10 April 2020

News Flash

निसटणाऱ्या फुलपाखराचा रंग…

माणूस आयुष्यामध्ये फार रंगून जातो.

मी कोणत्याही बंधनात फसलेलो नाही. माझा पाय मोकळा आहे. मी निघून जाईन तेव्हा तुमच्या हाती फक्त माझे काही (अंत) रंग असतील. बोटाला निसटलेल्या फुलपाखराचा रंग लागतो तेवढेच!

कोवळ्या वयात हे पंखांवरचं पेंटिंग ओलं असतं. नंतर मन निर्ढावत सुकत जातं. अखेरीला तर निव्वळ पानगळ बघायला मिळते. मधूनच आठवतं. मधूनच विसरत पडतो. माणूस ब्लँक  होऊन बसतो. माझ्या आईचं, आशा गवाणकरांचं असं काही होण्याआधीच तिने तिच्या बालसाहित्य – लेखनाचे, कल्पकतेचे, प्रतिभा शक्तीचे पंख काढून ठेवले. मग मृत्यूने शांतपणे तिला डंख केला. दुखणं कॅन्सरचं निघालं होतं.

माणूस आयुष्यामध्ये फार रंगून जातो. तो हे विसरतो की, रंगमंच त्याला कायमचा दिलेला नाही. पडदा कधीही पडू शकतो. सरहद्दीवरचा मर्द जवान शहीद होतो. उरतात फक्त त्याच्या शौर्याच्या आणि कपटी दुश्मनाच्या क्रौर्याच्या आठवणी..पण आपला तो धीट, धाडसी सैनिक परत कधीच येत नाही. मग तो आपला क्लासमेट होता तेव्हा मैदानी खेळ किती मस्त खेळायचा तेही आठवतं. काही सैनिक तर आयुष्याचं रणांगण लढवत असतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे असेच एक सुपुत्र होते. सत्य सांगणारा जो ‘नवा शिपाई’ आपल्या केशवसुतांना अभिप्रेत होता, तोच दाभोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत दिसतो. स्वप्राणाने त्यांनी सत्याची तुतारी फुंकली आणि सत्त्व राखताना लढाईत कायम विवेक ठेवला! विचार करणाऱ्या मराठी तरुणाच्या मनात कळत-नकळत विज्ञाननिष्ठेचा दिवा लावला. माझ्या विद्यार्थ्यांला, मैदानी खेळाडू असलेल्या नरेंद्र लाडला जेव्हा मी सांगितले की, डॉ. दाभोलकर उत्कृष्ट कबड्डीपटू होते, तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. चपळ, चतुर डॉक्टर सखोल व निर्भय भाषण करत. लेखनात अचूकपणा आणि सोप्या भाषेत केलेली चिकित्सा आणत. त्यांचे विचार महाराष्ट्रातून पुसून टाकणे ही केवळ अशक्य बाब आहे. काही फुलपाखरांचे रंग असे दीर्घकाळ कागदाच्या प्रतलावर ठळक होत राहतात.

कलेच्या क्षेत्रात ग्लॅमरस रंग पुसट झालेले मला दिसले. ऐटीत असलेली एखादी माध्यम परी असाध्य आजारामुळे ‘मीडिया’ सोडावा लागणार हे लक्षात आल्यावर एकांतात जी आसवं ढाळते, त्याची भावनिक ओळ माझ्यापर्यंतही प्रसंगी पोहोचली. झगमगणारे हे क्षेत्र क्षणभंगुर आहे. तुम्हाला झगमग दिसते. तगमग दिसत नाही. ‘नाचो प्यारे मन के मोर’ चा मनपसंत मोसम काही टिकत नाही. ‘दोन दिसांची रंगतसंगत’ हे तर कवी मंगेश पाडगांवकरांनाही ठाऊक होतं.

पु.लं.चं वलय इतर कोणत्याही विनोदनिष्ठ लेखकाला मिळालं नव्हतं, पण वृद्धत्वाने त्यांनाही कंपयातनाच दिल्या. हजारो लोकांना हसवणारा कलावंत असा एकाकी होऊन ढासळतो, तेव्हा मला ब्रह्मांडात कुठेही ‘ईश्वर’ नावाचा कुणी शिल्लक नाही याचा तो पुरावाच वाटतो.

अर्थात जरी फुलपाखरू प्राण सोडून मोकळं झालं, बालकवींसारखं वाऱ्याच्या लहरींवर उडणारं लहरी फुलपाखरू अगदी अकाली निसटलं, तरी आपण ते आपल्या स्मरणात, वाचनात, गाण्यात आणि चर्चेत जिवंत ठेवायचं असतं. ते मात्र आपण रसिकतेनं करू शकतो.

‘आनंदी आनंद गडे’ किंवा

‘माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे’

आपण विसरून जाणं शक्य तरी आहे काय? मी तर ग्रामीण भागात लहान मुलांचा शाळकरी कार्यक्रम करत असलो, तरी अजूनही बऱ्या असलेल्या माझ्या आवाजात त्यांना ‘मनीमाऊचं बाळ – कसं गोरंगोरं पान’ हे शरद मुठेंचं बालगीत म्हणून दाखवतो. हा गोडवाच आपल्याला जगवतो, नव्हे आपलं जगणं समृद्ध करतो. गवतात कोसळलेल्या फुलपाखराचा पंख नंतरही वाऱ्यावर थरथरत असतो बाप्पा!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 1:13 am

Web Title: nothing is permanent
Next Stories
1 मालाडचा म्हातारा
Just Now!
X