25 April 2019

News Flash

नेटस्केप आणि ओपन सोर्स

आपल्या प्रोप्रायटरी ब्राऊझरला ओपन सोर्स करण्याचा हा निर्णय नेटस्केपने काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या प्रोप्रायटरी ब्राऊझरला ओपन सोर्स करण्याचा निर्णय नेटस्केपने तडकाफडकी घेतलेला नव्हता. तरीही विविध कारणांमुळे त्याला जगभरातील तंत्रज्ञांनी अपेक्षेएवढं आपलंसं केलं नाही. या निर्णयाने इंटरनेट एक्स्प्लोररला नेस्तनाबूत करणं तर दूरच, त्याच्या केसालाही धक्का लागला नाही..

जानेवारी २३, १९९८. या दिवशी नेटस्केप नॅविगेटर या जगप्रसिद्ध ब्राऊझरची निर्मिती करणाऱ्या नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशनच्या सीईओ जेम्स बार्क्‍सडेलने केलेल्या एका जाहीर निवेदनानं संपूर्ण संगणकविश्व ढवळून निघालं. बार्क्‍सडेलने नेटस्केप नॅविगेटरला (तो ज्या नेटस्केप कम्युनिकेटर या सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन संचाचा भाग होता, त्या संचासकट) पूर्णत: ओपन सोर्स करण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आणि भल्याभल्यांची झोप उडाली. एका प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची निर्मिती करणाऱ्या व ते व्यावसायिकपणे विकून महसूल कमावणाऱ्या कंपनीने आपल्या मुख्य सॉफ्टवेअर प्रणालीला ओपन सोर्स करण्याची ही पहिलीच वेळ होती.

या घटनेच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी, नेटस्केप नॅविगेटरच्या प्रमुख तंत्रज्ञांपैकी एक असलेल्या जेम्स झाविन्स्कीने े९्र’’ं.१ॠ  या संकेतस्थळाची नोंदणी केली व नेटस्केपच्या या ओपन सोर्स प्रकल्पाला ‘मोझिला’ असे नाव दिले. या प्रकल्पामधून खुला होणारा सगळा सोर्स कोड एकत्रितपणे संघटित करण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली होती. ज्या मोझ्ॉक ब्राऊझरपासून नेटस्केपची सुरुवात झाली होती त्या नावात ‘गॉडझिला’ या जपानी अक्राळविक्राळ राक्षसाचे नाव मिसळून झाविन्स्कीने मोझिला हे नाव योजले होते. भविष्यात मोझिला प्रकल्पाने गॉडझिलासारखे विशाल रूप धारण करून मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोररला गिळंकृत करावे अशी काहीशी कल्पना झाविन्स्की आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात या प्रकल्पाचे नाव ठरवताना आली असावी.

आपल्या प्रोप्रायटरी ब्राऊझरला ओपन सोर्स करण्याचा हा निर्णय नेटस्केपने काही तडकाफडकी घेतलेला नव्हता. या निर्णयाप्रत येण्याआधी त्याआधीच्या दीड वर्षांतल्या घटना कारणीभूत होत्या. १९९६च्या मध्यापर्यंत ब्राऊझर मार्केटमध्ये सर्वाधिक हिस्सा असलेल्या नेटस्केपला त्यानंतर मात्र इंटरनेट एक्स्प्लोररच्या मुसंडीमुळे उतरती कळा लागली होती. इंटरनेट एक्स्प्लोररला विंडोजबरोबर मोफत वितरित करण्याची मायक्रोसॉफ्टची क्लृप्ती चांगलीच यशस्वी झाली होती. १९९७च्या मध्यावर नेटस्केप नव्हे तर इंटरनेट एक्स्प्लोरर नंबर एकचा ब्राऊझर बनला होता.

नेटस्केप हे जाणून होती की अजस्र मायक्रोसॉफ्टचा तिने कितीही प्रतिकार केला तरीही तिचा निभाव लागणं कठीण आहे. मायक्रोसॉफ्टला शह देण्यासाठी काही तरी चाकोरीबाहेरचा विचार करण्याची गरज होती. कंपनीवर आलेल्या प्रसंगाचं गांभीर्य समजवण्यासाठी व त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याच्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापन समितीने १९९७च्या मध्यावर नेटस्केपच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञांना बोलावून घेतले. या तंत्रज्ञांमधला एक होता, नेटस्केपचा तांत्रिक आराखडा बनविणारा, एरिक हान!

