|| अमृतांशू नेरुरकर

दैनंदिन कामासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा चार लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली आहेत. मुख्य म्हणजे या  प्रणाली वापरण्यासाठी  संगणकावर डेबियन किंवा उबुंटूसारखी ऑपरेटिंग प्रणाली असण्याची काहीच गरज नाही..

ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या आणि नव्वदच्या दशकात फोफावलेल्या ओपन सोर्स चळवळीने एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सॉफ्टवेअर उद्योगाच्या मुख्य धारेत आपलं स्थान बळकट करण्याला प्रारंभ केला होता. अनेक व्यावसायिक आस्थापनांनी लिनक्ससारख्या ओपन सोर्स प्रणालीचा वापर आपल्या कंपन्यांच्या मध्यवर्ती सॉफ्टवेअर प्रणाली चालवण्यासाठी करण्यास सुरुवात केली होती. मागील अनेक आठवडय़ांत आपण लिनक्ससारख्याच लोकप्रिय व ओपन सोर्स इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या अपाची वेब सव्‍‌र्हर, मायएसक्यूएल डेटाबेस, पीएचपी, डेबियन, उबुंटू वगैरेसारख्या विविध ओपन सोर्स प्रणालींचा विस्तृत परामर्श घेतला.

उबुंटू व मोझिला फायरफॉक्सचा अपवाद सोडला तर आपण चर्चिलेल्या बाकी जवळपास सर्व ओपन सोर्स प्रणाली या मुख्यत्वेकरून सव्‍‌र्हरवर चालणाऱ्या असल्याने त्या वैयक्तिक वापरासाठी सर्वसामान्य संगणक वापरकर्त्यांकडून तितक्याशा वापरल्या जात नाहीत. प्रस्तुत आणि पुढील लेखात आपण चार अत्यंत लोकप्रिय व दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा ओपन सोर्स प्रणालींचा आढावा घेणार आहोत. मुख्य म्हणजे या चारही प्रणाली वापरण्यासाठी आपल्या संगणकावर डेबियन किंवा उबुंटूसारखी लिनक्ससदृश ऑपरेटिंग प्रणाली असण्याची काहीच गरज नाही, कारण या प्रणाली मायक्रोसॉफ्ट विन्डोज व अ‍ॅपल मॅक ओएसवरही तेवढय़ाच व्यवस्थितपणे चालतात. आज या प्रणालींनी आपापल्या कार्यक्षेत्रात समकक्ष प्रोप्रायटरी प्रणालींना समर्थ पर्याय उपलब्ध करून दिलाय म्हणूनच त्यांची इथे नोंद घेणे अनुचित ठरणार नाही.

१) जिम्प (GIMP) – जीएनयू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम किंवा थोडक्यात जिम्प ही नावाप्रमाणेच डिजिटल स्वरूपातल्या प्रतिमांचं संपादन व हाताळणी करणारी प्रणाली आहे. नव्वदच्या दशकात कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ हे ओपन सोर्स चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. याच विद्यापीठात शिकणाऱ्या स्पेन्सर किंबल व पीटर मॅटिस या दोघा विद्यार्थ्यांनी आपला पदव्युत्तर प्रकल्प म्हणून त्याची निर्मिती १९९५मध्ये केली. त्या वेळेला अडोबी कंपनीचं फोटोशॉप हे सॉफ्टवेअर डिजिटल प्रतिमेवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जायचं. प्रोप्रायटरी असल्या कारणाने तसेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचं लायसन्सिंग शुल्क बरंच जास्त होतं. पण त्याहूनही मुख्य अडचण ही होती की, फोटोशॉप हे त्या काळात नावारूपाला येत असलेल्या लिनक्स प्रणालीवर चालण्यास असमर्थ होतं.

