३१ मार्चच्या आधी निधी वितरीत करण्याचे आदेश
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील पोलिस खबऱ्यांना पुरस्कार स्वरूपात १ कोटी ३८ लाखाची आर्थिक मदत दिली जाणार असून हा निधी ३१ मार्चच्या आधी वितरित करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस दलाला देण्यात आले आहेत.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्य़ात नक्षल चळवळ सक्रीय आहे. यातही गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्य़ात नक्षल चळवळीची मूळ खोलवर रुजली आहेत. महाराष्ट्रात गडचिरोली या एकमेव जिल्हय़ातील जंगलावर नक्षलवाद्यांचे अधिराज्य आहे. मात्र, राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे या चळवळीलाही धक्का बसलेला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलिसांनी खबऱ्यांची नियुक्ती केली आहे. नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपून खबरे पोलिसांना माहिती देत असतात. यासाठी खबऱ्यांना ठराविक रक्कम पुरस्कार स्वरूपात दिली जाते. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत १ कोटी ३८ लाखांचा निधी यासाठी देण्यात आलेला आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात सोमवारी अध्यादेश जाहीर केला आहे. ३० जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार ६९ लाखांचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला, तर उर्वरीत ५५ लाख २० हजाराच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. गडचिरोलीत नक्षल कारवाया संपुष्टात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ पोलिस उपविभाग आहेत. १४ पोलिस ठाणे, १४ उपपोलिस ठाणे, १४ आऊट पोस्ट कार्यान्वित केले आहे. यासोबतच नवीन नक्षलप्रभाव क्षेत्रात पोलिस मदत केंद्र, शिबिरे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरची, चामोर्शी, एटापल्ली, धानोरा तालुक्यातील नक्षल घटनांच्या ठिकाणी नक्षलवाद्यांची स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हा पोलिस, सी-६०, सीआरपीएफ बटालियन, एसआरपीफ कोब्रा बटालियन, नक्षलविरोधी पथक, विशेष पोलिस दल तैनात केलेले आहे. या सर्व दलाला खबरे नक्षलवाद्यांची माहिती पुरवत असतात. त्या मोबदल्यात त्यांना आर्थिक पुरस्कार दिले जातात. राज्य शासनाकडून येणारी मदत खबऱ्यांना वेळोवेळी वितरित केली जाते. यावर्षी आलेली मदत ३१ मार्च पहिले वितरित करावी लागणार आहे.