लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटक करण्याची आणि बघण्याची परंपरा आमच्या घरातच आहे. नाटकवाले अवतीभवती असण्याची मला सवय होतीच. नाटक कसं बघावं, याचे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच होत होते. सामान्य प्रेक्षक म्हणून मी नाटकांचा आस्वाद घेतला होता. मी आजही जेव्हा नाटक बघायला जातो तेव्हा आपण नाटय़-दिग्दर्शक आहोत हे विसरून जातो. त्यामुळे मला समरसून नाटय़ानुभव घेता येतो.

मी माझ्या नकळत्या वयापासून आजपर्यंत असंख्य नाटकं पाहिली आहेत. पूर्वी पाहिलेल्या नाटकांपैकी अनेक नाटकं आजही आठवतात. काही त्यातल्या प्रसंगांसाठी, तर काही संपूर्ण नाटय़परिणामासाठी. काही नाटकं प्रयोगात घडलेल्या नाटय़बाह्य़ प्रसंगांसाठी, तर काही त्यातल्या अभिनयासाठी. मला अत्यंत आवडलेल्या भूमिका आणि ते करणारे अभिनेते यांच्याविषयी कुणाशी तरी संवाद साधावा आणि त्यांना आपल्या अनुभवात सामील करून घ्यावंसं वाटत होतं, म्हणून हा लेखनप्रपंच.

‘पती गेले ग काठेवाडी’मधील दत्ता भट

‘पती गेले ग काठेवाडी’ हे व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेलं नाटक. मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती आणि सुधा करमरकरांचं दिग्दर्शन. या नाटकाचा प्रयोग इतका परिणामकारक झाला होता, की आजही मला तो आठवतो. माडगूळकरांनी या नाटकात ‘स्त्रीचं चातुर्य आणि पुरुषाचा परनारीचा नाद’ या विषयावर जे भाष्य केलंय ते लाजवाब आहे. पेशवाईच्या काळातील एका काल्पनिक कथेवर हे नाटक बेतलेलं आहे. या नाटकात दत्ता भट या समर्थ अभिनेत्याने साकारलेला जोरावरसिंग हा काठेवाडी राजा मी विसरूच शकत नाही.

महाराष्ट्रातून सर्जेराव नावाचा सुभेदार पेशव्यांच्या हुकमावरून काठेवाडात जोरावरसिंग या मांडलिक राजाकडे चौथाई वसूल करण्यासाठी जातो. जाताना त्याची बायको त्याच्या पगडीवर बकुळीच्या फुलांचा एक तुरा लावते. आणि सांगते, ‘हा तुरा माझ्या पातिव्रत्याची खूण आहे. तो कधीच सुकणार नाही.’ त्या तुऱ्याचा ताजेपणा बघून जोरावरसिंग अस्वस्थ व्हायला लागतो आणि सर्जेरावाच्या पत्नीला वश करण्यासाठी आपल्या दिवाणजीला महाराष्ट्रात पाठवतो. पुढे एक प्रेमकहाणी उलगडत जाते.. सर्जेरावच्या पत्नीची दासी आणि दिवाणजींची.