याच अडचणींवर मात करण्यासाठी किंबल आणि मॅटिसने आपल्या प्राध्यापकांचा विरोध असतानाही अशा अनवट प्रकल्पाची निवड केली. चार महिने रात्रंदिवस काम करून या दोघांनी फेब्रुवारी १९९६मध्ये या प्रणालीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली व तिचा सोर्स कोड लिनक्सच्या इंटरनेटवरील समुदायांबरोबर खुला केला. सुरुवातीला या प्रणालीचं नाव जनरल इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम असं होतं. १९९७मध्ये जेव्हा फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचा संस्थापक आणि जीएनयू प्रकल्पाचा संचालक रिचर्ड स्टॉलमनने कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा किंबल आणि मॅटिसने त्याची भेट घेतली. त्या काळात जीएनयू प्रकल्पाचा आणि एकंदरच स्टॉलमनचा ओपन सोर्स विश्वात चांगलाच दबदबा होता. किंबल आणि मॅटिसने स्टॉलमनकडे त्यांची जिम्पला जीएनयू प्रकल्पाचा एक भाग बनविण्याची आपली इच्छा बोलून दाखवली व सोर्स कोडला जीपीएल लायसन्सच्या शर्तीवर वितरित करण्याची सुद्धा तयारी दर्शवली.

स्टॉलमनदेखील जिम्प प्रकल्पाबद्दल ऐकून होताच. अडोबी फोटोशॉपला हा एक समर्थ पर्याय बनू शकेल याची स्टॉलमनला खात्री वाटली. त्याचप्रमाणे यामुळे जीएनयू प्रकल्पाचीही व्याप्ती वाढली असती. स्टॉलमनने किंबल आणि मॅटिसचा प्रस्ताव उचलून धरला व प्रणालीच्या नावाचा पहिला शब्द ‘जनरल’वरून ‘जीएनयू’ असा बदलण्यात आला. अर्थात,  यामुळे सॉफ्टवेअर ज्या ‘जिम्प’ नावाने ओळखले जात होते, त्यात काहीच बदल होणार नव्हता.

जिम्पच्या सुरुवातीच्या अनेक आवृत्त्या वापर सुलभता व युजर इंटरफेसच्या दृष्टीने फोटोशॉपच्या तुलनेत अनेक योजने मागे होत्या. त्यामुळेच सुरुवातीची अनेक वर्षे जिम्प जरी अनेक हौशी डिझायनर्सनी वापरलं असलं, तरी व्यावसायिक स्तरावर फारसं वापरलं जात नव्हतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र ही उणीव दूर करण्याचा जिम्प समुदायाने चंग बांधला व वापर सुलभतेत सुधार करण्यासाठी युजर इंटरफेस विषयामधील तंत्रज्ञांचा एक स्वतंत्र गट स्थापन केला. यानंतर मात्र जिम्पने मागे वळून पाहिले नाही. तिची तांत्रिक बाजू आधीच भक्कम होती. २०१० नंतर तिच्या दृश्यात्मकतेतदेखील पुष्कळ सुधारणा झाली. गेल्या पाच वर्षांपासून जिम्प ही वैयक्तिकप्रमाणेच व्यावसायिक स्तरावरदेखील मोठय़ा प्रमाणात वापरली जाऊ  लागली आहे. २०१५ साली निर्मिलेल्या ‘लुकास द गेम’ या सुप्रसिद्ध व्हिडीओगेमचं संपूर्ण डिझाईन हे केवळ जिम्प वापरून करण्यात आलेलं आहे. आज जवळपास सर्व स्वरूपाच्या डिजिटल प्रतिमा (जेपेग, जिफ, पीएनजी वगैरे) जिम्पवर हाताळल्या जाऊ  शकतात. उबुंटू तसेच रेड हॅटनेही आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या डेस्कटॉप पॅकेज वितरणामध्ये जिम्पचा समावेश केलेला आहे, यावरूनच त्याची कार्यक्षमता व लोकप्रियतेचा अंदाज यावा.

२) व्हीएलसी (श्छउ) – व्हीएलसी मीडिया प्लेयर किंवा व्हीएलसी हा ऑडिओ तसेच व्हिडीओस्वरूपाची दृकश्राव्य माहिती (आधीच साठवलेली किंवा थेट प्रक्षेपित केलेली) वापरकर्त्यांला सादर करू शकणारी प्रणाली आहे. जिम्पप्रमाणेच व्हीएलसीची निर्मिती नव्वदच्या दशकाच्या मध्यावर इकॉल सेन्ट्राल या पॅरिसमधील विद्यपीठात संगणकशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी प्रकल्पासाठी केली. व्हीएलसी हे ‘व्हिडीओलॅन क्लायंट’चं लघुरूप आहे. व्हीएलसीच्या निर्मात्यांचा मूळ उद्देश हा अशी एक प्रणाली निर्माण करण्याचा होता की, ज्यायोगे विद्यापीठाच्या सव्‍‌र्हरवर उपलब्ध असलेला सर्व प्रकारचा मल्टिमीडिया पाहण्याची सोय त्या सव्‍‌र्हरला लोकल एरिया नेटवर्कद्वारे (लॅन) जोडलेल्या संगणकांवर विनासायास व्हावी. त्यामुळे व्हीएलसी जशी वापरकर्त्यांच्या संगणकावर चालायची तशीच व्हीएलएस (व्हिडीओलॅन सव्‍‌र्हर) नावाची प्रणाली सव्‍‌र्हरवर चालवणं आवश्यक होतं.

