18 October 2019

News Flash

पीएचपी : महाजालाची भाषा

पीएचपीचा जागतिक हिस्सा आजच्या घडीला ८२ टक्के आहे.

|| अमृतांशू नेरुरकर

पीएचपीचा जागतिक हिस्सा आजच्या घडीला ८२ टक्के आहे. फेसबुक, विकिपीडिया, वर्डप्रेस यांसारखे करोडो वापरकर्ते असलेले वेब पोर्टल्स आज पीएचपीचाच वापर करतात, यावरूनच तिच्या वर्चस्वाची कल्पना यावी..

मागील लेखात चर्चिलेल्या ‘लॅम्प’ या महाजालाच्या ओपन आर्किटेक्चरमधलं शेवटचं अक्षर ‘पी’ हे महाजालातल्या विविध संकेतस्थळांच्या निर्मितीस आवश्यक असणाऱ्या प्रोग्रामिंग भाषेशी निगडित आहे. वापरकर्त्यांने मागितलेली व त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दाखवण्यायोग्य माहिती संकेतस्थळापर्यंत पोहोचवण्यामागचं तर्कशास्त्र या प्रोग्रामिंग भाषेमध्ये लिहिलेलं असतं.

जरी लॅम्प ही संकल्पना ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आली असली तरी इंटरनेट युगाच्या सुरुवातीच्या काळात ‘पी’वरूनच सुरू होणारी ‘पर्ल’ (ढी१’) नावाची प्रोग्रामिंग भाषा महाजालामध्ये सव्‍‌र्हरवरून माहिती मागविण्यासाठी वापरली जायची (व अजूनही काही प्रमाणात वापरली जाते). विशेष म्हणजे पर्लदेखील ओपन सोर्सच आहे. लॅरी वॉल या निष्णात संगणक अभियंत्याने १९८७ मध्ये तिची निर्मिती केली व त्या काळात युनिक्ससारख्या प्रकल्पांत प्रचलित असलेल्या देवाणघेवाणीच्या संस्कृतीस अनुसरून त्याने लगेचच पर्ल तिच्या सोर्स कोडसकट ‘कॉम्प.सोर्सेस’ नावाच्या ऑनलाइन चर्चामंचावर वितरित केली.

इंटरनेटची खऱ्या अर्थाने तेव्हा सुरुवात झाली नसल्याने पर्ल ही महाजालासाठी बनवलेलीच नव्हती. त्या काळात एखाद्या मजकुरावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यासाठी (टेक्स्ट प्रोसेसिंग) एकच संयुक्त प्रणाली उपलब्ध नव्हती. विविध साधनं वापरून हे काम करणं ही एक जिकिरीची प्रक्रिया होती. सिस्टीम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीत काम करताना वॉलला बरेचदा हे काम करावं लागे व त्यात त्याचा वेळ फार वाया जाई. या प्रश्नावर एक अंतिम तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्याने पर्लची निर्मिती केली होती. टेक्स्ट प्रोसेसिंग संदर्भातल्या कामासाठी पर्ल एवढी परिपूर्ण कोणतीच प्रोग्रामिंग भाषा तेव्हा उपलब्ध नसल्याने, पर्लवर तंत्रज्ञांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या व काहीच महिन्यांतच पर्ल प्रकल्पासाठी आपले योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांचे समुदाय तयार झाले. १९९२-९३ नंतर तर ‘सी’प्रमाणेच पर्ल हीसुद्धा युनिक्सवर चालणारी प्रमाणभाषा बनली.

९०च्या दशकात इंटरनेट युगाला सुरुवात झाली होती. इलेक्ट्रॉनिक व संगणक क्षेत्रातील क्रांतीमुळे अनेकांना वैयक्तिक पातळीवर संगणक खरेदी करणं सहज परवडण्यासारखं होत होतं, तर दळणवळण क्षेत्रातल्या नवनव्या शोधांमुळे इंटरनेटसाठी अत्यावश्यक असणारा नेटवर्कचा वेग व क्षमता गगनभरारी घेत होते. दर आठवडय़ाला अक्षरश: शेकडो नव्या संकेतस्थळांची निर्मिती होत होती व त्याचबरोबर इंटरनेट वापरकर्त्यांची संख्यादेखील भूमितीश्रेणीने वाढत होती. येणाऱ्या डिजिटल काळाशी सुसंगत राहण्यासाठी लॅरी वॉल व पर्ल प्रकल्पातल्या प्रमुख तंत्रज्ञांना पर्लमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची निकड वाटत होती.

