21 February 2019

News Flash

वार्षिक राशीभविष्य : २० ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर २०१८

गुरूचे भ्रमण नवीन उत्साह, आनंद देणारे ठरेल.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

मेष : आनंदी प्रवास

या नूतन वर्षी गुरू तूळ राशीत प्रवेश करीत आहे. हे गुरूचे भ्रमण नवीन उत्साह, आनंद देणारे ठरेल. शनीच्या विरोधाला सन्मार्गाने उत्तर देण्यात गुरूबल कदापि कमी पडणार नाही. तसेच शुक्राचा वर्षभरातील सुखदायी प्रवास खूप शितलता प्राप्त करून देईल. विशेष करून महिलांबाबतीत नवीन कल्पना, नवीन योजना मार्गी लागतील. अध्यात्मिक वाचनात मन रमेल.

नोव्हेंबर २०१७- गुरू,शुक्र, मंगळाचे उत्तम सहकार्य लाभेल. उद्योग-धंद्यात नवीन आखलेल्या योजनांना उत्तम प्रतिसाद लाभेल. मात्र आत्मविश्वास नि परिश्रम यांची जोड असूद्यात. प्रिय आप्तजनांच्या भेटी-गाठीत आनंद लाभेल. उत्तम अर्थप्राप्ती.

डिसेंबर २०१७- ग्रहांच्या उत्तम स्थितीतून आनंदी, निरागस जगण्याचा सूर लाभेल. मित्रमंडळींत आपण एक वेगळे आशास्थान- अशा आदरयुक्त भावनेने आपले स्वागत होईल. आपल्या सामाजिक-राजकीय कार्यक्षेत्रात अधिक भव्यता निर्माण होईल. उद्योग-धंद्यात नोकरीत स्थिरता प्राप्त होईल.

जानेवारी २०१८- हर्षल-मंगळ षडाष्टक अति सुखाला दृष्ट लागते अशा घटनांचा पट पुढे येईल. विसराळूपणा, वेळेचे भान न ठेवणे, गैरसमज करून घेणे या गोष्टींपासून दूर रहा. नोकरी-धंद्यात जबाबदारीने वागणे खूप गरजेचे ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

फेब्रुवारी २०१८- रवि, बुध, शुक्राचे उत्तम पाठबळ त्यातून संधी प्राप्त होतील. अष्टमातील मंगळाकडे लक्ष असूद्यात. अति साहस आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका.

मार्च २०१८- मंगळ-शनीच्या योगातून निर्माण होणारी कटुता सावरण्यात यशस्वी ठराल. नातेवाईक, जगतातले वाद चहाच्या पेल्यातील वादळासारखे ठरतील. त्यात फारसे भावूक होऊ नका नि गुंतू नका. घरातील मुलांचे वर्चस्व वाढेल. पण त्यांना खुबीने समज देण्यात यशस्वी ठराल.

एप्रिल २०१८- राहू-मंगळाचा विरोध जरी प्रकर्षांने वाढला, तरी आपल्या राशीच्या मागे शुक्र-गुरूचा मोठा आधार ठामपणे उभा राहील. त्यातून बुद्धीमत्ता नि आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना, नवीन कल्पना आकार घेतील. नोकरी-धंद्यात शब्दाला किंमत येईल. खूपशा गोष्टी महिनाअखेरीस मनासारख्या घडतील.

मे २०१८- बुध-शुक्र यांच्या शुभयोगातून दिलासा देणाऱ्या घटना घडतील. खूपसा धीर येईल. त्यातून एक वेगळा आत्मविश्वास, काम करण्याची उमेद येईल. नवीन योजना हाती येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.

जून २०१८- १५ जूनला पराक्रमात येणारा रवि नि तूळ राशीतील गुरू राहू, मंगळाचे सावट सहज दूर करतील. समस्यांवर उपाय सापडतील. उद्योग-धंद्याच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येतील. महत्त्वाच्या कामांना गती प्राप्त होईल. त्यातून घेतलेले निर्णय फलदायी ठरतील.

जुलै २०१८- चतुर्थातील रवि-राहू कौटुंबिक वातावरणात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण शुक्र-शनीच्या शुभयोगातून बरेचसे गैरसमज दूर होतील. नोकरी-धंद्यात सावधगिरीने वागणे गरजेचे ठरेल. अति दगदग टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

ऑगस्ट २०१८- १७ ऑगस्टला रवि स्वराशीत येत आहे. त्यामुळे एकूण सर्वच आघाडय़ांवर उत्साही वातावरण राहील. घरी, उद्योग-धंद्यात होणारा विरोध हळूहळू मावळेल. संयम, शांतता यातून एक वेगळे समाधान प्राप्त होईल.

सप्टेंबर २०१८- षष्टात रवि नि बुध-शुक्राचा शुभयोग यातून खूपशा गोष्टींना उत्तम चालना मिळेल. खऱ्या अर्थाने प्रगतीची दारे उघडतील. आर्थिक बाजू चांगली राहील, पण पैसा जपून वापरावा. घरातील वातावरण आनंदी राहील.

ऑक्टोबर २०१८- गुरूचा अष्टमातील प्रवेश काहीसा त्रासदायक ठरेल. पण एकमेव बुध-शनीचा होणारा सुयोग परिस्थिती खूपशी नियंत्रित ठेवील.

वृषभ : आत्मविश्वास वाढेल

या वर्षांच्या राशी प्रवासात रवी, बुध नि शुक्राचे सहकार्य उत्तम लाभणार आहे. शनी, गुरू यांनी जरी पाठ फिरवली असली, तरी या प्रवासातला सकारात्मक विचार ग्रह राशीं इतकाच महत्त्वाचा ठरेल. फार भावनिक राहू नका. धीराने, आत्मविश्वासाने ग्रह-राशीचा प्रवास अनुभवा. लहानशा दु:खातही सुखाची झालर लपलेली असते.

नोव्हेंबर २०१७- बुध-शुक्राचे उत्तम पाठबळ यामुळे नोकरी, उद्योग-धंद्यात कामाची व्यापकता वाढेल. आपल्या बौद्धिक कसोटीतून या साऱ्या जबाबदाऱ्या आपण उत्तमपणे पार पाडू शकाल. राजकारण, सामाजिक क्षेत्रांत नवीन परिचय, नवीन ओळखी मदतीच्या ठरतील. या अनुभवातून खऱ्या मैत्रीचे स्वरूप कळून येईल.

डिसेंबर २०१७- अति महत्त्वाची कामे १५ डिसेंबरपूर्वी करून घ्यावीत. सहावा मंगळ पराक्रम, साहस नि मेहनतीस न्याय देईल. बुध, शुक्र उत्तम मदतीचा हात देतील. कामाची व्याप्ती वाढेल. राजकारणात सामाजिक क्षेत्रात कामाचा गौरव होईल.

जानेवारी २०१८- मानसिक संतुलन चांगले राहील, उत्साह वाढेल. आखलेल्या योजना पुऱ्या होतील. नवीन परिचयाचे गोड नात्यात रूपांतर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील, पण दगदग वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

फेब्रुवारी २०१८- दशमातील रवी-बुध सहकार्यातून येणारा काळ खूप लाभदायक ठरेल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. राजकारणात सामाजिक क्षेत्रात आपले कौतुक होईल. मात्र, शब्दात संयम व कृतीत वेग असू द्या, म्हणजे अपेक्षा पूर्ण होतील.

मार्च २०१८- या महिन्यात स्वत:ला सावरण्याचे बळ लाभेल. जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. वेळेचे महत्त्व कळेल. मन स्थिर ठेवून विचार करा. जीवनात येणाऱ्या समस्या वेगवेगळी रूपे घेऊन समोर येत असतात; त्यांना शांतपणे सामोरे जा. प्रसंगात सुज्ञपणा, विनय खूपसा उपयोगी पडतो.

