21 November 2019

News Flash

मुझको भी तरकीब सिखा दे…

‘इजाजत’ हा गुलजारजींचा चित्रपट म्हणजे तर मूर्तिमंत कविता आहे.

गुलजारजींची ही विवेकी विचार करायला शिकवणारी गाणी आपल्यालाही तणावमुक्त जगण्याची तरकीब शिकवतात.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

मृदुला बेळे
विवेकनिष्ठ विचारसरणीनुसार, आपण जे स्वत:शी मनातल्या मनात सतत बोलत असतो त्याला म्हणतात- स्वसंभाषण. आणि आपण स्वत:शी काय बोलतोय याकडे जरा जाणीवपूर्वक लक्ष दिले तर आपली भावनिक आणि मानसिक आंदोलने आपण अगदी सहजपणे नियंत्रणात ठेवू शकतो, असे विवेकनिष्ठ विचारसरणी (Rational Emotive Behavioral Therapy- REBT) सांगते. त्यासाठी आपल्या अविवेकी विचारांशी आपल्या मनाला भांडायला शिकवावे लागते. गुलजारजींच्या अनेक चित्रपटगीतांमध्ये त्यांनी कळत-नकळत आपल्याला असे भांडायला शिकवलेले दिसते.

गुलजारजींच्या कवितेचं गारूड माझ्यावर सुरू झालं तेव्हा मी असेन १९-२० वर्षांची. खरं तर त्यांच्या चित्रपटातील गाण्यांकडून त्यांच्या गैरफिल्मी कवितेकडे असा वाचनाचा प्रवास होणं हे अधिक नैसर्गिक आहे. पण माझा प्रवास मात्र उलट झाला. कधीतरी ‘पुखराज’ हातात पडलं आणि त्यातल्या कवितांनी झोप उडवल्यावर गुलजारजींच्या चित्रपटांतील गाण्यांकडे अधिक डोळसपणे, ती केवळ ‘गाणी’ म्हणून न पाहता ‘कविता’ म्हणून पाहणं सुरू झालं. तोपर्यंत गाण्यातल्या संगीताकडेच माझं जास्त लक्ष असायचं. गुलजारजींची गाणी त्यातल्या वेगळ्या विचारांनी, वेगळ्या शब्दांनी आणि कल्पनांनी मनात घर करू लागली. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढू लागली. सगळे मार्ग संपलेत असं वाटत असताना नवा रस्ता दाखवू लागली. बोट धरून चालवू लागली.

नंतर कधीतरी अल्बर्ट एलीसच्या विवेकनिष्ठ विचारसरणीशी (Rational Emotive Behavioral Therapy किंवा REBT) तोंडओळख झाली. ही मानसशास्त्रातील एक विचारसरणी आहे- किंवा एक जीवनपद्धती आहे, म्हणू या. हिची तत्त्वे अंगी बाणवली तर भावनिक ताणतणावांचे व्यवस्थापन सोपे जाते आणि त्यामुळे जगणे खूप सुकर होते. विवेकनिष्ठ विचारसरणीचा पाया आहे- ABC analysis. यातला A म्हणजे आहे activating event, B म्हणजे belief  आणि C म्हणजे consequence. म्हणजे पहा, तुम्ही रस्त्याने चालत जात असताना समोरून तुमच्या ओळखीची एक व्यक्ती तुम्हाला येताना दिसली. हा तुमचा बऱ्यापैकी चांगला मित्र आहे. पण त्याने तुम्हाला ओळखच दाखवली नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा भयंकर राग आला आणि त्याच्याबरोबरचे तुमचे संबंध कायमचे दुरावले. आता यात activating event (A) किंवा कारणीभूत घटना आहे.. त्या व्यक्तीचे तुम्हाला ओळख न दाखवणे. आणि त्याचा परिणाम किंवा Consequence (C) काय झाला? तर तुम्हाला प्रचंड राग आला. पण हा राग त्या कारणीभूत घटनेमुळे- म्हणजे त्या व्यक्तीने ओळख न दाखविल्यामुळे खरं तर आला नाही. तर आपण त्याबाबत काय अविवेकी समज (belief- B) करून घेतला, आणि त्याबाबत स्वत:शी मनातल्या मनात काय बोललो, त्यामुळे आला. म्हणजे समोरून येणारा तुमचा मित्र कदाचित प्रचंड तणावात होता आणि त्यामुळे तुम्ही त्याला दिसलाच नाहीत असंही असू शकेल. पण तुम्ही मात्र असा समज करून घेतलात, की त्याने हे मुद्दाम केले आहे, किंवा तो फार शहाणा समजू लागला आहे स्वत:ला. आणि तुम्ही हा जो अविवेकी समज करून घेतला, त्यामुळे तुम्हाला राग आला. म्हणजे तुम्हाला राग येऊ  द्यायचा नसेल तर तुम्ही जो अविवेकी समज करून घेतला त्याऐवजी विवेकाला धरून विचार केला असतात तर तुम्हाला आलेला राग आणि त्याने निर्माण झालेला तणाव टाळू शकला असतात. म्हणजेच तुम्हाला जो तणाव आला, त्याचं कारण ती घटना नसून त्याबद्दलचा तुमचा अविवेकी समज आहे. आणि स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर काम करून तुम्ही जर विवेकनिष्ठ विचार करू शकलात तर ही भावनिक आंदोलने टाळता येऊ  शकतील.

