लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

गेली ४०-५० वर्षे तू या देशाच्या कानाकोपऱ्यात, आमच्या मनामनांत ठाण मांडून बसलाहेस. ‘करोडपती’ कसे व्हावे याचे धडे तू रोज देत आहेस. ‘सकाळपासून तेच ते, तेच ते’ जगण्यात मश्गूल आम्हाला ‘टूथपेस्ट’ कोणती वापरावी, गाडी कोणती घ्यावी, याचे सल्ले तू देत आहेस. गेली पन्नास वर्षे तू आमच्या आसपास तुझं आभासी कर्तृत्व उभं करतोयस. तू असा सदासर्वकाळ आमच्याभोवती फेर धरतोयस! जणू काही गेल्या ४० वर्षांत देशाच्या उत्क्रांत होत गेलेल्या मानसिकतेचा तू ‘बॅरोमीटर’च आहेस.

यार अमिताभ, तू चक्क पंच्याहत्तर वर्षांचा झालास. देशाला स्वातंत्र्य मिळून तर नुकतीच सत्तर वर्षे झाली.. तू तर त्यापेक्षाही मोठा झालास! गेली ४०-५० वर्षे तू या देशाच्या कानाकोपऱ्यात, आमच्या मनामनांत ठाण मांडून बसलाहेस. ‘करोडपती’ कसे व्हावे याचे धडे तू रोज देत आहेस. ‘सकाळपासून तेच ते, तेच ते’ जगण्यात मश्गूल आम्हाला ‘टूथपेस्ट’ कोणती वापरावी, गाडी कोणती घ्यावी, ‘मोबाइल’ कोणता वापरावा आणि रात्री ‘गुड नाइट’ किंवा फारच ताण पडला तर तेल कुठले वापरावे, याचे सल्ले तू देत आहेस.. गेली पन्नास वर्षे आणि आजही तू आमच्या आसपास तुझं आभासी कर्तृत्व हरघडी उभं करतोयस. तू असा सदासर्वकाळ आमच्याभोवती फेर धरतोयस!

जणू काही गेल्या ४० वर्षांत देशाच्या उत्क्रांत होत गेलेल्या मानसिकतेचा तू ‘बॅरोमीटर’च आहेस. प्रत्येक दशकात बदलत गेलेल्या देशातील राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांचा तू दुवा आहेस. त्यामुळेच तुझ्या चरित्राचे, प्रदीर्घ कारकीर्दीचे सिंहावलोकन करणे अपरिहार्य आहे. आणि म्हणूनच देशाच्या या काळातील चरित्राशी समांतर जाणारा तुझा प्रवास आम्हाला आमच्या मनाचा ठाव घेणारा वाटतो आहे.

तुझा जन्म १९४२ चा. प्रख्यात हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची तू रचना. तेजी आणि हरिवंशराय या सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबात तुझं संगोपन अलाहाबादला झालं. तो काळ ‘चले जाव’ चळवळीचा. आई-वडील दोघेही तसे या चळवळीशी जोडलेले. ब्रिटिश राजसत्तेविरुद्धचा असंतोष शिगेला पोचलेला. स्वातंत्र्यसंग्रामात माणसाची कुळी लावणाऱ्याने जगावे कसे आणि मरावे कसे, याची मोलाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी या लोकोत्तर नायकाचा हा काळ. निर्भयता, धैर्य आणि त्याग यांचं प्रतीक बनून स्वातंत्र्यासाठी, आत्मगौरवासाठी उत्स्फूर्तपणे जनतेला उठविण्याचे सामथ्र्य पेरणाऱ्या या काळात गांधींनी अहिंसेचे अमोघ अस्त्र उपसून ब्रिटिशांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडलं.. १९४७ साली. त्या काळात तू नुकताच ‘सेंट मेरीज’ शाळेत प्रवेश घेतला होतास.

तुला याचा मागमूस होता का, माहीत नाही. पण त्यावेळी ‘सिनेमा’ देशात येऊन पन्नास वर्षे झाली होती. ‘रामराज्य’ वगळता गांधींनी कुठलाच सिनेमा बघितला नव्हता. परंतु भारतीय मनांवर मात्र सिनेमाचं गारुड आस्ते आस्ते पसरत होतं. त्याच काळात ‘सिनेमा’ परिपूर्ण माध्यम म्हणून बहरत होता. संवाद.. गाणी.. संगीत यामुळे सिनेमा अधिकाधिक मोहक बनत होता. सैगलच्या जादुई आवाजाने आणि अशोककुमारच्या छैलछबिल्या प्रतिमेमुळे सारेच मोहित झाले होते.