या चर्चासत्रानंतर काही दिवसांच्या आतच हानने नेटस्केपला या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या उपायांचा ऊहापोह केलेला एक शिफारस अहवाल व्यवस्थापन समितीकडे पाठवून दिला. नेटस्केपला आपले गतवैभव परत मिळवून देण्यासाठी या अहवालात हानने दोन गोष्टी स्पष्टपणे मांडल्या होत्या. एक म्हणजे नेटस्केपसुद्धा इंटरनेट एक्स्प्लोररप्रमाणे व्यावसायिक वा बिगर व्यावसायिक वापरासाठी संपूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणं व दुसरं म्हणजे नेटस्केपचा सोर्स कोड पूर्णपणे मुक्त करून प्रकल्पाला ओपन सोर्स बनविणं. त्याची ही दुसरी शिफारस नेटस्केपच्या सध्याच्या व्यवस्थापनात अत्यंत मूलभूत स्वरूपाचा बदल सुचवणारी होती.

आपल्या या वरवर पाहता अशक्यप्राय वाटणाऱ्या शिफारसीसाठी त्याने काही तर्कशुद्ध कारणं दिली होती. हाडाचा तंत्रज्ञ असल्याने हान हा पहिल्यापासूनच लिनक्स प्रकल्पाचं बारकाईने निरीक्षण करत आला होता. लिनक्सने ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये यशस्वितेचा एक मानदंड तयार केला होता. हानला लिनक्स व नेटस्केपमध्ये काही साम्यस्थळं दिसली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांचाही शत्रू एकच होता – मायक्रोसॉफ्ट! लिनक्समध्ये अनेक तंत्रज्ञांनी केवळ मायक्रोसॉफ्टला विरोध करण्याच्या आपल्या भूमिकेमुळे भरघोस योगदान दिलं होतं. हीच भूमिका त्यांनी नेटस्केपसाठीसुद्धा अंगीकारली असती, असा हानचा कयास होता.

त्यामुळे एका बाजूला नेटस्केप मोफत उपलब्ध केल्याने इंटरनेट एक्स्प्लोररचे बरेचसे वापरकर्ते परत नेटस्केपकडे वळतील व दुसऱ्या बाजूला सोर्स कोड मुक्त केल्याने जगभरात पसरलेल्या ओपन सोर्स समुदायाचा भरघोस पाठिंबा नेटस्केप प्रकल्पाला लाभेल. यामुळे तांत्रिकदृष्टय़ादेखील नेटस्केप अधिक प्रगत होण्यास मदत होईल असा दूरदर्शी विचार हानच्या शिफारशींमागे होता.

नेटस्केपच्या व्यवस्थापन समितीने, विशेषत: सीईओ जेम्स बार्क्‍सडेलने, हानची कल्पना उचलून धरली. नेटस्केपचा ढासळता बाजार हिस्सा सावरण्याची व्यवस्थापन समितीला एवढी घाई झाली होती की, ओपन सोर्स प्रकल्प अंमलबजावणीला आपण पुरेसे तयार आहोत की नाहीत याची खातरजमा न करताच कंपनीने जानेवारी १९९८मध्ये या निर्णयाची घोषणा केली व सोर्स कोड मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागून घेतली.

व्यवस्थापन समितीच्या मताप्रमाणे इतका कालखंड सोर्स कोडला ओपन सोर्स स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्यामध्ये जेवढा बदल करणं आवश्यक होतं त्यासाठी पुरेसा होता. पण या निर्णयाच्या वाच्यतेनंतर कंपनीमधल्या तंत्रज्ञांना जाणवलं की, हा वेळ पुरा पडणार नाही. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर असल्याने नेटस्केपचा सोर्स कोड कंपनीतल्या ठरावीक तंत्रज्ञांपुरताच सीमित होता. वर्षांनुवर्ष काम करत असल्याने ते या सोर्स कोडशी चांगलेच परिचित होते. पण ओपन सोर्स समुदायाला खुला करण्याइतका तो परिपक्व नव्हता.

