X
X

आठवणी दाटतात…

पत्रव्यवसायात दीर्घ काळ अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकरांचा जवळून संबंध आला.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

पत्रव्यवसायात दीर्घ काळ व्यतीत करताना चित्रकारिता, संगीत, साहित्य आदी क्षेत्रांतील अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकर यांचा जवळून संबंध आला. त्यांच्या संगतीतील अनेक मैफिली : गप्पांच्या.. गाण्यांच्या! आयुष्याच्या मावळतीच्या उन्हात न्हाऊन निघताना त्या मधुर आठवणींच्या झुल्यावर पुनश्च झुलताना..

आयुष्याच्या संध्याकाळी अनेक आठवणी दाटून येतात. त्यातल्या काही मनाला सुखावून जातात. एकेक पान उलगडावे तशा त्या उलगडत जातात. चित्रकार व्ही. एन. ओके यांची पहिली भेट माझ्या एका मित्रामुळे झाली. आणि पुढे मी नियमितपणे त्यांच्या घरी जात राहिलो. कचेरीतून मधूनमधून रजा टाकून त्यांच्या घरी मी जात असे. देवळात ज्या भक्तीने भक्त जातो त्या भावनेने मी त्यांच्या घरी जाई. ‘तुमचे ओके हे नाव कसे काय?’ असे मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांचे मूळ नाव शेणॉय. ओके हे नाव ओळलंका या गावावरून घेतले. रावण अमृतकुंभ घेऊन जात असताना  ओळलंका या ठिकाणी थांबला. त्या गावावरून ‘ओके’ हे नाव त्यांनी घेतले. केवळ रेषांनी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे बारकावे दाखवणे अत्यंत कठीण काम आहे. या पद्धतीचे काम मी तरी दुसऱ्या कुणाचे पाहिलेले नाही. साहित्यिक, संगीत क्षेत्रातील अनेक कलावंत, तसेच ‘आधुनिक भारताचे भाग्यविधाते’ या नावाच्या एका अल्बमसह अनेक कलाकृती ओके यांच्या हातून निर्माण झालेल्या आहेत. ती चित्रे बघण्यात माझे भान हरपून जायचे. या शैलीसाठी मनाची एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक असते. त्यांच्या संग्रही अनेक संगीत मैफली होत्या. बॅ. नाथ पै यांचे भाषण मला त्यांच्याकडेच ऐकावयास मिळाले. स्वत:बद्दल फारसे न बोलणारे मितभाषी ओके माझ्याशी मात्र चांगल्या गप्पा मारायचे. एकदा डोंबिवलीत एका प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मी त्यांना आमंत्रण दिले. मोठय़ा मुश्किलीने त्यांनी होकार दिला. पण झाले असे की, एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एका मराठी सिनेनटालाही बोलावले गेले. सर्वजण त्या नटाच्या मागे. याचा मला खूप त्रास झाला. पण ओके यांनी त्याबद्दल नाराजीचा एकही शब्द काढला नाही. पुढे काही महिन्यांनी मी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्याचे ठरवले. त्यांनी बऱ्याच प्रयासाने परवानगी दिली. त्यांच्यासोबत त्यांचे परममित्र प्रभुभाई संघवी हे यायला तयार झाले. पांडुरंग  विद्यालयाचे श्री. नेरुरकर यांनी आनंदाने त्यांच्या विद्यालयात प्रदर्शन भरवण्यास संमती दिली. ओकेंची सर्व चित्रे मी घेऊन आलो. यावेळी त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. आम्हास सदैव सहकार्य करणारे साहित्यिक शं. ना. नवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंदाने स्वीकारले. त्यांना ओके यांच्या कलाकृती खूप आवडल्या. या प्रदर्शनास रसिकांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रसिद्धीपासून ओके अगदी दूर असत. एकदा मुंबईत त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. त्याला मधु दंडवते, एस. एम. जोशी यांसारखे अनेक दिग्गज हजर होते. छायाचित्रकार सर्वाचा एकत्रित फोटो काढण्यासाठी सज्ज असताना ओके यांना मीच शोधून घेऊन आलो. एस. एम. जोशी यांच्या अखेरच्या आजारात त्यांना संगीत ऐकविण्याचे तसेच त्यांची सेवा करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. जयप्रकाशजींचीही सेवा त्यांनी केली. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला म्हणून त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश नाकारला गेला होता. पण त्यांनी निराश न होता स्वत:ची स्वतंत्र चित्रशैली विकसित केली. त्यांच्या चित्रांचा अल्बम मी अनेकदा अवलोकन करत असतो तरी माझे समाधान होत नाही. ते रंगीत छायाचित्रणही अप्रतिम करायचे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील निसर्गाच्या निरनिराळ्या अद्भुत किमयांचे छायाचित्रण त्यांनी केले होते. आणि त्यांची ती किमया बघण्याचे भाग्यही मला लाभले. मोठय़ा पडद्यावर त्यांनी ते मला दाखवले. अशा या ऋ षितुल्य महान कलाकाराला पुढे विस्मृतीच्या विकाराने घेरले. एके दिवशी ते फिरावयास गेले ते दोन दिवस परत घरी आलेच नाहीत. नंतर काही दिवसांनी त्यांच्या निधनाची वार्ता कानावर आली आणि मन सुन्न झाले.

