X

कविता आणि रेखाटने

इवलासा जीव उडतो मैलो दूर..

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

पक्षी…

काव काव खिडकीत

भिर भिर भिंतींवर

चिव चिव पडवीत

व्याकूळ कौलावर

इवलासा जीव उडतो मैलो दूर..

कधी आक्रोश तरुवर

कधी शांत पारावर

कधी एकटाच खडकावर

कधी रांग शिखरावर

इवलासा जीव उडतो मैलो दूर..

कधी उमंग पहाटे

कधी खिन्न संध्येत

कधी फडफडतो पंख

कधी आडवा वाटेत

इवलासा जीव उडतो मैलो दूर…

कधी स्तंभ उजेडात

कधी जागा अंधारात

कधी वणवण उन्हात

कधी तारांवर पावसात

इवलासा जीव उडतो मैलो दूर…

कधी इकडे कधी तिकडे

कधी पानामध्ये झाक

आठवणीतल्या उंबरातून

येते ओली हाक…

पक्षी उडतो मैलो दूर

कुठे जातो..?

नीज

थकलेला सूर्य

चाफ्याशी येऊन निजला

चांदण्यात काळी रात्र

पान फुलांच्या सावल्या

चंद्रात बुडले डोळे

शीळ वाऱ्यातून

मग हळूच वाऱ्यामागे

पळाली नीज डोळ्यातून

जेव्हा चंद्र ढळेल

पहाटेच्या प्रहरात

येतील फिरून डोळे

नीज येईल डोळ्यांत..

काही ओळी..!

संध्येत समुद्राकाठी

वाळूत ढवळत पाय

लाटांत मिसळले अश्रू

शोधू कसे काय?

इथेच भेटू आपण

जिथून केली सुरुवात

वाऱ्यातून येतो गंध

स्वप्न फुलांचा साथ..

श्वासाची फुले…

खळखळतो झरा

नदीच्या उराशी

तरंगत कृष्णकमळ

सूर्याच्या डोहाशी

पाण्याच्या तळाशी

निजले दोन डोळे

नदीच्या भोवती

श्वासाची फुले

डोंगरात फिरतो

फुलांचा वारा

गंगेच्या उगमाशी

जातील काही धारा

चिमण्या

कधी येतील परतून

ठेवते देवडीत दाणे

राहून गेले अंगणात

आपुले घेणे-देणे..

सूर्य

सूर्य मावळत आहे

तसेच मीही

त्या दिशेने चालत आहे..

वाटेत बहरलेला चाफा

गंध मोकळा

इथेच थांबते

मुक्त करते जखडून ठेवलेल्या रक्तवाहिनींना

तुझ्या देठाशी…

माधवी ग्रेस

First Published on: March 26, 2018 12:44 pm