स्वातंत्र्य मिळालं..  आणि सिनेमाचा नूर बदलला. ‘दिलीप- राज- देव’ या त्रिमूर्तीचा उदय झाला. त्यावेळी एकीकडे ‘नेहरू युगा’चा प्रारंभ झाला होता. देश पुनर्बाधणीच्या प्रेरणेने झपाटला होता. तर दुसरीकडे बंगालमधील भयंकर दुष्काळ, महापूर, फाळणीची भयानकता आणि तीव्र बेकारी अशा खडतर परिस्थितीतून तो वाटचाल करीत होता. या परिस्थितीबद्दलचे दु:ख, त्यातील मनोवेदना हिंदी सिनेमा वेगळ्या पातळीवर व्यक्त करत होता. देश गाऊ व रडू पाहत होता.

हिंदी सिनेमातील प्रेम-शोकांतिकांशी संगीतात्मक तादात्म्य पावून त्यावेळच्या प्रेक्षकांचे डोळे जणू पाणावले होते. लताच्या आर्त सुरातील गाणी ऐकून प्रेक्षक भारावून गेले होते. या काळाचे भान ठेवून निर्माण झालेल्या प्रेम-शोकांतिकांचा नायक दिलीपकुमार होता. १९४८ ते १९६२ या नेहरू युगातील एक तपाचा तो नायक होता. पुढे त्याच्याच सावलीत हिंदी सिनेमाचा पैस आणि अभिनयाची जातकुळी बहरली.

काळ सरत गेला, तसे स्वातंत्र्योत्तर देशाचे चित्रही बदलत गेले. नेहरूंच्या पुनर्बाधणीच्या ध्यासाने वेग घेतला. यंत्रयुगाकडे वाटचाल करणाऱ्या पंचवार्षिक योजना आल्या. उद्योगधंद्यांची वाढ होऊ लागली. ‘खेडं’ स्वयंपूर्ण करण्याच्या नादात शहरं वाढू लागली. कामगारवर्ग उदयास आला. त्यातून वर्गकलह डोकावू लागला. आणि त्याचे प्रतिबिंब चित्रपटांतून उमटू लागले. दिलीपसह अनेकांनी आपला पवित्रा बदलला आणि सामान्यजनांचे विश्व व्यक्त करत, त्यावेळच्या तरुणांशी सलगी करत त्यांचे मनोगत व्यक्त करणारा सिनेमा बहरू लागला.

मोहब्बतीखातर बापाविरुद्ध बंड पुकारणारा ‘मुगल-ए-आझम’मधील बंडखोर प्रेमी आणि बिनकाळजाच्या समाजाविरुद्ध खवळून उठलेला ‘गंगा जमना’मधील गंगा हा संतप्त मर्द गडी अशा दोन प्रतिमा दिलीपने चिरंतन केल्या. यानिमित्ताने हिंदी सिनेमाने नवे वळण घेतले.. त्यावेळी तू ‘शेरवूड’मधील कॉलेज संपवून तारुण्यात प्रवेश केला होता.

दिलीप-युगाचा अस्त झाला. दंतकथा म्हणून त्याची लोकप्रियता अढळ राहिली. चित्रपट धंद्यातील स्टुडिओ सिस्टीम कोसळली आणि हिंदी चित्रपटात सुबत्ता आली. सिनेमा रंगीत झाला. चित्रपट व्यवसायाचे उद्योगात रूपांतर झाले. पलायनवादाचा भाव वधारला.

दिलीप-राज-देव यांच्या जमान्यानंतर अनेक चेहरे आले नि गेले. शम्मी कपूरसारख्या उसळत्या नायकाने धूम माजवली. ‘मदर इंडिया’ चित्रपटाने तीन नायकांना जन्म दिला.. राजेंद्रकुमार, सुनील दत्त व राजकुमार. तर त्यानंतर ही-मॅन धर्मेद्र, जितेंद्र आणि दिलीपची नक्कल करत देशप्रेमाचे गोडवे गाणारा मनोजकुमार, चिकणा शशी कपूर आणि अभिनेता संजीवकुमार असे अनेक नायक आले नि गेले. त्यातले काही काळाबरोबर अस्तंगत पावले. काहींना निर्माते विटले. तर काहींना आपण विटलो.

