24 January 2021

News Flash

काही पाने…

बाहेर कलकलतं ऊन. दूरवरच्या डोंगरावर जागोजागी फाटलेल्या, चिंध्या झालेल्या सावलीखाली कुठं कुठं दिसणारं जितराब.

डोळ्याला खुपणाऱ्या पांढुरक्या उन्हात तळत असलेल्या डोंगराच्या पायथ्याखालच्या झोपडय़ा.

आसाराम लोमटे

‘‘जुन्या मराठी चित्रपटात बाहेरख्याली पतीसाठीही आयुष्य मागणाऱ्या बायका असायच्या. नऊवारी साडीतल्या बाया ताटात निरांजन घेऊन देवाकडं धावा करायच्या. त्यांचे सात्विक भाव डोळ्यांतून दिसायचे. माझ्या कुंकवाचं रक्षण कर, असं म्हणत बाईचा धावा चाललेला असे. कुंकवानं सगळीकडं गुणं उधळलेले. बारा गावचं पाणी पिलेलं. प्रसंगी या घरच्या बाईला मारझोडही केलेली. तरीही बाई डोंगरावरच्या एखाद्या देवीला नवस बोलणार. त्यासाठी अनवाणी डोंगर चढून गाभाऱ्यापर्यंत पोहचणार. पण नवऱ्याबद्दल जराही त्वेष नाही. तो फक्त संकटातून सुटावा यासाठीच बाईचा टाहो. चेहऱ्यावर आतल्या तडफडीचा मागमूसही नाही. मला तुमचं सगळं लिहिणं या प्रकारातलं वाटतं. बाहेरख्याली पतीसाठीही आयुष्य मागणाऱ्या बाईचे सात्विक भाव दिसतात त्यात. पण तिचं दु:ख नाही दिसत..’’ असं मी एका लिहिणाऱ्याला म्हणालो होतो. तेव्हा झोपेत अंगावरचं पांघरूण खस्सकन् ओढल्यानंतर एखाद्याचा चेहरा होतो तसे भाव मला त्याच्या चेहऱ्यावर दिसले होते.

एक तर तसा थेट माझा साहित्याशी काडीचाही संबंध नाही. मी विज्ञानाचा पदवीधर. विद्यार्थी असेपर्यंत चिक्कार वाचायचो. आता तेही होत नाही. सतत कुठले कुठले विषय हातावर घेतलेले असतात. एक काम तडीला जायच्या आत दुसरं सुरू केलेलं असतं. एकाच वेळी दोन्ही पाय एकाच जागी आहेत असं होत नाही. एक पाय कायम बाहेरच ठेवलेला असतो. सततची वणवण पाठीमागं हातपाय धुऊन लागलेली. जराही थांबल्यासारखं वाटत नाही. डोक्यात सतत काही ना काही धुमसत असतं. जोवर ही धावाधाव चालूय तोवर लिहिण्या-वाचण्याचं हातून होणारच नाही. वाचायला जो निवांतपणा लागतो तो कुठून आणायचा?

आठ दिवसांखालीच जेलमधून आलो. चार दिवस तिथं जरा निवांतपण होतं. पण सगळा वेळ कार्यकर्त्यांसोबत गप्पागोष्टी करण्यात गेला. आता या सगळ्या लिहिणाऱ्या मंडळींना तर त्या जगातलं काहीच माहीत नाही. शिजून काढणारा उन्हाळा तिथं वेगळाच अनुभवला. उंचच उंच तुरुंगाच्या िभती. मधे भलामोठा चौक. त्यात पाण्याचे हौद. उन्हात घामाच्या धारा अंगातून पाझरू लागल्या की त्या हौदाचं पाणी अंगावर घ्यायचं. सकाळी कुपनवर मिळणारा चहा घ्यायचा. अंथरूण-पांघरूणाबरोबर मिळालेली एक मोठी खोलगट थाळी, वाडग्यासाखी मोठी वाटी आणि सोबत एक दांडी असलेला मग. पाणीही त्यानंच प्यायचं, कांजी प्यायलाही तोच अन् सकाळी संडासला जाण्यासाठीही तोच. जेवणात जी भाजी मिळायची ती कशाचीय, हे कळायचं नाही. भातात खडे असल्यानं तो न चावताच गिळायचा. उकाडय़ानं हैराण; त्यामुळे उघडंच बसून राहायचं. बराकींची उंची जास्त होती. दिवसाचं तापमान रात्री कमी व्हायचं. फरशीवरच उघडं अंग टाकून दिलं की निवांत झोप लागायची. चहा, कांजी, अन् सकाळचं जेवण हे एकामागोमाग एखाद्या रूखवतासारखं यायचं. दुपार जड जायची. जेलची लायब्ररी होती, पण त्यात सगळी पुस्तकं म्हणजे इतिहासातल्या फोडणी दिलेल्या कहाण्या. एका कोपऱ्यात वाद्यंही होती. पण ढोलकी हातात घेतली तर तिची शाई उडालेली. थाप मारल्याबरोबर ‘भद्द’ असा आवाज. मधेच रविवार आला. त्या दिवशी मात्र गहू भरडून केलेला गुळाचा शिरा मिळाला. त्या चार दिवसांत तुरुंगात कुठल्या कुठल्या गुन्ह्य़ातले सराईत आरोपी भेटले. कोणी बांध कोरण्याच्या वादातून एखाद्याचा मुडदा पाडला होता, तर कोणी बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव केलेला. आमचा गुन्हा काय, तर आम्ही काळ्या ज्वारीच्या खरेदीसाठी केलेला चक्काजाम.. आणि त्यासाठी मिळालेली चार दिवसांची न्यायालयीन कोठडी.

आता आमचं कार्यकर्त्यांचं हे जग.. आणि लिहिणाऱ्यांच्या दुनियेत दुसरंच काहीतरी चालू. शेती-मातीचं लिहिणारे काही लोक अधूनमधून त्यांची पुस्तकं देतात. कसं वाटलं, विचारतात. यात जे अगदीच खपली काढील अन् गदागदा हलवून सोडील असं खूपच कमी असतं. गेल्या काही दिवसांपासून काही कवींनी नादच लावला.. तुम्ही एकदा आमच्या कविता ऐका. आम्ही लिहितो, पण तुम्ही प्रत्यक्ष मदानात लढता. तुम्हाला आमच्या कविता कशा वाटतात ते सांगा. यातल्या एक- दोघांना मी ओळखत होतो. याच भागातले कवी होते सगळे. मग त्यांच्यापकी एकाच्या शेतात आम्ही जमलो.

