15 December 2019

News Flash

ओपन सोर्स-निर्मितीक्षम अंत:प्रेरणा

विविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले..

|| अमृतांशू नेरुरकर

ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं शोधायचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या कंपनीने काही वर्षांपूर्वी केला. विविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले..

जगभरात विखुरलेले सॉफ्टवेअर तंत्रज्ञ व प्रोग्रामर्स यांच्या सहभागामधून निर्मिलेल्या लिनक्स, अपॅची, मायएसक्यूएलसारख्या व्यापक व गुंतागुंतीच्या ओपन सोर्स प्रकल्पांनी सॉफ्टवेअर व्यवस्थापनाची एक विभिन्न व प्रोप्रायटरी मार्गानी बनणाऱ्या सॉफ्टवेअर व्यवस्थेशी समांतर पण कार्यक्षमतेच्या बाबतीत थोडी अधिक उजवी अशी व्यवस्था निर्माण केली आहे. इंटरनेटच्या व्यासपीठाचा वापर करून सामुदायिक स्तरावर घडणारी व सहभागात्मक प्रक्रियेतून बंधमुक्त ज्ञानाची निर्मिती करणारी अशी ही व्यवस्था आहे.

आज ओपन सोर्स सॉफ्टवेअरने जग पादाक्रांत केलंय. जगभरातल्या प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल करणाऱ्या बलाढय़ बँका आणि वित्तीय संस्थांपासून एकविसाव्या शतकातल्या डिजिटल कंपन्यांपर्यंत आज बहुसंख्य कंपन्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा आपल्या मध्यवर्ती प्रणालींसाठी व्यावसायिकपणे वापर करीत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यापीठं व संशोधन संस्थादेखील आपापल्या शैक्षणिक व संशोधन कार्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरलाच प्राधान्य देत आहेत. आणि हे सर्व या व्यवस्थेला कोणताही भक्कम आर्थिक पाठिंबा नसताना केवळ गेल्या दोन दशकांत घडलं आहे.

म्हणूनच या व्यवस्थेच्या यशाचा तात्त्विक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यवस्थापकीय अशा विविध दृष्टिकोनातून विचार करणं इथे अप्रस्तुत ठरणार नाही. लिनक्ससारखं सॉफ्टवेअर जेवढं गुंतागुंतीचं आहे तेवढेच ओपन सोर्स व्यवस्थेसंदर्भात वरील दृष्टिकोनांतून विचारले गेलेले प्रश्नदेखील गहन आहेत, ज्यांची उत्तरं सरळसोट पद्धतीने देता येणार नाहीत. प्रस्तुत लेखात आपण ओपन सोर्स व्यवस्थेचा सामाजिक अंगाने विचार करणार आहोत.

कोणत्याही आर्थिक परताव्याची हमी नसताना संगणक तंत्रज्ञ ओपन सोर्स प्रकल्पांत आपला वेळ व शक्ती का देतात किंवा दुसऱ्या शब्दात, ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं काय असतील, हा ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल पडणारा एक मूलभूत प्रश्न आहे. इथे काही मिथकं दूर सारावी लागतील, नाही तर या प्रश्नाची सुलभीकरण केलेली ठरावीक साच्याची उत्तरं आपल्या हाती येतील.

पहिलं म्हणजे ओपन सोर्स व्यवस्था ही काही समविचारी तंत्रज्ञांचा फावल्या वेळातला छंद म्हणून अस्तित्वात नाहीए. तसंच इथे विचारांची व सॉफ्टवेअर कोडची देवाणघेवाण नि:स्वार्थी व निरलस पद्धतीने होत नाहीए. जर तसं असतं तर हे तंत्रज्ञ आपल्या योगदानाचं श्रेय स्वत:ला मिळवण्यासाठी एवढे धडपडले नसते, तसंच ओपन सोर्स प्रकल्पांत जवळपास रोज सातत्यपूर्ण पद्धतीने घडणारे वादविवाद घडलेच नसते. किंबहुना हे खुल्या पद्धतीने घडणारे वादविवाद ओपन सोर्स प्रकल्पांचा अविभाज्य घटकच आहेत. मागील एका लेखात चर्चिलेला व लिनक्स प्रकल्पाचं विभाजन होईल की काय असं वाटावं इतक्या विकोपाला गेलेला टॉरवल्ड्स – मिलर वाद हे याचं एक महत्त्वाचं उदाहरण!

दुसरं म्हणजे केवळ ओपन सोर्स तत्त्वांशी निष्ठा असणारे व प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा कट्टर विरोध करणारेच फक्त ओपन सोर्स प्रकल्पांत भाग घेत नाहीत. रिचर्ड स्टॉलमनचे निस्सीम भक्त सोडले तर बऱ्याच तंत्रज्ञांचा ओपन सोर्सबरोबर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्यास जराही विरोध नसतो. जरी सोर्स कोड खुला ठेवण्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा असला तरीही व्यावहारिक कारणांसाठी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्याची ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांची तयारी असते. म्हणूनच अपॅची, मायएसक्यूएलसारख्या ओपन सोर्स प्रकल्पांच्या नेतृत्वाने प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या आयबीएम किंवा ओरॅकलसारख्या कंपन्यांबरोबर भागीदारी करताना तत्त्वांपेक्षा व्यावहारिकतेलाच महत्त्व दिले.

ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं शोधायचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या अमेरिकेतल्या अग्रगण्य सल्लागार कंपनीने काही वर्षांपूर्वी केला. विविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून व त्यातून हाती आलेल्या माहितीचं विश्लेषण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले. पहिल्या गटाला त्यांनी ‘बिलिव्हर्स’ असं म्हटलं. या गटातील तंत्रज्ञांचा ओपन सोर्सच्या तत्त्वांवर, विशेषत: सोर्स कोड खुला असण्याच्या तत्त्वावर, गाढ विश्वास होता; किंबहुना ही तत्त्वंच त्यांच्या ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देण्यामागची मुख्य प्रेरणा होती.

दुसऱ्या गटाला त्यांनी ‘प्रोफेशनल्स’ किंवा व्यावसायिक असं संबोधलं. या मंडळींना ओपन सोर्स तत्त्वांशी फारसे घेणे-देणे नव्हते. त्यांच्यासाठी हे प्रकल्प म्हणजे तंत्रज्ञांच्या समुदायांमध्ये स्वत:चा नावलौकिक कमावण्याचा व त्याद्वारे अधिक चांगली नोकरी पटकावण्याचा केवळ एक मार्ग होता. तिसरा गट हा ‘फन-सीकर्स’, अर्थात आनंदोपासकांचा होता. ओपन सोर्स प्रकल्पांतील तांत्रिक आव्हाने सर करताना मिळणारी बौद्धिक उत्तेजना आणि त्यातून निर्माण होणारा आत्मिक आनंद त्यांना या प्रकल्पांत आपले योगदान देण्याची ऊर्जा पुरवत होती. शेवटचा गट हा आपली तांत्रिक कौशल्यं विकसित करण्यावर भर देणाऱ्या ‘स्किल-एन्हान्सर्स’चा होता. हा गट विशेषकरून कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा नुकत्याच पदवी घेतलेल्या तरुणांचा होता, ज्यांना अशी तांत्रिक कौशल्यं विकसित करणं त्यांच्या पुढील व्यावसायिक कारकीर्दीसाठी महत्त्वाची वाटत होती.

कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात राजकीय आणि सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या स्टिव्हन वेबर यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर या विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. त्यांनी काढलेले निष्कर्ष हे वरील सर्वेक्षणात काढण्यात आलेल्या निष्कर्षांशी काही प्रमाणात मिळतेजुळते असले तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की इतक्या ढोबळमानाने तंत्रज्ञांना चार विभिन्न गटांत विभागणं तितकंसं योग्य नाही. प्रत्येक तंत्रज्ञाची ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याची विविध कारणं असतात, जरी अशा वेगवेगळ्या कारणांचं महत्त्व प्रत्येकासाठी कमी-जास्त असेल.

आपल्या शोधनिबंधात त्यांनी तंत्रज्ञांची ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याची काही प्रमुख कारणं विशद केली आहेत. आपल्या नोकरीत प्रगती करण्यासाठी या ज्ञानामुळे फायदा व्हावा या उद्देशाने, तांत्रिक वर्तुळात आपला नावलौकिक वाढतो व त्यामुळे काही प्रमाणात स्व-अभिमान वजा अहंकार वृद्धिंगत होतो म्हणून, मायक्रोसॉफ्टसारख्या प्रोप्रायटरी विश्वातल्या महाकाय शत्रूचा संयुक्तपणे पाडाव करण्याच्या उद्देशाने, गुंतागुंतीचे प्रोग्राम लिहून आपली सर्जनशीलता वाढते आणि आत्मिक आनंद मिळतो म्हणून, तांत्रिक कौशल्य जलद आत्मसात करण्यासाठी आणि अखेरीस, ओपन सोर्स व्यवस्था ही ज्या आचारविचारांच्या स्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार करते त्या तत्त्वांशी बांधिलकी वाटते म्हणून, अशा विविध कारणांचं सखोल विश्लेषण प्राध्यापक वेबर यांनी आपल्या संशोधनात केलं आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की ओपन सोर्स प्रकल्पात योगदान देणारा प्रत्येक संगणक तंत्रज्ञ हा ओपन सोर्स तत्त्वांनी भारून गेल्यामुळे अशा प्रकल्पांत काम करतो, अशा प्रकारची बाळबोध व एकरेषीय कारणमीमांसा या प्रश्नाची होऊ  शकत नाही. वर चर्चिल्याप्रमाणे ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याच्या मानसिकतेमागे वेगवेगळे अंत:प्रवाह विविध प्रतलांवर काम करीत असतात. अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतूनच लिनक्ससारखा यशस्वी प्रकल्प उभा राहतो.

असं जरी असलं तरीही ओपन सोर्स व्यवस्थेमागच्या यशाचं हे स्पष्टीकरण अपूर्णच आहे. ओपन सोर्स व्यवस्थेचा सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर पुढील लेखात आपण या व्यवस्थेमागे असलेल्या (सोर्स कोडच्या) देवाणघेवाणीसंदर्भातल्या आर्थिक तर्कशास्त्राचं विश्लेषण करू. यातून या व्यवस्थेच्या यशामागची कारणं अजून स्पष्ट होत जातील.

amrutaunshu@gmail.com

First Published on October 1, 2018 2:01 am

Web Title: what is open source software 2
Just Now!
X