‘पती गेले ग काठेवाडी’ हे नाटक मला त्यातील गाण्यांसकट तोंडपाठ झालं होतं. घरी मी त्याचा सबंध एकपात्री प्रयोग करीत असे. लोककला आणि पारंपरिक संगीत नाटक यांचा उत्तम संगम या नाटकाच्या लेखनात आणि सादरीकरणात झाला होता. जोरावरसिंगची व्यक्तिरेखा या नाटकात अतिशय महत्त्वाची. दत्ता भटांनी जोरावरसिंग साक्षात् साकारला होता. खरंच, असा एखादा राजा असेल तर तो भटांसारखाच असेल असं मला वाटायचं. काठेवाडी माहोल नाटकात उत्तम उभा केला होता. जोरावरसिंगचा दरबार सूचक नेपथ्यातून साकारला होता. त्याचबरोबर दर्या छोरू आणि पार्टी येऊन अप्रतिम दांडिया नाचून जायचे. या नाचानंतर सर्जेरावांचा जोरावरसिंगच्या दरबारात प्रवेश होतो. दोघांची गळाभेट होते.  कमलाकर सारंग- सर्जेराव. त्याचं रांगडं व्यक्तिमत्त्व. आणि समोर काहीसे ठेंगणे दत्ता भट. या भेटीत जोरावरसिंगच्या नाकात बकुळीच्या फुलांचा वास शिरतो आणि सर्जेराव गेल्यावर तो आपल्या दिवाणजीशी- अरविंद देशपांडेंशी गुफ्तगू करतो. दोघांचा अभिनय लाजवाब. मला अजून दत्ता भटांची काठेवाडी वेशभूषा आठवते. किंचित वाकडी मान, थोडे पाडलेले खांदे आणि धिमी चाल. ती धिमी चाल उत्तम पद्धतीने वापरायचे दत्ता भट. विशेषत: कट रचण्याच्या प्रसंगांमध्ये ही चाल आणि वाकडी मान खूपच परिणामकारक वाटे. भटांनी बोलण्याची काठेवाडी ढब छान उचलली होती. सर्जेरावाच्या पगडीवरचा बकुळीच्या फुलांचा तुरा सुकावा या इच्छेने अस्वस्थ होणारा जोरावरसिंग आणि एखादी कल्पना सुचल्यावर स्वत:वरच खूश होणारा जोरावरसिंग ते बोलण्यातून आणि शारीरभाषेतून अप्रतिम उभा करायचे. सर्जेराव दरबाराच्या जवळ पोहोचला की आधी त्याच्या तुऱ्याचा गंध दरवळायचा. दत्ता भट ज्या पद्धतीने नाकपुडय़ा फुगवून तो वास घ्यायचे आणि म्हणायचे, ‘‘दिवाणजी, सर्जेराव शिंदे आला वाटते. आम्हाला वास येते.’’ केवळ अप्रतिम!

नाटकात एक प्रसंग असा होता की, जोरावरसिंग दिवाणजीला सर्जेरावाच्या पत्नीला भेटायला पाठवणार असतो. आणि जाण्यापूर्वी त्याला काही धोक्याच्या सूचना देतो. दत्ता भट हा प्रसंग मस्त खुलवायचे. अर्थातच अरविंद देशपांडेंचीही त्यांना उत्तम साथ असे. एका सुलतानाची गोष्ट- बायकांचा नाद असलेल्या. त्या सुलतानाकडे मेहमूद नावाचा सोळा वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा कामाला असतो. बायकांना निरोप देण्यासाठी त्याला नेमलेला असतो. तो सुलतानाचा निरोप घेऊन बायकांकडे जातो. जाम धावपळ करतो. ही गोष्ट सांगून झाल्यावर जोरावरसिंग दिवाणजीला विचारतो, ‘‘पुढे काय झाला असेल?’’ दिवाणजी म्हणतो, ‘‘तो सुलतान मेला असेल.’’ जोरावर म्हणतो, ‘‘अरे, नाही. तो सुलतान पुरा त्रेण्णव वर्स जगला. आणि सोळा वर्साचा चुणचुणीत पोरगा मेहमूद दोडादोडीमधीच मेला. ऐनू तात्पर्य सूं दिवाणजी, हजार बायका करणारेला धोका नसते, पण बायकाच्या मागे धावणारा दोडादोडीमधीच मरते. ध्यान राखजो.’’ भट अत्यंत मिश्कीलपणे ही गोष्ट सांगायचे. प्रेक्षागृहात प्रचंड हशा पिकायचा. या प्रवेशात विरामांचा विनोदासाठी छान वापर केला होता.

मला दत्ता भटांचं हे काम आवडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण- या प्रकारचं काम करणं ही त्यांची प्रकृती नव्हे. गंभीर कामं करण्यात ते माहीर होते. त्यांच्या आवाजाची जातकुळीही गंभीर भूमिकांना साजेशीच होती. त्यामुळे आवाज, शारीरभाषा यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करून त्यांनी जोरावरसिंग उभा केला. चेहऱ्यावरील  हावभाव- कधी लाचारी, राग, असूया, मिश्कीलपणा- ही त्यांची खासियत होती. माझ्या दृष्टीने प्रेमात पडावं असा मिश्कील, पण खलप्रवृत्त जोरावरसिंग दत्ता भटांनी आजन्म लक्षात राहील असा अभिनित केला होता.