एप्रिल २०१८- स्वराशीत शुक्राचे आगमन खूपशा गोष्टींना पूरक ठरेल. वातावरण जरी संघर्षांचे असले तरी प्रत्येक संधी सफलतेचा मार्ग मोकळा करील. प्रयत्न, मेहनत या दोन शब्दांत मोठी ताकद आहे, याचा प्रत्यय येईल. त्याचबरोबर समजुतीच्या धोरणातून खूपशा गोष्टींचे मार्ग सोपे होतील.

मे २०१८- शुक्राचे छानदार आगमन खूपशा गोष्टींना फायदेशीर ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम काल. मात्र जागेसंबंधीचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. आर्थिक आवक वाढेल. तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल.

जून २०१८- पराक्रमात राहू-शुक्र  आहे, बौद्धिक पातळी घसरू देऊ नका. जागरणे, दगदग टाळा, आश्वासने देऊ नका. उद्योग-धंद्यात वाद-विवाद, गैरसमज होतील, पण शांत, स्थिर राहून त्यावर उपाय शोधा. शक्यतो वाद कोर्टापर्यंत नेऊ नका. पैशाचा अपव्यय टाळा.

जुलै २०१८- संकटातून संधी प्राप्त होतील असा प्रत्यय या महिन्यात येईल. रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. भाऊबंदकीतील वाद मध्यस्थीतून मिटतील. पैशाची आवक वाढेल. ऑगस्ट २०१८- पंचमात शुक्र, चतुर्थात रवी खूपशा निर्थक गोष्टी जवळ येण्याचा प्रयत्न करतील, त्यापासून दूर रहा. पैसे उसणे देणे, हमी घेणे, जामीन राहणे या गोष्टी टाळा. जवळची माणसे गैरसमज करून घेतील, पण हा प्रकार शांतपणे हाताळा.

सप्टेंबर २०१८- कामाचा व्याप वाढेल. त्यातून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या चालून येतील. अचानक वाढलेल्या कामामुळे चिडचिड वाढेल. वरिष्ठांशी किरकोळ मतभेद होतील, पण ते अति ताणू नका. कामाचे स्वरूप समजून घ्या. कुठेही वादग्रस्त भूमिका घेऊ नका.

ऑक्टोबर २०१८- १७ तारखेला बदलणारा रवी खूपसा आशादायक ठरणार आहे. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील, त्यातून गैरसमज दूर होतील. आपली प्रशंसा होईल. पुढील येणाऱ्या वर्षांसाठी हाच अनुभव राहील. आत्मविश्वास कायम असू द्यावा.

मिथुन : संधीचे सोने

रवी, बुध, गुरू ग्रहांची अपूर्व बैठक आपल्या राशीबरोबर जमली आहे. रवीचा वर्षभरातला प्रवास यशदायक घटनांची मालिका निर्माण करील व तुळेतील गुरू नवीन विचार, नवीन परिचयातून उत्कर्ष साधील. तर शुक्राचा वर्षभराचा प्रवास सुख नि आर्थिक बळ प्राप्त करून देईल.

नोव्हेंबर २०१७-  राशीच्या पंचमात गुरू, शुक्र तर रवी षष्टात. उद्योग-धंद्यात, नोकरीत घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. नवीन योजना, नवीन कामे हाती येतील. आपल्या बौद्धिक क्षमतेतून आपण आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकाल. मानसन्मान लाभेल.

डिसेंबर २०१७- उद्योग-धंद्यात, नोकरीत दुसऱ्यावर अधिक विसंबून राहणे चुकीचे ठरेल. अचानकपणे खर्चाचे प्रमाण वाढेल. राजकारणात, सामाजिक कार्यात किरकोळ बाबींवरून गैरसमज होतील. महिनाअखेरच्या काळात तरुणांना नोकरी, उद्योग-धंद्यात उत्तम संधी चालून येतील. आरोग्य सुधारेल.

जानेवारी २०१८- काही वैचित्र्यपूर्ण अनुभव येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा, मात्र अति उत्साह, अति गोंधळ, बेपर्वाई टाळा. नेटाने व शांतपणे निर्णय घ्या. गुरूचे उत्तम बळ आपल्या पाठीशी उभे आहे. आपल्या मनातील सद्हेतू पर्याय निर्माण करतील.

फेब्रुवारी २०१८- मंगळ, शनीचा सूर जरी नाराजीचा असला तरी रवी, बुध, गुरूची उत्तम साथ आपल्याला लाभत आहे. कौटुंबिक बाबींत काही प्रश्न अकारण त्रास देतील; पण त्यातून आपण आपले स्वच्छ अस्तित्व सिद्ध करू शकाल, हितशत्रूंपासून सावध राहा.

मार्च २०१८- उत्तम प्रगतीचा महिना. रवी-बुधाचे उत्तम वर्चस्व या महिन्यात खूपच फायद्याचे ठरेल. विशेषत: तरुण वर्गाला नोकरी-धंद्यात ऊर्जितावस्था प्राप्त होईल. मात्र अति सहवास, प्रेम या गोष्टींवर जरूर तितका संयम पाळावा. बदनामी, आरोप-प्रत्यारोपाचे प्रसंग येणार नाहीत इतके मात्र भान असू द्यावे.

एप्रिल २०१८- बुधासोबत १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करणारा रवी खूपशा गोष्टींना लाभदायक ठरेल. उद्योगधंद्यातील कामाचे स्वरूप बदलेल नि कामांना गती प्राप्त होईल. जुनी येणी वसूल होतील. पैशाची आवक वाढेल. मात्र व्ययात येणाऱ्या शुक्रामुळे पैशाची उधळपट्टी टाळा. योग्य ठिकाणी पैसे खर्च करा.

मे २०१८- शुक्र-गुरू शुभयोगातून खूपशा गोष्टींना चालना मिळेल. बऱ्याच नवीन जबाबदाऱ्या वाढतील. कामात केलेले नवीन बदल यशस्वी ठरतील. आर्थिक लाभात भर पडेल. जुने प्रश्न मार्गी लागतील.

जून २०१८- रवी-शनी प्रतियोगातून लहानसहान अडचणी उभ्या राहतील. धन स्थानातील शुक्र कामकाजातून येणारा पैसा जपून ठेवील. मात्र मंगळ- शनीच्या नाराज प्रवृत्तीला जपून राहा. कुठेही साहस, जिद्द, हट्टीपणा नको. पुढचा काळ अनुकूल ठरेल.

जुलै २०१८- बुध-शुक्राचे उत्तम सहकार्य, आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी, उद्योग-धंद्यात आपल्या नवीन योजनांचे स्वागत होईल. मुलांना शिक्षणासाठी परदेशगमनयोग संधी. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा वाढेल. त्यातून आनंद लाभेल.

ऑगस्ट २०१८- पराक्रमात रवी, चतुर्थात शुक्र, पंचमात गुरू हा प्रगतीचा आलेख चढत्या क्रमाने अधिक वर जाईल. अति महत्त्वाची कामे या पंधरा दिवसांत उरकून घ्या. उद्योग-धंद्यात, नोकरीत बढतीचे योग, त्यातून धनलाभ, पण पैसा कमावण्यापेक्षा तो टिकवणे खूप महत्त्वाचे ठरेल, हे लक्षात असू द्या.

सप्टेंबर २०१८- इतर ग्रहांचे सहकार्य जरी नसले तरी गुरू-शुक्राच्या जोरावर खूपशा गोष्टी अनुकूल ठरतील. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कामातील उत्साह वाढेल; पण संघर्ष, वादविवाद, गैरसमज टाळा.