विवेकनिष्ठ विचारसरणीनुसार, आपण जे स्वत:शी मनातल्या मनात सतत बोलत असतो त्याला म्हणतात- स्वसंभाषण. आणि आपण स्वत:शी काय बोलतोय याकडे जरा जाणीवपूर्वक लक्ष दिले तर आपली भावनिक आणि मानसिक आंदोलने आपण अगदी सहजपणे नियंत्रणात ठेवू शकतो असे REBT सांगते. त्यासाठी आपल्या अविवेकी विचारांशी आपल्या मनाला भांडायला शिकवावे लागते. आणि गुलजारजींच्या अनेक चित्रपटगीतांमध्ये त्यांनी कळत-नकळत आपल्याला असे भांडायला शिकवलेले दिसते.

आपल्या स्वसंभाषणाकडे नीट लक्ष पुरवले तर कळेल की, बऱ्याचदा आपल्या अनेक विचारांच्या शेवटी एक ‘च’ असतो. म्हणजे परीक्षेचा निकाल लागणार असतो तेव्हा आपले स्वसंभाषण ‘‘मला चांगले गुण मिळाले पाहिजेत’’ असे नसते, तर ‘‘मला चांगले गुण मिळाले‘च’ पाहिजेत’’ असे असते. आणि या ‘च’मुळेच सगळा घात होतो. मिळाले पाहिजेत, ही इच्छा आहे. म्हणजे मिळाल्यास उत्तम; पण नाहीच मिळाले तरी फार काही बिघडणार नाही. पण मिळाले‘च’ पाहिजेत, हा मात्र हट्ट आहे.. दुराग्रह आहे. नाही मिळाले तर मग माझी इज्जत जाईल, मी कुणाला तोंड कसे दाखवू, हे त्याच्यापुढचे विचार आहेत.

अनेकदा माणसाला आयुष्यात नैराश्य येण्यास कारणीभूत असतात ती नाती. नात्यातल्या असफलतेमुळे, किंवा प्रेमभंगामुळे येणारे नैराश्य कधी कधी इतक्या टोकाचे असते, की अनेक तरुण मुलं या नैराश्याला बळी पडून स्वत:चा जीव द्यायला, किंवा आपल्या प्रियकर/ प्रेयसीचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशावेळी या मुलांचे स्वसंभाषण काय असते? ‘‘हा मुलगा/ मुलगी मला माझा प्रियकर/ प्रेयसी म्हणून मिळाला/ली‘च’ पाहिजे’’ हे. ‘हा माझा प्रियकर झाला तर मला आवडेल..’ इथवर हा विचार मर्यादित राहत नाही. तो याच्या कोसभर पुढे निघून जातो आणि हट्ट होतो.

आपल्या बॉलीवूड चित्रपटांत अशा अर्थाची अनेक गाणीही आढळतात. पाहा. उदा. ‘दिल में आग लगाये सावन का महिना, नहीं जीना, नही जीना, तेरे बीन नहीं जीना’, किंवा‘जिये तो जिये कैसे, बिन आपके’,  ‘हम तुमसे जुदा होके, मर जायेंगे रो रो के‘, वगैरे. आणि असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिला तुम्ही तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं बनवलेलं असतं. ती व्यक्ती तुमच्या जगण्याचा फक्त एक भाग आहे; तुमचं संपूर्ण जगणं नव्हे, हे तुम्ही विसरून जाता. आणि मग ती व्यक्ती मिळाली नाही तर जीव देण्याची अशी टोकाची भाषा करता.