* * *

एकदा दुपारी मी ट्रेनने घरी जात असताना गाडीमध्ये पं. गजाननराव जोशी त्याच डब्यात होते. आमच्या थोडय़ा गप्पा झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी येण्यास सांगितले. दर रविवारी संध्याकाळी ते रियाजाला बसत असत, त्याचे ते निमंत्रण होते. मी आणि माझी पत्नी आम्ही रविवारी त्यांच्याकडे गेलो. इतर कोणी नव्हते. त्यांचे वडील पं. अंतुबुवा समोर बसले होते. ती संध्याकाळ सुरांनी न्हाऊन निघाली. आणि त्यानंतर पुढे अनेक रविवारच्या संध्याकाळ अशाच सूरमयी बनल्या. असेच एकदा मला त्यांचे आमंत्रण आले आणि मी टेपरेकॉर्डर घेऊन त्यांच्या घरी गेलो. छोटय़ाशा हॉलमध्ये मैफल जमली होती. बुवा व्हायोलिनवर सज्ज होते. त्यांच्या समोर नव्वदीच्या पुढे असलेले खाँसाहेब तिरखवॉ पहुडले होते. तबल्यावर बुवांचे चिरंजीव नारायण होते. बुवा खाँसाहेबांना एखाद्या सिंहाला जसे पिंजऱ्यात डिवचतात तसे सुरांनी निरनिराळ्या हरकती घेऊन डिवचत होते. अखेर खाँसाहेब उठले आणि त्यांनी नारायणाला बाजूला करून मैफलीचा ताबा घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे मैफल अशी काही रंगली की विचारू नका. खाँसाहेबांचे वैशिष्टय़ असे की, त्यांच्या फक्त मनगटाच्या पुढच्या हाताच्या- म्हणजे बोटांच्या हालचाली व्हायच्या. बाकी अंगविक्षेप काही नाहीत. याचे कारण लहानपणी तबला शिकताना मनगटाला लोखंडी कडे बांधले जायचे. त्यामुळे फक्त मनगटाच्या पुढच्याच हालचाली व्हायच्या. एक राग आणि बालगंधर्वाचे ‘नरवर कृष्णासमान’ हे पद आळवून मैफल समाप्त झाली. इतका मातब्बर वादक सारखा म्हणत होता, की- ‘हे पद नारायणरावांची नक्कल आहे. ते नाहीत.’ किती विनम्र भावना! खाँसाहेबांना लवकर जायचं असल्यामुळे एवढीच मैफल झाली. पण इतक्या वर्षांनी अजूनही ती स्मरणात ताजी आहे. मैफल किती वेळ झाली, यापेक्षा ती कशी झाली, याला जास्त महत्त्व आहे. अशीच एक मैफल पुण्यात ७०-७५ वर्षांपूर्वी ऐकायला मिळाली. पं. रविशंकर आणि खाँसाहेब अहमदजान तिरखवाँसाहेबांची. मैफल समाप्त झाल्यावर दोघांनी खूश होऊन परस्परांना अशी काही मिठी मारली, की अजूनही आठवण झाली की मन आनंदून जातं. एकदा शेख दाऊद यांच्याबरोबर पं. गजाननबुवांची झालेली मैफलही अशीच अविस्मरणीय होती.

