|| अमृतांशू नेरुरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैचारिक स्वातंत्र्य, वैयक्तिक योगदानातून केलेलं सहयोगात्मक कार्य, समुदायांमधली देवाणघेवाण व त्यातून आलेली सार्वजनिक बांधिलकी अशी मूल्यं जी ओपन सोर्स व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतात, त्याच मूल्यांची शिकवण ‘उबुंटू’ संकल्पना देत होती. अशा कारणांमुळेच नाव आजतागायत टिकून राहिलं आहे.

उबुंटू हा दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू भाषेतला शब्द आहे. वर्णद्वेषाविरुद्धच्या लढय़ात नेल्सन मंडेलांनी या शब्दाचा पुष्कळ उपयोग केला होता. या तीन अक्षरी छोटय़ा शब्दामागे एक व्यापक संकल्पना आहे. ‘‘आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वामुळेच माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे’’ “I am because we are”), ही या संकल्पनेमागची तात्त्विक बैठक आहे. थोडक्यात समुदायामधल्या प्रत्येकामध्ये एकमेकांप्रति बंधुभाव निर्माण करून, विचारांच्या आदानप्रदानाद्वारे सहयोगात्मक काम करण्याची शिकवण ही संकल्पना देते.

मार्क शटलवर्थ जेव्हा डेबियनवर आधारित आपल्या ओपन सोर्स ऑपरेटिंग प्रणालीनिर्मितीच्या प्रकल्पासाठी एका समर्पक शीर्षकाचा विचार करत होता तेव्हा त्याला ‘उबुंटू’ हेच नाव सर्वप्रथम सुचलं. थोडंसं चमत्कारिक असलं तरीही शटलवर्थला खात्री होती की त्याच्या या ओपन सोर्स प्रकल्पासाठी उबुंटूइतकं समर्पक नाव शोधूनही सापडणार नाही.

दक्षिण आफ्रिका जी त्याची जन्मभूमी होती तिथली ही संकल्पना होती. त्यामुळे या दृष्टीने हे नाव चपखल होतं. दुसरं त्याहूनही महत्त्वाचं कारण म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य, वैयक्तिक योगदानातून केलेलं सहयोगात्मक कार्य, समुदायांमधली देवाणघेवाण व त्यातून आलेली सार्वजनिक बांधिलकी अशी मूल्यं जी ओपन सोर्स व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतात, त्याच मूल्यांची शिकवण ‘उबुंटू’ संकल्पना देत होती. अशा कारणांमुळेच प्रकल्पाच्या प्रारंभीच निश्चित केलेलं हे नाव आजतागायत टिकून राहिलं आहे.

उबुंटू जरी अखेरीस लिनक्सचंच वितरण असलं तरीही त्यात इतर लिनक्स वितरणांच्या तुलनेत काही महत्त्वाचे तात्त्विक, तांत्रिक व व्यवस्थापकीय फरक आहेत. उबुंटू प्रकल्पाच्या सुरुवातीलाच शटलवर्थ आणि या प्रकल्पात त्याला पहिल्यापासून साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनी प्रकल्पाची दिशा स्पष्ट करणारी तीन मार्गदर्शक तत्त्वं तयार केली होती, ज्यांचा सारांश खालील परिच्छेदात दिला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनी स्टॉलमनच्या ‘फ्री सॉफ्टवेअरच्या’ व्याख्येचा विस्तार करून, उबुंटू व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसाराला लक्षणीय हातभार लावला.

१) वापरकर्त्यांला सॉफ्टवेअर स्वत:च्या गरजेनुसार वापरण्याचं, सॉफ्टवेअरच्या प्रतींचं वितरण करण्याचं, सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्याचं आणि सुधारित सॉफ्टवेअरचं पुनर्वितरण करण्याचं स्वातंत्र्य असणं जरुरी आहे,

२) वापरकर्त्यांला त्याचं सॉफ्टवेअर त्याच्या पसंतीच्या भाषेत वापरण्याचा अधिकार असला पाहिजे, आणि

३) सॉफ्टवेअरची निर्मिती अशा पद्धतीने व्हायला हवी की प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्यांला (मग तो दिव्यांग असला तरीही) ते सॉफ्टवेअर तेवढय़ाच सुलभतेने वापरता येईल.

