22 April 2019

News Flash

मरडॉक आणि डेबियन प्रकल्प

१९९८ सालापर्यंत लिनक्स आणि ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलची लोकप्रियता आणि विश्वासार्हता पुष्कळ पटीने वाढली होती.

|| अमृतांशू नेरुरकर

१९९८ सालापर्यंत लिनक्स आणि ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलची लोकप्रियता आणि विश्वासार्हता पुष्कळ पटीने वाढली होती. व्यावसायिक उद्योगक्षेत्रातल्या कित्येक अतिमहत्त्वाच्या प्रणालींसाठी लिनक्स वापरायला सुरुवात झाली होती आणि संगणक क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांनी आपले हार्डवेअर (पीसी किंवा सव्‍‌र्हर) आणि सॉफ्टवेअर (डेटाबेस, ईआरपी, अकाऊंटिंग वगैरे) लिनक्सवर प्रमाणित केले होते.

ओपन सोर्स व्यवस्था मुख्य धारेत स्थिरावयला जगभरातील तंत्रज्ञांचे योगदान, इंटरनेटचा प्रसार आणि उपलब्धता, उच्च गुणवत्तेची सॉफ्टवेअरनिर्मिती तसेच लिनक्सच्या यशामुळे झालेले प्रभावी ब्रॅण्डिंग अशा गोष्टी कारणीभूत ठरल्या असल्या तरी यांच्याचबरोबर समांतरपणे झालेले ओपन सोर्स व्यवस्थेच्या विविध घटकांचे विस्तृत व तपशीलवारपणे मांडण्याचे कामदेखील या व्यवस्थेची विश्वासार्हता वाढविण्यास तेवढेच महत्त्वाचे ठरले.

ओपन सोर्सची व्याख्या तयार करण्यापासून, त्याची लायसन्सिंग आणि वितरण पद्धती ठरवण्यापासून ते प्रकल्प व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्त्वे बनविण्यापर्यंत विविध महत्त्वाच्या मुद्दय़ांवर अनेकांनी समांतरपणे काम केले. मागील लेखात आपण या व्यवस्थेचे नामकरण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या एरिक रेमंडबद्दल बोललो होतो. त्यांच्यासारख्याच अनेकांनी अशा बिगर तांत्रिक पण घटनात्मक भागांवर केलेल्या कामामुळे ओपन सोर्स व्यवस्थेची एक पक्की तात्त्विक बैठक तयार झाली, जिने तिच्या विस्ताराला पुष्कळ हातभार लावला.

याची सुरुवात १९९३ साली डेबियन प्रकल्पाद्वारे झाली. तेव्हा जगभरात विविध समुदायांचे लिनक्सवर जोमाने काम सुरू होते. अमेरिकेतल्या विख्यात पडर्य़ू विद्यापीठात तेव्हा इयन मरडॉक हा विद्यार्थी विद्यापीठातल्या लिनक्स गटामध्ये समन्वयकाचे काम करत होता तोपर्यंत लिनक्सच्या पॅकेज पद्धतीच्या वितरणास सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे जगभरातल्या सर्वच तंत्रज्ञांना आपल्या विशिष्ट कामासाठी लिनक्सचा मूळ कोड, त्यात झालेल्या सुधारणा, चुका दुरुस्ती केलेले लघुकोड (पॅचेस) स्वत:च वेगवेगळ्या फाइल सव्‍‌र्हरवरून जमवाव्या लागत व त्यावर स्वत:कडे असलेल्या हार्डवेअरप्रमाणे योग्य ते संस्करण करून लिनक्सला वापरण्यायोग्य बनवावे लागे.