‘तुझे आहे तुजपाशी’तले दाजी भाटवडेकर

काही काही नाटकं त्या- त्या काळात बघायला मिळणं हे भाग्यच. त्यातलं एक पु. ल. देशपांडेंचं ‘तुझे आहे तुजपाशी’! मी त्याचा साहित्य संघाने केलेला उत्तम प्रयोग पाहिला होता. मी तेव्हा वयाने खूप लहान असलो तरी तो प्रयोग पाहताना आलेला मजा आजही तितकाच ताजा आहे मनात. त्यातला दाजी भाटवडेकरांचा काकाजी बघणं म्हणजे परमोच्च आनंद होता. दाजी अगदी वेशभूषेपासूनच काकाजी वाटायला लागायचे. सुरवार-कुडता, पांघरलेली शाल आणि गुडगुडी. ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये काकाजी आणि आचार्य यांच्या विचारसरणीतील संघर्ष मांडला आहे. विनोद हा त्याचा स्थायीभाव आहे. तरीही ते पूर्णपणे विनोदी नाटक नाही.

श्याम, गीता, उषा आणि सतीश या चार तरुणांशी संवाद साधणारे काकाजी. वासूअण्णा, जगन ड्रायव्हर आणि भिकू माळी यांच्याशी गमतीशीर पद्धतीने तात्त्विक चर्चा करणारे काकाजी. तसेच आचार्याना समजून घेऊन स्वत:चं जगण्याचं तत्त्व गंभीरपणे मांडणारे काकाजी. गाणे आणि शिकारीचा शौक असणारे काकाजी. दाजींनी काकाजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या या सर्व छटा आपल्या अभिनयाने अधोरेखित केल्या. जगण्यातला आनंद पूर्णपणे उपभोगणारा आणि त्या आनंदात इतरांनाही सामावून घेणारा काकाजी दाजींनी अक्षरश: जिवंत केला होता. दाजी अत्यंत हुशार अभिनेते असल्यामुळे काकाजी उभा करताना डोळ्यांचा वापर त्यांनी अतिशय परिणामकारकरीत्या केला होता.

या नाटकातलं जे कुटुंब आहे ते मध्य प्रदेशात राहणारं आहे. त्यामुळे नाटकात हिंदी भाषेचा आणि शेरोशायरीचा वापर होतो. दाजींनी भाषेचा लहेजा मस्त पकडला होता. काकाजींच्या भूमिकेतील सर्वात अवघड भाग म्हणजे आचार्याच्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहणे.. पण कुठेही आचार्याचा अवमान होऊ न देता! इथे पु. ल. काकाजींच्या बाजूला थोडेसे झुकलेले वाटतात. त्यामुळे अभिनेत्यावर खूप मोठी जबाबदारी होती. दाजींनी अभिनयात हा समतोल राखला होता. आचार्याची टिंगल होऊ न देता काकाजींचा विचार दाजींच्या अभिनयामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.

दाजींची मी बरीच कामं पाहिली होती. त्यांच्याकडे विनोदाचं अंग आहे हे सिद्ध झालेलंच होतं. पण काकाजी या व्यक्तिरेखेत विनोद अधिक अधोरेखित झाला असता तर ती सवंग वाटली असती. दाजींनी हे ध्यानात घेऊनच काकाजी उभा केला होता. देवासकरांच्या वाडय़ात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं वर्णन करण्याचा प्रसंग. शिकारीची धमाल आणि त्यातून निर्माण होणारे कठीण प्रसंग. दाजी हे प्रवेश परिणामकारकरीत्या सादर करायचे. शिकारीच्या वेळी काळवीट मारला जातो तो प्रसंग तर ते एका ठिकाणी बसून केवळ बोलून डोळ्यासमोर उभा करीत. इंदुरी भाषेचा लहेजा वापरून! श्याम, गीता यांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रवेश.. वासूअण्णा, जगन ड्रायव्हर, भिकू माळी हे तिघेजण भांग पिऊन येतात आणि ‘स्थितप्रज्ञ कसा दिसतो?’ असं काकाजींना विचारतात तो प्रसंग.. उषाताईला समजावून सांगण्याचा प्रसंग.. श्यामला बेशक मन जिंकायला सांगणारा, ‘पण ते कुठे बसलंय, याचा आधी शोध घेशील?’ हे विचारणारा परिच्छेद दाजी इतका अप्रतिम करायचे, की काकाजी पटायला लागायचा. आचार्याबरोबरच्या प्रसंगात आचार्याची बाजू ऐकणारे काकाजी दाजी तन्मयतेने करायचे. नाटकातील सर्व पात्रांचे स्वभाव बदलतात; पण काकाजींचा नाही. नाटकाचं शेवटचं वाक्य दाजी इतकं अप्रतिम म्हणायचे, ‘गीता, न पेलणाऱ्या पट्टीत गाऊ नये. नाहीतर सगळं आयुष्यच बेसूर होऊन जातं.’

