ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जसा सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरप्रतिच्या दृष्टिकोनात बदल होत होता तशीच स्टॉलमनचीही विचारधारा या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपन्यांच्या संपूर्ण विरोधात, म्हणजेच मुक्तपणाचा व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी बनली होती.  मागील लेखात चíचलेल्या झेरॉक्स कंपनीच्या पिट्ररच्या घटनेनंतर स्टॉलमन पेटून उठला. त्याची खात्री पटली की, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या कॉपीराइट नियमांचा गरफायदा घेत, निव्वळ नफा मिळवण्यासाठी वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकाराची गळचेपी करीत आहेत. बौद्धिक संपदा व कॉपीराइटचे नियम कंपन्यांना अधिक चांगले सॉफ्टवेअर निर्मिण्यास प्रोत्साहन देतात हा तर्कच स्टॉलमनला मान्य नव्हता. त्याचे म्हणणे उलट असे होते की, सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडभोवती कॉपीराइटची कुंपणे घातली तर सॉफ्टवेअरची चोरी अधिक होईल. त्याची ही भीती पुढे सॉफ्टवेअर पायरसीने खरी ठरवली.

थोडक्यात, ८० सालात झेरॉक्स पिट्ररच्या घटनेवेळी सोर्स कोड वितरित न केल्याने जी व्यावहारिक अडचण झाली होती तिचे रूपांतर स्टॉलमनसाठी पुढील तीन-चार वर्षांत नतिक समस्येत झाले होते. अखेरीस त्याने १९८४ सालात एमआयटीमधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला व ‘फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन’ या ‘ना-नफा’ तत्त्वावर चालेल अशा संस्थेची स्थापना केली.

एटीअँडटीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रोप्रायटरी दृष्टिकोनामुळे युनिक्सभोवती कॉपीराइट नियमांच्या भक्कम भिंती उभ्या राहिल्या होत्या व युनिक्सचा सोर्स कोड हाती लागणे दुरापास्त बनले होते. म्हणूनच स्टॉलमनने त्याच्या संस्थेचा मूळ उद्देश हा एक अशी ऑपरेटिंग प्रणाली निर्मिण्याचा ठेवला जिचा सोर्स कोड हा संपूर्णपणे खुला असेल, ज्यायोगे कोणासही त्यात हवा तसा बदल वा सुधारणा विनासायास करता येतील व त्यापुढे जाऊन अशा सुधारित प्रणालीचे पुनर्वतिरणही करता येईल.

एटीअँडटीच्या संकुचित धोरणास विरोध करण्यासाठी त्याने या ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याच्या प्रकल्पाला ‘जीएनयू’ (GNU) असे नाव ठेवले. आकर्षक आणि लोकांचे पटकन लक्ष वेधून घेईल अशी नावे देण्यात स्टॉलमनचा हातखंडा होता, जो या नावातही जाणवतो. जीएनयू हे  GNU’s Not Unix या नावाचे लघुरूप आहे. जीएनयू शब्दाच्या पूर्ण स्वरूपामध्येही परत जीएनयूची पुनरावृत्ती होत असल्याने ही नवी ऑपरेटिंग प्रणाली युनिक्ससारखी असणार नाही (Not Unix) हे स्टॉलमन अनंत वेळा सांगून आपल्या मनात ठसवतो.

यापुढे लगेचच स्टॉलमनने आपल्या जीएनयू प्रकल्पाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात त्याने आपल्या प्रकल्पाचा उद्देश तर जाहीर केलाच, पण त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या नावातल्या ‘फ्री सॉफ्टवेअर’चा त्याला अभिप्रेत असलेला अर्थ खुलासेवार सांगितला. स्टॉलमनला फ्री सॉफ्टवेअर हे फुकट वा मोफत या अर्थाने कधीच अभिप्रेत नव्हते; किंबहुना तो सॉफ्टवेअर मोफत देण्याच्या संपूर्णत: विरोधात होता. त्याने ‘फ्री’ हे फ्रीडम किंवा स्वातंत्र्य या अर्थाने वापरले होते. सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सोर्स कोडसकट सॉफ्टवेअर मिळण्याचे, त्यात बदल करण्याचे व बदललेल्या सॉफ्टवेअरचे पुनर्वतिरण करण्याचे स्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. त्याने त्याच्या जीएनयू प्रकल्पाच्या जाहीरनाम्यात सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या चार प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख खालीलप्रमाणे केला होता-

१) सॉफ्टवेअर स्वत:च्या गरजेनुसार वापरण्याचे स्वातंत्र्य.

