माझ्या शेजारी नाशिक येथे जुन्या पिढीतील हिंदी सिनेतारका इंद्राणी मुखर्जी राहतात. चार-पाच महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पाहुण्या म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीतील त्यांच्याच पिढीतील सिनेतारका माया मुखर्जी पाहुण्या म्हणून राहायला आल्या. सोबत त्यांचे पतीही होते. पतिराजांचे वय वर्षे ९१ आणि मायाजी ८६ वर्षांच्या. बऱ्याच वर्षांपूर्वी त्या व त्यांचे पती दिलीप हे शिलाँगला गेले होते. शिलाँग ही अरुणाचल प्रदेशची राजधानी. त्यांचा मुक्काम मुख्यमंत्री गार्विन प्यू (Garwin Pew) यांचे पाहुणे म्हणून शिलाँग क्लबमध्ये होता. १९८१ साली. मुख्यमंत्री मायाजींचे कॉलेजमधील सहाध्यायी. अतिथीगृहात मायाजींना सकाळी लवकर जाग आली. त्या व्हरांडय़ात येऊन चहा पीत बसल्या. दिलीपदांना जाग आल्यावर तेही बाहेर आले. त्यांना जाणवले की आसमंतात एक मादक गंध पसरला आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेऊन गंधाचा आस्वाद घेतला आणि मायाजींना म्हणाले, ‘‘एवढय़ा सकाळी कोणते सेंट लावून बसली आहेस?’’ त्या उत्तरल्या, ‘‘कुठे? मी कुठलाच सेंट लावलेला नाही. इथे बसल्यापासून मलाही हा गंध जाणवतो आहे. वेगळा. मादक. मन लुभावन. क्या बात है।’’

त्यांनी तिथल्या नोकराला बोलावले व विचारले, ‘‘ये कैसी खुशबू है?’’ तो म्हणाला, ‘‘येथून थोडय़ाच अंतरावर हिमचंपा का पेड है। उसके फूल जब खिलते है तो पुरा माहोल गंधित हो उठता है।’’

मायाजी आणि त्यांचे पती दोघेही त्या नोकरासोबत त्या झाडाजवळ गेले. नेटका पर्णसंभार असलेल्या त्या वृक्षावर छोटय़ा कमळाच्या आकाराची शुभ्र फुले उमलली होती. रबराच्या झाडासारखी पाने. काही मधमाश्या मधाच्या लोभाने फुलाभोवती आणि फुलावर घिरटय़ा घालत होत्या. क्या बात है। दोघेही तो वृक्ष न्याहाळीत आणि त्या सुगंधात न्हात बराच काळ तेथे स्तब्ध उभे होते. मन भरत नव्हते तरी खोलीवर परतावेच लागणार होते. ते खोलीवर परतण्यासाठी निघाले. नोकर सोबत होताच. तो म्हणाला, ‘‘साहेब, या फुलावर ज्या मधमाश्या मध गोळा करण्यासाठी येतात त्यांना या गंधाच्या तीव्र मादकतेने भोवळही येते.’’ मधमाश्यांना भोवळ येते ही कल्पनाच केवढी गोड आहे! गजलमधल्या एखाद्या शेरासारखी. बस्! दोघांच्याही मनात हिमचंपेने वारूळ केले.

पुढे नोकरीनिमित्त ते दोघे अमेरिकेला गेले. गेली वीस वर्षे त्यांच तेथेच वास्तव्य होते. दोघेजण जेव्हा काहीसे निवांत असत तेव्हा हिमचंपेच्या आठवणींच्या मुंग्या मनाच्या वारुळातून बाहेर पडत आणि त्यांचा ताबा घेत. दोघांनाही हिमचंपेने झपाटले होते. त्याच्या गंधाचे गारूड डोक्यावरून उतरायला तयार नव्हते. मात्र, पुन्हा हे झाड त्यांना कधीच कुठे आढळले नाही. अमेरिकेतून परतल्यावर ते कोलकात्याला स्थायिक झाले.

नाशिकला इंद्राणी मुखर्जीकडे ते पाहुणे म्हणून आले असता त्यांनी ही कथा त्यांना सांगितली आणि म्हणाले, ‘तुली (इंद्राणी मुखर्जी यांचे हे टोपणनाव!), कोलकात्याला आमच्या अंगणात जागा आहे. हिमचंपेचे हे झाड आम्ही लावू इच्छितो. त्याचे रोप कुठे मिळेल का?’ त्यावर इंद्राणी म्हणाल्या, ‘अरे, हमारे पडोसी दादा पाटील पेडों का सब जानते है।’ खरे तर निलगिरीची शेती केल्यामुळे मला फक्त निलगिरी वृक्षाची बऱ्यापैकी माहिती होती. तसा मी वृक्षजगतातील एका विटेवरचा पुंडलिक! निलगिरीच्या विटेवरचा!! पण एक का असेना, वीट भक्कम. लोकांचा समज असा की, मला सगळ्याच वृक्षांची माहिती आहे. अर्थात त्यांचा हा गैरसमज मला सुखावणारादेखील आहेच. असो.

