18 October 2019

News Flash

लॅम्प – महाजालाचे ओपन आर्किटेक्चर

महाजालातील कोणत्याही पोर्टल अथवा संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी मुख्यत्वेकरून पाच प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रणालींची गरज असते.

|| अमृतांशू नेरुरकर

महाजालातील कोणत्याही पोर्टल अथवा संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी मुख्यत्वेकरून पाच प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रणालींची गरज असते. एक म्हणजे वेब ब्राउझर, जो प्रत्येक वापरकर्त्यांच्या मशीनवर (पीसी, टॅबलेट अथवा मोबाइल फोन) असणं अत्यावश्यक असतं आणि ज्याचा वापर करून वापरकर्ता त्याला हव्या त्या संकेतस्थळापाशी पोहोचू शकतो. उरलेल्या चार सॉफ्टवेअर प्रणालींचा मात्र वापरकर्त्यांशी थेट संवाद होत नाही कारण त्या सव्‍‌र्हरवर काम करतात. ब्राउझरकडून येणारी आज्ञा स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करणारा वेब सव्‍‌र्हर, वापरकर्त्यांला त्याच्या अधिकाराप्रमाणे संकेतस्थळावर योग्य तितकीच माहिती दाखवण्यामागचं तर्कशास्त्र विशद करणारी प्रोग्रामिंग भाषा, संकेतस्थळावरच्या विविध ऑनलाइन व्यवहारांमध्ये प्रक्रिया होणारी माहिती साठवणाऱ्या डेटाबेस प्रणाली आणि हे डेटाबेस अथवा वेब सव्‍‌र्हर ज्यावर चालतात ती ऑपरेटिंग प्रणाली!

इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस ग्राहकांना विविध प्रकारची माहिती तसेच सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळांचं अक्षरश: पीक आलं होतं. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या संकेतस्थळांच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावू पाहणाऱ्या नवउद्योजकांची पिढी उदयाला येत होती. दुर्दैवाने कोणतेही ठोस बिझनेस मॉडेल यातल्या बऱ्याचशा पोर्टल्स अथवा संकेतस्थळांपाशी नसल्याने फारसा महसूल या उद्योगातून मिळू शकला नाही. सुरुवातीला डिजिटल तंत्रज्ञानाची भुरळ पडून या संकेतस्थळांना आर्थिक साहाय्य देणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्यांनी आपला हात आखडता घेतला व २१व्या शतकाच्या पहिल्या एक-दोन वर्षांतच हा डॉट कॉमचा फुगा फुटला.

अशा वेळेला या विविध संकेतस्थळांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपापली संकेतस्थळं प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरवर चालवणं निव्वळ अशक्य होतं. कारण प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरशी निगडित लायसन्सिंग शुल्क भरण्याची ऐपत आता बऱ्याचशा डॉट कॉम कंपन्यांकडे राहिली नव्हती. त्याच वेळेला समांतरपणे फोफावत असलेल्या ओपन सोर्स व्यवस्थेने या कंपन्यांना आपल्या संकेतस्थळांसाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला. सुरुवातीला केवळ एक प्रयोग म्हणून वापरला गेलेला हा पर्याय पुढे इतका रूढ झाला की आज महाजालातल्या अधिकतम संकेतस्थळांचं आरेखन पूर्णत: ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणाली वापरून केलं जातं. महाजालाच्या याच ओपन पद्धतीच्या आरेखनाला ‘लॅम्प’ (LAMP) असं संबोधलं जातं.

लॅम्प या नावातील चार इंग्रजी अक्षरं (एल, ए, एम आणि पी) ही वर उल्लेखलेल्या व संकेतस्थळांसाठी अत्यावश्यक अशा चार ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणालींच्या नावांमधली पहिली अक्षरं दर्शवतात. ‘एल’वरून लिनक्स ऑपरेटिंग प्रणाली, ‘ए’वरून अ‍ॅपची वेब सव्‍‌र्हर, ‘एम’वरून मायएसक्यूएल (MySQL) डेटाबेस तर शेवटच्या ‘पी’वरून पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग भाषा, अशा चार सॉफ्टवेअर प्रणालींचा समर्थ पर्याय ओपन सोर्स व्यवस्थेने महाजालाच्या आरेखनासाठी उपलब्ध करून दिला. पुढील काळात पीएचपीबरोबर अजून दोन ओपन सोर्स प्रोग्रामिंग भाषांची यात भर पडली, एक म्हणजे पर्ल (Perl) तर दुसरी म्हणजे पायथन (Python)! योगायोगाने दोन्ही ‘पी’ याच आद्याक्षराने सुरू होत असल्याने ‘लॅम्प’ संज्ञेत काहीच फरक करावा लागला नाही.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषत: वेब तंत्रज्ञानात जिथे विविध संज्ञा, लघुरूपं किंवा जार्गन्सचा नेहमीच सुकाळ असतो, ‘लॅम्प’ ही संज्ञा आणण्याचं श्रेय मायकल कुन्झ या विख्यात जर्मन संगणक भाष्यकार व लेखकाला जाते. संगणक विषयाला वाहिलेल्या ‘कॉम्प्युटरटेक्निक’ या जर्मन मासिकाच्या डिसेंबर १९९८च्या अंकात कुन्झने या संज्ञेचा पहिल्यांदा उपयोग केला. महाजालातल्या कोणत्याही पोर्टल वा संकेतस्थळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रणालींसाठी व्यवहार्य ओपन सोर्स पर्याय आहेत हे कुन्झला दाखवून द्यायचे होते. ओपन सोर्स व्यवस्थेच्या ऐन बहराचे ते दिवस होते. ‘ओपन सोर्स’ या संज्ञेचादेखील काही महिन्यांपूर्वीच जन्म झाला होता. अशा वातावरणात कुन्झची ‘लॅम्प’मागची कल्पना चांगलीच उचलून धरण्यात आली. पुढे या लॅम्पचा अविभाज्य भाग असलेल्या मायएसक्यूएल कंपनीने तसेच आपल्या ओरायली प्रकाशन संस्थेद्वारे टीम ओरायलीने या संज्ञेला लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा उचलला.