या अशा अनेक गाण्यांच्या पाश्र्वभूमीवर लख्खपणे प्रकाश देऊन जाते- ‘तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नहीं..तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं’  हे गुलजारजींचे गाणे.. ‘आंधी’ या चित्रपटातले. यातला नायक जे. के. आहे एक साधासुधा, मध्यममार्गी, विशेष महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस. तर नायिका आरती मात्र आहे हुशार, महत्त्वाकांक्षी, एका राजकीय नेत्याची मुलगी. दोघं प्रेमात पडून लग्न करतात. त्यांना एक मुलगी होते. पण आरती या साध्यासुध्या गृहिणीच्या भूमिकेत फारशी रमत नाही. तिला तिची राजकीय महत्त्वाकांक्षा सतत साद घालत असते. आणि नायकाला मात्र तिने या भानगडीत पडू नये असे वाटते. जेव्हा वाद विकोपाला जातात तेव्हा ते दोघं हे नातं संपवायचं ठरवतात. त्यानंतर आरतीची आपल्या आवडीच्या राजकीय क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरू होते आणि ती देशाची पंतप्रधान होते. तर जे.के.चे कर्तृत्व मात्र एका हॉटेलच्या मॅनेजरपदापर्यंतच मजल मारू शकले आहे. वेगळे झाल्यानंतर नऊ  वर्षांनी अचानक दोघे भेटतात. आरती तिच्या राजकीय दौऱ्यावर असताना जे.के.च्याच हॉटेलमध्ये उतरलेली असते. आणि त्यांची भेट होते. भेटीगाठी परत सुरू होतात. अशाच एका भेटीच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटात हे गाणे आहे. दोघांनी एकेकाळी एकमेकांवर नितांत प्रेम केलंय.. आणि आजही करतायत. पण आरतीच्या कारकीर्दीबाबत मतभेद असल्याने ते समजूतदारीने वेगळे झालेत. ते अपरिहार्य आहे. आणि ते त्यांनी स्वीकारलंय.

‘‘तू नाहीस आयुष्यात तर माझी काही तक्रार नाही. पण तू नाहीस, तर हे जगणं जगणंही नाही..’’ असं दोघंही एकमेकांना म्हणतायत. यात परिस्थितीचा स्वीकार आहे. नातं संपलंय म्हणून दोघेही कोसळून गेले नाही आहेत. ठामपणे उभे आहेत. आणि आपापले मार्गक्रमण करताहेत. आणि हे का शक्य झाले आहे? कारण हे नातं हे आपल्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत सुंदर भाग होतं यात त्यांना शंका नाहीच मुळी! पण हे नातं म्हणजे आयुष्य नव्हे, हेही दोघांना मान्यच आहे. याशिवायही आपली काही ध्येयं आहेत, त्यासाठी या नात्याचा त्याग त्यांना करावा लागला आहे. आणि तो त्यांनी केला आहे. पण तरी हेही दोघांना मान्य आहेच, की एकमेकांशिवाय आयुष्यातला एक फार फार महत्त्वाचा कप्पा रिकामा आहे.. सुना आहे. त्यामुळे सगळं मिळूनही असायला हवं तेवढय़ा सुखात आपण नाही आहोत. पण या परिस्थितीचा जाणीवपूर्वक स्वीकार आहे या गाण्यात!

‘काश ऐसा हो तेरे कदमों से
चुनके मंझिल चले
और कही, दूर कही…
तुम गर साथ हो, मंझिलों की कमी तो नहीं
तेरे बिना जिंदगी से कोई
शिकवा तो नहीं…’

ती म्हणतेय की, ‘तुझे पाय निवडतील त्या ध्येयाच्या वाटेवर आपण दोघेही दूर दूर चालत निघून जाऊ  शकलो असतो तर किती बरं झालं असतं ना? पण दुर्दैवाने ते आता शक्य नाही.

‘जी में आता है तेरे दामन में
सर झुका के हम रोते रहे, रोते रहे
तेरे भी आंखों में आसूओं की नमीं तो नहीं
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं…’

‘तुझ्या छातीत डोकं खुपसून तू नाही आहेस म्हणून रडत रहावंसं वाटतंय मला, पण ते आता शक्य नाही. तुझ्याही डोळ्यांत त्यामुळेच पाणी तरारलंय ना? पण नाही रे.. ते शक्य नाहीये..’

तो म्हणतोय- ‘आज रात्री मी या चंद्राला थांबवून ठेवू शकलो असतो तर किती बरं झालं असतं ना? म्हणजे तुला दिवस उजाडल्यावर निघून जायला लागणार नाही, राहता येईल इथेच. पण नाही गं. ते शक्य नाहीये. कारण आपणच समजूतदारपणे निर्णय घेतलाय ना वेगळे व्हायचा? मग आता तक्रार करून कसं चालेल? तक्रार नाहीच आहे माझी आयुष्याकडे तू नाहीस म्हणून. पण तू नाहीस तर काही मजाही नाही..’

‘तुम जो कह दो तो आज की रात
चांद डुबेगा नहीं
रात को रोक लो…
रात की बात है, और जिंदगी बाकी तो नहीं..’

असं वाटतं की, गुलजारजींच्या तोंडून कुणी मानसशास्त्रज्ञच बोलतोय. विवेकनिष्ठ विचारसरणीचा अगदी जिवंत धडा आहे हा. यात नातं संपलंय या परिस्थितीचा स्वीकार आहे. तू असायला हवी होतीस, ही खंत आहे. पण हवीसच, हा हट्ट नाही. आणि या स्वीकारानेच दोघांचेही जगणे सुसह्य़ झाले आहे.

