23 October 2019

News Flash

हिडरेशीचा हिरडा की कोळसा?

कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील.

जंगलातून गावाकडे येणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी बांधाच्या कडेवर कोळशाची पोती आढळून येतील.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

भोर संस्थानच्या हिडरेशी परिसरात कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील.  विशेषत: हिरडी या झाडापासून वजनाने जड व चांगल्या प्रतीचा कोळसा निघत असल्याने त्या झाडाची तोड विशेष करण्यात येते व त्याला बाहेरून भरपूर मागणी असल्याने दलाल लोक रोख पैशाचे आमिष दाखवून ‘अधिक कोळसा पिकवा’ या प्रकारची मोहीम सुरू करून त्यासंबंधी उत्तेजन व कारवाया सुरू करतात. याच मोहिमेची साथ शेजारील प्रदेश, विशेषत: भाटघर धरणावरील वेळवंडी खोरे यात पसरू पाहत आहे.

पूर्वी लहानपणी भोर संस्थानचा भूगोल शिकताना शिवकालीन इतिहासप्रसिद्ध मावळातील हिडरेशी हे हिरडा या मौल्यवान वनस्पतीचे आगार आहे असे वाचण्यात येई. तसेच हा भाग चांगल्या प्रकारच्या अरण्याने व्यापलेला असून वाघ, रानडुक्कर, कोल्हा वगैरेसारख्या हिंस्र पशूंचे वसतिस्थान असून, हे लोक मुख्यत्वेकरून शेजारील जंगलात असणाऱ्या निसर्गसंपत्तीवरच अवलंबून असत. संस्थानी काळात वावडुंग, किंजळ, ऐन, येलूर वगैरे वनस्पती तोडण्यास बंदी असे. हिरडा झाडाची तर फांदीदेखील खासगी वा सरकारी रानांतील तोडू देत नसत. याबद्दल लोकांना शिक्षाही होत असत. एकदा हिरडीच्या झाडाखालील शेत भाजण्याकरिता आग लावली असता ती चुकून हिरडीच्या मोहराला लागून तो करपला. त्यामुळे त्या माणसास भोपर्यंत १५ खेटे घालावयास लागून शिवाय थोडा दंडही झाला. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी हिरडीची किती काळजी घेतली जात होती हे दिसेल. येथील काही वृद्ध अजूनही सांगतात की, अगदी १५-२० वर्षांपूर्वी जवळील जंगलातून फिरण्यास भीती वाटे व गावांच्या पेठेच्या रस्त्यावरदेखील दाट झाडी होती व श्रावण महिन्यानंतर मोर वगैरे पक्षी अगदी गावाजवळ दृष्टीस पडत. येथील जनता झाडांची काळजी घेऊन आलेल्या पिकावर व जंगलात मिळणाऱ्या खाद्योपयोगी अगर व्यापारी वस्तूंवर आपल्या वर्षांचा चरितार्थ चालवीत असत. फक्त मीठ, तिखट, कांदा व गूळ यांची बाहेरून आवक होई. येथील लोकांचे मुख्य काम हिरडा गोळा करणे हे असे व मोसमाचे दिवसांत जवळजवळ कुटुंबातील सर्व मंडळी हिरडा गोळा करण्याचे कामावर असत व त्यापासून त्यांना आर्थिकही चांगला फायदा होई. शिवाय रानातील मध, वावडुंग, शिकेकाई वगैरे गोळा करण्यापासूनही थोडे उत्पन्न येत असे. एकंदरीत लोक सुखी होते. हे म्हणण्याचे कारण अन्न, धान्य व अत्यावश्यक प्राथमिक गरजा याबाबतीत ते स्वतंत्र होते.

