लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण या देशाच्या पंतप्रधान व्हावं/ होऊ अशी तुमची खरंच महत्त्वाकांक्षा होती का? की ‘नियतीशी करार’ या तुमच्या वडिलांच्या आवडत्या शब्दांमुळे तुम्ही ती जबाबदारी स्वीकारलीत आणि नंतर आपल्याला नियतीनेच निवडलं होतं, या दृढ विश्वासामध्ये मग्न झालात? पं. नेहरूंकडे लोकशाही समाजव्यवस्था राबविण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा आणि गुण होते; ज्यांचा तुमच्यात पूर्णपणे अभाव होता. परंतु वडिलांचे हे गुण स्वत:च्या अंगीही उशिरा का होईना, बाणवावेत आणि आपल्या वडिलांचा खरा- सुसंस्कृत लोकशाही राजकारण साधण्याची शिकस्त करण्याचा- वारसा चालवावा, असं तुम्हाला कधी वाटलंच नाही; उत्तरोत्तर धसमुसळेपणा वाढतच गेला..

माननीय इंदिराजी,

तुम्हाला पत्र लिहिण्याचं ठरवलं आणि मायन्यापाशीच अडखळलो. तुम्हाला अनेक पत्रं आली असतील आणि त्यातली धमकीवजा पत्रं सोडता ‘प्रिय’, ‘आदरणीय’, ‘पूजनीय’, ‘एकमेवाद्वितीय’ वगैरे मायन्यांची तुम्हाला सवय झाली असेल. मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल तशा कोणत्याही भावना नाहीत. आतासुद्धा ‘माननीय’ म्हणतो आहे ते भारतीय जनतेला तुमच्याबद्दल ज्या भावना होत्या त्यांचा आदर म्हणून!

पण हेही सांगितलं पाहिजे, की मी तुमच्या ‘झिंदाबाद’च्या उन्मादात सामील नव्हतो, तसाच ‘मुर्दाबाद’च्या उन्मादामध्येही कधी सहभागी झालो नव्हतो. अशा व्यक्तिनिष्ठ घोषणा लोकशाहीच्या नरडीला नख लावतात, हे एक कारण; आणि मला कुठलीच व्यक्ती तिच्यासाठी इतरांनी प्राण पणाला लावावेत इतकी महान असते असं कधीच वाटत नाही, हे दुसरं! त्यातच देवकात बरुआ या तुमच्या मिंध्या चमच्याने ‘इंदिरा इज इंडिया.. इंडिया इज इंदिरा’ अशी निर्लज्ज चापलुसी जाहीरपणे केली; तुमच्या पक्षाचं ‘इंडिकेट’ काँग्रेस (मोरारजींच्या ‘सिंडिकेट’च्या विरुद्ध!) नाव मागे पडून सरळ ‘इंदिरा’ काँग्रेस झालं, तिथेच भारतीय लोकशाहीच्या अध:पाताचा एक टप्पा निश्चित झाला होता. आणि ते तुम्ही थांबवू शकला असता, पण थांबवलं नाही, हे मी कधीच विसरलो नाही. तुम्ही असतानाही आणि नसतानाही. पण त्याची चर्चा थोडय़ा वेळाने करू.

मी सातवीत म्युनिसिपल मराठी शाळेत शिकत होतो. आसपास कानडी-तामिळ-केरळी मंडळींचा गराडा होता. संघ शाखेत जायला लागलो होतो. तरी हे सगळे शेजारी आणि माझे आई-वडीलदेखील ‘नेहरूंशिवाय देशाला पर्याय नाही,’ याच मताचे होते. त्यातच नेहरूंना लहान मुलं फार आवडतात आणि ते जपानला गेले तेव्हा जपानी मुलांना त्यांनी एक हत्तीचं पिलू भेट म्हणून नेलं होतं, वगैरे प्रचार जोरात होता. (तुमच्यावर प्रेम करायला वेळच मिळाला नाही म्हणून बहुधा नेहरूंनी त्यांचे दोन नातू आणि इतर बालकांवर जीव जडवला होता?) तोपर्यंत कृष्णा हाथीसिंग आणि विजयालक्ष्मी पंडित या तुमच्या दोन आत्यांची नावे नेहरूंच्या नातेवाईकांत घेतली जायची. खरं तर तुम्ही एकदा काँग्रेस अध्यक्षही झाला होता. पण ते कळण्याचं माझं वय नव्हतं. एक दिवस पेपरात पहिल्या पानावर बातमी होती : ‘फिरोज गांधी यांचे निधन’! बातमीबरोबर फिरोज गांधींचा फोटो अर्थातच होता आणि नेहरू, तुम्ही व राजीव-संजय यांचा एकत्र फोटोही होता. त्या शोकमग्न अवस्थेतही तुमची कृश शरीरयष्टी, धारदार नाक आणि मोठे डोळे सहज लक्षात येत होते. माझ्या आसपासच्या सगळ्या मंडळींना मात्र ‘या उतारवयात नेहरूंना हे दु:ख सोसेल का?’ याची जास्त काळजी होती. तुम्ही ४३ व्या वर्षी एकटय़ा पडलात याची खंत कुणालाच नव्हती! त्यांचं खरंही असेल; कारण नंतर चार र्वष उलटायच्या आतच नेहरूही गेले आणि तुम्ही खरोखर एकटय़ा पडलात!

