16 February 2019

News Flash

बेलेनडॉर्फ आणि अपॅची वेब सव्‍‌र्हर

१९९३ ते ९५ या कालावधीत लिनक्स प्रकल्प अक्षरश: गगनभरारी घेत होता.

|| अमृतांशू नेरुरकर

१९९३ ते ९५ या कालावधीत लिनक्स प्रकल्प अक्षरश: गगनभरारी घेत होता. जगभरात विखुरलेल्या संगणक तंत्रज्ञ व प्रोग्रामर्सच्या ऐच्छिक सहयोगाने निर्माण होत असलेल्या या प्रणालीबद्दल तांत्रिक आणि व्यावसायिक वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. इंटरनेट युगाला याच कालावधीत सुरुवात होत होती. त्यामुळे अनेक संगणक तंत्रज्ञ इंटरनेटच्या सुलभ वापरासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालींची निर्मिती करण्यात गुंतले होते. ओपन सोर्स व्यवस्थेला मिळणाऱ्या यशामुळे यातल्या काही संगणक तंत्रज्ञांनी इंटरनेटसाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालींच्या निर्मितीसाठी ओपन सोर्स मार्गाचा अवलंब करायचे ठरवले.

यातील एक ठळक यशोगाथा होती अपॅची वेब सव्‍‌र्हरची निर्मिती! वेब सव्‍‌र्हर ही नावाप्रमाणेच इंटरनेट वापरतानाच्या वेळेला अत्यावश्यक असलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे. आपण आपल्याला हवी असलेली वेबसाइट उघडण्यासाठी वेब ब्राऊझरला (इंटरनेट एक्स्प्लोरर, क्रोम वगैरे) जेव्हा आज्ञा देतो, तेव्हा आपल्या आज्ञेची छाननी सर्वप्रथम वेब सव्‍‌र्हर करतो आणि आपल्याला हव्या असलेल्या वेबसाइटचे मुख्य पृष्ठ किंवा इतर कोणतीही माहिती आपल्यापर्यंत सर्वाधिक कार्यक्षमतेने कशी पोचवता येईल याचा निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही करतो.

इंटरनेटच्या सुरुवातीच्या दिवसांत, १९९४ मध्ये अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध इलिनॉईस विद्यापीठातल्या नॅशनल सेन्टर फॉर सुपरकॉम्प्युटिंग अ‍ॅप्लिकेशन (एनसीएसए) या संस्थेत काम करत असलेल्या रॉबर्ट मॅककूल या संगणक तंत्रज्ञाने आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत एनसीएसए एचटीटीपीडी नावाच्या वेब सव्‍‌र्हरची निर्मिती केली होती. त्या काळातील तो सर्वाधिक वापरला जाणारा वेब सव्‍‌र्हर होता. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मॅककूलने या प्रणालीचा सोर्स कोड संगणक तंत्रज्ञांसाठी खुला ठेवला होता.

सोर्स कोड हाताशी असल्याने जगभरातील संगणक तंत्रज्ञ आपापल्या गरजेनुसार त्यात यथायोग्य बदल करून त्याचा वापर करत होते. १९९४च्या मध्यावर मॅककूलने एनसीएसएमधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला. तोवर त्याच्याबरोबर या वेब सव्‍‌र्हर प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनीदेखील एनसीएसए सोडली होती. एचटीटीपीडी वेब सव्‍‌र्हरच्या लोकप्रियतेमुळे अनेक संगणक तंत्रज्ञ, तसेच विविध संकेतस्थळं हाताळणारे वेब प्रशासक अजूनही या वेब सव्‍‌र्हरचा उपयोग तर करत होतेच पण त्याचबरोबर त्याच्या सोर्स कोडमधल्या चुकांची दुरुस्ती तसेच त्याच्या कार्यक्षमतेमध्ये नवनव्या सुधारणा एनसीएसएला सुचवीत होते. दुर्दैवाने, मॅककूल व त्याच्या सहकाऱ्यांनी एनसीएसएला सोडचिठ्ठी दिल्यामुळे या सूचना, सुधारणांची अंमलबजावणी व्यापक स्तरावर होत नव्हती.