अखेरीस १९९४च्या उत्तरार्धात त्यांनी पर्लची नवी कोरी पाचवी आवृत्ती प्रसिद्ध केली. खरं सांगायचं तर ही आवृत्ती म्हणजे संपूर्णपणे पुनर्लिखित असलेली नवी प्रोग्रामिंग भाषाच होती. याच आवृत्तीमध्ये पहिल्यांदाच सीजीआय (कॉमन गेटवे इंटरफेस) या तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सीजीआय तंत्रज्ञानामुळे ब्राऊझरला वेब सव्‍‌र्हरकडून वापरकर्त्यांने विचारलेली काही माहिती मागवणं आणि ती माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेब सव्‍‌र्हरवर काही प्रोग्राम चालवणं शक्य होणार होतं. नव्वदच्या दशकाच्या मध्यावर हे प्रोग्राम्स मुख्यत्वेकरून पर्ल भाषेमध्येच लिहिले जात. त्या काळात निर्मिलेले आणि आज चांगलाच नावलौकिक कमावलेले आयएमडीबी, बगझीला, क्रेगलिस्ट वगैरेसारखे वेब पोर्टल्स आजही पर्लचाच वापर करतात. सुरुवातीच्या काळातल्या या यशस्वी घोडदौडीनंतर पर्लची गती काहीशी मंदावली व इंटरनेट युगासाठीच निर्मिलेल्या एका नव्या प्रणालीने पर्लची जागा घेतली जिचं नाव होतं ‘पीएचपी’!

नव्वदच्या दशकाच्या अंतापासून आजतागायत पीएचपी (ढऌढ) हीच महाजालाची प्रमाणभाषा म्हणून मान्यता पावली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे महाजालातल्या प्रमाण ऑपरेटिंग प्रणाली, ब्राऊझर, वेब सव्‍‌र्हरप्रमाणे आणि पर्लसारखीच पीएचपीदेखील ओपन सोर्स आहे. पीएचपीची निर्मिती रॅस्मस लरडॉर्फ या कॅनेडियन संगणक अभियंत्याने १९९४ मध्ये केली. सी प्रोग्रामिंग भाषा आणि पर्लमधल्या सीजीआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने पीएचपीचा सुरुवातीचा कोड लिहिला होता. त्याचे पीएचपीच्या निर्मितीचे कारण अगदी खासगी होते. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या स्वत:च्या बायोडेटाला किती प्रतिसाद मिळतो याचं विश्लेषण करण्यासाठी त्याने पीएचपीची निर्मिती केली होती. यामुळेच पीएचपीचे मूळ नाव त्याने ‘पर्सनल होम पेज’ टूल्स असेच ठेवले होते.

जरी पीएचपीचा सोर्स कोड १९९५ मध्येच लरडॉर्फने खुला केला असला तरीही १९९७ मध्ये त्याने पीएचपीसाठी खुल्या लायसन्सिंग पद्धतीचा अंगीकार करून तिला खऱ्या अर्थाने ओपन सोर्स बनवले. इंटरनेटची वाढ ही एवढय़ा झपाटय़ाने होत होती की, पीएचपी ओपन सोर्स झाल्याबरोबर लगेचच अनेक तंत्रज्ञांनी विविध संकेतस्थळांच्या निर्मितीसाठी तिचा वापर केला. यापैकीच होते इस्राएलमधल्या तेल अवीव विद्यापीठातले दोघे विद्यार्थी- झीव सुरास्की आणि अ‍ॅण्डी गटमन्स! अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षांचा प्रकल्प म्हणून ते एका ई-कॉमर्स संकेतस्थळावर काम करत होते, ज्यासाठी सव्‍‌र्हरवर चालणारे प्रोग्राम्स लिहिण्याकरिता ते पीएचपीचा वापर करत होते.

