25 February 2021

News Flash

लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली-२

जिम्प व व्हीएलसी या दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींचा आढावा आपण मागील लेखात घेतला.

|| अमृतांशू नेरुरकर

जिम्प, व्हीएलसी, लिब्रि-ऑफिस व थंडरबर्ड या चार प्रकल्पांतून ओपन सोर्स व्यवस्थेची काही वैशिष्टय़े समोर येतात. यांची निर्मिती ही मुख्यत्वेकरून संबंधित क्षेत्रात असलेली ओपन सोर्स प्रणालींची उणीव भरून काढण्यासाठी होती.

प्रतिमा संपादन व हाताळणी तसेच विविध प्रकारचा दृक्श्राव्य स्वरूपातला मल्टिमीडिया चालवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनुक्रमे जिम्प व व्हीएलसी या दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींचा आढावा आपण मागील लेखात घेतला. एखादा सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपल्या दैनंदिन कार्यकालीन कामांसाठी (जसे ई-मेल पाठवणे, दस्तऐवज बनवणे, आकडेमोडीसाठी तक्ते बनवणे तसेच सादरीकरण करणे) विविध सॉफ्टवेअर प्रणालींचा सतत उपयोग करत असतो. प्रस्तुत लेखात आपण या कामांसाठी उपयुक्त ठरतील अशा दोन लोकप्रिय ओपन सोर्स प्रणालींबद्दल चर्चा करणार आहोत.

१) लिब्रि-ऑफिस (Libre- Office) : ही आजच्या घडीला दैनंदिन कार्यालीन कामकाज करण्यासाठीची सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली आहे. तसेच  लिब्रि-ऑफिस प्रकल्प हा सर्वाधिक सक्रिय ओपन सोर्स प्रकल्पांपैकी एक आहे. लिब्रि-ऑफिस प्रकल्प २०१० साली सुरू झाला असला तरी त्याची मुळं ही सन मायक्रोसिस्टिमच्या स्टार ऑफिस प्रणालीमध्ये सापडतात.

नव्वदच्या दशकाखेरीस सन मायक्रोसिस्टिमने ‘ऑफिस’ सॉफ्टवेअर क्षेत्रात आपला जम बसविण्यासाठी व मायक्रोसॉफ्टच्या सुप्रसिद्ध एमएस ऑफिसला शह देण्यासाठी स्टार ऑफिस या एमएस ऑफिसच्या समकक्ष प्रणालीची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकत घेतले. पहिली दोन वर्षे बराच प्रयत्न करून पाहिल्यानंतरही सन मायक्रोसिस्टिमला एमएस ऑफिसचा पाडाव करणं जराही जमलं नाही. त्यामुळे २००० सालच्या उत्तरार्धात सनने सुरुवातीला प्रोप्रायटरी असलेल्या स्टार ऑफिस प्रणालीला ‘ओपन-ऑफिस’ अशा नामकरणासह ओपन सोर्स म्हणून पुनर्वितरित केले.

एमएस ऑफिसला अगदी तुल्यबळ नसला तरीही एक सक्षम ओपन सोर्स पर्याय उपलब्ध झाल्यामुळे जगभरातल्या तंत्रज्ञांनी या प्रकल्पाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला व त्यातल्या अनेकांनी त्यात योगदान देण्यासही सुरुवात केली. अल्पावधीतच ओपन-ऑफिस प्रणाली ही विविध लिनक्स वितरणांबरोबर मायक्रोसॉफ्टच्या विन्डोज ऑपरेटिंग प्रणालीवरही चालू लागली. २००५ सालानंतर मात्र या प्रकल्पाला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. सन मायक्रोसिस्टिमसाठी ही प्रणाली व्यावसायिकदृष्टय़ा फारशी महत्त्वाची राहिली नव्हती. हा प्रकल्प सांभाळणं दिवसेंदिवस सन मायक्रोसिस्टिमला जिकिरीचं व्हायला लागलं होतं व त्यांचा प्रकल्पातील रस हळूहळू संपायला लागला होता. २००७ सालानंतर तर सनने प्रकल्पात योगदान देणाऱ्या आपल्या तंत्रज्ञांना प्रकल्पातून हळूहळू दूर सारायला सुरुवात केली. त्याचबरोबर प्रकल्पात जगभरातून योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांनी सुचवलेल्या सूचना, बदल वा सुधारणांवर कोणतीही प्रतिक्रिया देणं किंवा कसलीही कृती करणंसुद्धा बंद केलं.

