभाग. त्यातून नवीन परिचय वाढतील, प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होईल.

फेब्रुवारी २०१७ : चतुर्थातला शनी कौटुंबिक सुखात नको ते गैरसमज, त्यातून मनस्ताप देईल, पण संघर्ष टाळण्यात यशस्वी ठराल. आरोग्यावर लहानसा परिणाम होईल, मात्र उद्योगधंद्यात नवीन योजना, कामे मार्गी लागतील. अति भावनिक होणे टाळा.

मार्च २०१७ : महिन्याच्या पूर्वार्धात हाती घेतलेली कामे आटोपून घ्या. जमीन विक्री-खरेदी उद्योगधंद्यातील निर्णयातील विलंब टाळा. वादग्रस्त प्रकरणांपासून दूर राहा. कोर्टकचेरीची कामे निघालीच तर ती सामोपचाराने मिटवा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. शब्द-आश्वासाने देऊ नका.

एप्रिल २०१७ : मंगळ शुक्राच्या उत्तम सहकार्याने कामांना गती येईल. आपल्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. आपण आखलेल्या योजना यशस्वी होतील. अर्थप्राप्ती उत्तम राहील. एकूण हा महिना मानसिक दृष्टीने खूप चांगला जाईल.

मे २०१७ : मंगळ, रवी, शुक्र यांच्या शुभदृष्टीतून आर्थिक बाजू उत्तम राहील. सामाजिक कार्यात हातभार लावाल, शब्दाला एक वेगळीच किंमत प्राप्त होईल. जागेसंबंधी वाद सामोपचाराने मिटतील. संयम नि शांतता यातून कामे मार्गी लागतील.

जून २०१७ : बुध, मंगळ, रवी शुभस्थितीत आहे. शक्यतो कुणाला शब्द देऊ नका, दिलात तर तो अवश्य पाळा. मनस्वास्थ्य चांगले राहील. घरातील तरुण मंडळींना नोकरीधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक बाजू स्थिर राहील. पण अतिविश्वासावर अवलंबून राहणे चुकीचे ठरेल.

जुलै-२०१७ : ग्रहमान उत्तम आहे. मंगळ, बुध, रवी, शुक्र व शनी सारेच ग्रह तुमच्या मदतीला तयार आहेत. प्रत्येक कामात यश लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. शुभ घटना घडतील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पाहुण्यांची वर्दळ चालू राहील.

ऑगस्ट २०१७ : मंगळ, शुक्र शुभयोगात. नवीन परिचयातून होणारी मैत्री फायदेशीर ठरेल. अतिभावनावश होऊ नका, विशेष म्हणजे जुन्या दु:खद कहाण्या आठवू नका. काळ खूप पुढे चाललाय. काळाबरोबर चालणे इष्ट ठरेल. पश्चात्ताप, उद्रेक यांपासून दूर राहा. शांतपणे जगण्यातला आनंद शोधा.

सप्टेंबर २०१७ : गुरू, शनीची उत्तम साथ, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशाची योग्य गुंतवणूक करा. शेअर, धंद्यात सावधानतेने वागा. नोकरीधंद्यात वेगाने प्रगती होईल. बोलण्यात संयम ठेवा.

ऑक्टोबर २०१७ : स्वराशीत मंगळ, शुक्र, महत्त्वाचे निर्णय घ्या. कामे यशस्वी होतील. जागेसंबंधी वादात दोन पावले मागे या. प्रेमप्रकरणात वाहून जाऊ नका. खर्चाचे प्रमाण कमी करा. बोलण्यात एकसूत्रता असू द्या. शांतपणे आपले विचार मांडा.

तूळ : योग्य निर्णय घ्याल

आयुष्यातल्या सुखाच्या प्रवासात जेव्हा दया, प्रेम, सहानुभूती व कृतज्ञता या सद्गुणांचा सहवास होतो तेव्हा पायाखालच्या पायरीचेही महत्त्व कळून येते. असाच काहीसा वेगळा अनुभव आपल्याला येईल. कधी कधी या अनुभूती पैशांपेक्षाही खूप मोलाच्या ठरतात. आपल्या राशीच्या साडेसातीचे शेवटचे पर्व चालू आहे. आता जरी ग्रहांचे सहकार्य हवे तसे मिळाले नाही तरी चंद्र, शुक्र, रवी यांचे भ्रमणसौख्य खूप लाभदायक ठरेल. महिलांसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरेल. त्यांनी सामंजस्याने प्रश्न सोडवावेत.