२) स्वत:कडे असलेल्या सॉफ्टवेअरच्या प्रतीचे वितरण करण्याचे स्वातंत्र्य.

३) सॉफ्टवेअरच्या आज्ञावलींना अभ्यासून त्यात आवश्यकतेनुसार बदल वा सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य आणि

४) सॉफ्टवेअरच्या अशा सुधारित आवृत्तीचे पुनर्वतिरण करण्याचे स्वातंत्र्य.

हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरच्या थोडय़ाच कालावधीमध्ये स्टॉलमनच्या हे लक्षात आले की, त्याची संस्था सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य तर प्रदान करत आहे, पण त्याने सुधारणा केलेल्या सॉफ्टवेअरच्या आवृत्तीमध्येदेखील अशाच प्रकारचे स्वातंत्र्य पुढील वापरकर्त्यांना बहाल करण्याचे कसलेच बंधन घालत नाही. म्हणजेच एखादा वापरकर्ता हा स्वत:पाशी असलेल्या फ्री सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये बदल करून त्याला प्रोप्रायटरी बनवून त्याचे पुनर्वतिरण सोर्स कोडशिवायदेखील करू शकत होता.

हे रोखण्यासाठी त्याने एका नव्या प्रकारच्या लायसिन्सग पद्धतीला जन्म दिला. अगदी आजतागायत बहुसंख्य ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी वापरली जाणारी हीच ती जीपीएल अथवा जनरल पब्लिक लायसन्स (GPL – General Public License) पद्धती! या पद्धतीमध्ये स्टॉलमनने अत्यंत हुशारीने कॉपीराइटच्या नियमांचाच वापर अशा प्रकारे केला, की ज्यामुळे एकदा एखादे सॉफ्टवेअर जीपीएल लायसन्सच्या अटी व शर्तीवर वितरित केले, की नंतर त्यामध्ये कितीही मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले तरी ते जीपीएल लायसन्सनेच (म्हणजेच मुक्त स्वरूपातच) उपलब्ध करून द्यावे लागेल. दुसऱ्या शब्दात जीपीएल लायसन्स पद्धतीत कॉपीराइटचे नियम कोणाही सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला त्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वितरित करण्यावर कोणत्याही प्रकारचे र्निबध आणण्यापासून रोखतात.

परंपरागत कॉपीराइट कायद्याच्या (जे सोर्स कोड वितरित करण्याला कायदेशीरपणे मज्जाव करतात) हे संपूर्ण उलट वर्तन असल्यामुळे स्टॉलमनने जीपीएल लायसन्समधल्या कॉपीराइट नियमांना ‘कॉपीलेफ्ट’ असे चपखल नाव दिले आहे. जीपीएल लायसिन्सग पद्धती ही ओपन सोर्स जगतातली एक नावीन्यपूर्ण व क्रांतिकारी अशीच घटना होती. तिने प्रथमच ओपन सोर्स सॉफ्टवेअरची (स्टॉलमनच्या भाषेत ‘फ्री’ सॉफ्टवेअरची) अधिकृतपणे व्याख्या केली व त्याला औपचारिक नियमांचे कोंदण दिले, जेणेकरून अशा सॉफ्टवेअरला सर्वकाळ ‘ओपन सोर्स’ स्वरूपातच राहता येईल.

