18 April 2019

News Flash

व्यावसायिक कलाटणी

दिनांक ११ ऑगस्ट १९९९. लिनक्स व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेसाठी सुवर्णाक्षरांत लिहून ठेवावा असा हा दिवस.

|| अमृतांशू नेरुरकर

दिनांक ११ ऑगस्ट १९९९. लिनक्स व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेसाठी सुवर्णाक्षरांत लिहून ठेवावा असा हा दिवस. रेड हॅट या लिनक्स प्रणालीसंबंधित विविध सेवा व्यावसायिक जगतास पुरवणाऱ्या कंपनीने आपले समभाग खुल्या बाजारात नॅसडॅक या रोख्यांच्या खरेदी-विक्रीच्या उलाढालीत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या स्टॉक एक्स्चेंजवर विकायला काढले. पहिल्यांदाच कुठली तरी १०० टक्के ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा व्यवसाय करणारी कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत होती.

रेड हॅटच्या आयपीओला (Initial Public Offer) पहिल्याच दिवशी एवढा तडाखेबंद प्रतिसाद मिळाला की, नॅसडॅकच्या इतिहासातील ती आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी पहिल्या दिवशीची शेअरवाढ ठरली. या घटनेची दखल ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या आघाडीच्या वित्तीय नियतकालिकास घ्यावी लागली व दुसऱ्या दिवशी अमेरिकेतल्या जवळपास सर्व अर्थविषयक नियतकालिकांचे मथळे या बातमीने भरून गेले.

१९९८ सालच्या फ्रीवेअर परिषदेने ओपन सोर्स व्यवस्थेचे अधिकृतपणे नामकरण करून तिला एक स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवून दिली होती. संगणक विश्वातल्या सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक्समधल्या अनेक दिग्गज कंपन्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरला गांभीर्याने घ्यायला लागल्या होत्या. तरीही ओपन सोर्सबद्दलची जाणीव ही प्रामुख्याने संगणक तंत्रज्ञ व संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांपुरतीच मर्यादित होती. १९९९ सालच्या ऑगस्ट महिन्यातल्या या घटनेनंतर मात्र लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थेची ओळख वॉल स्ट्रीटवरच्या वित्तीय विश्लेषकांपासून अगदी सर्वसामान्य नागरिकांना व्हायला सुरुवात झाली.

पुढे डिसेंबर १९९९ मध्ये व्हीए लिनक्स या रेड हॅटसारख्याच ओपन सोर्स सॉफ्टवेअरला वाहिलेल्या कंपनीच्या आयपीओलासुद्धा नॅसडॅक स्टॉक एक्स्चेंजवर तसाच तुफान प्रतिसाद मिळाला व लिनक्ससकट ओपन सोर्स व्यवस्थेचे नाव सर्वतोमुखी झाले.

जगभरात विखुरलेल्या तंत्रज्ञ व प्रोग्रॅमर्सच्या ऐच्छिक सहयोगाने निर्माण होत असलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरला व्यावसायिक कलाटणी मिळण्याची सुरुवात १९९३-९४ पासूनच झाली होती. लिनक्सच्या ऐन बहराचा तो कालखंड! लिनक्सवर एवढय़ा जोमाने काम होत होते की, टॉरवल्ड्सला अक्षरश: दर आठवडय़ाला एक नवी आवृत्ती प्रसिद्ध करावी लागत होती. लिनक्स प्रकल्पात काम करणारे हात जसे वेगाने वाढत होते तसेच लिनक्स वैयक्तिक कामासाठी वापरणाऱ्या वापरकर्त्यांमध्येसुद्धा भूमितीश्रेणीने वाढ होत होती.

यातले सगळेच वापरकर्ते काही संगणक तंत्रज्ञ नव्हते, त्यामुळे त्यांना लिनक्सच्या विविध भागांच्या (जसे कर्नल, शेल, एडिटर वगैरे) नवनवीन आवृत्त्यांचा माग ठेवणे, त्यांची त्यांच्याजवळ असलेल्या संगणकावरची सुसंगतता तपासणे, लिनक्सवर चालू शकणाऱ्या इतर उपयुक्त सॉफ्टवेअर प्रणालींचा शोध घेणे व अंतिमत: लिनक्ससकट या सर्व प्रणालींना आपल्या संगणकावर चढवणे या सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रिया करणे त्रासदायक व वेळकाढू ठरत होते. म्हणूनच लिनक्सची इतर उपयुक्त सॉफ्टवेअरनी युक्त अशी एकात्मिक व स्थिर (integrate and stable) आवृत्ती वापरायला मिळावी अशी मागणी सातत्याने होत होती व यासाठी काही पैसे खर्च करायची तयारीही या वापरकर्त्यां समुदायांची होती.