नोव्हेंबर २०१६ : शुक्र, बुध, राहू शुभयोगात आत्मविश्वास वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्याचबरोबरीने धनलाभाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद यात यश लाभेल. मध्यस्थीतून खूपसे प्रश्न सुटतील.

डिसेंबर  २०१६ : काहीसा साडेसातीचा त्रास जाणवेल. जमीन विक्री-खरेदीसाठी योग्य काळ आहे. खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. घरगुती वाद, गैरसमज यातून सामंजस्याने मार्ग काढा. घरात तरुण मुला-मुलींच्या लग्नाची तयारी करावी लागेल.

जानेवारी २०१७ : पराक्रमात रवी आहे. १४ जानेवारीपर्यंत, त्याआधी महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. पंचमात शुक्र, मंगळ. घरातील मुलांचे परिचयातून विवाहयोग जुळून येतील. मंगळाच्या षष्ठातल्या आगमनामुळे शत्रुत्व कमी होईल. सामाजिक कार्यात यश लाभेल.

फेब्रुवारी २०१७ : शनी धनू राशीत, साडेसातीचा काळ संपला. नोकरी, उद्योगधंद्यात उत्कर्षांचा काळ असेल. सामाजिक कार्यात, राजकारणात महत्त्व वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. अध्यात्मात मन रमेल, तसेच तीर्थयात्रा प्रवासाचे योग येतील. घरात नवीन वस्तूची खरेदी, आरोग्य उत्तम राहील.

मार्च २०१७ : शनी, राहूचे उत्तम सहकार्य लाभेल. त्यातून नवीन योजना, नवीन कल्पना प्रत्यक्षात येतील. उद्योगधंद्यात नफ्याचे प्रमाण वाढेल. जमीन खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ संभवतो. प्रवासाचे योग येतील. नवीन संधी चालून येतील. त्यातून फायद्याचे गणित जुळून येईल.

एप्रिल  २०१७ : उद्योगधंद्यात भागीदारी यशदायक ठरेल. सप्तमात बुध, लेखनकलेत यश लाभेल. षष्ठात शुक्र. किरकोळ आजार त्रास देतील. शनी, राहूमुळे मेहनतीचे चीज होईल. आपल्या बौद्धिक विचारातून आपले मोठेपण सिद्ध कराल.

मे २०१७ : बुध, शनी नवपंचमयोग नोकरीधंद्यात आपल्या कर्तृत्वाची चमक दिसून येईल. कामाचा व्याप वाढेल. धावपळ वाढेल. धांदरटपणा सोडा, शांतपणे वागा. जेवणाखाण्याच्या वेळा सांभाळा. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

जून २०१७ : राहू, शनी व रवी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योग-व्यवसायात सध्या बदल करू नका. नोकरीत बढतीचे योग आहेत. पाहुण्यांची ये-जा वाढेल. प्रेम-परिचय यातील मानसिक त्रास टाळा. स्वत:ची काळजी घ्या.

जुलै २०१७ : २० जूनला वृश्चिक राशीत शनी मागे येत आहे. त्यामुळे तूळ राशीला काहीशी झळ पोहोचेल, पण प्रगतीत तसे अडथळे येणार नाहीत. बोलण्यातील आत्मविश्वास वाढेल. नोकरीधंद्यात बुधाचे साह्य़ लाभेल. मंगळाच्या साह्य़ातून उत्तम ऊर्जितावस्था लाभेल. आपल्या कामाचे खूप कौतुक होईल.

ऑगस्ट २०१७ : शुक्र, मंगळ, रवी, बुधाच्या साहाय्याने काही रखडलेल्या योजना मार्गी लागतील. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल, पण त्यातून नफ्याचे गणित यशस्वी ठरेल. कामाचा उत्साह वाढेल, मात्र संघर्ष टाळावा. शांतता नि संयम हे आपल्या यशाचे सूत्र ठरेल.

सप्टेंबर २०१७ : राहू ८ सप्टेंबरला कर्क राशीत येणार आहे. दशमात उद्योगधंद्याच्या बाबतीत खूप मदतीचा ठरेल, तर १२ सप्टेंबरला गुरू स्वराशीत येईल. आपल्या बुद्धिमत्तेचे, कर्तृत्वाचे कौतुक होईल. शांत, स्थिरपणे केलेली कामे यशस्वी होतील.

ऑक्टोबर २०१७ : लाभात मंगळ नि गुरू, रवी, बुध यांचा सहयोग. या काळात महत्त्वाचे निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे होतील. जमीन, स्थावर इस्टेटीच्या वादात थोडीशी माघार घ्याल, पण चर्चेतून प्रश्न सुटतील.