ऑक्टोबर २०१८- बुध-शुक्राचा उत्तम सहयोग, तर गुरूचे षष्टातील अस्तित्व अशा संमिश्र ग्रहयोगातून या महिन्याचा प्रवास पुढे सरकणार आहे. इच्छा नसतानाही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

कर्क : कर्तृत्व सिद्ध कराल

हे वर्ष कर्क राशीला सुखाचे, आनंदाचे नि भरभराटीचे जाईल आपल्या राशीला येणारा सहावा शनी निश्चित आपल्या मनोकामना पुऱ्या करील. शनीची सहिष्णुता, सत्त्वशीलता जागोजागी आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देईल आणि हे वर्ष खऱ्या अर्थाने आनंद देईल. विशेषत: महिलांनी निर्णय घेण्याची घाई करू नये. संयम, सहनशीलता बाळगावी. विद्यार्थिवर्गात कला-क्रीडा क्षेत्रांना उत्तम यश.

नोव्हेंबर २०१७- मंगळ, बुध, शुक्र, शनी यांचे लाभणारे सहकार्य खूप मोलाचे ठरेल. नव्या योजना, कल्पना यशस्वी ठरतील. प्रवासाचे योग आनंदात अधिक भर घालतील. बौद्धिक व राजकीय क्षेत्रातील लोकांशी होणारा परिचय वेगळे समाधान देईल.

डिसेंबर २०१७- १५ डिसेंबर धनू राशीत प्रवेश करणारा रवी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यात शनी-बुधाची साथ तसेच विनय, विनम्रता तुमच्या यशाला अधिक सुंदरता येईल. कौटुंबिक सुखात भर पडेल. मन प्रसन्न राहील.

जानेवारी २०१८- बुध-शनीच्या उत्तम सहकार्यातून नोकरी-उद्योग धंद्यातील कामाना छान चालना मिळेल. नवीन जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक लाभात भर पडेल. जवळच्या व्यक्तीशी अतिमतभेद नकोत. हट्टीपणात टोकाचे निर्णय घेऊ नका. मनस्ताप टाळा.

फेब्रुवारी २०१८- बुध-शुक्राचे उत्तम सहकार्य शक्यतो शत्रुत्व, संघर्ष टाळा. आलेल्या संधी स्वीकारून त्यात लक्ष घाला. उद्योग-धंद्यात नोकरीत झालेले गैरसमज दूर होतील. अर्थप्राप्ती होईल. व्यवहारात सतर्क राहा. आरोग्य ठीक राहील.

मार्च २०१८- ग्रहांची साथ छान लाभेल. संघर्ष संपेल. घरातील, घराबाहेरील वातावरण आनंदी राहील. नोकरी, उद्योग-धंद्यात नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक लाभाचे योग. शांतपणे घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होईल.

एप्रिल २०१८- रवी, बुध, शनी, हर्षल यांचे उत्तम सहकार्य लाभेल. एकूण शरीर मन:स्वास्थ्य ठीक राहील. पूर्वीचे घेतलेले निर्णय दुरुस्त करण्यात वेळ जाईल. पैशाची आवक वाढेल. उद्योग-धंद्यात नव्या ओळखी-परिचय फायद्याचे ठरतील. स्थिरता लाभेल.

मे २०१८- रवी, बुध, शुक्राची मदत खूप मोलाची ठरेल. स्वत:ला सावरण्याचे बळ लाभेल. जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. आर्थिक अडचणी दूर होतील. नवीन कल्पना, योजना पुढे नेण्यासाठी उत्तम काळ. जबाबदाऱ्या वाढतील. नवीन परिचय, ओळखी खूप मदतीच्या ठरतील. त्यातून धावपळ वाढेल.

जून २०१८- १५ जूनपूर्वी आपली महत्त्वाची कामे उरकून घ्या. उत्तरार्धात नोकरी, उद्योग-धंद्यात काहीसा संघर्ष करावा लागेल. पण तो काही दिवसांत शांत होईल. उलटसुलट चर्चा, प्रतिक्रिया यांकडे दुर्लक्ष करा.

जुलै २०१८- शुक्र-शनीचे उत्तम सहकार्य लाभेल. महिना अखेपर्यंत योजना पूर्ण होतील. उद्योग-धंद्यातून, नोकरीतून पैशाची आवक छान राहील. मित्रमंडळींत वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील.

ऑगस्ट २०१८- पराक्रमात शुक्र, राजकारणात, सामाजिक कार्यात आपला उत्तम प्रभाव पडेल. आपल्या चतुरस्रपणाचे कौतुक होईल. मनोबल वाढेल. नवीन योजना, कामे हाती येतील. आरोग्याची काळजी घ्या.

सप्टेंबर २०१८- रवी, बुध, शुक्राचे उत्तम सहकार्य, पराक्रमातला रवी उद्योग-धंद्यात, नोकरीत महत्त्वाचा ठरेल. नवीन आव्हाने जरूर स्वीकारा, ती यशस्वी ठरतील. रेंगाळलेल्या कामांना गती लाभेल. आरोग्य चांगले राहील.

ऑक्टोबर २०१८- शनी-शुक्राचा लाभयोग आत्मविश्वास व प्रेरणा या शब्दांचा खरा अनुभव देईल. चांगले विचार, चांगल्या अपेक्षा ठेवल्या की सकारात्मक बदल होतो याची खात्री पटेल. अशा छानशा अनुभवातून नूतन वर्षांकडे आपला प्रवास सुरू होईल.

सिंह : कार्यमग्न राहा

या नुतन वर्षांत काळात शुक्र, बुधाची आपल्याला उत्तम साथ लाभत आहे. जरी इतर बलाढय़ ग्रहांनी पाठ फिरवली असली तरी रविचा राश्यांतर प्रवास खूप मोठे बहुमोल साह्य करील. उद्योग-धंद्यात, नोकरीत घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. नवीन कल्पना, नवीन योजना कृतीत आणू शकाल.

नोव्हेंबर २०१७- १६ नोव्हेंबर पर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्या. तूळ राशीतील रवी फलदायक ठरेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक अडचणी कौटुंबिक नाराजी गैरसमज दूर होतील. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात टोकाचे निर्णय टाळा. शांततेच्या मार्गातून खूपशा गोष्टी मार्गी लागतील.

डिसेंबर २०१७- बुध, शुक्र उत्तम स्थितीत तर पराक्रमात मंगळ.. खूपश्या समस्या दूर होतील. नोकरी, उद्योग-धंद्यात, सामाजिक कार्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मान-सन्मानाचे योग येतील. भेटीगाठीतून परिचय वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.

जानेवारी २०१८- १४ जानेवारीला रवि मकर राशीत नोकरी-धंद्यात आपल्या कर्तृत्वाची चमक दिसून येईल. कामाचा व्याप वाढेल. धावपळ वाढेल. शांतपणे कामाची आखणी करा. जेवणा खाण्याच्या वेळा सांभाळा. अपचन, पोटाचे आजार यांपासून दूर रहा.

फेब्रुवारी २०१८- रखडलेल्या योजना मार्गी लागतील, त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. पण त्यातूनच नफ्याचे गणित यशस्वी होईल. कामाचा उत्साह वाढेल, त्यातून वादविवाद, संघर्ष वाढेल. पण संयम नि चिकाटी यातून यश लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मार्च २०१८- शुक्र नि केतू आपल्या नशिबाचा तोल सावरतील. अनेक महत्त्वाच्या गोष्टी मार्गी लागतील. आपल्या बुद्धीमत्तेचे कर्तृत्वाचे कौतुक होईल. शांत स्थिरपणे केलेली कामे यशस्वी होतील. मात्र आर्थिक व्यवहार जरून करा. आरोग्य सांभाळा.