जसजशी सन ओपन-ऑफिस प्रकल्पात योगदान देणाऱ्या समुदायांच्या अपेक्षांना अपुरी पडू लागली, तसतशी समुदायांमधली बेचैनी वाढायला लागली. पुढे तर सनने ओपन-ऑफिसचा सोर्स कोड आयबीएमला तिच्या प्रोप्रायटरी लोटस ऑफिस प्रणालीमध्ये वापरायला देण्यासाठी आयबीएमबरोबर चक्क करार केला. एका ओपन सोर्स प्रणालीचा सोर्स कोड असा प्रोप्रायटरी कंपनीला विकणं म्हणजे प्रकल्पातल्या समुदायाचा विश्वासघात होता. ओपन-ऑफिस प्रकल्पात ‘क्रायसिस’ उत्पन्न व्हायला सुरुवात झाली होती. २०१० सालात जेव्हा ओरॅकलने सन मायक्रोसिस्टिमला विकत घेण्याची घोषणा केली तेव्हा  या क्रायसिसची परमावधी गाठली गेली.

ओरॅकल ही १००% प्रोप्रायटरी कंपनी असल्याने ओपन-ऑफिस प्रकल्पाच्या समुदायाला तिच्या ओपन सोर्स तत्त्वांशी असलेल्या बांधिलकीबद्दल कसलीही खात्री नव्हती. ओपन-ऑफिसच्या सोर्स कोडवर आधारित एक नवा ओपन सोर्स प्रकल्प (‘फोर्क’) सुरू करणं हाच ओपन-ऑफिस प्रकल्पातल्या क्रायसिसवर एक तार्किक तोडगा होता आणि झालेही तसेच. मायकल मीक्स या ओपन-ऑफिस प्रकल्पात मोलाचं योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाने या कामी पुढाकार घेतला व प्रकल्पातल्या काही समविचारी तंत्रज्ञांना एकत्र करून त्याने ‘द डॉक्युमेंट फाऊंडेशन’ या ना-नफा संस्थेची पायाभरणी केली व सप्टेंबर २०१०मध्ये ओपन-ऑफिसला एका नव्या रूपात सादर केलं.

द डॉक्युमेंट फाऊंडेशनने ओरॅकलला या नव्या प्रकल्पासाठी ‘ओपन-ऑफिस’ हेच नाव वापरू देण्यासाठी विनंती केली होती. अपेक्षितपणे ओरॅकलने ती धुडकावून लावली. मग ‘ओपन’ किंवा मुक्त या शब्दाला समानार्थी असा ‘लिब्रि’ हा फ्रेंच शब्द शोधण्यात आला व या प्रकल्पाचं ‘लिब्रि-ऑफिस’ असं नामकरण करण्यात आलं. एकीकडे ओपन-ऑफिस प्रकल्प संपूर्णपणे बारगळला असताना लिब्रि-ऑफिसने मात्र आजतागायत आपली घोडदौड जोमाने सुरू ठेवलीय. ११५ भाषांत उपलब्ध असलेली, ‘ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट’च्या बरोबरीने एमएस ऑफिसमध्ये बनलेल्या दस्तऐवजांवरदेखील समर्थपणे काम करू शकणारी अशी ही प्रणाली आहे. म्हणूनच उबुंटू, रेड हॅटसारख्या लिनक्स वितरणांमध्ये लिब्रि-ऑफिसचा अंतर्भाव केलेला असतोच, पण त्याचबरोबर बऱ्याच शैक्षणिक, संशोधन व शासकीय संस्था आज लिब्रि-ऑफिसला पसंती देताना दिसतात. त्यामुळे जरी आजही एमएस ऑफिस हेच पहिल्या क्रमांकाचं ऑफिस सॉफ्टवेअर असलं तरीही लिब्रि-ऑफिसने त्याला एक समर्थ ओपन सोर्स पर्याय उपलब्ध करून दिलाय हे नक्की!

२) थंडरबर्ड (Thunderbird) – थंडरबर्ड ही आपल्या ई-मेल व त्या संदर्भातल्या इतर गोष्टींचं (जसं कामकाजाचं अथवा मीटिंग्सचं वेळापत्रक ठरवणं, सहकाऱ्यांशी चॅटिंग वगैरे) कार्यक्षम व्यवस्थापन करणारी ओपन सोर्स प्रणाली आहे. फायरफॉक्स या विश्वविख्यात ओपन सोर्स ब्राउझरच्या निर्मात्या मोझिला फाऊंडेशननेच थंडरबर्डची निर्मिती केलीय. थंडरबर्डच्या लोकप्रियतेमुळे जिम्प, व्हीएलसी व लिब्रि-ऑफिसप्रमाणे थंडरबर्डचाही समावेश उबुंटूच्या वितरणामध्ये केलेला आहे.