वृश्चिक : सामथ्र्यवान बनाल

स्वराशीत साडेसातीचा काळ जरी असला तरी हे वर्ष गुरू, राहू नि शुक्राच्या सान्निध्यातून उत्तम मार्गक्रमण करील. आपल्या जवळपासची माणसे तुमच्याशी शत्रूच्या रूपात वावरतील. त्यांच्या क्षुद्र विचारांचा त्रास आपण करून घेऊ नका. कृपया हे प्रसंग नाटक-सिनेमातले समजून विसरून जा. ११ सप्टेंबपर्यंतची गुरूची साथ खूप महत्त्वाची ठरेल. त्यातूनच आपल्या प्रगतीची वाट तयार होईल. विशेषत: महिलांना समजुतीचे धोरण फायदेशीर ठरेल. परिश्रमाचे सार्थक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष मेहनत घ्यावी.

नोव्हेंबर २०१६ : शुक्राचा उत्तम सहयोग, आर्थिक लाभ होतील. नोकरी-उद्योगधंद्यात नवीन योजनांचे स्वागत होईल. मुलांना शिक्षणासाठी परदेशगमनाचा योग आहे. आरोग्य ठीक राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा वाढेल, त्यातून आनंद मिळेल.

डिसेंबर २०१६ : शुक्र, बुधाचा उत्तम सहयोग. गुरूचा पितृतुल्य आशीर्वाद, त्यामुळे कामामध्ये विशिष्ट गती प्राप्त होऊन कामाचा उरक चांगला राहील. मानसिक ताणाखाली राहू नका. शांती नि संयम राखा.

जानेवारी २०१७ : १४ जानेवारीला रवी मकर राशीत जाईल. त्या- आधी महत्त्वाची कामे उरका. जुनी येणी, जमीन, स्थावर व्यवहारात आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वादविवाद टाळा, समजुतीने घ्या.

फेब्रुवारी २०१७ : शुक्राचे उत्तम पाठबळ आहे. बऱ्याच नवीन जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक लाभात भर पडेल. पेचप्रसंग सुटतील, मात्र राजकारणी, पुढारी लोकांपासून अंतर ठेवून राहा. आपल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. स्पष्ट मते मांडू नका.

मार्च २०१७ : दशमात राहू, धनस्थानात शनी, पंचमात शुक्र, रवी. एकूण ग्रहांचे उत्तम सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. गैरसमजुतीतून निर्माण होणारे वादविवाद मिटतील. कोर्टकचेरीची कामे होतील. नोकरीधंद्यात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. धार्मिक कार्यात विशेष आनंद लाभेल.

एप्रिल २०१७ : शुक्र, रवी, राहू, गुरूच्या मदतीने या महिन्यात खूपशा गोष्टींना सकारात्मक स्वरूप प्राप्त होईल. पैशाची आवक वाढेल. नवीन कल्पना, योजना यामधून उद्योगधंद्यात प्रगती होईल, तर महिला विशेष आनंदीदायक घटना अनुभवतील.

मे २०१७ : राहू, गुरू, शुक्र यांची उत्तम मदत लाभेल. मंगळ, रवी कौटुंबिक सुखात वादग्रस्त ठरतील, ते आपण सामंजस्याने घ्यावे. प्रसंगावधानातून मार्ग मिळेल. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नफा होईल. शरीरस्वास्थ्य लाभेल, उत्साह वाढेल.

जून २०१७ : राहू, गुरूचे उत्तम सहकार्य, अष्टमात रवी, काही वैचित्र्यपूर्ण घटना अनुभवास येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जा. अतिउत्साह, अतिआततायीपणा, बेपर्वाई, गोंधळ, आळशीपणा जरूर टाळा. शांतचित्ताने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

जुलै २०१७ : १६ जुलैला रवी भाग्यस्थानात प्रवेश करीत आहे नि त्यात राहू, गुरूचे उत्तम सहकार्य मिळेल. आपण ठरवलेल्या गोष्टींची पूर्तता होऊ लागेल. आनंददायक घटना घडतील. मानसन्मानाचे योग जुळून येतील. संयमाने हाताळलेल्या घटनांचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील.

ऑगस्ट २०१७ : बुध, रवी, राहू उत्तम स्थितीत. वातावरणात खूप बदल होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत झालेले गैरसमज दूर होतील. धनलाभाचे योग, जुनी येणी वसूल होतील. महिला मौल्यवान वस्तूची खरेदी करतील, आरोग्याची काळजी घ्या.