स्टॉलमनने फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून संगणकीय विश्वाला युनिक्सवर काम करू शकतील अशी काही उत्कृष्ट दर्जाची व मोठय़ा प्रमाणावर वापरली गेलेली ‘फ्री’ सॉफ्टवेअर बहाल केली आहेत. त्याचबरोबर फ्री व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसारासाठी स्टॉलमनने विविध क्ऌप्त्या लढवल्या. उदा. त्याने स्वत:च रचून, संगीतबद्ध करून गायलेले फ्री सॉफ्टवेअरचे गीत, ज्यात त्याने संगणक तंत्रज्ञांना या चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले होते किंवा स्वत: निर्मिलेल्या इमॅक्स (Emacs) या विविध सॉफ्टवेअर आज्ञावल्यांचे संपादन करू शकणाऱ्या सॉफ्टवेअरला चर्चची उपमा देणे व स्वत:ला त्या चर्चचे प्रमुख संतपद घेऊन इतर तंत्रज्ञांना ते सॉफ्टवेअर वापरायच्या आधी ‘फ्री’ सॉफ्टवेअर वापरण्याची शपथ घ्यायला लावणे असे अनेक विक्षिप्त वाटतील असे उपद्व्याप स्टॉलमनने केले.

फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनची पायाभरणी, जीपीएल लायसिन्सग पद्धतीचे आरेखन व युनिक्सच्या कोणत्याही आवृत्तीवर चालू शकतील अशा ‘फ्री’ सॉफ्टवेअरच्या निर्मितीनंतर अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी व यश मिळाले. या सुरुवातीच्या यशानंतर मात्र स्टॉलमनचे कर्तृत्व अपेक्षित उंची गाठू शकले नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. युनिक्सवर चालू शकणाऱ्या उपयुक्त सॉफ्टवेअरच्या निर्मितीत गुंतल्यामुळे असेल कदाचित, पण फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या जाहीरनाम्यात उल्लेखलेली ‘मुक्त’ ऑपरेटिंग प्रणाली कधी बनवलीच गेली नाही. त्याचबरोबर त्याचा विक्षिप्त व फटकळ स्वभाव, कट्टरतावादी भूमिका व प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरबद्दल असलेला कमालीचा तिरस्कार यामुळे त्याला पराकोटीचे विरोधकही लाभले ज्यांच्या विरोधात लढण्यात त्याची बरीच ऊर्जा व वेळ खर्च झाला.

‘फ्री’ सॉफ्टवेअर हे त्याने केलेले नामकरणसुद्धा त्याच्या मूळ उद्देशाच्या विरोधातच गेले. ‘फ्री’ म्हणजे फुकट नसून फ्रीडम अथवा स्वातंत्र्य असे त्याने अनेक वेळा खुलासेवार स्पष्ट करूनसुद्धा संगणकीय जगतात ‘ओपन सोर्स’ हे नाव अधिक प्रचलित झाले. स्टॉलमनने मात्र कधीही ‘ओपन सोर्स’ या नामकरणाला मान्यताही दिली नाही व त्याचा कुठे वापरही केला नाही. असे जरी असले तरीही सॉफ्टवेअर सोर्स कोडमुक्त करण्यासाठीच्या चळवळीचे सेनापतिपद त्याच्याकडून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. असो.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात ओपन सोर्स चळवळीला एक संभ्रमावस्था प्राप्त झाली होती. बीएसडी व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनची स्वीकृती एका मर्यादेच्या पुढे जात नव्हती. पुन्हा एकदा प्रोप्रायटरी दिग्गजांपुढे या चळवळीची पीछेहाट होईल की काय अशी स्थिती निर्माण होत होती. काही तरी चमत्कार घडणे गरजेचे होते. अशा वेळेला ओपन सोर्स जगतात एक तिसरी आघाडी उभी राहिली जिने या चळवळीला प्रथमच मुख्य प्रवाहात स्थान दिले. या आघाडीचे नाव होते ‘लिनक्स’; ज्याचे विश्लेषण आपण पुढील लेखांपासून करू.

– अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com