या पाश्र्वभूमीवर हसतमुख, भावपूर्ण चेहऱ्याच्या राजेश खन्नाचा उदय झाला. साद घालणारा भोलाभाला प्रेमी म्हणून त्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्याने एक अल्प युग निर्माण केले. त्याच्या झंझावाती लोकप्रियतेच्या चक्रीवादळात अनेकजण सापडले. पण हे वादळही अखेर शमले..

त्याला कारणीभूत होता तू आणि तूच.. अमिताभ! याच वेळी कोलकात्यातील नोकरी सोडून ‘स्ट्रगलर’ म्हणून तू मुंबईत दाखल झालास. निर्मात्यांकडे खेटे घालू लागलास. तुझी ‘फिगर’ स्लिम होती. ताडमाड उंच होतास. पण नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी व चेहरेपट्टी तुझ्याकडे नव्हती. ‘लंबू’ म्हणून तुझी हेटाळणी होत असे. पण हीरो होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तू झटत होतास. ते साल होतं १९६९. त्यावेळी तुझ्याकडे होता फक्त तुझा बुलंद आवाज!

या आवाजामुळे तू त्याकाळी मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटाला निवेदन केलेस. समांतर सिनेमातील हा मैलाचा दगड. पण त्या वाटेला तू उभ्या आयुष्यात गेला नाहीस. याच वेळी ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’मध्ये एक हिंदुस्थानी म्हणून पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी तुला कल्पनाही नसेल, की आपण पुढे पन्नास वर्षे हिंदुस्थानवर राज्य करणार आहोत.

‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटात गोवामुक्ती संग्रामातील तरुण शिलेदार अन्वरची भूमिका तू मन लावून केलीस. पण लगोलग ती विस्मरणात गेली. त्यानंतर प्रथम तू प्रेक्षकांच्या नजरेत भरलास तो हृषीकेश मुखर्जीच्या ‘आनंद’मधील बाबू मोशायमुळे! राजेश खन्नासमवेत सहनायकत्व पत्करून तू बाबू मोशाय ऊर्फ डॉ. भास्कर बॅनर्जीची व्यक्तिरेखा सर्वार्थाने जगलास. मृत्यूला कवटाळणाऱ्या आनंदला तू ‘छे महिनों से तुम्हारी बकबक सुनता आया हूँ.. आज तुझे बोलना होगा..’ असं म्हणतानाचा तुझा आवेश, तुझ्यातील सुप्त संतापाचे दर्शन आम्हाला घडलं. बाबू मोशाय सर्वतोमुखी झाला.

पण यानंतरच्या दोन वर्षांत तुझे सिनेमे येत गेले आणि पडत गेले. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘बन्सी बिरजू’, ‘एक नजर’, ‘संजोग’, ‘रास्ते का पत्थर’, ‘गहरी चाल’ आणि ‘बंधे हाथ’ अस तुझे एकापाठोपाठ अनेक सिनेमे अपयशी ठरले. ‘दॅट वॉज अ बॅड पीरियड..’ असं म्हणत पुढे अनेक वर्षे तू हळहळत होतास. याच काळात तू ‘गुड्डी’.. जया भादुरीशी विवाहबद्ध झालास आणि चौकोनी कुटुंबाचं स्वप्न रंगवू लागलास.

११ मे १९७३ ला ‘जंजीर’ प्रदर्शित झाला. त्यावेळी तू तुझ्या तिशीत होतास. ‘जंजीर’मध्ये तू तेजतर्रार पोलीस इन्स्पेक्टर झाला होतास. ज्या सराईतपणे तू खुर्ची लाथाडून पोलीस चौकीत मटका अड्डेवाल्यांची जागा काय, हे दाखवून दिलेस..  आणि त्याच मटके अड्डेवाल्या प्राणने ‘तुझी ही ‘वर्दी’ बोलतेय..’ असं म्हटल्यावर ‘वर्दी’ काढून तू एकटा त्याच्या गल्लीत गेलास, तेव्हा आम्ही तुला मानलं! ‘नमकहराम’मध्ये आपल्या दोस्ताला मार लागल्यानंतर विचारपूस करून तू गल्लीत येतोस आणि ‘कौन माई का लाल हैं? सामने आओ’ असं आव्हान देतो, तेव्हा तुला ते शोभलं.  त्यानंतर तुझा ‘दीवार’ आला आणि रूपेरी पडद्यावर स्फोट झाला. ‘दीवार’मध्ये तू तोंडातली विडी ओठातल्या ओठात चुळबुळ करत एवढंच म्हणतोस, ‘कल और एक कुली पैसे देने से इन्कार करेगा.’ बस्स! अमिताभ ही तुझी कमालीची तिरंदाजी बघून आम्ही तुला डोक्यावर घेतलं..