एप्रिल २०१८- या महिन्यात जरी प्रमुख ग्रहांनी पाठ फिरवली असली तरी स्वत:ला सावरण्यात आपण यशस्वी ठराल. काहीसे कठोर निर्णय जरी त्रासदायक वाटले तरी ते योग्य असतील. मात्र कुणावरही उगाचच अन्याय नको. सावध, शांतपणे केलेली कामे यशस्वी ठरतील. टिका-टिप्पणी यांना जास्त किंमत देऊ नका.

मे २०१८- रवि-शुक्राचे उत्तम सहकार्य त्यामुळे उद्योग-धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. नवीन योजना, कल्पना कृतीत आणण्यासाठी उत्तम काळ. राजकारणात सामाजिक कार्यात आपल्या विचाराचे स्वागत होईल. कामाच्या व्यापातून दगदग वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

जून २०१८- व्ययात राहू, शुक्र जरी असले, तरी रविचे लाभातील अस्तित्व खूप मोठा आधार ठरेल. नोकरी-धंद्यात वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. त्यामुळे कामाचे स्वरूप अधिक गतिमान होईल. अडचणी दूर होतील. उत्तम संवाद साधला जाईल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.

जुलै २०१८- वातावरण जरी संघर्षांचे असले तरी प्रत्येक येणारी संधी सफलतेचा मार्ग मोकळा करील. तसेच स्वराशीतील शुक्राचा आधार खूप मदतीचा ठरेल. तेव्हा ईर्षेने पुढे सरका. मागील येणी वसूल होतील. नवीन वस्तूची खरेदी कराल. घरात पाहुणे मंडळीने आगमन आनंद देईल.

ऑगस्ट २०१८- या महिन्यातही शुक्राची मदत लाभदायक ठरेल. खूपशा गोष्टींचे निकाल आपल्या बाजूने लागतील. खरेदीतून खर्चाचे प्रमाण वाढेल. अतिश्रमामुळे थकवा वाटेल, पण त्यातही एक वेगळ समाधान जाणवेल.

सप्टेंबर २०१८- शुक्र-शनि योगातून निर्माण होणारे शुभसंकेत या महिन्यात खूपसे फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ होतील. जागेसंबंधीचे वाद सामोपचाराने मिटतील. घरातील तरुणांना नोकरी-धंद्यात उत्तम संधी प्राप्त होतील.

ऑक्टोबर २०१८- या वर्षांअखेरही रवि-शुक्राची शुभ साथ आपले भाग्य अधिक उजळ करील.

कन्या : समस्या सोडवाल

आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दु:खद क्षण आपल्या यशस्वी जीवनाचा शिल्पकार असतो. या वर्षी राहू-गुरूच्या रूपाने हे सदैव आपल्या सुखात अधिक भर घालणारं आहे. मात्र जीवनातल्या चढ-उतारात फार हळवे होऊ नका. गुंतू नका.

नोव्हेंबर २०१७- १६ नोव्हेंबरला वृश्चिकेत प्रवेश करणारा रवी व धनस्थानी शुक्राचे वास्तव्य एकूण खूपच मदतीचे ठरेल. नोकरी, उद्योग-धंद्यात घेतलेल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल. अचानक धनलाभाचे योग येतील. जमीन स्थावर इस्टेटीतून लाभ, जुने मित्र, नातेवाईकांच्या भेटीतून आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

डिसेंबर २०१७- १५ डिसेंबपर्यंतचे रवीचे वृश्चिक राशीतील वास्तव्य खूपचे लाभदायक ठरेल. त्यात गुरू-शुक्राचा सहवास अधिक भर घालील. आखलेल्या योजना अधिक वेगाने पुढे सरकतील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरणात प्रसन्नता लाभेल.

जानेवारी २०१८- बुध-गुरू शुक्राचे उत्तम वास्तव्य या महिन्यातही खूप फायदेशीर ठरेल. उद्योग-धंद्यात आखलेल्या योजना पार पडतील. मात्र निर्णय फार घाईगर्दीने घेऊ नका. संयम, सावधानता खूप महत्त्वाची ठरेल. महिनाअखेर खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंबात गैरसमज होतील, पण साऱ्या गोष्टी धीराने घ्याव्यात.

फेब्रुवारी २०१८- कुटुंबातील गैरसमज हळूहळू दूर होतील. प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणू नका, ‘नाही’ म्हणण्याची हिंमत ठेवा. कुणावरही फार अवलंबून राहू नका. सहाव्या स्थानातील रवी उत्तमपणे पाठीशी उभा राहील. मात्र तूर्त मोठय़ा कामाची बोलणी नकोत.

मार्च २०१८- अति भावनिक राहू नका. उद्योग-धंद्यात, नोकरीत किरकोळ समस्या उभ्या राहतील. त्या सोडवू शकाल. आरोप-प्रत्यारोप, वादविवाद यापासून दूर राहा. काही प्रसंगांतून खऱ्या वास्तवतेचे दर्शन होईल. मनाचा मोठेपणा जपण्यात कसरत करावी लागेल. त्यात गुरू ग्रहाची साथ महत्त्वाची ठरेल.

एप्रिल २०१८- शुक्र-गुरूचे उत्तम सहकार्य, खूपशा कामात जरी सहजता प्राप्त झाली तरी अखेर संघर्षांतून यश लाभेल. आपल्याविरोधात उभे ठाकलेल्या लोकांचे डावपेच त्यांच्या अंगाशी येतील. जागा-स्थावर मालमत्ता यात लाभदायक घटना.

मे २०१८- शनी-मंगळाचा ससेमिरा मागे चालूच राहील. त्यामुळे नोकरी-धंद्यात, राजकारणात आपली प्रगती रोखण्याचा प्रयत्न होईल, पण गुरू-राहूच्या शुभाशीर्वादातून पूर्णपणे हा डाव उधळला जाईल. नि प्रगतीची दारे आपली वाट पाहतील. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील.

जून २०१८- १५ जूनला दशमात प्रवेश करणारा रवी त्याच्याशी गुरूचा नवपंचम योग एकूण यशाची घोडदौड कायम ठेवण्यात थोडीशी दमछाक होईल. पण उत्साह, स्फूर्ती यांच्या जोरावर बरीच क्षेत्रे काबीज कराल. घरात- बाहेरचे वातावरण आनंदी राहील.

जुलै २०१८- रवी, बुध, राहू, गुरू यांचा उत्तम वरदहस्त, त्यामुळे गरज असेल तिथेच संघर्ष करा. नको तितके श्रम, साहस टाळा. अंतर्मनात जपलेल्या इच्छा-आकांक्षा कृतीत येतील. मात्र नात्यात किंवा प्रेमात फार भावुक राहू नका. तो चक्क वेडेपणा ठरेल.

ऑगस्ट २०१८- व्ययात रवी असल्याने आर्थिक गणिते फार खुबीने सांभाळा. फार उतावळेपणा, नाहक खर्च, चुकीच्या जबाबदाऱ्या यांपासून दूर राहा. हट्टीपणाने आतातायी निर्णय घेऊ नका. धीराने व शांतपणे घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

सप्टेंबर २०१८- अचानक सुरू झालेल्या विरोधाचे प्रमाण कमी कमी होत जाईल. त्यात शुक्र-राहूची मदत मोलाची ठरेल. जमीन, स्थावर इस्टेटीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र अतिघाई, अतिविश्वास टाळा. नोकरी-धंद्यात निर्णय घेताना सहकाऱ्यांना विश्वासात घ्या, म्हणजे कामाचे स्वरूप सोपे होईल.

ऑक्टोबर २०१८- या महिन्यातही बुध-शुक्राचा मोठा आधार खूपशा कामांना गती प्राप्त करून देईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कला, क्रीडा क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, मान-सन्मान, प्रियजनांच्या भेटीगाठी, आरोग्य छान राहील. मनोबल वाढेल.