जवळपास याच अर्थाचे आणखी एक गाणे आहे. त्याचा मुखडा आहे :

‘आज बिछडे है, कल का डर भी नहीं
जिंदगी इतनी मुख्तसर भी नहीं’

‘आज आपण वेगळे झालोय, उद्या कुणी पाहिलाय? मग त्याला घाबरायचे कशाला? टुमारो इज अनदर डे.’ आणि अशा गोष्टींनी त्रास करून घेण्याइतकं आयुष्य छोटं आहे का?

एखादं नातं जेव्हा वादळात सापडतं, तुटण्याच्या मार्गावर असतं, किंवा गैरसमजाच्या वादळात सापडतं, तेव्हा ते वाचवणं सहज शक्य असतं. दोघांपैकी कुणीतरी एकाने जरासं पडतं घेतलं, समझोता करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर हे नातं सहज वाचवता येऊ  शकतं. पण कधी कधी होतं असं, की दोघांपैकी कुणीच हे पाऊल पुढे टाकायला तयार होत नाही. त्याचं कारण असतं- माझं काही चुकलेलंच नाही, चुकूच शकत नाही, हा अहंकार. आणि हा अहंकार विचारांमध्ये अविवेकी बंडखोरी निर्माण करतो. एकत्र राहण्यामधला आनंद हे उद्दिष्ट त्यामुळे हरवते. नातं जगवण्याला जर प्राधान्य दिले तर मनातली बंडखोरी सहज शमेल. माफी मागण्यासाठी पाऊल उचलले जाईल. पण आडवा येतो परत तोच- ‘च’; आणि परत तोच अविवेकी विचार. समोरचा माणूस चुकीचा‘च’ आहे आणि मी नेहमीच बरोबर असतो, हा गैरसमज. आणि हेच ‘थोडीसी बेवफाई’ चित्रपटातल्या या गाण्यातून गुलजारजी सांगतायत. यातल्या नवरा- बायकोच्या नात्यात एका क्षुल्लक कारणामुळे वितुष्ट आलं आहे. यातल्या बायकोने आपल्या पतीला एका मैत्रिणीबरोबर पाहिलंय आणि तडकाफडकी काहीही शहानिशा न करता ती घरातून निघून गेली आहे. खरं तर तिला वाटतं आहे तसं काहीही नातं नाही आहे तिच्या नवऱ्यात आणि त्याच्या मैत्रिणीत. पण एका अविवेकी समजापायी ती हे नाते संपवते. या पाश्र्वभूमीवरील या गाण्याच्या ओळी आहेत:

‘तुम्हे ये जिद थी के हम बुलाते, हमे ये उम्मीद वो पुकारे
है नाम होठों पे अब भी लेकीन, आवाज में पड गई दरारे
हजार राहे, मुड के देखी, कहीं से कोई सदा ना आई
बडी वफा से निभाई तुमने, हमारी थोडी सी बेवफाई..’

दोघांनाही वाटतंय, की हे नातं जगवावं; पण समोरच्याने! तू हट्ट धरून बसलीस की मी हाक मारीन, आणि मी तू बोलावशील या आशेवर जगत राहिलो. खरं तर तुझं नाव अगदी ओठांवरच आहे माझ्या. पण आपल्या मनात पडलेली दरी इतकी मोठी आहे, की आवाज पोहोचूच शकत नाही आहे एकमेकांपर्यंत. मी प्रत्येक रस्त्यावर परत परत वळून पाहिलं, पण कुठूनही तुझी हाक ऐकू आली नाही!  मी तुझा केलेला (सो-कॉल्ड) विश्वासघात तू मात्र फारच विश्वासाने निभावालास.