यातलं पाहिलं तत्त्व हे स्टॉलमनने जीएनयू प्रकल्पाच्या जाहीरनाम्यात सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचा मूलभूत अधिकार म्हणून ज्या चार प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख केला आहे, त्याचीच पुनरावृत्ती आहे. पुढील दोन तत्त्वं मात्र शटलवर्थ आणि त्याच्या सहकाऱ्यांचा ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मितीबद्दलचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट करतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा प्रगत राष्ट्रांमध्ये जरी इंग्रजी भाषा सहजपणे बोलली व वाचली जात असली तरीही जगातल्या निम्म्याहून अधिक जनतेला (विशेषत: आफ्रिकेमधले अनेक मागास देश) इंग्रजीचा जराही गंध नाही याची शटलवर्थला जाणीव होती. एखाद्या सॉफ्टवेअरचा व्यापक स्तरावर विनियोग होण्यासाठी ते विविध भाषांमध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे, किंबहुना सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचा तो मूलभूत अधिकारच आहे, असं शटलवर्थचं स्पष्ट मत होतं. केवळ भाषेच्या अडथळ्यामुळे कोणीही वापरकर्ता संगणक वापरण्यापासून वंचित राहता कामा नये या जाणिवेतून, उबुंटूचं आरेखन हे बहुभाषिकतेला अनुसरून करण्याकडे सुरुवातीपासूनच प्रकल्पात भर देण्यात आला. म्हणूनच आज उबुंटू, केवळ १४ वर्षांचा इतिहास असूनही, ५५ जागतिक भाषांमध्ये (ज्यात १० भारतीय भाषा आहेत) उपलब्ध आहे.

भाषेप्रमाणेच, कोणत्याही वापरकर्त्यांस असलेल्या शारीरिक अथवा मानसिक अपंगत्वामुळे किंवा अक्षमतेमुळे, तो संगणक वापरण्यापासून वंचित राहू नये या जाणिवेतून सुरुवातीपासूनच उबुंटूची दृश्यात्मकता व युजर इंटरफेसचं आरेखन एखाद्या सामान्य संगणक वापरकर्त्यांबरोबर दिव्यांग व्यक्तीलादेखील डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलं आहे.

उबुंटू प्रकल्पाचं वेगळेपण इथेच संपत नाही. ओपन सोर्स प्रकल्प व्यवस्थापनासंदर्भात वेगवेगळे प्रयोग उबुंटू प्रकल्पात करण्यात आले आहेत. अत्यंत यशस्वी प्रकल्प असूनही डेबियन लिनक्सच्या नवनव्या आवृत्त्यांच्या निर्मितीमध्ये नियमितता व सुसूत्रीकरणाचा अभाव होता. ऑपरेटिंग प्रणाली निर्मितीसारख्या मोठय़ा प्रकल्पाची व्यवस्थात्मक संस्थाबांधणी मजबूत व स्थिर असणं गरजेचं आहे याची शटलवर्थला खात्री पटली होती. म्हणूनच उबुंटूच्या निर्मितीचं एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने कॅनॉनिकल (Canonical) या कंपनीची स्थापना केली आणि उबुंटू प्रकल्पात सहभागी असणाऱ्या प्रमुख तंत्रज्ञांची पूर्ण वेळ, पूर्ण पगारी तत्त्वावर कंपनीमध्ये भरती केली. यामुळे या तंत्रज्ञांना आपला संपूर्ण वेळ उबुंटूसाठी देणं शक्य होणार होतं, तसंच जाहीर केलेल्या मुदतीत उबुंटूच्या नवनवीन आवृत्त्या नियमितपणे प्रसिद्ध करणंदेखील शक्य होणार होतं.

कॅनॉनिकल ही खऱ्या अर्थाने ‘व्हर्चुअल’ कंपनी होती. तिचं मुख्यालय म्हणजे शटलवर्थचं लंडनमधलं घर होतं व यात पूर्ण वेळ काम करणाऱ्या तंत्रज्ञांना ऑफिसमध्ये एका छताखाली आणण्याऐवजी शटलवर्थने त्यांना आपापल्या देशात त्यांच्या सोयीनुसार काम करण्याची मुभा दिली होती. कॅनॉनिकलच्या भक्कम आर्थिक पाठिंब्यामुळे गेले जवळपास १४ र्वष दर सहा महिन्यांनी उबुंटूची नवी आवृत्ती बाजारात दाखल करणं प्रकल्पाच्या व्यवस्थापन समितीला शक्य झालं आहे. जिथे प्रचंड आर्थिक ताकद व कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असूनही मायक्रोसॉफ्ट व अ‍ॅपलला आपल्या विंडोज व मॅक ओएसच्या नव्या आवृत्त्या बाजारात आणायला २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो, तिथे उबुंटूचं हे वेगळेपण नजरेत भरण्यासारखं आहे.

