19 October 2019

News Flash

अमिताभ  पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा

‘अमिताभचे आठवावे रूप.. त्याचा आठवावा प्रताप’ असेच त्याचे गेल्या पन्नास वर्षांतले दिग्विजयी कर्तृत्व आहे.

कित्येकदा सकाळी नऊ वाजता मी माझ्या कुठल्यातरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी डबिंग थिएटरमध्ये शिरत असताना अमिताभ त्याच्या कुठल्यातरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी डबिंग उरकून बाहेर पडताना भेटायचा.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

‘अमिताभचे आठवावे रूप.. त्याचा आठवावा प्रताप’ असेच त्याचे गेल्या पन्नास वर्षांतले दिग्विजयी कर्तृत्व आहे. रूपेरी पडदा व्यापूनही दशांगुळे उरणारा हा महानायक! त्याच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्याच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा, अभिनयासह विविधांगी कर्तबाचे वेगवेगळ्या कोनांतून घेतलेले ‘थ्री-डी’ दर्शन..

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला आमची पहिल्यांदा ओळख झाली ती ‘आनंद’ चित्रपटात. तेव्हा अमिताभ बच्चन पडद्यावर होता आणि मी प्रेक्षागृहात! खरं तर त्या चित्रपटात प्रमुख भूमिका होती ‘सुपरस्टार’ राजेश खन्नाची. खेळकर, उमद्या व्यक्तिमत्त्वामागे दडलेलं दु:ख अतिशय सहजतेने लपवून ठेवणारी संवेदनशील व्यक्तिरेखा राजेश खन्नाने सुंदर साकार केली होती. तरीही सगळ्यांच्या नजरेत भरला होता तो पडद्यावर नव्याने पदार्पण करणारा अमिताभ! मोजकं बोलणारा, किंवा अनेकदा न बोलता खूप काही सांगून जाणारा कलावंत म्हणून तो मला अतोनात भावला होता. शिवाय सहकलाकारावर कोणत्याच प्रकारे कुरघोडी न करता सहज मात करणारा एक ताकदवान अभिनेता अशीही त्याची ओळख माझ्या मनात ठसली होती. त्याच्या  खर्जातल्या आवाजाबरोबरच, किंबहुना किंचित जास्तच आवडली होती ती त्याची प्रखर असूनही संयत अभिनयशैली! या सगळ्या आयुधांचा योग्य तसा वापर करायची त्याची हातोटी तर ‘नवशिका’ या बिरुदाला न साजेशीच होती. त्यानंतर लगेच वर्षभरात- १९७२ मध्ये त्याच्या लंबूटांग्या शरीराला बिलकूल न साजेलशा पद्धतीने ‘‘देखा ना, हाय रे सोचा ना’’ असं म्हणत तोच गंभीर अमिताभ ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये आला. ज्या बेभानपणे, अक्षरश: उलटसुलट होऊन त्याने जो धिंगाणा-नाच केला होता, त्या रसायनाबद्दल उत्सुकता बघता बघता वाढायला लागली होती.

फक्त पडद्यावरच गाठीभेटी झालेल्या या अभिनेत्याशी प्रत्यक्ष भेट मात्र अगदी अनपेक्षितरीत्या झाली. १९७४ मध्ये माझा ‘रजनीगंधा’ झळकला होता आणि त्यानंतर ‘छोटीसी बात’चं शूटिंग नुकतंच सुरू झालं होतं. त्यादरम्यान एका संध्याकाळी नाटकाची तालीम संपल्यावर सत्यदेव दुबे मला आग्रहाने परवीन बाबीच्या घरी घेऊन गेला. तिथे एक अतिशय खाजगी, घरगुती पार्टी रंगली होती. परवीनने दुबेचं आणि माझं आपुलकीने स्वागत केलं. महेश भट, जया बच्चन, रोमेश शर्मा अशा लोकांशी ओळख करून दिली. थोडय़ा वेळाने एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या अमिताभशी ओळख झाल्यानंतर थोडय़ा गप्पा झाल्या. परत येताना लक्षात राहिले ते- अतिशय मोकळेपणाने, अघळपघळ बोलणारी जया आणि खूप कमी बोलणारा, बुजरा अमिताभ. आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची सुंदर ओघवती हिंदी! सत्यदेव दुबे, डॉ. धर्मवीर भारती, कमलेश्वर यांसारख्या दिग्गजांच्या उत्कृष्ट हिंदीचे  संस्कार माझ्यावर होत असतानाच त्याच घराण्यातली हिंदी अमिताभच्या तोंडून ऐकल्यामुळे मी सुखावल्याचंही मला आठवतं. त्यानंतर काहीच महिन्यांनी ‘छोटीसी बात’च्या शूटिंगदरम्यान ‘पाहुणा कलाकार’ म्हणून घाईघाईत शॉट देऊन जाताना माझ्याशी आपुलकीने दोन शब्द बोलून जायला तो विसरला नाही. या आमच्या पडद्याबाहेरच्या भेटीनंतर पडद्यावरच्या भेटी वाढत गेल्या. ‘शोले’, ‘डॉन’, ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’मुळे शिगेला पोचलेली त्याची लोकप्रियता आपण सगळेच अनुभवत होतो. एव्हाना माझा ‘चितचोर’ही आला होता. आणि ‘टॅक्सी टॅक्सी’, ‘दामाद’सारख्या खुसखुशीत चित्रपटांच्या यशाबरोबर माझा प्रवासही यथासांग चालला होता. त्यामुळे पडद्याबाहेरच्या आमच्या ओझरत्या भेटीही वाढत गेल्या. आणि हळूहळू माझ्यात नसलेला एक गुण मला त्याच्यात जाणवायला लागला. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मी अवघडून जाऊन ‘मी विशेष कोणी नसून तुमच्यातलाच आहे’ असं दाखवून द्यायचा प्रयत्न करत राहायचो. ती प्रसिद्धी कवचासारखी स्वत:भोवती पांघरून स्वत:चं वलय वाढवत जाणं, स्वत:चा मोठेपणा, वेगळेपणा ‘मिस्टिफाय’ करत राहणं मला कधीच पटलं नाही, वा जमलं नाही. अमिताभने ते खूप सहजगत्या, कलात्मक इतमामाने जपलं.. आयुष्यभर!