ही मर्यादा दूर करण्यासाठी १९९८ साली व्हीएलसीचं पुनर्लेखन करण्यात आलं, ज्यामुळे आता व्हीएलसीला सव्‍‌र्हरवर चालवण्याची गरज नव्हती. असं असलं तरीही व्हीएलसी अजूनही इकॉल सेन्ट्रालपुरतीच सीमित होती. २००१ साली मात्र इकॉल सेन्ट्रालने व्हीएलसीच्या सोर्स कोडला जीपीएल लायसन्स शर्तीवर खुलं केलं आणि व्हीएलसी प्रकल्प खऱ्या अर्थाने ओपन सोर्स झाला. २००३ साली जॉन-बॅप्टिस्ट केम्पफ् या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांने इकॉल सेन्ट्राल विद्यापीठात प्रवेश घेतला. वर्षभराच्या अवधीतच तो व्हीएलसी प्रकल्पातील एक प्रमुख तंत्रज्ञ बनला. सुरुवातीपासूनच केम्पफ् ला व्हीएलसीचं इकॉल सेन्ट्रालवरचं अवलंबित्व रुचत नव्हतं. त्याच्या मनात व्हीएलसी आणि मल्टिमीडिया तंत्रज्ञानावर आधारित इतर ओपन सोर्स सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची निर्मिती करण्याचे विचार घोळत होते. २००७ साली व्हीएलसी प्रकल्पप्रमुख बनल्यानंतर त्याने आपल्या स्वप्नाचा त्वरित पाठपुरावा करण्यास सुरुवात केली व २००९ साली व्हिडीओलॅन नावाच्या एका ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची निर्मिती केली. एवढय़ावरच तो शांत बसला नाही तर व्हीएलसी प्रकल्पाला संपूर्णत: व्हिडीओलॅनच्या छत्राखाली आणण्याची त्याची कल्पना तो इकॉल सेन्ट्राल विद्यापीठातल्या संचालक मंडळाच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला.

त्यानंतर मात्र व्हीएलसी प्रकल्पाने व व्हिडीओलॅन संस्थेने गगनभरारी घेतली. आज व्हीएलसी ही ४८ भाषांमध्ये उपलब्ध असलेली आणि सर्वात जास्त प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडीओ फॉरमॅट्स चालवू शकणारी एकमेव प्रणाली आहे. एवढंच नव्हे तर व्हीएलसी ही केवळ डेस्कटॉप पीसीवर मर्यादित नाहीए तर आज सर्व महत्त्वाच्या मोबाइल ऑपरेटिंग प्रणालींवरसुद्धा (जसं अँड्रॉइड, आय-ओएस, विन्डोज फोन वगैरे) ती वापरली जाऊ  शकते. व्हिडीओलॅन आज व्हीएलसीच्या बरोबरीने मल्टिमीडिया क्षेत्रातल्या इतर अनेक ओपन सोर्स प्रकल्पांवर काम करते. मायक्रोसॉफ्टच्या विनअ‍ॅम्प मीडिया प्लेयरला एक समर्थ, किंबहुना अनेक बाबतीत त्यांच्याहूनही वरचढ, पर्याय व्हीएलसीने उपलब्ध करून दिलाय हे नक्की! म्हणूनच जिम्पप्रमाणेच उबुंटूने आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या डेस्कटॉप पॅकेज वितरणामध्ये व्हीएलसीचाही समावेश केलेला आहे.

असो. कार्यकालीन कामांसाठी (जसे ई-मेल पाठवणे, दस्तऐवज बनवणे, आकडेमोडीसाठी तक्ते बनवणे तसेच सादरीकरण करणे) विविध सॉफ्टवेअरची आपल्याला  गरज लागत असते. अशा कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ओपन सोर्स प्रणालींचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.