12 July 2020

News Flash

ओपन सोर्स – विस्तारणारी क्षितिजं

माध्यम, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग राबवले गेले.

|| अमृतांशू नेरुरकर

माध्यम, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग राबवले गेले. ते मग यशस्वीही ठरले..

या लेखमालेच्या सुरुवातीपासून मागील आठवडय़ातल्या लेखापर्यंत आपण ओपन सोर्स व्यवस्थेला ऐतिहासिक, तात्त्विक, मानसशास्त्रीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थापकीय अशा अनेक अंगांनी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. ओपन सोर्स संकल्पनेचा उगम जरी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये झाला असला तरीही ओपन सोर्सच्या मुळाशी असलेली तत्त्वं या व्यवस्थेला अधिक व्यापक बनवतात. म्हणूनच जसजशी ओपन सोर्स व्यवस्थेची लोकप्रियता वाढत गेली तसतसे सॉफ्टवेअरव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतदेखील ओपन सोर्स तत्त्वांवर आधारित काही प्रयोग, विशेषत: एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केले गेले.

ओपन सोर्सच्या या विस्तारणाऱ्या क्षितिजाचा आढावा घेण्यापूर्वी या व्यवस्थेला व्यापक परिमाण देणाऱ्या काही वैशिष्टय़ांचं विश्लेषण करणं उद्बोधक ठरेल. ज्या निर्मिती व्यवस्थेत खाली नमूद केलेली ओपन सोर्ससदृश वैशिष्टय़े आहेत तिथे ओपन सोर्स निर्मितीपद्धत प्रभावी ठरण्याची बरीच शक्यता असते.

१) जिथे कोणत्याही स्वरूपातल्या ज्ञानाची किंवा वस्तूची निर्मिती भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेल्या व्यक्तींच्या ऐच्छिक सहभागामुळे होऊ  शकते. जिथे प्रत्येक सहयोगी व्यक्तीने दिलेला लहानातील लहान सहभाग उपयुक्त ठरू शकतो.

२) अशा प्रकारे निर्माण झालेल्या ज्ञानाचं एक सार्वजनिक ठेव म्हणून संवर्धन केलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी, तसेच तिचे उपयोजन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव (वय, लिंग, शिक्षण, देश वगैरे) केला जात नाही किंवा कसल्याही प्रकारचं (कॉपीराइट, बौद्धिक संपदा वगैरे) बंधन लादलं जात नाही.

३) जिथे मर्यादित संसाधनं व जुजबी तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्तीदेखील कमीत कमी खर्चात आपलं अर्थपूर्ण योगदान त्या वस्तूच्या निर्मितीत देऊ  शकते.

४) जिथे प्रकल्पामधले अंतर्गत व्यवहार, चर्चा, वाटाघाटी अत्यंत खुल्या व पारदर्शक पद्धतीने पार पडतात. जिथे प्रकल्पातल्या इतर सहयोगींनी वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेल्या पुनरावलोकनाला व त्यांनी दिलेल्या प्रतिसादाला प्रचंड महत्त्व असते.

५) जिथे एखाद्या व्यक्तीच्या प्रकल्पातल्या सक्रिय सहभागासाठी बिगर-आर्थिक स्वरूपातल्या काही प्रबळ प्रेरणा आहेत.

आज माध्यम क्षेत्र, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन क्षेत्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले, ज्यातल्या काही ठळक प्रयोगांचा परामर्श आपण या आणि पुढील लेखात घेणार आहोत.