कित्येकदा सकाळी नऊ वाजता मी माझ्या कुठल्यातरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी डबिंग थिएटरमध्ये शिरत असताना अमिताभ त्याच्या कुठल्यातरी चित्रपटातल्या भूमिकेसाठी डबिंग उरकून बाहेर पडताना भेटायचा.

(सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आणि आजच्या पिढीला माहितीसाठी थोडंसं- सत्तरी आणि ऐंशीच्या दशकात चित्रपट तंत्रात मोठे बदल झाले होते. विशेषत: अ‍ॅरिफ्लेक्स कॅमेऱ्याच्या आगमनामुळे आधीच्या काळात शूटिंग्ज जशी व्हायची तशी फक्त स्टुडिओतच न होता खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर, भर गर्दीत, उन्हापावसात कुठेही करणं शक्य झालं होतं. पण त्या कॅमेऱ्याच्याच ‘खर्र्र्र्रखराटा’मुळे, तसंच लोकशनवरच्या  कमी-जास्त गलक्यामुळे प्रत्येक चित्रपट पुनर्मुद्रित करणं केवळ अनिवार्य झालं होतं. म्हणजे शूटिंगच्या वेळी सर्व पात्रांनी बोललेले सगळेच्या सगळे संवाद तर पुनर्मुद्रित करायला लागायचेच, त्याचबरोबर व्यक्तिरेखांच्या अस्तित्वाशी निगडित इतर अनेक ध्वनीही- चालताना येणारा पावलांचा आवाज, दार उघड-बंद  होण्याचा आवाज, झालंच तर पलीकडच्या घरातून ऐकू येणारे गाण्याचे मंद सूर, वा गल्लीतून भरधाव गेलेल्या फटफटीचा कर्कश्श आवाज- मुद्रित करून चित्रपटाच्या ध्वनिमालेत भरावे लागायचे. शिवाय ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानातही अनेक बदल झाले होते. गंमत म्हणजे माझे अनेक समकालीन कलावंत अशा पद्धतीने ‘डबिंग’ करायला नाखूश असायचे. उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या भावना आणि संवादातले चढउतार पुन्हा तशाच समर्थपणे व्यक्त करता येत नाहीत असं मानणारा एक मोठा वर्ग होता. माझा दृष्टिकोन मात्र अगदी विरुद्ध होता. शूटिंगच्या वेळेला अभिनेत्याला कित्येक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लेखकाने लिहिलेले संवाद इमानेइतबारे, चोख म्हणण्यापासून ते नायिकेच्या चेहऱ्यावर त्याची सावली येऊ नये याची खबरदारी घेणं, तसंच अमुक वेळेला अमुक ठिकाणी अचूक पोचण्यापासून ते दूरवरून त्याच्यासाठी दिलेला खास प्रकाशझोत बरोब्बर चेहऱ्यावर घेणं.. अशी अनेक अवधानं सांभाळून मग जमलंच तर अभिनय करायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आधी ठरवून किंवा तालमीत घोटवून मग केलंय असं भासवू न देता, अगदी विसाव्या वा बाविसाव्या ‘टेक’मध्येसुद्धा अभिनयातला ताजेपणा आणि उत्स्फूर्ततेचा आभास टिकवून ठेवणं, हे ‘अभिनेता’ असं बिरूद लावणाऱ्याचं मूलभूत कर्तव्य आहे असं मानणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक होतो आणि आजही आहे. एकदा या दृष्टिकोनातून डबिंगकडे पाहिलं की मग शूटिंगच्या वेळी बोललेल्या संवादांमधले आवाजातले चढउतार आणखी जास्त प्रभावी पद्धतीने सादर करण्याचा हा मार्ग मला कायमच सोपा वाटला आणि आवडला. स्वत:च्या अभिनयाला आपण स्वत:च डबिंग करून थोडंसं जास्त सजवू शकत असलो तर ती संधी का दवडावी? आणि हेही, की आपला आवाज कुठल्याही जातकुळीचा असला तरी सकाळी त्यामध्ये खर्ज छानच असतो. त्याचाही योग्य वापर का करू नये? असो.)