तूळ : यश लाभेल

आपली शनी साडेसाती संपली. एकूण संघर्ष, वादग्रस्तता आणि प्रतिकूल परिस्थितीत माणूस कसा जगतो यावर त्याचे मोठेपण सिद्ध होत असते. नि हा अनुभव साडेसातीत पुरेपूर आपल्याला आला आहे. आता साडेसाती संपल्यानंतर हेच शनी महाराज आपल्या पाठीवर मित्रत्वाचा हात ठेवून आपल्याला मदत करणार आहेत.

नोव्हेंबर २०१७ – साडेसातीच्या खडतर प्रवासाचे भय अजूनही संपत नाही. पण तो भूतकाळ विसरा. आता शुक्र, बुध, शनी असे मातब्बर ग्रह आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा नवीन योजना, नवीन कल्पना लवकरच कृतीत उतरतील. आर्थिक बाजू उत्तम राहील.

डिसेंबर २०१७ – १५ डिसेंबरला रवीचा धनू राशीत प्रवेश तर पराक्रमात शुक्राचे आगमन.. एकूण उत्तम प्रसन्नतेचा काळ. खूपशा लहान-लहान गोष्टींतून आनंद मिळवाल. नोकरी-धंद्यात उत्कर्ष प्रवास सुरू होईल. आरोग्य व मन:स्थिती चांगली राहील.

जानेवारी २०१८ – पराक्रमात १४ जानेवारीपर्यंत रवीचे वास्तव्य तोपर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. घरातील कौटुंबिक वाद फार ताणू नयेत. त्यावर उपाय शोधून निर्णय घ्यावेत. ते सर्वाच्या हिताचे ठरतील. महिनाअखेरीस अनपेक्षित शुभ घटना आनंद देतील. मित्रमंडळींच्या भेटीतून समाधान लाभेल.

फेब्रुवारी २०१८ – बुध, शुक्र, शनीचा सहवास खूपशा गोष्टींना अनुकूल ठरेल. उद्योग-धंद्यात, नोकरीत प्रगतीचा काळ. सामाजिक कार्यात, राजकारणात महत्त्व वाढेल. आरोग्य चांगले राहील.

मार्च २०१८ – पराक्रमात मंगळ, शनी तर षष्टात रवी-बुध आपल्या निर्भय वागण्यातून यशाकडे वळाल. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. नवीन आव्हाने, नवीन कामे पुरी करू शकाल. उद्योग-धंद्यात, नोकरीत आपल्या कर्तृत्वशैलीचे स्वागत होईल. कोर्ट-कचेरीत यशदायक निकाल.

एप्रिल २०१८ – मंगळ, शनी, रवी, बुध, शुक्र एकूण ग्रहांची उत्तम बैठक आपल्या राशीभोवती जमली आहे. या संधीचा उत्तम उपयोग करून घ्या. मात्र उद्योग-धंद्यात तूर्त बदल करू नका. फार चिकित्सकपणे वागू नका. वादविवाद टाळा. वेळेचे भान ठेवा.

मे २०१८ – शनी-शुक्राचे उत्तम मित्रत्व आपल्या राशीला लाभले आहे. नोकरी, उद्योग-धंद्यात आपल्या कर्तृत्वाची चमक दिसून येईल. त्यातून जबाबदाऱ्या, कामाचा भार वाढेल. नवीन परिचय ओळखीतून आनंद लाभेल.

जून २०१८ – शनीचा एक मेव आधार घेऊन आपला प्रवास चालू राहील. अपेक्षा, इच्छा, आकांक्षा याच्या पूर्ततेचा हा काळ आहे. आणि हे सर्व आपण आपल्या मेहनतीतून साध्य करू शकाल. नि त्यातून मिळणारे अलौकिक समाधान शब्दात मोजता येणार नाही. तूर्त वेळापत्रक जपा.

जुलै २०१८ – रवी, बुध, शुक्र, शनी एकूण ही ग्रहमालिका आपल्या राशीत लख्ख प्रकाश घेऊन आली आहे. त्यामुळे खूपशा अडचणी दूर होतील. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. मात्र कुठेही विरोधी झेंडा खांद्यांवर घेऊन नेतृत्व करू नका. राजकारणापासून काही काळ दूर राहा.

ऑगस्ट २०१८ – बुध, रवी, शुक्राची साह्यता अशीच या महिन्यात कायम राहील. मात्र अतिस्पष्ट बोलणे टाळा. तसेच ‘आपले तेच खरे’ हा भाव मनात ठेवू नका. उद्योग-धंद्यातून पैशाची आवक वाढेल. नवीन कामे, नवीन योजनांसाठी हा काळ उत्तम राहील.

सप्टेंबर २०१८ – स्वराशीत शुक्राचे आगमन तर शनी-बुध नवपंचमयोग ही आपल्या जमेची बाजू. खूपशा कामात आपण आघाडीवर राहाल. अधूनमधून मंगळ-गुरू यांच्या विरोधी हालचाली सुरू राहतील. पण आपण मिळवलेला आत्मविश्वास खूपशा कामात मदतीचा ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

ऑक्टोबर २०१८ – शनीची वर्षांअखेपर्यंत लाभलेली मदत खूप मोलाची ठरली, तर शुक्राने आपुलकी, जिव्हाळा जपला. खूपशा अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून पुढच्या वर्षांचा प्रवास सुरू होईल.

वृश्चिक : दैवाची साथ लाभेल

शनीची साडेसाती, बारावा गुरू जरी असला तरी रवी-शुक्राचे राश्यांतर बळ खूपशा गोष्टींना सहजता प्राप्त करून देईल. आपल्या अंतरातल्या आवाजाने स्वीकारलेल्या कामाची खरी पूर्तता होते.

नोव्हेंबर २०१७ – मंगळ-शुक्र शुभयोगात नवीन परिचयातून होणारी मैत्री फायदेशीर ठरेल. अतिभावनावश होऊ नका. जुन्या आठवणी, जुने वाद यांना पूर्णविराम द्या. काळ खूप पुढे चाललाय. नवीन कल्पना, नवीन योजना मार्गी लागतील. त्यासाठी वेळ द्या.

डिसेंबर २०१७ – या महिन्यात खऱ्या अर्थाने साडेसातीचा त्रास जाणवेल. ‘भय इथले संपत नाही.’ अशी जरी अवस्था असली तरी आपल्या राशीतील जिद्द नि परिश्रम पूर्णपणे चित्र बदलतील, अशा विपरीत काळात केलेली मेहनत यश घेऊन येत असते. बाकी आपल्या मनाशी ठाम राहा. परिस्थिती बदलण्याचे कसब तुम्हाला साधेल.

जानेवारी २०१८ – या महिन्यातही ग्रहाचे सहकार्य लाभणार नाही. राजकीय, सामाजिक कार्यात जरा जपून वागावे. स्वत:हून कोणतीच जबाबदारी स्वीकारू नका. शब्द देणे, हमी देणे टाळा. खर्चाचा ताळमेळ सांभाळ. आर्थिक देवाणघेवाण फार काळजीपूर्वक करा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळा.

फेब्रुवारी २०१८ – बुध-शुक्राचा उत्तम सहयोग हा महिना काहीसा समतोल राहील. सुख-दु:खात संयमी माणूस स्थिर राहतो. तो हलत नाही. हे पुरे लक्षात असू द्या. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात नवीन विचार, नवीन कल्पना फलद्रूप होतील.

मार्च २०१८ – सध्याची ग्रहस्थिती साथ देणारी आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. फायद्या-तोटय़ाचे मनांतील अंदाज खरे ठरतील. नोकरी-धंद्यातील गैरसमज दूर होतील. नवीन कामांना गती प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.