डोंगरमाळावरची शेतं सगळी. जिथवर जमीन वहितीखाली आणता येते तिथवर लोकांनी उन्हाळ्यात पाळी घातलेली. नजर जाईल तिथवर मोकललेली रानं. आभाळात मस्तक घुसवू पाहणारे उजाड डोंगरांचे माथे. कलकलत्या उन्हात भुंडय़ा माळावर वाळल्या गवताला भिडलेली चुकार जनावरं. माळावर एकमेकांच्या अंगाला खेटून बसावं तशी मोठमोठी आकारहीन दगडं. दोन दगडांच्या मधून निघालेली कडूिलबाची भलीमोठी फांदी. ऐन माथ्यावर झोपडय़ासारखा केलेला एक आडोसा. पंधरा-वीस माणसं सहज बसतील असा. अन् खोप म्हणता येणार नाही त्यापेक्षा मोठा. इतक्या रखरखत्या उन्हात त्या झोपडय़ात मात्र गार वाटत होतं. खाली टाकलेल्या दोन चटया अन् कोपऱ्यात पाणी भरून ठेवलेला मातीचा बारका रांजण. सगळ्यांनी आपापल्या घरून जेवणाचं सोबत आणलेलं. आम्ही सारे त्या झोपडीत वर्तुळाकार बसलेलो. जरा उशिराने शशांक धानोरकरही तिथे आला. इतक्या कडक उन्हाळ्यातही अंगात जाकीट वगरे. जाकिटावर डिझाईन. मनगटावर बारीक रूद्राक्षाची माळ गुंडाळलेली. सोबत कवितांची वही. तिला कापडी अस्तर. मनात म्हटलं, हा झोपतानाही अंगातलं जाकीट काढतो की नाही, कुणास ठाऊक. सगळ्यांनी जरा व्यवस्थित बुड टेकवल्यानंतर आपापल्या कविता वाचायला सुरुवात केली. मी म्हटलं, ‘‘मी शेवटी बोलणार काय बोलायचं ते. तुमच्या एकापाठोपाठ एक कविता होऊ द्या.’’ आधी प्रत्येकजण आपली ओळख करून देऊ लागला. त्यानंतर कविता.

अंगद गरड असा परिचय करून देणाऱ्या पोरानं सादर केलेली पहिली कविता होती. कोरडवाहू अल्पभूधारक कुटुंबातून मी आलोय, असं सांगत त्यानं जी कविता म्हटली तिचे शब्द साधारण असे होते-

‘उरात साकळत जातो ओलसर अंधार

उठतो खोलवर बुडत चाललेल्या हाकांचा तवंग

टिमटिमणाऱ्या वातींची कालवाकालव होते मनात

जितराबाने निमूट गाठावी दावण

अन् लगेच काही कळायच्या आत

अडकवलं जावं दावं

तसं आवळलं जातं गळ्याभोवती काहीतरी

फक्त दिसत नाही आवळणारा हात..’

कविता वाचताना अंगदच्या आवाजातलं बुजलेपण लपत नव्हतं. त्यानंतर परमेश्वर कवडे याने पेरणीच्या दिवसांचे वर्णन करणारी कविता वाचून दाखवली. माझी अडचण अशी की, मला रानात असं फार काही रोमँटिक दिसतच नाही. म्हणजे पहिल्या पावसाने मातीचा दरवळ सगळीकडे सुटतो अन् त्या मातकट वासाने मी मोहरूनही जातो. हावरटासारखं छाती भरून वास घेतल्यानंतरही आपण रितेच आहोत असं वाटत राहतं. पिकं मातीतून वर उठू लागल्यानंतर आनंद होतो. दररोज नव्या नजरेनं वाढत्या पिकांकडं पाहताना अंकुरल्यापासून फुला-फळात येताना प्रत्येक टप्प्यावर चमत्कारासारखंच दिसू लागतं सगळं. पण मनाची ही अवस्था फार काळ टिकत नाही. आता शेतातनं मोती पिकतील अन् धनधान्याच्या राशी शेतकऱ्याच्या घरात भरून ओसंडू लागतील- असं भाबडं चित्रही मला आवडत नाही. बांधावर बसून ठेचा-भाकर अन् कांदा खाण्यातला आनंद मी आजवर अनेकदा वाचलाय. पण तो मलाच काय, खेडय़ातल्या कोणालाच प्रत्यक्ष वाटणार नाही. जे असं लिहितात त्यांनी दररोजच असा बांधावर चटणी-भाकरी खाण्याचा उद्योग आनंदाने करावा. असा हवापालट ते रोज करतील काय? आता परमेश्वरच्या कवितेतल्या पेरणीच्या वर्णनाने मीही क्षणभर भुरळलो, पण पेरणी झाल्यानंतर पिकं हाताशी येताना किंवा मातीमोल होताना त्याचे जे काही होते त्याने मनास इंगळ्यांचा दाह होतो, त्याचे काय? कोंभाची लवलव ते पदरात पडलेली रखरख यांचा मेळ कसा लावायचा? दोन टोकच आहेत ती.

शशांकने जी कविता सादर केली ती काहीतरी अलौकिकाकडे डोळे लागलेली. ही माणसं कुठल्या जगात वावरतात? ही जणू धुक्याने दाटलेली दुनिया. दैनंदिन जगण्यातली आच यांच्यापर्यंत पोहचत नसेल का? कसलाच ओरखडा उमटत नाही यांच्या मनावर? यांच्या आयुष्यात उगवणारा सूर्य वेगळाय का? हे अन्नाशिवाय काही वेगळं खातात का? यांच्या आयुष्यातले ऋतूंचे सगळेच प्रहर आपल्याशी न जुळणारे.

‘हे रक्त निळे कोणाचे

जे आकाशातून झरते

दारात साचतो डोह

उंबरठा ओला करते

का उरात उमलत जाते

ही इंद्रधनूची कांती

अन् दाटून येतो गहिवर

या उदासल्या एकांती

हे आतडे होती गोळा

देता प्राणांतिक वेणा

अन् काळीज घेऊन जाण्या

दारात थबकला मेणा’

ओतीव ठशासारख्या आवाजात त्यानं ही कविता सादर केली. कुठल्यातरी कवीचे मनावर कायमचे गारूड. सदैव मोहिनी घातलेली. त्या वातावरणातून बाहेर यायचे नावच नाही. सारं काही एखाद्या बुवा-बाबाच्या नादी लागल्यासारखं. सादरीकरण सफाईदार कसं होईल याचीच चिंता. प्रत्येक प्रसंगात स्वत:ला विक्रीयोग्य आणि ठीकठाक केलेलं. मनगटावरच्या बारीक रुद्राक्षमाळेशी दुसऱ्या हाताने चाळा करीत शशांकने त्याची कविता संपवली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रतिसादोत्सुक भाव अक्षरश: तरारून आले होते. त्यानंतरही काही कविता झाल्या. शेवटी दत्ता ठोसर याने एक कविता वाचली.