की तुम्ही आयुष्यभर एकटय़ाच होता? मनूने हमी दिलेली पिता, पती, पुत्र ही तिन्ही नाती तुमचं एकटेपण दूर करायला असमर्थ होती? कारण कमला नेहरू गेल्या तेव्हा तुमची विशी उलटायची होती. आणि त्या एकाकी दिवसांत तुम्ही फिरोज गांधींची निवड केलीत. ते गेले तेव्हा तुम्ही चाळीशी नुकतीच ओलांडली होती!

नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात तुम्ही माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून आलात. त्याही वेळी ‘नेहरूंच्या घरातलं कुणीतरी केंद्रीय मंत्रिमंडळात असायलाच हवं’ हीच भावना जास्त प्रबळ होती. जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाही देशाचं माहिती आणि नभोवाणी खातं- ‘इन्फर्मेशन, मिस-इन्फर्मेशन, डिस-इन्फर्मेशन’ या तंत्रांची ताकद राज्यकर्त्यांना कळू लागलेली असताना- एका महिलेकडे आहे याचं कौतुकही होतं. मात्र, तुम्ही उद्याच्या पंतप्रधान आहात असं वातावरण नव्हतं. त्यातच तुमचं सगळं आयुष्य- मुख्यत: जडणघडणीची र्वष तुम्ही एकटय़ाच होता. त्यामुळे खऱ्या-खोटय़ा ‘ष्टोऱ्या’ही तुमच्याबद्दल नव्हत्या. अधूनमधून ‘लेटर्स ऑफ अ फादर टू हिज डॉटर’मधला एखादा उतारा पाठय़पुस्तकात भेटायचा; पण त्यातही ‘फादर’च जास्त!

लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले त्या वेळेलाच काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षांची सुरुवात झाली होती. मायकेल ब्रेशरच्या ‘सक्सेशन इन इंडिया’ या पुस्तकात त्याचा एक किस्सा आला आहे. नेहरू गेले, आता पुढचं कसं उरकायचं, हा प्रश्न दिल्लीमधल्या सगळ्या काँग्रेसजनांना पडला होताच. कुणीतरी तसं बोलून दाखवल्यावर मोरारजीभाई म्हणाले, ‘सगळ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत.’ ताबडतोब तारकेश्वरी सिन्हा त्यांना म्हणाल्या होत्या, ‘ऑर्डर्स देणारे तुम्ही कोण?’ ठिणगी पडलेलीच होती. मोरारजींनी आपली महत्त्वाकांक्षा कधीच लपवली नव्हती. मात्र, लालबहादूर शास्त्रींसारखा नेहरूंची ‘सावली’ म्हणावी (पण ‘छाया’ न पडलेला?) असा खंदा उमेदवार समोर होता म्हणून तेव्हा मोरारजी मागे पडले; पण हटले नव्हते. शास्त्रींनीही सर्व जग चकित व्हावं इतक्या वेगाने कारभाराची पकड घेतली. ‘जय जवान, जय किसान’ नुसती घोषणा न उरता तो एक पराक्रम झाला. ‘धोतीवाले भी लड सकते है’ असं म्हणून एकाच वेळी ‘आत्मविश्वास’ आणि ‘आत्मटीके’चा अनुभव त्यांनी भारतीय जनतेला दिला. अचानक ते गेले आणि उघडावाघडा सत्तासंघर्ष काँग्रेसमध्ये सुरू झाला. काही मोजके ‘पित्ते’ सोडले तर मोरारजीभाई कुणालाच नको होते. त्यांना मागे हटवायचं तर तुमचंच नाव शिल्लक होतं. कारण आमचे महाराष्ट्राचे ‘नेहरू’- हिमालयाच्या हाकेला धावून जाणारे ‘सह्य़ाद्री’ (इतकी पोरकट उपमा!)’ नेहरूंच्या कन्या म्हणून पंतप्रधानपदावर तुमचाच पहिला हक्क आहे..’ अशी स्वाभिमानशून्य, पण ‘डिप्लोमॅटिक’ भूमिका घेऊन मोकळे झालेच होते. लोकशाहीला पहिला सुरुंग तिथेच लागला होता..

मात्र, तेवढंच नव्हतं. काँग्रेस संसदीय पक्षांतर्गत जरी नेतेपदाची लढाई होणार असली तरी तुम्ही काय किंवा मोरारजी देसाई काय, सैनिक कुणाकडेच नव्हते. सगळे ‘विकाऊ’ लोकप्रतिनिधी होते. माझे सीनिअर मित्र- ‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगांवकर त्यावेळी मुद्दाम ‘सत्तासंघर्षांचा आँखो देखा हाल’ (पत्रकारितेमधला एक बावळट भ्रम?) बघायला दिल्लीत जाऊन बसले होते. परत आल्यावर त्यांनी दोन्हीकडचे ‘ऑफर्स’चे जे आकडे सांगितले, त्यावरून कोटय़वधी (कदाचित अब्जावधी) रुपयांची देवाणघेवाण त्या पक्षांतर्गत (!) संघर्षांत झाली होती. व्यापाऱ्यांनी (आपडा) मोरारजीभायना निवडून आणण्याची शिकस्त केली. पण उद्योगपतींच्या पुढे- मुख्यत: टाटा समूह (पारशी- फिरोज गांधी कनेक्शन की आधुनिक कन्व्हिक्शन?)- त्यांचं काही चाललं नाही! तुम्ही निवडून आलात, पंतप्रधान झालात. (इतिहासाची वक्रोक्ती अशी, की त्याचवेळी गोल्डा मायर ही वृद्धाही भारतातल्या महानगरांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या इस्रायलची पंतप्रधान होती!) ‘इंदिरा नेहरू-गांधी’ ही नावातली संगतीही भारतीय आणि जागतिक दोन्ही पातळ्यांवर मान्य झाली. भारतीय लोकशाहीचा दुसरा अध्याय सुरू झाला तोच ‘वारसा हक्कआणि त्याला भांडवलदारांचा पाठिंबा’ ही मध्ययुगीन आणि क्रूर संकल्पना प्रमाण मानून! आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.