जगभरातल्या समुदायांना सहज समजेल व त्यावर काम करता येईल यासाठी सोर्स कोडचं छोटय़ा छोटय़ा हिश्शांत विभाजनीकरण करणं अत्यावश्यक होतं. एखाद्या नव्या तंत्रज्ञाला सोर्स कोडमधलं तर्कशास्त्र नीट समजावं म्हणून कोडच्या बाजूला टिप्पणी लिहिण्याची पद्धत असते. नेटस्केपच्या बाबतीत ही मार्गदर्शक सूचना फारशी पाळली गेली नव्हती. सोर्स कोड कंपनीपुरता सीमित असेपर्यंत हे एकवेळ ठीक होतं पण ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशासाठी हे चालण्यासारखं नव्हतं.

नेटस्केपची अडथळ्यांची शर्यत इथेच संपत नव्हती. प्रोप्रायटरी असल्याने नेटस्केपमध्ये इतर अनेक प्रोप्रायटरी घटकांचा उपयोग झाला होता, जे कंपनीच्या मालकीचे नव्हते, तर त्यांचं नेटस्केपने फक्त वापरण्याचं लायसन्स घेतलं होतं. त्यामुळे नेटस्केपचा सोर्स कोड या घटकांशिवायच मुक्त स्वरूपात उपलब्ध करून द्यावा लागणार होता.

अखेरीस दिलेलं वचन पाळण्यासाठी नेटस्केपने दोन महिन्यांत, ३१ मार्च १९९८ला, आपल्या ब्राऊझरच्या सोर्स कोडला दोन भागांत विभागून, त्यातल्या एका भागाला मोझिला प्रकल्पाअंतर्गत खुला केला. सुरुवातीला या प्रकल्पाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  पहिल्या २-३ महिन्यांत अशा ऐच्छिक योगदानातून नेटस्केपमध्ये काही चांगल्या कार्यक्षमतांची भर पडली.  अशा उत्कृष्ट प्रारंभानंतरही, नेटस्केपच्या ओपन सोर्स प्रकल्पामध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर झपाटय़ाने घटत गेली व नेटस्केपच्या ओपन सोर्स मोहिमेला ओहटी लागली. प्रोप्रायटरी इतिहास असल्यामुळे म्हणा किंवा प्रकल्पाबाबतीतले सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यत्वे कंपनीमधल्या तंत्रज्ञांपुरताच मर्यादित राहिल्यामुळे म्हणा, किचकट लायसन्सिंग पद्धतीमुळे म्हणा किंवा अगदी आक्रस्ताळ्या व्यवस्थापनामुळे म्हणा, कारणं काहीही असली तरीही शेवटी नेटस्केपच्या ओपन सोर्स अवताराला जगभरातल्या तंत्रज्ञांनी अपेक्षेएवढं आपलंसं केलं नाही. इंटरनेट एक्स्प्लोररला नेस्तनाबूत करणं तर दूरच, त्याच्या केसालाही धक्का नेटस्केपच्या ओपन सोर्स निर्णयाने लागला नाही. १९९६ पर्यंत नाममात्र असलेला इंटरनेट एक्स्प्लोररचा बाजार हिस्सा, केवळ पाच वर्षांत ९५ टक्क्यांपर्यंत वाढला.

२००२ मध्ये पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टच्या रेटय़ासमोर नेटस्केप आणि तिचा ओपन सोर्स मोझिला प्रकल्प निष्प्रभ ठरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, मोझिला प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन आणि मोझिलाच्याच सोर्स कोडचा आधार घेऊन एक नवा ओपन सोर्स प्रकल्प नेटस्केपमध्ये कार्यरत असलेल्या तिघा तंत्रज्ञांनी मिळून सुरू केला. पहिली आवृत्ती प्रसिद्ध केल्याच्या केवळ तीन-चार वर्षांच्या आत या ब्राऊझरने इंटरनेट एक्स्प्लोररचा बाजार हिस्सा जवळपास ४० टक्क्यांनी खाली आणला. या ब्राऊझरचं नाव होतं ‘मोझिला फायरफॉक्स’! फायरफॉक्सच्या उदयाची व त्यास मिळालेल्या यशामागील कारणांची चर्चा आपण पुढील लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com

First Published on July 2, 2018 1:08 am

Web Title: netscape and open source