|| अमृतांशू नेरुरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायएसक्यूएल ही आजच्या घडीला जगातली नंबर एकची ओपन सोर्स आरडीबीएमएस (रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम) आहे. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, एसएपीसारख्या बलाढय़ प्रोप्रायटरी प्रतिस्पध्र्यापुढे ती पाय रोवून उभी आहे, किंबहुना आज जगातल्या बऱ्याच आघाडीच्या पारंपरिक अथवा डिजिटल उद्योगक्षेत्रातल्या कंपन्या आपल्याकडील माहितीच्या व्यवस्थापनासाठी मायएसक्यूएलला पहिली पसंती देतात.

एखाद्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये प्रक्रिया केलेली माहिती साठवण्यासाठी, तसेच त्या प्रणालीच्या वापरकर्त्यांने विचारलेली माहिती परत मिळवण्यासाठी डेटाबेसचा वापर केला जातो. आरडीबीएमएस हा एक विशिष्ट प्रकारचा डेटाबेस आहे ज्यात माहिती ही वेगवेगळ्या टेबल्समध्ये पंक्ती आणि स्तंभांच्या (रोज आणि कॉलम्स) स्वरूपात साठवली जाते. त्याचबरोबर ही टेबल्स एकमेकांशी संबंधित असतात. अत्यंत पद्धतशीरपणे माहितीची साठवण केल्यामुळे आरडीबीएमएसमध्ये नव्या माहितीची भर घालणं, असलेली माहिती परत मिळवणं व नको असलेली माहिती काढून टाकणं अत्यंत कार्यक्षमपणे करता येतं. मायएसक्यूएलप्रमाणेच मायक्रोसॉफ्टचा एसक्यूएल सव्‍‌र्हर, तसेच अ‍ॅक्सेस डेटाबेस, आयबीएमचा डीबी२ डेटाबेस, ओरॅकल डेटाबेस, एसएपीचा सायबेस डेटाबेस असे विविध आरडीबीएमएस आज प्रचलित आहेत.

मायएसक्यूएलची निर्मिती १९९५ मध्ये तीन स्वीडिश संगणक तंत्रज्ञांनी (मायकल विडेनियस, डेविड अ‍ॅक्समार्क व अ‍ॅलन लार्सन) स्वत:च स्थापलेल्या मायएसक्यूएल एबी या कंपनीद्वारे केली. या तिघांत सर्वात वरिष्ठ असलेल्या मायकल विडेनियसच्या मुलीच्या नावावरून (जिचे नाव ‘माय’ (ट८) असे होते) या प्रणालीला नाव देण्यात आले होते. त्या काळात मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम वगैरे कंपनींच्या आरडीबीएमएस प्रणाली व्यावसायिक वर्तुळात प्रसिद्ध असल्या तरी त्यांच्या अवाढव्य किमतीमुळे लघू किंवा मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी तसेच हौशी संगणक तंत्रज्ञांच्या वैयक्तिक वापरासाठी आवाक्याबाहेरच्या होत्या. मायएसक्यूएलची निर्मिती तिच्या संस्थापकांनी विशेषकरून याच मार्केटला डोळ्यासमोर ठेवून केली होती. त्याचप्रमाणे मायएसक्यूएलला विविध ऑपरेटिंग प्रणाली प्लॅटफॉर्मवर चढवता येऊ  शकेल याकडेही विशेष लक्ष पुरवण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच मायएसक्यूएल ही विण्डोज, लिनक्स, सन सोलारिससारख्या ऑपरेटिंग प्रणालींवर विनासायास वापरता येऊ  शकत होती.

असं असलं तरीही मायएसक्यूएल काही पहिल्यापासून ओपन सोर्स प्रणाली नव्हती. निर्मितीपासून पहिली पाच र्वष, २००० सालापर्यंत ही प्रणाली मायएसक्यूएल एबी कंपनीच्याच मालकीची होती व आपल्या प्रतिस्पध्र्याप्रमाणेच लायसन्सिंग शुल्क घेऊन वितरित होत होती. पहिली पाच र्वष काहीशा संथ गतीनेच वाटचाल करत असलेल्या या आरडीबीएमएस प्रणालीने २००० सालानंतर मात्र गगनभरारी घेतली. तोवर प्रोप्रायटरी असलेल्या मायएसक्यूएलला त्या वर्षी कंपनीने १०० टक्के ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणून पुनर्वितरित केले व डेटाबेसचा सोर्स कोड जीपीएल लायसन्सिंग पद्धतीद्वारे सर्व जगास खुला केला. पुढील दोन एक वर्षांतच मायएसक्यूएलला २० लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले, तर जवळपास ३० लाख सक्रिय वापरकर्त्यांनी विविध कारणांसाठी तिचा उपयोग केला.