सत्ता मिळवणं आणि टिकवणं हे राजकारणाचं सूत्र फारच बटबटीतपणे मिरवू लागलं. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा मोठी ठरू लागली. लोकशाहीची चिंता कुणालाच उरली नाही. काँग्रेसमधली फूट उघड झाली होती, तरीही १९६७ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ता टिकली होती. मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांची संख्या बरीच वाढली होती. पण ते एकत्र येणं शक्य नव्हतं. तुम्ही आणि मोरारजी देसाईंनी एकमेकाला कधीच क्षमा तर केली नाहीच, पण तुम्हा दोघांमध्ये सूडभावनेचं राजकारण सुरू झालं. जो विकार नेहरूंच्या राजकीय कारकीर्दीमध्ये कधीच नव्हता. आधी समाजवादी फुटले. मग काँग्रेस फुटली. कम्युनिस्टांचे दोन पक्ष झाले. अगदी द्रमुकसारखा प्रादेशिक पक्षही फुटून काँग्रेस आयसारखा ‘अण्णा द्रमुक’ नावाचा व्यक्तिनिष्ठ पर्याय उभा राहिला. स्वतंत्र पक्ष लवकरच अस्तंगत होणारच होता म्हणून फुटला नाही. जनसंघ फुटला नाही तरी बलराज मधोक- अल्पसंख्याकांच्या ‘भारतीयीकरणा’चा धाडसी सिद्धान्त मांडून- बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झालीच होती. उत्तर प्रदेशातल्या जाट पट्टय़ामध्ये भारतीय लोकदल हा नवा पर्यायही जुन्या काँग्रेसवाल्यांनीच उभा केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या लोकसभेचे एक-चतुर्थाश खासदार पाठवणाऱ्या राज्यामध्ये अस्थिरतेला ऊत आला. योग्य ती किंमत पैशात आणि नंतर सत्तेमधला वाटा वसूल करण्यात मिळाली की पक्ष सोडणं.. काल ज्यांच्याशी वैर होतं त्यांच्यात ‘हा ‘दलबदल’ नाही, ‘दिलबदल’ आहे,’ असं बेशरम कारण देऊन सामील होणं, ही नित्याची बाब झाली. नेहमीप्रमाणे जमिनीवरचे वास्तव माहीत नसलेले आमचे तथाकथित बुद्धिजीवी (निदान राजकारणापुरते सुशिक्षित अडाणी!) देशाची शकले होण्याचे इशारे देऊ लागले. (या मंडळींना भारत एक का आणि कसा राहिला/ राहतो/ राहील, हे अजूनही उमगत नाही. आजही तसेच इशारे दिले जात आहेत.) आणि यात परकीय शक्तींचा हात आहे की आपल्याच सत्ताधाऱ्यांनी जे पेरलं ते उगवलं आहे, याची न संपणारी चर्चा सुरू झाली. मुख्य म्हणजे देशाला ‘खंबीर नेतृत्वच स्थिर शासन देऊ शकेल’ असा भ्रम पसरला/ की पसरवला गेला? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तीन धाडसी निर्णय घेऊन एकदम सर्व नेत्यांच्या काही योजने पुढे निघून गेलात.

संस्थानिकांचे तनखे रद्द करणं, १४ मोठय़ा बँकांचं ‘राष्ट्रीयीकरण’ करणं हे तुमचे धाडसी निर्णय होते. एकाएकी आता मध्ययुगीन सरंजामशाही संपवून देश समाजवादाच्या दिशेने ठोस वाटचाल करू लागल्याचा ‘साक्षात्कार’ झाल्यामुळे काँग्रेस फुटली तरी समाजवादी आणि कम्युनिस्टांनी तुमच्यासाठी आपले मतभेद बाजूला ठेवले (यांनी हे स्वत:च्या पक्षांसाठी आजतागायत केलेलं नाही. एक आणीबाणीचा अपवाद वगळता!) आणि बाहेरून पाठिंब्याच्या ‘लाइफ लाइन’वर तुमचं सरकार तगवलं. तुम्ही प्रथम काँग्रेसमधल्या तुम्हाला नको असणाऱ्या म्हाताऱ्यांची आणि नंतर सगळ्याच विरोधी पक्षांची कबर खणत होता. ही दुहेरी कोलांटउडी कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यांचे डोळे उघडले ते चार-पाच वर्षांनी.. आणीबाणी लागू झाल्यावर! इकडे संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यामुळे ते सरळ राजकारणात आले. केंद्रात-राज्यात मंत्री- मुख्यमंत्री झाले. त्यातला एक तर तुम्ही गेल्यावर वर्षभरासाठी पंतप्रधानही झाला!