जरी शटलवर्थला उबुंटूच्या व्यावसायिक आस्थापनांमधल्या वापरातून कॅनॉनिकलसाठी महसूल मिळवणं अपेक्षित असलं तरीही तो किती व कधीपासून मिळेल याची कसलीच शाश्वती देता आली नसती. उबुंटू प्रकल्पाचं भवितव्य दीर्घकाळ सुनिश्चित करण्यासाठी शटलवर्थने उबुंटू फाऊंडेशन या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना केली व त्यात स्वत:चा एक कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला. या संस्थेच्या माध्यमातून उबुंटू प्रकल्पासाठी शटलवर्थला अधिकृतपणे देणगीमूल्य स्वीकारता येऊ  लागलं.

शटलवर्थ एवढय़ावरच थांबला नाही. उबुंटू समुदायात इतर काही ओपन सोर्स प्रकल्पांच्या समुदायांप्रमाणे हेवेदावे, राजकीय पेचप्रसंग किंवा वादविवाद फारसे होऊ  नयेत म्हणून त्याने प्रकल्पात सहयोग देणाऱ्या तंत्रज्ञांसाठी एक आचारसंहिताच तयार केली. एखाद्या तंत्रज्ञाला प्रकल्पात सहभागी करून घ्यायच्या आधी त्याला आचारसंहिता पूर्ण समजून घेऊन ती पाळण्याची संमती द्यावी लागे. ‘मी प्रकल्पाच्या संदर्भात काही मत नोंदवताना प्रकल्पातल्या इतर सहयोगी तंत्रज्ञांच्या मतांचा व भावनांचासुद्धा विचार करेन, स्वत:च्या हितापेक्षा समुदायाच्या हिताला सदैव प्राधान्य देईन, वैचारिक मतभेद संपूर्ण समुदायासमोर लगेचच चव्हाटय़ावर आणण्याआधी काही तज्ज्ञांचा सल्ला घेईन.’ अशा वर्तणुकीसंदर्भातल्या अनेक बाबींचा या आचारसंहितेत विचार केला होता. उबुंटूची आचारसंहिता पुढे अनेक ओपन सोर्स प्रकल्पांत काही जुजबी बदल करून वापरण्यात आली.

उबुंटूची खासियत ही की इतर लिनक्स वितरणांच्या तुलनेत तिचा प्रसार विकसनशील देशांत खूप जोमाने झाला. भारतातलंच उदाहरण घ्यायचं तर आज आपल्या न्यायालयांत सर्व स्तरांवर उबुंटू वापरली जाते.  डेस्कटॉप पीसीवर लिनक्सला लोकप्रिय करण्याचं पूर्ण श्रेय उबुंटूकडेच जातं. लिब्र ऑफिस, फायरफॉक्स ब्राऊझर, व्हीएलसी मीडिया प्लेयर, जिम्प इमेज प्रोसेसरसारख्या अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर प्रणालींचा अंतर्भाव पुढील काळात झाल्यामुळे उबुंटूची लोकप्रियता अधिकच वाढली. असो. २१व्या शतकाच्या पूर्वसंध्येला ऑपरेटिंग प्रणाली, वेब सव्‍‌र्हर किंवा ब्राऊझपर्यंत सीमित असलेली ओपन सोर्सची व्याप्ती पुढील दशकात प्रचंड वाढली आणि महाजालातल्या विविध पोर्टल्स व संकेतस्थळांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रणालींसाठी ओपन सोर्सचा पर्याय उपलब्ध झाला. महाजालाच्या या ‘ओपन आर्किटेक्चर’बद्दलची चर्चा आपण पुढील लेखात करू.

amrutaunshu@gmail.com

मराठीतील सर्व महाजालाचे मुक्तायन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The broad concept of humanism
First published on: 13-08-2018 at 00:51 IST