तर अनेकदा दिवसाची सुरुवात अमिताभ-भेटीने व्हायची. थोडय़ाफार गप्पांमध्ये एकमेकांच्या आवडलेल्या चित्रपटांविषयी, एखाद्या भूमिकेबद्दल, तर कधी अभिनेता म्हणून भावलेल्या काही खास क्षणांना दाद द्यायची संधीही दोघांना मिळत असे. एकदा त्याच्या ‘चुपके चुपके’मधल्या विनोदी अभिनयासाठी त्याचं कौतुक केल्यावर अवघडल्यासारखा होऊन, ‘‘अमोल, मुझे शर्मिदा मत कर यार!’’ असं म्हणाला. आणि त्याची कमी बोलण्याची सवय बाजूला सारून बरंच बोलला. ‘हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर माहीत नसलेली नर्मविनोदी शैली ‘छोटीसी बात’, ‘दामाद’ वगैरे भूमिकांमधून तू रुजवलीस. शिवाय नाटय़ात्मक अभिनय पठडीपलीकडे जाऊन संयत आणि तरीही प्रभावी अभिनयाचा वस्तुपाठ तू घालून दिलास,’ अशी माझी मन:पूर्वक स्तुती केल्यावर अवघडून जायची पाळी माझ्यावर आली होती. पण तिथेच न थांबता त्याने ‘भूमिका’मधल्या माझ्या खलनायकी व्यक्तिरेखेबद्दल बोलताना माझा हात घट्ट धरला. काळ्या-पांढऱ्याच्या मधल्या राखाडी रंगाच्या अनंत छटा कुठेही बटबटीतपणे भृकुटी वक्र न करता सूक्ष्मरीत्या दाखवल्याबद्दल माझं भरभरून कौतुकही केलं. दुबेकडून क्वचित मिळणाऱ्या कौतुकभरल्या कटाक्षानेही भरून पावणाऱ्या मला इतक्या सढळ स्तुतीची सवय नव्हतीच. त्या दिवशी संकोचापोटी नॉनस्टॉप सिगरेट ओढत बसलेली माझी प्रतिमा आजही सुखावून जाते.

त्यानंतर पडद्याबाहेरच्या गाठीभेटी अधूनमधून होत राहिल्या; पडद्यावरचे आमचे दोघांचेही प्रवास जोरात चालू होते. १९८० मध्ये ‘गोलमाल’साठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचं फिल्मफेअर अ‍ॅवार्ड मला मिळालं. विशेष म्हणजे त्याच वर्षी अमिताभला ‘काला पत्थर’ आणि ‘मिस्टर नटवरलाल’साठी, राजेश खन्नाला ‘अमरदीप’साठी आणि ऋषी कपूरला ‘सरगम’साठी नॉमिनेशन्स होती. अशा मातब्बर स्टार्सच्या स्पर्धेत माझ्या पारडय़ात पडलेलं बक्षिसाचं माप नक्कीच अमोल होतं! माझ्या बरोबरीने सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जया बच्चनला मिळाला होता. समारंभ पार पडल्यानंतर आमचं अभिनंदन करायला लागलेली रीघ ओसरल्यावर अमिताभने त्याच्या बुजऱ्या पद्धतीने आमचं अभिनंदन केलं. एव्हाना त्याचा पडद्यावरचा प्रवास ‘सुपरस्टार’च्या दिशेने चालला होता. ‘दीवार’ (१९७५) पासून सुरू झालेली त्याची घोडदौड ‘शोले’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारख्या प्रचंड लोकप्रिय चित्रपटांमुळे आणखीनच भरधाव झाली हाती. आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला तर ‘नसीब’, ‘लावारिस’, ‘याराना’च्या धंदेवाईक यशामुळे त्याच्या लोकप्रियतेची उंची त्याच्या शारीरिक उंचीला शोभेशी झाली होती यात नवल नाही.

