लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगीरथ पृथ्वीवर अवतरला आणि तडक माननीय प्रधानमंत्र्यांच्या केबिनमध्ये गेला आणि प्रधानमंत्र्यांना म्हणाला, ‘‘हे प्रधानसेवका, पृथ्वीवर गंगा मी आणली, ती भारतीयांनी घाण केली. तर आता तुम्हाला ती स्वच्छ करता येत नाही का? इस्रायलची मदत कशासाठी? एक वर्षांत गंगा स्वच्छ करा. आणि भारतीयांपैकी हिंदूंनीच स्वच्छ करा. नाही तर मी गंगा परत स्वर्गात घेऊन जाईन.’’

आणि भगीरथ अदृश्य झाला.

आईने हे वाचून दाखवले. आम्ही- मी, आई, बायको सकाळी निवांतपणे सुट्टीचा दिवस म्हणून नाश्ता करत होतो. जुलै होता. पण लख्ख ऊन होते. उकडत होते. आईने मला पंखा लावायला सांगितले.

पंखा लावून मी पुन्हा नाश्त्याला लागलो.

बायको म्हणाली, ‘‘एवढीच गोष्ट?’’

आई म्हणाली, ‘‘अगं, ही सुरुवात आहे. पुढे डेव्हलप होईल ना!’’ आणि माझ्याकडे बघत म्हणाली, ‘‘ही सुरुवात आहे ना? अजून पुढे असेल ना?’’

बायको घाईने मला म्हणाली, ‘‘नको पुढे लिहूस. ही गोष्ट लिहूच नकोस. लोक चिडतील.’’

आई जोरात म्हणाली, ‘‘नाही चिडणार.’’

बायको चिडून म्हणाली, ‘‘नाही चिडणार काय?.. प्रधानसेवका.. लिहिलेय.. पंतप्रधानांना ‘प्रधानसेवक’ म्हणणे चीड आणणारे आहे.’’

आई म्हणाली, ‘‘अगं, पंतप्रधानांनीच स्वत: ‘प्रधानसेवक’ हा शब्द वापरलाय.’’

बायको म्हणाली, ‘‘ती पंतप्रधानांची नम्रता आहे. इतरांनी नसते तसे म्हणायचे. आणि नाहीच कुणी म्हणत. न्यूटन म्हणायचा, माझे ज्ञान वाळूच्या कणाएवढे आहे. इतरांनी नाही म्हणायचे- न्यूटनचे ज्ञान वाळूच्या कणाएवढे आहे. न्यूटन ज्ञानी होता, असेच इतरांनी म्हणायचे आणि तसेच म्हटले जाते.’’

आई बायकोला समजावत म्हणाली, ‘‘अगं, इथे प्रधानसेवक हे भगीरथ म्हणतोय, लेखक नाही म्हणत.’’

बायको ताडकन् म्हणाली, ‘‘मला नाही हे पटत. गोष्ट.’’

आई म्हणाली, ‘‘पण का? कारण सांग ना..’’

बायको दबत म्हणाली, ‘‘लोक चिडतील.’’

आई म्हणाली, ‘‘नाही चिडणार. गोष्ट आहे म्हटल्यावर नाही चिडणार. गोष्टीत असे चालते.’’

बायको म्हणाली, ‘‘गोष्टीतही आपल्याकडे असे चालत नाही.. लोक चिडणार.. भगीरथ संतापून म्हणाला, असे लिहिलेय.. लोक चिडणार..’’

आई म्हणाली, ‘‘भगीरथाला राग आलाय- गंगा स्वच्छ करण्यासाठी इस्रायलची मदत घ्यायची म्हणून.’’

बायको म्हणाली, ‘‘भगीरथ ऋषी होता. ऋषींना राग येत नाही. त्यांनी सर्व विकार जिंकलेले असतात.’’

आई बारीक हसत म्हणाली, ‘‘मीना, तू बुद्धिमान आहेस. एमबीए आहेस. मोठय़ा कंपनीत व्यवस्थापक मंडळात मोठय़ा हुद्दय़ावर आहेस. पण अगं, जुन्या प्राचीन काळातली तुला माहिती नाहीय् गऽ.. तो तुझा दोष नाहीय. तुम्ही नव्या काळातल्या. नव्या काळातलं तुमच्या पिढीला खूप ज्ञान आहे. पण तुला सांगत्ये, भगीरथ ऋषी नव्हता, तो राजपुत्र होता. आणिक ऋषी संतापायचेही.’’

बायको पडेलपणे म्हणाली, ‘‘तरी पण भगीरथ म्हणाला.. असे एकेरी बरोबर नाही.’’

