|| अमृतांशू नेरुरकर

संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतलेला शटलवर्थ हा हाडाचा संगणक तंत्रज्ञ तर होताच, पण त्याचबरोबर एखाद्या गोष्टीने झपाटल्यावर ती तडीस नेईपर्यंत स्वस्थ न बसणारा एक अवलिया होता. लिनक्स वितरणांमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचा शटलवर्थने चंग बांधला व त्यातून उभा राहिला उबुंटू प्रकल्प!

२००४ सालचा एप्रिल महिना! वसंत ऋतू ऐन बहरात असल्याने लंडनमधले वातावरण अगदी आल्हाददायक होते. अशा उत्साहवर्धक वातावरणात आधी संगणक तंत्रज्ञ, पुढे उद्योजक व नंतर व्हेन्चर कॅपिटलिस्ट बनलेल्या एका अवलियाला एका स्वप्नाने भारून टाकले होते. आपले स्वप्न सत्यात उतरवण्याची पूर्वतयारी म्हणून त्याने आपल्या लंडनच्या घरी एप्रिल २००४ मध्ये डेबियन, जीएनयू व जीनोम या आघाडीच्या ओपन सोर्स प्रकल्पांत भरीव योगदान देणाऱ्या काही संगणक तंत्रज्ञांना विचारमंथनासाठी बोलावले होते.

सर्वप्रथम त्याने या तंत्रज्ञांना प्रश्न विचारला की, तोवर उपलब्ध असलेल्या ऑपरेटिंग प्रणालींपेक्षा (मग ती ओपन सोर्स असो वा नसो) अधिक कार्यक्षम व वापराच्या दृष्टीने अधिक सुलभ ऑपरेटिंग प्रणाली बनवणे शक्य आहे का? बहुतेक सगळ्या तंत्रज्ञांनी याचे होकारात्मक उत्तर दिले. मग त्याने या तंत्रज्ञांना अशा ऑपरेटिंग प्रणालीची वैशिष्टय़े लिहून काढायला सांगितली. तसेच अशा प्रकल्पावर काम करणाऱ्या समुदायाला सहयोगात्मक काम अधिक कार्यक्षमतेने कसे करता येईल याचेही वर्णन करायला सांगितले. अनेक तास चाललेल्या या सखोल चर्चेचे निष्पन्न एका नव्या, ओपन सोर्स पद्धतींचा अवलंब करून बनणाऱ्या ऑपरेटिंग प्रणालीच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात झाले. या ऑपरेटिंग प्रणालीचे नाव होते उबुंटू व तिच्या निर्मितीचा ध्यास घेतलेल्या या अवलियाचे नाव होते मार्क शटलवर्थ!

आपल्या जन्माच्या दोन वर्षांच्या आतच उबुंटूने लोकप्रियतेच्या अनेक निकषांमध्ये नंबर एकचे लिनक्स वितरण म्हणून मान पटकावला. २०१५ मध्ये उबुंटूच्या वापरकर्त्यांची संख्या ४ कोटींच्या घरात पोचली होती, तर उबुंटू प्रकल्पात योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांची संख्या काही लाखांमध्ये होती. आज उबुंटू हे सर्वाधिक लोकप्रिय बिगरव्यावसायिक लिनक्स वितरण म्हणून ओळखले जाते. लिनक्सची सव्‍‌र्हरपुरती मर्यादित राहिलेली व्याप्ती वाढवून तिला वैयक्तिक वापरासाठी डेस्कटॉप पीसीवरसुद्धा तेवढेच लोकप्रिय बनविण्याचे श्रेय  उबुंटूला जाते.

