|| अमृतांशू नेरुरकर

१९९६ सालात लिनक्सची दुसरी आवृत्ती टॉरवल्ड्सने प्रसिद्ध केली. लिनक्सची ही आवृत्ती सर्वार्थाने अतिप्रगत व काळाच्या पुढची होती. इंटेल, डीईसी, मोटोरोलासारख्या कंपन्यांच्या हार्डवेअर संचांवर चालू शकणारी, एकाच वेळेला अनेक वापरकर्त्यांच्या सूचना समर्थपणे हाताळू शकणारी व तसेच एकाहून अधिक मायक्रोप्रोसेसरच्या चकत्या असलेल्या सव्‍‌र्हरवरदेखील कार्यक्षमतेने चालणारी अशी ती ऑपरेटिंग प्रणाली होती. त्या वेळेला बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रोप्रायटरी ऑपरेटिंग प्रणालींचा कार्यक्षमतेच्या दृष्टीने समर्थपणे मुकाबला लिनक्सच्या या आवृत्तीने केला असता.

७०च्या दशकात युनिक्सपासून उगम पावलेली ओपन संस्कृती ९०च्या दशकाच्या मध्यावर अधिक प्रगल्भ व परिपक्व बनली होती. बीएसडी व लिनक्ससारख्या जटिल व गुंतागुंतीच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन ओपन व्यवस्थेने जगभरात विखुरलेल्या तांत्रिक समुदायांच्या मदतीने समर्थपणे हाताळले होते. फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने निर्मिलेल्या जीपीएल (जनरल पब्लिक लायसन्स) परवाना पद्धतीने ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या वितरणासाठी औपचारिक नियम बनवले होते व लिनक्ससकट बऱ्याचशा ओपन सोर्स प्रकल्पांत जीपीएलचाच अधिकृतपणे वापर होत होता. लिनक्सच्या यशामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअरला उद्योग क्षेत्रांमध्ये मागणी जसजशी वाढायला लागली तसतशी या सॉफ्टवेअरभोवती विविध बिझनेस मॉडेल्ससुद्धा उदयाला येऊ  लागली होती.

डीईसी, आयबीएमसारख्या संगणक क्षेत्रातल्या बलाढय़ कंपन्या ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये पुष्कळ रस घेत होत्या; एवढंच काय त्यात आर्थिक गुंतवणूकसुद्धा करत होत्या. थोडक्यात इतका काळ परिघाबाहेर असलेली ही व्यवस्था आता केवळ ‘काही समविचारी तंत्रज्ञांचा फावल्या वेळातला छंद’ एवढय़ापुरतीच सीमित राहिली नव्हती, तर सॉफ्टवेअर क्षेत्रात मुख्य प्रवाहात आपले स्थान बळकट करत होती. अनेक प्रकारच्या संक्रमणांतून जाऊन विस्तारलेल्या या व्यवस्थेला दोन दशकं उलटून गेली तरी कोणतेही अधिकृत नाव मात्र नव्हते. लिनक्ससारख्या ओपन सोर्स प्रकल्पांत भरीव योगदान देणाऱ्या समुदायांना आपली स्वतंत्र ओळख असावी असं वाटू लागलं होतं व तशी मागणी विविध परिषदा तसेच ऑनलाइन चर्चामंचांवर जोर धरू लागली होती.

तसं पाहायला गेलं तर रिचर्ड स्टॉलमनने फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून या चळवळीला एक नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता, पण ओपन सोर्स प्रकल्पांत आपले योगदान देणाऱ्या अनेकांना स्टॉलमनची प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या संपूर्ण विरोधातली कट्टरतावादी भूमिका पटत नव्हती. त्याचबरोबर सोर्स कोडमुक्त असलेल्या सॉफ्टवेअरला ‘फ्री’ सॉफ्टवेअर म्हणण्याचा अट्टहासदेखील स्टॉलमनच्या विरोधातच जात होता. फ्री म्हणजे मोफत नव्हे तर फ्रीडम अथवा स्वातंत्र्य असा वारंवार खुलासा करूनदेखील आपल्या ऐच्छिक सहयोगाने बनलेल्या एखाद्या सॉफ्टवेअरला फ्री म्हणणे अनेकांच्या पचनी पडत नव्हते. त्याचप्रमाणे अशा सॉफ्टवेअरच्या व्यावसायिक जगातल्या ब्रॅण्डिंग किंवा मार्केटिंगच्या दृष्टीनेसुद्धा फ्री हे विशेषण शोभत नव्हते.