तिसरा धाडसी निर्णय घेण्याची संधी नियतीने तुम्हाला दिली. बांगलादेशमधल्या राजकीय उलथापालथीमध्ये भारताचा काही हात नव्हता. पश्चिम पाकिस्तानातल्या उद्दाम लष्करशहांच्या खूनशी राजकारणाची ती अपरिहार्य परिणती होती. आणि निर्वासितांचा भार मात्र भारतावर पडत होता. ही संधी साधून तुम्ही बांगलादेशला मान्यता देण्याचा ठराव संसदेत आणलात. त्यांच्या मुक्तीसाठी १६ दिवसांचं युद्धही झालं. प्रथमच मोठय़ा प्रमाणावर पाकिस्तानी सैनिक कैद झाले. नेहरू गेल्यानंतर एकदाचा भारताचा आवाज जगभर निनादला. रशियाशी मैत्रीचा करार झाल्यामुळे दक्षिण आशियामधला सत्तासमतोल नव्याने मांडावा लागला आणि जागतिक पातळीवरही तुमच्या खंबीर नेतृत्वाची दखल राजकीय निरीक्षक घेऊ लागले.

पाकिस्तानचे तुकडे झाले म्हणून हिंदुत्ववादी बेभान झाले होते आणि ‘मुक्ती बाहिनी’ला ‘पीपल्स आर्मी’ समजून समाजवादी व कम्युनिस्ट तुमच्यामध्ये क्रांतिकारी बदलाच्या शक्यता पाहत होते. काँग्रेस (आय)चा नवा चेहरा- खंबीर, धाडसी, आधुनिक, दास्यविमोचक- जनतेच्या मनात आकार घेत असतानाच तुम्ही याही वेळी- मुदत संपायच्या आधी पुन्हा दुहेरी कोलांटउडी मारलीत. लोकसभा विसर्जित करून निवडणुका जाहीर केल्यात. ज्यात सर्व विरोधी पक्षांचं अक्षरश: पानिपत झालं! जवळपास दोन-तृतियांश बहुमत तुमच्या पक्षाला मिळालं. एकटे अटलबिहारी वाजपेयी ‘बांगलादेशचा विजय हा कोणा एका व्यक्तीचा, पक्षाचा नाही; तो भारतीय जनतेचा आणि सैन्याचा पराक्रम आहे,’ असं सांगत देशभर फिरत होते. बाकीच्यांनी ‘याह्य़ासुरमर्दिनी इंदिराभवानी’ या तुमच्या प्रतिमेपुढे हार पत्करली! ‘काँग्रेस (आय) ही यौवनाने मुसमुसलेली तरुणी आहे; तिच्यापुढे विरोधी पक्ष ही शाळकरी पोरं आहेत,’ असे चावट पण हताश उद्गार एसेम जोशींनी काढले होते. १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही तुमचा पक्ष दिग्विजयी होणार हे स्पष्ट होतं. तसा तो झालाही. मात्र, त्यावेळी लोकसभा-विधानसभा निवडणुकांची जी फारकत झाली, त्यामुळे देश एका वेगळ्याच अंदाधुंदीत अडकला तो आजतागायत. तेव्हापासून देशात सततच कुठल्या तरी राज्यात विधानसभा निवडणूक असतेच असते.

इंदिराजी, तुमच्या राजकीय कारकीर्दीचा वैभवशाली टप्पा १९७२ मध्ये संपतो. नंतर एकच अभिमानास्पद क्षण आला तो भारतीय वैज्ञानिकांनी राजस्थानच्या वाळवंटात यशस्वी अणुविस्फोट करून दाखवला तेव्हा! ‘अ क्लीन जॉब’ असं तुम्ही त्यासंदर्भात म्हणाला होता. जग स्तिमित झालं होतं! आर. के. लक्ष्मण यांनी ‘न्यूक्लिअर क्लब’मध्ये तुम्ही ठिगळ लावलेली साडी आणि खांद्यावर कबूतर घेऊन घुसला आहात आणि तिथले बाकीचे मेंबर ‘आता या क्लबात कुणीही घुसायला लागलं’ असं म्हणताहेत असं व्यंगचित्रही काढलं होतं. मात्र, वैज्ञानिक घटनांचं श्रेय राजकीय नेतृत्वाला दिलंच पाहिजे असं नाही. अर्थव्यवस्था आणि विज्ञान यांची स्वत:ची दिशा आणि वेगही असतो. तसं नसतं तर ‘एनडीए’च्या पाच विस्फोटांनंतर महिनाभरातच पाकिस्तानने तेवढेच विस्फोट करून दाखवलेच नसते.