आणि त्यानंतर तुझा ‘शोले’ आला.. ‘अमिताभ आया’ असा गजर देशभरातील हजारो थिएटरमध्ये घुमू लागला. आणि मग परत कधीच तुला मागं वळून बघावं लागलं नाही. एका युगाची सुरुवात झाली.. की ज्याला धुडकावून लावणं आजपावेतो कुणालाच जमलेलं नाही.

१९७२ ते ८२ या दशकात फक्त अमिताभ होता.. ‘अदालत’, ‘खून-पसीना’, ‘डॉन’, ‘कस्मे वादे’, ‘मुकद्दर का सिकंदर’, त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘कालियाँ’ आणि ‘लावारीस’.. या काळात त्याच त्याच कथा आणि तोच तोच अमिताभ आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचा होता. आम्ही पुन्हा पुन्हा तो पाहत होतो. तुझ्या तत्कालीन तीन तासांच्या पौरुषयुक्त यशासाठी आणि गरगरत्या वेगाच्या नशेसाठी तू आम्हाला हवा होतास. केवळ स्वप्नरंजन का असेना, पण जीवनाच्या एका अपवादात्मक, पण सच्च्या दर्शनानं तू आम्हाला प्रभावित करत होतास. एक अदम्य, उसळतं चैतन्य आम्हाला पडद्यावर दिसत होतं. आणि आमच्या आजूबाजूला मात्र भयभीत करणारं वास्तव आम्हाला घाबरवत होतं.

तुझं दशक हे ‘अस्वस्थ दशक’ होतं. इंदिरा गांधींची निरंकुश सत्ता ‘आणीबाणी’च्या दिशेने वाटचाल करत होती. रेल्वे संप, निदर्शने आणि आंदोलनांनी देशाला घेरलं होतं. जॉर्ज फर्नाडिस व बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आक्रमक नेते आम्हाला भडकावत होते. जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या घोषणेमुळे इंदिरा गांधींची सत्ता उलटवली होती. त्यानंतरच्या विरोधकांच्या दिवाळखोरीमुळे आम्ही पुरते उद्ध्वस्त झालो होतो.. अशा वेळी तुझं तेजतर्रार व्यक्तिमत्त्व आमचा माणसावरील भरवसा वाढवत होतं. आणि म्हणूनच या दशकाचं तू प्रतीक बनलास. सर्वहारा वर्गाचा ताईत बनलास.. हे सारं आठवलं की मग ते तृप्तीचे, बेहोशीचे क्षण आठवू लागतात. तुझे अनेक तडफदार प्रसंग डोळ्यासमोर येतात. तुझ्या गोळीबंद आवाजातील संवाद कानात घुमू लागतात..

‘ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं’ (जंजीर)

‘मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता’ (दीवार)

‘तुम्हारा नाम क्या हैं, बसंती?’ (शोले)

‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकीन हैं’ (डॉन)

‘हम जहाँ पे खडे हो जाते है, लाइन वही से शुरू हो जाती हैं’ (कालिया)

तुझ्या या संवादांनी काही काळ का होईना, आम्हाला स्वाभिमान दिला. आमच्यातील समाजाविरुद्धचा असंतोष, चीड, त्रागा, संताप, उद्रेक या साऱ्यांना तुझ्या निमित्ताने वाट मिळाली. आमच्या हरणाऱ्यांच्या छोटय़ा लढाईत तुझी जिंकण्याची ईष्र्या आणि जिद्द याची आम्हाला नशा मिळाली. ७२ ते ८२ हे खरं तर तुझं दशक! या दशकाला तुझ्यामुळे व्यक्तिमत्त्व मिळालं. उत्तुंग, झुंजार, आक्रमक. पडद्यावरील असंतोषाचा तू जनक ठरलास!