एप्रिल २०१८ – या महिन्यात साडेसातीबरोबर ग्रहांचेही बळ हाती नाही. पण बुधाचे बुद्धिचातुर्य, प्रसंगावधान नि सचोटी खूपशा कामात साह्यभूत ठरेल. तिखट बोलणे टाळा. आरोप-प्रत्यारोप नको. अशी पथ्ये पाळली तर खूपसे प्रगतीचे मार्ग जवळ येतील.

मे २०१८- ग्रहांचे उत्तम बळ आहे. रखडलेल्या योजना मार्गी लागतील, त्यातून खर्चाचे प्रमाण वाढेल, पण ही सारी झळ भरून निघेल. बोलण्यातील आत्मविश्वास खूपशी कामे करील. आपल्या बौद्धिक क्षमतेतून आपण आपले मोठेपण सिद्ध कराल. आरोग्य ठीक राहील.

जून २०१८- शुक्र-मंगळाची उत्तम साथ खूपशा गोष्टींना अनुकूल ठरेल. अष्टमात रवी वैचित्र्यपूर्ण घटना अनुभवास येतील. अतिसाहस, वेगाने वाहन चालवणे टाळा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी विचारविनिमय करणे हितकारक ठरेल.

जुलै २०१८ – मंगळ-बुध उत्तम स्थितीत, वातावरणात बदल होईल. उद्योग-धंद्यात, नोकरीत झालेले गैरसमज दूर होतील. आर्थिक लाभ, मानसन्मानाचे योग येतील. शरीरस्वास्थ्य लाभेल, उत्साह वाढेल. प्रवासाचे योग जुळून येतील.

ऑगस्ट २०१८- ग्रहाची उत्तम साथ लाभल्याने साडेसातीतही रवीच्या आगमनाने एक वेगळे चैतन्य प्राप्त होईल. खूप दिवसांच्या इच्छा-आकांक्षा पुऱ्या होतील, तर शुक्रामुळे लाभदायक घटना घडतील. नवीन कामे, नवीन योजना पुढे येतील. त्यातून आनंद, उत्साह वाढेल.

सप्टेंबर २०१८ – रवी, मंगळ, बुध, शुक्र सारेच ग्रह तुमच्या मदतीला तयार आहेत. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. खऱ्या अर्थाने निर्भेळ आनंद लाभेल.

ऑक्टोबर २०१८ – खर्चाचे प्रमाण वाढेल. काही गुंतागुंतीचे प्रश्न मनाला त्रास देतील, पण स्थिर राहून चांगले विचार, चांगल्या कल्पनांचा वावर मनात ठेवा, म्हणजे त्यातूनच सकारात्मक मनाची घडण घडेल नि मग तुमच्या भावी जीवनाचा आलेख उंचावेल.

धनू : आधार लाभेल

खरं तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतून आपण खूपशा चुकीच्या गोष्टींना जन्म देत असतो, त्यातून निर्माण होणारे परिणाम सुख-दु:खाच्या स्वरूपात अनुभवावयास येतात. घटनांचे हे परिणाम आपण आपल्या मनावर कसे ग्रहण करतो यावर आपली मन:स्थिती ठरते. त्यात ग्रहाच्या सहवासाची भर पडून ती घटना कमी-अधिक संवेदनशील होत.

नोव्हेंबर २०१७ – तूळेतील रवी अनुकूल असल्याने १६ नोव्हेंबरपूर्वी महत्त्वाची कामे पुरी करा. आपण ठरवलेल्या योजना, कल्पनांची पूर्तता होईल. शुक्र-गुरूच्या उत्तम सहकार्यातून उद्योग-धंद्यात चैतन्य निर्माण होईल.

डिसेंबर २०१७ – मंगळ, गुरू, शुक्राचा लाभदायक सहवास आनंद देईल. मात्र, खूपशा जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक लाभात भर पडेल. जुने पेचप्रसंग सुटतील. शक्यतो राजकारणी लोकांपासून अंतर ठेवून राहा. आपल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. स्पष्ट मते मांडू नका. आरोग्य चांगले राहील.

जानेवारी २०१८ –  पहिल्या दोन आठवडय़ांत नोकरी, उद्योग-धंद्यात मानसिक त्रास, खूपशा गोष्टी सबुरीने घ्याव्या लागतील. जमीन, आर्थिक व्यवहारात अतिविश्वास टाळा. आश्वासने, वचने देऊ नका. महिनाअखेरीस खूपशा कामांना गती लाभेल.

फेब्रुवारी २०१८ – पराक्रमातील रवी, शुक्राचे उत्तम सहकार्य लाभेल. उद्योग-धंद्यात नवीन बदल घडून येतील. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी कामांना गती प्राप्त होईल. घाईगर्दीत कोणतेही निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग येतील.

मार्च २०१८ – या महिन्यात एकमेव गुरूचे साह्य खूप मोलाचे ठरेल. १४ मार्चपूर्वी महत्त्वाची कामे मार्गी लावा. गैरसमज, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुठलाही अतिरेक, साहस टाळा. कोणतेही निर्णय दबावाने वा घाईने घेऊ नका. वाजवी खर्च टाळा. जुनी येणी वसूल होतील.

एप्रिल २०१८ – बुध, गुरू सोडले तर बाकी ग्रहांच्या विरोधाची झळ काहीशी त्रासदायक ठरेल. खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. स्थावर इस्टेटीच्या वादात थोडीशी माघार घेणे शहाणपणाचे ठरेल. चर्चेतून प्रश्न सुटतील. शांत व संयम हे यशाचे सूत्र ठरेल.

मे २०१८ – रवी, बुध, गुरू यांच्या प्रसन्नतेतून खूपशा अडचणींवर मात करता येईल. नोकरी, उद्योग-धंद्यात उत्तम संधी चालून येतील. नातेवाईक, मित्रमंडळींत गैरसमजाचे सावट दूर होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जुनी येणी यातून धनलाभ होतील.

जून २०१८ – १४ मे पर्यंत महत्त्वाची कामे करून घ्यावीत. उद्योग-धंद्यात, नोकरीत आलेल्या संधींचा त्वरित फायदा घ्यावा. फार भावनावश होणे, हळवेपणा यांपासून दूर राहा. संयमाने वागा. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्लामसलत जरूर करा. आरोग्याची काळजी घ्या.

जुलै २०१८ – शुक्र, गुरूचे उत्तम साह्य, पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. शेअर धंद्यात सावधपणे वागा. सामाजिक जीवनात वावरताना सत्याची बूज राखा. नव्या संधी, नवे मार्ग उपलब्ध होतील.

ऑगस्ट २०१८ – प्रेमात, मैत्रीत काही कारण नसताना अविश्वासाचे वारे वाहू लागतील. किरकोळ वादविवाद, गैरसमज, मानापमान यातून मनस्ताप होईल, पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती पूर्णपणे बदलेल. खूपशा बाबतीत समेट होईल तो स्वीकारा.

सप्टेंबर २०१८ – रवी, बुध, शुक्र, गुरूच्या साह्यातून परिस्थितीला उत्तम कलाटणी मिळेल. उद्योग-धंद्यात, नोकरीत काही रखडलेली कामे पुन्हा कार्यान्वित होतील. त्यातून खर्चाचे प्रमाण वाढेल, पण पुढील फायद्यासाठी ते हिताचे ठरेल. कामाच्या उत्साहात दगदग वाढेल, श्रम होतील.

ऑक्टोबर २०१८ – वर्षभर गुरूची उत्तम साथ लाभली, पण आता रवी-बुध-शुक्राचा लाभस्थानातील सहवासही तितकाच मोलाचा ठरेल. हाही महिना उद्योग-धंद्यात, नोकरीत तितकाच यशस्वी ठरेल.