त्यानंतरही तुम्ही दहा वर्षे देशाच्या राजकारणातली सर्वात प्रभावी व्यक्ती होताच. जनता पक्षाच्या अडीच-पावणेतीन वर्षांच्या (नसत्या?) कारभारातही माध्यमे आणि जनता तुमच्यामागे होतीच. पण या काळात एकही धड निर्णय तुम्हाला घेता आला नाही आणि तुम्ही उचललेलं एकही पाऊल निर्भेळ यशापर्यंत पोचलं नाही. कर्तुम-अकर्तुम सत्ता मिळाली; पण व्यक्तिनिष्ठेचा दुर्धर रोगही भारतीय लोकतंत्राला जडला. पाठोपाठ घराणेशाहीही आली. केंद्रात आणि राज्यातही! दिल्लीत नेहरू-गांधी घराणं सांभाळलं की राज्यात आपलं घराणं प्रस्थापित करण्याचा परवानाच तुमच्या राज्या-राज्यांतल्या शिलेदारांना मिळाला. संसदेमध्ये अ‍ॅबनॉर्मल बहुमत मिळालं की राज्यकर्त्यां पक्षामधूनच विरोधी पक्षाचा उदय होत असतो, या नियमाला धरून तुमच्या पक्षातच तरुण तुर्काचा गट सक्रिय झाला. प्रशासनावर पकड बसली म्हणावं तर भ्रष्टाचाराचा कहर झाला. लायसन्स- परमिट राज पक्कं झालं. केंद्रात स्थिर सरकार असलं की राज्यांची घडीही व्यवस्थित बसते, हा समज खोटा पडला. पंजाबात खलिस्तानी आणि आसाममध्ये आसामी अस्मितांचे नारे घुमू लागले. ही दोन्ही राज्ये सीमावर्ती असल्यामुळे या घडामोडींकडे दुर्लक्ष करणं शक्यही नव्हतं आणि योग्यही नव्हतं! त्यातच देशाच्या निरनिराळ्या भागांत आलटूनपालटून येणाऱ्या दुष्काळ आणि महापूर या अस्मानी आपत्तींचा धुमाकूळ चालूच होता. अर्थव्यवस्थेला गती येत नव्हती. विकासदर मंदावत होता. बेरोजगारी वाढत होती. तुमच्या घराण्याभोवती काही निवडक उद्योगपतींच्या घराण्यांची प्रभावळ वाढत चालली होती. चंद्रास्वामीसारखे ज्योतिषी नेत्यांच्या कुंडल्या मांडून देशाचं भविष्य ठरवण्यात महत्त्वाचे ठरत होते. पुन्हा काही खंबीर निर्णय तातडीने घ्यायला हवे होते. तुमच्याशिवाय हे कोणालाही जमणार नाही, ही भारतीय जनतेची श्रद्धा होती. ‘गरिबी हटाव’ची अपेक्षा विफल झाली आणि गरीबच हटले होते, तरी तेही तुमच्यावरच भरवसा ठेवून होते.

जयप्रकाश नारायण यांनी तुमची खरी पंचाईत करून ठेवली. ‘भ्रष्टाचार ही जागतिक वस्तुस्थिती आहे’ या तुमच्या भूमिकेचा फोलपणा त्यांनी वेशीवर टांगला. त्यांनी सुरुवातही देशातल्या सर्वाधिक भ्रष्ट (ही एक आपल्या देशातली लाजिरवाणी स्पर्धा!) मानल्या गेलेल्या बिहार या राज्यापासून केली. जनतेला स्वच्छ प्रशासन हवं आहे (हे अर्धसत्य होतं!), मात्र भ्रष्टाचार हा सत्तेच्या वरच्या थरातूनच सुरू होऊन मग खाली झिरपतो, हे त्यांनी ठणकावलं. त्यांचा स्वानुभवच तसा होता. गांधी जन्मशताब्दी वर्षांत (१९६९ साली) त्यांना एक कोटी रुपयांचा स्मारक निधी उभारायचा होता. मात्र तो निधी चेकने जमा करून पावती स्वीकारणारे देणगीदार त्यांना मिळाले नव्हते. कॅशने वाटेल तेवढय़ा निनावी रकमा देऊ इच्छिणारे हवे तेवढे होते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजकारणाला काही नैतिक बंधने असली पाहिजेत, ही त्यांची भूमिका स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या माझ्या पिढीने (निदान आमच्यापैकी काही जणांनी!) स्वीकारली आणि तुमच्या धडाक्यापुढे हतबल झालेले विरोधी पक्ष मुरब्बी धोरणीपणाने त्यांच्याभोवती गोळा झाले.

नंतरचा घटनाक्रम उगाळण्यात मला स्वारस्य नाही. संपूर्ण क्रांती (कुणालाच नीट न कळलेली)ची घोषणा, अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला निकाल, देशभरचा जनक्षोभ, देशांतर्गत आणीबाणीची दीड-पावणेदोन र्वष, हजारो स्थानबद्ध आणि सत्याग्रही, अजूनही ‘जनता माझ्याच मागे आहे’ या भ्रमातून तुम्ही घेतलेली निवडणूक, उत्तर भारतामधलं (तुमच्यासकट तुमच्या पक्षाचं पानिपत, जनता पक्षाचं ‘खिचडी’ (तुमचाच योग्य शब्द!) सरकार, तुमच्या एक दिवसाच्या अटकेचा सूडबुद्धीमधून झालेला फार्स, बेलछी हत्याकांडापासून तुमच्या पुनरागमनाची लागलेली चाहूल, चिकमंगळूूरमधून झालेलं तुमचं प्रत्यक्ष पुनरागमन, जनता पक्षाचा पाडाव, चरणसिंग आणि चव्हाण यांचं लाजिरवाणं गर्वहरण, तुम्ही पुन्हा दिमाखात पंतप्रधान होणं, संजय गांधींचा मृत्यू आणि राजीवचा राजकारणात प्रवेश, भिंद्रनवाले प्रकरण (जे तुम्हीच सत्तेच्या खेळात प्रमाणाबाहेर वाढू दिलं होतं.) हाताबाहेर जाणं, ऑपरेशन ब्लू-स्टार आणि तुमची अंगरक्षकांकडून झालेली हत्या, शीखविरोधी हिंसाचाराची लाट, राजीव गांधींना देशाने तुमच्या बलिदानाची आठवण ठेवून दिलेलं अ‍ॅबनॉर्मल बहुमत, तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी स्वत:भोवती गोळा केलेला दरबार (जनाना?), श्रीलंकेत ढवळाढवळ करण्याचं मूर्ख साहस व त्यातून झालेली त्यांची हत्या.. इथपर्यंत जे काही घडलं तो काळा कोळसा उगाळण्यात हशील नाहीच!

‘चिरडिली, भरडिली रागे;

रडविली बडविली बळें

लाटिली कुटिली देवे; दापिली कापिली बहु!’