अशा परिस्थितीत एरिक रेमंड या अमेरिकेतल्या कुशल संगणक तंत्रज्ञाने व पुढे नावाजल्या गेलेल्या लेखकाने १९९७ साली लिनक्ससारख्या सॉफ्टवेअरच्या निर्मितीव्यवस्थेवर एक दीर्घ निबंध प्रसिद्ध केला ज्याचे नाव होते – The cathedral and the bazaar. आजतागायत ओपन सोर्स व्यवस्थेवर सर्वाधिक वाचला गेलेला हा निबंध आहे. हा निबंध तसेच एरिक रेमंडच्या ओपन सोर्स विषयावरील इतर निबंधांचे याच नावाचे छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध आहे. जवळपास सर्व ओपन सोर्सचे अभ्यासक आपल्या अभ्यासाचा श्रीगणेशा याच पुस्तकापासून करतात.

रेमंड हा कुशल तंत्रज्ञ तर होताच; पण त्याचबरोबर एक प्रभावी लेखक व हौशी मानववंशशास्त्रज्ञदेखील होता. लिनक्स, तसेच त्याने स्वत: चालू केलेल्या फेचमेल (Fetchmail) या ओपन सोर्स प्रकल्पांच्या व्यवस्थापनाचा, त्यामध्ये काम करणाऱ्या विविध समुदायांमधील चर्चाचा व वादविवादांचा, त्यांना अशा प्रकल्पांत योगदान देण्यास कारणीभूत ठरलेल्या अंतर्बाह्य़ कारणांचा सखोल विचार करून त्याने हे अभ्यासपूर्ण विवेचन मांडले होते.

हा निबंध प्रसिद्ध झाल्यावर जवळपास सर्व ओपन सोर्स प्रकल्पांतल्या समुदाय व कार्यगटांकडून त्याचे प्रचंड स्वागत झाले. पहिल्यांदाच कोणी तरी ओपन सोर्स प्रकल्प व्यवस्थापनाची व त्यात कार्यरत असलेल्या गटांच्या मानसिकतेची व निर्मितीमागच्या अंत:प्रेरणेची कारणमीमांसा करत होता; त्यामागचं तर्कशास्त्र समजावून सांगत होता.

रेमंडने सॉफ्टवेअर निर्मितीप्रक्रियेच्या दोन स्वतंत्र पद्धतींचा या निबंधात ऊहापोह केला होता. एक म्हणजे ‘कॅथ्रेडल’ पद्धत – जी एका चर्चमधल्या व्यवस्थेसारखी बंदिस्त व चार भिंतींच्या आतली आहे. यात सॉफ्टवेअर निर्मितीत गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ठरावीकच अधिकार आहेत व तिने नेमून दिलेलीच कामं करणं अपेक्षित आहे. ही अधिकारांची उतरंड एवढी पक्की आहे की, ज्यात बदल करण्याचे अधिकार केवळ काही थोडय़ा वरच्या हुद्दय़ाच्या व्यक्तींकडेच केंद्रित आहेत. एखाद्या कंपनीच्या आत बनत असलेल्या प्रोप्रायटरी स्वरूपाच्या सॉफ्टवेअर निर्मितीच्या प्रक्रियेला त्याने ‘कॅथ्रेडल’ ही संज्ञा वापरली.

