ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था ही केवळ काही हौशी तंत्रज्ञांचा फावल्या वेळातला छंद एवढय़ापुरतीच सीमित राहील की काय अशी स्थिती ८० च्या अखेरीस निर्माण झाली होती. पण १९९१ मध्ये एक नवी व सशक्त पर्यायी व्यवस्था अनौपचारिकरीत्या उभी राहिली, जिचे नाव होते लिनक्सआणि या व्यवस्थेचा नायक होता लिनस टॉरवल्ड्स..

८०च्या दशकाच्या प्रारंभी ओपन सोर्स व्यवस्थेमध्ये दोन समांतर प्रवाह समर्थपणे सुरू झाले होते. पहिला प्रवाह होता बीएसडीचा! एटीअ‍ॅण्डटीने १९८२ सालच्या कोर्टाच्या आदेशानुसार सॉफ्टवेअर क्षेत्रात पदार्पण करून युनिक्सचं प्रोप्रायटरीकरण केलं होतं. या नव्या कॉपीराइटच्या बंधनांमुळे युनिक्सची किंमत भरमसाट वाढली होतीच शिवाय सोर्स कोडसुद्धा सोबत वितरित होत नव्हता. अशा परिस्थितीत संगणक तंत्रज्ञांना युनिक्स वापरण्यासाठी बीएसडीशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.

दुसरा प्रवाह हा स्टॉलमनच्या फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचा होता. जीपीएल (जनरल पब्लिक लायसन्स) परवाना पद्धतीमुळे व युनिक्सवर विनासायास चालू शकणाऱ्या काही उपयुक्त सॉफ्टवेअरमुळे अल्पावधीतच त्याला व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनला अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्याउपर जाऊन स्टॉलमनने एका ‘मुक्त’ ऑपरेटिंग प्रणालीच्या निर्मितीचे मनसुबे जाहीर केले होते. या सर्वामुळे ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंत ओपन सोर्स जगतात चैतन्यमय वातावरण होते. या दशकाखेरीस मात्र परिस्थिती झपाटय़ाने बदलत गेली.

बीएसडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व एटीअ‍ॅण्डटी युनिक्सच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीमुळे अनेक विद्यापीठे व संशोधन कंपन्या बीएसडी वापरण्यावर भर देत होत्या. अखेरीस एटीअ‍ॅण्डटीने बीएसडी व ती वितरित करणाऱ्या बर्कलेमधल्या कॅलिफोर्निया विद्यापीठावर कॉपीराइटच्या उल्लंघनाचा व युनिक्सच्या (एटीअ‍ॅण्डटीचा मालकी हक्क असलेल्या) सोर्स कोडच्या चौर्याचा आरोप ठेवून कोर्टात फिर्याद केली. हा ओपन सोर्स चळवळीसाठी जबर धक्का होता. जरी कोर्टाला कॅलिफोर्निया विद्यापीठ व बीएसडीबद्दल सहानुभूती होती तरीदेखील कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत एकंदरीतच बीएसडीचे भवितव्य अंधारात होते.

कोर्टाचा निकाल हाती येईपर्यंत काही वर्षेही निघून गेली असती. अशा परिस्थितीत बीएसडीवर काम करणारे बर्कलेमधले आणि बाहेरचे जे समुदाय होते त्यांना आता बीएसडीसाठी आपला मौल्यवान वेळ व ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ वाटत नव्हता. जर का उद्या निकाल एटीअ‍ॅण्डटीच्या बाजूने लागला असता व बीएसडीच्या वापर व वितरणावर बंदी लादली गेली असती तर या तंत्रज्ञांची मेहनत कवडीमोल ठरली असती. एटीअ‍ॅण्डटी आणि कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या या कायदेशीर लढाईत विजय कोणाचाही होवो, बीएसडीच्या वाटय़ाचा पराभव अगदी नक्की होता. याच कारणामुळे ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात बीएसडीची वाढ संपूर्णपणे खुंटली.

दुसऱ्या बाजूला रिचर्ड स्टॉलमन व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने आपल्या मूळ जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेला जीएनयू (GNU) प्रकल्प बारगळला होता. जरी त्यांनी काही उपयुक्त सॉफ्टवेअर प्रणालींची निर्मिती केली असली तरीही ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याचा मूळ उद्देश बाजूला पडला होता. जीपीएल परवाना पद्धतीमुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मिती व वितरणासाठीचे अधिकृत व औपचारिक नियम बनले खरे, पण त्यातला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरपासून संपूर्णपणे फारकत घेण्याचा हट्ट हा व्यावहारिकतेला धरून नव्हता. अनेक संगणक तंत्रज्ञांना ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत काही इतर बाबींसाठी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं होई. अशा वेळेला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरदेखील जीपीएल परवाना पद्धतीनेच वितरण करण्याची अट जीपीएल व एकंदरीतच ‘फ्री’ सॉफ्टवेअरच्या वाढीस प्रमुख अडथळा ठरत होती. स्टॉलमन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रचंड वेळ आणि ऊर्जा आपल्या विरोधकांविरुद्ध लढण्यात व आपल्या मतांचा व तत्त्वांचा हिरिरीने पुरस्कार करण्यात खर्च होत होती.