या सगळ्या मुख्य धारेच्या महापुरात त्याचा समांतर चित्रपटाशी असलेला धागा मात्र पार निसटून गेला. ‘सौदागर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘आलाप’ अशा अतिशय संवेदनशील, आगळ्यावेगळ्या भूमिकांतून दिसणारे त्याचे अनेकविध पैलू हळूहळू पडद्यावर दिसेनासे झाले होते. किंबहुना, १९७७ मध्ये ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’ची तुफान लोकप्रियता आणि ‘आलाप’चं जबरदस्त अपयश एकाच वर्षी आल्यावर त्याने समांतर चित्रपटांकडे निग्रहाने पाठ फिरवली होती. त्याविषयी माझ्याशी बोलताना एकदा हृषिदा म्हणाले, ‘‘अमू बेटा, त्यानंतर अमितने माझे फोन घेणंसुद्धा बंद केलं याचं दु:ख ‘आलाप’च्या अपयशापेक्षा कितीतरी जास्त घाव घालणारं होतं.’’ हृषिदांचे ते पाणावलेले डोळे माझ्या आठवणीत आजही ताजे आहेत. अमिताभचा त्यांच्यासोबतचा नऊ-दहा चित्रपटांचा सहप्रवास अशा तऱ्हेने संपावा, हे शल्य त्यांना विसरता न येणारं होतं. पण हिंदी चित्रपटसृष्टीची वाटचाल बघितली- विशेषत: समांतर चित्रपटांच्या कालखंडात डोकावलं तर फक्त गल्लाभरू चित्रपटांच्या लाटेत हरवून न गेलेले मी, स्मिता, शबाना, नसीर आणि ओमसारखे हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगे अपवादच आढळतात. एरवी ‘ईप्टा’सारख्या व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या नाटय़संस्थेतून आलेला संजीवकुमारसुद्धा मुख्य धारेत यशस्वी झाल्यानंतर समांतर धारेपासून दूरच राहिला. ‘दस्तक’, ‘कोशिश’, ‘शतरंज के खिलाडी’सारख्या चाकोरीबाहेरच्या चित्रपटांतल्या सहभागाच्या तुलनेत त्याचा ‘मल्टीस्टारकास्ट’ मसाला फिल्म्समधला वावर बघितला की माझ्या विधानाची प्रचीती सहज येईल!

आम्हा दोघांच्याही कारकीर्दीचा व्याप वाढत गेल्यामुळे साहजिकच आमच्या भेटी- पडद्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्या- तुरळक होत गेल्या. अर्थात, मी जुहूला ‘चिरेबंदी’ बंगला उभारल्यानंतर त्याच्याकडून ‘‘शेजारी म्हणून मन:पूर्वक स्वागत’’ अशी चिठ्ठी आणि भलामोठा पुष्पगुच्छ आला होता. नंतर एकदा कुठल्यातरी राष्ट्रीय कार्यासाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने अहमदाबादला फिल्मस्टार्सची क्रिकेट मॅच आयोजित केली होती. तेव्हा अमिताभने मी त्याच्या टीमतर्फे खेळावं यासाठी आवर्जून फोन केला होता आणि अमजद खान, मिथुन चक्रवर्तीसकट आम्ही सगळे क्रिकेटची मजा मनमुराद लुटून आलो होतो. तसंच एकदा फिल्मसिटीत माझ्या मेकअपरूमच्या जवळच त्याची खोली दिसली. (तेव्हा व्हॅनिटी व्हॅनचे दिवस आले नव्हते.) चौकशी केल्यावर त्याने आग्रहाने जेवायला बोलावलं. मग त्याच्या खोलीत बसून रेखा, तो आणि मी एकमेकांना आपापल्या घरून आणलेल्या डब्यांतल्या पदार्थाची चव देत मस्त गप्पा मारल्या होत्या.

१९८० मध्ये मी ‘आक्रीत’ बनवला आणि माझ्या दिग्दर्शन कारकीर्दीला सुरुवात केली. वर्ष- दीड वर्षांनंतर मी ‘ओळंगल’ नामक बालू महेन्द्र दिग्दर्शित मल्याळी सिनेमात काम करत होतो. आमच्या शूटिंगचं एक सत्र बंगलोरच्या स्टुडिओत होतं. तिथेच पलीकडच्या सेटवर अमिताभचं ‘अंधा कानून’चं शूटिंग चाललं होतं. दिवसातून दोन-तीनदा आपापल्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात चहा-कॉफीच्या निमित्ताने आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अचानक एकदा त्याने मला ‘आक्रीत’ कसा बघायला मिळेल, असं विचारलं. मी तातडीने मुंबईहून चित्रपटाची इंग्लिश सबटायटल्ड प्रिंट मागवली आणि शूटिंग संपल्यावर संध्याकाळी ‘आक्रीत’ दाखवला. स्टुडिओतल्या अद्ययावत रेकॉर्डिग थिएटरमध्ये आम्ही तिघेच- माझ्या एका बाजूला अमिताभ आणि दुसऱ्या बाजूला बालू! दोघेही अधूनमधून त्यांचे काही प्रश्न माझ्या कानात कुजबुजत होते. पैकी काहींची उत्तरं लगेच देऊन, तर काहींची ‘‘नंतर सांगतो..’’ असं म्हणून मी दोघांचं समाधान करत होतो. कार्यक्रम संपेस्तोवर बराच उशीर झाला होता, तरीही त्याबद्दल गप्पा उद्या-परवावर न ढकलता आत्ताच करूया असा आग्रह अमिताभने धरला. गप्पांची सुरुवात बालूच्या रसग्रहणाने झाली. फिल्म इन्स्टिटय़ूटमधून प्रशिक्षण घेतलेला यशस्वी छायाचित्रकार आणि प्रथितयश दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेतून त्याने केलेलं विश्लेषण- त्याच्या कौतुकापेक्षा माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. विशेषत: मानवत खुनाच्या सत्य घटनेवर आधारलेल्या या कलाकृतीमध्ये एकही हत्या वा हिंसात्मक घटना न दाखवता दिग्दर्शक म्हणून मी उभ्या केलेल्या भयाचं दृश्यात्मक स्वरूप त्याला खूप भावलं होतं. अमिताभने मला अभिनेता म्हणून दिलेली दादही पुन्हा एकदा सुखावणारी होती. त्याने आवर्जून ‘भूमिका’ची आठवण काढली. त्या दोन खलनायकांमधला फरक विशद करून दाखवला. ‘मध्यमवर्गीय, शहरी आणि दांडग्या, ग्रामीण देहबोलींचा वापर तू अप्रतिम केलास.. ’ हा उल्लेख तर अजूनही माझ्या कानात घुमतो. शिवाय ‘भूमिका’मध्ये वापरलेली किंचित वरच्या सुरांची पट्टी आणि ‘आक्रीत’मधल्या खालच्या सुरांतला भेदकपणा असे सूक्ष्म फरक त्याने दाखवून दिले. किती दर्दीपणे आणि मनापासून ही व्यक्ती चित्रपटाचा आस्वाद घेते हेही प्रखरपणे त्यातून जाणवलं.