दसरा संपला की औंध संस्थानातील संगीत महोत्सवाचे वेध लागतात. या दिवसांत साऱ्या सृष्टीने हिरवा शालू परिधान केलेला असतो. हवेत सुखद गारवा असतो. अशा वेळी प्रवास करावयास मला खूप आवडतं. औंधला पोहोचल्यावर बुवा, त्यांचे चिरंजीव मनोहर ऊर्फ बच्चू, नारायण आणि मधू अगत्याने स्वागत करतात. एखाद्या लग्नघरासारखी लगबग चालू असते. प्रवासानंतर रात्रीचे साधे, पण रुचकर जेवण मनाला तरतरी देते. जरासे आडवे व्हावे असे वाटत असताना तबला-पेटीचे स्वर घुमू लागतात. काहीजण आपला घसा साफ करू लागतात. दरवर्षी पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांसारखे काही जुने जाणकार एका खोलीत गप्पांची मैफल रंगवत होते. जुन्या आठवणींत रमून गेले होते. गत-मैफलींची उजळणी होत होती. या ठिकाणीच पं. सुरेश तळवलकर यांच्याशी माझी मैत्री घट्ट झाली. उल्हास व अरुण कशाळकर यांना तर मी ते दोघं पं. गजाननरावांकडे शिकण्याच्या आधीपासूनच चांगलं ओळखत होतो. आमची चांगली मैत्री होती. अनेक मैफली त्यांच्यासोबत ऐकल्या आहेत. राजाभाऊ कोकजे यांची मैफल डोंबिवलीत आम्ही एकत्र ऐकली होती. राजाभाऊ अत्यंत साधा माणूस. हा गृहस्थ इतकी सुंदर मैफल सादर करेल असं मुळीच वाटलं नव्हतं. काच्या मारलेलं धोतर, साधा शर्ट व काळी टोपी असा माणूस इतक्या उत्तम ठुमऱ्या सादर करील यावर त्यावेळी विश्वास बसला नाही. तेव्हापासून उल्हास, अरुण कशाळकर आम्ही जवळ आलो. पं. गजाननरावांचे आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद यांनी औंध संस्थानात  ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी बुवांनी दत्त मंदिर बांधले आणि त्या मंदिरात दरवर्षी ते संगीतोत्सव करतात. पुढे तेथील आमदारांच्या सहकार्याने एक सभागृह बांधले गेले. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांचे अनेक गायक येथे हजेरी लावतात. या संगीत महोत्सवाला पन्नास र्वष झाली त्यानिमित्त रसिकराज पु. ल. देशपांडे सपत्निक आले होते. त्यामुळे या उत्सवाला खूप मजा आली. पु. ल. अगदी बैठक मारून सभागृहात दाद देत होते.

इथल्या टेकडीवर यमाईचे देऊळ आहे. टेकडीच्या मध्यापर्यंत सुरेख पायऱ्या बांधलेल्या आहेत. टेकडीच्या मध्यावर चित्रसंग्रहालय आहे. इथले राजेसाहेब गुणग्राही आणि स्वत: उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांनी भारतीय तसेच पाश्चात्य कलाकारांच्या अनेक कलाकृती तेथे संग्रहित केलेल्या आहेत. त्यात राजा रविवर्मा, बाबूराव पेन्टर, धुरंधर आदी अनेक भारतीय चित्रकारांच्या कलाकृती तसेच पाश्चात्य चित्रकारांच्या उत्तम कलाकृती सुंदर चौकटींसह लावलेल्या आहेत. वरच्या दालनात भारतीय शैलीतल्या असंख्य कलाकृती आहेत. कांगडा शैलीतील अनेक चित्रं ऋ तूंवर आधारित आहेत. दुसऱ्या दालनात लाकडावर रामायण कोरलेलं आहे. या कलाकृती स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या आहेत. हे सगळं बघून आपण या संग्रहालयाला भेट दिल्याचं समाधान वाटतं. एका बंदिस्त दालनात महाराजांच्या संग्रही असलेली हिरे, माणके, पाचू अशी अनमोल रत्ने ठेवलेली आहेत. मधल्या मोकळ्या जागेत निरनिराळ्या देशांतील पुतळे पाहावयास मिळतात. हे सर्व वैभव बघण्यासाठी आवर्जून या ठिकाणाला भेट देणं आवश्यक आहे. राजे किती रसिक होते हे यावरून कळते. राजवाडय़ाशेजारी यमाईचे देऊळ आहे. त्यात राजेसाहेबांनी स्वत: काढलेली पौराणिक चित्रे आहेत. राजेसाहेबांना साष्टांग नमस्काराचे अत्यंत वेड होते. त्यांच्या आश्रयाला असलेल्या विद्यार्थ्यांनी दररोज साष्टांग नमस्कार घातलेच पाहिजेत; त्याशिवाय जेवण मिळणार नाही, असा त्यांचा हुकूम होता. अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटक त्यावरूनच लिहिलं.