‘कायदा तोड के सोचो एक दिन..’ हे ‘खूबसूरत’मधलं गाणं पाहा. यातली मंजू (रेखा) आपल्या बहिणीच्या- अंजूच्या सासरी राहायला आली आहे. अंजूची सासू निर्मला आहे कडक शिस्तीची. आणि तिच्या शिस्तीवर ती तिचे घर चालवते. तिची मुलं, सुना, नवरा हे सगळेच या शिस्तीपायी भरडले जातायत. कुणालाही आपल्या मनाप्रमाणे जगता येत नाही. आपापल्या छंदांना वेळ देता येत नाही. नाचायची आवड असली तरी नाचायचं नाही, गायला आवडतं तरी गायचं नाही, अशी निर्मलाबाईंची शिस्त आहे. अशा या शिस्तीच्या जोखडात अडकलेल्या आणि त्यामुळे हसणं- खेळणं विसरलेल्या घरात एक दिवस मंजू येऊन धडकते.. आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या दीदीच्या सासरी राहायला. मंजू आहे बिनधास्त आणि नटखट. स्वत:ला हवं तसं आयुष्य जगणारी. तिला घरात आपल्या दीदीची आणि इतर लोकांची मुस्कटदाबी सहन होत नाही. तिच्या बिनधास्तपणामुळे ती हळूहळू सगळ्यांची मैत्रीण होते. आणि मग त्यांना घराची शिस्त झुगारून देऊन मस्तीत जगायला शिकवायला लागते. घराचे कायदे तोडून आपापला आनंद मिळवायला शिकवते. आणि याच पाश्र्वभूमीवर चित्रपटात हे गाणे आहे. गाण्यात पहिल्या ओळीनंतर आहे कल्पनाविलास: म्हणजे कायदा नसता तर चंद्र खालून उगवून जमिनीवर येऊन बसला असता, किंवा चंद्रावर दुधाचे समुद्र वाहिले असते, वगैरे. पण यातली पहिली ओळ मात्र अत्यंत महत्त्वाची- ‘कायदा तोड के सोचो एक दिन..’ इथे गुलजारजी कुठल्या कायद्यांबद्दल बोलतायत पहा. जेव्हा एखादा माणूस अत्यंत टापटिपीचा असतो तेव्हा त्याला हळूहळू आपल्या व्यवस्थितपणाचा गर्व होऊ  लागतो. तो स्वत:च्या शिस्तीच्या या दुष्टचक्रात इतका अडकतो, की त्याकरता लोकांना वेठीला धरायला लागतो. वस्तू नीटनेटक्या ठेवण्यासाठी माणसांना दुखवायला लागतो. कुणी कधी उठायचं, काय खायचं, कधी जेवायचं, घरात काय कुठे ठेवायचं, याचे तो अत्यंत कठोर नियम बनवायला लागतो. या नियमांचं रूपांतर तो कायद्यात करून टाकतो, आणि स्वत: बनतो न्यायाधीश! कोणी चुकलं त्याचे कायदे पाळायला- तर त्याचा न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश! मग जरा कुणी त्याच्या नियमांच्या विरोधात वागलं रे वागलं, की चालव त्याच्यावर अपशब्दांचा आसूड, भोसक त्याला आपल्या जिभेच्या सुरीने.. असा कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्या भानगडीत आपली अत्यंत जवळची माणसं तर दुखावली जातातच. कारण तुमच्यापेक्षा या घरातल्या वस्तू जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या जागच्या जागी नाही ठेवल्या तर तुमची काही खैर नाही, हा संदेश सतत त्यांना  दिला जातो. शिवाय घरादाराला अशा शिस्तीच्या वेठीला धरणारी व्यक्ती हे विसरते, की शिस्त हा जसा तिच्या जगण्याचा कायदा आहे, तसे घरातल्या दुसऱ्यांच्या जगण्याचा कायदा थोडी कमी शिस्त किंवा बेशिस्त हा असू शकेल. मग तिने तुमच्या कायद्यांप्रमाणे का वागावं? ‘My life, my rules’ या तत्त्वाने जगू द्यावे की प्रत्येकाला आपापले आयुष्य! का एका व्यक्तीने इतरांच्या आयुष्याचा ताबा घ्यायला पाहावं त्यांना धाकात ठेवून? प्रत्येकाने माझा कायदा पाळला‘च’ पाहिजे, हा हट्ट  सोडून द्यावा. आणि हाच विवेकनिष्ठ विचार गुलजारजींच्या या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतो.