– ‘‘नायक म्हणून लोकप्रिय आणि यशस्वी कारकीर्दीच्या शिखरावर असताना मुख्य धारेच्या विरुद्ध जाण्याची गरज तुला का वाटली?’’

– ‘‘दिग्दर्शक झालेल्या अभिनेत्याला- उदा. गुरुदत्त, मनोजकुमार- इतर दिग्दर्शक फारसे जवळ करत नाहीत, हा आपल्या इंडस्ट्रीचा अनुभव असताना या टप्प्यावर तू हा धोका का पत्करलास?’’

– ‘‘आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या हलक्याफुलक्या चित्रपटांसाठी प्रेक्षक तुझ्यावर अतोनात प्रेम करतात, तशाच घराण्यातला सिनेमा तू का नाही बनवलास?’’

रसग्रहणात्मक सगळं बोलून झाल्यावर त्याने प्रश्नांची सरबत्तीच केली होती. त्याच्या सगळ्या प्रश्नांना माझं खरंखुरं उत्तर एकच होतं- ‘नाटय़क्षेत्रात वा चित्रपट व्यवसायात आजवर मी कधीच आर्थिक किंवा धंदेवाईक यशापयशाची गणितं मांडून काही केलं नाही. माझ्या दृष्टीने ती कलाकृती साकार करताना मिळणारा सृजनात्मक आनंद नेहमीच अग्रभागी राहिला आहे.  असं असूनही मी जे काही केलं ते लोकांना भावलं आणि मी यशस्वी होत गेलो, हा त्यातला अत्यंत सुखद भाग!’ माझं बोलणं ऐकून बालूने मला घट्ट मिठी मारली आणि निघून गेला. अमिताभ मात्र बराच वेळ नि:शब्द बसून होता. मला एव्हाना त्याच्या मितभाषीपणाची सवय झाली असली तरी त्याच्या मौनातही अधूनमधून उमटणारे परिचित हुंकार बराच वेळ ऐकू नव्हते आले. मग एकाएकी तो उठला आणि ‘‘बहुत देर हो गयी..’’ असं काहीसं पुटपुटून लांब टांगा टाकत निघून गेला. रात्र बरीच सरली होती हे लक्षात आल्यावर मीही उठलो आणि माझ्या हॉटेलवर गेलो.

