श्याम मनोहर

एक संत आत्महत्या करतो.

एक संत तुरुंगात जातो.

एक संन्यासी एका प्रांताचा मुख्यमंत्री होतो.

एक संन्यासी मोठा व्यापार करतो.

एक नव्हे, तर दोन उद्योगपती लाखो कोटींचे कर्ज बुडवून परदेशी पळून जातात..

हे वर्तमानातले.

भूतकाळातले..

श्यामच्या आईप्रमाणे समाजावर प्रेम करणारा एक लेखक आत्महत्या केलेला.

एक गांधीवादी, सवरेदयी नेता तरुणपणी एका युवतीशी लग्न करू म्हणतो. दोघे गांधीजींना लग्नाची परवानगी मागतात. लग्न करा, पण ब्रह्मचर्य पाळायचे- गांधीजींची अट. दोघे लग्न करतात. आयुष्यभर गांधीजींची अट पाळतात.

अशा अजून खूप गोष्टी असतात. वर्तमानातली अगदी ठळक एक गोष्ट आहेच की.. हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. आपण सगळे बघत राह्य़लोय नुस्ते.

हे सर्व कुणी कल्पना करू शकते?

एक लेखक विचार करत होता.. सर्वसामान्य समजा अशा कल्पना नाही करू शकत. मला- एका लेखकालाही अशा कल्पना करता येऊ नयेत? माझ्यात कल्पनाशक्तीच नाही की काय?

लेखक धास्तावून काही क्षण गप्प राह्यला.

स्वत:च्या सांत्वनाची त्याला उबळ आली. तो पुन्हा विचार करू लागला.

मला कल्पनाशक्ती नाही असं नाही. माझ्याकडे कल्पनाशक्ती नक्की आहे.

पण एखादा संत आत्महत्या करतो, अशी गोष्ट मला कशी सुचली नाही?

मला कल्पनाशक्ती कमी आहे असे आहे काय?

लेखक स्वत:च्या लिखाणाचे परीक्षण करू लागला.

माझे अनुभव हे माझे लिखाणाचे भांडवल.

अनुभव म्हणजे भूतकाळ. अगदी वर्तमानात प्रत्यक्ष गोष्टी घडत असताना कुणीच त्यावर लिहू शकत नसेल. गोष्ट घडून गेल्यावरच, भूतकाळ झाला की लिहिता येते. समकालीन म्हटले तरी भूतकाळच.

लिखाणाचे दुसरे भांडवल म्हणजे माझ्या मनोवस्था, इच्छा, आकांक्षा, भावना, त्रागा, त्रास, दु:ख, रोमँटिकपणा.

तिसरे भांडवल म्हणजे सामाजिक वास्तव. मला अनुभवायला आलेले वा कुठे कुठे ऐकलेले वा वाचलेले आणि माझ्या विचारसरणीतून..

मी माझ्याबाहेरच पडत नाही. त्यामुळे कल्पनाशक्ती कमी राहते? ती विकास पावत नाही?

लिखाणात मी माझ्याबाहेरच काय, पण काळाच्या, अवकाशाच्याही बाहेर जायला हवे. ते मॅजिक असते. लिखाणात मॅजिक हवे. त्यातून मग काहीही येऊ दे.. चांगले, वाईट, भयंकर.. वाट्टेल ते.

त्यासाठी कसल्या प्रकारची कल्पनाशक्ती हवी?

लेखकाला थकवा आला. कुठेतरी जावे, कुणीतरी यावे, कुणाचा फोन तरी यावा, कुणाला फोन करावा?

लेखक गप्प बसून राह्यला तरी गप्प नव्हताच; डोक्यात, मनात भलतेच काय काय येत-जात होते. त्रस्त व्हायलाही होत होते..

नाही, कुठ्ठे जायचे नाही. एव्हढा विरळा असा एकांत चुकून मिळालाय. सोडायचा नाही. सुचू दे, नाही तर न सुचू दे.. सोसायचे.

हं, काय मुद्दा?

तरी लेखक वाट्टेल त्या विचारांच्या आवकजावकीत गजबजलेला राह्यला.

हं, काय मुद्दा?

तरी भलतेच.

काय मुद्दा?

तरी भलतेच..

मुद्दय़ाच्या कानफटीला बसल्यावर लेखकाला मुद्दा आठवला: कसल्या प्रकारची कल्पनाशक्ती?

डोक्यात, मनात भलतंच. त्याला तोंड देत लेखक विचाराकडे, मुद्दय़ाकडे यायला धडपडत होता.

वाइल्ड इमॅजिनेशन हवे.

वाइल्ड इमॅजिनेशन.. वाइल्ड इमॅजिनेशन.. म्हणजे.. म्हणजे.. म्हणजे मोकाट कल्पनाशक्ती.. मराठी शब्द सुचला.

व्वा! लेखकाला आनंद झाला. प्रमेय सापडले: मोकाट कल्पनाशक्ती हवी.

एखादा संत आत्महत्या करतो, अशी गोष्ट सुचायला मोकाट कल्पनाशक्तीच हवी. एखादा संन्यासी मोठ्ठा व्यापार करतो, अशी गोष्ट सुचायला मोकाट कल्पनाशक्ती हवी.

लेखकाला लगेच जाणवले. एखादा संत आत्महत्या करतो, अशी गोष्ट लिहिलीच तर सगळीकडून निषेध होईल. माफी मागायची, गोष्ट परत मागे घ्यायची, गुन्हा नोंदवायची धमकी येईल. समाजाचा दबाव आहे.