आई काहीशी चिडचिडत म्हणाली, ‘‘संस्कृतात आदरार्थी एकवचन नाही, इंग्रजीतही नाही.’’

बायको अडवत म्हणाली, ‘‘पण मराठीत आहे ना? मग भगीरथ म्हणाले, असे म्हणावे ना?’’

आई म्हणाली, ‘‘पुराणात सगळ्यांना एकेरीच संबोधन असतं. तू न्यूटनलाही एकेरीच म्हटलेस. ते जाऊ दे. बारीकसारीक गोष्टीवरनं वाद नकोत.’’

बायको म्हणाली, ‘‘गोष्टीत भगीरथ पंतप्रधानांना दमदाटी करतोय. ही भाषा योग्य नाही. लोक चिडतील. माझे मत आहे- मिलिंदने ही गोष्ट म्हणून लिहू नये. आता त्याला त्याचा मुद्दाच मांडायचा असेल तर मिलिंदने वर्तमानपत्रांत पत्र लिहावे. लिहावे, की गंगा स्वच्छ करण्यासाठी कुणाचीही मदत घेऊ नये. हिंदूंनीच गंगा स्वच्छ करावी. साध्या भाषेत लिहावे. गोष्टीसाठी इतर खूपच विषय आहेत.’’

आई म्हणाली, ‘‘लेखकाला आपण कसे सांगायचे- हे लिहा, हे लिहू नको? आता मला मिलिंदने लिहिलेय ते पटतेय असे नाही. त्याने लिहिलेल्यातला आशय मला अजिबात पटत नाही. व्यक्तींनी, राष्ट्रांनी एकमेकांची मदत घ्यायचीच असते. त्यात काही चूक नाही.’’

बायको म्हणाली, ‘‘आशयाबद्दल माझा विरोध नाही. मतभेद असू शकतात. भाषा नीट हवी..’’ आणि उठत आईला म्हणाली, ‘‘आपल्याला मॉलमध्ये जायचंय.. आवरायला हवं.’’

‘‘येस, येस.. भरभर आवरायला पाहिजे,’’ आई उत्साहाने उभी राहिली.

आम्ही तिघं बाहेर कुठे जायचे म्हटलं की आईला अपरिमित उत्साह येतो. कारण ती ड्रायव्हिंग करणार असते. सेवानिवृत्त झाल्यावर आई ड्रायव्हिंग शिकलीय. तिला लायसेन्सही मिळालेय. आईला अजून चांगले ड्रायव्हिंग येत नाही. मीना तिला उत्तेजन देते. आईशेजारी मीना बसते, सूचना देते. आईच्या ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवते. दोघींचे संवाद, संबंध प्रेमळ, लिरिकल असतात. यंत्र असे माणसांना जवळ आणते.

आईने सामानाची यादी केलेली असते. मुख्य दोन गोष्टी: ड्रायफ्रूट्स आणि सितोपलादी चूर्ण. बदाम, अक्रोड रोज खायचेच. आम्ही तिघांनीही. आई रोज रात्री तिघांचे सहा बदाम, मनुका भिजत टाकते. सकाळी ते खायचेच. मग चहा. बदाम बुद्धीसाठी. मनुका.. खरे तर आईला काँस्टिपेशन आहे म्हणून आईसाठी. पण आम्हीही खायच्या. साइड इफेक्ट्स नसतात. पुढे काँस्टिपेशन होऊ नये. सितोपलादी चूर्ण मीनासाठी. तिला कायम सर्दी असते. ड्रायफ्रूटस्, सितोपलादी चूर्ण खरेदील्यावर मॉलमध्ये हिंडत, शोधत इतर वस्तू.. उपयोगाच्या, हौसेच्या, फॅशनच्या.

मॉलमध्ये खरेदी झाल्यावर मॉलच्या हॉटेलात जेवण.

आईला चिकन करी आवडते. मीनाला थालीपीठ आणि लोणी. चिकन करी जास्त असते. मी चिकन करी खातो.

मीना आईला म्हणाली, ‘‘मिलिंद, गप्प गप्प आहे.’’

आई मला म्हणाली, ‘‘आम्ही तुझ्या लिखाणावर टीका केली म्हणून राग आलाय का तुला?’’

मीना मोठय़ांदा हसून मला म्हणाली, ‘‘बघ, तुझ्यावर आम्ही प्रेमाने टीका केली तर तुला राग येतो. मग तू पंतप्रधानांवर भगीरथातर्फे राग काढलास तर पंतप्रधानांच्या लोकांना तुझा राग नाही का येणार?’’

