News Flash

‘ओपन’ चळवळीचा स्वातंत्र्यसेनानी

नैतिक अधिष्ठान देण्याचं काम सर्वप्रथम स्टॉलमननं केलं.

रिचर्ड स्टॉलमन

रिचर्ड स्टॉलमन हे सॉफ्टवेअर जगतातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसारासाठी त्याचे योगदान अत्यंत भरीव स्वरूपाचे आहे. किंबहुना ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या इतिहासातील (आणि वर्तमानातीलसुद्धा) सर्वात महत्त्वाच्या ५ व्यक्तींमध्ये त्याचा सहज समावेश होईल. १९८०च्या दशकापर्यंत ओपन सोर्स क्षेत्रात वेगवेगळ्या गटांमध्ये जे विखुरलेलं काम होत होतं त्याला एकसंध करण्याचं व त्यास एक नैतिक अधिष्ठान देण्याचं काम सर्वप्रथम स्टॉलमननं केलं.

त्याच्या काहीशा विक्षिप्त स्वभावामुळे व बेधडक वक्तव्य करण्याच्या सवयीमुळे त्याला जसे कट्टर समर्थक मिळाले तेवढेच टोकाचे विरोधकही लाभले. पण एका बाबतीत मात्र या दोन्ही गटांचं दुमत होणार नाही, तो म्हणजे त्याला असलेला ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा (ज्याला तो ‘फ्री सॉफ्टवेअर’ असं म्हणत असे आणि अजूनही म्हणतो) निरंतर ध्यास व त्याच्या प्रसारासाठी त्याला असलेली कळकळ!

जरी स्टॉलमनने भौतिकशास्त्र विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असलं तरी सुरुवातीपासूनच त्याचा ओढा हा संगणक व विशेषकरून सॉफ्टवेअरकडे होता. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच १९७१ मध्ये त्याने हार्वर्डपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयटी या तंत्रज्ञानासंबंधित विषयात जगात अव्वल समजल्या जाणाऱ्या विद्यापीठातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेत आज्ञावलीकार म्हणून काम सुरू केले.

या प्रयोगशाळेत संगणक विषयातलं अत्यंत प्रगत स्वरूपाचं काम चालायचं व त्यात काम करणारी मंडळी स्वत:ला सार्थपणे ‘हॅकर’ या बिरुदाने संबोधायची. अल्पावधीतच या हॅकर संप्रदायात स्टॉलमन त्याच्या तांत्रिक कुवतीमुळे प्रसिद्ध झाला. साठ व सत्तरच्या दशकात एमआयटीमधलं वातावरण हे खुलेपणा व सहयोगासाठी अत्यंत पूरक असं होतं. जरी त्याला अधिकृतपणे ‘ओपन सोर्स’ असं म्हटलं गेलं नसलं, तरीही या प्रयोगशाळेत निर्मिलेल्या सॉफ्टवेअरचं (त्याच्या सोर्स कोडसकट) इतर विद्यापीठांसोबत अगदी मोकळेपणाने आदानप्रदान होत होतं.

अशा मुक्तपणाला प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात असल्यामुळे असेल कदाचित पण स्टॉलमन हा माणसाच्या वैचारिक व कृतिशील स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता बनला. स्वातंत्र्याचे हेच निकष त्याने सॉफ्टवेअर व त्याच्या वापरकर्त्यांसाठी लावले. त्याचं म्हणणं हे होतं की, प्रत्येक सॉफ्टवेअर वापरकर्ता वा तंत्रज्ञाला त्या सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीमध्ये डोकावून बघण्याचं, त्यात स्वत:च्या गरजेनुसार बदल करण्याचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे. हे स्वातंत्र्य शाबूत ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर त्याच्या आज्ञावलीसोबत देणं आवश्यक होतं.

७०च्या दशकाच्या अंतापर्यंत (जोपर्यंत सॉफ्टवेअर हे हार्डवेअरसकटच दिलं जायचं व त्याला वेगळं व्यावसायिक मूल्य नव्हतं) बऱ्याच प्रमाणात सॉफ्टवेअरसोबत त्याचा सोर्स कोडसुद्धा वितरित केला जाई. त्यानंतर मात्र हे चित्र झपाटय़ाने पालटायला लागलं. एटीअ‍ॅण्डटीसारख्या कंपनीने ६० व ७०च्या दशकात ओपन सोर्स व सहयोगाचं प्रतीक असलेल्या युनिक्स ऑपरेटिंग प्रणालीवर कॉपीराइटची बंधनं आणून तिला प्रोप्रायटरी कुंपणात जखडून टाकलं. कंपन्यांना हळूहळू सॉफ्टवेअरचं व्यावसायिक महत्त्व उमगायला लागलं होतं व बहुतेक कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरसोबत सोर्स कोड देणं बंद केलं होतं. मुक्त देवाणघेवाणीवर व वैचारिक स्वातंत्र्यावर पोसत असलेल्या ‘ओपन’ संस्कृतीला ग्रहण लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली होती.