पोटच्या गोळ्यांना  नाही दिली माया

जिरवली काया ढेकळांत

जगण्याचा पाटा काळ वरवंटा

जीव हा करंटा राबताना

कष्टविला देह  रात्रीचा दिवस

तरी दारी आवस      सदाचीच

हंबरला गळा   सोसताना कळा

दाटला उमाळा उरातच

आता वाटू लागे जिण्याचीच लाज

मोकलावी आज       आशा सारी..

तशा साऱ्यांच्याच कविता वाचून झाल्या होत्या. कवितावाचनानंतर थोडा वेळ पोकळी निर्माण झाली. डोंगरमाथ्यावरच्या त्या झोपडीत अधूनमधून शिरणाऱ्या गरम उन्हाच्या झळा कानाला चाटून जात होत्या. मी गप्प होतो. शशांक म्हणाला, ‘‘नामाकाका, आता बोला तुम्हीच काहीतरी.’’

काय बोलायचं अन् कुठून सुरू करायचं याची मनाशी जुळवाजुळव चालली होती. मी घसा खाकरल्यानंतर सगळ्यांनीच कान टवकारले.

‘‘छान वाटलं मला तुमच्या कविता ऐकून. जेव्हा तुम्ही नवे असता तेव्हा कोणाचाच शिक्का नसतो तुमच्यावर. कोणाचाही गंडादोरा बांधलेला नसतो. या सगळ्या गोष्टी पुढे पुढे होत असतात. मला तुमच्या साहित्यवर्तुळातलं तेवढं माहीत नाही, पण आम्ही कार्यकर्त्यांनी मनाशी एक ठरवलेलं असतं. साधारणपणे इकडून-तिकडून िहडून आलेला कार्यकर्ता फार कामाचा असतो असं वाटत नाही. मातीत काय गुण आहेत, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश किती, हे सगळं जोखायचं असेल तर त्यासाठी माती परीक्षण करावं लागतं. या परीक्षणासाठी काळ्याभोर रानातली माती जरी आणली तरी ती खरी नसते. अनेक रसायनं त्यात मिळालेली असतात. या मातीचा मूळ पोत बदलतो. त्यामुळं तिच्याबाबतचं निदान करता येत नाही. मग माती परीक्षणासाठी कुठली माती वापरतात? तर ती बांधावरची. कारण ती त्या रानाची मूळ ओळख सांगते. जमिनीत कुठले घटक कमी-जास्त आहेत, हे तपासायचं असेल तर बांधावरच्या मातीचं परीक्षण करावं लागतं. त्याशिवाय जमिनीचा पोत जोखता येत नाही. त्यामुळं सध्यातरी तुमच्यापकी अनेक जण मला बांधावरच्या मातीसारखे कोरे करकरीत वाटता.’’

‘‘पण आमच्या कविता कशा वाटल्या ते सांगा,’’ अंगद गरडनं हसत हसत विचारलं.

‘‘हे बघा, मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. माझ्या मतावरून तुम्ही तुमचं काही ठरवू नका. शिवाय मी कार्यकर्ताय्. माझी साहित्याकडून वेगळी अपेक्षाय्. मला घडवणाऱ्या, इथवर आणणाऱ्या गोष्टी, घटना-प्रसंग वेगळेयत. आम्हाला लहानपणी कशाची भीती वाटू नये म्हणून मíतकावरून झोकलेल्या पशाला भोकं पाडून  मायबाप ते आमच्या करदोटय़ात ओवायचे. कुठलंही भेवपान लागू नये म्हणून. ती त्यांची भावना होती. आम्ही हे उलटवलं. आम्ही इतके निबर झालो, की कुठल्याही पुढाऱ्याची तेरवी घालताना आम्हाला भीती वाटत नाही. ही जिगर येते कुठून?’’ माझ्या प्रश्नाला त्यांच्याकडून कोणाचं चटकन् उत्तर येईल ही अपेक्षा मीही केली नव्हती. मी प्रश्न विचारणाऱ्या अंगदलाच म्हणालो, ‘‘कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की, कुठल्याही लिहिण्याला एक परिणामकारक टोक असावं. आता तुझ्याच कवितेत तू शेवटी म्हणतोस की, गळ्याभोवती काहीतरी आवळलं जातं, पण आवळणारा हात दिसत नाही. तर आमचं म्हणणंय्- की घ्या ना शोध त्या आवळणाऱ्या हाताचा. कुठवर अंधारात चाचपडत बसणार? आता हे मी केवळ तुझ्या कवितेपुरतं बोलत नाही. पण अशी असंख्य वर्णनं मी कथा-कादंबऱ्यांमधून वाचतो. वाचणाऱ्याला सर्रकन अंगावर काटा आणील अशा टप्प्यावर पोहोचणारं अन् त्याला तळामुळापासून ढवळून काढणारं असं खूपच कमी येतं. शेवटपर्यंत लिहिणारा चाचपडतच असतो. आता मला सांगा, हे आम्ही कुठवर वाचायचं तुमचं? ..रात चढाला लागली व्हती अन् लांबवर कुठंतरी कुत्रं इवळण्याचा आवाज येत व्हता.. किंवा फार फार तर- रातकिडय़ाची किरकिर ऐकू येत व्हती.’’

माझा आवाज वाढतोय असं मला वाटू लागलं, मी तो लगेचच खाली आणला. अंगदला वाईट वाटू नये म्हणून त्याला म्हणालोही, ‘‘हे तू मनाला लावून घेऊ नकोस. मी हे सगळं जुन्यांबद्दल बोलतोय. तुम्ही पोरंच पुढं काहीतरी चांगलं लिहाल. आणि तसंही मी तुम्हाला म्हणालेलोच आहे, की माझ्याही काही आकलनाच्या मर्यादा असतीलच.’’

.. या सर्वामध्ये एकजण होता, ज्याने कोणतीच कविता वाचली नव्हती. माझं बोलणं चालू असतानाच त्यानं हाताचं एक बोट वर केलं होतं. त्याला काहीतरी म्हणायचं होतं. तो कविता वगरे काही लिहीत नव्हता. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता- असं त्याच्या बोलण्यावरून कळालं. चेहऱ्यावर पुरेपूर आत्मविश्वास. त्याला ‘बोल’ म्हणालो.