रेड हॅटप्रमाणेच कंपनीने मायएसक्यूएलला दोन आवृत्त्यांमध्ये उपलब्ध केले; एक म्हणजे संपूर्णपणे मोफत उपलब्ध असलेली मायएसक्यूएलची कम्युनिटी (समुदायाची) आवृत्ती, तर व्यावसायिक आस्थापनांसाठी मायएसक्यूएलची एण्टरप्राइज आवृत्ती!  ग्राहक जी काही किंमत मोजत होता त्यात त्याला २४७७ सॉफ्टवेअरचा सपोर्ट मिळत होता – मग त्यात त्याच्या शंकांचे निरसन, सॉफ्टवेअर सव्‍‌र्हरवर चढवण्यासाठीची संपूर्ण मदत व मार्गदर्शन, सुधारित सॉफ्टवेअरची आवृत्ती ग्राहकाला देऊन त्याच्याकडचे सॉफ्टवेअर अद्ययावत करणे अशा अनेक गोष्टी समाविष्ट होत्या.

डेटाबेस ओपन सोर्स केल्यामुळे जगभरातल्या समुदायांकडून त्यात नियमितपणे होत असलेल्या सुधारणा, त्यामुळे प्रणालीच्या कार्यक्षमतेत होत असलेली वाढ व त्यावर कंपनीकडून मिळणारे सशुल्क सपोर्ट, या कारणांमुळे पुढील सहा-सात वर्षांत अनेक मोठय़ा बँका, वित्तीय संस्था, तसेच दूरसंचार क्षेत्रातल्या महाकाय कंपन्यांनी मायएसक्यूएलला आपलंसं केलं. शून्य लायसन्सिंग व माफक सपोर्ट फी असलेला पण तरीही अत्यंत कार्यक्षम, तसेच मोठय़ा प्रमाणात व विस्तृत प्रकारची माहिती साठवण्याची क्षमता असणाऱ्या या आरडीबीएमएस प्रणालीने मायक्रोसॉफ्ट, ओरॅकलसारख्या पारंपरिक प्रोप्रायटरी प्रतिस्पध्र्याची झोप उडवली. यात सर्वात जास्त फटका ओरॅकलला बसला, कारण कंपनीच्या महसुलातला सर्वाधिक हिस्सा हा तिच्या स्वत:च्या प्रोप्रायटरी आरडीबीएमएस प्रणालीतून मिळत होता.

कॉर्पोरेट धोरण आखण्यामध्ये माहीर असलेल्या ओरॅकलने मग पद्धतशीरपणे या आव्हानाचा मुकाबला करण्यास सुरुवात केली. कंपनीची व्यवस्थापन समिती हे जाणून होती की मायक्रोसॉफ्टप्रमाणे आक्रस्ताळ्या पद्धतीने मायएसक्यूएल व पर्यायाने ओपन सोर्सचा मुकाबला करण्यात काहीच हशील नाहीए. त्याचप्रमाणे सरळसरळ मायएसक्यूएल कंपनीला विकत घेण्याचा निर्णय ओरॅकलच्या अंगाशी येऊ  शकला असता, कारण ओरॅकलमध्ये ओपन सोर्सला विरोध करणारा एक खूप मोठा आंतरिक गट होता.