आई प्रेमाने मला म्हणाली, ‘‘तुझे लिखाण सुधारावे म्हणून आम्ही टीका करतो, तुझ्या चुका दाखवतो. आणिक घट्ट हो. तुला योग्य वाटेल ते लिही. आमचीच काय, कुण्णाकुण्णाची.. समाजाचीही फिकीर करू नकोस. होय ना ग ऽ मीना?’’

मीना आईला म्हणाली, ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनेच दिलेले आहे. आणि मिलिंदने अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरेपूर एन्जॉय करावे. फक्त त्याने भाषा नीट वापरावी.’’

‘‘आणिक,’’ आई म्हणाली, ‘‘आशय बदलला पाहिजे. गंगा स्वच्छ करण्यात इस्रायलची मदत घेण्यात काही वावगे नाहीये.’’

मीना आईला म्हणाली, ‘‘मिलिंदने आता लिखाण वगैरे करायच्या भानगडीत पडू नये. आधी पीएच. डी. करावे. निदान नेटसेट करावे. अवर बेसिसवर शिकवणे खरे नाही. पूर्ण लेक्चरर व्हावे.’’ थांबून म्हणाली, ‘‘नंतर इंग्रजीतनं लिहावे. मराठीत लिहिणे खरे नाही.’’

आई मला म्हणाली, ‘‘भगीरथाचे तू लिहितोयस ते इंग्रजीत लिही. इंग्रजीत लिहिलेस की ते फक्त एलिटमध्येच जाईल. एलिट त्यातला ह्य़ूमर एन्जॉय करतील. सर्वसाधारण जनतेपर्यंत जाणार नाही. तुझ्या लिखाणावर कुणाचा रोष होणार नाही.’’

‘‘इंग्रजीत लिहिले,’’ मीना म्हणाली, ‘‘तरी भाषा नीट हवी.’’

‘‘आशयही..’’ आई म्हणाली, ‘‘बदलावा लागेलच. गंगा स्वच्छ करण्यासाठी इस्रायलची मदत घेणे योग्यच आहे.’’

जेवणानंतर आम्ही चहा पितो. चहा प्यायचा ही माझी आयडिया. मीना मला म्हणते, ‘‘हॉटेलात जेवणानंतर चहा पिणे ही तुझी आयडिया मला फार आवडते. त्यावरूनच मी तुझ्याशी लग्न केलेय.’’

आमचा प्रेमविवाह नाहीये. ठरवून लग्न. मीना एमबीए. कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी. मी एम. ए. इंग्लिश; पण अवर बेसिसवर दोन कॉलेजात शिकवतो. तरी मीनाने माझ्याशी लग्न केलेय, यावर माझ्या लग्नाला वर्ष झालेय तरी विश्वास बसत नाही. मी मीनाला अधूनमधून म्हणतोही, ‘‘माझ्यासारख्याशी लग्न केलेस. थँक्यू.’’ मला चापट मारून मीना म्हणते, ‘‘आय लव्ह यू म्हणायच्या ऐवजी थँक्यू काय म्हणतोस? कुजकटपणा करतोयस? तू मोठ्ठा लेखक होणारायस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलेय. लेखक ही ग्रेट गोष्ट असते. आय नो इट्स डीपर मीनिंग.’’

चहा पिताना आई म्हणाली, ‘‘मिलिंद, तू मोठा लेखक व्हावास अशी माझी तळमळ आहेस. अरे, जगात लेखक असणे ही देवाची इच्छा असते. माझ्या हयातीत तू मोठा लेखक झालेला मला पाहायचंय. मग मी आनंदाने डोळे मिटेन.’’

‘‘आई,’’ भावनाशीलपणे मीना म्हणाली, ‘‘नका ना असं बोलू. मिलिंद मोठ्ठा लेखक व्हावा यासाठी मी वाट्टेल तेवढा त्याग करायला तयार आहे.’’

आईने मीनाच्या गालावरनं हात फिरवला.

आम्ही घरी गेलो. आता घरी दुपारची डुलकी काढायची वेळ. ‘डुलकी’ हा शब्द आईचा. आठवडय़ातला मीनाचा सुट्टीचा दिवस. आई मीनालाही दुपारी जेवणं झाल्यावर डुलकी काढायला आग्रह करते. दोघींचे एक्कावन्न टक्के मेतकूट असते. माझ्यावरून, मी काय करावे यावरून एकोणपन्नास टक्के मतभेद असतात. आईच्या मते, मीना मला मॅनेज करते. आणि मीनाच्या मते, आई हेडमास्तरकी करते माझ्यावर. आई एका शाळेची हेडमास्तरीण होती ना. तरी एक्कावन्न टक्के मतैक्य म्हणजे खूपच. कंपनीत एक्कावन्न टक्के शेअर असणे जसे महत्त्वाचे, तसे.