सप्टेंबर २०१७ : १२ सप्टेंबरला गुरू व्ययात, शनी स्वराशीत, अशा स्थितीत बुध, शुक्र नि रवीचे उत्तम सहकार्य लाभेल. हितशत्रूशी समजुतीने वागण्यात फायदा होईल. तीर्थक्षेत्री प्रवास होईल. घरांतील निर्णय घेताना वडीलधाऱ्या मंडळीशी विचारविनिमय करावा, प्रकृतीची काळजी घ्यावी.

ऑक्टोबर २०१७ : १७ ऑक्टोबरला रवी तूळ राशीत येत आहे. त्याआधी महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मंगळ, बुधाच्या सहकार्यातून नवीन कामे, नवीन योजनांची सुरुवात होईल. व्यवसायात, भागीदारीत वादाचे प्रसंग टाळा. जमीने खरेदी-विक्री व्यवहार फायदेशीर ठरतील. २६ ऑक्टोबपर्यंत शनी वृश्चिक राशीत आहे. साडेसातीचा काळ त्रासदायक वाटणार नाही.

धनू : मोलाची मदत होईल

साडेसाती चालू आहे, पण राहूचे उत्तम पाठबळ लाभेल, तर १२ सप्टेंबर २०१७ ला तूळ राशीत प्रवेश करणारा गुरू उत्तम आधार देणारा ठरेल. शुक्राचा वर्षभरातला प्रवास आनंद देईल. सामाजिक क्षेत्रात व राजकारणात आपल्या विचारांचे कौतुक होईल. नवीन योजना, नव्या कल्पना पूर्ण स्वरूपात साकार होतील. विशेष म्हणजे सुखदु:खात आपले स्थिरत्व इतरांना खूप आधार वाटेल. संयम नि साहस यातून या वर्षांचा प्रवास सुखदायक कराल. महिलांना कलाकौशल्य व अध्यात्मात आनंद लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याअभ्यासात विशेष प्रगती होईल.

नोव्हेंबर २०१६ : १६ नोव्हेंबरपूर्वी रवी तूळ राशीत असणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाची कामे करावीत. धन स्थानात मंगळ. मोजकेच बोला. बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरी, उद्योग, धंद्यात आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडाल. नवीन कामे, नवीन योजना पुढे येतील.

डिसेंबर २०१६ : शुक्र राहूचे उत्तम सहकार्य, त्यात स्वराशीत छान

ग्रहस्थिती. शक्यतो शत्रुत्व, संघर्ष टाळा. आलेल्या संधी स्वीकारून त्यात लक्ष घाला. पैसे कमावण्यापेक्षा ते टिकवणे खूप महत्त्वाचे, हे लक्षात असू द्यात.

जानेवारी २०१७ : १४ जानेवारीच्या आधी महत्त्वाचे निर्णय घ्या. पराक्रमात शुक्र, मंगळ असल्याने उद्योगधंद्यात, नोकरीत यशस्वी व्हाल. नवीन कामे, नवीन योजना हाती येतील. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक होईल. धावपळ वाढेल. घाईगर्दीने निर्णय घेऊ नका.

फेब्रुवारी २०१७ : पराक्रमात रवी. एकूण आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन संधी, नवीन कामे यातून दगदग वाढेल. त्यातही कामाचा उरक चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मार्च २०१७ : महत्त्वाची कामे सुरुवातीच्या दोन आठवडय़ात पूर्ण करा. ग्रहस्थिती काहीशी विरोधात राहील. गैरसमज, वादविवाद होतील. पण राहूच्या मदतीने त्यात कुठे अतिरेक होऊन त्रास होणार नाही. पैशाची आवक ठीक राहील.

एप्रिल २०१७ : महिन्याच्या उत्तरार्धात रवी पंचमात, तर षष्ठात मंगळ आहे. एकूण कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. नवीन ओळखी परिचयातून कार्याची व्याप्ती वाढेल. सामाजिक कार्यात मानसन्मानाचे प्रसंग येतील. एकूण हा महिना मानसिक दृष्टीने खूप चांगला जाईल.

मे २०१७ : पंचमात बुध, षष्ठात मंगळ, रवीसारखे  ग्रह आहेत. त्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत फारसा विरोध होणार नाही. घरातील वातावरण आनंदी राहील, मात्र आपण शांत व संयमाने राहा. वागण्या-बोलण्यातला अतिरेक टाळा. नवीन संधी उपलब्ध होतील, पण अधिकाराचा गैरवापर करू नका.