दाजी भाटवडेकरांचा काकाजी खूप गाजला. मी तरी त्यांच्यानंतर एकही उत्तम ‘काकाजी’ पाहिला नाही. दाजींचं काम उत्तम होण्याची कारणं म्हणजे ते त्या भूमिकेत शोभले. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतंच; शिवाय स्वत: पु. ल. देशपांडेंचं दिग्दर्शन. ही भूमिका साकारताना म्हणे दाजींनी दोन माणसं डोळ्यासमोर ठेवली होती. एक मध्य प्रदेशातील रामूभैया दाते आणि दुसरे कर्नाटकातील किरकिरे.. असं दाजी स्वत:च सांगत. पण हे सगळं जरी मान्य केलं तरी मला असं वाटतं, की दाजींचा ‘काकाजी’ ग्रेट होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते स्वत: ही भूमिका एन्जॉय करत असत. त्यामुळेच त्यांच्यात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होत असे. या चैतन्यामुळेच दाजींचा ‘काकाजी’ जिवंत होत असे. दाजींसाठी मी ‘तुझे आहे तुजपाशी’ अनेक वेळा पाहून एन्जॉय केलं आहे.

‘नटसम्राट’.. डॉ. श्रीराम लागू

मराठी रंगभूमीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं नाटक- ‘नटसम्राट’! प्रत्येक अभिनेत्याला करावीशी वाटणारी भूमिका म्हणजे ‘नटसम्राट गणपतराव बेलवलकर’! वि. वा. शिरवाडकरांचं हे नाटक. मी त्याचा गोवा हिंदू असोसिएशनच्या मूळ संचातील प्रयोग पाहिला होता. त्यात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी साकारली होती. अविस्मरणीय अभिनयासाठी हे नाटक माझ्या स्मरणात राहिलं होतं. म्हाताऱ्या माणसांची व्यथा या नाटकात मांडली आहे. माझं हे विधान जरा धाडसीच आहे, पण मला नाटक म्हणून ‘नटसम्राट’ फारसं प्रिय नाही. मला आवडतात ती कवी कुसुमाग्रजांची त्यातली स्वगतं.

‘नटसम्राट’ १९७१ साली रंगभूमीवर आलं. डॉक्टरांनी त्याचे सुरुवातीचे २५० तरी प्रयोग केले. कदाचित थोडेसे जास्तच. त्यानंतर रंगभूमीवर कार्यरत असलेल्या अनेक सक्षम अभिनेत्यांनी आपापल्या पद्धतीने गणपतराव बेलवलकर साकारले; पण माझ्या लक्षात राहिले ते डॉक्टर श्रीराम लागूच. मी लहानपणी शाळेत असताना ‘नटसम्राट’ प्रथम पाहिलं. त्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. त्यानंतर काही वर्षांनी ‘रंगयात्री’ या मधुकर नाईक यांच्या नाटय़संस्थेसाठी त्यांनी माधव वाटवेंच्या दिग्दर्शनाखाली सुहास जोशींबरोबर ‘नटसम्राट’ पुन्हा एकदा केलं. तेदेखील मी पाहिलं. आणि त्यानंतर ‘नटसम्राट’ नाटकाचं शूटिंग केलं तेव्हा ते मीच दिग्दर्शित केलं होतं. त्यावेळी तर मी डॉक्टरांबरोबर प्रत्यक्ष कामच केलं. या सर्व प्रवासात मला गणपतराव बेलवलकर जसा दिसत गेला त्याची नोंद करून ठेवणं मला गरजेचं वाटतं.