जैवविज्ञान व त्यातील संशोधनाची परिणिती म्हणून आकार घेणारे औषध निर्माण क्षेत्र जरी अनेक बाबतींत सॉफ्टवेअर क्षेत्राहून संपूर्णपणे भिन्न असले तरी एका बाबतीत मात्र त्यांच्यात बरेच साम्य आहे. दोनही क्षेत्रांमध्ये निर्माण होणारे ज्ञान हे बौद्धिक संपदा हक्कांच्या अखत्यारीत येते. सॉफ्टवेअर क्षेत्रात कॉपीराइट नियमांच्या आधारे किंवा जैवविज्ञान क्षेत्रात पेटंट्सच्या आधारे बौद्धिक संपदा हक्कांच्या कृत्रिम भिंती उभारून, ज्ञानसाठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी किल्ली ही फक्त ठरावीक विशेषाधिकार असणाऱ्या लोकांकडेच सुरक्षित ठेवता येते. या तात्त्विक साधम्र्यामुळे विसाव्या शतकाच्या अंतापासूनच ओपन सोर्स तत्त्वांशी जवळीक साधणारे अनेक प्रयोग या क्षेत्रात केले गेले आहेत.

यातला सर्वात वैशिष्टय़पूर्ण, यशस्वी आणि या क्षेत्रातला आजपर्यंतचा सर्वात मोठा सहयोगात्मक प्रकल्प म्हणून ज्याचं यथार्थपणे वर्णन करता येईल, तो प्रकल्प म्हणजे ‘ह्य़ूमन जीनोम’ प्रकल्प अर्थात मानवी जनुकीय आराखडय़ाला योग्य क्रम लावण्याचा प्रकल्प! अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थतर्फे नव्वदच्या दशकात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीपासूनच या प्रकल्पात सहयोगावर प्रचंड भर देण्यात आला होता. त्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापनाने विविध सहयोगींच्या सहकार्याने तयार होणारा जनुकीय डेटा व माहितीच फक्त खुली केली नाही तर त्यापुढे जाऊन या तयार झालेल्या माहितीचा दर्जा सुधारणे, चुका दुरुस्त करणे वगैरे कार्य सुलभतेने करता यावीत (ज्याला जीवशास्त्रीय भाषेत अ‍ॅनोटेशन असं म्हटलं जातं) म्हणून ‘डिस्ट्रिब्युटेड अ‍ॅनोटेशन सिस्टिम’ नामक एका ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली. या प्रणालीमध्ये प्रकल्पात काम करणाऱ्या एका सहयोगी टीमकडून पूर्ण केलेल्या कामाचं दुसऱ्या टीमकडून पुनरावलोकन करणं (पीअर रिव्ह्य़ू) तसेच दोन गटांकडून एकाच प्रकारच्या जनुकीय आराखडय़ावर झालेल्या कामाचा तुलनात्मक अभ्यास करणं खूप सोपं झालं. १९९८ पासून या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने वेग घेतला आणि मानवी जनुकांना क्रम लावून त्यांचा एकत्रित डेटाबेस तयार करण्याचं आव्हानात्मक, किचकट आणि वेळकाढू काम अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केलं.

इंटरनॅशनल हॅपलोटाइप मॅपिंग प्रोजेक्ट (‘हॅपमॅप’ प्रकल्प) हा ह्य़ूमन जीनोम प्रकल्पाची पुढची पायरी होता. यात जनुकांमध्ये आनुवंशिकतेमुळे निर्माण होणाऱ्या तफावतीचा एक आकृतिबंध तयार करण्याचं (ज्याला हॅपलोटाइप असं म्हटलं जातं) आणि त्यांचा विविध आजारांसोबत असलेला परस्परसंबंध तपासण्याचं काम हाती घेतलं होतं. अलायन्स फॉर सेल सिग्नलिंग (‘एएफसीएस’) प्रकल्पात अमेरिकेतल्या जैवविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या नऊ  शैक्षणिक संस्था एकत्र आल्या होत्या. शरीरात घडणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांचा मानवी पेशींवर होणारा परिणाम अभ्यासून त्यांचा रोगांशी असणारा संबंध तपासण्याचं अत्यंत किचकट काम या प्रकल्पात हाती घेतलं होतं. प्रकल्पात निर्माण होणारा डेटाबेस (एखाद्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर) संशोधकांसाठी खुला ठेवण्याचं बंधन या प्रकल्पात होतं. विविध सरकारी, शैक्षणिक तसेच व्यावसायिक अशा हजार एक आस्थापनांचं सहकार्य या प्रकल्पाला मिळत आहे.