१९८२ साली दोन चित्रपट आले. एक ‘शक्ती’ आणि दुसरा रिचर्ड अ‍ॅटनबरोंचा ‘गांधी’! ‘शक्ती’मध्ये ‘मुगल-ए-आझम’चा बंडखोर प्रेमी तुझा बाप बनला होता. कर्तव्यदक्ष पोलीस कमिशनर आणि त्याचा संतप्त बंडखोर मुलगा.. असा संघर्ष. दिलीपकुमार आणि तू प्रथमच आमनेसामने आला होता. त्यात दोन पिढय़ांच्या जित्याजागत्या प्रतिमांची जुगलबंदी झाली. दिलीपने त्याचा आब व रूबाब सांभाळला आणि तूही त्याला बेदरकारपणे सामोरा गेलास. तुझ्या निमित्ताने दिलीप चरित्र अभिनेता बनला. जसा तू राजेश खन्नाच्या निमित्ताने सहनायकाचा नायक बनलास!

याच वर्षी ‘गांधी’ चित्रपट सादर करून रिचर्ड अ‍ॅटनबरांनी तुझ्या प्रेक्षकांना डुलकी घेताना पकडले होते. सारा देशच आपलं कुटुंब मानून त्यांच्यात स्वातंत्र्याचे, निर्भयतेचे धुमारे पेटविणाऱ्या महात्मा गांधींनाच चित्रपटाचा नायक म्हणून त्यांनी पेश केले. अ‍ॅटनबरांचा नायक तुझ्या तेजतर्रार, संतप्त व अन्यायाशी एकटा प्रतिकार करणाऱ्या प्रतिमेपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. तो निखळ माणुसकीचे, सत्यनिष्ठेचे, स्वातंत्र्यप्रेमाचे आणि उदात्ततेचे संस्कार करणारा होता. माणसं व माणसांपलीकडे काहीतरी झरझर चपळपणे पाहणारा, शोधणारा, हेरणारा आणि त्यांच्यात आत्मविश्वास फुलविणारा होता. एका गालावर थप्पड बसली तर दुसरा गाल पुढे करण्याची ताकद देणारा होता. तो महामानव होता. तरीही हा चित्रपट तुझ्या चित्रपटाइतका लोकप्रिय झाला नाही..  अखेर तुझे ‘ठोशास ठोसा’ हे तत्त्वज्ञानच भाव खाऊन गेले. कारण या काळाचा तू महानायक होतास.

याच वर्षी अशाच एक ‘ठोशा’मुळे ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तुला अपघात झाला आणि मृत्यूशी तुझी नजरभेट झाली. देशभर काहूर माजले. तुझे प्राण परत येण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. नवस केले गेले. पंतप्रधान इंदिरा गांधीही तुझी विचारपूस करण्यासाठी आल्या. ‘मायस्थेनिया ग्रेविस’ या अनोख्या आजाराशी दीर्घ अशी झुंज देऊन तू पुन्हा ताजातवाना झालास. तेव्हा तुला तुझ्या देशभरातील अफाट लोकप्रियतेचे गमक उमगले. तू चाळिशीत होतास तेव्हा. आणि मग तू याच लोकप्रियतेवर आरूढ झालास..

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि सारा देश हादरला. इंदिराजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मित्राच्या दु:खात तू राजीव गांधींची सोबत करत होतास. देशात टेलिव्हिजनचे जाळे पसरले होते. त्यामुळे सतत तीन दिवस इंदिराजींचे पार्थिव टेलिव्हिजनच्या रूपाने प्रत्येक देशवासीयांच्या घरात होते. शोकाकुल वातावरणात देश सुन्न झाला होता. त्यानंतरच्या सहानभूतीच्या लाटेत तुझा सखा राजीव गांधी पंतप्रधान झाला आणि तुझ्या आयुष्याने नवे वळण घेतले.