असं आमच्या संत रामदासांनी ईश्वरी कोपाचं वर्णन केलं आहे. १९७५ ते १९८४ या काळातलं तुमचं राजकारण तसंच होतं. मात्र ही ‘देवा’ची लीला नव्हती; तुमची दिशाहीनता होती!

इंदिराजी, हे सगळं असंच घडायला हवं होतं? देशातले सर्व राजकारणी- तुमच्या स्वत:च्या पक्षातलेसुद्धा- तुमचे निष्ठावंत खुशमस्करे नसले तर तुमचे शत्रूच होते? सुरुवात मोरारजीभाईंपासून झाली. त्यांना काही काळ पंतप्रधान होऊ दिलं असतं तर ते त्यांच्या चक्रम, आचरट सवयींमुळे, अहंकारामुळे स्वत:चं राजकीय मरण ओढवून घेणारच होते आणि पक्ष फोडण्याचा ठपका न घेताच पंतप्रधानपद तुमच्याकडे येणारच होतं, हे तुम्हाला कधीच जाणवलं नाही? तसं झालं नसतं तर ते जनता पक्षाच्या बोकांडी बसले नसते आणि इतक्या लोकशाहीविरोधी माणसाला भारतात लोकशाहीची पुन:स्थापना केल्याचं श्रेय मिळून त्यांचं उदात्तीकरणही झालं नसतं. मात्र मोरारजीभाईंनी स्वत:च आपली अपात्रता सिद्ध केली! त्यांचं सोडा, ते तुमचे उद्दाम प्रतिस्पर्धी होतेच. पण जयप्रकाश नारायण यांच्याशी इतकं खुनशीपणे वागण्याची गरज होती? त्या जराजर्जर, व्याधिग्रस्त माणसाने स्वत:च्या अकारण घेतलेल्या राजकारणसंन्यासाची भरपाई करण्यासाठी नैतिक पायावर राजकारणाचं आवाहन केलं होतं, जनता त्यांच्याभोवती गोळा होत होती. तुम्ही त्यांना एकदाही भेटला तर नाहीतच; भेटलात ते विनोबा भाव्यांना- जे थेट सूक्ष्मात की आणि कुठल्यातरी पोरकट तंद्रीमध्ये मश्गूल होते! जयप्रकाश नारायणांशी तुम्ही चर्चेच्या एक-दोन फेऱ्या जरी केल्या असत्या तरी पुढचं सगळं महाभारत टळणार होतं. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा मार्ग मोकळा होता. तसं केलं असतंत तर काही अराजक माजणार नव्हतं. तुमच्या मर्जीतल्या कोणालाही काही काळ पंतप्रधान करून तुम्ही लोकशाही दृढमूल केल्याचं श्रेय घेऊ शकला असता. कारण त्या निर्णयानंतर देशातली एकूण अंदाधुंदी ध्यानात घेऊन, जनक्षोभाची जाण ठेवून कदाचित सुप्रीम कोर्टानं तुमची सुटकाही केली असती. मात्र तुम्ही ‘अंतर्गत आणीबाणी’ या अपवादात्मक तरतुदीचा आधार घेतलात, त्यासाठी जयप्रकाशांच्या शब्दांचा विपर्यास केलात (‘पोलीस आणि सैन्याने स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीने वागावं..’ जसे काही ते तसे वागणारच होते!) आणि सगळा देश एका संशयग्रस्त आणि भयग्रस्त हलाखीत ढकललात. पोलीस त्यांच्या विवेकशून्य पद्धतीने वागायला, तुमचे चमचे स्वत:चे व्यक्तिगत सूड घ्यायला मोकळे झाले. त्यांच्या पापांची शिक्षा मात्र तुम्हाला झाली!

तुमच्याभोवतीच्या सल्लागारांत स्पष्ट बोलणारं कुणीच टिकणार नाही अशी सत्ता संजय, धवन, विद्याचरण शुक्ला वगैरे मंडळींच्या हातात द्यायची गरज होती? तुमची लोकप्रियता त्यांनी भाडोत्री मंडळींची गर्दी रोज तुमच्या बंगल्यासमोर गोळा करून सिद्ध करावी इतकी तकलादू होती? शीख समाजामधल्या आधुनिक, लिबरल मंडळींना आवाहन करण्याऐवजी अकाली दलाचा पायाच उखडून टाकण्यासाठी भिंद्रनवालेचा भस्मासुर वाढू देण्यातून तुम्ही एका नव्या शोकांतिकेचा पाया घालण्याची खरंच गरज होती? आणीबाणीच्या काळात काही अतिरेक झाले असल्याची शक्यता आहे, एवढं म्हणण्याइतकं राजकीय शहाणपणही तुम्ही दाखवू नये? तुमच्या या आत्मकेंद्रित, संशयग्रस्त- ‘असौ मया हत: शत्रू: हनिष्ये चापरान्अपि’ शैलीच्या (हा मी एक शत्रू मारला, आता उरलेल्यांनाही मारीन) राजकारणामुळे तुम्ही ‘आसुरी संपदे’च्या धनी झालात! तुमच्या वडिलांनी हिंदी राष्ट्रभाषा ठेवूनही दक्षिण भारताशी धागा बळकट ठेवला होता. १९७७ च्या निवडणुकीत पुन्हा उत्तर-दक्षिण अशी देशाची मतदान विभागणी झाली; ती अजून पुन्हा जोडली गेलेली नाही. अगदी २०१४ च्या निवडणुकांतही भाजप आणि मोदींना दक्षिण भारतात फारसं स्थान मिळालेलं नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांच्या शक्तीमध्ये झालेली वाढ आणि तुमची सून आणि नातू यांच्या दिशाहीनतेमुळे तुमच्या पक्षाला त्याचा फायदा उठवता आलेला नाही.