मी ‘नटसम्राट’ पाहत असताना मला त्या नाटकाच्या संरचनेत त्रुटी असल्याचं जाणवत होतं. ही व्यथा कुठल्याही म्हाताऱ्या जोडप्याची असू शकते. मग त्यांचं अभिनेता असणं अपरिहार्य आहे का, असे प्रश्न मला पडत होते. तरीही मला डॉ. लागूंचं काम अतिशय परिणामकारक वाटत होतं. माझ्या एक गोष्ट सतत लक्षात येत होती, ती अशी की, हा अभिनेता केवळ त्या व्यक्तिरेखाची व्यथा माझ्यापर्यंत पोहोचवत नाही आहे, तर त्यामागचा विचारही पोहोचवतो आहे. वास्तव आणि नाटकातील स्वगतांतून निर्माण होणारं त्याचं असं वास्तवाच्या पलीकडे जाणारं विश्व यांतील फरक आपल्या अभिनयाने तो अधोरेखित करीत आहे. स्वत:च्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाक्रमांकडे पाहताना त्यांनी जगलेल्या नाटकांतल्या स्वगतांचा वेगळा अन्वयार्थ लागतोय याची जाणीव गणपतराव बेलवलकरांना होते आहे, हे डॉक्टरांच्या अभिनयातून संप्रेषित होत होते. बेलवलकर या व्यक्तिरेखेला डॉक्टरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

नाटकाच्या सुरुवातीला सत्कार स्वीकारणारे, अत्यंत खूश असलेले गणपतराव. आपल्या नाटकीय दुनियेत रममाण गणपतराव. हळूहळू वास्तवाशी सामना करायला लागल्यानंतरचे गणपतराव. आणि आपल्या नाटकीय जाणिवांचा आधार घेऊन वास्तवाशी झगडण्याचा प्रयत्न करणारे गणपतराव. आपल्या मुला-नातवंडांवर निव्र्याज प्रेम करणारे गणपतराव. आपली पत्नी कावेरी- जिला ते ‘सरकार’ म्हणतात- तिच्याशी असलेले मैत्री, आदर आणि प्रेमाचे संबंध जपणारे गणपतराव. नाटकवेडय़ा विठोबाशी संवाद साधणारे गणपतराव. आणि आपल्याशी रक्ताचे नातेसंबंध नसलेल्या बुटपॉलिशवाल्या राजाचे तत्त्वज्ञान समजून घेऊन त्याच्याशी जुळवून घेणारे गणपतराव. डॉक्टरांनी या सर्व अवस्थांमधून जाणारे गणपतराव आपल्या अभिनयाने अक्षरश: जिवंत केले. त्यांचा गणपतराव कुठेच भावनांचं अतिरंजन करत नव्हता, तर विचार अधोरेखित करत होता. म्हणूनच शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ त्यांच्या विचारासकट आमच्यापर्यंत पोहोचला. अन्यथा एक गांजलेला म्हाताराच उभा राहिला असता. पुष्कळ अभिनेते ‘नटसम्राट’ आपल्याला उत्कट भावनाविष्काराची संधी आहे म्हणून करताना दिसतात. पण गणपतराव बेलवलकर या नटसम्राटाचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, हे ते विसरतात. कदाचित त्यामुळेच जी उंची डॉक्टर गाठू शकले, ती इतरांना गाठणं अवघड गेलं असावं. एका बाजूला उत्तम अभिनेता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांवर प्रेम करूनही पदरी निराशा पडलेला म्हातारा- या दोन्हीचा समन्वय साधणे अवघड होते. पण लागूंनी ते आव्हान लीलया पेलले.