त्यानंतर पडद्याबाहेर आमची पुन्हा एकदा भेट झाली ती जवळजवळ सतरा-अठरा वर्षांनंतर! ‘पहेली’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून त्याने काम करावं, ही माझी इच्छा मान्य करून अमिताभ शाहरुखच्या बंगल्यावर आला.. व्यक्तिरेखा समजून घ्यायला, तसंच त्याचा ‘लुक’ आणि कॉस्च्युम्स’ वगैरे संदर्भात जाणून घ्यायला, आणि शूटिंगच्या आदल्या संध्याकाळी नेमके सीन्स आणि संवाद यावर चर्चा करायला! कामाचं सगळं सविस्तर बोलून झाल्यावर निघताना त्याने विचारलं, ‘‘अमोल, शूटिंगला उद्या किती वाजता येणं अपेक्षित आहे?’’ मी म्हटलं, ‘‘सकाळी ७ वाजता.’’ तो थबकला आणि म्हणाला, ‘‘नाही, मी शिफ्टची वेळ नाही विचारली. मी कधी येऊ ते सांग.’’ मी म्हणालो, ‘‘तू जर सेटवर तयार होऊन ७ वाजता आलास तर मी ७.१५ ला पहिला शॉट घेईन.’’ क्षणभर त्याने माझ्याकडे रोखून बघितलं आणि एक हुंकार भरून दिसेनासा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या ठोक्याला तो फिल्मसिटीत आला आणि सातच्या ठोक्याला माझ्यासमोर व्यवस्थित तयार होऊन हजर झाला. ‘‘रिपोर्टिग टू यू, सर!’’ असं म्हणून त्याने एक कडक सलामही ठोकला. मी हसून त्याचं स्वागत केलं आणि दिलेल्या शब्दाला जागून आम्ही पहिला शॉट घेतला तेव्हा ७ वाजून १० मिनिटं झाली होती. पण खरी गंमत पुढेच होती. अमिताभच्या आणि दोन्ही शाहरुखच्या जादुई शॉट्ससाठी ‘Milo motion Rig’ आणि हॉलीवूडचे तंत्रज्ञ मागवले होते. डबल रोलच्या नेमकेपणासाठी आणि दोन शाहरुख एकमेकांसमोर अंतर राखून उभे न राहता एकमेकांच्या किंवा इतर पात्रांच्या अवतीभवती फिरू शकावेत, एकमेकांना वा तिसऱ्याला स्पर्श करू शकावेत, यासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करत होतो. भारतीय चित्रपटसृष्टीत अगदी पहिल्यांदाच असा प्रयत्न आणि वापर केला गेला. ते सगळं बघितल्यावर अमिताभ त्याचा शॉट संपल्यानंतरही तिथून हलायला तयार नव्हता. अतोनात गर्मीची पर्वा न करता अगदी लहान मुलाच्या उत्सुकतेने तिथेच बसून राह्यचा. अनेक प्रश्न विचारायचा. मला हवा तसा शॉट मिळाल्यावर त्याचा चेहरा आनंदाने फुलून जायचा. असं संध्याकाळपर्यंत चालूच राहिलं. मी त्याला ‘‘पॅकअप् फॉर यू, अमित..’’ असं सांगितल्यावर तो उठला आणि उत्साहाने म्हणाला, ‘‘उद्याही आजच्यासारखंच ना?’’ माझा हात घट्ट दाबून त्याने माझा निरोप घेतला आणि त्याच्या राजस्थानी पेहरावात लांब लांब टांगा टाकत निघून गेला.

त्याच्याबरोबर त्या तीन-चार दिवसांच्या शूटिंगमध्ये मला क्षणोक्षणी जाणवत राहिला तो त्याचा ओसंडून जाणारा उत्साह! तसंच रणरणत्या उन्हाची पर्वा न करता किंवा पहाटे उठून येण्याबद्दल आढेवेढे न घेता कामात झोकून देण्याची त्याची वृत्ती! दिग्दर्शकाला हवं ते साकार करण्यासाठी प्रत्येक शॉटमध्ये सर्वस्व पणाला लावण्यामागची त्याची असोशी! एका जबरदस्त आत्मविश्वासाने कॅमेऱ्याला नव्याने सामोरं जाण्यामागचं झपाटलेपण! हे सगळं अनुभवत असताना आठवली- हृषिदांकडून ऐकलेली आणखी एक गोष्ट.. कित्येक वर्षांपासून अमिताभला निद्रानाशाचा विकार आहे. पण त्याबद्दल कुरकुर न करता तो रोज रात्रभर सितार घेऊन बसतो आणि रियाज करतो. अगदी पहाटे डोळे जड होईस्तोवर! हृषिदा स्वत: अतिशय उत्तम सतारवादक होते अािण त्यांच्याकडून अमिताभच्या वादनाला ‘‘शुन्दोर, भीषोण भालो’’ असं प्रशस्तीपत्रक मिळणं विशेष होतं.

त्यानंतर दीडेक वर्षांनी मी अमिताभचा दरवाजा ठोठावला. गौरी देशपांडेच्या एका कथेवर तिने आणि मी मिळून ‘उधार’ नामक चित्रपटाची एक पटकथा लिहिली होती. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी नांदेडला स्थायिक झालेल्या शीख डॉक्टरची मध्यवर्ती भूमिका त्याने करावी अशी माझी इच्छा  होती. पहिल्या भेटीत त्याने कथा ऐकली. दुसऱ्या भेटीत एकंदर प्रोजेक्टबद्दल जास्त सविस्तर.. म्हणजे नायिकेच्या- त्याच्या सुनेच्या- भूमिकेसाठी निकोल किडमनसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभिनेत्रीशी बोलणी सुरू आहेत; किती दिवस परदेशात शूटिंग असेल, वगैरे गोष्टी त्याने ऐकून घेतल्या. नंतरच्या भेटीत ‘उधार’बद्दल काही बोलण्याआधीच त्याने माझ्या चित्रकलेविषयी चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्या घरात आणि ऑफिसमध्ये भिंतींवर लावलेली उत्तमोत्तम पेंटिंग्ज दृश्यकलेतल्या त्याच्या संवेदनशील, समृद्ध जाणिवांची साक्ष देत होतीच. त्यामुळे त्या विषयावर गप्पा झाल्यावर तो उठला आणि समोरच्या कपाटातून एक पुस्तक बाहेर काढलं. ‘‘नम्रताची- माझ्या पुतणीची- चित्रं आहेत. मला वाटतं, तुला आवडेल तिचं काम..’’ असं म्हणून पहिल्या पानावर त्याने सही केली, मला पुस्तक दिलं आणि निरोप देण्यासाठी हस्तांदोलन केलं. मीही हसून वळलो आणि ज्या कामासाठी आलो होतो त्याबद्दल यत्किंचित उल्लेखही न करता बाहेर पडलो.