तोपर्यंत सहनायक, खलनायक, नायक असा पल्ला गाठत तू महानायक बनला होतास. तुला अनेक प्रतिष्ठित सन्मानही मिळाले होते. करमणूक उद्योगाचा ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हणून तुझा लौकिक झाला होता. तरीही मित्राला मदत म्हणून तू राजकारणात उडी घेतलीस. अलाहाबादहून तू खासदार म्हणून निवडून आलास. पण या क्षेत्रात पुढे तुझ्या पदरी निराशाच आली. तुझ्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आयकराच्या नोटिसा आल्या. ‘बोफोर्स’ प्रकरण तुझ्यावर शेकले. तरीही तू या सगळ्याचा सामना आपल्या पडद्यावरील प्रतिमेप्रमाणे करत होतास.

या काळात तुझे अनेक चित्रपटही येत होते. सवयीने लोकप्रियही होत होते. ‘शहेनशहा’, ‘अग्निपथ’, ‘आखरी रास्ता’, ‘अंधा कानून’, ‘मै आझाद हूँ’ अशा चित्रपटांत तुझे कसब दिसत होते. बाकी ‘जादूगार’, ‘अजूबा’सारखे चित्रपट बेतासबातच होते. तुझं वयही वाढत होतं. आणि ते लपतही नव्हतं. ‘मिड्ल एज्ड अँग्री मॅन’ म्हणून ‘हम’ चित्रपटाने तुला पुन्हा लौकिक मिळाला. टेलिव्हिजन घराघरात असल्याने तुझे जुने चित्रपट परत परत दिसत होते.

त्यावेळी देशाच्या सत्तेच्या सारीपाटावर अनागोंदी होती. राजीव गांधींनी ‘कॉम्प्युटर’ युगाचा श्रीगणेशा केला होता.. त्यादरम्यानच त्यांची हत्या झाली आणि तू सैरभैर झालास. १९९२ च्या ‘खुदा गवाह’ चित्रपटानंतर तू पुढे पाच वर्षे चित्रसंन्यास घेतलास.

१९९१ साली पी. व्ही. नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली मनमोहनसिंगांनी आर्थिक उदारीकरणाचा नवा अध्याय सुरू केला. देश पूर्णत: बदलत होता. चित्रपट उद्योगदेखील नवनव्या तंत्रज्ञानाचे टक्केटोणपे खात कात टाकत होता. सॅटेलाइट, चॅनेल, डीव्हीडी, कॉम्प्युटर, मोबाइल अशी अनेक आवर्तनं जुन्या कल्पनांचा मागमूस नामशेष करत होती. खेडय़ांकडून शहरांकडे स्थलांतरितांचे लोंढे येत होते. महानगरे अधिक संपन्न, विकसित होत होती. प्रेक्षकांना ‘गिऱ्हाईक’ बनविण्याचा नवा पायंडा पाडला जात होता. पूर्वीचा सर्वहारा वर्ग आता मध्यमवर्गात तबदील होत होता.. आणि नवश्रीमंत होण्याची हाव समाजाने स्वीकारली होती.

या काळात तुझी प्रतिमा ‘विक्रीयोग्य’ होती. अमूल्य होती. तूही अब्जाधीश होण्याच्या नादात चित्रपट सोडून अनेक उद्योग करत होतास. टी. व्ही. मालिका, ‘एबीसीएल’पासून देशी-विदेशी अनेक उपक्रमांत कोलांटउडय़ा मारत होतास. ‘टॅलेन्ट हंट’, ‘विश्वसुंदरी’ असे अनेक उपक्रम. त्यापैकी काहींना यश मिळालं. काही फसले. जाहिरात क्षेत्र काबीज करत तू आपल्याच प्रेक्षकांना ‘ग्राहक’ बनवत होतास.

१९९७ च्या ‘मृत्युदाता’ चित्रपटापासून तू पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन केलंस. त्यानंतर तुझा नवा चेहरा उजागर केलास. पांढऱ्याशुभ्र दाढी-मिशांमुळे रुबाबदार भासणारा चेहरा घेऊन तू अनेक चरित्र भूमिका केल्यास. प्रिन्सिपल, डॉक्टर, लेखक, बँक मॅनेजर, मेजर अशा अनेक व्यक्तिरेखा सादर केल्यास. त्यांतही तू ‘अँग्री ओल्ड मॅन’ होतास. तू संतापत होतास. पण तुझा हा संताप आता व्यवस्था, शिस्त व परंपरा यासाठी होता. एका अर्थाने तू आता प्रस्थापित झाला होतास. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ व ‘त्रिशूल’मधील चिडलेल्या तरुण विजय, हिराचा आता तू बाप बनला होतास.