आई तिच्या बेडरूममध्ये डुलकी घ्यायला गेली. आमच्या बेडरूममध्ये मीना गेली. मी हॉलमध्ये. आमचा टू बीएचके फ्लॅट आहे. आईनेच घेतलेला. कारही आईनेच घेतलीय. आई, मीना डुलकी म्हणतात, पण गाढ झोपतात. मग हॉलमध्ये शांतता. तरी मला सेपरेट रूम हवीय. टेबल, खुर्ची. टेबलावर कागद, पेन. आत जायचे, लिहायचे. हॉल म्हणजे सगळ्यांचा. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा. हॉलमध्ये येऊन गेलेल्या, येणाऱ्या.. अशांचा सतत तिथे वास असतो. सेपरेट रूम केवळ माझी.. तिथे असेल फक्त लिखाणाचा वास. खरे तर सेपरेट फ्लॅटच हवा. संसाराचा वास नकोच. पण सेपरेट फ्लॅट शक्यच नाहीये. खरा लेखक असतो तो भररस्त्यातही लिहू शकतो. मी खरा लेखक होईन की नाही? की आधी पीएच. डी. करावे? सेट-नेट करावे?

मन भरकटले.

बुद्धी भरकटायला हवी. इतकी, की मला जे वाटतेय, त्याबद्दलही प्रश्न तयार व्हावेत. मन भरकटतेय.. मनाचा भरकटणं हा गुणधर्मच आहे. मनाला किंमतच द्यायची नाही. बुद्धीला किंमत द्यायची. तर बुद्धीला आपण व्यवहारात कोंबतो. जगण्यातल्या फायदा-तोटय़ांच्या दृष्टीने आपण बुद्धीला वळण लावतो. लिहिणे हा व्यवहार नाही, शोध असतो. तिथे बुद्धी मोकाट सोडली पाहिजे. बुद्धी मोकाट सुटू शकते. अगदी सामान्य माणसाचीही. मीनाला हवेतल्या प्रदूषणाची अ‍ॅलर्जी आहे. तिला सतत सर्दी असते. मीनाचे वडील हसत म्हणतात, ‘‘मीनाला ऑक्सिजनचीच अ‍ॅलर्जी आहे.’’ वडीलही विनोद करतात. माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन हवा असतो.. आणि ऑक्सिजनचीच अ‍ॅलर्जी! पेच! काय विचित्र, तिरपागडे, भीषण दर्शन आहे जीवनाचे! वडीलच हे म्हणतात, म्हणून मीना गप्प बसते. इतर कुणी हा ज्योक म्हणून केला तर मीना व्हायोलंटच होईल.

तास संपवून वर्गाबाहेर पडल्यावर आधी तरातरा टॉयलेटला गेलो. शिकवतानाच लागली होती. दाबून धरून शिकवत होतो. गेले तीन दिवस, रात्र वरचेवर टॉयलेटला जावे लागत होते. रात्री झोपमोड सारखी. टॉयलेट झाल्यावर बाहेर आल्यावर मोबाइल अ‍ॅक्टिव्ह केला. पुन्हा टॉयलेटला गेलो. बाहेर आलो. मेसेज आला होता. आत्तेबहिणीचा होता. टॉयलेटला गेलो. मग निश्चय करून आत्तेबहिणीच्या मेसेजनुसार हॅपी मोमेंटमध्ये गेलो. आत्तेबहीण गार्डनमध्ये बसलेली होती.

कॉफी मागवली.

आत्तेबहीण म्हणाली, ‘‘यूपीएससी अ‍ॅकेडमीत एसेज शिकवायला त्यांना टीचर पाहिजेत. मी तुझं नाव सांगितलंय. तुला आता वेळ आहे ना?’’

‘‘हो.’’

‘‘मग लगेच असाच जा आणि भरपूर मानधन माग. ते लोक कँडिडेट्सकडून भरपूर फिया घेत असतात.’’

‘‘इंटरव्ह्य़ू वगैरे घेणारहेत?’’

‘‘छेऽऽ!’’ आत्तेबहीण म्हणाली.

‘‘डायरेक्टर माझा पेशंट आहे. त्याच्या सगळ्या दातांचं भदं झालं होतं. सगळं रिपेअर केलंय. तू कामच सुरू कर.’’

डॉक्टरांकडे गेलो. नंबर होते. टॉयलेटला दोनदा जाऊन आलो. नंतर नंबर आला.

डॉक्टरांना तक्रार सांगितली.

‘‘पावसाळा आहे. होतं असं.’’ डॉक्टर म्हणाले.

‘‘पण पाऊस कुठाय?’’

डॉक्टर प्रीस्क्रिप्शन लिहीत होते.