एका बाजूला वर उल्लेखलेल्या विविध कारणांमुळे ओपन सोर्स चळवळ व संस्कृतीची पीछेहाट होत असताना मायक्रोसॉफ्टसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपनीची मात्र जोरात घोडदौड सुरू होती. आयबीएमने आपल्या पीसी(पर्सनल कॉम्पुटर)साठी मायक्रोसॉफ्टची डॉस ऑपरेटिंग प्रणाली वापरल्यामुळे, आयबीएम पीसीसदृश संगणक बनविणाऱ्या कंपन्यासुद्धा डॉस प्रणालीच वापरू लागल्या. अशा तऱ्हेने सुरुवातीला मायक्रोसॉफ्टची डॉस व नंतर विंडोज या प्रोप्रायटरी प्रणालीच वैयक्तिक वापराच्या संगणकासाठीच्या प्रमाण प्रणाली बनल्या होत्या आणि सर्व मालकी हक्क स्वत:कडे राखून सॉफ्टवेअर बनविण्याची प्रोप्रायटरी पद्धत हीच प्रमाण मनाली जाऊ  लागली होती.

७०च्या दशकाच्या अखेरीप्रमाणेच ८०च्या दशकाच्या अंतासही ओपन सोर्स चळवळीसमोर असं निराशाजनक चित्र होतं. ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था ही केवळ काही हौशी तंत्रज्ञांचा फावल्या वेळातला छंद एवढय़ापुरतीच सीमित राहील की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा संभ्रमावस्थेत व निर्नायकीत ओपन सोर्स चळवळीला एका तिसऱ्या आघाडीची गरज निर्माण झाली होती; अशी आघाडी जी मरगळलेल्या ओपन सोर्स चळवळीमध्ये नवे प्राण फुंकेल व आतापावेतो परिघाबाहेर असलेल्या या व्यवस्थेला मुख्य प्रवाहात स्थान देईल.

अखेरीस १९९१ सालात ओपन सोर्स जगतात एक नवी व सशक्त पर्यायी व्यवस्था अनौपचारिकरीत्या उभी राहिली, जिचे नाव होते ‘लिनक्स’! या व्यवस्थेचा नायक होता फिनलंड येथील हेलसिंकी विद्यापीठात संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी – ‘लिनस टॉरवल्ड्स’!

लिनस टॉरवल्ड्स व हेलसिंकी विद्यपीठातल्या काही तंत्रज्ञांच्या समुदायापासून सुरू झालेलं लिनक्सचं लोण पाहता पाहता अगदी ६-७ वर्षांच्या आतच जगभरात पसरलं. ९०चं दशक संपायच्या आतच लिनक्स ही संगणकविश्वातील एक आघाडीची ऑपरेटिंग प्रणाली बनली होती.

भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेल्या तंत्रज्ञ व आज्ञावलीकारांनी आपल्या मोकळ्या वेळात दिलेल्या ऐच्छिक योगदानामुळे एका अत्यंत जटिल, गुंतागुंतीची पण तरीही अत्याधुनिक ऑपरेटिंग प्रणालीची निर्मिती होणं हा एक तांत्रिक व व्यवस्थापनातला चमत्कारच आहे. एवढंच नाही तर लिनक्सच्या मजबूत व सुरक्षित आरेखन व स्थापत्यशैलीची (robust and secure architecture) ग्राहकांना एवढी खात्री आहे की, असे कोणतेही उद्योगक्षेत्र नाही जिथे लिनक्स वापरली जात नाही.

अगदी जेथे सेकंदाला लक्षावधी वित्तीय व्यवहार होत असतात अशा जगभरातल्या आघाडीच्या वित्तीय संस्था (जसे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेन्ज किंवा भारतातील नॅशनल स्टॉक एक्स्चेन्ज) व बार्कलीससारख्या अजस्र बँका, तसेच पॉस्कोसारख्या बलाढय़ स्टील कंपन्यांपासून ते अगदी आजच्या काळातल्या गुगल, अमेझॉनसारख्या डिजिटल व ई-कॉमर्स कंपन्यांपर्यंत विविध उद्योगांतल्या अनेक कंपन्या त्यांच्या सव्‍‌र्हरवर आज संपूर्णपणे लिनक्सचा उपयोग करीत आहेत. गार्टनर शोधपत्रिकेच्या अहवालाप्रमाणे लिनक्सचा आजच्या घडीला जागतिक बाजार हिस्सा ४० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे व तिची वाढ ही इतर सर्व ऑपरेटिंग प्रणालींपेक्षा किती तरी अधिक वेगाने होत आहे.

मायक्रोसॉफ्ट विंडोजला एक समर्थ, किंबहुना विंडोजपेक्षाही अधिक सक्षम, असा पर्याय लिनक्सने उपलब्ध करून दिला आहे. आज लिनक्स आणि ‘ओपन सोर्स’ हे जवळपास समानार्थी शब्द आहेत. यावरूनच लिनक्सचे एकंदरीतच ओपन सोर्स चळवळ व व्यवस्थेमधले असामान्य स्थान ध्यानात यावे.

लिनक्सच्या जन्माची आणि वाढीची कहाणी अत्यंत विलक्षण आणि असामान्य आहे; ज्याचा ऊहापोह आपण पुढील लेखांपासून करणार आहोत.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com