यात वेळ तर खूप जाईच पण उत्तम प्रकारचे तांत्रिक ज्ञान असल्याखेरीज हे करणे कठीणही होते. तेव्हा सॉफ्टलॅण्डिंग लिनक्स सिस्टीम (एसएलएस) नावाचे लिनक्सचे पॅकेजसदृश वितरण प्रसिद्ध होते. खरे सांगायचे तर ते काही तितकेसे चांगले पॅकेज नव्हते; कारण एक तर त्यात चुका फार असायच्या व त्या लवकर दुरुस्तही व्हायच्या नाहीत. पण त्या वेळेला ते लिनक्सचे विविध कोड एकत्र करून केलेले एकमेव वितरण असल्याने सर्वच जण ते वापरायचे. इयन मरडॉकही त्यास अपवाद नव्हता. पण पुढे पुढे यातल्या चुका दुरुस्त करून ते वापरण्यायोग्य बनविण्यात मरडॉकचा एवढा वेळ जायला लागला की त्याने एक स्वत:चे लिनक्स पॅकेज बनविण्याचा निर्णय घेतला.

१६ ऑगस्ट १९९३ रोजी त्याने लिनक्सच्या ऑनलाइन चर्चामंचावर पहिल्यांदा याची जाहीर वाच्यता केली व या प्रकल्पाचे नाव ठेवले ‘डेबियन’! त्याची त्या वेळची मैत्रीण डेब्रा हिला तो ज्या ‘डेब’ या नावाने पुकारत असे, तेच ‘डेब’ हे नाव वापरून व त्यात स्वत:चे ‘इयन’ हे नाव जोडून त्याने ‘डेबियन’ हे नाव निर्मिले होते. पुढे २००८ मध्ये हे दोघे विभक्त झाले; त्यानंतर २०१५ मध्ये तर नैराश्याच्या भरात मरडॉकने आत्महत्या केली, पण या दोघांच्या नावाचे मिश्रण असलेले हे नाव आजतागायत टिकून आहे. एवढेच नव्हे तर लिनक्सचे सर्वाधिक यशस्वी बिगर व्यावसायिक पॅकेज वितरण म्हणून ते आजही नावलौकिक टिकवून आहे. असो.

सप्टेंबर १९९३ मध्ये मरडॉकने या डेबियन लिनक्सची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आणि काही मर्यादित वापरकर्त्यां समुदायांपुरती वितरित केली. सुरुवातीचे काही महिने डेबियन लिनक्स वितरण तयार करण्याचे काम मरडॉकसोबत पडर्य़ू विद्यापीठातले काही विद्यार्थी आणि तंत्रज्ञ करत होते. पण थोडय़ा कालावधीतच मरडॉकच्या लक्षात आले की पॅकेज बनविण्याचे काम हे खासगी स्तरावर काही थोडय़ा तंत्रज्ञांपुरतेच ठेवले तर एक तर त्याचे व्यवस्थापन तितकेसे कार्यक्षमपणे करता येणार नाही आणि दुसरे म्हणजे त्यास व्यापक स्तरावर प्रसिद्धी आणि मान्यतादेखील मिळणार नाही.

म्हणूनच डेबियन लिनक्सच्या वितरणासाठी आवश्यक असणारा लिनक्सचा नवीनतम सोर्स कोड मिळवणे, त्याची तपासणी करून त्यात असणाऱ्या चुका दुरुस्त करणे आणि विविध प्रकारच्या हार्डवेअर संरचनांवर सहजपणे चढू शकतील अशा आवृत्त्या बनविणे यासाठी मरडॉकने ओपन सोर्स पद्धतीचाच अवलंब करायचे ठरवले.

१९९४ मध्ये त्याने डेबियन लिनक्सचे वितरण पहिल्यांदाच सर्व जगाला खुले केले आणि त्याचबरोबर डेबियन प्रकल्पाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करणारा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात मरडॉकने डेबियन प्रकल्प जीएनयू किंवा लिनक्सप्रमाणेच ओपन सोर्स व्यवस्थापन पद्धतीने चालविण्याचा आपला इरादा जाहीर केला. लिनक्सच्या निर्मितीमध्ये जसा जगभरातील तंत्रज्ञांचा हातभार लाभला तसाच तो डेबियन पॅकेजसाठीसुद्धा लाभेल अशी मरडॉकची अटकळ होती आणि झालेही तसेच! त्याच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मरडॉकच्या जाहीरनाम्यात डेबियनचा उल्लेख ‘फ्री’ ऑपरेटिंग प्रणाली असा असल्याने आणि तसेच त्याने डेबियनसाठी जीपीएल लायसन्सिंग पद्धतीचा अंगीकार करण्याचा मनसुबा जाहीर केल्याने, स्टॉलमन व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने डेबियन प्रकल्पाला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याहीपुढे जाऊन फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने डेबियनला १९९४-९५ या कालखंडासाठी प्रायोजकत्व बहाल केले, ज्याची डेबियनच्या वाढीस चांगलीच मदत झाली.