डॉक्टरांनी मला प्रीस्क्रिप्शन दिले. म्हणाले, ‘‘मी तुला फोनच करणार होतो.. बरं झालं, तू आलास ते. माझं एक काम आहे.’’

‘‘हं!’’

‘‘आम्हा दहाएक डॉक्टरांचा क्लब आहे. आमच्यातल्या एका डॉक्टरांनी आयडिया काढलीय.. शेक्सपीअरची नाटके वाचावीत. आता आम्ही सगळे साठीकडे जातोय. शेक्सपीअर वगैरे थोडेफार तरी समजावून घ्यावेत. त्यातून असे ठरले, एखादा इंग्रजीचा प्राध्यापक गाठावा, त्याने आठवडय़ातनं, पंधरवडय़ातनं एकदा नाटक आमच्यासमवेत वाचावे. तर मला तू आठवलास. तू कर हे काम. आणि आम्ही घसघशीत मानधनही देणाराय. अरे, आम्ही खूप कमावलेय. शेक्सपीअरसाठी आम्ही खर्च करणाराय. हौसेला मोल नसतेच. तू हे काम करायचेसच. आमची वेळ तुला कळवीन. चल, हे काम करायचंस. चार-पाच नाटके तरी वाचायचीतच. ये.’’

मी खुर्चीतून उठलो.

‘‘अरे हो..’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘तू लिहितोहेस, त्यातला आशय बदललास का? बदल. बाय्.’’

मी टॉयलेटला गेलो.

स्कूटर रेड सिग्नलला थांबली होती. पोलीस माझ्याकडे आला. म्हणाला, ‘‘मिलिंददादा, भाषाशैली बदल.’’ पोलिसाने टोपी काढली. माझ्या धाकटय़ा मावशीचा मुलगा- माझा मावसभाऊ होता.

आईला, मीनाला दोन्ही असाइनमेंटचे सांगितले. त्यांना आनंद झाला.

आई म्हणाली, ‘‘आशय आता बदलून टाक.’’

मीना म्हणाली, ‘‘माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावणार. ग्रेट! नवऱ्याला बायकोपेक्षा जास्त पगार हवा, मग मजा येते.’’ थांबून म्हणाली, ‘‘आता भाषाशैली बदल.’’

डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये नाटक प्रत्यक्ष वाचून दाखवायचे होते, म्हणजे तसा अभ्यास मुद्दामहून करायला लागणार नव्हता. नाटके ठरवायची होती. शेक्सपीअरच्या नाटकांवरच्या डिक्शनऱ्या, संदर्भग्रंथ कपाटातून काढून ठेवले. एसेज लिहायचे, शिकवायचे म्हणजे खूप बरेच काम करावे लागणार होते.

इस्त्रीचे कपडे आणत होतो, तिथे आमचा प्लंबर भेटला. म्हणाला, ‘‘भाषाशैली बदला.’’

टॉयलेटला मी दाबून धरायचो.

एसेज्, ग्रामर शिकवताना मला मजा यायची, तरी भीती वाटायची. कुणी म्हणतेय की काय, की आशय बदला, शैली बदला. चार लेक्चरला तरी कुणी म्हणाले नाही. कुणी माझ्या ओळखीतले नव्हतेच म्हणा.

मला आणखी कामे मिळाली, पैसा मिळणार.. मी खुशीत होतो. विद्यार्थ्यांना माझी लेक्चर्स आवडत होती. डॉक्टरांना माझे नाटक वाचून दाखवणे, संदर्भ देणे आवडत होते. मी खुशीत होतो. पैसा मिळणार म्हणून आई, मीना खुशीत होते. खूप खूप पैसा मिळवायचा. लेखन जाऊ दे. काहीतरी मस्त अनुवाद करावेत. त्यातून पैसा मिळवावा.

माझ्या लघवीचे ताब्यात आले.

आईची एक विद्यार्थिनी अमेरिकेत जाऊन अ‍ॅड्चा डिप्लोमा करून अ‍ॅड्च्या उद्योगात पडली होती. आईची ती लाडकी विद्यार्थिनी होती. आई तिला म्हणाली, ‘‘एखाद्या अ‍ॅड्मध्ये मला घे,’’ तर त्या विद्यार्थिनीने आईला आणि मीनाला स्क्रीन टेस्टला बोलावले होते.

दोघी खुशीने गेल्या. घरी मी एकटा. एकान्त. त्या दिवसाची सगळी कामे मी रद्द केली. मला फुरफुरीच आली. आशयाचे नंतर बघू, भाषाशैलीचे आधी करू. मला सुचत होते. सुचते ते लिहून काढू या. क्रम, लॉजिक नंतर बघू.