येथील शाळेत ग. दि. माडगूळकर, सानेगुरुजी, व्यंकटेश माडगूळकर वगैरेंनी शिक्षण घेतले होते. त्यांची नावे शाळेतील एका बोर्डावर आहेत. दोन दिवसाचा संगीत सोहळा संपून एक-एक जण आपापल्या मार्गी लागला. मीही एकटाच घाईत एका एसटीत चढलो. पुण्याला जायचे होते. एसटी एके ठिकाणी बदलायची असते हे मला माहीत नव्हते. ते स्थानक मागे पडले तेव्हा कंडक्टरने एसटी थांबवली. तो स्वत: खाली उतरला. तेवढय़ात समोरून एक एसटी आली. तिला त्याने थांबवले आणि मला त्याने तीत बसवून दिले. इतकी आपुलकी तिथल्या माणसांत या उत्सवाला येणाऱ्या रसिकांप्रति असते.

एखाद्या गवयाची मुलाखत घ्यावी तर ती अशोक रानडे यांनीच. त्यांनी घेतलेली पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची मुलाखत अशीच लक्षात राहण्याजोगी आहे. रानडे प्रश्न असे छान विचारतात! तसेच एखाद्याकडून उत्तर कसे काढून घ्यायचे, हे त्यांनाच जमते. पं. गजाननरावांच्या पंच्याहत्तरीनिमित्तचे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते.

संगीत ऐकण्यासाठी आणि त्याचे जतन करून ठेवण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडून देणारे दोन रसिक माझ्या संपर्कात आले. एक होते श्री. काळे. ते चेंबूरला राहात असत. ऑफिसमधून मी संध्याकाळी चेंबूरला जात असे. ते उत्तम रेकॉर्डिग करत असत. बरेच गायक त्यांनाच रेकॉर्डिगसाठी पाचारण करीत असत.  आमची रेकॉर्ड्सची देवाणघेवाण होत असे. तेथून मी डोंबिवलीला जात असे. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. पुढे मीही पुण्यात स्थायिक झाल्यावर आमच्या वारंवार भेटी होत असत. आठवडय़ातून एकदा वहिनींच्या हातची गरम कॉफी व जोडीला एखादी ध्वनिमुद्रित मैफल ऐकण्यात सकाळ सूरमयी होऊन जायची. दुसरे मित्र श्री. करमरकर यांच्याकडेही माझ्या अनेक रात्री रेकॉर्डिग ऐकण्यात गेल्या होत्या. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोन्ही मित्र सोडून गेल्यामुळे त्यांच्या आता आठवणीच फक्त सोबत करताहेत.

चित्रकार ग. ना. जाधव, प्र. ग. शिरुर आणि बसवंत यांनी एक काळ गाजवला होता. आपल्या चित्रांनी ‘किर्लोस्कर’ मासिकाची शान त्यांनी वाढवली होती. त्यांची चित्रे बघण्यासाठी रसिक ‘किलरेस्कर’ मासिकाची प्रतीक्षा करीत असत.