या काळात ‘मोहब्बतें’, ‘सूर्यवंशम्’, ‘मेजरसाब’, ‘कभी खुशी, कभी गम’ यांसारखे तुझे अनेक चित्रपट आले. नव्या शतकातही तुझे अनेक चित्रपट गाजले. कधी तू ‘एकलव्य’ बनलास, तर ‘सरकार’मध्ये तू चक्क बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात दिसलास. ‘ब्लॅक’, ‘पिकू’, ‘लास्ट लियर’सारख्या काही चित्रपटांत तू अदाकारीचे कर्तब दाखविले. ‘पिंक’मध्ये स्त्रियांची तरफदारी केली तर ‘पा’, ‘नि:शब्द’, ‘चिनी कम’ चित्रपटांत तू स्वत:च्या व्यक्तिरेखेला अनेक नव्या ‘सिच्युएशन’मध्ये सादर केलेस. तर ‘भूतनाथ’सारख्या मुलांसाठी असलेल्या चित्रपटात तुझं ‘अ‍ॅग्री यंग मॅन’चं भूत तुझ्या मानगुटीला बसलं असल्याचं लक्षात आलं.

आणि नव्या शतकात तुझ्या या अनेक चित्रपटांसह परत एकदा तू उसळी मारून आलास. यावेळी तू जाहिरात क्षेत्रात तुझं कसब दाखवत होतास. अगदी पोलिओ निर्मूलनाच्या जाहिरातीतदेखील ‘अँग्री ओल्ड मॅन’ची भूमिका तू निभावत होतास. शेकडो ब्रँडच्या जाहिराती करत तू टीव्हीचा पडदा चोवीस तास अडवत होतास.

तुझी ७० एमएमचा पडदा व्यापून टाकणारी प्रतिमा टेलिव्हिजनच्या छोटय़ा पडद्यावर कशी मावते, या चिंतेत असतानाच नव्या सहस्रकाच्या प्रारंभी ‘कौन बनेगा करोडपती’ आला आणि तू परत एकदा नव्याने निर्माण झालेल्या मध्यमवर्गाच्या स्वप्नांवर आरूढ झालास. लोभ आणि नशीब आजमावून पाहणाऱ्या या नव्या खेळाने तुझी प्रतिमा घराघरात स्थानापन्न झाली. कॉम्प्युटर महाशयांशी सलगी करत तुझ्या या ‘जंटलमन’ अवताराचा आणि त्यातील संवादाचा बोलबाला घुमू लागला.. ‘लॉक किया जाय..?’ तू चित्रपटाचा महानायक होतासच; आता टीव्हीचा सुपरस्टारही बनलास. सहस्रकातील सर्वश्रेष्ठ बनलास!

आजही तुझा ‘केबीसी’ कार्यक्रम सातव्या पर्वात उत्कंठा टिकवून आहे. आजही तू म्हणतोस, ‘वो कहते हैं, मेरी आँखो में उनको अपने सवालों के जवाब मिलते है! चलिए, देखते हैं, अब कितनों को सपनों के पंख मिलते हैं।’.. आजच्या माहितीयुगात माहितीच्या फुशारकीवर तुझ्या अब्जाधीश चाहत्यांपैकी किती जण करोडपती होतात, कोण जाणे! एक मात्र खरं, तुला बक्कळ मानधन मिळतंय.. आणि तुझी तुझ्या चाहत्यांशी दिलखुलास गाठभेट होते. त्यांचं रोजचं जगणं तुलाही बघायला मिळतं!

७५ वर्षांचं तुझं हे दीर्घ आयुष्य आणि पन्नास वर्षांची तुझी वेगवान कारकीर्द.. सारं काही अचंबित करणारं! देशातील मध्यमवर्ग १००-१२५ वर्षे कसा उत्क्रांत होत गेला, याचं चित्रण सत्यजित राय यांच्या चित्रपटांमध्ये आढळतं. तर त्या मध्यमवर्गाची पन्नास वर्षांतील स्पंदनं तुझ्या प्रतिमेत सापडतात. आणि म्हणूनच प्रेक्षकांनी तुला ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळपद दिलंय.. यापुढील शतकात देशातील चित्रपट इतिहासाचे कालमापन अमिताभपूर्व आणि अमिताभोत्तर असंच केलं जाईल, हे निर्विवाद!
सतीश जकातदार