मकर : बौद्धिक आरोग्य जपा

साडेसातीचे पर्व सुरू आहे. त्यात गुरू ग्रहाचा असहकार अशा प्रतिकूल स्थितीत रवी-शुक्राचे वर्षभरातील राश्यांतर खूप मदतीचे ठरेल. सध्या कुठल्याही ग्रहाच्या मदतीपेक्षा सतत मनातील चांगल्या विचाराचे, चांगल्या कल्पनांचे चिंतन खूप गरजेचे ठरेल. तसेच स्थिर मनाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक नवीन विषयाची आवड निर्माण होईल.

नोव्हेंबर २०१७ – लाभात रवी, बुध आहेत. उद्योग-धंद्यातील स्पर्धेत आघाडीवर राहाल. मात्र, हितशत्रूंपासून सावधानता बाळगा. बोलण्यातून-वागण्यातून कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घ्या. जुनी येणी येतील. आर्थिक सुबत्ता वाढेल, मन उत्साही, आनंदी राहील.

डिसेंबर २०१७ – बुध-शुक्राच्या कामगिरीतून गुप्त शत्रूंच्या कारस्थानांना खीळ बसेल. त्यातून आपल्या बुद्धीचा पराक्रम श्रेष्ठ ठरेल.  सावधानता, नियोजन व मानसिक संतुलन यातून आपल्या नेहमीच्या जीवनात यशस्वी व्हाल. आर्थिक बाजू उत्तम राहील.

जानेवारी २०१८ – मंगळाची परखडता सोडली तर कुठल्याच ग्रहाचे साह्य लाभणार नाही. कायदेशीर बाबी, कोर्टकचेरी कामात सावधानता बाळगा. कुटुंबात, नात्यात नको ते गैरसमज, त्यातून काहीसा मनस्ताप होईल. मात्र महिनाअखेरीस खूपशा बाबींवर पर्याय सापडेल. त्यातून समाधान मिळेल.

फेब्रुवारी २०१८ – उद्योग-धंद्यात, नोकरीत योजना, कामे सफल होतील. कामाचे उत्तम आयोजन, श्रम, ध्यास यातून आपले महत्त्व वाढेल. त्यातून नवीन जबाबदाऱ्या येतील. सामाजिक कार्यात उत्तम सहभाग, कौटुंबिक समस्या दूर होतील.

मार्च २०१८ – उद्योग-धंद्यात, नोकरीत उत्तम संधी. आपल्या नवीन योजना, नवीन विचाराचे स्वागत होईल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीतून समाधान मिळेल. प्रवासाचे लहानसे योग येतील. घरातील वातावरण आनंदी राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल.

एप्रिल २०१८ – १४ एप्रिलपर्यंत रवी पराक्रमात महत्त्वाची कामे करून घ्यावीत. बुध-शुक्राची उत्तम मदत. घरातील वातावरण आनंदी राहील. उद्योगधंद्यात, नोकरीत सहकार्याचे वातावरण राहील. लाभदायक घटना, त्यातून पैशाची आवक वाढेल.

मे २०१८ – हितशत्रूंपुढे एक पाऊल मागे येणे खूप हिताचे ठरेल. उद्योगधंद्यात, नोकरीत झालेले गैरसमज दूर होतील. आरोग्य ठीक राहील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. त्यातून आनंद मिळेल.

जून २०१८ – बऱ्याचशा गोष्टी मनासारख्या होतील. त्यातून कामाची व्यापकता वाढेल. त्यामुळे वेळेचे महत्त्व कळेल. घरातील मुलांना नोकरीधंद्यात चांगल्या संधी प्राप्त होतील. कोर्टकचेरीच्या कामात यश, घरातील वातावरण आनंदी राहील.

जुलै २०१८ – रवी-शुक्राचे उत्तम साह्य. खूपशा गोष्टी सुबुरीने घ्या. घाई, धांदल यात खूपसे अंदाज चुकवतील. उद्योगधंद्यातील संघर्ष संपेल. जुनी येणी वसूल होतील. नवीन जागा, स्थावर इस्टेट खरेदीसाठी उत्तम काळ.

ऑगस्ट २०१८ – उद्योगधंद्यातील नवीन बदल पथ्यावर पडतील. मात्र बेकायदा वागणे, चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे टाळा. आर्थिक बाबतीत जमाखर्चाचा ताळमेळ साधा. प्रेम, हळवेपणा, भावनोत्कटता यांचा अतिरेक टाळा. त्यातून नुकसान संभवते.

सप्टेंबर २०१८ – महत्त्वाची कामे मार्गी लावा. वेळापत्रकाप्रमाणे कामाचा क्रम लावून कामे उरका. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण उधळपट्टीस आवर घाला. आमिषांना बळी पडू नका. मित्रमंडळींच्या मदतीसाठी चुकीची कामे करू नका. ती त्रासदायक ठरतील.

ऑक्टोबर २०१८ – ११ ऑक्टोबरला गुरूचा वृश्चिक राशीतील प्रवेश आपला भविष्यकाळ उज्ज्वल करील. दशमातील रवी-बुध उद्योगधंद्यात, नोकरीत महत्त्वाचे ठरतील. त्यातून उत्कर्षांची वाट तयार होईल, नवीन वर्षांकडे निघालेला मकर राशीचा प्रवास सुखद होईल.

कुंभ : सुज्ञतेचा उपयोग करा

गुरू, शनी, राहू अशा मातब्बर ग्रहांचा सहवास आपल्याला जास्तीत जास्त काळ लाभणार आहे. बुद्धी आणि भावना यांचा वापर कुशलतेने केला तर खूपशा कामांत आपण यशस्वी व्हाल. आपल्यातील चांगुलपणाचा, निरागसतेचा फायदा कुणालाही घेऊ देऊ नका. सात्त्विकता जरूर असावी, पण तिचा बाजार होऊ नये. महिलांना परिश्रम व सद्हेतू सफलता देतील.

नोव्हेंबर २०१७ – १६ नोव्हेंबरला रवीचे वृश्चिकेतील राश्यांतर खूप मोलाचे ठरेल. तर गुरू, शुक्र, शनी ग्रहांचा सहवासही खूपशा कामांना अनुकूता देईल. उद्योग-धंद्यात भागीदारी यशदायक ठरेल. सामाजिक कार्यात, राजकारणात भाग घ्याल. प्रवासाचे योग जुळून येतील. आर्थिक बाजू चांगली राहील.

डिसेंबर २०१७ – रवी, बुध उत्तम स्थितीत. उद्योग-धंद्यात, नोकरीत उत्तम संधी चालून येतील. घरांतील वातावरण आनंदी राहील. आपल्या नम्रतेचे कौतुक होईल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटीतून वेगळे समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील.

जानेवारी २०१८ – उत्तम ग्रहस्थिती. महत्त्वाची कामे पार पडतील. उद्योग-धंद्यात, भागीदारीत लाभदायक घटना. नवीन योजना, कामांना गती लाभेल. या प्रगतीच्या काळात उत्साह, ऊर्जा वाढेल. सरकारदरबारी कामात दिरंगाई टाळा. सावधतेने वागा.

फेब्रुवारी २०१८ – गुरू-शनीचे उत्तम सहकार्य. त्यातून कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यातून मानसिक स्वास्थ लाभेल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ आदी घटना आनंद देतील.

मार्च २०१८ – अर्थप्राप्ती चांगली होईल. तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. निर्णय घेण्यात मागे-पुढे होईल. तेव्हा तूर्त त्वरित निर्णय घेण्याची घाई करू नका. वादविवाद टाळा. जागेचे व्यवहार जागृतपणे करा. शब्द-आश्वासने देऊ नका.