मी भराभरा लिहिले..

१) अहाहा! इस्रायलच्या साहाय्याने गंगा स्वच्छ झाली! धन्य ते पंतप्रधान- ज्यांनी इस्रायलची मदत मिळवली.

२) मला फार करुण वाटतेय. आपली गंगा आपली आपल्याला स्वच्छ करता येऊ नये? त्यासाठी अगदी छोटय़ा- जवळजवळ आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या इस्रायलची मदत घ्यावी लागते? मला फार असहाय वाटतेय.

३) हे बुद्धिमानांनो, उच्च तंत्रज्ञानांनो, तुम्ही पुढे या. कल्पकता वापरा, गणित मांडा, गंगा स्वच्छ करा.. इस्रायलच्या मदतीची काही गरज नाही.

४) आस्तिकहो, गंगा तुम्हाला पूज्य आहे ना? तुम्हीच पुढे या. नास्तिकहो, गंगेचे सौंदर्य तुम्हाला हवेय ना? तुम्ही पुढे या.

५) संतजनहो, मंत्रशक्ती वापरा, यज्ञशक्ती वापरा. गंगा प्रत्यक्ष स्वच्छ करा.

६) हे काय चाललेय? यापुढे कुठेही जायचे नाही. कुणाचीही मदत घ्यायची नाही. हे भिकेपण पुरे. इस्रायल बीफलेस कंट्री आहे का? बीफलेस नसेल तर त्यांची अजिबात मदत घ्यायची नाही. खरे तर बीफ खाणाऱ्या कुठल्याच माणसाला आपल्या पवित्र भूमीवर पायसुद्धा ठेवू द्यायचा नाही. हा, आता मला कळतेय, असे केले तर आपण एकटे पडू. मग असे करू या- जगातून बीफ भविष्यात बंद करायचेय, हे ध्येय ठेवू या. तूर्त अधल्यामधल्या हिंदू नेत्यांनी वरचेवर हे बोलत राहायचे. मुख्य नेत्यांनी मौन पाळायचे. ठरले!

७) गंगा स्वच्छ करण्यासाठी इस्रायलची मदत घ्यावी काय, यावर सार्वमत घ्या.

८) इस्रायलशी गंगा स्वच्छ करायचा करार रद्द करा.

९) राष्ट्रपतींनीच हा करार रद्द करावा.

१०) करार रद्द करा, अन्यथा मी संसदेसमोर आत्मदहन करेन.

११) मा. पंतप्रधान, आपली गंगा आपणच स्वच्छ करू या.

गंगा स्वच्छ करण्यास कुणाचाही विरोध असणार नाही. गंगा स्वच्छ करणे हा एकमेव असा इश्यू आहे, ज्याला कोणाचाही विरोध असणार नाही. भारतात असे असणे दुर्लभ आहे. गंगा स्वच्छ झालेली.. परिणाम.. हाही स्पष्ट असणार आहे. त्याबाबतही मतभेद होऊ शकणार नाही. हेही दुर्लभ आहे. गंगा आपली आपण स्वच्छ करण्याने आपल्याला आत्मविश्वास येईल. आत्मविश्वास ही भावना म्हणजे जगण्याचा अलंकार आहे. भारतातला प्रत्येक नागरिक ओळखपाळख काढून प्रत्येक काम करतो. मीसुद्धा. हक्काने कुठलेच काम होत नाही. मनाने गरीब व्हायला होते. ओळखीपाळखी सापडल्या नाहीत तर काम होत नाही. मग हिंस्रपणा येतो. हे चित्र बदलायला हवे. ताबडतोब.

आपले प्रश्न, आपले काम आपले आपल्याला सुचणे, उत्तर शोधण्याची तळमळ होणे, पद्धत शोधण्यात दंग होणे.. ही जीवनाची रसमयता असते.

आई, मीना परतल्या. खूश होत्या. स्क्रीनटेस्ट चांगली झाली होती.

रात्री जेवणं झाल्यावर मी आई, मीनाला अकरावे कलम वाचून दाखवले.

‘‘किती छान लिहिलेयस रे..’’ म्हणत आईने माझ्या गालावरनं हात फिरवला. मीनाने बिनधास्तपणे गालाचा मुका घेतला.

मी पुढचे काही दिवस गोष्ट वाढवायची कशी याचा विचार करत होतो. यूपीएससी, डॉक्टरांचा क्लब, कॉलेजमधले तास.. तरी नेटाने विचार करत होतो.

नंतर अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी हल्ला झाला.

रात्री टीव्ही बघताना आई संतापून म्हणाली, ‘मिलिंद, चांगले खडसावून लिही. सगळे सगळे देव अवतरून प्रधानसेवकाला संतापून बोल लावताहेत, असे लिही.’