‘‘कसंय सर, यांनी शेताशिवाराबद्दल, पावसापाण्याबद्दल, वाऱ्यावर डोलणाऱ्या पिकांबद्दल लिहिलं की तुम्ही म्हणणार- हे रोमँटिक लिहितायत. नटवं लिहितायत. अन् यांनी रानात राबणारांच्या दु:खाबद्दल लिहिलं की तुम्ही म्हणणार- यांनी आमचं दुख विकायला काढलंय. मग यांनी नेमकं करायचं काय?’’ त्याच्या प्रश्नानं मीही जरा सावरून बसलो. बोलताना त्याला धापही लागली थोडी. पण त्याच्यातली धिटाई अजोडच होती. सगळे ऐकतायत, अगदी माझ्यासह त्याच्याकडं टक लावून पाहतायत, हे नजरेत सामावून घेऊन तो पुन्हा बोलू लागला. सगळ्यांच्या नजरेतलं बळ जणू त्यानं गोळा केलंय असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

‘‘सर, खेडय़ात नव्यानं सून म्हणून आलेल्या पोरीला कळतच नाही सासूशी कसं वागावं. तिला वाटतं- आपण लवकर उठून शेताला जावं, सासूनं निवांत मागून यावं. सून म्हणतेही- तुम्ही आरामानं या. सुनेचा पाय उंबरठय़ाबाहेर पडल्याबरोबर शेजारीण विचारते, बाई, लवकरच निघाली तू शेताला? सासू दाराआडून म्हणते, घरची सगळी कामं करायला मी हाय की. तिला काय घरादाराची चिंता का काय..? निघाली परदिश्यावानी. दुसऱ्या दिवशी सुनेला वाटतं, आधी सासूला शेताला जाऊ द्यावं. आपण सगळी घरची कामं उरकून, सासूचा भाकरतुकडा घेऊन पाठीमागून जावं. ती सासूला तसं सांगते. सासूचा पाय उंबरठय़ाबाहेर पडायला, की शेजारीण विचारते- आज तर तुम्हीच आधी शेताला चाललात? सासू म्हणते, काम कोणाला चुकलंय का? आपण जावं, घाण्याच्या बलाला जुपावं. सून येईन मागून न्हाऊनधुऊन. राजाच्या राणीवानी. आरामानं. आता मात्र सून गांगरून जाते. ती ठरवते- तिसऱ्या दिवशी दोघींनी बरोबरच जायचं. मग तर सासू शेजारणीला काही बोलणार नाही. ठरल्याप्रमाणं दोघी सासू-सून उंबरठय़ाबाहेर पाऊल टाकतात- शेतात जायला. शेजारीण म्हणते, आज तर कमालचंय! दोघीही संगंमंगं? सुनेला वाटलं, सासू आता काय बोलणार? तिला बोलायला कारणच ठेवलं नाही. पण सासू नंबरी. ती म्हणाली, हं. सून असली म्हणून काय झालं? कशातही बरोबरीच. आता रानात जायचं तरी बरोबरीच. जणू सवत म्हणूनच आलीय नं उरावर. सर, अशानं नव्या सुनेनं वागावं तरी कसं?’’ त्याच्या वाक्यातला शेवटचा शब्द संपायच्या आत आम्ही सगळेच हसलो. मी पाहिलं- अंगदच्या चेहऱ्यावरचा ताण कुठल्या कुठं पळालेला. ही गोष्ट सांगितलेला पोरगाच पुन्हा म्हणाला, ‘‘सर, सांभाळून घ्या- काही चुकलं असलं तर. जरा गंमत करायची म्हणून बोललो. उलट, तुम्ही आमचं ऐकून घेण्यासाठी एवढा वेळ आम्हाला दिलात हेच खूप झालं.’’ मी सगळं बारकाईनं ऐकून घेतलं. नजर पार लांबवर खिळली होती. नजरेच्या टप्प्यात एक शेळी बाभळीच्या खाली वाकलेल्या फांदीचा शेंडा कुरतडत होती. तिच्यापासून काही अंतरावर डोक्याला कळकट रुमाल बांधलेला माणूस हातातल्या काठीनं काहीतरी उकरल्यासारखं करीत होता. अंतर बरंच होतं, अन् इकडं आमचं काय चाललंय याच्याशी काहीच देणंघेणं नसल्यागत तो माणूस आपल्याच नादात होता. पाण्यात बुडी मारल्यानंतर हाती थव घेऊन यावं तसं मी त्या तंद्रीतून बाहेर येत या सगळ्यांशी बोललो. जवळपास त्या आमच्या बठकीतलं निरोपाचंच.

‘‘ कसं असतं- आयुष्यात सगळ्या गोष्टींची सरमिसळ असते. खूप कष्टानं आंबून गेलेल्या माणसाची तुम्ही गोष्ट सांगाल, तर त्याच्याच आयुष्यात त्याचं सुख म्हणून शोधण्याच्या काही जागा असतात. वेदनेनं कळवळून जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यातही एखादा उजेडाचा कोपरा असतो. फक्त कष्टाचीच गोष्ट किंवा फक्त सुखाचीच गोष्ट अशी काही नसते. विहिरीत रिकामा पोहरा आदळतो. तो सतरा ठिकाणी आदळावा लागतो. सपाट पाण्यावर आदळतानाच तो स्वतची जागा तयार करतो. एकदा विहिरीतलं पाणी त्यात शिरायला सुरुवात झाली की मग आपल्याला काहीच करावं लागत नाही. कौशल्य पणाला लागतं ते पाणी आत शिरायला. पोहऱ्यातली पोकळी भरून निघतेय अन् पोहरा जड होतोय हे आपल्याला हातातल्या दोरीवरूनच कळतं. लिहिण्याचंही तसंच असतं.. म्हणजे असावं असं मला वाटतं.’’