जून २०१७ : पंचमात शुक्र षष्ठात १४ जूनपर्यंत रवी, भाग्यात राहू. घरांतील तरुण मुलामुलींचे विवाह जमतील. घरातील वातावरण आनंदी राहील. नातेवाईक, मित्रमंडळीत झालेले गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

जुलै २०१७ : १६ जुलैपर्यंत रवीची उत्तम साथ लाभेल. राहू भाग्यात. उत्तरार्धात अष्टमात रवी मंगळ. व्ययात शनी. एकूण संमिश्र ग्रहमान राहील. साहस, जिद्द, हट्टीपणा करू नये.

ऑगस्ट २०१७ : बुध, रवी, राहू, शुक्र ग्रहांची उत्तम साथ लाभेल. संघर्ष संपेल. उद्योगधंद्यात नोकरीत उत्तम संधी चालून येतील. घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आपल्या नम्रतेचे कौतुक होईल.

सप्टेंबर २०१७ : १२ सप्टेंबर गुरू तूळ राशीत आहे. त्यात बुध, शुक्राची उत्तम साथ. एकूण ग्रहसौख्य उत्तम लाभले आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. उद्योगधंद्यात, नोकरीत सहकार्याचे वातावरण राहील. लाभदायक घटनांतून धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

ऑक्टोबर २०१७ : गुरु- रवी- शुक्र यांच्या सहकार्यातून रेंगाळलेल्या कामांना वेग येईल. पैशाची आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात भाग घ्याल. आरोग्य चांगले राहील.

शनी साडेसातीतही रवी-शुक्राच्या सहवासातून खूपशा गोष्टींत सहजता प्राप्त होईल. त्यामुळे वर्षभर या राशीचा प्रवास कठीण वाटणार नाही.

मकर : स्थिर राहा

वर्षभर गुरूचे उत्तम साह्य़, तर रवी शुक्राच्या शुभराश्यांतरातून मिळणारे आत्मिक समाधान मिळेल. हेच समाधान शोधण्यासाठी आपल्या मनाची पायपीट सुरू असते, पण शुभ ग्रहांच्या उत्तम स्थितीत हे सुख आपल्यापाशी येऊ लागेल. त्यातूनच श्रम आणि बुद्धी यांच्या गुणाकारातून आपले भाग्य अधिकाधिक उजळेल. २६ जानेवारी २०१७ पासून शनी साडेसातीचे पहिले पर्व सुरू होईल. पण त्यामुळे चिंताग्रस्त होऊ नका. महिलांना कामात आनंद लाभेल. श्रमाचे सार्थक होईल. विद्यार्थ्यांना कला- क्रीडाक्षेत्रात विशेष संधी प्राप्त होतील.

नोव्हेंबर २०१६ : उद्योगधंद्यात, नोकरीत वादविवाद टाळा. बेताल, बेकायदा वागू नका. आपल्यापाशी असलेल्या सामंजस्याचा चांगला उपयोग करा. निर्णय घेताना संयम, सावधानता ठेवा. पैसे काळजीपूर्वक खर्च करा.

डिसेंबर २०१६ : शनी, गुरूचे उत्तम साह्य़ लाभेल. नोकरी, उद्योगधंद्यात प्रगती होईल, पण हितशत्रूंचा त्रास होईल. फार चतुराईने त्यांना सामोरे जावे लागेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.

जानेवारी २०१७ : गुरू- शनी- शुक्र शुभावस्थेत आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील. बौद्धिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींशी संबंध येईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आर्थिक लाभ होईल.

फेब्रुवारी २०१७ : मंगळ- शुक्र सहयोगातून खूपशा कामात यशस्वी व्हाल. नवीन उद्योगधंद्याविषयीच्या योजना आखाल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या वाढतील. आपल्या हरहुन्नरीपणाचे कौतुक होईल.

मार्च २०१७ : उद्योगधंद्यातील वेग कायम राहील, पण खर्चाचे प्रमाण वाढेल. गरजा वाढतील, सामाजिक कार्यात, राजकारणात भाग घ्याल. आरोग्याची काळजी घ्यावी.

एप्रिल २०१७ : गुरू, शुक्राचा उत्तम सहयोग आहे. त्यातून खूपशा समस्या संपण्याच्या मार्गावर असतील. नवीन योजना, नवीन कामे यात आपल्या कार्यकुशलतेचे कौतुक होईल. तर अडचणीतही स्थिर व संयमशीलतेने राहा.

मे २०१७ : पराक्रमातला शुक्र, नवमातला गुरू या दोन प्रमुख ग्रहांनी आपली बाजू अधिक बळकट केली आहे. फक्त चिडचिड, व्यर्थ चर्चा करू नका. आपले मनोरथ पूर्ण होईल. नेहमी सकारात्मक बोलण्याने कामे यशस्वी होतात, हे सूत्र लक्षात असू द्या.