आई थरथर कापत होती.

मी उठलो, आईपाशी गेलो, तिचे हात हातात घेतले. मीना धावली आणि तिने टीव्ही मालवला. आईच्या दुसऱ्या बाजूला कोचाच्या कडेवर बसली. आईच्या खांद्यावर हलकेच पंजा ठेवला. माझ्याकडे बघत हलकेच म्हणाली, ‘आपण दुसरे काहीतरी बोलू या.’ थोडय़ा वेळाने म्हणाली, ‘चहा पिऊ या.’

‘नको. झोप उडेल.’

दुसरे काहीतरी म्हणजे आता चहा नाही. हॉटेलात मजेने खाल्ल्यावर चहा घेणे हे दुसरे असते. आत्ता नाही. सकाळी उठल्यावर चहा पिणे पहिले असते. दिवसाची कामे आठवणे दुसरे असते.

आई उठली, तिच्या बेडरूममध्ये गेली. मी, मीना आईच्या दोन्ही बाजूंना बसून राहिलो. काही वेळाने आई झोपी गेलीय हे बघून मी आणि मीना आमच्या बेडरूममध्ये गेलो. बेडवर आडवे झालो. मीना पुटपुटत म्हणाली, ‘‘आपल्याला आईची काळजी घेतली पाहिजे.’’

‘‘हं.’’

‘‘तू लिहिलेले आईला वाचायला देत जाऊ नकोस.’’

‘‘यावेळी मी दिले नव्हते. तुलाही दाखवले नव्हते. आईने ड्रॉवरमधनं घेतलेलं दिसतंय. तुला वाचून दाखवलं.’’

‘‘ड्रॉवरला कुलूप लावत जा.’’

‘‘ वाईट दिसेल.’’

‘‘ कुठेतरी लपवून ठेवत जा.’’

मी काही बोललो नाही.

‘‘तू लिहिलेलं वाचून आई फ्लेअरप झाली.’’

‘‘अलीकडे आई चिडचिडी झालीय. कशावरनंही चिडते. उतारवयात होते असे.’’

‘‘ आताचे तसे नव्हते. पर्टिक्युलर होते. भयानक गोष्टी घडताहेत देशात. तू भर घालू नकोस.’’

‘‘ मी नाही लिहिले तरी कुणीतरी लिहिणारच.’’

‘‘ तू.. जवळच्या कुणी.. मुलाने असे लिहिले की जास्त जाणवणारच ना?’’

‘‘लांबच्या कुणी लिहिले तरी कुणाच्या कुणाच्यावर परिणाम होतोच की!’’

‘ ‘आणि गोंधळ होतो ना?.. खरं तर तू असलं काही लिहूच नकोस.’’

‘‘मी आता काल्पनिकच लिहायचे ठरवलेय. काळ काल्पनिक, पात्रे काल्पनिक.. किंवा नातेसंबंधांच्या समस्या, पौगंडांच्या समस्या..’’

थोडय़ा वेळाने मीना म्हणाली, ‘‘खरं म्हणजे गोष्टीत दुसरेच काहीतरी असले पाहिजे.’’

‘‘ एंटरटेन्मेंट?’’

‘‘ ते तिसरे आहे. दुसरे.. वेगळेच काहीतरी.’’

नंतर आम्ही बोललो नाही. मीनाला झोप लागली नाहीये, हे मला कळत होते. मला झोप लागली नाहीये, हे मीनाला कळत होते, हे मला कळत होते.

सकाळी आई म्हणाली, ‘‘रात्रभर नीट झोप नाही.’’

मीना तिच्या झोपेबद्दल बोलली नाही. ती बोलणार नाही, हे मला माहीत होते. मी बोललो नाही. मी बोलणार नाही, हे मीनाला माहीत होते, हे मला माहीत होते.

आधीच्या रात्रीचे आम्हा तिघांना आठवतेय, हे मला माहीत होते. दिवसाचे आठवतेय, ते त्यात आहे, हेही मला माहीत आहे. आम्ही तिघेही काहीच बोलणार नाही, हे मला माहीत आहे.

पहिले- चहा पिणे, आणि दुसरे- आठवणे.. की पहिले- आठवणे, आणि दुसरे चहा पिणे?

चहा पिणे- पहिले असेल, किंवा आठवणे- पहिले असेल.

चहा पिणे- पहिले असेल, तरी आठवणे दुसरे नाहीय, तिसरे.

आठवणे- पहिले असेल, तरी चहा पिणे दुसरे नाही, तिसरे.

दुसरे- गैरहजर.