परतताना माझ्या मनात एकामागून एक प्रश्न उठत होते. ‘उधार’मध्ये त्याला काम करायचं नव्हतं, हे उघड होतं. पण मग त्याने तसं प्रांजळपणे का नाही सांगितलं? हा नकार त्या चित्रपटाची जातकुळी मुख्य धारेची नव्हती म्हणून होता, की आणखी काही कारणामुळे? चाकोरीबद्ध व्यवस्थेने उभारलेल्या महामार्गाच्या विरुद्ध किंवा समांतर अशा एखाद्या पाऊलवाटेवर पाय टाकायला तो का धजावत नाही? कोणताही चित्रपट स्वीकारताना हमखास आर्थिक, धंदेवाईक यशाची हमी हीच एकमेव मोजपट्टी असावी का? ‘महानायक’ पदावर पोचल्यानंतरही अशी जोखीम पत्करणं त्याला कठीण का जावं?

Why did he always choose to be a conformist? कोणत्याही सामाजिक वादावर मत, विशेषत: अ‍ॅन्टी एस्टाब्लिशमेंट असल्यास, प्रदर्शित करणं त्याने कायम टाळलं. त्याच्या राजकीय काळातही त्याने ‘जनमानसाचा रोष ओढवेल’ असं काही करणं टाळलंच. यासंदर्भात एक प्रसंग आठवतो. ‘अग्निपरीक्षा’ चित्रपटासाठी ठरलेलं मानधन न दिल्याबद्दल बी. आर. चोप्रांना मी कोर्टात खेचलं. तेव्हा अमिताभचा फोन आला होता. त्यालाही ‘जमीर’ चित्रपटाच्या वेळी असाच अनुभव आल्याचं सांगून त्याने मी हे पाऊल उचलल्याबद्दल त्याने माझं अभिनंदन केलं होतं. पण यासंदर्भात मला पाठिंबा देण्यासाठी विचारणा केल्यावर ‘‘पानी में रहना है तो मगरमच्छ से नहीं लडम् सकते ना!’’ अशा डायलॉगने त्याने विषय संपवला होता. असाच सल्ला संजीवकुमारने (‘पती, पत्नी और वो’साठी मानधन न मिळूनही) दिल्याचं आठवतंय.

मला अजून एक प्रश्न पडतो, की विलक्षण प्रतिभा, कसब, प्रसिद्धी असणारा हा कलाकार स्वत:चा वापर ‘निव्वळ एक विकाऊ प्रॉडक्ट’ म्हणून का करू देतो? त्याची किमया चाकोरीबाहेरचे विचार पटवून देण्यासाठी आणि पुरोगामी कारणांसाठी का वापरत नाही? किंवा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ठामपणे मत व्यक्त करून जनमताचा रेटा एखाद्या दिशेने वळवण्यासाठी तो त्याची ताकद का पणाला लावत नाही? ऐकलेत कोणी त्याचे विचार समलैंगिक संबंधांविषयी वा सेन्सॉरशिपविषयी? पहलाज निहलानीच्या काळात एवढा गदारोळ झाला तरी राहिला का उभा तो आवाज उठवलेल्या दिग्दर्शकांच्या बाजूने? किंवा दाभोलकर ते लंकेश हत्यांविरोधात सामील झाला होता का एका तरी निषेध यात्रेमध्ये? दिली का त्याने भरघोस देणगी कुठल्यातरी सामाजिक चळवळीसाठी? पोलिओ वा स्वच्छ भारत वा गुजरात राज्यासाठी केलेल्या जाहिरातींमधलं काम त्याने ‘जनसेवा’ या पातळीवर केलेलं आहे, की त्यातल्या राजकीय फायद्यासाठी, याविषयी माझ्या मनात संदिग्धता नाही.