‘‘तुम्हाला माझी गोष्ट सांगतो बालपणीची.. म्हणजे माझ्या बापाची. आपल्याकडं उकिरडय़ात वर्षभर जमा झालेलं खत अशाच रखरखत्या उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकण्याची कामं असतात. सगळं अंग माखून जातं केरकचऱ्यानं. कुबट वासानं. टोपल्याटोपल्यानं बलगाडीत शिगोशीग खत जमा करायचं अन् शेतात नेऊन पुन्हा ते टाकायचं. ठरावीक ठिकाणी त्याचे ढीग करायचे. तर.. माझा बाप दिवसभर खताच्या गाडीवर काम करून दमूनभागून जायचा. पण याच दिवसांत आपल्याकडं जत्रा असतात. जत्रेत तमाशे येतात. दिवसभर खताच्या टोपल्या वाहणारा हाच बाप मी पहाटेपर्यंत जत्रेत फिरणारा अन् तमाशा पाहण्या-ऐकण्यात दंग होणारा पाहिलाय. बत्तीच्या सुंसुं करणाऱ्या भगभगीत उजेडात पुढं नाच चालूय् अन् एखादी चुरगळलेली नोट खिशातून काढून बाप सोडतोय हे चित्र मी लहानपणी पाहिलंय. आयुष्य असंच असतं. ही सरमिसळ तुम्हाला वेगळी नाही करता येत. जे जगण्यासोबत येतं ते काहीही लिहिण्यात आलं तरी चालेल. फक्त ते उपरं वाटू नये..’’

बाहेर कलकलतं ऊन. दूरवरच्या डोंगरावर जागोजागी फाटलेल्या, चिंध्या झालेल्या सावलीखाली कुठं कुठं दिसणारं जितराब. डोळ्याला खुपणाऱ्या पांढुरक्या उन्हात तळत असलेल्या डोंगराच्या पायथ्याखालच्या झोपडय़ा. एकमेकांच्या आधारानं तग धरून असलेल्या ठिपक्यांसारख्या. ज्यांना कायम कोणीतरी हुलकावणी दिलीय अशी इथली माणसं. नांगरताना, खुरपताना, कापणी करताना, मळताना, रास गोळा करताना जेव्हा जेव्हा त्यांचं काळीज उकललं तेव्हा तोंडातून शब्द फुटले असणार. असे कैक उद्गार याच गरम हवेत विरले आणि इथल्याच तापल्या मातीत गळणाऱ्या घामासोबत जिरूनही गेले. तुम्हा साऱ्यांच्या शब्दांतून या खाणाखुणा उमटतील? असा विचार मनाशीच करीत राहिलो. जे बोललो होतो त्यातलं त्यांच्यापर्यंत किती पोहोचलं माहीत नाही, पण ही टळटळीत दुपार मात्र आयुष्यभर लक्षात राहील.

पण या कवी संमेलनापेक्षाही आमच्या भागातल्या विभागीय साहित्य संमेलनावेळी एक वळ मनावर उमटलाय तो कायमचा.

मार्केट यार्डात येणाऱ्या कापसाच्या गाडीकडून प्रत्येक क्विंटलमागे दहा रुपये कापून घेतले जात असल्याची बातमी मला कळाली. काही शेतकरीच तशा वसुलीच्या पावत्या घेऊन आले. मी रामच्या िपट्रिंग प्रेसवर होतो. त्याला विचारलं, ‘तू इथं मोंढय़ात प्रेस चालवतो, तुला कसं माहीत नाही?’ त्यालाही याची खबर  नव्हती. कोणतं तरी विभागीय साहित्य संमेलन अन् त्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली! छापील पावत्या त्यासाठी केलेल्या. इथं शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी आला तर ग्रेडर त्याला पाडून भाव देणार. अन् दलालांनी वजन वाढविण्यासाठी कापसावर पाणी मारून आणलं किंवा कापसाच्या भोतात दगड टाकून आणले तरीही त्यांना चढा भाव मिळणार. आधीच मापात पाप अन् त्यात पुन्हा ही वसुली. मोंढय़ात जो शेतमाल येईल त्यावरही अशीच वसुली क्विंटलमागे चाललेली. माहिती घेतल्यानंतर कळालं, की हे संमेलन गावाच्या बाहेर अन् डोंगराच्या पायथ्याला बाजार समितीनं घेतलेल्या नव्या जागेवर पार पडणारंय. सध्या फक्त रस्त्याला या नव्या जागेचा फलक लागलेला. तो जाता-येता दिसतो. बाजार समिती गावाबाहेर कशासाठी न्यायची? तर- सभापती बदामराव अस्वले यांची या नव्या जागेला लागूनच वीस एकर जमीन आहे. त्या जमिनीचा भाव कसा वाढणार? तर मग बाजार समितीच गावाबाहेर घेऊन जायची. खरेदी-विक्रीची लिलाव प्रक्रिया, मार्केट यार्ड यासाठी गावातली जमीन अपुरी पडतेय, शिवाय सगळ्या खेडय़ापाडय़ांतून येणाऱ्या वाहनांमुळं इथं लोकांना अडथळा होतो- अशी कारणं सांगून बाजार समिती गावाबाहेर न्यायचं जवळपास बदामरावांनी नक्की केलं. त्यानंतर संबंधित जागेवर तसा फलकही लागला. मुख्य रस्त्यावरून आत जाण्यासाठी रस्ता तयार झालाय. कंपाऊंडचं काम झालंय. विजेचे खांब उभारलेत. आता कधीही बाजार समिती डोंगराच्या पायथ्याला असलेल्या सपाट जागेवर जाऊ शकते. अन् याच जागेवर संमेलन भरणार असल्याचं कळालं. रामला म्हटलं, त्या संमेलनाला काडी लागू दे, पण आधी ही कापसाच्या अन् शेतमालाच्या क्विंटलमागे होणारी वसुली थांबली पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष बदामराव अस्वले यांच्या फर्मानानुसार हा सगळा वसुली कार्यक्रम सुरू झाला होता. रामला सोबत घेतलं. त्याच्या गाडीवर बसलो अन् चार-दोन ठिकाणची वसुलीची पावती पुस्तकं ताब्यात घेतली. काही अडतींमध्ये झटापटही झाली. संमेलन भरवणारी मंडळी दोन तासांत प्रेसवर हजर. आपल्या गावात हा असा सोहळा होतोय, तर त्याला विरोध कशाला? उलट, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संमेलनाला मदत केली पाहिजे.. असं दळण त्यांनी सुरू केलं. हा विषय बदामरावपर्यंत इतक्या लवकर जाणारच नव्हता. मुळात ते कुठंतरी बाहेरगावी असण्याचीच शक्यता जास्त होती. आम्हाला समजवायला आलेली मंडळी हेही सांगू लागली की, ‘आपले स्वागताध्यक्ष चर्चा करतीलच तुमच्यासोबत, पण आम्ही विनंती करायला आलो आहोत. अन् संमेलन आता एकदमच तोंडावर आलंय. त्याला गालबोट लागायला नको.’

मी आलेल्या सगळ्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही थोर आहात. संत ज्ञानेश्वरांपेक्षाही महान आहात.’’