स्टॉलमन या संक्रमणाचं जवळून निरीक्षण करत होता. किंबहुना तो स्वत:च या संक्रमणातून जात होता; कारण दस्तुरखुद्द एमआयटीमध्येही हॅकर संप्रदायात फूट पडत चालली होती व बऱ्याच जणांनी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. स्टॉलमनला हे जाणवायला लागलं होतं की, आत्तापर्यंत अनौपचारिकरीत्या अस्तित्वात असलेल्या या ‘ओपन’ संस्कृतीला टिकवायचं असेल तर तिला औपचारिक बैठक देण्याची गरज आहे.

त्याच्या या विचारांचं कृतीत रूपांतर होण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. स्टॉलमन ज्या एमआयटीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेत काम करत होता तिथं झेरॉक्स कंपनीचा एक लेजर प्रिंटर वापरात होता. त्या वेळी संगणक व इतर हार्डवेअर संचांच्या किमती आजच्या एवढय़ा कमी नव्हत्या; त्यामुळे त्या प्रयोगशाळेच्या सर्व मजल्यांवर मिळून केवळ तो एकच प्रिंटर होता.

प्रयोगशाळेतले सर्व जण हाच प्रिंटर वापरत असल्याने एकाच वेळी अनेक जणांनी प्रिंटरला छापण्याची आज्ञा देणं ही अगदी नेहमी घडणारी घटना होती. तशात कधी कधी प्रिंटरमध्ये कागद अडकायचे व छापण्याची क्रिया बंद पडायची. यामुळे सर्व तंत्रज्ञांची चांगलीच गैरसोय व्हायची व वेळही वाया जायचा. हा प्रिंटर चालवण्यासाठीचे सॉफ्टवेअर (ज्याला ड्राइव्हर – Driver सॉफ्टवेअर म्हटले जाते) झेरॉक्स कंपनीने त्याच्या सोर्स कोडसकट दिले होते. स्टॉलमनने या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड अभ्यासून त्यात काही महत्त्वाचे बदल केले; ज्यायोगे या प्रिंटरच्या वापरकर्त्यांना आपले कागद छापून झाले आहेत का ते त्यांच्या संगणकावरच बसल्याबसल्या समजू लागलं तसंच कधी छापताना जर कागद अडकले असतील तर तेही समजू लागलं.

स्टॉलमनने प्रिंटरच्या सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या सुधारणा एमआयटीच्या प्रयोगशाळेत अत्यंत लोकप्रिय झाल्या. कारण यामुळे लोकांचा वेळ व परिश्रम प्रचंड प्रमाणात वाचत होते. १९८० सालात एमआयटीने हा जुना झालेला प्रिंटर, झेरॉक्सच्याच तांत्रिकदृष्टय़ा प्रगत अशा झेरॉक्स ९७०० या लेसर प्रिंटरने बदलायचे ठरवले. वर उल्लेखलेल्याप्रमाणे तोवर बऱ्याच कंपन्यांचा सॉफ्टवेअरप्रतिचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली होती. अशा बदललेल्या परिस्थितीत झेरॉक्स कंपनीने हा नवा प्रिंटर चालविण्यासाठीच्या सॉफ्टवेअरसोबत त्याचा सोर्स कोड देणं नाकारलं. त्यामुळे स्टॉलमनला प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांच्या गरजेनुसार या प्रिंटरच्या सॉफ्टवेअरमध्ये (आधीच्या प्रिंटरप्रमाणे) सुधारणा करणं अशक्यप्राय बनलं. स्टॉलमनने झेरॉक्स कंपनीशी पुष्कळ पाठपुरावा करूनही झेरॉक्स कंपनी जराशीसुद्धा बांधली नाही व सोर्स कोड न देण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम राहिली.

या घटनेमुळे स्टॉलमन व्यक्तिश: खूप व्यथित झाला व त्याला खात्री पटली की सॉफ्टवेअरमध्ये मुक्तपणे सुधारणा करता येणे हा सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचा नैतिक व मूलभूत अधिकार आहे व त्या अधिकाराचं जतन करण्यासाठी त्याला सोर्स कोड हाती मिळणं अत्यावश्यक आहे.

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर व ते बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात स्टॉलमनच्या मनात जी आग आतल्या आत धुमसत होती तिच्यावर या घटनेने ठिणगी पडली व त्याचं पर्यवसान झालं, ओपन सोर्सच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या संस्थेत जिचं नाव होतं ‘फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन’!

या संस्थेबद्दल व एकूणच स्टॉलमनच्या ओपन सोर्स क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल आपण पुढील लेखात चर्चा करू.

– अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:36 am

Web Title: articles in marathi on american software programmer richard stallman
Next Stories
1 बीएसडी – ओपन युगाची नांदी
2 युनिक्सची वाढ आणि बीएसडी
3 युनिक्स : सहयोगाची सुरुवात
Just Now!
X