जून २०१७ : षष्ठात १४ जूनचा रवी प्रवेश खूपसा लाभदायक ठरणार आहे. त्यात उत्तम असलेले गुरूचे बळ या सर्वातून उत्तम सामथ्र्य लाभेल. अध्यात्माची आवड निर्माण होईल. तसेच बहुतांश घडणाऱ्या गोष्टींचे अंदाज खरे ठरतील. आपले सकारात्मक विचार, चिंतन खूप लाभदायक ठरेल.

जुलै २०१७ : १६ जुलैपर्यंत रवी खूप मदतीचा ठरेल शुक्र, गुरूचेही साह्य़ उत्तम लाभेल. उद्योगधंद्यात काळजीपूर्वक वागा. महत्त्वाचे निर्णय घेताना आर्थिक लाभापेक्षा धंद्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून निर्णय घ्या. त्यातूनच खऱ्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

ऑगस्ट २०१७ : गुरू- शनीचे उत्तम सहकार्य  लाभेल. शनीच्या सामंजस्यातून परिस्थितीत खूप चांगला बदल घडून राजकारण, समाजकार्य, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रातले आपले मोठेपण अबाधित राहील. शाब्दिक चकमकी, वादविवाद टाळा. आर्थिक बाबतीत जमा-खर्चाचा ताळमेळ साधा. प्रेम, भावनोत्कटता यांचा अतिरेक टाळा.

सप्टेंबर २०१७ : १६ सप्टेंबरला येणारा रवी भाग्याच्या दृष्टीने खूप मोलाचा ठरणार आहे. त्यासोबत असलेले गुरूचे अस्तित्व, शनीचा आशीर्वाद यातून खूपशा नवीन योजना, कामे यांना चालना मिळेल. सामाजिक कार्यात आपला प्रवेश गौरवशाली ठरेल.

ऑक्टोबर २०१७ : १३ ऑक्टोबरनंतर रवी सहवास खूप नवीन संधी घेऊन येईल, तर दशमात प्रवेश करणारा बुध उद्योग, व्यापारात व नोकरीत आपल्या कामाचे अस्तित्व कायम ठेवील. मन:स्थिती चांगली राहील व मनातल्या संवादातून यश आपल्या होकाराला दुजोरा देईल. सहानुभूती, आपुलकी, दया या शब्दांच्या आधाराची जेव्हा आपल्याला खूप सवय लागते, तेव्हा कालांतराने आपल्या लक्षात येते की, शरीरापेक्षा आपण मनाने जास्त थकत चाललो आहोत. आणि हा अनुभव मकर राशीला कदापि येऊ नये म्हणून या राशीच्या लोकांनी स्वत:च्या मनाचे जास्त लाड करू नयेत.

कुंभ : मनाला बुद्धीची साथ!

आपण नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात आनंद मानत असतो. आधारापेक्षा बौद्धिक चालणे फार गरजेचे असते. आत्मविश्वासाचा जन्म मन आणि बुद्धीच्या साह्यातून होतो, पण खूपदा आत्मविश्वासाच्या अफाट कर्तृत्वात वैश्विकशक्तीच्या सहभागाचा अनामिक भास होऊ लागतो. स्पर्धेतील कौशल्यात आत्मविश्वासाची साथ मिळाल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. २६ जानेवारीला लाभस्थानात प्रवेश करणारा शनी ही आत्मविश्वासाची वाट अधिक सोपी करून देईल नि हा वर्षभराचा प्रवास आशादायी, उत्साही ठरेल. या वर्षी महिलांचे घाईगर्दीतही मन:स्वास्थ्य चांगले राहील. कामाचा पसारा वाढेल, पण त्यात आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा म्हणजे यश अधिक जवळ येईल.

नोव्हेंबर २०१६ : रवी, शुक्र उत्तम स्थितीत. उद्योगधंदा, नोकरी यातून पैशाची आवक वाढेल. पण तसे खर्चाचे प्रमाणही वाढेल. जमिनी, स्थावर इस्टेटीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कामासाठी वेळ द्यावा लागेल.

डिसेंबर २०१६ : १५ डिसेंबरनंतर रवी अधिक लाभदायक ठरेल. श्रम, साहस यातून आपल्या यशाची वाट मोकळी होईल. आपल्या शब्दाला एक वेगळी किंमत येईल. सामाजिक कार्यात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

जानेवारी २०१७ : महिन्याच्या पूर्वार्धात बहुतांश संधी, योजना पुऱ्या कराव्यात. उद्योगधंद्यात, नोकरीत पैशाची आवक छान राहील. मित्रमंडळीत वेळ आनंदात जाईल. आरोग्य चांगले राहील.