‘‘अहो, असं काय बोलताय नामादा..?’’ त्यातला एक जण एकदमच अजिजीच्या सुराला आला.

मी म्हणालो, ‘‘कसं आहे.. ज्ञानेश्वरांनी रेडय़ामुखी वेद वदवले असं लोक बोलत असतात. माझा त्यावर विश्वास नाही. पण बदामराव स्वागताध्यक्षाचं भाषण करणार, ही कृतीही मला त्या कथित कृतीइतकीच थोर वाटते. एकच करा- त्या भाषणात एकही जोडाक्षर येऊ देऊ नका.’’

या सर्वानी मिळून बदामरावांना बोहल्यावर बसवलं. गावाबाहेर बाजार समितीच्या ज्या नव्या मोकळ्या जागेवर साहित्य संमेलन होणार, त्या जागेचाही लोकांना परिचय होणार. हळूहळू बाजार समिती त्या जागेवर स्थलांतरित होणार. तिथली चहलपहल वाढणार. अन् काही दिवसांनी बदामरावच्या जमिनीचाही भाव वाढणार. पण आता काही वाद झाला अन् बदामरावानं अंग काढून घेतलं तर साहित्य संमेलन होणारच नाही. माझ्यासमोर बसलेल्या चार-पाच जणांच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसू लागली.

तेवढय़ात राम म्हणाला, ‘‘आम्ही संमेलन उधळणार.’’

मग तर ते सारेच हबकून गेले. मग रामनं बदामरावची आणखी खिल्ली उडवली. तो म्हणाला, ‘‘बदामरावचा अन् साहित्याचा संबंध काय? साहित्य म्हणजे सामान नाही. एकदा कशाचा तरी कोनशिला समारंभ होता बदामरावच्या हस्ते. बदामराव त्या संगमरवरी दगडापुढं उभे होते तरीही विचारू लागले, कोण शिलाय् कुठंय? अन् आरंभ कधी करायचा? अशा माणसाला तुम्ही स्वागताध्यक्ष करताय. ते जाऊ द्या, पण साहित्य संमेलनासाठी चक्क शेतकऱ्यांकडून वसुली? यापुढं एक रुपयाही वसुली होऊ देणार नाही. अन् झालीच तर संमेलनाचा मांडवच उधळून लावू..’’ अशी धमकीच रामनं दिली. तरीही तोवर बरेच पसे वसूल झाले होते. कुठल्या कुठल्या गावाच्या शेतकऱ्यांच्या पावत्या फाडलेल्या. काही पावती पुस्तकं आम्ही ताब्यात घेतली. लोकांचे पसे परत देणं तर शक्य नव्हतं. मग या संमेलनवाल्या चमूनं आम्हाला शब्द दिला, की यापुढं शेतकऱ्यांचा एकही रुपया वसूल केला जाणार नाही.

‘‘बदामराव एकटाच बाजार समितीमार्फत संमेलन घेऊ शकतो. अन् त्याचे खाजगी धंदेही कमीयत् का? कशासाठी लोकांचे खिसे कापता? ही तर नवी लेव्ही वसुली सुरू केली तुम्ही..’’ असं खडसावल्यावर त्यांच्यापकी कोणीच काही बोललं नाही. मात्र, सगळ्यांनी हात जोडून ‘एवढं कार्य निर्वघ्निपणे पार पडू द्या,’ अशी विनवणी केली.

‘‘तुम्ही एकदा सगळी वेगवेगळ्या आडतींवर दिलेली पावती पुस्तकं परत आणून द्या. तुमच्यासमोरच आम्ही काडी लावतो,’’ असं मी त्यांना म्हणालो.

कोणतीही खळखळ न करता त्या सगळ्यांनी निमूट माना हलवल्या. ते सगळे उठून गेल्यानंतर राम म्हणाला, ‘‘अरे यातले चार-दोन जण तर हबकलेच होते.’’ मी विचारलं, ‘‘कसं?’’ तर तो म्हणाला, ‘‘थेट पोटावरच पाय. त्या सगळ्यांनी कामं वाटून घेतलीत. यातला एक जण कालच प्रेसवर येऊन गेला. म्हणाला, रामभाऊ, तुम्ही फक्त कोटेशन देता का? स्मरणिकेचं काम मी घेतलंय अन् ते बाहेरून छापून आणणाराय.’’ मी म्हटलं, ‘आनंद सगळा. धन्य बदामराव अन् धन्य त्यांचे लाभार्थी. वरमाय िशदळ अन् वऱ्हाडही शिंदळ.’

.. होणारी वसुली तर थांबली, पण गेल्या चार-आठ दिवसांत जी वसुली झाली त्याचं काय? त्या दिवशी रात्री मला टकळी लागली. झोपच येईना. यावर काहीतरी वाट शोधली पाहिजे. दुसऱ्या दिवशी रामला म्हणालो, ‘‘या वसुलीचा संमेलनाध्यक्षानं निषेध नोंदवला पाहिजे यासाठी त्याच्यावर दबाव आणू. नाही तर ज्यांच्याकडून पावत्या फाडल्यात अशा सगळ्या शेतकऱ्यांना गोळा करून संमेलनाच्या मांडवात घुसवून देऊ.’’ तो म्हणाला, ‘‘ही आयडिया चांगलीय.’’ ‘‘फक्त कुठंच बोलू नको. या विषयावर आपला संवाद आता थेट संमेलनाध्यक्षासोबतच..’’ असं त्याला सांगितलं. संमेलनाध्यक्ष कधी येणार याचीही माहिती काढली. दुरून येणार असल्याने ते संमेलनाच्या आदल्या दिवशीच सपत्नीक येणार आणि त्यांचा मुक्काम गावाबाहेरच्या शासकीय विश्रामगृहावर असणार आहे असाही तपशील कळाला.

ठरल्या दिवशी सात-आठ जण सोबत घेतले. त्याआधी एक-दोन दिवसांपूर्वी बदामरावमार्फत निरोपही आला होता- एकदा भेटू आपण म्हणून. मी त्याला भेटलोही नाही अन् त्याला काही कळवलंही नाही. शासकीय विश्रामगृहावर रात्री पोहोचलो. आजूबाजूला झाडी सगळी. लाइट गेले होते. सगळाच अंधार. मेणबत्तीच्या उजेडात एका कक्षात काहीतरी हालचाली खिडकीतून दिसत होत्या. एक तर हे विश्रामगृह गावाबाहेर. आजूबाजूला वस्ती नाही. माणसांचा ठिकाणा नाही. आम्हीच अंधारात चाचपडत तिथं पोहोचलेलो. दारावर हलकीशी थाप मारली. अध्यक्ष- महाशय दरवाजा उघडून तसंच थबकले. मेणबत्तीच्या उजेडात आम्हा सर्वाचे चेहरे त्यांना दिसले असण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. इतक्या अनोळखी लोकांना त्यांनी ‘आत या’ असं म्हणणंही अपेक्षित नव्हतं. मीच म्हणालो, ‘‘सर, तुमच्याशी बोलायचंय. जरा बाहेर येता का?’’