प्र. ग. शिरुर ‘टाइम्स’मध्ये कला विभागात होते. त्यांनी काढलेले जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे एकत्र सुहास्य मुद्रेतील पेंटिंग अतिशय गाजले होते. या श्रेष्ठ चित्रकारास टाइम्सच्या कलाविभागाच्या प्रमुखपदाला केवळ इंग्लिश न येण्यामुळे मुकावे लागले याचे त्यांच्याइतकेच मलाही वाईट वाटले. त्यांचा फार थोडा सहवास मला मिळाला. एकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांची पेंन्टिंग्ज बघितली. मी डोंबिवलीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची मनीषा व्यक्त केली आणि तशी विनंती केली. त्यांनी परवानगी दिली. माझ्या एका मित्राच्या साहाय्याने मी त्यांची चित्रे डोंबिवलीत आणली. शिरुर आणि त्यांच्या पत्नी दोघेही डोंबिवलीत  आले. आम्हाला सदैव साहाय्य करणारे लेखक शं. ना. नवरे यांनी आनंदाने अध्यक्षस्थान स्वीकारले. शं. ना. ना त्या कलाकृती बघून खूपच आनंद झाला. रसिकांनीही या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला.

व्यंकटेश माडगूळकरांबरोबर गप्पा मारण्यात काही औरच मजा येत असे. त्यांच्या अभ्यासिकेत गप्पा मारताना त्यांनी काढलेली पक्ष्यांची चित्रे ते दाखवीत असत. एकदा सकाळी त्यांच्या बंगल्याच्या ओसरीवर चहाचे घुटके घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्या सुमारास मी त्यांचे स्केच काढले आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे ठरवले. चित्रे नीट सांभाळण्यास त्यांनी सांगितले. घरच्या अडचणीमुळे ते स्वत: मात्र या प्रदर्शनास हजर राहू शकले नाहीत. माणसांना जर सांगितले तर ती एखाद् वेळेस स्थिर उभी राहू शकतील, पण पक्षी किंवा प्राण्यांना आपण तसं सांगू शकत नाही. तेव्हा त्यांची रेखाटने करताना चपळता दाखवूनच स्केच करावे लागते.

* * *

‘आतला आवाज’ याबद्दल मी नुसते ऐकून होतो. पण त्याची प्रचीती मला एकदा प्रत्यक्षच आली. त्याचे असे झाले: त्या दिवशी सकाळपासूनच मला वाटत होते की आज आपल्या घरी पं. भीमसेन जोशी यांनी यावे. त्या दिवशी त्यांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. दुपारी मी सायकल बाहेर काढली आणि टिळक नगरच्या दिशेने निघालो होतो. तर काय आश्चर्य! भीमसेनजींची गाडी अचानक समोरून आली. माझ्यापाशी थांबली. त्यांनी एक पत्ता विचारला. मी आजूबाजूला जराशी चौकशी केली, पण पत्ता काही मिळाला नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली. त्यांनी त्वरित होकार दिला. मग काय, माझी सायकल पुढे आणि त्यांची गाडी मागे- असे आम्ही आमच्या घरी आलो. त्यांना पाहून पत्नीला आश्चर्याचा धक्काच बसला. ते आंब्याचे दिवस असल्यामुळे भीमसेनजींचे यथोचित स्वागत झाले. नंतर त्यांच्याच गाडीतून आम्ही मैफलीला गेलो. कार्यक्रमात त्यांनी ‘माझे मित्र’ असा माझा उल्लेख केल्यामुळे मला आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.

भीमसेनजींच्या निधनाची बातमी टीव्हीवर बघताना मला अश्रू अनावर झाले तेव्हा माझ्या मुलाने मला सावरले. पुण्यात असताना मी त्यांचे एक व्यक्तिचित्र काढले होते. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. सोबत दत्ता मारुलकर होते.

* * *

माझ्या आयुष्यातील दुसरा आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे बालगंधर्व आमच्या घरी येऊन गेले तो. दोन दिवस त्यांची सेवा करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. एकदा मी त्यांचं ‘एकच प्याला’ हे नाटक दादरला बघितलं होतं. उतारवयातसुद्धा त्यांच्या अभिनयाचा प्रभाव चकित करणारा होता. सुधाकरने दारू सोडली त्यावेळचा  त्यांचा अभिनय, तसेच बाळाला खेळवत गाणं म्हणतानाचा अभिनय आज सत्तर वर्षांनंतरही मनात कोरला गेलेला आहे. वार्धक्यातसुद्धा पोशाखाच्या बाबतीत ते अतिशय चोखंदळ होते. सुरवार, कोट वगैरे घालून ते बैठक मारून भजनासाठी बसले. मधे खंड न घेता अखंड भजनाच्या झऱ्यामध्ये त्यांनी रसिकांना चिंब न्हाऊन काढले.