आपल्या विद्यापीठीय प्रकल्पावर काम करता करता त्यांना असे आढळून आले की, सद्य:स्थितीतली पीएचपी ही एखाद्या ई-कॉमर्स संकेतस्थळासाठी तितकीशी कार्यक्षम नाही. ई-कॉमर्समध्ये ऑनलाइन व्यवहार पुष्कळ प्रमाणात होत असल्याने सव्‍‌र्हरकडून अत्यंत कमी वेळेत अचूक माहिती येणं गरजेचं असताना पीएचपी तेवढय़ा कार्यक्षमतेने माहितीची देवाणघेवाण करू शकत नव्हती. सोर्स कोड हाताशी असल्याने या दोघांनी पीएचपीमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यांतच जवळपास सगळ्या प्रणालीची पुनर्रचना व पुनर्लेखन करून व लरडॉर्फकडून बदललेल्या कोडचं पुनरावलोकन करून पीएचपीची नवी तिसरी आवृत्ती १९९८ मध्ये प्रसिद्ध केली.

या तिसऱ्या आवृत्तीपासून पीएचपी ही महाजालाची प्रमाणभाषा बनण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज अस्तित्वात असलेल्या पीएचपीच्या सातव्या आवृत्तीचं आरेखनदेखील या तिसऱ्या आवृत्तीशी बऱ्याच प्रमाणात समानता दर्शवतं. यावरूनच सुरास्की आणि गटमन्सचं काम किती मूलभूत स्वरूपाचं होतं याचा अंदाज येऊ  शकतो. या आवृत्तीपासून पीएचपीचं पूर्ण नावही ‘पर्सनल होम पेज’पासून ‘पीएचपी : हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर’ असं बदललं. जीएनयूप्रमाणेच पीएचपीच्या नव्या नावातसुद्धा ‘पीएचपी’ या शब्दाची अनंत वेळा पुनरावृत्ती होते.

१९९८च्या अंतापर्यंत पीएचपीच्या या नव्या आवृत्तीचा वापर सत्तर हजारांहून अधिक संकेतस्थळांसाठी करण्यात आला होता. पीएचपीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ केल्यानंतर सुरास्की आणि गटमन्स शांत बसले नाहीत. लगेचच त्यांनी, प्रकल्पात योगदान देणाऱ्या इतर तंत्रज्ञानाबरोबर, पीएचपीच्या मूळ गाभ्याच्या कोडचं विभाजनीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पीएचपी ही सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग प्रणाली तसेच वेब सव्‍‌र्हरवर चालण्यासाठी सक्षम बनविण्यासाठी त्यात महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. १९९९च्या मध्यावर पीएचपीची चौथी आवृत्ती प्रसिद्ध झाली, ज्यात प्रथमच प्रणालीच्या गाभ्यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची निर्मिती करण्यात आली होती व ज्याचं नामकरण सुरास्की आणि गटमन्सच्या पहिल्या नावातील (झीव व अ‍ॅण्डी) काही अक्षरांचं मिश्रण करून ‘झेंड’ (Zend) इंजिन असं करण्यात आलं होतं.

यानंतर मात्र पीएचपी प्रकल्पाने मागे वळून पाहिलं नाही. संकेतस्थळांसाठी वापरल्या जाणाऱ्या व वेब सव्‍‌र्हरवर चालणाऱ्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये पीएचपीचा जागतिक हिस्सा आजच्या घडीला ८२ टक्के एवढा आहे. फेसबुक, विकिपीडिया, वर्डप्रेस यांसारखे करोडो वापरकर्ते असलेले वेब पोर्टल्स आज पीएचपीचाच वापर करतात, यावरूनच तिच्या महाजालातल्या वर्चस्वाची कल्पना यावी. असो.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला एकीकडे ओपन सोर्सची जोरदार घोडदौड सुरू असताना दुसऱ्या बाजूला महाजाल किंवा वर्ल्ड वाइड वेब एका स्थित्यंतरातून जात होतं. डॉट कॉमचा फुगा फुटला होता व येणाऱ्या काळात महाजालाचं स्वरूप कसं असेल याबाबत एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अशा वेळेला टीम ओरायली या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विख्यात भाष्यकाराने ओपन सोर्स व्यवस्थेच्या मूळ तत्त्वांशी मिळतंजुळतं असं महाजालाचं एक सहभागात्मक स्वरूप रेखाटलं होतं, ज्याचं त्याने वेब २.० असं नामकरण केलं होतं.

amrutaunshu@gmail.com

First Published on September 3, 2018 2:09 am

Web Title: php programming language