१९९५ नंतर मात्र मरडॉकच्या हे ध्यानात यायला लागले की, जीपीएल लायसन्सिंग पद्धती डेबियनच्या वाढीला पूरक ठरण्याऐवजी अडथळाच बनू लागली आहे. डेबियन लिनक्स वितरणासोबत अनेक वापरकर्त्यांना प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरणे गरजेचे होत असे, पण जीपीएलमधल्या अटी आणि शर्ती असे करण्यापासून मज्जाव करत असत. थोडक्यात लिनक्सचे आणि पर्यायाने ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे वितरण व प्रसार वेगाने व्हावा या डेबियनच्या मूळ उद्देशालाच यामुळे हरताळ फासला जात होता.

मरडॉकसाठी वापरकर्त्यांचे हित जपणे महत्त्वाचे होतेच, पण त्याचबरोबर त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देणेसुद्धा तितकेच अत्यावश्यक होते. म्हणूनच डेबियन लिनक्सच्या वापरकर्त्यांला डेबियनबरोबर व्यावसायिक सॉफ्टवेअर वापरणे गरजेचे होत असेल, तर त्याचे ते स्वातंत्र्य आणि अधिकार जपणे आवश्यक आहे असे मरडॉकचे मत बनायला लागले.

तात्त्विक निष्ठा की वास्तववादी व्यावहारिकता या झगडय़ात मरडॉकचे पारडे व्यावहारिकतेकडे झुकायला लागले आणि इथेच हळूहळू फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनपासून डेबियन प्रकल्प फारकत घेऊ  लागला. अखेरीस १९९५च्या उत्तरार्धात फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने, एक वर्षांचा कालावधी संपल्यानंतर, डेबियनला प्रायोजकत्व देण्याचे थांबवले. एप्रिल १९९६ मध्ये डेबियनच्या काही तांत्रिक बाबीत अधिक लक्ष घालता यावे म्हणून मरडॉकने डेबियनचे नेतृत्व सोडले आणि ते आले ब्रूस पेरेन्स या अत्यंत धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्या निष्णात अमेरिकी संगणक तंत्रज्ञाकडे!

पेरेन्सने डेबियन प्रकल्पाच्या माध्यमातून ओपन सोर्स व्यवस्थापनाच्या विषयात अत्यंत मूलभूत स्वरूपाचे काम केले. त्याने डेबियनसाठी बनविलेली फ्री सॉफ्टवेअरची मार्गदर्शक तत्त्वे आजही कोणत्याही ओपन सोर्स सॉफ्टवेअरसाठी वापरली जातात. त्याने डेबियनच्या वापरकर्त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी लिहिलेला डेबियन सामाजिक करार (social contract) आणि त्यात केलेली ओपन सोर्स सॉफ्टवेअरची व्याख्या आजही बऱ्याच अंशी प्रमाण मानली जाते. डेबियनच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी त्याने निर्मिलेली डेबियनची घटना (constitution) अनेक ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये (थोडे फेरफार करून) वापरली जाते.

पेरेन्सच्या डेबियनमधल्या आणि एकंदरीतच ओपन सोर्स प्रकल्पांचे व्यवस्थापन वापरकर्ताभिमुख आणि अधिक कार्यक्षमतेने व्हावे म्हणून केलेल्या कार्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

First Published on May 28, 2018 12:24 am

Web Title: murdock and debian project