याच कारणांमुळे ओरॅकलने २००५ मध्ये सर्वप्रथम इनोबेस या कंपनीला खरेदी केले. ही इनोबेस कंपनी मायएसक्यूएल डेटाबेसच्या माहिती साठवणाऱ्या इंजिनचे व्यवस्थापन व देखभालीचे काम करायची. पुढच्याच वर्षी ओरॅकलने स्लीपीकॅट या मायएसक्यूएल डेटाबेसमध्ये साठवलेली माहिती परत मिळवण्याच्या अथवा तिच्यात फेरफार करण्यासाठी आवश्यक असलेले अल्गोरिदम बनविण्याचे काम करणाऱ्या कंपनीला विकत घेतले. दुसऱ्या बाजूला मायएसक्यूएलची घोडदौड जोरात सुरू होती. २००७ सालच्या अंतापर्यंत कंपनीमधल्या तंत्रज्ञांची संख्या ३००च्या वर गेली होती (त्यातले ७० टक्के लोक घरून काम करीत), तर ओपन सोर्स असूनही कंपनीचा महसूल ७.५ कोटी अमेरिकन डॉलर्सएवढा झाला होता.

ओरॅकल मायएसक्यूएलच्या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सावधपणे पावलं टाकत असतानाच जानेवारी २००८ मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज सन मायक्रोसिस्टीमने मायएसक्यूएलला १०० कोटी अमेरिकन डॉलर्सना खरेदी केल्याचे जाहीर केले. सन मायक्रोसिस्टीमची सांपत्तिक स्थिती मजबूत नसताना तिने घेतलेल्या या निर्णयाचे संमिश्र प्रतिसाद उमटले. जरी सन मायक्रोसिस्टीमचा ओपन सोर्सला पाठिंबा असला तरीही ओपन सोर्स समुदायाने या घटनेचे फारसे स्वागत केले नाही. मायएसक्यूएलचे संस्थापक विडेनियस आणि अ‍ॅक्समार्क यांनी तर सन मायक्रोसिस्टीमवर कठोर शब्दात टीका केली व मायएसक्यूएलच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली.

ओरॅकलसाठी ही एक नामी संधी होती. सन मायक्रोसिस्टीमच्या काहीशा अस्थिर आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवत ओरॅकलने एप्रिल २००९ मध्ये मायएसक्यूएलसकट सन मायक्रोसिस्टीमला विकत घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला. ओरॅकलच्या ओपन सोर्स तत्त्वांशी असलेल्या बांधिलकीबद्दल कसलीही खात्री नसल्याने, त्याच दिवशी मायएसक्यूएलच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मायकल विडेनियसने कंपनीला सोडचिठ्ठी दिली व मायएसक्यूएल प्रकल्पात सहभागी असलेल्या काही प्रमुख तंत्रज्ञानाबरोबर मारियाडीबी या मायएसक्यूएलवरच आधारित असलेल्या (‘फोर्क’) नव्या ओपन सोर्स आरडीबीएमएस प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. मायएसक्यूएलप्रमाणेच याही प्रणालीचे नाव त्याने आपली दुसरी मुलगी मारियावरून ठेवले होते.

ओरॅकलने जरी मायएसक्यूएलची कम्युनिटी आवृत्ती अजूनही ओपन सोर्स ठेवली असली व ओरॅकलच्या पाठिंब्यामुळे व्यावसायिक आस्थापनांसाठी मायएसक्यूएलवर मिळणाऱ्या सपोर्टमध्ये अधिक व्यावसायिकपणा आला असला तरीही प्रणालीमधल्या नवीनतम सुधारणांच्या बाबतीत आज मारियाडीबीने मायएसक्यूएलवर मात केली आहे. त्याचबरोबर मायएसक्यूएलशी १०० टक्के सुसंगत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी मायएसक्यूएलवरून मारियाडीबीवर आपल्या डेटाबेसचं बस्तान बसवलं आहे. त्यामुळेच नाना कॉर्पोरेट क्लृप्त्या वापरून मायएसक्यूएलला आपल्या अमलाखाली आणण्याचे ओरॅकलचे धोरण संपूर्णत: यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही. अफाट संसाधनं हाताशी असूनही एका संगणक क्षेत्रातील महासत्तेला, कसलंही आर्थिक पाठबळ नसलेल्या ओपन सोर्स व्यवस्थेला नमवणं जवळपास अशक्य आहे ही बाब यातून स्पष्ट होते. तसेच समुदायाच्या सहभागात्मक सहयोगाची ताकददेखील यात अधोरेखित होते.

amrutaunshu@gmail.com

मराठीतील सर्व महाजालाचे मुक्तायन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mysql oracle mariadb
First published on: 27-08-2018 at 00:24 IST