डॉक्टरांचं अर्थवाही बोलणं हे त्यांचं प्रमुख अस्त्र होतं. पण ‘नटसम्राट’मध्ये डॉक्टरांनी ज्या पद्धतीने त्यांची शारीरभाषा वापरली होती, ती वाखाणण्यासारखी होती. विशेषत: ते भ्रमिष्ट व्हायला लागलेत असं वाटण्यानंतरची. बुटपॉलिशवाल्या राजाबरोबरच्या प्रवेशातील अस्वस्थता, आधार शोधण्याची धडपड आणि घरची मंडळी जवळ आल्यावर त्यांना ‘दूर व्हा’ असं सांगत ‘या प्रार्थना निर्थक आहेत’ हे त्यांचं स्वगत आणि नंतरचं त्यांचं कोसळणं. आठवण आली तरी अंगावर काटा येतो. डॉक्टर आणि शांताबाई जोगांचा आऊटहाऊसमधला प्रवेशही मनाला चटका लावून जात असे.

लागूंनी ‘नटसम्राट’ उभा करताना अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी केल्या होत्या. मुलांसोबतचे गणपतराव सुरुवातीला आनंदी, उत्साही होते. त्यावेळची शारीरभाषा मोकळीढाकळी. जसजसं नाटक पुढे गेलं, तसतशी त्यांनी शारीरभाषा बदलली. नातीबरोबर वेगळी. विठोबाबरोबर वेगळी. ‘सरकार’बरोबर वेगळी. राजाबरोबर वेगळी. डॉक्टरांचा ‘नटसम्राट’ नाटकात कसं बोलावं, शारीरभाषा कशी वापरावी, आणि मुख्य म्हणजे आपल्या सहकलाकारांचं बोलणं कसं ऐकावं, याचा वस्तुपाठ होता. त्यांचा ‘नटसम्राट’ हा अभिनेत्यांसाठी अभ्यासक्रम आहे.

‘तरुण तुर्क’मधले प्रा. तोरडमल

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि दिग्दर्शित धमाल विनोदी नाटक. या नाटकातली तोरडमलांची प्रो. बारटक्केंची भूमिका म्हणजे विनोदी व्यक्तिरेखा कशी वठवावी याचा वस्तुपाठच. मी त्यांचं काम पाहिलं आणि वेडाच झालो. त्यांच्या प्रेमातच पडलो. मी कुठलंही विनोदी नाटक बघत असलो तरी ते बघताना मला ‘तरुण तुर्क’ आठवतंच. आणि मी नकळत तुलना करायला लागतो. खरं तर हे चुकीचं आहे, पण बऱ्याचदा हे असं होतं. मी साहित्य संघात ‘तरुण तुर्क’ पहिल्यांदा पाहिलं. हाऊसफुल्ल प्रयोग. नाटक इतकं रंगलं, की चार तास चाललं. पण एक क्षणही कंटाळा आला नाही. प्रयोग तर धमाल होताच, पण तोरडमलांचा बारटक्के कमालच होता. विनोदी भूमिका करणं खूप अवघड असतं. स्वत: जबरदस्तीने विनोद न करता केवळ व्यक्तिरेखा गांभीर्याने उभी करून लोकांना हसवणं खूप अवघड आहे. मी काय म्हणतो त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तोरडमलांचा बारटक्के अभ्यासावा.