अमुक बोलतो एक आणि करतो दुसरेच. दुसरे नाही.. तिसरे, पाचवे.. सत्राव्वे.. शंभरावे.. लाखावे.. भलतेच..

जन्म मिळाला, मृत्यू मिळणार आहेच. मधे काय हवंय? पैसाअडका, इच्छापूर्ती, आकांक्षापूर्ती, सत्ता, स्थान, प्रतिष्ठा?

जन्म मिळालाय, मृत्यू मिळणारच आहे. मधले पूर्ण जगणे हवेय. नैसर्गिक मृत्यू हवाय.

अपघात, घातपात, खून.. यातून मृत्यू नकोय, हे पहिले.

जन्माचे रहस्य, सृष्टीचे रहस्य, मृत्यूचे रहस्य.. याचा शोध. शोध हे दुसरे.

पैसाअडका, इच्छापूर्ती, आकांक्षापूर्ती, सत्ता, स्थान, प्रतिष्ठा.. हे तिसरे, चौथे, शंभराव्वे, लाखावे..

शोध हे दुसरे. गोष्टीत हे हवे.

मला गंगेचा प्रवाह दिसतोय. मोठय़ा मोठय़ा वस्तू वाहताहेत. छोटय़ा वस्तू वाहताहेत. अविद्राव्य पदार्थाचे सूक्ष्म कण. विद्राव्य पदार्थाचे सूक्ष्म कण. सूक्ष्म जंतू. अंतर्गत प्रवाह विस्कटलेले.

गंगा स्वच्छ करायचे काम चालू झाले.

मला दिसतेय, मोठय़ा वस्तू प्रवाहातून काढून टाकायच्या पद्धती विकसित करणारे तंत्रज्ञ, अविद्राव्य पदार्र्थाचे कण काढून टाकायच्या पद्धती विकसित करणारे पदार्थवैज्ञानिक, विद्राव्य पदार्थाचे सूक्ष्म कण काढून टाकण्याच्या पद्धती विकसित करणारे रसायनशास्त्रज्ञ, सूक्ष्म जंतू काढून टाकायच्या पद्धती विकसित करणारे जीवशास्त्रज्ञ, अंतर्गत प्रवाहांची समीकरणे मांडणारे गणितज्ज्ञ. मला दिसतेय, नागरिकांच्या अस्वच्छपणाच्या सवयींचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ, समाजमनाच्या गंडांचा अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ, स्वच्छतेची व्याख्या करणारे तत्त्वज्ञ, शोधवृत्तीचा अभ्यास करणारे मीमांसक, तन्मयता भाषेत पकडणारे कवी, तपशील मांडणारे गद्यलेखक, शोधांच्या गोष्टी रंगून बोलणारे नागरिक.

मला दिसतेय : नव्या तत्त्वज्ञानाची बीजे.

मला दिसाहेत : शहाणे राजकारणी.

सुखं आहेत. दु:खं आहेत. स्वार्थ आहेत. विकार आहेत. संकटं आहेत. युद्धं आहेत. मला दिसतंय : तरीही सर्जन चालू आहे. सर्जनाला मदत आहे.

सर्जनाला मदत ही खरी मदत.

मी गोष्ट लिहायला लागतो.

मी साशंक झालोय. मला गोष्ट लिहिणे जमेल का? गोष्ट लिहिणाऱ्याला गोष्टीचे तंत्र शोधावे लागते, व्यक्तिमन, समाजमन याची जाण असावी लागते, सभ्यतेचे निरीक्षण लागते, ज्ञानशाखांची प्रमेये तरी माहीत असावी लागतात, संगत-विसंगत बाबी न टाळण्याचे धैर्य हवे, अवास्तव जाणण्यासाठी कल्पनाशक्ती हवी, गोष्ट लिहिणाऱ्याचे मन तत्त्वज्ञाचे हवे, एकांत हवा, भरपूर भरपूर मोकळा वेळ हवा.

एवढे तरी कळले.

गंगा शंभर टक्के स्वच्छ हवी, करायला हवी, करता येते.

गोष्ट शंभर टक्के परिपूर्ण क्वचित साधते.

पस्तीस टक्के, पास होण्याएवढी परिपूर्ण गोष्ट मला लिहिता आली तरी खूप झाले.

जास्तीत जास्त परिपूर्ण गोष्ट लिहायचा प्रयत्न करायचा.

कॉलेजच्या लायब्ररीत शुकशुकाट होता. कँटीनला गर्दी असणार. कॉलेजच्या लायब्ररीत कागद, पेन घेऊन धडधडत्या मनाने लिहायला लागलो…
श्याम मनोहर

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change
First published on: 26-03-2018 at 18:39 IST