फेब्रुवारी २०१७ : धन स्थानात शुक्र, मंगळ, लाभात शनी.  महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वेळापत्रकाप्रमाणे कामाचा क्रम लावून कामे उरका. पैसा हाती येईल, पण उधळपट्टीस आवर घाला. आमिषांना बळी पडू नका.

मार्च २०१७ : शनी, शुक्र, मंगळ यांचे उत्तम सहकार्य लाभेल. जुनी येणी, जमीन, स्थावर इस्टेट यात आर्थिक लाभ होतील. आखलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील. भावनेच्या आहारी जाऊन पैसे देण्या-घेण्याचे व्यवहार टाळा.

एप्रिल २०१७ : रवी, शुक्र, शनी शुभयोगात  आहेत. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन परिचय, नवीन ओळखीतून कार्याची व्याप्ती वाढेल. लाभदायक घटनांतून पैशाची आवक होईल. वादविवाद टाळा.

मे २०१७ : महिन्याच्या पूर्वार्धात पराक्रमातील रवी उद्योगधंद्यात, नोकरीत यशदायक ठरेल; तर धनातील शुक्र आर्थिक ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल. लाभातील शनी नव्या योजना, नवीन विचारांना कृतिशीलता देईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

जून २०१७ : शुक्र, शनीचे उत्तम सहकार्य. २० जूनपर्यंत शनीचे साह्य लाभेल.  महत्त्वाची कामे त्याआधी उरकून घ्यावीत. नोकरी-उद्योगधंद्यातील निर्णय शांतपणे घ्या. उच्च अधिकाऱ्यांच्या सल्लामसलतीतून नेमके कामाचे स्वरूप ठरवा. श्रमातून यश लाभेल.

जुलै २०१७ : १६ जुलैला रवी षष्ठात त्याबरोबर मंगळाचे साह्य, चतुर्थात शुक्र.. एकूण प्रतिस्पर्धी माघार घेतील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या नावांचा लौकिक वाढेल. जुनी येणी, कामातील नफा यातून आर्थिक लाभ चांगला होईल.

ऑगस्ट २०१७ : महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाची कामे १६ ऑगस्टपूर्वी करावीत. पंचमात शुक्र. शुभ घटनांतून हळवेपणा, भावविवशता वाढेल. जुन्या आठवणी, जुनी माणसे, जुनी वास्तू या गतकालात मन गुंतू देऊ नका. अतिभावनिक राहू नका. दगदगीतून काही काळ दूर राहा.

सप्टेंबर २०१७ : ८ सप्टेंबरला राहू कर्केत, तर १२ सप्टेंबरला गुरू तुळेत आहे. एक उत्तम सुयोग आपल्या राशीला लाभत आहे. उद्योगधंद्यात, राजकारणात, नोकरीत यशदायक काल, व्यवहारात दक्षता बाळगा. जुनी येणी, वसुली यातून पैसे येतील.

ऑक्टोबर २०१७ : राहूचा पराक्रम हा या महिन्यातला खूप मोठा आधार ठरेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य ठीक राहील.  चांगल्या गोष्टी करताना मन प्रसन्न राहते व तीच प्रसन्नता आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते नि हे घडत असताना ग्रहांची साथही खूप मोलाची ठरते, याचा प्रत्यय या वर्षी कुंभ राशीला जरूर येईल.

मीन : आनंदी राहाल

या वर्षी षष्ठात राहू व सप्तमात गुरू आहे. जवळजवळ वर्षभर या दोन बलाढय़ ग्रहांची साथ या राशीला लाभणार आहे. वर्षांरंभी रवी जरी अष्टमात असला तरी तो फारसा हानिकारक ठरणार नाही. मातृत्वाच्या नजरेतून प्रेम शोधणारी ही रास दुसऱ्याच्या दु:खावर नेहमीच फुंकर मारत असते. त्यामुळे यांना जरी अडचणी आल्या तरी अनेक हात यांच्या मदतीला धावून येतील. हे वर्ष या राशीला आनंदी व सुखकर जाईल. महिलांचे प्रश्न सुटतील. त्यांच्यातील कलाकौशल्याचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. अभ्यासात उत्तम यश मिळेल.