आणखी एक वंदनीय दांपत्य डोंबिवलीत मला भेटले, ते म्हणजे लीलाबाई करंबळेकर व जयराम करंबळेकर. ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला होता. तेव्हापासून सलग पंचवीस र्वष दिवाळीच्या पहाटे संगीताच्या मैफलीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यामुळे ‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना प्रथम या जोडप्याने सुरू केली असे म्हणायला पाहिजे. या मैफलीत पं. सी. आर. व्यास, पं. जितेन्द्र अभिषेकी, माणिक वर्मा, प्रभाकर कारेकर असे अनेक दिग्गज हजेरी लावत असत. सलग पंचवीस वर्षे आमच्या दिवाळी पहाट या दाम्पत्यामुळे सूरमयी झाल्या.

दरवर्षी दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये पं. पलुस्कर पुण्यतिथी साजरी होत असे. त्यामध्ये मल्लिकार्जुन मन्सूर, अमिरखाँ, बडे गुलाम अली, नारायणराव व्यास आणि पलुस्करांचे चिरंजीव डी. व्ही. पलुस्कर ऐकावयास मिळाले. ही मैफल अशावेळी संपायची की शेवटची गाडी निघून गेलेली असे. मग पहाटेच्या पहिल्या गाडीपर्यंत प्लॅटफॉर्मवर आम्ही वेळ काढत असू. सूरांचा प्रभावच इतका असायचा, की याचे काहीच वाटत नसे.

* * *

एखादी रविवार सकाळ अशी असे, की श्रीकांत टोळ यांच्या विकास वाचनालयासमोर एकेक जण जमू लागत. एका हातात छोटीशी बॅग घेऊन वाजपेयी सर येत. डोंबिवलीतील एका बँकेचे मॅनेजर पावगी येत. गांधीटोपी, धोतर, नेहरू शर्ट आणि जाकीट घातलेले ब्रrो येत. केव्हातरी डॉ. उल्हास कोल्हटकर येत. केसावरून हात फिरवीत राजाभाऊ पाटकर येत. सर्वत्र उशिरा येणारे आबासाहेब पटवारी येत. मग गप्पा आणि हशांना ऊत येई. सोबत टपरीवरचा चहा. मग काय! एकमेकांची चेष्टामस्करी करण्यात वेळ कसा जात असे, काही विचारू नका. येथेच सुधीर फडके यांची पहिली भेट झाली. त्यांना भेटून अतिशय आनंद  झाला. मी त्यांच्या आवाजावर, त्यांच्या संगीताच्या चालींवर अत्यंत फिदा होतो. माझ्या अत्यंत आवडत्या गायकाची माझी ओळख झाली यापरते आणखी भाग्य काय असेल! विकास वाचनालयात शंकर पाटील यांचे व्यंगचित्र मी लावले होते. शंकरराव एकदा तेथे आले असताना त्यांच्या ते पाहण्यात आले. त्यांना ते खूप आवडले. म्हणून मग त्यांनी ते चित्र त्यांच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी घेण्यासाठी प्रकाशकाला आग्रह केला. पुण्यात कुमार गंधर्व यांची ओळख वामनराव देशपांडे यांच्या घरी झाली होती.