एप्रिल २०१८ – पराक्रमातील रवी खूपशा गोष्टींना लाभदायक ठरेल. शनीच्या सामंजस्यातून रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारण, सामाजिक कार्य, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतले आपले वर्चस्व कायम राहील. दगदग वाढेल. विश्रांती घ्या.

मे २०१८ – उत्तम ग्रहसौख्य. नोकरी, उद्योग-धंद्यात विशेष प्रगती. हितशत्रूंचा त्रास जाणवेल. वादविवाद टाळा. बेताल, बेकायदा वागू नका. शांतपणे धिराने वागा. अडचणीतून मार्ग निघतील. एकूण महिन्याचा प्रवास आनंद व सुखाच्या गतीने पुढे जाईल.

जून २०१८ – गुरू-शनीचे उत्तम साह्य लाभेल. इतर ग्रहांची नाराजी राहील, पण आपल्या कार्यक्षेत्रावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही. राहूच्या वर्चस्वातून उत्तम संवाद साधला जाईल. स्नेह, विश्वास आणि दूरदर्शीपणातून आपल्या कामांना सहजता प्राप्त होईल.

जुलै २०१८ – १६ जुलैला रवी षष्टात. कामाचे स्वरूप बदलेल. अगदी जिवाभावाची मित्रमंडळी आपल्या मदतीला धावून येतील नि तशा अडचणीही दूर होतील. मात्र मानलेल्या नात्यांना व्यावहारिक स्वरूप देऊ नका. आणि मानापमानाचे हिशेब ठेवू नका, म्हणजे आपल्या सुखात अधिक भर पडेल.

ऑगस्ट २०१८ – १७ ऑगस्टपूर्वी महत्त्वाची कामे उरकून घ्या. नवीन योजना, नवीन कामे यात आपल्या कार्यकुशलतेचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. राहूच्या सहकार्यातून स्थिर व संयमशील राहण्याचे सूत्र मिळेल.

सप्टेंबर २०१८ – ग्रहांची संमिश्र स्वरूपात मदत लाभेल. उद्योग-धंद्याच्या स्पर्धेत टिकून राहाल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल. शुक्र -शनी त्रिएकादश योगातून खूपशा अडचणी दूर होतील. महिन्याच्या उत्तरार्धात नवीन संधी, नवीन कामे हाती येतील.

ऑक्टोबर २०१८ – ११ ऑक्टोबरला वृश्चिकेत जाणारा गुरू उद्योग-धंद्यात, नोकरीत जरी अडचणीचा ठरला तरी शनीच्या कृपादृष्टीमुळे सहजता प्राप्त होईल.

मीन : उत्कर्ष साधाल

बोलण्यातील नम्रता कायम असू द्या. तो तुमचा सद्गुण ठरेल. कटकारस्थाने, शाब्दिक चकमकी करणाऱ्यांपासून दूर राहा. या वर्षी जरी ग्रहांचे पाठबळ नसले तरी आपल्यापाशी असलेली निर्णयक्षमता आपल्या यशाला अधिक सामथ्र्यवान करील. महिलांनी चुकीची पुनरावृत्ती करू नये. वादातून मार्ग सापडणार नाहीत.

नोव्हेंबर २०१७ – खोटी आपुलकी जास्त काळ फसवू शकत नाही नि असा अनुभव या महिन्यात आपल्याला येईल तेव्हा अति विश्वास, भावना, प्रेम यात फारसे रंगून जाऊ नका. समोरच्या व्यक्तीचे खरे स्वरूप ओळखा. नेपच्यून नवपंचमयोगातून मानसिक स्थिती चांगली राहील.

डिसेंबर २०१७ – रवी-शुक्राचे उत्तम साह्य. उद्योग-धंद्यात, नोकरीत उत्तम यश लाभेल. त्यात आणखी जबाबदाऱ्या वाढतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. राजकारण, सामाजिक कार्यात नको ते राजकारण आडवे येईल, त्याला शांतपणे सामोरे जा.

जानेवारी २०१८ – रवी, बुध, शुक्राच्या सहकार्यातून आर्थिक आवक वाढेल. प्रयत्न व कामाची तळमळ यातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या सहवासातून आनंद मिळेल. सार्वजनिक धार्मिक कार्यात भाग घ्याल.

फेब्रुवारी २०१८ – एकूण ग्रहाचे पाठबळ बिलकूल नाही. त्यामुळे समजुतीने वगण्यात खूप फायदा होईल. सामाजिक कामात गैरसमज, वादविवाद यात टोकाची भूमिका घेऊ नका. महिनाअखेरीस उद्योग-धंद्यात, नोकरीत विशेष लाभदायक घटना घडतील.

मार्च २०१८ – ग्रहांच्या अडथळ्याची शर्यत समजून घेऊन पुढे जाताना जर योग्य आखणी केली तर खूपशा नव्या संधी उपलब्ध होतील. मनाचा उत्साह, ऊर्जा, कामाचे स्वरूप सोपे करील नि कामांना वेग येईल.

एप्रिल २०१८ –  शनी, गुरूचे वास्तव्य जरी कटुता आणणारे असले तरी मंगळ, बुध, शुक्राच्या स्नेहातून ते पार पुसले जाईल. अखेर सत्य नि सचोटीच्या साह्याने विरोधाची तीव्रता कमी होईल. दगदग- धावपळ वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मे २०१८ – रवी, मंगळ, बुध, शुक्र अशी एक उत्तम ग्रहमालिका आपल्या राशीभोवती गुंफली आहे. महिन्याच्या उत्तरार्धात चित्र अधिकाअधिक स्पष्ट होऊन आपण हातात घेतलेली कामे पूर्णपणे यशस्वी कराल. त्याबरोबर आर्थिक बाजू उत्तम राहील.

जून २०१८ – बुध-शुक्राचा उत्तम सहवास खूपशा बाबतीत मदतीचा ठरेल. हा महिना काहीसा समतोल राहील. संयम असू द्यावा, तसेच जिद्द नि श्रम अशा काळात खूप मदतीचे ठरतात. नवीन योजना, नवीन कल्पना पुढे सरकतील.

जुलै २०१८ – मंगळ, बुध, शुक्राची उत्तम साथ त्यामुळे नोकरी, उद्योग-धंद्यात विशेष  प्रगती. मात्र अति आत्मविश्वास टाळा. चर्चेतून प्रश्न सोपे होतील. कौटुंबिक प्रश्नांना फार व्यापक स्वरूप देऊ नका. गैरसमज दूर करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. मागील येणी वसूल होतील.

ऑगस्ट २०१८ – गुरू, शनीच्या असहकारातून खर्चाचे प्रमाण वाढेल. उद्योग-धंद्यात, नोकरीत कामाचा व्याप वाढेल. पण १७ ऑगस्टला षष्ठस्थानात प्रवेश करणारा रवी खूप मोलाची कामगिरी करेल. रेंगाळलेली कामे पुढे सरकतील, आत्मविश्वास वाढेल. नवीन जागेच्या खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ.

सप्टेंबर २०१८ – बुध, रवीचा मदतीचा हात खूप मोलाचा ठरेल. नवी नवी आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. उत्साह वाढेल. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घेणे गरजेचे ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

ऑक्टोबर २०१८ – ११ ऑक्टोबरला गुरूचे भाग्य स्थानात होणारे आगमन खूप लाभदायक ठरेल. एकूण नव्याने ऊर्जितावस्थेचा काळ अनुभवाल. अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. मन:स्वास्थ चांगले राहील. नवीन कल्पना, नवीन योजनांसाठी नवीन वर्ष फायद्याचे ठरेल.
ज्योतिषरत्न उल्हास प्रभाकर गुप्ते

First Published on March 26, 2018 11:02 am

Web Title: diwali 2017 yearly astrology