थंडरबर्डची निर्मिती ही काही प्रमाणात फायरफॉक्सशी समांतरपणे झाली आहे. फायरफॉक्सची निर्मिती ही जशी मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी झाली होती, त्याचप्रमाणे थंडरबर्डची निर्मिती ही मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम या प्रोप्रायटरी सम्राटांच्या ई-मेल व्यवस्थापन क्षेत्रातल्या लोकप्रिय प्रणालींना (अनुक्रमे आउटलूक व लोटस नोट्स) एक समर्थ ओपन सोर्स पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने झालीय.

डिसेंबर २००४ साली या प्रणालीची पहिली आवृत्ती मोझिलाने प्रसिद्ध केली. मोझिलाचा फायरफॉक्स ब्राउझर दोन वर्षांपूर्वीच वितरित झाला होता व त्यावर तंत्रज्ञांच्या आणि वापरकर्त्यांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या होत्या. त्यामुळे थंडरबर्ड ई-मेल व्यवस्थापन प्रणालीबद्दल ओपन सोर्स आणि एकंदरीतच संगणक क्षेत्रात बरीच उत्सुकता होती. त्यामुळे थंडरबर्डची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतरच्या पहिल्या १० दिवसांतच तब्बल १० लाखांहून अधिक प्रती लक्षावधी तंत्रज्ञ व वापरकर्त्यांकडून डाउनलोड करण्यात आल्या.

निर्मितीप्रमाणेच थंडरबर्डमधल्या सुधारणा व विस्तारदेखील फायरफॉक्सशी समांतरपणे करण्यात आला. पुढील काही वर्षांत थंडरबर्डमध्ये नव्या कार्यक्षमतांची (जसे चॅट, कॅलेंडरसारख्या सुविधा, अनेक ऑपरेटिंग प्रणालींवर चालण्यास योग्य बनवणे वगैरे) भर टाकण्यात आली. आज थंडरबर्ड ५९ भाषांमध्ये उपलब्ध आहे व जवळपास सर्व आघाडीच्या ऑपरेटिंग प्रणालींवर काम करण्यास सक्षम आहे. २०१५ सालानंतर मोझिलाने, फायरफॉक्सच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, थंडरबर्ड प्रकल्पातील आपला सक्रिय सहभाग कमी केला असला तरीही ई-मेल व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची ओपन सोर्स प्रणाली म्हणून तिचे स्थान अबाधित आहे.

जिम्प, व्हीएलसी, लिब्रि-ऑफिस व थंडरबर्ड या चार प्रकल्पांच्या विश्लेषणातून ओपन सोर्स व्यवस्थेची काही वैशिष्टय़े समोर येतात. या प्रणालींची निर्मिती ही मुख्यत्वेकरून त्या त्या संबंधित क्षेत्रात असलेली ओपन सोर्स प्रणालींची उणीव भरून काढण्यासाठी होती. काही वेळेला प्रोप्रायटरी व्यवस्थेतल्या संयुक्त शत्रूंचा (मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, ओरॅकल वगैरे) पाडाव करण्याचाही हेतू त्यामागे असतो. बऱ्याचदा प्रणालीच्या पहिल्या आवृत्तीची निर्मिती ही दोन-तीन तंत्रज्ञांनी एकत्र येऊन केलेली असते. त्यामुळे सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये व्यावसायिक सफाईचा अभाव असला तरीही जर त्यात तांत्रिक श्रेष्ठत्व असेल व नेतृत्वाकडून प्रकल्पाची दिशा सुस्पष्ट दिसत असेल तर समुदायांकडून भरघोस स्वरूपाचं योगदान मिळू शकतं. आणि अखेरीस जर प्रकल्पाचं नियोजन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेकडून जर समुदायाला योग्य प्रतिसाद मिळत नसेल किंवा ओपन सोर्स तत्त्वांची पायमल्ली होत असेल तर एक नवा प्रकल्प (फोर्क) सुरू होण्याची दाट शक्यता असते.

असो. ओपन सोर्सच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर सॉफ्टवेअरव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतदेखील ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित काही प्रयोग केले गेले . या बद्दल आपण  पुढील लेखात चर्चा करू.

amrutaunshu@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 12:29 am

Web Title: what is open source software 7
Next Stories
1 लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली
2 ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स
3 ओपन सोर्स लायसन्स आणि व्यवस्थापन 
Just Now!
X