२००४ साली जेव्हा लिनक्सची अनेक व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक वितरणे (डेबियन, रेड हॅट, सुजे लिनक्स वगैरे) प्रचलित होती, लिनक्सशी संलग्न सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यादेखील उदयास आल्या होत्या व व्यावसायिक परिघात लिनक्सला व्यापक स्तरावर मान्यता मिळाली होती, अशा वेळेला एका नव्या लिनक्स वितरणाची खरे सांगायचे तर काय आवश्यकता होती? त्यामुळेच अशा एका प्रकल्पाचे स्वप्न बघणे म्हणजे वेडेपणा आहे, असे काहींचे रास्त मत होते; पण मार्क शटलवर्थने आपले स्वप्न सत्यात उतरवले आणि एवढेच नाही तर त्यात घवघवीत यश संपादन केले.

उबुंटूसारख्या ऑपरेटिंग प्रणालीची आवश्यकता, इतर लिनक्स वितरणांच्या तुलनेत उबुंटूचे वेगळेपण, तसेच उबुंटू प्रकल्प व्यवस्थापनातील इतर तपशिलांकडे वळण्याआधी, या प्रकल्पाचा प्रणेता मार्क शटलवर्थबद्दल जाणून घेणे उचित ठरेल. त्यामुळे उबुंटूच्या निर्मितीमागची वैचारिक बैठकसुद्धा समजून घेता येईल.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला व केपटाऊनमधून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतलेला शटलवर्थ हा हाडाचा संगणक तंत्रज्ञ तर होताच, पण त्याचबरोबर एखाद्या गोष्टीने झपाटल्यावर ती तडीस नेईपर्यंत स्वस्थ न बसणारा एक अवलिया होता. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याला ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मिती प्रक्रियेबद्दल विशेष रस होता. अपॅची वेब सव्‍‌र्हर व डेबियन या दोन्ही प्रकल्पांत त्याचे योगदान महत्त्वपूर्ण होते; किंबहुना अपॅची वेब सव्‍‌र्हरला डेबियन लिनक्सवर विनासायास चालण्यासाठी सुसंगत बनविण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

इंटरनेट युगाला तेव्हा सुरुवात होत होती. जसजसे इंटरनेट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तसे इंटरनेटवर होणाऱ्या व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाईल हे शटलवर्थ जाणून होता. अशा प्रकारच्या, विशेषत: आर्थिक बाबींमधल्या, व्यवहारांना एका तटस्थ संस्थेने प्रमाणित केल्याशिवाय अशा व्यवहारांतील सुरक्षितता व त्यांची लोकांमधली विश्वासार्हता वाढणार नाही हे त्याने ओळखले आणि म्हणूनच ऑनलाइन व्यवहारांमधल्या तांत्रिक सुरक्षेची प्रमाणपत्रे बहाल करणाऱ्या ‘थॉट’ (Thawte) नावाच्या कंपनीची १९९५ मध्ये स्थापना केली. यात विशेष म्हणजे या प्रकारची सेवा पुरवण्याकरिता थॉट वापरत असलेल्या जवळपास सर्व सॉफ्टवेअर प्रणाली ओपन सोर्स होत्या.

तीन-चार वर्षांतच थॉट ही या क्षेत्रातली दिग्गज कंपनी ‘वेरिसाइन’ (Verisign) नंतरची दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली. अपेक्षेप्रमाणे डिसेंबर १९९९ मध्ये वेरिसाइनने थॉटला काही कोटी अमेरिकन डॉलरना विकत घेतले. त्या वेळेला शटलवर्थ फक्त २६ वर्षांचा होता. एवढय़ा लहान वयात इतका पैसा कमावल्यानंतर शटलवर्थने आपल्या दोन स्वप्नांचा पाठपुरावा करणे सुरू केले. ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्याचे पहिले स्वप्न होते अंतराळप्रवास! एक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर व रशियन अंतराळसंस्थेला तब्बल २ कोटी अमेरिकन डॉलर देणगी स्वरूपात दिल्यानंतर, शटलवर्थचे स्वप्न पूर्ण झाले. मे २००२ मध्ये दोन दिवस सोयुझ अंतराळयानात व आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर व्यतीत करून शटलवर्थ परत पृथ्वीवर आला.