लिनक्सच्या अशा ‘पॅकेज’ स्वरूपातल्या वितरणाची सुरुवात मागील लेखात उल्लेखल्याप्रमाणे डेबियन, इगड्रासिल कॉम्प्युटिंग, टबरेलिनक्स, कॅलडेरा, व्हीए लिनक्स वगैरे कंपन्यांनी केली; पण या सर्व लिनक्ससंबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा मेरुमणी ठरली रेड हॅट, जी आजही १००% ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवणारी जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखली जाते. ओपन सोर्स सॉफ्टवेअरला खऱ्या अर्थाने व्यवसायाभिमुख बनविण्यात व त्याला मुख्य प्रवाहात आणण्यात रेड हॅटचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

रेड हॅटची स्थापना १९९४ मध्ये मार्क इविंग या संगणक अभियंत्याने केली. त्याने संगणक अभियांत्रिकीची पदवी ही संगणक विज्ञानासाठी जगभरात प्रख्यात असलेल्या कार्नेजी मेलन विद्यापीठातून घेतली होती. त्याच्या आजोबांनी त्याला एक लाल रंगाची काऊबॉय बाजाची हॅट दिली होती, जी घालून तो सदैव कॉलेजमध्ये फिरत असे. संगणकासंबंधीच्या विषयात पारंगत असल्यामुळे विद्यापीठातले प्राध्यापक, तसेच त्याचे सहाध्यायी संगणकासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासाठी त्याला पाचारण करीत. त्याच्या या लाल टोपीसाठी तो प्रसिद्ध होता. त्यामुळे बरेच जण त्याला त्याच्या नावापेक्षा या हॅटनेच ओळखत व त्याला बोलाविण्यासाठी Call that red hat guy (त्या लाल टोपीवाल्याला बोलवा) असे पुकारीत.

त्यामुळेच आपल्या कंपनीचे नाव त्याने या टोपीवरच ‘रेड हॅट’ असे ठेवले. १९९५ मध्ये बॉब यंग या कॅनेडियन संगणक तंत्रज्ञाने (त्याने एसीसी ही लिनक्सवर सेवा पुरवणारी कंपनी १९९३ मध्ये स्थापन केली होती.) रेड हॅटला विकत घेतले; पण रेड हॅट हे नाव तोवर संगणक विश्वात अधिक परिचित झाल्यामुळे तेच नाव त्या दोघांनी कायम ठेवले, जे आजतागायत कायम आहे.

लिनक्सवर सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांपेक्षा रेड हॅटचे बिजनेस मॉडेल वेगळे होते. प्रथमत: त्यांनी व्यावसायिक वापराच्या लिनक्सची रेड हॅट एन्टरप्राइज लिनक्स (ज्याला संक्षिप्त रूपात RHEL असे संबोधले जाते.) ही आवृत्ती बाजारात आणली. अत्यंत सुरक्षित आरेखन असलेली, वेगवेगळ्या सव्‍‌र्हर हार्डवेअर संचांवर तपासलेली, शक्यतो सर्व त्रुटी किंवा चुका दुरुस्त केलेली व विविध उपयुक्त सॉफ्टवेअर प्रणालींचा भरणा असलेली अशी पॅकेज स्वरूपातली ही आवृत्ती होती. याच्याच जोडीला रेड हॅटने लिनक्सची ओपन सोर्स व्यवस्थेतून होणारी वाढ कायम राहावी या हेतूने ‘फेडोरा’ (Fedora) या लिनक्स निर्मितीच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ दिले.

फेडोरा प्रकल्पात रेड हॅटने आपले तांत्रिक मनुष्यबळदेखील लक्षणीय प्रमाणात उपलब्ध करून दिले. रेड हॅटच्या भक्कम आर्थिक व तांत्रिक पाठबळामुळे फेडोरा प्रकल्पास लिनस टॉरवल्ड्ससकट जगभरातल्या समुदायांचा भरघोस सहभाग लाभला. रेड हॅटला यामुळे दुहेरी फायदा झाला. एक तर तिला ओपन सोर्स व्यवस्थेवरची आपली निष्ठा व बांधिलकी सिद्ध करता येत होती व त्याचबरोबर फेडोरा प्रकल्पात लिनक्समध्ये होणाऱ्या नवनवीन सुधारणांचा रेड हॅटच्या व्यावसायिक लिनक्सच्या आवृत्तीमध्ये समावेश करता येत होता. आज फेडोरा प्रकल्पाचा रेड हॅट हा (इंटेलनंतरचा) सर्वात मोठा भागीदार आहे व या प्रकल्पात आजवर १० लाखांहून अधिक तंत्रज्ञांचे योगदान लाभले आहे.

रेड हॅटचे लिनक्ससंबंधित सेवा पुरवण्याचे बिझनेस मॉडेल दोन गोष्टींसाठी फार प्रसिद्ध आहे. एक म्हणजे रेड हॅटने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेली सदस्यत्वाची योजना (Subscription model) – ज्यात ग्राहकाला रेड हॅटकडून मिळणाऱ्या सेवेसाठी त्याच्या सोयीनुसार ठरावीक कालखंडासाठी शुल्क भरण्याची मुभा होती आणि दुसरे म्हणजे रेड हॅटने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जगतातल्या दिग्गज कंपन्यांबरोबर केलेल्या भागीदाऱ्या – ज्यामुळे विविध प्रकारच्या व्यावसायिक गरजांसाठी कंपन्यांना रेड हॅट लिनक्स वापरणे फार सोयीचे झाले.

प्रामुख्याने या दोन गोष्टींमुळे रेड हॅट तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुष्कळ पुढे गेली व व्यावसायिक जगासाठी रेड हॅट एन्टरप्राइज लिनक्स ही प्रमाण ऑपरेटिंग प्रणाली बनली. रेड हॅटच्या या प्रगतीचा, त्यामागील कारणांचा व तिच्या ओपन सोर्स व्यवस्थेला अधिक परिपक्व बनवण्यामधल्या योगदानाचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

First Published on May 14, 2018 1:07 am

Web Title: linux and open source software system