‘तरुण तुर्क’ हे महाविद्यालयाची पाश्र्वभूमी असलेलं नाटक. कॉलेजकुमारांची धमाल आणि म्हाताऱ्यांच्या प्रेमाचा त्रिकोण या नाटकाच्या केंद्रस्थानी  आहे. हॉस्टेलमधला पहिला प्रवेश झाला. बंडा, प्यारे, कुंदा आणि थत्तेकाका इत्यादी पात्रांची ओळख झाली. आणि दुसऱ्या प्रवेशात कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये देशपांडे मॅडम आणि थत्तेकाका बोलत असताना प्रो. बारटक्केंची एन्ट्री झाली. कोट, शर्ट, तोकडी पँट, फेल्ट हॅट, हिटलरछाप मिशा, गोल काडय़ांचा चष्मा, काखेत छत्री, हातात जाड पुस्तकं असा वेश करून जेव्हा हे ध्यान रंगमंचावर अवतरतं आणि तेव्हापासून सबंध प्रेक्षागृह हास्यरसात बुडून गेलं. तोरडमलांचं ‘काळं बेट, लाल बत्ती’ पाहिलं होतं. त्यातील त्यांचा टेरर आंग्रे आणि हा त्याच्या अगदी विरुद्ध प्रकृतीचा बारटक्के.. विश्वासच बसत नव्हता. सरळमार्गी, कधी कधी बावळट वाटणारा बारटक्के साकारण्यासाठी थोडंसं वरच्या पट्टीत बोलणं, बेसचा वापर कमी करणं, चालताना दोन पायांत अंतर ठेवून चालणं, चालताना मधे मधे जमिनीकडे पाहणं.. या सर्व गोष्टी वापरून त्यांनी प्रेक्षकांना हसवत ठेवलं आणि नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात जेव्हा विद्यार्थी त्यांना लिंबूपाण्यामधून दारू पाजतात त्यावेळी बारटक्केबद्दल वाईट वाटायला लावलं. या शेवटच्या प्रवेशात तोरडमलांनी जी कमाल केली- त्यामुळे बारटक्के या व्यक्तिरेखेने जी उंची गाठली, त्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही.

‘तरुण तुर्क’मध्ये आणखीन एक अडचण होती. बारटक्केंना पटकन् शब्द सुचत नसल्यामुळे त्यांच्याकडून केला जाणारा ‘ह’च्या बाराखडीचा वापर. तोरडमलांनी इतक्या सहजपणे या ‘ह’च्या बाराखडीचा वापर केला, की कुठेही अश्लील होऊ न देता ती बारटक्केंचीच भाषा वाटली. केवळ अफलातून! एका प्रसंगात बॉईज हॉस्टेलच्या खिडकीतून शिडीचा पूल करून गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अवेळी येऊन बारटक्के पकडतात आणि बघितल्या बघितल्या ते म्हणतात, ‘‘बॉईजच्या ह्याच्यातून हे घालायला ही काय सर्कस वाटली तुम्हाला?’’ आणि थत्तेकाकांना म्हणतात, ‘‘आणि तुम्ही? तुमचं हे मोडून ह्याच्यात काय शिरताय?’’ आणि हे सगळं म्हणत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही ‘ह’वर अनावश्यक जोर ते देत नसत. त्यामुळे ती सगळी भाषा खूप गोड वाटायची. कुठेही अश्लील होऊ न देता ती बारटक्केंची भाषा वाटली.

नाटकात दोन वयस्कर पात्रं- थत्ते आणि बारटक्के. थत्ते स्मार्ट आणि बारटक्के बावळट. पण बारटक्केंचं काम करणारा अभिनेता मधुकर तोरडमल दिसायला स्मार्ट. त्यामुळे बारटक्केंना बावळट दिसवण्यासाठी दिग्दर्शक तोरडमल यांना अभिनेता तोरडमलांना अजागळ दिसवण्यासाठी वेशभूषेचा आधार घ्यावा लागला. आणि अभिनेता तोरडमलांनी ती वेशभूषा नाटकभर उत्तमरीत्या वागवली आणि प्रेक्षकांना त्यांना ‘बारटक्के’ म्हणून स्वीकारायला भाग पाडलं.

या नाटकातले चार प्रवेश म्हणजे तोरडमलांच्या अभिनयकौशल्याचं उत्तम उदाहरण. हॉस्टेल रूममधला बारटक्के आणि थत्तेंचा प्रवेश- जिथे बाथरूममध्ये काढलेल्या कार्टूनबद्दल चर्चा होते. थत्तेकाकांचं कार्टून काढून प्लस साइन काढून देशपांडेबाईंचं कार्टून आणि त्यातून मायनस बारटक्के.. त्यांचंही कार्टून काढून अर्थात! या प्रवेशात तोरडमल जी शारीरभाषा वापरत होते ती कमाल होती. प्रवेशाच्या शेवटी विनोदी पद्धतीने उजवा पाय मुडपून थत्तेंना ते सांगतात की, ‘तुम्हाला काही चान्स नाही.’ ती पोझ अविस्मरणीय.