त्यांना अंदाज येत नव्हता- हे नेमकं काय चाललंय! मी म्हणालो, ‘‘बाईंना थांबू द्या सर आतच. तुम्हीच बाहेर या. आपण समोरच्या व्हरांडय़ात बसू.’’ मग त्यांनी दार बाहेरून ओढून घेतलं. ‘‘आलो तेव्हापासून लाइटच नाही. त्यामुळं हा परिसर कसाय् हेही माहीत नाही. काहीच अंदाज येत नाही,’’ असं ते म्हणाले. मग त्यांना व्हरांडय़ाच्याही बाहेर आणलं. पायऱ्या उतरवून समोरच्या मोकळ्या पटांगणात आम्ही आलो. मी त्यांना माझी ओळख करून दिली. सगळे जमिनीवरच बसलो.

‘‘उद्या जे संमेलन होतंय, त्यासाठी बाजार समितीच्या यार्डात आलेल्या कापसातून, शेतमालातून प्रति िक्वटलमागे शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आलीय. आम्ही सगळे कार्यकत्रे आहोत. आमचं म्हणणं इतकंचय् की या प्रकाराचा तुम्ही तुमच्या अध्यक्षीय भाषणातून निषेध नोंदवावा..’’ असं मी म्हणालो. माझा राग या अध्यक्षांवरही होताच. आयुष्यभर इरसाल भानगडी आणि किस्से लिहिलेलीच या महाशयांची साहित्यसंपदा. जणू खेडय़ापाडय़ांत फक्त बावळट आणि मूर्ख माणसेच राहतात असे वाटावे यांचे लेखन वाचून. आपल्या गावात आलेत तर कुठं त्यांचा पाणउतारा करा, असं मला वाटलं. म्हटलं, आपला संबंध फक्त अध्यक्षांनी घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवावा एवढय़ापुरताच मर्यादित. बाकी त्यांचं संमेलन त्यांना लखलाभ.

अध्यक्ष म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणताय त्या प्रकाराची मला काहीएक माहिती नाही. पण आता शेवटी संमेलन भरवायचं म्हणजे पसा तर लागणारच ना? तो वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे ज्यांची कपात होतेय त्यांनी तक्रार करायला पाहिजे ना? तुम्ही बोलून काय उपयोग?’’

आम्हा बसलेल्यांपकी एकाचा आवाज वाढला. अंधार दाटला होता. त्या अंधारात हा आवाज आणखीच सणसणीत वाटला. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर काय चाललेय हेही समजत नव्हते. तरीही धाडस गोळा करत ते बोलत होते. ‘‘हे पहा, मला माहिती घ्यावी लागेल. घाईघाईत मला काही निर्णय घेता येणार नाही.’’

‘‘माहिती कशाला घेता? आम्हीच तुम्हाला पावत्या आणून दाखवतो. शेतकऱ्यांकडून सक्तीनं वसुली केलेल्या पावत्या दाखवल्यावर तर भरोसा बसंल ना?’’ अंधारात आमच्यामधूनच उमटलेला आणखी एक आवाज. आता वाटलं, थेट पुरावाच म्हटल्यावर अध्यक्ष नरमतील. पण तसं झालं नाही.

‘‘हे बघा, मी काय बोलावं, काय बोलू नये, हे तुम्ही मला सांगू नका. मी अध्यक्षपदावरून माझ्या भावना व्यक्त करीन. पण हे असं करा, तसं करा असं तुम्ही मला सांगू नाही शकत.’’ अध्यक्ष बोलत असतानाच आतापर्यंत बांधून ठेवलेला संयम तट्दिशी दावं तुटावं तसा तुटला.

‘‘ठिकय्, तुम्ही तुम्हाला वाटतं तसं बोला, आम्ही आम्हाला जे करायचं ते करू. नाही तरी तुमच्या भाषणानं असा कोणता उजेड पडणाराय? आजवर आमच्या बापाची टिंगलटवाळी करणारंच लिहिलंय तुम्ही. आयुष्यात दुसरं काहीच लिहिता आलं नाही. लोकांचं मनोरंजन करण्याचा धंदा मात्र छान जमला तुम्हाला. खेडय़ातली सगळी माणसं बेरकी किंवा भोळसर, वेडगळ.. असल्या भाकडकथा तुम्ही सांगितल्यात. गावातल्या सगळ्या असलेल्या- नसलेल्या भानगडी सांगून अन् चहाटाळ किस्से ऐकवून तुम्ही गल्ला गोळा केलात. आता तुम्हाला साधा निषेध नोंदवा म्हटलं तर तुम्ही मी नाही त्यातली म्हणताय..’’ माझा आवाज वाढला.

अध्यक्ष थांबले होते त्या खोलीचं दार करकरलं अन् आतला अंधुक उजेड थेट व्हरांडय़ापर्यंत रांगत आला. आमचा गोंधळ ऐकून बाई गडबडीनं बाहेर आल्या. काय चाललंय त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही घाबरू नका. आम्ही फक्त सरांशी बोलायला आलोय.’’

तर त्या म्हणाल्या, ‘‘अहो, असं कुठं बोलणं असतं का? किती जोरजोराने आरडाओरडा करताय तुम्ही.’’

अध्यक्षांची तंतरली होती, पण तरीही ते बाईंना म्हणाले, ‘‘तू घाबरू नकोस. आत जा अन् दार बंद करून बस. येतोच मी.’’

तरीही बाई हलल्या नाहीत. आम्ही वर्तुळाकार बसलेलो अन् आमच्या बाजूला बाई उभ्या. एवढय़ात मोटारसायकलचा आवाज आमच्याच दिशेनं अंगावर चालून आला. पाहता पाहता विश्रामगृहाच्या आवारात ती मोटारसायकल दणदणाट करीत घुसली. आमच्या सर्वाच्याच तोंडावर भगभगीत उजेडाचा एक झोत आला अन् ती बंद झाली. राम उतरून धावतपळत आला. मला म्हणाला, ‘‘चल आटप, अन् मागं बस.’’