आयुष्यात अशी एखादी परिस्थिती उद्भवते, जेव्हा सगळे प्रयत्न खुंटतात. अत्यंत परिश्रमपूर्वक मिळालेल्या आपल्या नोकरीत जम बसतो. चांगला पगार मिळू लागतो. मध्यंतरी लग्न होतं. आपण नवं घर घेतो. कर्जाचा हप्ता सुरू होतो. आपण प्रमोशनच्या प्रतीक्षेत असतो. आणि अचानक आपल्याला नोकरीवरून काढून टाकलं जातं. आपण मोठय़ा परिश्रमपूर्वक जे मार्गक्रमण करायचा प्रयत्न करत होतो, तो रस्ताच बंद होतो. संपलं सगळं.. आता डेड एंड आलाय असं वाटतं. अनेकदा माणूस खचून जातो अशा परिस्थितीत. तो जीवन-मरणाचा प्रश्न बनवून टाकतो या आपत्तीला. पण खरं तर तो तसा जीवन-मरणाचा प्रश्न नसतोच मुळी. तो एक साधा मनोसामाजिक प्रश्न आहे. म्हणजे असं पाहा : असं म्हणतात की माणूस ज्या भावना अनुभवतो, त्या त्याच्या आदिम काळातील पूर्वजांनी अनुभवलेल्या भावनांचेच सुधारित रूप आहेत. आपले पूर्वज म्हणजे आदिमानव शिकार करून पोट भरायचे. दहा ते पाच नोकरी करून अन्न कमावण्याची त्यांना गरज नव्हती. रोज सकाळी शिकारीला बाहेर पडलेला माणूस रात्री घरी कधी परत येईल? की येणारच नाही? याची कुठलीही शाश्वती नसायची. त्याच्यापुढे रोज आव्हान असायचं ते जिवंत घरी परत जाण्याचं. कधी जंगली प्राण्याचा हल्ला.. कधी खराब हवामान.. एक ना अनेक संकटं! रोजच स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान. (biological किंवा existential challenge) खरोखरीच ‘रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’! या जीवशास्त्रीय आव्हानांना तोंड देता देता शरीरात जे बदल व्हायचे त्याचा परिणाम अर्थातच मन आणि भावनांवर होऊ  लागला. या भावना असायच्या- एकतर संकटाशी आक्रमकतेने दोन हात करण्याच्या (आक्रमकता किंवा fight) , संकटापासून लांब पळण्याच्या (पळपुटेपणा किंवा flight), किंवा गलितगात्र होण्याच्या (थिजणे किंवा freeze). आज हजारो वर्षांनंतर आपल्यापुढची आव्हानं जीवशास्त्रीय उरलेलीच नाहीयेत. सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आज जिवंत परत येऊ  की नाही, हा प्रश्न नसतोच मुळी. पण या आव्हानांनी आता मनोसामाजिक (psychosocial) स्वरूप धारण केलं आहे. आज ‘स्ट्रेस’ हा आपल्या आयुष्यातला परवलीचा शब्द बनला आहे. कशामुळे येतो आपल्याला हा तणाव? आता याच उदाहरणात पाहायचं झालं तर नोकरी जाणे हे जीवशास्त्रीय आव्हान आहे का? खरं तर अजिबात नाही. पण आपणच त्याला जीवन-मरणाचा  प्रश्न बनवतो. माझी नोकरी गेलीये, बाप रे!! मग मेलोच मी ठार!!!!’’ .. ही असते आपली प्रतिक्रिया. नाही का? म्हणजे आपण आपल्यापुढच्या साध्या मनोसामाजिक आव्हानाला (psychosocial challenge) जीवन-मरणाचा प्रश्न (biological challenge) बनवतो. त्याचा बागुलबुवा करतो..‘भयंकरीकरण’ करतो त्याचं. आणि मग अशा वेळी काय करायचं, ते आपल्यातले आपल्या पूर्वजांचे जीन्सच सांगतात आपल्याला. आपले पूर्वज जीवन-मरणाच्या प्रश्नाला तोंड देताना ज्या भावना अनुभवायचे त्या आपण आता अशी किरकोळ मनोसामाजिक आव्हानं पेलताना अनुभवू लागतो. मग आपल्याला राग येतो, अस्वस्थ वाटतं, नैराश्य येतं. आणि ही आहेत आपल्या पूर्वजांच्या अनुक्रमे fight, flight आणि freeze या आदिम भावनांची बदललेली रूपं!

पण विवेकनिष्ठ विचारसरणी सांगते की, हा अविवेकी समज आहे. आणि याचा सामना विवेकी समजाने केला पाहिजे. आणि तो विवेकी विचार कुठला? तर ‘परिचय’मधलं गुलजारजींचं अत्यंत गाजलेलं गाणं:

‘मुसाफीर हूं यारो, ना घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है, बस चलते जाना…’

या गाण्याचं हे कडवं पाहा:

‘एक राह रुक गई तो और जुड गयी
मैं मुडा तो साथ साथ राह मुड गयी..’

एक रस्ता बंद झाला तर काय झालं? दहा नव्या दिशा सापडतील! माझ्याबरोबर माझा रस्ताही वळेल. मी माझा स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकेन. कशाला हवी दुसऱ्याची ताबेदारी? हाच तो विवेकनिष्ठ विचार. आणि गुलजारजी आपल्या कवितेतून तो गात गात शिकवून जातात. अशाच प्रकारचा विचार ‘नाम गुम जायेगा’मध्येही गुलजारजी मांडतात. जेव्हा ते म्हणतात-

‘जो गुजर गयी कल की बात थी,
उम्र तो नहीं, एक रात थी,
रात का सिरा अगर फिर मिले कही..’

किंवा :

‘दिन ढले जहाँ रात पास हो
जिंदगी की लौ उंची कर चलो’

..सगळं आयुष्य नाही संपलेलं. उलटून गेली ती फक्त एक काळी रात्र होती. आयुष्याच्या दिव्यातली आशेची ज्योत मोठी करूनच पुढे जायला हवं.’

कधी कधी आपण भूतकाळाच्या जळमटांत स्वत:ला इतके अडकवून घेतो, की ‘आज’मधला आनंद शोधायलाच विसरतो. त्यावेळेला आपला असाच अविवेकी समज असतो की, भूतकाळातले दु:ख इतके मोठे आहे, की आता मी जगू तरी कसा? मी कधीही आनंदी राहूच शकत नाही, इतके हे मोठे दु:ख आहे. तर कधी अमरपट्टा घेऊन आल्यासारखे आपण भविष्याची इतकी चिंता करीत बसतो, की ‘आज.. या क्षणासाठी’ आपल्याकडे वेळच नसतो. पण या अविवेकी समजाची हकालपट्टी ‘आज’ या क्षणात जगून करायला हवी, हे भल्याभल्यांनी सांगून ठेवलं आहे. या क्षणात जगायला शिका, हे आपण ऐकत आलो आहोतच. गुलजारजीही आपल्या गाण्यातून हे सांगितल्याशिवाय राहत नाहीत, जेव्हा ते लिहितात :

‘आनेवाला पल जानेवाला है,
हो सके तो उस में जिंदगी बिता लो
पल जो ये जानेवाला है..’