त्याउलट ‘बाजार’ ही नावाप्रमाणेच खुली व्यवस्था आहे, जिथे मुक्तपणाने विचारांची देवाणघेवाण चालते. इथे प्रत्येक व्यक्ती आपलं काम निवडायला स्वतंत्र आहे, तसेच अधिकारांचे केंद्रीकरणसुद्धा झालेले नाहीए. काहीशी गोंधळलेली, अगदी अराजकापर्यंतसुद्धा जाऊ  शकणारी असली तरीही इथे प्रत्येकाला आपलं मत ठामपणे मांडण्याचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य मात्र पुरेपूर आहे. लिनक्ससारख्या सोर्स कोड खुला असलेल्या व जगभरातील असंख्य तंत्रज्ञांच्या ऐच्छिक सहयोगाने निर्माण होणाऱ्या सॉफ्टवेअर प्रकल्पांच्या प्रक्रियेसाठी त्याने ‘बाजार’ ही संज्ञा वापरली.

या निबंधात सॉफ्टवेअर निर्मितीच्या वरील दोन पद्धतींच्या अजून अनेक मुद्दय़ांवर ऊहापोह केला होता. त्यातलं एक विधान, जे लिनस (टॉरवल्ड्स)चा नियम म्हणून प्रसिद्ध आहे, ते म्हणजे – Given enough eyeballs, all bugs are shallow. थोडक्यात, ‘बाजार’ पद्धतीच्या सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये सोर्स कोड खुला असल्याने सुरुवातीपासूनच त्याची तपशीलवार छाननी व तपासणी झाल्याने सॉफ्टवेअरमधल्या चुका व दोष लगेचच दूर होऊ  शकतात.

रेमंडच्या या निबंधाने लिनक्ससारख्या प्रकल्पात काम करणाऱ्या समुदायांना एक ओळख मिळवून दिली असली तरी सॉफ्टवेअर निर्मितीच्या या व्यवस्थेचं अधिकृत नामकरण अजून व्हायचंच होतं. रेमंडनेच मग या व्यवस्थेच्या नामकरणासाठी पुढाकार घेतला. फेब्रुवारी १९९८ मध्ये या विषयावर ‘वीए लिनक्स’ नावाच्या कंपनीत रेमंडने या कंपनीचे अध्यक्ष लॅरी ऑगस्टीन व मागील लेखात उल्लेखलेले डीईसी कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ जॉन हॉल यांच्याबरोबर सखोल चर्चा केली व फ्री सॉफ्टवेअर या नावापेक्षा तटस्थ वाटेल अशा ‘ओपन सोर्स’ या संज्ञेला जन्म दिला. पुढे १९९८च्या एप्रिल महिन्यात ओरायली प्रकाशन संस्थेचा प्रमुख व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या टीम ओरायलीने आयोजित केलेल्या फ्रीवेअर परिषदेत, लिनस टॉरवल्ड्स, एरिक रेमंड, जॉन हॉल वगैरे मंडळींच्या साक्षीने व पाठिंब्याने, या व्यवस्थेचा ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था’ हा नामकरण सोहळा पार पडला.

इतके दिवस विखुरलेल्या गट-समुदायांत काम करत असलेल्या प्रत्येकाला आता स्वत:ची विशिष्ट ओळख मिळाली होती. म्हणूनच १९९८ मध्ये पार पडलेल्या या परिषदेला आजही ‘ओपन सोर्स शिखर परिषद’ असेच संबोधले जाते. १९९७-९८ पासून, विशेषत: या शिखर परिषदेनंतर, ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेला संगणकीय क्षेत्रातले प्रतिस्पर्धी व एकंदरीतच उद्योग क्षेत्र गांभीर्याने घ्यायला लागलं. लिनक्स आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था आता फक्त एक प्रयोग म्हणून अस्तित्वात नव्हती, तर तिला एक भरीव व्यावसायिक मूल्य निर्माण झालं होतं. याच वेळेला लिनक्सभोवती विविध सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांचा उदय झाला. यातल्या कंपन्यांनी तर मायक्रोसॉफ्टसारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या दादा कंपनीची झोप उडवली. ओपन सोर्स व्यवस्थेला मिळालेल्या या व्यावसायिक कलाटणीचा परामर्श आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.