ढमी नावाची एक वात्रट मुलगी बॉईज हॉस्टेलमध्ये येते- अर्थात चोरून. तिथे ती कॉटखाली लपते तेव्हा तिथेच लपलेला बंडा तिचा मुका घेतो. म्हणून ती तिच्या बहिऱ्या वडिलांना घेऊन येते, तो प्रवेश. तिचे वडील डेप्युटी कलेक्टर असतात. बारटक्के सतत त्यांना डेप्युटी ‘हे’ म्हणतात.  आणि ऐकू येत नसल्यामुळे डेप्युटी कलेक्टर बारटक्केंना वेगवेगळ्या आडनावांनी हाक मारतात. त्यावेळी हताश होणारा बारटक्के बघणं ही मेजवानी होती.

नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात लिंबू सरबतामधून दारू प्यायल्यामुळे हवेत तरंगणारे बारटक्के. तोरडमल हा प्रवेश एकाच वेळी विनोदी आणि मधे मधे कारुण्याची छटा दिसेल अशा पद्धतीने सादर करायचे. या प्रसंगात ते एकदा छत्री उघडून त्याचं पॅराशूट झालंय असं समजतात. ते व्हिज्युअल फँटॅस्टिक होतं.

आणि या सर्व प्रवेशांवर कडी म्हणजे पार्वतीबाईंबरोबरचा बागेतल्या बाकडय़ावरचा प्रवेश. एकमेकांना पाठविलेल्या कवितांचं ते वाचन करतात. खरं म्हणजे ती पत्रं त्यांनी एकमेकांना पाठवलेली नसतात. फक्त पत्रं पाठवण्यामागे असणाऱ्याची योजना असते, की त्या दोघांना वाटावं- ही पत्र त्यांनी एकमेकांना लिहिलेली आहेत. ही अर्थातच प्रेमपत्रं आहेत. तोरडमल या पत्रांचं वाचन इतकं अप्रतिम करायचे, की हसून हसून मुरकुंडी वळायची. पत्रातली एखादी ओळ किंवा संबोधन कळलं नाही तर ज्या पद्धतीने ते पार्वतीबाईंकडे बघायचे आणि त्यांचा राग ओळखून काहीही न बोलता पुन्हा पत्र वाचायला सुरुवात करायचे. या अभिनेत्याने न बोलून ‘व्यक्त’करायच्या जागा ते लीलया पोहोचवायचे. आणि त्यांचं पत्रवाचन तर आठवून आठवून हसायला येतं. पार्वतीबाईंच्या पत्रातला मजकूर वाचताना पहिला परिच्छेद आणि दुसरा परिच्छेद यातला भेद ते लाजवाब दाखवायचे. विशेषत: दुसरा पॅरा ‘जसा सुक्क्यात सुक्का बोंबील सुक्का तसा टक्क्यात टक्का बारटक्का’ म्हणून झाल्यावरचा चेहरा आणि स्वत:चं पत्र वाचतानाचा मजकुराबद्दलचा अविश्वास आणि आश्चर्य ही दोन एक्स्प्रेशन्स म्हणजे तर धमालच. ‘तू रसगुल्ला, मी जम्बू.. तू झारी, मी चम्बू’ हे म्हणून झाल्यावर हलकेच ओठांचा चंबू करून परत चेहरा पूर्ववत करणं, किंवा कवितेच्या अगदी सुरुवातीला लिहिलेला मजकूर वाचल्यावरची प्रतिक्रिया- ‘तुझ्या प्रेमाचा भिकारी- ह हा हे.. कोण हा भिक्कारडा ह हा हे?’ माझ्या डोळ्यासमोर हे म्हणतानाचे तोरडमल साक्षात् उभे राहतात.. नुसतं आठवलं तरी.

आम्ही नेहमी म्हणतो की, अभिनेत्याने नाटकातील भाषा त्याची स्वत:ची करून घेतली पाहिजे. ‘तरुण तुर्क’मध्ये ‘लेखक’ तोरडमलांनी लिहिलेली भाषा ‘अभिनेता’ तोरडमलांनी स्वत:ची करून घेतली. अभिनेता तोरडमलांची ही कामगिरी केवळ अफलातून.
विजय केंकरे

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay kenkre article about marathi drama
First published on: 26-03-2018 at 11:50 IST