आज या भागांत अगदी वेगळी परिस्थिती दिसत आहे. हल्ली जरी कोणीही पेठेच्या रस्त्यावरून निरीक्षण करेल अगर लोकांची बोलणी ऐकेल तर हिरडीचे व्यवहाराऐवजी कोळशाची आवक व त्यासंबंधीचे सौदे कानावर ऐकू येतील. जवळजवळ सर्व खासगी राने तुटत चालली असून, पुणे शहराच्या आसपास जशा रूक्ष टेकडय़ा दिसतात, तसा हिडरेशी गावासभोवतालचा प्रदेश दिसण्यास सुरुवात झाली आहे. हिरडी, किंजळ, ऐन या झाडांची सरसकट तोड सुरू असून त्याचा कोळसा करण्याच्या भट्टय़ा शेताशेतावर रचल्या जात आहेत. हिरडा गोळा करण्याचे उत्पन्न पूर्वी दर झाडामागे साधारण १२ ते १५ रुपये येत असे. पण त्याच्या कोळशापासून ३० ते ४० रुपये येत असल्याने जास्त पैसा मिळविण्याकरिता कोण जास्त झाडे तोडतो, याची चढाओढ लागली आहे. यावरून सोन्याचे अंडे देणाऱ्या हंसी पक्ष्याची आठवण होते. हे पैशाच्या भ्रमाने धुंद झालेले लोक हंसी पक्ष्यालाच मारत आहेत. सरकारी रानांतील झाडे तोडण्यास जरी बंदी असली तरी एकदा खासगी रानं तुटली की लोकांची वखवखलेली दृष्टी शेजारील जंगलावर जाणार व त्याचाही ऱ्हास होण्याचा धोका वाढू लागला आहे. जंगल खाते कितीही तत्पर असले तरी सर्व जनताच जर भ्रम पडून काही गुन्हे करण्यास प्रवृत्त होऊ  लागली आणि खात्यातील लोकांना त्यांच्यातच चांगल्या रीतीने राहावयाचे असल्याने एकंदर सर्व प्रकार नियंत्रणाखाली आणणे फार जड जाणार आहे. अशाच काही गुन्ह्य़ांबद्दल काही खटले कोर्टात भरले जातात; परंतु साक्षीदार न मिळाल्याने जवळजवळ सर्व खटले सुटले जातात.

कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील. जंगलातून गावाकडे येणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी बांधाच्या कडेवर कोळशाची पोती आढळून येतील. अगदी डोंगरकपारीतून हे भोळे, अशिक्षित डोक्यावरून कोळशाची पोती घेऊन १० ते १५ मैल वाटचाल करून येतात. येथे रानावनातून प्रत्येक जण कोळसा करण्याचे उद्योगात असल्याचे आढळून येईल. विशेषत: हिरडी या झाडापासून वजनाने जड व चांगल्या प्रतीचा कोळसा निघत असल्याने त्या झाडाची तोड विशेष करण्यात येते व त्याला बाहेरून भरपूर मागणी असल्याने दलाल लोक रोख पैशाचे आमिष दाखवून ‘अधिक कोळसा पिकवा’ या प्रकारची मोहीम सुरू करून त्यासंबंधी उत्तेजन व कारवाया सुरू करतात. याच मोहिमेची साथ शेजारील प्रदेश, विशेषत: भाटघर धरणावरील वेळवंडी खोरे यात पसरू पाहत आहे. हल्ली येथे २ रुपये किंवा काही वेळेस ३ रुपये देऊनदेखील मजूर मिळणे जड झाले आहे व लोकांची वृत्ती अस्थिर बनत चालली आहे. नवीन वृक्ष लावण्याचे ऐवजी चांगली जोमदार झाडे कशी तोडता येतील, सरकारी रानातील झाडे वठलेले (सुकलेले) वृक्ष कसे बनतील, यासंबंधीच्या कारवाया आत्तापासूनच काही उपद्व्यापी लोकांनी सुरू केल्यास नवल नाही. पूर्वी येथे धान्याची आवक क्वचितच होई; परंतु आता पाहिले तर हजारो रुपयांच्या ज्वारीची आयात करावी लागते. दिवसेंदिवस हिरडा पाठविण्याचे प्रमाण घसरत चालले आहे व कोळशाचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले दिसून येईल. येथील सुज्ञ लोकांस विचारले असता त्यांनाही पटते व कळते, की जंगल नाही की पाऊस कमी पडतो, जमिनीची धूप वाढते व त्याचेच शेवटी दुष्काळात रूपांतर होते. हे सर्व माहीत असूनदेखील या भोळ्या, परंतु आता पैशाच्या भ्रमात पडलेल्या लोकांस कसे पटवून द्यावे याचा त्यांस विचार पडला आहे, आणि त्यासंबंधी निर्भीड विचार बोलून दाखविण्यास ही मंडळी तयार नाहीत हे खेदाने म्हणावे लागते. एकंदरीत पैशाच्या भ्रमाने पछाडलेले लोक स्वत:चे हित न जाणता काही लोभी, आपमतलबी लोकांच्या सल्ल्याने विनाशाकडे खेचले जात आहेत, हे निश्चित. हीच जर स्थिती अशीच काही वर्षे चालू राहिली तर एक अत्यंत दुष्काळी प्रदेश म्हणून या भागाची गणना करावी लागेल.

