१९८०च्या दशकाच्या अंतापर्यंत युनिक्सचा बहर ओसरत चालला होता व मुख्यत्वे करून तिचं प्रोप्रायटरीकरण झाल्यामुळे ती ओपन सोर्स चळवळीपासून दुरावली होती. एटीअँडटी व कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या कायदेशीर लढाईमुळे बीएसडीचं भवितव्य अधांतरी होतं. फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन ही संस्था आपल्या मुक्त ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याच्या मूळ उद्देशापासून भरकटत चालली होती आणि फ्री व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसाराखेरीज फारसं भरीव काम तिच्या हातून होत नव्हतं.

याच्याच जोडीला मायक्रोसॉफ्टसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या कंपन्यांची घोडदौड जोमाने सुरू असल्याने १९९० सालच्या अंतापर्यंत ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीचं (तेव्हा खरं तर असं नामकरणही झालं नव्हतं) स्वरूप हे काही मूठभर, हौशी संगणक तंत्रज्ञांनी अशाच काही समविचारी तंत्रज्ञांसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअर प्रणाली व्यवस्थेपुरतंच सीमित होतं. जीपीएलसारख्या परवाना पद्धतीमुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या वितरण व्यवस्थेस एक औपचारिक बैठक मिळाली असली तरी तिच्यातील जाचक अटींमुळे तिचा वापर मर्यादित स्वरूपातच होत होता.

एकंदर एका बाजूला ओपन सोर्स व्यवस्था मुख्य प्रवाहाबाहेरच होती, तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिक सॉफ्टवेअर निर्मिती व वितरणासाठी कॉपीराइटच्या नियमांचा वापर करून, सॉफ्टवेअरचे व त्याच्या सोर्स कोडचे सर्व हक्क निर्मात्यांकडे सुरक्षित ठेवणारी प्रोप्रायटरी व्यवस्थाच प्रमाण मानली जाऊ  लागली होती. १९९१ नंतर मात्र पुढील ४-५ वर्षांतच या परिस्थितीत झपाटय़ाने बदल घडत गेला. ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीमध्ये नवसंजीवनी फुंकणाऱ्या व एकंदरीतच संगणकीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या लिनक्स प्रणालीने सगळी समीकरणे पार बदलून टाकली.

या सर्वाची सुरुवात झाली जानेवारी १९९१ मध्ये. त्या महिन्यात फिनलंडमधल्या हेलसिंकी विद्यापीठात द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या लिनस टॉरवल्ड्स या विद्यार्थ्यांने वैयक्तिक वापरासाठी एक संगणक (पीसी) विकत घेतला. इंटेल कंपनीच्या ८०३८६ चिपवर चालणारा, चार मेगाबाइट अंतर्गत मेमरी (रॅम) व ४० मेगाबाइट हार्डडिस्क असलेला असा तो संगणक होता. आज, प्रत्येकाच्या खिशात सुपर कॉम्पुटरच्या क्षमता असलेला मोबाइल असण्याच्या काळात लिनस टॉरवल्ड्सचा संगणक आदिमानवाच्या कालखंडातला वाटू शकेल. पण त्या काळातल्या संगणकांच्या मानाने टॉरवल्ड्सचा पीसी बराच शक्तिमान होता.

त्या काळातील इतर पीसींप्रमाणेच टॉरवल्ड्सच्या पीसीवरसुद्धा मायक्रोसॉफ्टची डॉस (डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम) हीच ऑपरेटिंग प्रणाली विराजमान झाली होती. टॉरवल्ड्स हा हाडाचा संगणक अभियंता होता. त्याला सोर्स वितरित न करणारी डॉस प्रणाली वापरण्यास यत्किंचितही रस नव्हता. किंबहुना सोर्स कोड वितरित न करणाऱ्या डॉससारख्या सॉफ्टवेअरचा त्याला तिरस्कारच होता. त्याची हॅकर मनोवृत्ती ही युनिक्ससारख्या खुल्या प्रणालीशी अधिक जवळीक साधणारी होती. पण त्याच्या विद्यापीठातल्या संगणक प्रयोगशाळेत अत्यंत मोजक्या संगणकांवर युनिक्स वापरात होती. तिच्या वापरासाठी विद्यापीठातल्या प्राध्यापक, संशोधक व त्याच्या समवयस्क विद्यार्थ्यांच्या मोठाल्या रांगा लागलेल्या असत. त्यामुळेच प्रत्येकास अगदी मोजकाच वेळ तिच्यावर काम करण्यासाठी मिळे.

युनिक्स प्रोप्रायटरी बनल्यामुळे ती एवढी महाग बनली होती की वैयक्तिक वापरासाठी युनिक्सची एखादी प्रत विकत घेणे टॉरवल्ड्सच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्या काळात अ‍ॅमस्टरडॅममधल्या राईज विद्यापीठात (Vrije University) संगणकशास्त्राची प्राध्यापकी करणाऱ्या अँड्रय़ू टॅननबॉम या प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग व ऑपरेटिंग प्रणालीचे सोप्या पद्धतीने, प्रात्यक्षिकांसह शिक्षण देण्यासाठी बनवलेल्या ‘मिनिक्स’ (MINIX – MINi unIX चं लघुरूप) नावाच्या ऑपरेटिंग प्रणालीबद्दल टॉरवल्ड्स ऐकून होता. हाडाचा शिक्षक असलेला टॅननबॉम हा अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होता. त्याची ऑपरेटिंग प्रणाली व डेटाबेसवरील पुस्तके आजही संगणकशास्त्राचे विद्यार्थी वापरतात. त्या काळात युरोपमधील विविध विद्यापीठांत त्याची मिनिक्स प्रणाली प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अगदी हमखास वापरली जात होती.