मी विचारलं, ‘‘कुठं?’’

‘‘तू फक्त बस. लवकर निघायचंय आपल्याला..’’ असं म्हणत त्यानं मला जवळपास दंडाला धरून उठवलं. बाकीच्यांनाही तिथून निघायला सांगितलं. जाताना मला अध्यक्षांवर साधा एक कटाक्षही टाकता आला नाही. काय झालंय काहीच कळत नव्हतं. विश्रामगृहाबाहेरच्या आवारातूनही त्यानं जोरात गाडी पळवली अन् झाडी पार करून आम्ही माझ्या गावाकडच्या रस्त्याच्या दिशेनं निघालो. गाडीच्या उजेडानं पुढचा रस्ता दिसत होता, पण रस्त्यावरचे दगडगोटे चुकवताना रामची तारांबळ उडत होती. तरीही गाडीचा वेग तो कमी करत नव्हता. शेवटी त्याला जरा वैतागून विचारलं, ‘‘नेमकं झालंय काय ते तरी सांग.’’

‘‘अण्णा गेले. प्रेसवर तुझ्या गावाकडचा माणूस निरोप घेऊन आला होता.’’ रामनं सांगितलं. अण्णा म्हणजे माझा बाप. क्षणात साऱ्या अंगातला जिवंतपणा आटल्याचा अनुभव आला. मोटारसायकलवर पाठीमागं जणू माझं धूड चाललंय असं वाटलं. गेल्या काही दिवसांत अण्णा अंथरुणावर पडून होते. मी असाच कधीतरी वाऱ्यावाहटुळीसारखा गावाकडं येणार अन् निघून जाणार. शेवटच्या दिवसात मी जवळ राहावं असं त्यांना वाटत होतं, पण ते घडलं नाही. आणि आता ही बातमी. राम काहीच न बोलता सुसाट गाडी पळवत होता. मीही जवळपास गप्प होतो. आतल्या आत कढ दाटून येत होते. डोळ्यातून गालावर पाणी ओघळत होतं. सारखा पुसत होतो तरीही डोळ्यांचं झरणं चालूच होतं. रामच्या लक्षातही हे आलं असणार. पण तोही काहीच बोलत नव्हता. मोठमोठे खड्डे अन् रस्त्यावर अधूनमधून अंथरलेली खडी यावरून आदळत गाडी जात होती. लहानपणापासूनच्या असंख्य गोष्टी तरळू लागल्या. मधूनच डोळे गच्च मिटून घेऊन अवतीभवतीचं काहीच दिसू नये, मनाच्या तळकोपऱ्यातली कालवाकालव तशीच निमूटपणे सोसावी म्हणून गप्प गप्प होत गेलो. म्हणावा तसा वेळ अण्णाला देता आला नाही. शेवटच्या काळात जरा जवळ राहायला पाहिजे होतं असं आता वाटलं तरी उपयोग नाही. काय काय दाटून येतंय मनात.. सुंभ तुटलेल्या बाजेवर पडून आभाळातल्या चमचमत्या चांदण्याकडं पाहत लहानपणी अण्णांसोबत गोष्टी ऐकताना जागून काढलेल्या रात्री. बारक्या पायांचं वजन किती पडणार, पण त्यांच्यासोबत कापसाचा भोत तुडवण्यासाठी केलेला आटापिटा. रात्री गावात रंगणारी झिमडीवरची भजनं, आराद्यांचा मेळा, कान्होबाची काठी फिरविण्याआधी गावातल्या चौकाचौकात घुमलेला डफाचा ताल.. हे सगळं पाहण्यासाठी कधी त्यांचं बोट धरून, तर कधी गर्दीत वरतून पाहता यावं म्हणून त्यांच्या खांद्यावर बसून कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी केलेली धडपड. या साऱ्या गोष्टी डोळ्यांवाटे कोमट होऊन ओघळत राहिल्या.

.. हा सारा लहानपणीचा काळ अन् त्यानंतरही वाढत्या वयासोबत बापाची गच्च रुतलेली प्रतिमा. ती कशातूनही डोकं वर काढायची. म्हणजे त्या कवी संमेलनातही मी कवींना म्हणालो, कष्ट आणि जगण्यातला आनंद शोधणारे क्षण यांची सरमिसळ धान्यातल्या खडय़ासारखी निवडता येत नाही, ती एकजीवच झालेली असते. त्यासाठी दिवसभर खताची गाडी हाकणारा अन् रात्री जत्रेत चुरगळलेली नोट सोडणारा बाप मला आठवला होता. आता साहित्य संमेलनातल्या वसुलीवरून जेव्हा अध्यक्षांसोबतच भांडायला उठलो तेव्हा ‘नाही तरी आयुष्यभर माझ्या बापाची टिंगलटवाळी करण्यापलीकडं काय लिहिलं तुम्ही?’ असं म्हणतच भिडायच्या तयारीत होतो. मी कधीच आमचे पिताजी किंवा माझे वडील असे म्हणालो नाही. कधीही ‘माझा बापच’ यायचं तोंडातून. तो असा उसळी घ्यायचा माझ्यातून. त्याच्यातला तरतरीतपणा वयानुसार कमी होत गेला. माझं वय वाढत गेलं. हळूहळू अण्णा- म्हणजेच बाप थकत गेला. कधीकाळी कनातीच्या ताणलेल्या दोरीसारखा दिसणारा बाप बारदाण्यातली सुतळी भासू लागतो तेव्हा वारा-वारा होतो जीव. अन् फक्त सावली दिसू लागते आपल्या मोठं झालेल्या भुताची.

.. गावापर्यंतचं अंतर तीसेक किलोमीटरचं; पण का कुणास ठाऊक, हा खडीनं अंथरलेला रस्ता उरकतच नाहीये. डोळ्यांचं झरणं थांबलंय, पण एक आभाळाएवढी पोकळी जाणवतेय मनात. मी उजवा हात आडवा करून रामच्या खांद्यावर ठेवतो. पाठोपाठ त्यावर डावा. तो जरासुद्धा बिचकत नाही. दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवल्यानंतर पुन्हा भडभडून आलं अन् या दोन्ही हातांच्या जखडून टाकणाऱ्या मिठीत मी गच्च तोंड

खुपसलं.

(आगामी कादंबरीतील अंश. ‘काही पाने’ हे कादंबरीचे शीर्षक नव्हे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2019 1:09 am

Web Title: writer and social worker
Next Stories
1 गोल्डा मेयर
2 विदा आजचं सोनं!
3 कारण
Just Now!
X