क्षणभर राजकीय वा सामाजिक बांधिलकीचा मुद्दा बाजूला ठेवू या. सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाईट प्रथा दूर करण्यासाठीही तो कधी काही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. किंबहुना, असे अनिष्ट पायंडे पाडण्यात त्याने हातभार लावल्याचंच दिसतं. उदाहरणार्थ, आजकाल कोणत्याही क्षेत्रातला ‘इव्हेन्ट’ असला- अगदी शाळकरी स्तरावरची गायन / चित्रकला स्पर्धा असो किंवा राष्ट्रीय क्रीडामहोत्सव- तरी तिथे ‘बॉलीवूड’चा टिळा लावल्याशिवाय आयोजकांना चैन पडत नाही. आपण हे विसरतो की, तसं केल्यामुळे त्या क्षेत्रातल्या दिग्गजांना तर आपण अव्हेरतोच; शिवाय त्या गुणीजनांच्या कर्तृत्वामुळे युवा पिढीला स्फूर्ती मिळण्याची, प्रेरित करण्याची संधीही आपण गमावतो. म्हणून ज्या क्षेत्रात लुडबुड करायचं वा अधिकारवाणीने बोलायचं कोणतंच कारण नाही अशा ठिकाणी ‘उत्सवमूर्ती’ बनून मिरवण्याचं मी कटाक्षाने टाळतो. ऑलिम्पिक ज्योत नेण्यासाठी आपल्याला अमिताभची गरज भासली, या आपल्या मनोभूमिकेविषयी माझ्या मनात एक सुशिक्षित नागरिक या नात्याने आजही खंत आहे. त्याला मान्यता देऊन अमिताभने एका अनिष्ट पायंडय़ाला खतपाणी घातलं, हेही वाईटच! तसंच, मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटनासाठी उभं आयुष्य नाटय़कलेसाठी वेचलेल्या व्यक्तींना डावलून अमिताभ (आणि माधुरी दीक्षितला) आम्ही नाटकवाल्यांनी पाचारण केलं तेव्हाही त्या नावांना माझा विरोध याच भूमिकेतून होता.

आज पंच्याहत्तरीच्या उंबरठय़ावरही त्याच्या जोरात चालू असलेल्या पडद्यावरच्या प्रवासाकडे नजर टाकली की माझ्या मनात प्रचंड आदर दाटून येतो. कोणतीही असंभव वा कितीही अतार्किक भूमिका असली तरी त्याने अभिनेता या नात्याने त्यातली विश्वासार्हता कायम ठेवली, ही त्याची फार मोठी जमेची बाजू! आजही एखादं केशवर्धक तेल खरेदी करण्यासाठी आवाहन असो, अमुक राज्याला भेट देण्याचं आमंत्रण असो, वा तमुक छाप अगरबत्ती वापरण्याचा आग्रह असो.. अशा एका आंतरिक विश्वासाने अमिताभ त्याबद्दल बोलतो की त्यातला शब्द न् शब्द आपल्याला पटतो. पूर्वी त्याने समांतर सिनेमाशी तोडलेलं नातं हल्ली ‘पा’, ‘पिकू’, ‘पिंक’सारख्या सिनेमांतून पुन्हा एकदा जोडलं, हीदेखील कौतुकाची बाब आहे. गेल्या दशकातल्या त्याच्या भूमिकांमधलं वेगळेपण ही त्याच्या खात्यातली आणखी एक जमेची बाब. पडद्यावरच्या या ‘महानायका’ला, त्याच्या आवाजाला, व्यक्तिमत्त्वाला, अभिनयाला

आणि वर्षांनुर्वष आपल्याला भारून टाकण्याची क्षमता असलेल्या या गारुडय़ाला त्रिवार सलाम!!!

जाता जाता शेवटी म्हणावंसं वाटतं की-

अमित, कारकीर्दीच्या उमेदीच्या काळात तू ‘भुवन शोम’मध्ये सामाजिक विषमतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मूठभर लोकांच्या बाजूने तुझ्या खर्जातल्या आवाजाचा वापर केला होतास. तसाच आता.. कधीतरी पडद्याबाहेरही तुझा बुलंद आवाज सामाजिक, सांस्कृतिक विषमतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मूठभर लोकांच्या बाजूने वापर! साटय़ालोटय़ांची समीकरणं संपवून अन्यायाविरुद्ध उभा राहा! ते जेव्हा करशील तेव्हा पुन्हा एकदा मनापासून दाद द्यायला, भरभरून कौतुक करायला जमलेल्या असंख्य चाहत्यांच्या दाटीवाटीमध्ये मीही नक्कीच असेन.

आज पंच्याहत्तरीच्या उंबरठय़ावरही अमिताभच्या जोरात चालू असलेल्या पडद्यावरच्या प्रवासाकडे नजर टाकली की माझ्या मनात प्रचंड आदर दाटून येतो. कोणतीही असंभव वा कितीही अतार्किक भूमिका असली तरी त्याने अभिनेता या नात्याने त्यातली विश्वासार्हता कायम ठेवली, ही त्याची फार मोठी जमेची बाजू! मात्र, कारकीर्दीच्या उमेदीच्या काळात त्याने ‘भुवन शोम’मध्ये सामाजिक विषमतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मूठभर लोकांच्या बाजूने आपल्या खर्जातल्या आवाजाचा वापर केला होता, तसाच आता कधीतरी पडद्याबाहेरही त्याने त्याचा बुलंद आवाज सामाजिक, सांस्कृतिक विषमतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मूठभर लोकांच्या बाजूने वापरावा! साटय़ालोटय़ाची समीकरणं संपवून अन्यायाविरुद्ध उभे राहावे! हे जेव्हा अमिताभ करेल तेव्हा पुन्हा एकदा मनापासून दाद द्यायला, भरभरून कौतुक करायला जमलेल्या असंख्य चाहत्यांच्या दाटीवाटीमध्ये मीही नक्कीच असेन.
अमोल पालेकर

First Published on March 26, 2018 2:22 pm

Web Title: amitabh bacchan on screen off screen