आल्याबरोबर लगेचच त्याने आपले दुसरे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. आपल्या कॉलेजच्या दिवसांपासूनच शटलवर्थ डेबियन प्रकल्पाचा चाहता होता. डेबियनमध्ये असलेला जगभरातील समुदायांचा सक्रिय आणि भरीव सहभाग, प्रकल्पाच्या व्यवस्थापनामधली सुसूत्रता, व्यावसायिक स्तरावर मिळत असलेला पाठिंबा या सर्वाचे तो सुरुवातीपासूनच बारकाईने निरीक्षण करत होता. खूप लोकप्रिय असूनही शटलवर्थला डेबियन आणि डेबियनसारख्याच, पण तुलनेने कमी प्रसिद्ध अशा इतर लिनक्स वितरणांमध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आढळल्या.

पहिले म्हणजे डेबियनसारख्या प्रकल्पात अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक पूर्णवेळ काम करत असल्याने डेबियनच्या नव्या अधिकृत आवृत्त्या नियमितपणे निघत नसत, तसेच दोन आवृत्त्यांमधला कालखंडसुद्धा कधीकधी बराच मोठा असे. त्यामुळेच ऑपरेटिंग प्रणाली निर्मितीसारख्या किचकट आणि वेळकाढू प्रकल्पासाठी केवळ जगभरातल्या समुदायांच्या ऐच्छिक योगदानावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही याची शटलवर्थला जाणीव झाली.

शटलवर्थला जाणवलेली दुसरी मर्यादा तांत्रिक स्वरूपाची होती. लिनक्स जरी १९९१ पासून अस्तित्वात होती आणि लिनक्सच्या व्यावसायिक व बिगरव्यावसायिक वितरणास १९९३-९४ पासून सुरुवात झाली होती तरीही अगदी त्यानंतर १० वर्षे होऊनदेखील या सर्व सॉफ्टवेअर वितरणांची भाषा ही केवळ इंग्रजी होती. स्वत: दक्षिण आफ्रिकेचा असल्यामुळे असेल, पण शटलवर्थने प्रादेशिक भाषांचे महत्त्व जाणले होते. लिनक्ससारख्या सॉफ्टवेअरची खरी गरज ही विकसनशील व अविकसित देशांत होती जिथे लोकांना विंडोजसारखी प्रोप्रायटरी प्रणाली परवडणार नव्हती; पण भाषेची मर्यादा हा लिनक्सच्या प्रसाराचा मुख्य अडथळा बनला होता. त्यामुळेच लिनक्सला विविध जागतिक भाषांमध्ये ‘लोकलाइज’ करण्याची गरज होती.

लिनक्सच्या व्यावसायिक वापराला पाच-सात वर्षांचा कालखंड उलटून गेला असला तरीही लिनक्स ही सव्‍‌र्हर ऑपरेटिंग प्रणाली म्हणूनच ओळखली जात होती. हॅकर्सनी हॅकर्ससाठी बनवलेली प्रणाली असल्याने वापरकर्त्यांचे तांत्रिक ज्ञान हे काही प्रमाणात गृहीत धरण्यात आले होते व वापर सुलभतेच्या दृष्टीने फारसे प्रयत्न केले गेले नव्हते. त्यामुळेच डेस्कटॉप पीसीसाठी लिनक्स ही विंडोजला समर्थ पर्याय बनू शकत नव्हती. शटलवर्थला लिनक्समध्ये असलेली ही मर्यादासुद्धा दूर करायची होती.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मिती व्यवस्थेच्या सर्व शक्तिस्थळांचा वापर करून लिनक्स वितरणांमध्ये आढळलेल्या वरील त्रुटी दूर करण्याचा शटलवर्थने चंग बांधला व त्यातून उभा राहिला उबुंटू प्रकल्प! उबुंटू या चमत्कारिक वाटणाऱ्या नावापासून ते या प्रकल्पाच्या वैशिष्टय़पूर्ण व्यवस्थापनापर्यंत, उबुंटूशी निगडित सर्वच गोष्टी केवळ विलक्षण आहेत, ज्याचे विश्लेषण आपण पुढील लेखात करू.

amrutaunshu@gmail.com