नोव्हेंबर २०१६ : राहू, मंगळ, गुरू यांचे उत्तम सहकार्य लाभेल. महिन्याच्या उत्तरार्धात रवीच्या साह्यातून मानसन्मान लाभेल. अर्थप्राप्ती होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी.

डिसेंबर २०१६ : रवी, बुधाचे विशेष सहकार्य लाभेल. उद्योगधंद्यात, नोकरीत लाभदायक घटना घडतील. नवीन योजना हाती येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीतून आनंद मिळेल. सार्वजनिक, धार्मिक कामात भाग घ्याल.

जानेवारी २०१७ : लाभात रवी असल्याने मानसन्मानाचे योग येतील. स्वराशीत मंगळ आहे. वाहने सावकाश चालवा. अतिसंताप, राग टाळा. नोकरीधंद्यातील जबाबदाऱ्यांत वेळेला जास्त महत्त्व द्या. मौल्यवान वस्तू जपा. आरोग्य उत्तम राहील.

फेब्रुवारी २०१७ : राहू, गुरूचे पाठबळ यांचा आधार वाटेल. मंगळ, शुक्राच्या सहयोगातून प्रेमप्रकरणात गैरसमज संभवतो. वादविवाद टाळा. एका लहानशा चुकीतून नाते विस्कटू शकते. समजुतीने घ्या. उद्योगधंद्यात, नोकरीत प्रमोशन अर्थप्राप्ती होईल.

मार्च २०१७ : प्रियजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. जुनी येणी, जमीन, स्थावर इस्टेटीची खरेदी-विक्री यात अर्थलाभ  होईल. कुठल्याही बाबतीत अतिशयोक्ती नको. पथ्ये पाळा. त्यातून अडचणी, संकटे परस्पर दूर होतील. उत्तरार्धात मनासारख्या घटना घडतील.

एप्रिल २०१७ : शुक्र, बुध, मंगळ यांचे उत्तम साह्य मिळेल. अनुकूलता लाभेल. पैशाची अडचण दूर होईल. माणसाची विद्वत्ता, मोठेपण याची सुरुवात त्याच्या मनातून होते. हे मोठेपण जपा. यश तुमच्याजवळ येईल.

मे २०१७ : बुध, मंगळ, रवी यांच्या शुभयोगातून दिलासा देणाऱ्या घटना घडतील. धीर येईल. एक वेगळा आत्मविश्वास, काम करण्याची उमेद देईल. नवीन महत्त्वाची कामे हाती येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील.

जून २०१७ : मंगळ, शुक्राच्या उत्तम सहकार्यातून आर्थिक लाभाचे गणित जुळून येईल, पण खरेदीतून पैसा खर्च होईल. साहस, अतिक्रोध, उद्धटपणा टाळा. तो आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकेल. २० जूनला शनी वक्री आहे. अतिविश्वास टाळा.

जुलै २०१७ : बुध, शुक्र उत्तम योगात आखलेल्या योजनांचे शुभ परिणाम दिसू लागतील. प्रयत्न व कामाची तळमळ यातून होणाऱ्या गोष्टी पुढे सरकतील. विचाराचे सूत्र बदलल्याने मन हलके होईल.

ऑगस्ट २०१७ : १६ ऑगस्टला रवी स्वराशीत जात आहे. एकूण होणारा विरोध हळूहळू मावळेल. संघर्ष संपेल. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम यश लाभेल. आपली उत्तम मानसिकता आपले मोठेपण सिद्ध करील. शांती नि संयम खूप वेळा शस्त्रापेक्षा मोठे काम करून जातात.

सप्टेंबर २०१७ : षष्ठात मंगळ अनेक गोष्टींना साहाय्य करील. गुरू, राहूचे असहकार्य असल्याने चिंताग्रस्त होऊ नका. प्रत्येक होणाऱ्या घटनेला पर्याय असतो. आपल्या मनातील सद्हेतू पर्याय तयार करतील. आरोग्याची काळजी घ्या.

ऑक्टोबर २०१७ : वर्षांअखेर साऱ्याच ग्रहांनी पाठ फिरवली आहे. पण षष्ठात १३ ऑक्टोबपर्यंत मंगळाचे अस्तित्व  आधार ठरेल. नवीन करार, जमीन, स्थावर यांचे व्यवहार करताना जपून करावेत. राजकारणात, सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

वर्षभर रवी, शुक्राच्या शुभ भ्रमणात अनेक गोष्टींचे आकलन होईल. आत्मविश्वासाने आखलेल्या कामात उत्तम गती लाभेल.
ज्योतिषरत्न – उल्हास प्रभाकर गुप्ते