‘इजाजत’ हा गुलजारजींचा चित्रपट म्हणजे तर मूर्तिमंत कविता आहे. त्यातली गाणीच नव्हे, तर संवाददेखील कवितेसारखे आहेत. महेंदर ( नसिरुद्दीन शाह) आणि माया (अनुराधा पटेल) हे एकमेकांवर अफाट प्रेम करतात. पण मायाला लग्न करण्यात काहीही स्वारस्य नाही. महेंदरला आपल्या आजोबांना दिलेल्या वचनासाठी सुधाशी (रेखा) लग्न करावं लागतं. दोघं मधुचंद्राला जात असताना सुधाला सतत माया आठवत असते. तेव्हा महेंदर तिला म्हणतो, की ‘अगं, माझ्यापेक्षा माया तुझ्याच डोक्यात जास्त राहतेय. भूतकाळाला भूतकाळच राहू दे. त्याला वर्तमानात आणू नकोस. त्याला बांधून ठेवू नकोस. वाहत राहू दे.’

‘नमकीन’मधलं संजीवकुमारवर चित्रित झालेले अप्रतिम गाणे ‘राह पे रहते है, यादों पे बसर करते है, खुश रहो एहले वतन, हम तो सफर करते है..’ या गाण्याचं कडवं हेदेखील विवेकनिष्ठ विचारसरणीचाच अप्रतिम नमुना आहे.

‘जल गये जो धूप में तो साया हो गये
आसमान का कोई कोना, ओडा सो गये’

आपल्याकडे काहीही उरत नाही असं जेव्हा होतं तेव्हा आपण प्रचंड निराश होतो. एका भयंकर अपघातात एखाद्याच्या कुटुंबातले सगळेच्या सगळे मरतात. कुणासाठी जगायचं आता, असा प्रश्न निर्माण होतो. आपलंही आयुष्य संपवून टाकावं असं वाटू लागतं. आणि त्यावेळी डोक्यात धुमाकूळ घालणारा हा एकच अविवेकी समज असतो, की आयुष्यात आता जगण्यासारखं काहीही उरलेलं नाही. संपवून टाकावं हे निर्थक आयुष्य. पण अशावेळी या विचाराचा सामना एका विवेकी, सकारात्मक विचाराने केला पाहिजे. ते नाही जमलं तर आपण नैराश्याच्या गर्तेत खोल खोल बुडून जाणार, हे निश्चित. आणि असा विवेकी विचार आपण केला पाहिजे, ते हे गाणं आपल्याला शिकवतं. आपण लागलेल्या वणव्यात जळून गेलो तरी काय झालं? आपण तरीही उन्हात थकल्या-भागलेल्या जीवांना सावली देऊ शकतो. आपल्या जिवाभावाची माणसं हरवली तरी काय झालं? आपण कुणा निराधाराचा सहारा बनू शकतो. आणि त्यासाठी तरी मला उभं राहायला हवं, हा तो विचार. अनेक सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला याच विवेकी विचाराचा आधार घेऊन उभे राहिलेले दिसतील. स्वत: उन्मळून न पडता दुसऱ्याला रुजायला मदत करताना दिसतील.