१९९४च्या अंतापर्यंत एचटीटीपीडी वेब सव्‍‌र्हरला कोणीही वाली उरला नव्हता व त्याच्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या आवृत्त्यांचा सुळसुळाट झाला होता. अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एचटीटीपीडी प्रणालीचा फोर्क तयार होऊन एक नवा प्रकल्प सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. ही शक्यता प्रत्यक्षात घडून यायला फारसा वेळ लागला नाही. १९९५च्या सुरुवातीलाच एचटीटीपीडीच्या सोर्स कोडचा आधार घेऊन एका नव्या वेब सव्‍‌र्हर निर्मितीच्या प्रकल्पाचा आरंभ झाला ज्याचं नाव होतं, अपॅची वेब सव्‍‌र्हर व या प्रकल्पाचा जनक होता कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाचा विद्यार्थी ब्रायन बेलेनडॉर्फ!

१९९५ साली विद्यार्थी असूनदेखील संगणक सॉफ्टवेअर विषयात निष्णात असल्यामुळे, बेलेनडॉर्फ ‘वायर्ड’ या पुढील काळात इलेक्ट्रॉनिक व संगणक क्षेत्रात पुष्कळ नाव कमावलेल्या मासिकात काम करत होता. त्या वेळेला तो या मासिकाची प्रत ग्राहकांना काही डॉलर्सच्या मोबदल्यात इंटरनेटवरच डाऊनलोड करता येईल अशा प्रणालीच्या निर्मितीत गुंतला होता. ई-पुस्तक संकल्पनेला नुकती सुरुवात होत होती व वायर्ड मासिक त्यात अग्रेसर होते.

या प्रणालीसाठी साहजिकच बेलेनडॉर्फने एचटीटीपीडी वेब सव्‍‌र्हरचा वापर करण्याचे योजले होते. त्याने या वेब सव्‍‌र्हरची नवीनतम आवृत्ती या प्रकल्पासाठी वापरात असलेल्या ऑनलाइन चर्चामंचावरच्या तंत्रज्ञांशी तसेच आपल्या विद्यापीठातल्या सहाध्यायींशी पाठपुरावा करून मिळवली. पण १९९५मध्ये या प्रकल्पाचे भवितव्य एनसीएसएमध्ये अधांतरी असल्याने, त्याने वायर्ड ई-मासिक प्रकल्पासाठी वापरात येणाऱ्या वेब सव्‍‌र्हर निर्मितीमध्ये त्याला साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचा एक गट  बनवला व एचटीटीपीडीवर बेतलेल्या पण तरीही स्वतंत्र अशा वेब सव्‍‌र्हर निर्मितीच्या प्रकल्पाची घोषणा केली. एचटीटीपीडी सव्‍‌र्हरच्या विविध आवृत्त्यांमधल्या सोर्स कोडच्या तुकडय़ांपासून बनला असल्याने या वेब सव्‍‌र्हरचं नाव ‘अ पॅची’ किंवा एकत्र उच्चार केल्यास अपॅची वेब सव्‍‌र्हर असं ठेवलं. असाही एक मतप्रवाह आहे की, बेलेनडॉर्फला हे नाव प्रथम सुचलं व त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याला या नावाची समर्पकता नंतर दाखवली. कसंही असलं तरी हे नाव अगदी आजतागायत टिकून राहिलं आहे.

या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर लगेचच बेलेनडॉर्फने अपॅची वेब सव्‍‌र्हरचा सोर्स कोड खुला केला व त्या प्रकल्पासाठी एका अधिकृत ऑनलाइन चर्चामंचाची स्थापना केली तसेच प्रकल्पासंबंधी नवनवीन माहिती पुरविण्यासाठी एक ई-मेल लिस्टसुद्धा तयार केली. पहिल्याच दिवशी तब्बल ४० जण या ईमेल लिस्टचे सदस्य झाले तर काही महिन्यांतच ही संख्या पाचशेच्या वर पोचली. प्रकल्प सुरू झाल्याच्या वर्षांच्या आतच अपॅची वेब सव्‍‌र्हरने लोकप्रियतेमध्ये एनसीएसएच्या एचटीटीपीडी वेब सव्‍‌र्हरला मागे टाकले.