फिडेल कॅस्ट्रो यांनी तुम्हाला ‘सावध राहा’ असा इशारा दिला होता, असं तुम्ही सांगितलं ते कधी, केव्हा? त्याचे साक्षीदार कोण? की १९७७ च्या निवडणुकीत बसलेला जनक्षोभाचा तडाखा तुम्ही विसरलात तर नाहीतच, एका असुरक्षिततेच्या गंडामध्ये अडकलात? बालपणात वडिलांपेक्षा आजारी आईच्या सहवासात जास्त र्वष घालवलेली, तारुण्यात पदार्पण करतानाच मातृसुखाला आचवलेली, त्या काळात आधार देणाऱ्या फिरोज गांधींबरोबर वडिलांचा विरोध असतानाही लग्न करून पुन्हा आधार शोधू पाहणारी, नंतर तोही गमावल्यावर थोरला सभ्य मुलगा भारतात परत येतो की नाही याची चिंता असल्यामुळे धाकटय़ा वांड मुलाचा व त्याने जमवलेल्या भगतगणांचा आधार काही काळ मिळाल्यावर तोही गमावणारी इंदिरा नावाची स्त्री कायमच भयग्रस्त होती! कारकीर्दीच्या पहिल्या सात वर्षांतलं यशही तो भयगंड घालवू शकलं नव्हतं? लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही?

मी हे प्रश्न मांडतो आहे; हे माझे निष्कर्ष नाहीत. कारण हे प्रश्न खरे असतील तर, आणि त्यांचं उत्तर होकारार्थी आलं तर मग मारेकऱ्यांनी बंदूक रोखलेली असताना ‘क्या कर रहे हो?’ (पीटर उस्तिनॉव्हचं खरं मानून) असा प्रश्न तुमच्या तोंडून कसा आला? की एकाकीपणा आणि स्वमहानता (मेगॅलोमेनिया) या द्वंद्वामधून तुम्ही कधीच बाहेर येऊ शकला नाहीत?

या १०-१५ वर्षांच्या काळात मी तुम्हाला तीनदा प्रत्यक्ष बघितले. तुम्ही पुणे विद्यापीठाच्या रौप्य- महोत्सवाला आला होता. आम्हाला ऋषी वाटणारे मोठमोठे प्राध्यापक तुमच्यासमोर अगदी कमरेत वाकून बंदगी फर्मावत होते, र्फड इंग्रजी झाडत होते. त्याची लाज वाटली असताना तुम्ही उंच, धारदार स्वरात ‘कुलपतीजी..’ अशी स्वच्छ हिंदीमध्ये सुरुवात केली तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात माझीही टाळी होतीच. भाषण संपवताना तुम्ही मर्ढेकरांच्या ‘धैर्य दे अन् नम्रता दे। पाहण्या जे जे पहाणे। वाकू दे बुद्धीस माझ्या। तप्त पोलादाप्रमाणे’ या ओळींचा हिंदी अनुवाद सादर केलात तेव्हा अत्यानंद झाला होता. तुमचं भाषण कुणीतरी लिहून दिलेलं असणार हे माहीत असूनही! त्याच दौऱ्यातली तुमची पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरची सभा उधळण्यासाठी आम्ही बिनविषारी साप आणि बेडूक घेऊन गेलो होतो. पण भयानक पोलीस बंदोबस्त होता आणि दिवसभर ब्रीफकेसमध्ये ठेवल्यामुळे साप व बेडूकही (तुमच्या विरोधकांसारखे) अर्धमेले झाल्याने तो आचरट बेत फसलाही होता.

दुसऱ्यांदा तुम्हाला पाहिलं ते चिकमंगळूर निवडणुकीच्या प्रचारामध्ये. एका राजवाडय़ासारख्या बंगल्यात तुमची प्रेस कॉन्फरन्स होती. यावेळी मात्र मी धक्काबुक्की करून अगदी पहिल्या रांगेत.. तुमच्यापासून चार-पाच फुटांवर तासभर बसलो होतो. तुमच्या नजरेची धार तेव्हा लक्षात आली. ती नजर भाला फेकल्यासारखी आक्रमक होतीच; पण तिच्यात एक निकराची आत्मनिष्ठाही जाणवत होती. तासभर तुम्ही धादांत खोटं बोललात. आणीबाणीतच माध्यमांना जास्त स्वातंत्र्य होतं आणि जनता समाधानी होती, असं बजावलंत. माझ्या लक्षात ते तुमचे डोळेच काय ते राहिले. तशी नजर राजीवकडे नव्हतीच. पण एक चंद्रशेखरांचा अपवाद सोडता नंतरच्या व्ही. पी. सिंग, देवेगौडा, नरसिंह राव, गुजराल, वाजपेयी, मनमोहन सिंग यातल्या एकाही पंतप्रधानाकडे नव्हती. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. तुम्हाला तिसऱ्यांदा बघितलं ते १९८० च्या जानेवारी महिन्यात जनता पक्षाचा दणदणीत पराभव करून तुम्ही काँग्रेस (आय) च्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी संसद भवनात आलात तेव्हा. यावेळी मी दूर उभा होतो. ‘बाग उजड गया’ हे जेपींचे शब्द जनता पक्षाने सार्थ ठरवले म्हणून विषण्ण होतो. मात्र तुम्ही कारमधून उतरलात आणि तुमच्या दिशेने धावणाऱ्या हजारोंच्या गर्दीकडे एक कटाक्ष टाकून झपझप पावले टाकत आतमध्ये गेलात हे आठवतं!