आपण सगळेच अनेकदा सिस्टिम्सला, सरकारला शिव्या घालत असतो. मुंबई पावसाळ्यात पाण्याने तुंबली की घाल शिव्या. रस्त्यावरच्या खड्डय़ांना घाल शिव्या. परिसरातील घाणीला घाल शिव्या. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याला शिव्या घालायला फार तत्पर असतो. खरं तर या प्रश्नांवरील उपाय आपल्याला माहीत असतात. पण आपण ते उपाय करण्याची सुरुवात आपल्यापासून कधीही करत नाही. ते दुसऱ्यांनी, शेजाऱ्यांनी, नगरपालिकेने, सरकारने करावे असंच आपण कायम म्हणत राहतो. ही परिस्थिती कधीही बदलू शकत नाही असा समज करून घेऊन सतत निराशावादी बोलत राहतो. पण मला करता येईल ती छोटीशी का होईना गोष्ट मी करेन, असा विचार आपण करत नाही. कारण हेच- या देशात काहीही बदलू शकत नाही, हा अविवेकी विचार. पण माणूस कितीही छोटा असला तरी तो बदल घडवू शकतो. त्याने फक्त सुरुवात करायची गरज असते, हजारो हात नंतर मदतीला धावून येतात, अशा अर्थाची एक अप्रतिम जाहिरात आहे.. ‘लीड इंडिया कॅम्पेन’ची. धो-धो पडणाऱ्या पावसात रस्त्यात आडवे पडलेले झाड आणि त्यामुळे तुंबलेली रहदारी. गर्दीतले सगळे- अगदी पोलीस, राजकीय नेतेसुद्धा काहीही न करता हातावर हात ठेवून चरफडत बसलेत. या रहदारीत अडकलेल्या स्कूल बसमधल्या एका चिमुकल्याला मात्र असं बसून राहणं मंजूर नाही. आणि प्रौढांमध्ये आलेला निर्ढावलेपणादेखील त्याच्यात आलेला नाही. हा छोटा मुलगा पावसात बसमधून खाली उतरून आपल्या चिमुकल्या हाताने ते अवाढव्य झाड लोटू लागतो. त्याचं कौतुक वाटून गर्दीतले अनेक हात त्याच्या मदतीला येतात. आणि महानगरपालिकेच्या मदतीची वाट न पाहता काही वेळात रस्ता मोकळा होतो. या जाहिरातीत गुलजारजींनी लिहिलेले शब्द पाहा:

‘फलक पकड के उठो और हवा पकड के चलो
तुम चलो तो हिंदुस्तां चले
लगाओ हाथ के सूरज सुबह निकला करे
हथेलीयो में भरे धूप और उजाला करे
उफक पे पाव रखो और चलो अकड के चलो
फलक पकड के उठो और हवा पकड के चलो
तुम चलो तो हिंदुस्तां चले चलो…’

..आकाशाला गवसणी घालून उठ…
आणि वाऱ्याला जखडून ठेवून चाल
तू चाललास तरच  हिंदुस्थान चालेल
सूर्य रोज सकाळी उगवावा म्हणून जरा हातभार लाव
तरच तळव्यात उन्हाचा शिडकावा होऊन
प्रकाश पडेल
क्षितिजावर पाय ठेव आणि गर्वाने चाल
तू चाललास तरच हिंदुस्छान चालेल..

खरं तर यातली बहुतेक सर्व गाणी चित्रपटगीते आहेत. म्हणजेच त्यांच्या तोंडी जो विवेकनिष्ठ विचार ऐकायला मिळतोय ते गुलजारजींचे नव्हे, तर त्या पात्रांचे तत्त्वज्ञान आहे असे म्हणता येईल. असे ना का! पण तरीही गुलजारांची अशी गाणी ही नुसती गाणी उरत नाहीत, ती ऐकून सोडून दिली असं होत नाही. ती एक तत्त्वज्ञान सांगून जातात आपल्याला. जगणं सुसह्य़ करण्याचा रस्ता दाखवतात. हा शुभ्र केसांचा , खर्जातल्या आवाजाचा माणूस मग नुसता गीतकार उरत नाही. तो तुमचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनतो. जगायला दिशा देतो. वादळलेल्या रात्रीत सापडलेल्या तुमच्या भरकटलेल्या नावेला दीपस्तंभासारखा दिशा दाखवणारा देवदूत होऊन जातो. गुलजारजींची एक प्रसिद्ध कविता आह- ‘यार जुलाहे’ नावाची. कुणी विणकर वस्त्र विणताना एखादा धागा तुटला तर त्याला पटकन् दुसरा धागा जोडून, गाठ मारून पुढे विणायला सुरुवात करतो. आणि तो हे इतके सफाईने करतो, की तयार झालेल्या कपडय़ावर आपल्याला ही गाठ कुठे दिसतसुद्धा नाही. पण एखादं नातं विणताना अशी गाठ  पडली तर सगळे मतभेद विसरून नव्याने सुरुवात करण आणि मनाला पडलेली अढी दिसू न देता पुढे जाणं अवघड जातं माणसाला. म्हणून गुलजारजी या विणकराला (विणकर = जुलाहा) म्हणतात, ‘विणकरा, हे कसं करायचं ती युक्ती मला शिकव.’

‘मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोडम् के उस में
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिरह बुनतर की
देख नहीं सकता है कोई
मैनें तो इक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिरहें
साफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे’

गुलजारजींची ही विवेकी विचार करायला शिकवणारी गाणी आपल्यालाही तणावमुक्त जगण्याची तरकीब शिकवतात. तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीत ही गाणी ऐकली तर आपल्याला कुणालाही ‘कसं जगायचं, त्याची तरकीब सिखा दे’ म्हणायची वेळ येणार नाही. जगायला एक ‘वजह’ देतील ही गाणी. आणि ‘बेवजह जिंदगी जा रही है’ असं वाटणार नाही मग आपल्याला.
मृदुला बेळे

First Published on March 26, 2018 4:29 pm

Web Title: gulzar 10
Just Now!
X