हिंदू संस्कृतीतील विविध प्रतिमांचा अंतर्भाव असलेला आणि सुबक कोरीवकामाने वैशिष्टय़पूर्ण ठरलेला सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या शंखाचा शोध लागला आहे. कल्याण येथील फडके कुटुंबीयांच्या साईबाबा मंदिरामध्ये असलेला हा शंख सोमवारी पुणेकरांना पाहता आला.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विशेष पाक्षिक सभेमध्ये या अद्भुत शंखाविषयीची माहिती इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी दिली. पुरातत्त्वशाखेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, डेक्कन कॉलेजचे उपसंचालक डॉ. वसंत िशदे आणि मंडळाचे सचिव डॉ. श्री. मा. भावे या प्रसंगी उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, व्याख्यानमालेसाठी जानेवारीमध्ये मी कल्याण येथे गेलो होतो. त्या वेळी चिंतामणी फडके यांनी माझी भेट घेऊन साईबाबा मंदिराचे दर्शन घ्यावे, अशी विनंती केली. ‘माझ्या आजोबांनी शिर्डीहून साईबाबांच्या पादुका आणल्या आहेत’, अशी माहिती फडके यांनी दिली. दर्शन घेताना माझे लक्ष तेथील शंखावर गेले. मी देगलूरकर सरांशी संपर्क साधून हा शंख पुण्याला आणला आणि डॉ. श्रीकांत प्रधान यांनी या शंखाच्या अभ्यासावर प्रकाश टाकला. १५ सेंटीमीटर उंच आणि १० सेंटीमीटर खोली असलेल्या या शंखावर कोरीव काम आहे. गजमुख, अश्वस्वार यांसह त्रिमिती कलाकुसर असलेला हा शंख वैशिष्टय़पूर्ण असल्याचे ध्यानात आले. अिजठा लेणी, कान्हेरी गुफा, कर्नाटकातील बदामी आणि अहिवळे येथील लेण्यांवर असलेल्या कोरीवकामातील प्रतिमा आणि शंखावरील प्रतिमा यामध्ये विलक्षण साम्य आढळते. यावरून हा शंख किमान दीड हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज बांधता येतो.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. एका शंखासाठी पुण्यातील इतके शंख एकत्र येऊ शकतात, यावरून शंखाचे महत्त्व लक्षात येते. संस्कृतीची केवळ जाणीव असून उपयोगाचे नाही. संस्कृतीच्या रक्षणासाठी आपण काही करत नाही हे वास्तव आहे.
रवी परांजपे म्हणाले, देशाचा इतिहास जेवढा महत्त्वाचा तेवढाच वारसा हा देखील महत्त्वाचा आहे. वारसा जतन करण्यातून सत्व आणि स्वत्व जपले जाते.