राज्यात यात्रा आणि उत्सवांदरम्यान व्यापक स्वच्छता जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आता दिले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असले, तरी या मोहिमेला अपेक्षित यश मिळू शकले नाही. या पाश्र्वभूमीवर यात्रा आणि उत्सवांच्या संधीचा योग्य वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जत्रा भरतात. यावेळी मोठी गर्दी उसळते. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी यावेळी जनजागृतीचे कार्यक्रम राबवल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत त्याची महती पोहोचू शकेल, असे पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ हा नारा देऊन अभियान सुरू केले. राज्यातील लोकप्रतिनिधी आणि सेलेब्रिटींनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई केली. मात्र, ही मोहीम काही दिवसांपुरतीच मर्यादित ठरली. शासनाने शौचालयांच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान पुरवण्याचा निर्णय घेतला. अनुदानाची रक्कम ४ हजार ६०० रुपयांवरून १२ हजार रुपयांपर्यंत करण्यात आली.
मात्र, गेल्या वर्षांत ५ लाख ९६ हजार शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट विविध कारणांमुळे अपुरे राहिले. प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि गावकऱ्यांची उदासीनता त्यासाठी कारणीभूत मानली गेली. चालू आर्थिक वर्षांतही या मोहिमेची प्रगती समाधानकारक नाही.
महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानासाठी राज्यातील ९ नामवंतांनी स्वच्छतादूत म्हणून काम करण्यास तयारी दर्शवली आहे. यापूर्वीही राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छताविषयक कामांना प्राथमिकता देण्यात आली आहे, पण अनेक गावे अजूनही हागणदारीमुक्त झालेली नाही. अस्वच्छतेमुळे अतिसार, मलेरियासारखे आजार उद्भवतात. विशेषत: लहान मुलांना याची लगेच लागण होते. पावसाळ्यात त्याचा अधिक प्रादुर्भाव जाणवतो. स्वच्छताविषयक जनजागृतीसाठी आजवर मोठय़ा प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे, पण त्यातून अपेक्षित यश मिळू शकलेले नाही.
नाशिक, पंढरपूरमध्ये वाव
राज्यातील दोन मोठय़ा यात्रांचा उल्लेख पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आपल्या पत्रात केला आहे. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा आणि पंढरपूरच्या यात्रेत लोकजागृतीसाठी मोठा वाव आहे. राज्यातील इतर भागात यात्रा आणि उत्सवांच्या काळात ‘सॅन्डी भारत’ आणि ‘सेफ ड्रिकिंग वॉटर’ ही मोहीम हाती घेता येऊ शकेल. सॅन्डी भारत मिशन अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून जनजागृती मोहीम राबवावी, अशी सूचना करण्यात आली आहे. यात्रा संपल्यानंतर होणारी घाण साफ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च होतो. अनेक ठिकाणी तर निधीअभावी स्वच्छतेची कामे न झाल्यास गंभीर स्थिती उद्भवते. यात्रेकरूंना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आक्रमकपणे ही मोहीम राबवावी, असेही राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला कळवण्यात आले आहे.

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