आणि मलाच वाटतेय- संत आत्महत्या करणेच शक्य नाही. आत्ताही वाटतेय- संत आत्महत्या करतो.. हे सुचलेले, ही आयडिया. संन्यासी मोठ्ठा व्यापार करतो, ही आयडिया चूक आहे. असे होऊच शकणार नाही. मी रूढीत बद्ध आहे. बंड म्हटले तर करता येईल. इतर लेखक करतही आहेत. मला खळबळजनक लिहावे वाटते.. माझे काहीतरी अडलेच.

त्या रात्री लेखकाला गाढ झोप लागली.

सकाळी उठल्या उठल्या, जाग आल्या आल्या लेखक मनात म्हणाला, इतकी गाढ झोप लागली, हे बरोबर नाही. म्हणजे मी विषय गंभीरपणे डोक्यात घेतलाच नाही असा याचा अर्थ आहे.

आणि आंघोळ करताना मनात म्हणाला, आज काही ना काही मोकाट कल्पना काढायच्याच..

संध्याकाळी पाचला लेखकाला पुसट पुसटपणे काही काही सुचले. त्यावर विचार करून, ते स्पष्ट करून लेखकाने लिहिले..

१) काँग्रेस, शिवसेना, बसप, कम्युनिस्ट, आरएसएस, राष्ट्रसेवा दल असे पक्ष, संघटना यांच्या अध्यक्षपदासाठी खुलेपणाने निवडणूक होतेय. अध्यक्षपदासाठी प्रत्येक पक्षात दोनपेक्षा जास्त उमेदवार उभे.

२) देशाच्या निवडणुकीत उमेदवार त्यांना, त्यांच्या पक्षाला कोणते, किती आणि कसे काम करता येईल, हे सविस्तरपणे सांगताहेत.

३) दुसऱ्याची निंदानालस्ती न करता तात्त्विक टीका करून, स्वकर्तृत्वानेच केवळ व्यक्ती उच्चपदी पोचते.

४) एक पाच वर्षांची मुलगी. तिच्या घरासमोर रोज संध्याकाळी शाखा भरते. ती मुलगी रोज शाखा पाहते. आई ‘चल घरात..’ म्हणाली तरी ती आईचे ऐकत नाही. ‘‘इतकी कसली शाखा आवडते तुला, कुणास ठाऊक!’’ आई लाडाने म्हणते. सहाव्या वर्षी मुलगी शाखास्थानावर जाते.

‘‘मी येऊ शाखेत?’’ एका स्वयंसेवकाला म्हणते.

‘‘अगं, शाखेत फक्त मुले असतात.’’ स्वयंसेवक म्हणतो.

‘‘तू इथे बाहेर थांब आणि बघ.’’

मुलगी सातव्या वर्षी रोज शाखा पाहते. आठव्या वर्षी पाहते. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत ती शाखा पाहते. आई म्हणते, ‘‘आता काय लहान आहेस का शाखा बघायला? मैत्रिणींबरोबर हिंडाफिरायला जात जा.’’

अठरावे वर्ष पूर्ण झाल्यावर मुलगी निक्षून आई-वडिलांना म्हणते, ‘‘मला पुरुष व्हायचेय.’’

आई हसते. म्हणते, ‘‘स्त्रीजन्म महत्त्वाचा असतो. आणिक आता पुरुष जे- जे करतात, ते- ते सगळे स्त्रियाही करू शकतात.’’

वडीलही तिला समजावतात.

ती म्हणते, ‘‘मला पुरुष व्हायचेय. शाखेत जायचेय. मला पुरुष व्हायचे ऑपरेशन करायचेय. नाहीतर मी जीव देईन.’’

तिचे ऑपरेशन होते. यशस्वी होते. ती शाखेत जाते..

५) अमेरिका-युरोपमधले शास्त्रज्ञ, कवी, तत्त्वज्ञानी भारतात कायमचे राहायला येतात. कारण भारतात शास्त्रज्ञ, लेखक, तत्त्वज्ञानी यांना महत्त्व दिले जाते. भारतीय समाज त्यांच्यावर प्रेम करतो.

६) एक तरुण योगिनी आणि एक आयटी इंजिनीअर यांची प्रेमकथा. योगिनीची इंजिनीअरला अट : मी आध्यात्मिक आहे. आश्रम काढणार आहे.

७) नवरा-बायको. दोघांना मुलंही. काही वर्षांनी नवऱ्याचे हळूहळू स्त्रीत रूपांतर होते. आता दोघेही स्त्री. दोघांनाही लेस्बियन म्हणून अटक होते.

८) धार्मिक पिंड असलेल्या पंतप्रधानांनी एके दिवशी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि ते लगेच परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेले.

रात्रीचे जेवण झाल्यावर लेखकाने लिहिलेले पुन्हा पुन्हा वाचले.

व्वा! मस्त मोकाट सुचलेय.

लेखकाला आनंद झाला. लेखक आनंदाने अंथरुणावर आडवा झाला.

ह्य़ॅ???

मोकाट कल्पनेपेक्षाही अधिक मोकाट हरघडी जगभर प्रत्यक्ष घडतेय.

लेखक उठला.

मग मोकाट कल्पनाशक्ती म्हणजे काय?

उत्तर लगेच सुचले..

दर्शन निर्माण होते ती मोकाट कल्पनाशक्ती.

लेखकाला विलक्षण सुचल्याचा आनंद झाला.

आणि लगेच-

बापरे! लिखाणातून दर्शन निर्माण व्हायला हवे!

.. जमेल? झेपेल?

– आनंदात घाबरलेपण मिसळले गेले.