जरी लॅम्प ही संकल्पना १९९८ नंतर प्रचलित झाली असली तरी अशा संकल्पनेवर आधारित प्रयोग १९९४ पासूनच सुरू झाले होते. अपॅची वेब सव्‍‌र्हरचा पूर्वसुरी असलेल्या एचटीटीपीडी वेब सव्‍‌र्हरची निर्मिती त्याच वर्षी झाली होती व या वेब सव्‍‌र्हरबरोबर प्रथमच सीजीआय (कॉमन गेटवे इंटरफेस) या तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. सीजीआय तंत्रज्ञानामुळे ब्राउझरला वेब सव्‍‌र्हरकडून वापरकर्त्यांने विचारलेली काही माहिती मागवणं आणि ती माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोचवण्यासाठी वेब सव्‍‌र्हरवर काही प्रोग्राम चालवणं शक्य होणार होतं. वेब सव्‍‌र्हरवर चालणारे प्रोग्राम्स लिहिण्यासाठी १९९४ साली पीएचपी तसेच पर्ल हे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. १९९५ साली आलेल्या पोस्टग्रे ९५ या ओपन सोर्स डेटाबेसमुळे ही माहिती साठवण्यासाठीचीसुद्धा यंत्रणा उपलब्ध झाली. पुढील काळात मात्र मायएसक्यूएल व पीएचपी या दोन प्रणालींनी आपापल्या क्षेत्रात घेतलेल्या गरुडझेपेमुळे महाजालाच्या आरेखनासाठी यांनाच प्रमाण ओपन सोर्स प्रणाली मानले गेले.

तसं बघायला गेलं तर लॅम्प हा काही मायक्रोसॉफ्टच्या डॉट नेट किंवा सन मायक्रोसिस्टिमच्या जावा तंत्रज्ञानाप्रमाणे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्याचा प्लॅटफॉर्म नाहीए. तर तो एकमेकांशी निगडित असलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणालींचा संच आहे. संगणकीय परिभाषेत त्याला ‘स्टॅक’ असं म्हटलं जातं. या स्टॅकमध्ये असलेली सर्व सॉफ्टवेअर ओपन सोर्स असल्यामुळे लॅम्पला ‘ओपन स्टॅक’ असंही म्हणतात. जसजशी ओपन सोर्स व्यवस्थेची विश्वासार्हता वाढत गेली तशा विविध प्रोप्रायटरी कंपन्यांनी ओपन सोर्सला सपोर्ट करायला सुरुवात केली. लॅम्पप्रमाणेच मग इतरही काही स्टॅक प्रचलित झाले. यात लॅम्पच्या पाठोपाठ संकेतस्थळांच्या आरेखनासाठी दोन स्टॅक प्रामुख्याने वापरले गेले. त्यातला एक म्हणजे वॅम्प (WAMP) ज्यात लिनक्सच्या ऐवजी विंडोज ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यात आली तर दुसरा म्हणजे विम्प (WIMP) ज्यात विंडोजबरोबर अपॅचीऐवजी मायक्रोसॉफ्टचाच इंटरनेट इन्फॉरमेशन सव्‍‌र्हर वापरण्यात आला.

असं असलं तरीही आजही महाजालातील सर्वाधिक संकेतस्थळं लॅम्प स्टॅकवरच आधारलेली आहेत. एवढंच नव्हे तर गुगल आणि अमॅझॉनसारख्या डिजिटल युगातील महाकाय कंपन्या आपल्या प्रणालींसाठी लॅम्प स्टॅकचाच उपयोग करत आहेत. सेकंदाला लाखो व्यवहार होणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सचा ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर या व्यवस्थेच्या वाढलेल्या कार्यक्षमतेचा व विश्वासार्हतेचाच द्योतक आहे.

खरं सांगायचं तर लॅम्प आरेखन पद्धतीमध्ये अंतर्भूत असलेल्या चारही प्रणाली काही संयुक्तपणे ठरवून महाजालाच्या आरेखनासाठी म्हणून निर्मिलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या निर्मितीची एक स्वतंत्र कहाणी आहे. लिनक्स व अपॅची वेब सव्‍‌र्हरबद्दल विस्तृत चर्चा आपण मागील काही लेखांमध्ये केलेलीच आहे, त्यामुळे त्यांची पुनरावृत्ती करण्याची जरी आवश्यकता नसली तरीही मायएसक्यूएल व पीएचपी या दोन प्रणालींच्या निर्मितीची व त्यांनी पुढे घेतलेल्या भरारीची कहाणी मोठी विलक्षण आहे, ज्याची चर्चा आपण पुढील लेखात करू.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

First Published on August 20, 2018 2:10 am

Web Title: lamp system software