12 July 2020

News Flash

मालाडचा म्हातारा

अचानक तो यायचा थांबला. त्याचं घर नक्की कुठे ते आम्हा मिसरूड फुटलेल्या पोरांना ठाऊक नव्हतं.

‘मालाडचा म्हातारा शेकोटीला आला’ अशी ती ओळ होती. ‘कॅम्प फायर’च्या वेळी सवंगडय़ांच्या तोंडी ती मोठय़ा पोरांची बडबड गाणी असायची. त्यांना खास काही अर्थ होता असंही नाही. हा ‘मालाडचा म्हातारा’ कोण ते कळत नसे! ‘कोकणचा राजा झिम्मा खेळतो’मधला राजाही आम्हा मुलांना अज्ञातच होता!

तसं बघायला गेलो, तर ‘बागुलबुवा’ ‘भुतू’, ‘हावका’ ही मंडळी तरी आपण कुठं कधी पाहिलेली असतात! भय मात्र जरूर असतं. हळूहळू आपलीच ‘भुतं’ बनतात!

खूप थकलेला एक वृद्ध माणूस केवळ हातावर पोट घेऊन आमच्या गोरेगावात सिनेमाच्या गाण्यांची स्वस्त, मस्त पुस्तकं घेऊन यायचा. माझं सिनेमाचं आणि त्यातही पुन्हा गाण्यांचं वेड त्याने ओळखलं. ‘मालाडचा म्हातारा’ मग मी त्यालाच म्हणू लागलो. थंडीवाऱ्यातही तो पुस्तकं घेऊन फिरत असायचा. दहा पैसे किमतीला ती गाण्यांची हस्तपुस्तिका मिळायची. ‘दो कलियाँ’मधलं ‘बच्चे मन के सच्चे’ गाणं मी अशा पुस्तकातूनच पाठ केलं होतं. मालाडवरून गोरेगावपर्यंत चालत येणारा तो गरीब विक्रेता हळूहळू आम्हा मुलांना त्यातही मी सगळ्यात मोठा म्हणून मला त्याच्या गोष्टी सांगू लागला. त्याची सून त्याने काही कमाई करून आणल्याशिवाय त्याला धड जेवणही देत नसे. ‘कोरा चहा’सुद्धा पहाटे त्याचा त्याला करून घ्यावा लागत असे. सून आणि मुलाच्या शृंगारप्रणयात व्यत्यय येऊ नये म्हणून रात्री हा मालाडचा म्हातारा अनेकदा देवळात जाऊन झोपायचा. कुटुंबव्यवस्थेबद्दल माझ्या मनात त्या म्हाताऱ्याने काही प्रश्नचिन्हं निर्माण केली. कोवळ्या वयातच मालाडच्या म्हाताऱ्यासारखी माणसं बघून मला काही प्रश्न पडू लागले.

मालाडच्या म्हाताऱ्याला नातवंडं नव्हती. मी त्याच्याकडून इतकी पुस्तकं विकत घेत हातो की, ‘राजा और रंक’चं पुस्तक त्याने मला चकटफू भेट दिलं. ‘मस्ताना मोसम आ गया’ हे गाणं मी त्या बदल्यात सुरेल आवाजात म्हणून दाखवलं. ‘देवाची देणगी’ या अर्थाने म्हाताऱ्याने हात आकाशाकडे उंचावून माझं कौतुक केलं.

अचानक तो यायचा थांबला. त्याचं घर नक्की कुठे ते आम्हा मिसरूड फुटलेल्या पोरांना ठाऊक नव्हतं. तरी मालाडपर्यंत सायकल हाणत जाणाऱ्या बाळूने बातमी आणली की मधुमेहामुळे मालाडच्या म्हाताऱ्याचा तळपाय कापावा लागला. आता तो चालणार नाही! मला फार भीती वाटली. कारण तो हिंडता-फिरता होता तेव्हाच सून त्याचा अंत बघत होती. ‘म्हातारी’ मेल्यापासून मालाडचा म्हातारा पायपीटच करत होता. आता जगीच बसल्यावर त्याला खायला-जेवायला कुणी देईल का?

त्याची ती कळकट-मळकट पिशवी आणि त्यातली सिनेगीतांची अनेकानेक पुस्तकं, त्यातली बहारदार गाणी आजही मला आठवतात. इतकी जुनी गाणी मला तोंडपाठ आहेत याचं श्रेय अप्रत्यक्षपणे मालाडच्या म्हाताऱ्याला जातं आणि त्यातून त्याला काय सुटलं! त्या चारपानी पत्रकवजा पुस्तिकेचं दहा पैसे मूल्यसुद्धा पूर्णपणे त्याच्या मालकीचं नव्हतं. म्हाताऱ्याचा अंत कसा कधी झाला माहीत नाही! हाल मात्र खूप झाले असणार.

मालाडचा म्हातारा शेवटपर्यंत कष्ट करणाऱ्या, आयुष्यभर शोषण सहन करणाऱ्या, घरचे लोक असूनही परकेपण व ‘दुसरं बालपण’ आल्यावर पोरकेपण भोगणाऱ्या गायगरीब ज्येष्ठ नागरिकाचं प्रतीक वाटू लागला. अशांना इच्छामरणही ‘व्यवस्था’ देत नाही!

आता तर माझ्या लक्षात येतंय की, माझंही रूपांतर हळूहळू ‘मालाडच्या म्हाताऱ्यात’ होतंय. सरकारी अनुदान उद्या  मला सुरू झालं तरी फार अपुरं असणार आहे. शब्द कोरून पोट भरण्याचा लेखकीय वेडेपणा करत मी खपाटीला गेलो आहे. शेकोटीभोवती हल्ली पैशाच्या, भांडवलाच्या, नफ्याच्या आणि आर्थिक लबाडीच्याच गोष्टी असतात. त्यामुळे ‘मालाडचा म्हातारा’ शेकोटीला आला. तरी त्याला ‘तुझं काय इथं’ म्हणून हुसकावलं जाईल.

एखाद्या मॉलकडे किंवा टॉवरकडे अथवा पंचतारांकित हॉटेलांकडे, एकूणच ‘इंडिया’कडे आप्त ‘भारता’तल्या लोकांची एकटक बघण्याचीही हिंमत होत नाही. उगाच कुणाला वाटायचं, हा म्हातारा सोसायटी बघून ठेवतोय! रात्री भुरटी चोरी करायला यायचा!

देश खेडय़ापाडय़ांचा आहे असं आपण नुसतं म्हणतो, पण आम्हा कंगाल, कफल्लक लोकांना इथं कुठं, काय ‘स्पेस’ आहे? कूल कॅब बंद पडल्यावर ढकलण्याचे काही पैसे पावसापाण्यात मिळाले तर! ‘मालाडच्या म्हाताऱ्या’चं दु:ख, दैन्य तुमच्यापर्यंत थोडंफार पोहोचलं तरी २०१७ मध्ये मला नव्याने भरून येईल राव!

माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: old person of malad
Just Now!
X