तुमची हत्या झाल्यावर देशामध्ये पसरलेला सुन्न शोक बघत होतो आणि माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठत होतं. त्यातले काही या पत्रात नोंदवले आहेत. शेवटचा आता नोंदवतो- आपण या देशाच्या पंतप्रधान व्हावं/ होऊ अशी तुमची खरंच महत्त्वाकांक्षा होती का? विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या कितीतरी वर्षे आधी ‘एक दिवस असा येईल, की इंग्लंडला माझीच गरज भासेल’ असं स्वत:च्या डायरीत लिहून ठेवलं होतं, तसं काही तुमच्याबाबतीत होतं का? तुमच्या चरित्रकारांनी गृहीतच धरलेलं दिसतं, की तुम्ही पंतप्रधान होणार हे विधिलिखित होतं. तुम्हाला काय म्हणायचं होतं? की ‘नियतीशी करार’ या तुमच्या वडिलांच्या आवडत्या शब्दांमुळे तुम्ही ती जबाबदारी स्वीकारलीत आणि नंतर आपल्याला नियतीनेच निवडलं होतं, या दृढ विश्वासामध्ये मग्न झालात? कारण नेहरूंचं व्यक्तिमत्त्व, शिक्षण, अभ्यास, विद्वत्ता, सुसंस्कृतपणा, पक्षकार्याचा अनुभव, तुरुंगवासामधलं चिंतन, समाजाला आधुनिक जीवनाची स्वप्ने दाखवण्याची प्रतिभा यांतलं काहीच तुमच्याकडे नव्हतं! मग हे गुण स्वत:च्या अंगीही उशिरा का होईना, बाणवावेत आणि आपल्या वडिलांचा खरा- सुसंस्कृत लोकशाही राजकारण साधण्याची शिकस्त करण्याचा- वारसा चालवावा, असं तुम्हाला कधी वाटलंच नाही; उत्तरोत्तर धसमुसळेपणा वाढतच गेला?

व्यक्तिश: मला तुमचे आभारच मानले पाहिजेत. प्रत्येक देशाच्या आयुष्यात असा क्षण येतो, जेव्हा  ‘मेन आर सेपरेटेड फ्रॉम बॉइज’- पोरसवदा कोण आणि प्रौढ कोण, ते ठरवण्याचा! आणीबाणी लादून माझ्या पिढीसाठी तो क्षण तुम्ही उपलब्ध करून दिलात. मी त्याच्याविरोधात सत्याग्रह करून तुरुंगात गेलो आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा शिलेदार बनलो. सत्तेच्या मागे न धावता देशासमोर असलेल्या जटिल समस्यांचा अभ्यास करून काही सकारात्मक, पण सडेतोड उत्तरे शोधून ती मांडणारा कार्यकर्ता ही माझी ओळख पक्की होण्याची संधी मला आणीबाणीमुळेच मिळाली. गेली चाळीस र्वष तुम्ही भारतीय लोकशाहीला केलेल्या जखमांचे व्रण बुजवणं आणि पुन्हा कुणाची तसं करण्याची हिंमत होऊ नये म्हणून स्वत: सावध राहणं, प्रचलित राजकारणाची ‘दूध का दूध, पानी का पानी’ अशी मीमांसा करणं, हे एक काम मला तुमच्यामुळेच मिळालं. दुसरं काम तुमच्या वडिलांनी शेतकऱ्यांची अक्षम्य हेळसांड, उपेक्षा करून या देशातला सर्वात प्राचीन व बहुसंख्य उत्पादक वर्ग वैफल्याच्या गर्तेत ढकलला, त्याला त्यातून बाहेर काढणं- यात तुमच्यावर थेट ठपका ठेवता येत नाही, पण शेतकरी आंदोलनांची तुम्ही फारशी तमा बाळगली नव्हती, ही वस्तुस्थिती आहेच.

आता आवरतं घेतो. तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असला तर परत जरूर भारतात या. मात्र यावेळी महान घराण्यात जन्म घेऊ नका. माझ्यासारख्या चारचौघांसारख्या घरात घ्या. तुम्हाला आयत्या मिळालेल्या संधी आम्हाला कधीच मिळाल्या नसल्या तरी माझ्यासारखे असंख्य भारतीय देशाचा विचार करत असतात, समस्यांवर उपाय शोधत असतात आणि मिळेल त्या माध्यमातून ते जनतेपुढे ठेवण्याची धडपड करत असतात, हे तुम्हाला त्याशिवाय जाणवणार नाही. आणि येनकेनप्रकारेण सत्ता टिकवण्याची तजवीज करून मग केवळ खुशमस्कऱ्या सल्लागारांवर भिस्त ठेवावी लागणार नाही. लोकाभिमुख अभ्यास आणि लोकप्रिय नेतृत्व यांची इतकी फारकत असण्याची गरज नाही. त्यांचं सहकार्यच सुसंस्कृत लोकशाहीची हमी देऊ शकतं, हेही तुम्हाला जाणवेल. आजही या देशापुढचे अनेक प्रश्न प्रतिभावान उत्तरांची वाट पाहत आहेत. ती उत्तरे आपण शोधू…
विनय हर्डीकर

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter to indira gandhi
First published on: 27-03-2018 at 11:44 IST