एप्रिल १९९६ पासून मात्र अपॅची वेब सव्‍‌र्हरने लोकप्रियतेमध्ये आपला पहिला क्रमांक टिकवलाय तो अगदी आजपर्यंत! २००९मध्ये तब्बल १० कोटी संकेतस्थळांसाठी वापरला गेलेला तो पहिला व एकमेव वेब सव्‍‌र्हर होता. आजच्या घडीला त्याचा जागतिक बाजार हिस्सा ५०%च्या जवळपास आहे. यावरूनच त्याच्या वर्चस्वाची कल्पना येऊ  शकेल.

अपॅची व लिनक्स या दोनही जगद्विख्यात व वरकरणी सारख्या वाटणाऱ्या ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत, जे मुख्यत्वेकरून या प्रकल्पांच्या व्यवस्थापनासंबंधित आहेत. लिनक्सला अनेक दिग्गज संगणक तंत्रज्ञांचं भरीव योगदान लाभलं असलं तरीही लिनक्स म्हणजे लिनस टॉरवल्ड्स हे समीकरण अनेकांच्या मनात अगदी पक्कं बसलं आहे. टॉरवल्ड्समधले नेतृत्वगुण, ओघवतं वक्तृत्व, निर्णय घेण्याची क्षमता, मतभेद हाताळण्याचं कौशल्य व एकंदरीतच व्यक्तिमत्त्वातला करिश्मा या सर्वामुळे लिनक्सला टॉरवल्ड्सपासून विलग करताच येत नाही. बेलेनडॉर्फ हे जाणून होता की तो टॉरवल्ड्ससारखा ‘बॉर्न लीडर’ नसला तरी तो एक अत्यंत कुशल संघटक आहे. म्हणूनच त्याने अपॅची वेब सव्‍‌र्हरच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक नेतृत्वाचा पर्याय स्वीकारला.

लिनक्समध्ये फार काळपर्यंत कोणत्या सूचना व सुधारणा स्वीकारायच्या याचा निर्णय केवळ टॉरवल्ड्स घेत असे. अपॅचीमध्ये मात्र या निर्णयप्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं होतं. बेलेनडॉर्फने सुरुवातीपासूनच अपॅचीमध्ये भरघोस योगदान देणाऱ्या प्रमुख तंत्रज्ञांची एक मध्यवर्ती समिती गठित केली होती. अपॅची वेब सव्‍‌र्हरच्या अधिकृत आवृत्त्या प्रसिद्ध करणं, विविध समुदायांकडून आलेल्या सूचना, चुका दुरुस्ती तसेच सुधारणांवर निर्णय घेऊन त्यांचा अपॅचीच्या सोर्स कोडमध्ये अंतर्भाव करणं, प्रकल्पाची पुढील दिशा ठरवणं अशा अनेक बाबींवर ही समिती काम करायची (व अजूनही करते.) एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही समिती लोकशाही पद्धतीने काम करते. प्रत्येक निर्णय हा समितीतल्या प्रत्येक सदस्याचं मत अजमावून मताधिक्य पडताळून घेतला जातो. तसंच या समितीतले सदस्यसुद्धा त्यांच्या प्रकल्पातल्या सहभागानुसार ठरावीक कालावधीनंतर बदलत राहतात. थोडक्यात ओपन सोर्स प्रकल्प व्यवस्थापनाची एक भिन्न पण औपचारिक बैठक अपॅची वेब सव्‍‌र्हर प्रकल्पाने घालून दिली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

इंटरनेटच्या वापरासाठी वेब सव्‍‌र्हरइतकाच (किंबहुना अधिकच, कारण प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांशी याचा थेट संबंध येतो) दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वेब ब्राऊझर! या ब्राऊझरच्या ओपन सोर्स वाटचालीचा व प्रस्थापित प्रोप्रायटरी ब्राऊझर्सबरोबर झालेल्या त्याच्या तुंबळ युद्धाचा परामर्श आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

First Published on June 18, 2018 2:09 am

Web Title: apache http server