अजूनही या प्रदेशाच्या काही भागांत अगदी अल्प प्रमाणात लोकांच्या झाडतोडी मोहिमेपासून वाचलेला भाग आढळतो. त्यास येथील लोक ‘रहाट’ असे म्हणतात. हे रहाट म्हणजे जंगलातील देवतांचे (उदा. जन्नी, दुर्गा, वाघजयी वगैरे देवता) वसतिस्थान समजले जाते व म्हणून येथील झाडाची फांदी, एवढेच काय- फूलदेखील तोडले जात नाही. या जंगलात गुरे चारली जात नाहीत की विस्तव पेटविला जात नाही. कारण याविरुद्ध जाणाऱ्यावर वनदेवतांचा कोप होईल, त्याचा संपूर्ण नाश होईल अशी समजूत असते. या सर्व कारणांमुळे येथे एक प्रकारचे घनदाट अरण्य तयार झालेले आढळते. या जंगलात १०० फूट उंचीवरील अनेक वृक्ष असून काही तर दुर्मीळ वृक्ष येथे सापडतात उदा. राळधूप, येलूर, बिबू वगैरे वृक्ष व रानमिरी, गारबी, पिळूक, वाटोळी वगैरेसारख्या अवजड वेली येथे विपुल प्रमाणात आढळून येतात. तसेच झाडावर निरनिराळ्या प्रकारची शेवाळी व आमरी या शोभिवंत वनस्पतींच्या निरनिराळ्या जाती सापडतात. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचू शकत नाही. हे एकंदरीत वनस्पतीवैपुल्य व विविधता पाहिली म्हणजे पूर्वी या भागात एकंदर कोठल्या प्रकारचे जंगल असले पाहिजे याची कल्पता येते व अजूनही असे वाटते की, एकंदर प्रामाणिक प्रयत्न केले गेले तर हा विनाश टाळता येईल.

याबाबतीत आपल्या सरकारने जर खास लक्ष घालून तातडीचे उपाय योजले तर या लोकांना वाचविता येईल. खालील गोष्टींना जर सरकारने प्राधान्य दिले तर एकंदर परिस्थितीत खूपच सुधारणा होईल.

१. कोळसा तयार करण्याचे परवान्यावर कडक नियंत्रण व परवाने देण्याच्या प्रमाणात कमी करणे.

२. विशेषत: हिरडी, आपटा वगैरे झाडे तोडण्यास संपूर्ण बंदी.

३. सरकारी सोसायटय़ांच्या मार्फत हिरडा, वावडुंग, मध, शिकेकाई वगैरे गोळा करून त्याची दलाली न करता खुद्द माल गोळा करणाऱ्यास कसा फायदा होईल, इकडे लक्ष.

४. भोर-महाड रस्त्यावर जे पूलबांधणी, घाटातील मार्ग वगैरे कामे सुरू आहेत, त्यामध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे. म्हणजे २ ते ३ वर्षे तरी रिकामटेकडय़ा लोकांना मजुरी मिळून त्यांचे लक्ष गुंतवता येईल.

५. विकास केंद्राची योजना व लोककार्याची आस्था बाळगणाऱ्या तत्पर कार्यकर्त्यांची निवड.

६. सर्व प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांनी आहे अशी परिस्थिती चालू राहिली तर पुढील येणाऱ्या संकटाची जाणीव येथील जनतेस देणे.

या जर सर्व गोष्टी झाल्या तर एकंदर परिस्थितीत खूपच सुधारणा होईल व येथील लोकांना भावी दुष्काळापासून वाचविल्याचे श्रेय मिळेल.

(प्रकाशन साल १९६७)
वा. द. वर्तक

First Published on March 26, 2018 5:44 pm

Web Title: coal hirdee tree