वरील तीनही प्रकल्पांत मुख्यत: जैववैज्ञानिक डेटाबेसच्या निर्मितीचं काम ओपन सोर्स पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यापुढील टप्पा म्हणजे ओपन सोर्स पद्धतीने एखादं नवं औषध किंवा उपचारपद्धतीची निर्मिती करणं! हे महत्त्वाकांक्षी काम ‘द ड्रग्स फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह’ (डीएनडीआय) या प्रकल्पात हाती घेतलं गेलं.

गेली दोन दशकं आरोग्य व्यवस्थापनामध्ये जागतिक स्तरावर काही महत्त्वाची आव्हानं भेडसावत आहेत. एक म्हणजे तिसऱ्या जगाला ग्रासणाऱ्या काही प्रमुख रोगांना (जसे क्षयरोग, मलेरिया किंवा आफ्रिकेत आढळणारे काही दुर्मीळ आजार) अटकाव करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या औषध निर्मितीकडे झालेले संपूर्ण दुर्लक्ष! या रोगांना बळी पडणाऱ्या रुग्णांची क्रयशक्ती मर्यादित असल्याने बाजार नियमाप्रमाणे जगभरातल्या आघाडीच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा रोगांवरच्या लसी किंवा औषधाच्या निर्मितीसाठी संशोधन करण्यास फारशा अनुकूल नसतात. त्यांना मुख्यत: जीवनशैलीशी निगडित आजारांवर (जसे हृदयरोग किंवा मधुमेह) संशोधन करणं नफा कमावण्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. त्याचबरोबर जरी अशा ‘उपेक्षित’ आजारांवर काही औषध उपलब्ध असलेच तरीही जिथे अशा औषधाची खरीच गरज आहे त्या देशातल्या रुग्णांना ते वाजवी किमतीत मिळण्याची सुतराम शक्यता नसते. कारण या कंपन्या पेटंटच्या नियमांमुळे मिळणाऱ्या विशेषाधिकाराचा फायदा घेत अशा औषधांच्या ‘जेनरिक’ पद्धतीच्या निर्मितीला अटकाव करतात.

या आव्हानाचा ओपन सोर्स पद्धत अनुसरून समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ‘डीएनडीआय’ या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेचा जन्म २००३ साली झाला. विविध शैक्षणिक व संशोधन संस्था आणि शासकीय मदतीच्या आधारे तसेच जगभरातल्या तज्ज्ञांच्या सहयोगाने डीएनडीआयने आजवर मलेरिया, काही विशिष्ट जातींच्या कीटकांच्या चावण्यामुळे होणारा शागास रोग यांसारख्या आजारांवर सहा नव्या उपचारपद्धती तयार केल्या आहेत. जैवविज्ञानातील या ओपन सोर्स क्रांतीमध्ये भारताचादेखील सक्रिय सहभाग आहे. भारताने आपल्या सीएसआयआर या शासकीय संशोधन संस्थेच्या माध्यमातून ‘ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी’ हा प्रकल्प चालू करून क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी एक आश्वासक पाऊल टाकले आहे.

ओपन सोर्स जैवविज्ञान हा खरं तर स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्यामुळे एका लेखात या व्यापक विषयाला न्याय देणे निव्वळ अशक्य आहे. पण या निमित्ताने ओपन सोर्सची तत्त्वं ही केवळ सॉफ्टवेअरपुरती मर्यादित नाहीत याची जरी जाणीव झाली तरी या लेखाचा उद्देश सफल होईल. पुढील लेखात इतर काही क्षेत्रांतल्या ओपन सोर्सच्या प्रभावी अंमलबजावणीचा आपण परामर्श घेऊ.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2018 12:25 am

Web Title: what is open source software 8
Next Stories
1 लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली-२
2 लोकप्रिय ओपन सोर्स प्रणाली
3 ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्स
Just Now!
X