नावाप्रमाणेच मिनिक्स ही ऑपरेटिंग प्रणाली आरेखनामध्ये युनिक्सशी साधर्म्य साधणारी पण युनिक्सपेक्षा बऱ्याच लहान आकाराची (मिनिएचर) व मर्यादित व्याप्तीची होती. तिचे वैशिष्टय़ म्हणजे ती पीसीवर वापरता येऊ  शकत होती व त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅननबॉमने ती १०० अमेरिकी डॉलरहूनही कमी किमतीत फ्लॉपी डिस्कवर सोर्स कोडसकट उपलब्ध करून दिली होती.

तिच्या याच वैशिष्टय़ांमुळे टॉरवल्ड्सने मिनिक्स प्रणाली विकत घेऊन आपल्या पीसीवर तिचा वापर सुरू केला. एवढंच नाही तर मिनिक्सच्या सोर्स कोडचा आधार घेत त्याने एका नव्या ऑपरेटिंग प्रणालीच्या उभारणीला प्रारंभ केला. त्याचा झपाटा इतका मोठा होता की मिनिक्स वापरण्याच्या ६ महिन्यांच्या आतच, १९९१ च्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याच्या या नव्या ऑपरेटिंग प्रणालीचा गाभा (कर्नल) लिहून तयार होता.

ही नवी प्रणाली युनिक्सवर (व काही प्रमाणात मिनिक्सवर) आधारित असल्याने टॉरवल्ड्सने तिला आपल्या नावाची आद्याक्षरं जोडून ‘लिनक्स’ असं नाव दिलं. ऑगस्ट १९९१ मध्ये टॉरवल्ड्सने लिनक्सच्या कर्नलचा सोर्स कोड संगणक तंत्रज्ञांच्या एका इंटरनेट ग्रुपवर प्रसिद्ध केला. लिनक्सबद्दलच्या त्याच्या भूमिकेचा अधिक खुलासा त्याने खालीलप्रमाणे केला.

‘मी मिनिक्सच्या खुल्या आवृत्तीवर आधारित अशा नव्या ऑपरेटिंग प्रणालीवर गेले काही महिने काम करीत आहे. ती आज प्राथमिक स्तरावर वापरण्यायोग्य स्वरूपात तयार आहे, जिचे मी लिनक्स असे नामकरण केले आहे. ही एका हॅकरने हॅकर्ससाठी बनविलेली प्रणाली आहे. जर तुमच्यापैकी कोणीही आपल्या मोकळ्या वेळात त्यावर काम करून त्यात सुधारणा करू इच्छित असेल तर मी त्याचे मनापासून स्वागत करतो व तुम्हा सर्वाना ऐच्छिक सहयोगाचे आवाहन करतो. याचसाठी मी ही प्रणाली सोर्स कोडसकट वितरित करत आहे.’

टॉरवल्ड्सच्या वरील आवाहनाला अगदी अनपेक्षितपणे विलक्षण प्रतिसाद मिळाला. १९९१ सालच्या अंतापर्यंतच जगभरात विखुरलेले शंभरहून अधिक लोक लिनक्स प्रकल्पात सामील झाले. त्यातल्या बऱ्याच जणांनी प्रकल्पात भरघोस योगदान देण्यास (जसं सोर्स कोडमधील त्रुटी, उणिवा अथवा चुका दूर करणे, प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे किंवा तिला नवी वैशिष्टय़े बहाल करणे इत्यादी) सुरुवात केली. १९९२-९३ मध्ये लिनक्स प्रकल्पातील संगणक तंत्रज्ञ व प्रोग्रामर्सचा सहभाग वाढत गेला. १९९४ मध्ये टॉरवल्ड्सने लिनक्स ऑपरेटिंग प्रणालीची पहिली अधिकृत आवृत्ती (१.०) प्रसिद्ध केली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती सोर्स कोडसकट इच्छुकांना उपलब्ध करून दिली.

लिनस टॉरवल्ड्सने आपल्या मोकळ्या वेळात, तांत्रिक नवनिर्मितीची ऊर्मी शमविण्यासाठी निर्मिलेल्या पण अल्पावधीतच ओपन सोर्स चळवळीचे नायकत्व पत्करलेल्या लिनक्स नामक ऑपरेटिंग प्रणालीने १९९४-९५ नंतर जो झंझावात तयार केला तो आजतागायत टिकून राहिला आहे. लिनक्सची भूमिती श्रेणीने झालेली वाढ व तिचं ओपन सोर्स व्यवस्थेतलं योगदान अभ्यासणं हे विस्मयकारक तर आहेच, पण त्याचबरोबर उद्बोधक व स्फूर्तिदायीदेखील आहे; ज्याचं विश्लेषण आपण पुढील लेखांमध्ये करणार आहोत.

– अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com