मला त्यांच्याकडून बोलावणे आले. मी गेलो. मायाजी आणि दिलीपदांनी हिमचंपेची सर्व स्टोरी मला ऐकवली आणि म्हणाले, ‘मी नव्वदी ओलांडली आहे. मायाही नव्वदीकडे झुकली आहे. देवाने सगळे काही दिले आहे. त्याच्याकडे आमचे काहीही मागणे नाही. तरीही एक इच्छा अपूर्ण आहे. आंगन में हिमचंपा चाहिये। पौधा (रोप) कोठे मिळेल का?’

या वर्णनाच्या वृक्षाबद्दल मी कधी ऐकल्याचे वा तो पाहिल्याचेही आठवत नव्हते. मी त्यांना म्हणालो, ‘याचे बॉटनिकल नाव सांगा, म्हणजे तपास करणे सोपे जाईल.’

बॉटनिकल नाव त्यांना माहितीचे होते. ते त्यांनी सांगितले- MAGNOLIYA GRANDIFLORA. मग नेटवरून सर्च सुरू झाला. माहिती मिळाली. झाडाचे व फुलांचे फोटोही मिळाले. झाड व फुलांचे फोटो पाहिल्यावर आठवले. अरे, याची आणि आपली भेट झाली आहे. काश्मीरमध्ये श्रीनगरला परीमहलमध्ये आम्ही थांबलो होतो याच्यासमोर बराच वेळ.. मायाजी आणि दिलीपदांसारखे! एका जाणकार गाईडकडून त्याचे बॉटनिकल नावही लिहून घेतले होते एका चिटोऱ्यावर. नाशिकला परसात लावावे म्हणून! पण पुढे त्याला साफ विसरलो. मुखर्जी दाम्पत्य विसरले नव्हते. बरे झाले यानिमित्ताने आठवण झाली. रोप मिळण्याची शक्यता असलेल्या मित्रांना व्हॉटस्अ‍ॅपवर व मेलवर माहिती पाठविली आणि त्यांच्याकडे हिमचंपेच्या रोपांची मागणी केली. ‘रोपे आहेत’ म्हणून एकाचा निरोप आला. विचारले, ‘किती रोपे आहेत?’ म्हणाला, ‘अकरा.’ त्वरित सगळी रोपे पाठवायला सांगितले. रोपे आली. त्यातली दोन माया मुखर्जीना दिली. सहा इंद्राणी मुखर्जीना दिली. त्यांच्या बंगल्याचे आवार तीन एकरांचे आहे. दोन माझ्या परसात लावली. एक चित्रकार सुभाष अवचटच्या खंडाळ्यातील बंगल्यासाठी राखून ठेवले. त्याचे आज नेतो, उद्या नेतो असे चालले आहे. जाऊ द्या- आपल्याला काय? गंधानंदाला तोच मुकणार आहे. मग बसेल नाशिकच्या वाढलेल्या वृक्षासमोर कॅनव्हास घेऊन पेंटिंग करत! पण पेंटिंगमध्ये गंध कसा येणार? कदाचित सुभाषच्या चित्रात येईलही, कारण तो चित्राशी काढताना इतका एकरूप होतो, की त्या समाधी अवस्थेत काढलेल्या चित्राला येऊही शकेल मादक गंध. ऑस्कर वाईल्डच्या कादंबरीतील डोरियन ग्रेच्या चित्रासारखे ते जिवंत असेल.

एखादे झपाटलेपण माणसाला किती घट्ट बांधून ठेवू शकते. मुखर्जीचे ते झपाटलेपण त्यांना रोप दिले त्या दिवशी संपले. आता ते गंधरूप झपाटलेपण माझ्या मानगुटीवर बसले आहे. रोज सकाळी जाग आल्याबरोबर मी बाहेर पडतो. त्या दोन्ही झाडांजवळ जातो. त्यांना डोळे भरून पाहतो. आई आपल्या शांत निजलेल्या बाळाकडे पाहते तसे. आशा चाळवते. लोभ जागा होतो. वाटते, आता ही रोपे मोठी होतील, त्यांचे वृक्ष होतील, पांढऱ्या फुलांनी ते लदबदतील, आसमंत गंधभारित होईल, मधमाश्या आकर्षित होतील, मधप्राशनासाठी येतील, तृप्त होतील, धुंद गंधाने त्यांना भोवळ येईल, त्या लडखडत उडतील.

माझे हे वय म्हणजे परतीचा प्रवास आहे. या प्रवासात इच्छांचे ओझे आपण उतरवीत असतो. सत्ता नको, संपत्ती नको, कीर्ती नको.. या उतरंडी उतरवण्यात आपल्याला काही प्रमाणात

यशही मिळते. पण हिमचंपेच्या या दृश्याची

इच्छा फुलपाखरासारखी येते आणि अलगद खांद्यावर बसते. रेशमाचे असले, तरी हे बंधच असतात..
विनायक पाटील