टोळ यांच्या डोक्यात सतत काहीतरी भन्नाट कल्पना येत असत. आणि त्या अमलात येईपर्यंत त्यांना चैन पडत नसे. त्यांनी डॉ. उल्हास कोल्हटकरांमधील लेखनगुण ओळखून त्यांना लिहिते केले. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एकदा चित्रकारांची एखादी संस्था असावी असे त्यांच्या मनात आले. लगेचच एक बैठक घेऊन त्यांनी संस्था स्थापन केली. माझ्या मनात नव्हते तरीही मला तिचा अध्यक्ष केले. सार्वजनिक कार्याचा मला तोवर काहीच अनुभव नव्हता. पण माझ्या एका शब्दावर अनेक नामवंत व्यक्ती या संस्थेत आल्या आणि त्यांनी अप्रतिम प्रात्यक्षिके सादर केली. शंकरराव पळशीकर हे माझे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रोफेसर होते. मी त्यांना त्यांच्या घरी भेटलो. तेही येण्यास राजी झाले. सुहास बहुलकरांची माझी कधी प्रत्यक्ष गाठभेट नव्हती, पण प्रथम भेटीतच त्यांनी होकार दिला. रवि परांजपे हे माझ्याबरोबर टाइम्समध्ये होते. ते पण आनंदाने तयार झाले. शंतनू माळी, प्रसिद्ध सुलेखनकार सत्यनारायण आणि मी आम्ही तिघे नेहमी एकत्रच असायचो. त्यामुळे हे दोघे आमच्या संस्थेत येऊन त्यांनी अप्रतिम प्रात्यक्षिके करून दाखविली. मोहन वाघ यांची माझी चांगली ओळख होती. त्यांच्या नवीन नाटकाचे दोन पास ते आवर्जून माझ्यासाठी राखून ठेवत असत. त्यांना भेटल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. त्यांची मुलाखत मोहन मुंगी यांनी घेतली. विकास सबनीस यांना मी पूर्वी कधी भेटलो नव्हतो. त्यांना मी कार्यक्रमाच्या वेळीच स्टेशनवर भेटलो आणि त्यांना हॉलवर घेऊन आलो.  त्यांनी व्यंगचित्रे कशी काढावीत हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. वसंत सरवटे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दोन दिवस होते. शेवटच्या दिवशी विजय तेंडुलकरांनी वसंतरावांची मुलाखत घेतली. या फार छान आठवणी आजही मनाला सुखावत असतात.

वसंतराव देशपांडे यांचे साडू बंडोपंत जोशी माझ्या चांगल्या परिचयाचे.  त्यांच्या घरी वसंतराव यायचे तेव्हा भेट व्हायची. एका संध्याकाळी त्यांनी मारवा गायलेला अजूनही चांगलाच लक्षात आहे. अझमत हुसेन खाँ यांची बैठकही कायमची स्मृतीमध्ये आहे. त्यांची वज्रासन घालून आणि हातात सिगरेट अशी मूर्ती अजूनही स्मरणात आहे.

किशोरवयापासूनच दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा मी भक्त होतो. ‘दीपावली’च्या दिवाळी अंकाची मी आतुरतेने वाट पाहत असे. तसेच ‘सत्यकथे’च्या  अंकाचीसुद्धा मी वाट पाहत असे. दलालांच्या चित्रांत प्रयोगशीलता असे. ‘सत्यकथे’तील ‘गारंबीच्या बापू’ची त्यांची चित्रे निराळ्याच शैलीतली होती. त्यांना भेटण्याची संधी एकदा मिळाली. गोपाळ कृष्ण गोखले यांचे चित्र  त्यांना देण्यासाठी माझ्या बंधूंनी मला दिले. मी आनंदाने त्यांच्याकडे गेलो. अत्यंत भक्तिभावाने मी त्यांच्या स्टुडियोत प्रवेश केला. प्रथम परब भेटले आणि नंतर माझ्या या गुरूंचे दर्शन झाले. पुढे मी त्यांच्याकडे नियमितपणे जात राहिलो. त्यांच्याशी बोलताना ते आपले काम चालूच ठेवत असत. एकदा त्यांनी कागदावर गाय आणि घोडा यांचे पाय काढून दाखवले. एकदा मी माझ्या मैत्रिणीला त्यांच्याकडे घेऊन गेलो. आणि काय आश्चर्य! ‘सत्यकथे’च्या मुखपृष्ठावर पुढच्या महिन्यात तिचे चित्र बघावयास मिळाले. त्यांनी दरवर्षी ‘दीपावली’चा अंक माझ्यासाठी राखून ठेवलेला असे.

…तर अशा या आठवणी! अचानक दाटून आल्या आणि एकापाठोपाठ बरसत गेल्या. अन् पहिल्या पावसाचा सुखद गारवा मनाला देऊन गेल्या.

मुकुंद तळवलकर

(सर्व रेखाटने : मुकुंद तळवलकर)

24
First Published on: March 26, 2018 3:56 pm
Just Now!
X